आईला उद्योजिका व्हायचंय..

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:49

udyojika%20aai2.jpg

आपले शिक्षण, आपल्या अंगी असणारे कलागुण, कौशल्ये ह्यांना वाव मिळावा, त्यांच्या योगे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे असे अनेक जणींच्या मनात असते. परंतु घरगुती जबाबदार्‍या, बालसंगोपन किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडून पूर्ण वेळाची नोकरी/व्यवसाय करणे मात्र शक्य नसते. स्वतःमधील क्षमता, कौशल्ये माहीत असतात. घरबसल्या "काहीतरी" करायचंय ही ऊर्मी सतत अस्वस्थ करत असते. पण हे "काहीतरी" कुठून आणि कसे सुरू करावे ह्याबद्दल मात्र मन साशंक असते.

आपल्या मायबोलीकरांपैकी बरेच जण प्रथितयश व्यावसायिक/उद्योजक/उद्योजिका आहेत तर काही लघु उद्योजक/उद्योजिका आहेत. खालील प्रश्नावलीच्या आधारे ज्या आयांना अशा प्रकारे उद्योग/ व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल त्यांना आपले अनुभवी मार्गदर्शन लाभावे, त्यांच्या शंकांचे निरसन होऊन प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

तेव्हा ह्या उगवत्या उद्योजिकांना आत्मविश्वासाने नवीन सुरुवात करण्यासाठी मदत कराल ना!

आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या अनुषंगाने आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का?

design.jpg

१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

३. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल कुठल्या मार्गांनी उभारता येते? कुठले पर्याय उपलब्ध असतात? त्यासाठी सामान्यतः कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? कमीत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील कोणकोणते व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत?

४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?

५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?

१०. या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत.

११. अन्य काही सल्ले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखीव तासांत अपत्याची जबाबदारी अन्य कोणाकडे सोपवावी असं तुम्हाला वाटतं का? की मांडीवरच्या मुलाला थोपटत फोनवर कस्टमरशी बोलणं हेच भागधेय आहे असं तुम्ही (किंवा घरातील बाकी सदस्यांनी) ठरवून टाकलं आहे? सुरुवातीच्या काळात कदाचित ही आर्थिक गरज असू शकते, पण लवकरात लवकर हे करता यावं हा निअर-टर्म-प्लॅनिंगचा भाग असतो का? असायला हवा असं तुम्हाला वाटतं का? (हो किंवा नाही यापैकी काहीही उत्तर असेल तर) का??>>

सध्या याच फेजमधे आहे म्हणून उत्तर. हो. अशी गरज निश्चितच आहे. आर्थिक गरजेपेक्षा जास्त मला योग्य व्यक्ती न मिळणे हा प्रॉब्लेम जास्त आहे. माझ्या परीने मी स्वैपाक आणि इतर घरकामाला योग्य व्यक्ती मिळाल्याने तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह केला आहे. (घरीच राहून तुला स्वैपाकाला बाई कशाला हवी? हे टोमणे ऐकलेतच अर्थात!!). शिवाय कामाचे सगळेच तास डेडीकेटेड नसल्याने चोवीस तास बाई काही मिळणार नाहीच. पण तरी शोध चालू आहे.

घरातले इतर सदस्य म्हणजे माझा नवरा. मी काम करत असताना (आणि नसतानादेखील) घरात असल्यावर तो लेकीला संभाळतो. कामानिमित्त कधी मला दिवसभर बाहेर जावं लागलं तरी तो लेकीला सांभाळतो. त्यामुळे तो घरी असेल त्या दिवशी मी जास्तीत जास्त काम करायचं असं ध्येय ठरवून मी टाईम मॅनेजमेंट करते. पुढच्या महिन्यात लेकीची शाळा चालू झाल्यावर वेगळ्या पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करावे लागेल.

मागच्या पानावर ज्या ६० + वयाच्या दोन उद्योजिकांबद्दल लिहिलंय, त्यांच्यापैकी सध्या सत्तरी ओलांडलेल्या व घरगुती व्यवसाय म्हणून बाळंतविडे, कापडी पिशव्या, सजावट-रुखवत-मंगलकार्य प्रसंगी लागणारे शोभेचे सामान इत्यादींपासून ते 'टेन्डर' नारळपाण्याच्या पावडरीची विक्री घरबसल्या करणार्‍या बाईंनी आपले व्यवसायाचे अनुभव सांगितले ते असे :

वयाच्या चाळिशीनंतर, मुली मोठ्या झाल्यावर मनातल्या ''आपण स्वतः काही अर्थार्जन करावे, व्यवसाय करावा' या सुप्त इच्छेने उचल खाल्ली. तोवर घरगुती स्वरूपात मुली, पुतण्या, भाच्या यांसाठी शिवणकाम, भरतकाम, विणकाम करत होते. त्यात उत्तम कौशल्य अवगत होते. परंतु या कौशल्याला व्यावसायिक स्वरूपात कसे बदलायचे? तसेच व्यवसायासाठी लागणारा पैसा कोठून आणायचा? असे अनेक प्रश्न होते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला कर्जाऊ बिनव्याजी दहा हजार रुपये देऊ केले. तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्यातून बाजारातून लागणार्‍या साहित्याची खरेदी केली. माझ्या बहिणीने मला एका शाळेचे ८० गणवेष शिवून दाखविण्याचे आव्हान दिले. मी व माझ्या दोन मैत्रिणींनी मिळून ते आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर आम्हाला नियमित स्वरूपात त्या व दुसर्‍या एका शाळेच्या गणवेषाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या.

त्याच जोडीला मी स्वतःचे व्यावसायिक कौशल्यही वाढवत होते. वेगवेगळ्या निष्णात टेलर्सच्या हाताखाली मोठ्या प्रमाणात कपडे शिवण्याच्या आवश्यक कौशल्याचे धडे गिरवत होते. त्याचबरोबर मी लोकरी विणकामाचे मशीनही घेतले. त्या मशीनवर लोकरी कपडे कसे शिवावेत याचा पंधरा दिवसांचा पूर्णवेळ कोर्स केला. मला येणारी कौशल्ये माझ्या मुलीही शिकल्या व मला व्यवसायात मदत करू लागल्या. शिवणकाम, विणकाम ते मालाच्या खरेदीपासून सर्व ठिकाणी माझी साथ देऊ लागल्या. मी मग गणवेष व लोकरी कपडे दोन्हींच्या ऑर्डर्स घेऊ लागले. मिळणारा नफा पुन्हा व्यवसायातच गुंतवत होते. माझ्या मैत्रिणी, मुली, बहिणी व माझी मावशी यांच्या मदतीने या व्यवसायाचा विस्तार होत गेला. माहेरी व सासरी एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप मोठा गोतावळा होता. त्यामुळे नातेवाईक व ओळखीच्यांकडूनच बर्‍याच ऑर्डर्स असायच्या. शिवाय आपल्या व्यवसायाची जाहिरात करायला अजिबात घाबरायचे नाही हे मी शिकले. आपण जर लोकांना सांगितले नाही तर त्यांना तरी ते कसे कळणार?

१९८७ सालापासून मी घरी शिवणाचे क्लासेसही घ्यायचे. बर्‍याच बायका माझ्याकडे शिवण शिकून गेल्या. नंतर श्रमिक विद्यापीठातर्फे पुण्यातल्या अनेक झोपडपट्ट्यांमधूनही मी बर्‍याच बायकांना शिवण शिकविले. अर्थात त्यात व्यवसायाचा भाग नव्हता. पण आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते केले. जय भवानी झोपडपट्टी, ताडीवाला रोडची झोपडपट्टी, औंधची झोपडपट्टी, दीपगृह सोसायटीच्या येथील जनता वसाहत अशा बर्‍याच ठिकाणी व्यक्तिशः जाऊन मी तेथील बायकांना शिवण शिकवायचे. त्यांचेच जुने कपडे उसवून त्यांवर शिवण शिकवायचे. त्यातून तीन-चार बायका अतिशय तयार झाल्या व त्यांनी स्वतःचे शिवण व्यवसाय सुरु केले - त्यांच्या येथील शाळांचे गणवेष शिवू लागल्या.

सजावटीचे सामान - मोत्याची तोरणे, महिरपी, मोत्याच्या सुपार्‍या, मोत्याची फुले इत्यादी कलाकुसरीचे प्रकार माझ्या लहानपणापासून मी शिकत गेले. घरात अशी कलाकुसर करणार्‍या कुशल स्त्रिया होत्या. पुढे याच वस्तू घाऊक प्रमाणात बनविणे/ बनवून घेणे व त्यांची विक्री हेही सुरु केले. तसेच माझ्या काही मैत्रिणींना मी कापड द्यायचे व त्यापासून त्या ओटीचे रूमाल बनवून द्यायच्या. बाजारातल्या दुकानांमध्ये मिळणार्‍या सजावटीच्या वस्तू पाहून त्या घरी बनवून बघायच्या, त्यात स्वतःची काही भर घालायची असे प्रकार करत भेटीदाखल देण्यात येणारी तबके, पूजा थाळी हेही प्रकार घरी बनू लागले. मुलीने क्रेप, ऑरगंडी फुले बनविण्याचा कोर्स केला व तिने बनविलेले पुष्पगुच्छही विक्रीस ठेवू लागले. अशा प्रकारे माझ्या घरगुती व्यवसायाचे स्वरूप बदलत गेले.

माझ्याकडे घरच्या घरी, आप्त-स्नेही मंडळींमध्येच शिवण-विणकामाचा - सजावटीच्या तयार साहित्याचा खूप प्रमाणात खप होता. मुंबईच्या माझ्या बहिणीच्या ओळखीतही या साहित्याला खूप मागणी होती. त्यामुळे ती तयार बाळंतविडे, ओटीचे रूमाल, सजावटीचे साहित्य घेऊन जायची व तिच्या येथे त्या वस्तू हातोहात खपायच्या.
परंतु तरीही आपल्या व्यवसायाची जाहिरात व्हावी या दृष्टीने अनेक प्रदर्शनांतून तेव्हा मी भाग घेतला. मुंबईला वनिता समाजात मी लोकरी कपडे विक्रीसाठी ठेवले तेव्हा काही लोकांनी मला वेड्यात काढले होते. परंतु लोकांना ते कपडे इतके आवडले की वीस-बावीस वर्षांपूर्वी आमच्याकडच्या लोकरी कपड्यांची तिथे पंधरा-वीस हजारांची विक्री झाली.

माझ्या व्यवसायात मागणीप्रमाणे पुरवठा असे स्वरूप असले तरी कधी तेजी असते, तर कधी मागणी खूप कमी असते. काही महिन्यांपूर्वी मंगलोरला होणार्‍या एका मुंजीसाठी एकांनी माझ्याकडून एकदम चाळीस हजारांचा माल उचलला. आपल्या नात्यात लग्न-कार्य, समारंभ असतील तर आवर्जून माझ्याकडून त्यासाठी साहित्य घेऊन जाणारे अनेक लोक आहेत. तरी मी बर्‍याच वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू ठेवते. त्यामुळे जरी एखाद्या वस्तूला तितकी मागणी नसली तरी दुसर्‍या वस्तूला मागणी असते.

वयपरत्वे मी आता प्रदर्शने, अन्य ठिकाणी आपल्याकडील वस्तू विक्रीसाठी घेऊन जाणे असे काही करत नाही. माझ्या मुली आता बरेचसे साहित्य मला बनवून देतात. गणवेष व लोकरी कपड्यांचे काम आता माझी मुलगी बघते. टाकाऊतून टिकाऊ साठीही आम्ही विशेष प्रयत्न घेतो. गणवेषाचे किंवा अन्य शिवणकामातून उरलेले कापडाचे तुकडे जोडून त्यांतून पर्सेस, एप्रन्स, पिशव्या, लहान बाळांचे वॉर्डरोब्ज असे बरेच काही बनवितो. माझ्याकडचे कापडांचे तुकडे मी ओळखीतील गरजू बायकांनाही देते. त्यांतून जर १० पर्सेस शिवून होणार असतील तर त्यांनी कापडाच्या बदल्यात मला दोन पर्सेस शिवून द्याव्यात, उरलेल्या आठ ठेवून घ्याव्यात - विकाव्यात अशा बोलीवर आमचे काम चालते.

या व्यवसायाला आपल्याकडे भारतात कायम मागणी आहे. आपले काम, कामाचा दर्जा व वस्तूची गुणवत्ता उत्तम असेल तर लोक पुन्हा पुन्हा त्या वस्तू घ्यायला तुमच्याकडे येतात व तुमच्याकडील साहित्याची स्वतः होऊन जाहिरातही करतात असा माझा अनुभव आहे. शिवाय मीही ओळखीत, नात्यात जर कोणाचा काही घरगुती व्यवसाय असेल तर त्यांच्याकडून आवर्जून काहीतरी विकत घेते. शेवटी हा दुहेरी व्यवहार असतो. बाजारातले नवे ट्रेंड्स ओळखणे, मार्केटमध्ये येणार्‍या नव्या प्रकारच्या वस्तू पाहणे, त्यापेक्षा आपण जास्त सरस अशा वस्तू द्यायचा प्रयत्न करणे, किंमत वाजवी ठेवणे, कच्च्या मालासाठी पुरवठादार निश्चित करणे हेही या व्यवसायात आवश्यक ठरते. माझी एक मुलगी परदेशात असते. तिच्याकडे मी राहायला गेले होते तेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींनी हक्काने त्यांची वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंची मागणी नोंदवली. त्यांना त्यांच्या मागणीबरहुकूम वस्तू तयार करून दिल्यावर ती मंडळी खूप खूष झाली. आता दरवेळी मुलगी भारतात आली की तिच्याकडे ते लोक ऑर्डर नोंदवितात व त्याप्रमाणे ती माझ्याकडच्या वस्तू घेऊन जाते. मराठी मंडळाचे कार्यक्रम, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी माझ्याकडे मोत्याच्या सुपार्‍या, फुले, महिरपी, तोरणे घेण्यात येतात.

घरगुती, सांसारिक जबाबदार्‍या या असतातच! त्यांमधून मार्ग काढायचाच असा निश्चय केला तर अडचणीलाही आव्हान समजून तिच्यावर मात करता येते. माझ्या मुली वयाने मोठ्या झाल्यावर मी या व्यवसायात शिरले. पण तरीही कुटुंबियांची आजारपणे, घरगुती कार्ये, मुलींची बाळंतपणे आणि इतर अनेक जबाबदार्‍या सांभाळत मी हा व्यवसाय पुढे नेला व आजही जिद्दीने तो चालू ठेवला आहे. वर्षानुवर्षे जोपासलेले ऋणानुबंध, स्नेहसंबंध यांचाही या व्यवसायाचा विस्तार होण्यात मोठा वाटा आहे.

या धाग्यावर सगळ्यांनी खूप छान माहिती दिली आहे. बरेचसे मुद्दे सगळ्यांनी कव्हर केले आहेतच.
स्मार्ट फोन वापरून क्रेडीट कार्ड चार्ज करण्याबद्दल कोणी लिहीलेले दिसले नाही म्हणून तो एक मुद्दा लिहीते. अमेरीकेत जेव्हा जेव्हा छोट्या प्रदर्शनात स्टॉल लावला जातो तेव्हा एकतर रोख रक्कम घेतली जाते किंवा मग चेक. पण बर्‍याचदा लोकांकडे कॅशच नसते आणि चेकबुक पण नसते. क्रेडीट कार्ड मात्र सगळ्यांकडे असते. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे क्रेडीट कार्ड स्विकारणे. यासाठी आधी कार्ड स्वाइप करण्याची वेगळी मशिन लागायची आणि सगळ्यांना परवडण्यासारखी ती नव्हती. पण आता गेल्या २-३ वर्षात स्क्वेअर (https://squareup.com/) आणि अश्या बर्‍याचश्या कंपन्या आहेत ज्यांच्यामुळे हे सहज शक्य झालेय. हे अगदी १" बाय १" उपकरण तुमच्या स्मार्टफोनला,किंवा टॅबलेटला लावता येते अणि त्यावर क्रेडीट कार्ड चार्ज करता येते. मला याचा खूप फायदा झाला. हे मशिन या कंपन्या तुम्हाला मोफत पाठवतात व नंतर प्रत्येक transaction मागे २.५०% ते ३% कमिशन घेतात. बहुतांश कंपन्यांचा कमिशनचा दर साधारण paypal इतकाच आहे. ह्यामुळे तुम्हाला अगदी कधीही कुठेही कुठल्याही कार्डवर पैसे चार्ज करता येतात. इथल्या छोट्या उद्योजकांसाठी अगदी अत्यावश्यक आहे हे.

सहीच अकु! लगे हाथ उद्योजिकांची मुलाखत पण.
रुनी, अकु चांगली माहीती.

रूनी अतिशय नाविन्यपूर्ण माहिती.
माबोवरील तसेच माबोकरांच्या परिचयातील उद्योजिकांचे प्रवास वाचायला आवडतील. अकुने मुलाखतीत लिहिलेय तसेच पण आपण अमुक-अमुक व्यवसाय करतो, त्याची अशी अशी जाहिरात करतो असे स्वरूप न देता...अगदी पायापासून, म्हणजे उद्योग करायचा हे कधी/कसे ठरवले, कोणता करायचा हे कसे ठरवले इथपासून ते मध्ये आलेले अडथळे, त्यांच्यावर केलेली मात, आलेले यश-अपयश, त्यातून मिळालेली शिकवण, घर्+व्यवसाय यांची घातलेली सांगड, व्यवसायवृद्धीसाठी केलेले प्रयत्न इत्यादी पायरीपायरीने वाचायला जास्त आवडेल.

भारतात, खास करून महाराष्ट्रात स्वतःचे काही काम करू इच्छिणार्‍या, व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या स्त्रिया, मुलींना उपयोगी पडतील अशा वेबसाईट्सचे संकलन.

Pages