आईला उद्योजिका व्हायचंय..

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:49

udyojika%20aai2.jpg

आपले शिक्षण, आपल्या अंगी असणारे कलागुण, कौशल्ये ह्यांना वाव मिळावा, त्यांच्या योगे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे असे अनेक जणींच्या मनात असते. परंतु घरगुती जबाबदार्‍या, बालसंगोपन किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडून पूर्ण वेळाची नोकरी/व्यवसाय करणे मात्र शक्य नसते. स्वतःमधील क्षमता, कौशल्ये माहीत असतात. घरबसल्या "काहीतरी" करायचंय ही ऊर्मी सतत अस्वस्थ करत असते. पण हे "काहीतरी" कुठून आणि कसे सुरू करावे ह्याबद्दल मात्र मन साशंक असते.

आपल्या मायबोलीकरांपैकी बरेच जण प्रथितयश व्यावसायिक/उद्योजक/उद्योजिका आहेत तर काही लघु उद्योजक/उद्योजिका आहेत. खालील प्रश्नावलीच्या आधारे ज्या आयांना अशा प्रकारे उद्योग/ व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल त्यांना आपले अनुभवी मार्गदर्शन लाभावे, त्यांच्या शंकांचे निरसन होऊन प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

तेव्हा ह्या उगवत्या उद्योजिकांना आत्मविश्वासाने नवीन सुरुवात करण्यासाठी मदत कराल ना!

आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या अनुषंगाने आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का?

design.jpg

१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

३. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल कुठल्या मार्गांनी उभारता येते? कुठले पर्याय उपलब्ध असतात? त्यासाठी सामान्यतः कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? कमीत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील कोणकोणते व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत?

४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?

५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?

१०. या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत.

११. अन्य काही सल्ले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पोस्टी आहेत. वाचते आहे. Happy

मी जे काम करते, त्याला व्यवसाय म्हणावं अथवा नाही याबद्दल खात्रीशीररीत्या सांगता येणार नाही. पण संयुक्ता संयोजकांकडून मी इथे लिहावं अशी विनंती करणारं ई-मेल आलं, म्हणून काही मोजक्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. (माझा भांडवली व्यवसाय नसल्यामुळे काही प्रश्न माझ्या बाबतीत लागू होत नाहीत.)

----------------------------

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
संपर्क प्रस्थापित करणे आणि वाढवणे यासाठी ई-मेल, इण्टरनेट, फोन हे हवंच.
creative - supportive writingच्या बाबतीत editing softwaresची compatibility हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासंबंधीची आपली माहिती अद्ययावत ठेवावी. ज्या प्रकाशकांना तुम्ही तुमचं लेखन देणार त्यांच्याशी त्याबद्दल खुलेपणानं चर्चा करावी. हस्तलिखित / कम्प्युटर टायपिंग - यांपैकी तुम्ही कशात अधिक comfortable आहात हे त्यांना खुलेपणानं सांगावं. त्यांच्याकडच्या softawareशी तुमचं घरचं software compatible आहे अथवा नाही हे वेळीच पडताळून पहावं. मुळात तुमच्याजवळ एक परिपूर्ण editing software असणं अत्यावश्यक आहे.

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?
जितकी जाहिरात जास्त, तितका अधिक व्यवसाय, असं काही ठामठोक समीकरण नसतं. mouth publicity आणि पध्दतशीरपणे केली गेलेली जाहिरात यांचा योग्य तो ताळमेळ साधला जावा. मागणी असेल तसा आणि तितका योग्य तो पुरवठा करण्यावर भर द्यावा. उत्तम सेवा असेल, तुमचं final product अपेक्षा पूर्ण करणारं असेल, तर जाहिरात आपोआप होतेच.
नेटवर्किंगसाठी सोशल मिडियाचा चांगला वापर करता येतो. कॉण्टॅक्टस्‌ कसे वाढवायचे हे प्रत्येकाच्या स्वभावधर्मावर अवलंबून असतं. एखाद्याला ई-मेलमधून संपर्क साधणं सोयीचं आणि उपयोगी वाटतं. कुणाला प्रत्यक्ष ओळख करून घेऊन थेट संवाद साधायला अधिक चांगलं जमतं. आपण आपली संभाषणकला कुठल्या माध्यमाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो हे ओळखून त्यानुसार त्याचा वापर करावा.
शिवाय, व्यवसाय करायला लागून १ वर्ष झालेलं असू दे, नाहीतर ११, humbleness is the key!

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?
शक्य असल्यास प्रशिक्षण घेणं केव्हाही चांगलंच. पण प्रशिक्षण म्हणजेच सर्व काही नाही. किंवा प्रशिक्षण नसेल तर तुम्ही फारशी प्रगती करू शकणार नाही असं नाही. तुमचं त्या क्षेत्रातलं शिक्षण, जाण, माहिती, नवे प्रयोग करून पाहण्याची इच्छाशक्ती, यश आणि अपयशाची तुमची व्याख्या, यावर सगळं ठरतं.
मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये - हे मनात स्पष्ट असायला हवं.

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?
पहिलं अत्यंत महत्त्वाचं पथ्य म्हणजे वेळेची मर्यादा पाळणे आणि मिळालेल्या वेळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. मी जे काम करते, freelancing, creative and supportive writing, त्यापैकी creative writing ला वेळेच्या बंधनात अडकवता येतंच असं नाही. पण supportive writingच्या बाबतीत वेळेचं भान ठेवावं लागतं आणि ते ठेवलं जावं. (शिवाय, माझ्या बाबतीत, घरी एकच डेस्कटॉप असल्यामुळे computer time sharing हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी वेळेचं योग्य नियोजन अत्यावश्यक असतं.)
दुसरं, दर्जाशी तडजोड न करणे.
या दोन्हीसाठी स्वयंशिस्तीची आवश्यकता असते.
तिसरं पथ्य - स्वतःचा घरबसल्या उद्योग असला, तरी त्यासाठी dedication हे लागतंच. तेव्हा याबाबतीत घरच्यांना आपल्याला गृहित धरू न देणे आणि त्यांचे शेरे, टीका-टिप्पण्या यांच्याकडे शांतपणे दुर्लक्ष करणे.

पैसा वाचवावा, वाचवू नये याबद्दल -
आपल्या व्यवसायाच्या show-offवर, सुरूवातीच्या काळात तरी, फार पैसा घालवू नये. तो अन्य सुयोग्य कारणांसाठी खर्च करावा.
व्हिजिटिंग कार्डस्‌, लेटर हेडस्‌, चकाचक फर्निचरचं कार्यालय... या गोष्टींविनाही बस्तान बसवणं शक्य असतं यावर विश्वास ठेवावा. त्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवावा.
माझ्या कामाच्या बाबतीत, खासकरून creative writingच्या बाबतीत, आपलं लेखन वेळप्रसंगी इतरांना अभिप्रायार्थ वाचायला द्यावं लागतं. काही स्पर्धाप्रकारांत भाग घ्यायचा असल्यास तिथे पाठवावं लागतं. मराठी साहित्यविश्व, प्रकाशनविश्व अजूनही म्हणावं तितकं net-savvy नाहीये. तिथं अजूनही पांढर्‍यावर काळंच जास्त करून स्वीकारलं जातं. अशा वेळेस तुमच्या लेखनाचं presentation ही बाब खूप महत्त्वाची ठरते. त्यासाठी थोडा पैसा खर्च करण्याची तयारी हवी. (printing, spiral binding, त्यासाठी चांगल्या प्रतिच्या कागदाचा वापर, इ.)

नंदिनी, चिन्नु, susmita, ललिता, तुमच्या पोस्टी आवडल्या. चांगली माहिती मिळाली.

भ्रमर, स्मार्ट कॉन्सेप्ट सही!

वर दिलेल्या प्रश्नांमध्ये बसणारी उत्तरं बहुतेक मला द्यायला जमणार नाहीत कारण माझं काम थोडं वेगळं आहे. त्यामुळे ज्यांना काही वेगळं करुन बघण्यात इंटरेस्ट असेल त्यांच्याकरता थोडी माहिती देते. (माझी माहिती न्यू जर्सी स्टेट पुरतीच मर्यादित आहे.)

मी २०१० वर्षाअखेर रियल इस्टेट मध्ये काम करायला सुरुवात केली. ह्यातच काम करायचं असं काहीही ठरवलेलं नव्हतं. ९-५ नोकरी नको होती. माझ्या सोयीने काम करायचं आहे एवढंच मनात होतं. त्यामुळे मे महिन्यात रियल इस्टेट स्कूलला नाव नोंदवून ७५ तासांचा कोर्स करायला सुरुवात केली. शाळेची परिक्षा पास झाल्यावरच स्टेटच्या परिक्षेकरता जाता येतं. स्टेट परिक्षा पास करुन हातात लायसन्स पडलं. त्यानंतर आमच्या टाऊनमध्ये कोणते ब्रोकर्स जास्त घरं विकतात हे बघून त्या ब्रोकरकडे जाऊन लायसन्स अ‍ॅक्टिव्हेट करुन घेतलं. हे करावंचं लागतं. लायसन्स हातात पडल्यावर स्वतःचं स्वतः काम सुरु करता येत नाही. त्यांनतर प्रत्येक कंपनी त्यांच्या शाळेत पाठवून तुम्हांला ट्रेनिंग देते. ते ही पार पडलं आणि मग स्वतःच्या जीवावर हातपाय मारणं सुरु झालं. जे अजूनही चालूच आहे आणि चालूच राहील. Happy सध्या काही पार्टनर्सबरोबर पार्टनरशीपमध्ये कंपनी सुरु करुन construction मध्ये नशीब आजमावणं सुरु आहे. पुढच्या महिन्यात आमचा पहिला प्रोजेक्ट मार्केटमध्ये येईल.

सुरुवातीची गुंतवणूक :

रियल इस्टेट स्कूलच्या कोर्सचीफी, परिक्षेकरताची पुस्तकं, लायसन्सकरता लागणारे पैसे ही सुरुवातीची गुंतवणूक आहे (साधारण ८००,९००). बाकी ब्रोकरकडे गेल्यावर पूर्ण वर्षाचे ड्यु भरावे लागतात. ( वेबसाईट्स, इन्शुरन्स, रियल्टर असो. ची मेंबरशीप इ. ) वर्षाला साधारण $१५००. जरी फार बिझनेस/ डील्स झाली नाहीत तरी स्वतःच्या खिशातून पदरमोड करुन ह्या फीज भराव्या लागतातच तेव्हा त्याची तयारी असू द्यावी.

४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?

गुगल केल्यास आपल्या स्टेटचे लॉज कळतील. तिथेच नियम, अटी ही माहितीही मिळू शकेल.

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?

मार्केटींग करण्याची अत्यंत गरज आहे. स्वतःची कार्ड्स, वेबसाईट, वेगवेगळ्या वेबसाईट्स (झिलो, ट्रुलिया, रियल्टर इ) मेंबरशीप, नवीन वर्षाची ग्रिटींग्ज, कॅलेंडर्स पाठवणं, जुन्या क्लायंट्सच्या संपर्कात रहाणं इत्यादी.

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?

कस्टमर सर्विस इज द की. (कॉल्स आन्सर करणं, इमेलला पटकन उत्तर देणे) जेवढी चांगली सर्विस द्याल तेवढी लोकं तुमची पब्लिसिटी करतील. सुरवातीला डील झालं म्हणजे तुमचं काम संपलं असं अजिबातच समजू नये. जोवर घराचं क्लोजिंग होत नाही तोवर तुमचं काम, तुमचा सहभाग अजिबात संपत नाही हे लक्षात राहू द्यावं. पहिल्यांदाच घर घेणार्‍या कुंटुंबाला पहिल्यापासूनच hand holding ची, पावलोपावली मार्गदर्शनाची गरज असते हे लक्षात ठेवावं.
खोटं बोलून चुकीची माहिती पसरवणे आणि त्यातून स्वतःचाच फायदा होईल असं वागणे हे टाळावंच.

confidentiality- जर A आणि B ह्या मित्रांबरोबर काम करत असाल आणि ते ही एकमेकांचे मित्र असतील तर त्यांची कोणतीही गोष्ट एकमेकांशी शेअर न करणे ( एकमेकांचे मित्र नसले तरीही हे पथ्य पाळावंचं.)

सगळ्यांची पोस्ट्स खूपच आवडली .. छान माहिती देत आहेत सर्वजण .. Happy

विशेषतः HH, Sushmita आणि ललिता -प्रिती, तुम्ही दिलेले सल्ले खूप उपयुक्त वाटले ..

संसं, मला असं जाणवलं की इथल्या पोस्ट्स आणि उद्योजक गृपमधले काही मोजकी बीबी जे मी आतापर्यंत वाचले आहेत त्यात खूपच जास्त ओव्हरलॅप आहे .. मला अजून ह्या बीबीचा मातृदिनाशी असलेला रिलेव्हन्स् नीटसा कळलेला नाही ..

सगळ्यांनी उपयुक्त आणि मस्त माहिती दिली आहे. व्यवसाय करताना आई असणार्‍या / नुकत्याच झालेल्या / होणार्‍या स्त्रियांचे अनुभव, विचार वाचायला आवडतील. 'आई' म्हणून व्यवसाय करताना काही अडचणी / लिमीटेशन्स आल्या का? तुम्ही त्यातून कसा मार्ग काढला? याबाबत तुमचे सल्ले काय असतील? तसंच व्यवसाय करताना त्याचा मुलांवर काय / कोणता परीणाम झाला? मुलं व्यवसायाबाबत जास्त सजग झाली का? पुढे हा व्यवसाय स्विकारणं त्यांना आवडेल का?

सायो, नवीन प्रोजेक्टबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

ebay, etsy अशा साइट्सचा कुणाला काही अनुभव ? भारतात आणि भारताबाहेर ह्या दोन्ही साइट्स कशा वाटतात ? आणखी काही साइट्स आहेत का जिथे विक्री करता येते ?

सगळ्यांनी उपयुक्त आणि मस्त माहिती दिली आहे. व्यवसाय करताना आई असणार्‍या / नुकत्याच झालेल्या / होणार्‍या स्त्रियांचे अनुभव, विचार वाचायला आवडतील. 'आई' म्हणून व्यवसाय करताना काही अडचणी / लिमीटेशन्स आल्या का? तुम्ही त्यातून कसा मार्ग काढला? याबाबत तुमचे सल्ले काय असतील? तसंच व्यवसाय करताना त्याचा मुलांवर काय / कोणता परीणाम झाला? मुलं व्यवसायाबाबत जास्त सजग झाली का? पुढे हा व्यवसाय स्विकारणं त्यांना आवडेल का?
<<<+१
मला पण हा मुद्दा वाचायला आवडेल ,' आईला उद्योजिका व्हायचय' मधे हवाच हा मुद्दा !

उत्तम धागा व सर्व मुलींनी भरभरुन माहिती लिहिली आहे. खुप ऊपयोग होईल ह्या माहितीचा (जर कधी उद्योजिका व्हायचे ठरवले तर)..
धन्यवाद तुम्हाला सर्वांना मुलींनो.

आई असण्याचा आणि व्यावसायीक असण्याचा संबंध नीट कळला नाही. हीच आई कुणाची बहीण, कुणाची मुलगी कुणाची मैत्रीण असतेच की मग केवळ आई असण्याने व्यवसाय निवडीवर, करण्यावर काय परीणाम होतो? ह्या बायका आई आहेत म्हणुन नक्की काय बदलते? आयांनसाठी स्पेशल व्यवसाय आहेत काय ज्यात आई असल्याचे फायदे होतात? किंवा आया असण्याचे तोटे?

पुरुष जे व्यावसायीक असतात त्यातले से शेकडा ९९% 'बाबा' असतातच किंवा होतातच मग बाबा असल्याने त्यांच्या व्यवसाय निवडीवर करण्यावर फरक पडतो असे वाटते का?

अंजली, डीजे, पेशवा +१ ..

संसं, तुम्ही खास विनंती करून पोस्ट्स लिहायला सांगत असाल तर हे किंवा अशा प्रकारचे प्रश्नही जरूर अ‍ॅड व्हावेत असं वाटतं ..

पेशवे आणि सशल, ज्या आयांना व्यावसायिक व्हायचे आहे त्यांना स्फुर्ती मिळावी म्हणून मातृदिनानिमित्त हा उपक्रम ठेवला आहे.

स्वतःमॉम बिजनेन वुमन इथे लिहु शकत नसेल तर आपल्या पहाण्यात असलेल्या यशस्वी ' मॉम' बिजनेस वुमन ने फेस केलेली चॅलेन्जेस , त्यांचे व्ह्युज कोणी लिहिले तरी आवडेल वाचायला !

सिंडरेलाने लिहिले आहेच. मातृदिनानिमित्त धागा काढण्याचा उद्देश की आयांना जर बाहेर जाऊन नोकरी करा येत नसेल तर स्वतः च्या कौशल्यांचा, क्षमतांचा वापर करून काही घरात राहून लघुउद्योग करता येइल ह्याबद्दल जे कुणी असा व्यवसाय करत असतील त्यांचे अनुभव कळावेत, मार्गदर्श्न मिळावे.

>>
'आई' म्हणून व्यवसाय करताना काही अडचणी / लिमीटेशन्स आल्या का? तुम्ही त्यातून कसा मार्ग काढला? याबाबत तुमचे सल्ले काय असतील? तसंच व्यवसाय करताना त्याचा मुलांवर काय / कोणता परीणाम झाला? मुलं व्यवसायाबाबत जास्त सजग झाली का? पुढे हा व्यवसाय स्विकारणं त्यांना आवडेल का?
<<
+१
एका अर्थी पेशव्यांच्या प्रश्नाला हे उत्तर असेल असं वाटतं.

एका अर्थी पेशव्यांच्या प्रश्नाला हे उत्तर असेल असं वाटतं.>>+१

पुरुष जे व्यावसायीक असतात त्यातले से शेकडा ९९% 'बाबा' असतातच किंवा होतातच मग बाबा असल्याने त्यांच्या व्यवसाय निवडीवर करण्यावर फरक पडतो असे वाटते का?>>>>

पेशवे, समजा व्यावसायिक आई आणि व्यावसायिक बाबा. किंवा दोघेही एकाच व्यवसायात. मुलाला / मुलीला बरं नसेल पण त्याच दिवशी महत्वाची मिटींग असेल, डील करायचं असेल, व्हेंडर्स-सप्लायरबरोबर मिटींग असेल तर शेकडा ९९% आई घरी थांबेल का बाबा?

आई असण्याचा आणि व्यावसायीक असण्याचा संबंध नीट कळला नाही. हीच आई कुणाची बहीण, कुणाची मुलगी कुणाची मैत्रीण असतेच की मग केवळ आई असण्याने व्यवसाय निवडीवर, करण्यावर काय परीणाम होतो? ह्या बायका आई आहेत म्हणुन नक्की काय बदलते? आयांनसाठी स्पेशल व्यवसाय आहेत काय ज्यात आई असल्याचे फायदे होतात? किंवा आया असण्याचे तोटे?>>>>>>> पेशवे, सध्या फक्त घरातले बघणार्‍या (हाऊसवाईफ) स्त्रीया ह्यांना जर नोकरी/व्यवसाय सुरु करायचा असेल तर काय करता येइल हा विषय आहे. माझ्यामते इथे फरक असा आहे की सध्या फूल टाईम नोकरी/व्यवसाय न करणारं कोणी असेल (पुरुष अथवा स्त्री) तर ताबडतोब घरातल्या सगळ्या जवाबदार्‍या सोडून किंवा दुसर्‍या कोणावर टाकून फुल टाईम नोकरी/व्यवसाय करता येणं शक्य नाहीये (कमीत कमी थोडा जम बसू पर्यंत तरी) .

ह्यात परत तुमचं (म्हणजे स्त्रीयांचे) शिक्षण किती, शिक्षण असेल तर नोकरी/व्यवसायाचा पुर्वानुभव किती, घरात असलेल्या लोकांची/मुलांची जवाबदारी किती ह्या सगळ्या बाबी पण आहेत. घरातली इतर मंडळी स्त्रीयांनी स्वतः काही नोकरी/व्यवसाय करावा ह्या करता खुप सपोर्टिव असून सुद्धा मी वर दिलेल्या काही बाबींमुळे ते ध्येय गाठण्याच्या दृष्टिने पुर्ण वेळ देता येऊ शकत नाही आणि त्या करता सुरवात म्हणून का होईना पण जरा थोडा "हटके" विचार करुन जर एखादी वेगळी नोकरी किंवा वेगळा व्यवसाय सुरु केला तर फरक पडू शकतो. अशाच प्रकारचे थोडे अनुभव//सल्ले अपेक्षित असावेत. (हेच उदाहरण फिरवून पुरुषांकरता ही वापरता येइल. मुख्य मुद्दा, काही कारणांनी नोकरी/व्यवसाय करायला पुर्ण स्वातंत्र्य नसणे हा आहे)

डिजे +१.

(पोस्ट लिहू पर्यंत २-३ पोस्टी आल्या, मुद्दे रिपीट झाले असतील तर सॉरी!)

ज्यांनी कधीही उद्द्योग केला नाही पण करायची खूप इच्छा आहे , आणि ज्यांचा उद्द्योग सुरुवातीला तरी घरगुती प्रकारचा आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून हे लिहतो आहे.
१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

अगदी सुरुवातीला काहीही योजना किंवा आराखडा करू नये. पहिला ग्राहक मिळाल्यावर त्या अनुभवावरून आराखडा करावा. पहिला ग्राहक मिळवण्यासाठी. हवी असल्यास एखादी यादी (Todo List) करावी. माझ्या माहितीतले अनेक उद्द्योजक याच पायरीवर अडकतात आणि नंतर ४-५ वर्षे "अजून आराखडा करते आहे/करतो आहे" यावरच थांबतात.

२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?
बाजारपेठेचा अभ्यास ही खूपच महत्वाची गोष्ट आहे.
अ. काय विकणार हे ठरवा.
ब. ते तयार करा/स्वस्तात विकत आणा/करवून घ्या
क. फक्त एका व्यक्तिला/संस्थेला विका.

हे तुम्ही करू शकलात तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील

३. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल कुठल्या मार्गांनी उभारता येते? कुठले पर्याय उपलब्ध असतात? त्यासाठी सामान्यतः कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? कमीत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील कोणकोणते व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत?
या गोष्टी खरंच खूप नगण्य आहेत आणि त्याबद्दल माहिती देणार्‍या बर्‍याच संस्था आहेत. वर २) मधे लिहलेली गोष्ट करणे खूप जास्त अवघड आहे, ती केलीत तर खरोखर वस्तू/सेवा द्यायला किती वेळ लागतो/खर्च येतो/नफा मिळतो याचा अंदाज येईल आणि त्याप्रमाणे भांडवल मागता येईल. पुन्हा मी घरगुती उद्योगाबद्दल बोलतो आहे.

४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?
याबद्दल माहिती देणार्‍या बर्‍याच संस्था आहेत.

५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?

प्रश्न नुसत्या मागणीचा कधीच नसतो, त्यापेक्षा
अ) तुम्ही मागणी असलेल्या वस्तू हव्या असणार्‍या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता का?
ब) त्यांना ते विकू शकता का ?
क) आणि त्यातून नफा मिळवू शकता का ?

या प्रश्नांची उत्तरे शोधा.

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
एक फोन सोडला तर घरगुती उद्योगांनी पहीले ५-१० ग्राहक मिळेपर्यंत तंत्रज्ञानाचा विचारही करू नये.

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?
१ ला ग्राहक मिळवण्यासाठी जाहिरात करावी लागणार असेल तर करावी. पण तो पर्यंत प्रत्यक्षात ग्राह्कांना भेटून कशी विक्री करता येईल ते पहावे. म्हणजे जाहिरात करताना काय बोलले/व्यक्त केले तर ग्राहक प्रतिसाद देतात याची जाणीव होईल.

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?
१ ला ग्राहक मिळवण्यासाठी जितके आवश्यक आहे तितकेच करावे.

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?
पहिले १ ते ५ ग्राहक मिळवताना (तुमच्या आर्थिक कुवतीनुसार) नफ्याचा विचार जरूर करावा पण तो नाही झाला तरी त्याची तयारी ठेवावी. पहिले ५ ग्राहक हे तुमचे शिक्षक आहे आणि ते मिळवताना होणारे शिक्षण हाच तुमचा नफा असे समजावे. मी "नफ्याबद्दल" बोलतो आहे. वस्तूच्या किंवा सेवेच्या किंमतीबद्दल नाही. कुठलिही सेवा/वस्तू फुकट देवून मिळणारा ग्राहक हा ग्राहक नसतो, तो एक जाहिरात करण्याचा/नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असू शकतो.

तुम्हाला काहितरी पैसे देऊन तुमची सेवा/वस्तू विकत घेणारी व्यक्ती ही खरी ग्राहक

१०. या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत.

११. अन्य काही सल्ले.
तुम्ही काय करणार्/वस्तू कशी करणार यावर वेळ घालवू नका. आधी तुम्हाला विकणे जमते ते पहा. कारण ते जमत नसेल तुमचा उद्योग कधीच पुढे जाणार नाही. आणि विकणे जमले तर सगळ्याच गोष्टी तुम्हीच केल्या पाहिजे असे नाही.

अजय, अगदी practical सल्ले देणारी पोस्ट!
>>४-५ वर्षे "अजून आराखडा करते आहे/करतो आहे" यावरच थांबतात.
Happy

>>आधी तुम्हाला विकणे जमते ते पहा. कारण ते जमत नसेल तुमचा उद्योग कधीच पुढे जाणार नाही. आणि विकणे जमले तर सगळ्याच गोष्टी तुम्हीच केल्या पाहिजे असे नाही.
पते की बात!!

हीच आई कुणाची बहीण, कुणाची मुलगी कुणाची मैत्रीण असतेच की मग केवळ आई असण्याने व्यवसाय निवडीवर, करण्यावर काय परीणाम होतो? >>> सामान्यपणे व्यवसाय सुरु करण्याचे वय २०-६० वर्षे असते आणि त्या वयात बहिण, आई,मैत्रीण ही नाती शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीशी असते (सामान्यपणे म्हणतीये, नियमाला अपवाद असतात. घरात महिलेवर शारीरिक श्रमदृष्ट्या अवलंबून कुणी असेल जसे वृद्ध आई, अपंग भाऊ इ इ तर त्या मुलीची व्यवसायाची निवड आई होण्याआधीच प्रभावित होईल). सामान्यपणे आईपण हे शारीरिक दृष्ट्या किमान एक वर्ष 'डिमांदिंग आणि चालेन्जिंग' ठरते. त्याचा व्यवसाय निवडीवर निश्चितीच परिणाम होतो.

ह्या बायका आई आहेत म्हणुन नक्की काय बदलते? >>>
हा कळीचा मुद्दा. मानसिकता बदलते. अपत्याचे शारीरिक आणि मानसिक संगोपनासाठी आई स्वतःला १०१% जबाबदार मानायला लागते. ज्या मुलींना जाणीव आहे की आई म्हणून आपली जबाबदारी टीम कप्तान सारखी आहे त्या आई असतानाही स्वतःच्या करीयरसाठी (नोकरी, व्यवसाय इ)धडपड करतात. क्वचित आईपणाचा आनंद पूर्ण उपभोगता येणार नाही ह्या समजुतीने व्यवसाय टाळला जातो (एकवेळ नोकरी ठीक असे मत सुद्धा ऐकले आहे, रजा मिळते.)

आयांनसाठी स्पेशल व्यवसाय आहेत काय ज्यात आई असल्याचे फायदे होतात? >>> आई असल्याचा थोडाफार फायदा 'केअर-गीव्हिग' ज्या व्यवसायात असते तिथे होतो. अर्थात आई नसलेल्या काही स्त्रियाही ह्या क्षेत्रातून उत्तम काम करताना मी पाहिलेल्या आहेत. Madam Montessori ने स्वतःचे मुल वाढवले नाही असे ऐकून आहे, पण त्यामुळे त्यांची शिक्षण पद्धती कमी महत्वाची ठरत नाही.

आई असण्याचे तोटे >>> काय लिहिणार!! स्त्रीजात वाळीत टाकेल मला किंवा सल्ल्यांचे खंडकाव्य इथे लिहिले जाईल. सगळे तोटे मुल आपल्याकडे बघून हसल की विसरले जातात असे बाळकडू मिळून आम्ही वाढतो. मुल आत्ता नको, कधीच नको, आईपणाने व्यवसायात तोटा होतोय असा काही विचार मांडणे सध्या शक्य नाही. हे शेवटी 'जावे तिच्या वंशा' ...

पुरुष जे व्यावसायीक असतात त्यातले से शेकडा ९९% 'बाबा' असतातच किंवा होतातच मग बाबा असल्याने त्यांच्या व्यवसाय निवडीवर करण्यावर फरक पडतो असे वाटते का? >> हो आणि नाही. लेखाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे सहसा "घरबसल्या" काहीतरी सुरु करण्याची उर्मी असणारे बाबा माझ्या पाहण्यात फारसे नाहीत. पण मुले ५-६ वर्षाची झाली की नोकरीला आवडीचा जोडधंदा सुरु करणारे बाबा पहिले आहेत. त्यांच्याशी बोलताना जाणवते की त्यांचे गणित आर्थिक जबाबदारी किती, कशी, मुलांना 'प्रोव्हाईद' करू शकेन का ह्याच्याशी असते. मुले कोण सांभाळेल हा प्रश्न त्यांना प्राथमिक वाटत नाही.

पेशवे, चांगली पोस्ट. मला माझ्या अनुभवविश्वाला तपासावे लागले.

'आई' म्हणून व्यवसाय करताना काही अडचणी / लिमीटेशन्स आल्या का? तुम्ही त्यातून कसा मार्ग काढला? याबाबत तुमचे सल्ले काय असतील?

>>> यावर (किंवा पेशव्यांच्या प्रश्नांना उत्तरं म्हणून) लिहिण्यासारखं बरंच आहे. पण मग धागा निराळी दिशा पकडेल.

@ अजय - तुम्ही काय करणार्/वस्तू कशी करणार यावर वेळ घालवू नका. आधी तुम्हाला विकणे जमते ते पहा. कारण ते जमत नसेल तुमचा उद्योग कधीच पुढे जाणार नाही. आणि विकणे जमले तर सगळ्याच गोष्टी तुम्हीच केल्या पाहिजे असे नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट
हौस, छंद, आवड & उद्योग है सगळ्याची सांगड घालणे महत्वाचे असते. बहुतेक स्त्रिया ह्यातच गल्लत करतात.

उपयुक्त पोस्ट्स आहेत सर्वांच्या. भ्रमर चा ''स्मार्ट'' फंडा आवडला.

माझ्या जवळच्या नात्यातील काही स्त्रिया घरगुती स्वरूपाचे व्यवसाय गेली अनेक वर्षे करत आहेत.

गृह-उद्योग कॅटेगरीतला एका आप्त बाईंचा व्यवसाय आहे. त्या अंतर्गत त्या बर्‍याच वस्तू बनवतात, बनवून घेतात व विकतात. या व्यवसायातून महिन्याला किमान दहा हजार रुपये तरी सुटले पाहिजेत हे त्यांचे ध्येय असते. त्यांचे नेटवर्किंग जबरदस्त आहे व त्यांच्या घरी माणसांची भरपूर वर्दळ असते. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे विकायला असणारे साहित्य गप्पांच्या ओघात खुबीने दाखविणे, आपल्याजवळच्या विक्रीच्या वस्तूंची जाहिरात करणे, कोणाचा फोन आल्यावर त्यांना आपल्याकडे सध्या कोणत्या वस्तू आहेत / कशाची एजन्सी घेतली आहे इत्यादी माहिती देणे असे सर्व त्या अतिशय लीलया करतात.

त्यांच्याकडे बाळंतविडा, लोकरी कपडे, एप्रन्स, वेगवेगळ्या आकारांच्या कापडी पिशव्या, रुखवत / लग्नकार्यात लागणारे शोभेचे कलाकुसरीचे साहित्य, कृत्रिम फुले (क्रेप/ऑरगंडी) व पुष्पगुच्छ असे बरेच काही मिळते. त्यांनी ''टेन्डर'' नामक नारळाच्या पाण्याच्या पावडरीच्या सॅशे-विक्रीचीही एजन्सी घेतली आहे. त्यांच्याकडे श्रमिक विद्यापीठात त्यांनी ज्या बायकांना प्रशिक्षित केले त्या येऊन ऑर्डरबरहुकूम वेगवेगळ्या वस्तू/कपडे बनवून / शिवून देतात.

दुसर्‍या आप्त आहेत त्या आपल्या सुनेसोबत कपडे-कापड व साड्यांच्या विक्रीचा व कापडी अ‍ॅक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय करतात. वेगवेगळ्या ठिकाणी सुनेसोबत जाऊन कापडे / साड्या सिलेक्ट करून होलसेल भावात विकत घेणे (हैद्राबाद, इचलकरंजी, कलकत्ता, मुंबई, सोलापूर इ.) व पुण्या-मुंबईत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शने भरविणे, घरातून किरकोळ विक्री, काही कापडांचे टॉप्स शिवून घेणे - त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे भरतकाम / नक्षीकाम इत्यादी करून घेणे - ते विक्रीत ठेवणे हा त्यांचा व्यवसाय आहे. दर महिन्यात त्या किमान दोन ठिकाणी तरी प्रदर्शन भरवतातच! सून बर्‍याचदा कापडाच्या खरेदीसाठी त्या त्या ठिकाणी जाणे, ऑर्डर्स देणे, कपडे शिवून घेणे, व्यवसायाच्या इतर बाजू सांभाळणे हे बघते. तर सासूबाई मार्केटिंग, नेटवर्किंग करतात. त्यांच्या खूप ओळखी व व्यापक जनसंपर्क आहे. प्रत्येक व्यक्तीशी संपर्क ठेवणे व कुशलतेने आपल्या जवळच्या मालाची विक्री हे तंत्र त्यांना खूपच छान जमलेले आहे. सध्या सून ब्लॉक प्रिंटिंग शिकून आली आहे व तसे ड्रेस मटेरियल देखील त्या मागणीनुसार उपलब्ध करून देत आहेत. त्यांची जेव्हा प्रदर्शने असतात तेव्हा घरातील स्वैपाकपाणी, नातवंडांची देखभाल, घरातील व बाहेरची इतर कामे त्यांचे पती व मुलगा सांभाळतात. सासू-सुनांना तेव्हा घरात जास्तीत जास्त आराम मिळेल असे बघतात.

वरील दोन्ही उद्योजिका वयाची साठ वर्षे पार केलेल्या आहेत हे विशेष!

सर्वांच्याच पोस्ट खूप छान आहेत Happy अजय यांची पोस्ट पण खूप आवडली
<<कुठलिही सेवा/वस्तू फुकट देवून मिळणारा ग्राहक हा ग्राहक नसतो, तो एक जाहिरात करण्याचा/नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असू शकतो.तुम्हाला काहितरी पैसे देऊन तुमची सेवा/वस्तू विकत घेणारी व्यक्ती ही खरी ग्राहक>> एकदम पटल Happy

Pages