पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....

Submitted by पुरंदरे शशांक on 14 November, 2012 - 01:11

पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....

आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१च्या सुमारास. त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने" पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके हे....
झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.

त्यांची पुस्तके वाचताना एकंदरीत विनोबा हे एक भारीच रसायन आहे हे जाणवतं. मुळात ते कोकणस्थ (स्वतः ते मानत नसणारंच अस्लं काही...) - त्यामुळे विचारात व मांडणीत कमालीचा नीटनेटकेपणा व ठामपणाही.
दुसरे असे की प्रयोगशीलता व चिंतनशीलता या पायावरच त्यांचे संपूर्ण जीवन उभारलेले. शेतातले, रसोईतले वा इतर कुठलेही काम असो - स्वतः ते करणार व त्यात चिंतनाने वेगवेगळे प्रयोग करीत रहाणार.

परमेश्वराविषयी विनोबा अतिशय सश्रद्ध.

विनोबांच्या अशिक्षित आईने त्यांच्यावर जे बहुमोल सुसंस्कार केले त्याचे नित्यस्मरण त्यांना असल्याचे जाणवते व विनोबांवर दुसरा मोठा प्रभाव जाणवतो तो महात्माजींचा.

शंकराचार्यापासून ते अगदी ज्ञानोबा-तुकोबांपर्यंत सगळ्यांच्या वाङ्मयाचा गाढा अभ्यास विनोबांनी केलेला. तो अभ्यासही असा की त्यावर स्वतःचे अतिशय लॉजिकल मत ते असे मांडणार की जे वाचताना शंकराचार्य असो वा ही संतमंडळी - विनोबांच्या मतावर नक्कीच कौतुकाची मान डोलावत असतील.
हे कमी की काय म्हणून भारतातल्या इतर अनेक संतांचे वाङ्मय विनोबांनी समरसून अभ्यासलेले; याव्यतिरिक्त भारतातल्या व युरोपीय अनेक भाषा त्यांनी जाणून घेतलेल्या; अनेक धर्मांचे विचार कसे मांडलेत याचाही सांगोपांग अभ्यास केलेला.

प्रखर पांडित्य असताना बुद्धी आणि तर्काच्या आहारी न जाता त्याच्या मर्यादाही विनोबा कसे काय ओळखून आहेत हे मला तरी न उमगलेलं कोडंच आहे.
त्याजोडीला - १] विवेकयुक्त प्रखर वैराग्य बाळगूनही सतत ईश्वरभाव धारण करु शकेल अशा कोमल अंतःकरणाचे विनोबा.
२] उदंड कर्मे करुन त्यापासून पूर्णपणे अलिप्त असणारे विनोबा.
३] अचंबित करणारा लोकसंग्रह असताना सतत अंतर्मुख असणारे विनोबा.
४] अतिशय विद्वान असून बालकवत् निरागसता ज्यांच्याठायी आहे असे विनोबा.
५] सहजसोपे व आचरणीय विचारधन वाटणारे विनोबा
अशा लोकविलक्षण गुणांनी संपन्न असणारे विनोबा हे एक केवळ आश्चर्यच आहे.

विनोबांची उदंड ग्रंथसंपदा आहे. या सर्वांमधे मला स्वतःला आवडणारी जी काही आहेत त्यापैकी "विचारपोथी" हे एक आहे. या पुस्तकाचे वर्णन "वन लायनर" म्हणून करता येईल.
विचारपोथीत विनोबांची अभिव्यक्त (एक्सप्रेस) व्हायची एक विशिष्ट शैली आहे. ही शैली म्हटले तर फटकेबाजी (पंचेस) यास्वरुपाची आहे पण हे फटके केवळ वाचकाच्या/ विद्वानाच्या टाळ्या मिळवण्यासाठी अजिबात नाहीयेत हे सुजाण वाचकाच्या लगेच लक्षात येते. तसेच स्वतःची विद्वत्ता वा कोटीबाजपणा दाखवायची खुमखुमीही विनोबांच्याठिकाणी मुळीच नाहीये.

हे विचार वाचताक्षणीच आपल्याला अपिल का होतात तर त्यामागे असलेले विनोबांचे सखोल चिंतन, अविरत साधना व विचारपूर्वक केलेली नेमकी शब्दयोजना होय.

ही नुसती "पंच्" फुल वाक्ये नसून संपूर्ण पारमार्थिक व लौकिक जीवनावरचा व्यापक विचारच अतिशय छोट्या छोट्या वाक्यात त्यांनी मांडलाय हे जाणवतं. सुरुवातीला मी देखील या फटक्यांमधे, त्यातील पंचेसमधे गुंतून पडलो - पण जसजसे आपण वाचत जाऊ, त्यावर चिंतन करु तसतशी त्याची गोडी वाढतच जाते, विनोबांविषयीचा आदरभाव दुणावतच जातो.

हे विचार जसजसे आपण अभ्यासत जाऊ तसतसे ते आपल्याला त्या सखोलतेत घेउन जातात; त्यातील गंभीरता, अनमोलत्व अजून अजून जाणवायला लागते.
श्रद्धावान असूनही त्यांच्या विचारांमधे ते कमालीचे रॅशनलही आहेत हे आपल्याला नक्कीच जाणवते. तसेच नुसती थेअरी सांगण्यात त्यांना रस नसून ते अतिशय प्रॅक्टिकलही आहेत हेदेखील आपल्या लक्षात येते.

या सर्व विचारमांडणीत जे एक अनुपम सौंदर्य आहे तेदेखील एका नि:संगाच्या ठायी असलेल्या रसिकतेची चुणूक दाखवणारे असेच आहे.

त्यांचा परमार्थ हा कुठेही माया-ब्रह्म या घोटाळ्यात अडकत नाही तर तो आपल्या अगदी जवळचा तसेच आचरण्यालाही सोपा वाटू लागतो - हेदेखील या पुस्तकाचे एक आगळेवेगळेपण.

हे विचार आपल्या मनाचा, बुद्धिचा व अंतःकरणाचा ठाव घेतात, आपल्या जाणीवा जास्तच सजग होउ लागतात व सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या सगळ्या चित्तवृत्तींसह संपूर्ण ईश्वरशरणता साधण्यात आपल्याला मदतच करतात.
त्यामुळे ही वन लायनर न रहाता एखाद्या क्रांतदर्शी पण आधुनिक ऋषीची मंत्रवाणीच आहे असे वाटू लागते; निदान माझी तरी तशी श्रद्धाच आहे.

--------------------------------

विचार पोथी - परंधाम प्रकाशन, पवनार.

१] सत्याची व्याख्या नाही. कारण, व्याख्येचाच आधार सत्यावर आहे.

२] स्वधर्म सहजप्राप्त असतो. मुलाला दूध पाजण्याचा धर्म आई मनुस्मृतीतून शिकत नाही.

३] आत्मे सगळेच आहेत. पण आत्मवान् एखादाच.

४] संध्याकाळची प्रार्थना म्हणजे अंतकाळचे स्मरण आहे.

५] गीता अनासक्ति सांगते. पण ईश्वरात आसक्त हो म्हणतेच.

६] अत्त्युत्तम कल्पनांचे विपर्यास अत्यंत हीन असतात. ताज्या फळासारखे अन्न नाही, तर कुजलेल्या फळासारखे आरोग्यनाशकहि नाही.

७] गंडकीच्या पाण्यात राहून शाळिग्राम वाटोळा, गुळगुळीत होतो, पण भिजत नाही. तसे सत्संगतीत राहून आम्ही सदाचरणी होऊ, पण एवढे बस नाही. भक्तीने भिजले पाहिजे.

८] सेवा भागिले अहंकार = भक्ति

९] वर्तनाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी रहाते.

१०] गीतेत हिमालय स्थिरतेची विभूति सांगितली आहे. ज्याची बुद्धि स्थिर आहे तो हिमालयातच आहे.

११] शरीरनाश हा नाशच नव्हे. आत्मनाश होतच नाही. नाश म्हणजे बुद्धिनाश.

१२] नामरुप मिथ्या असले तरी भगवंताचे नामरुप मिथ्या म्हणू नये.

१३] नदीमधे मी देवाची वाहती करुणा पाहतो.

१४] आत्मविषयक अज्ञान हे प्राथमिक अज्ञान. आपल्या ठिकाणी हे अज्ञान आहे ह्याची जाणीव नसणे म्हणजे ते 'अज्ञानाचे अज्ञान' किंवा गणिताच्या भाषेत 'अज्ञानवर्ग'. आपण ह्या अज्ञानवर्गात सामील आहोत, ह्या गोष्टीचा इनकार करणे म्हणजे 'अज्ञानघन'. ह्यालाच 'विद्वत्ता' म्हणतात.

१५] वेद जंगल आहे. उपनिषदे गाई आहेत. गीता दूध आहे. संत दूध पीत आहेत. मी उच्छिष्टाची आशा राखून आहे.

१६] मनुष्य आणि पशु ह्यांच्यातील मुख्य विशेष वाणीचा आहे. जर पशूच्या ठिकाणी मनुष्यासारखी वाणी कल्पिता आली तर त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी मनुष्यासारखा विचारही कल्पिता येईल. म्हणून वाणी पवित्र राखणे हे मनुष्याचे स्वाभाविक कर्तव्य आहे.

१७] दैव अनुकूल करण्याची साधने कोणती?
---(१) प्रयत्न, (२) प्रार्थना

१८] नम्रतेच्या उंचीला माप नाही.

१९] "समोरचा दिवा आहे हे जसे निश्चित, तसे देव आहे हे तुम्ही निश्चित मानता का?"
---- देव आहे मी निश्चित मानतो. समोरचा दिवा आहेच याची मी हमी घेऊ शकत नाही.

२०] सद्भावाने साधनेचे नाटक केले तरी चालेल.

२१] अहंकाराला वाटते. 'मी' नसलो तर जगाचे कसे चालेल ? वस्तुस्थिती अशी आहे की, मीच काय पण संबंध जग नसले तरी जगाचे चालण्यासारखे आहे.

२२] परमार्थ कठिण म्हटला तर आम्ही भीतीने घरच सोडीत नाही; सोपा म्हटला तर बाजारात विकत घ्यायला धावतो.

२३] सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.

२४] अल्प श्रद्धेच्या माणसाला लोक परमार्थ पचनी पडू देत नाहीत, हा लोकांचा उपकार आहे.

२५] उपासना म्हणजे देवाच्या जवळ बसणे, म्हणजेच बसल्या जागी देवाला आणणे.

२६] मनुष्य आधी दरिद्री होतो. द्रव्य मागून जाते.

२७] संसाराच्या खोलीला भिऊ नको. तुला पोहून पृष्ठभागावरुन जायचे आहे ना ? की आत बुडायचे आहे ?

२८] 'हवेची खोली' म्हणून एखादी स्वतंत्र खोली नाही. सर्वच खोल्यातून हवा पाहिजे. तसे, धर्म म्हणून स्वतंत्र विषय नाही. सर्व व्यवहारात धर्म पाहिजे.

२९] साधन अल्प असो, पण उत्कटता तारील.

३०] जप म्हणजे आंत न मावणार्‍या निदिध्यासाचे प्रगट वाचिक रुप, अशी माझी जपाची व्याख्या आहे.

३१] 'सायन्स' ची कितीही सूक्ष्म दुर्बीण घेतली तरी आत्म्याचा आवाज ऐकण्याच्या कामी ती निरुपयोगी आहे.

३२] गुण किंवा दोष 'सहकुटुंब सहपरिवार येऊन कार्यसिद्धि' करीत असतात.

३३] तप आणि ताप ह्यातील विभाजक रेखा ओळखणे जरुर आहे.

३४] अंध श्रद्धा म्हणजे काय ? - 'तर्क तो देव जणावा' ह्या श्रद्धेचे नांव अंध श्रद्धा.

३५] समुद्राचा देखावा आनंदमय आहे. पण तो तीरावरुन पाहणाराला, आंत बुडणाराला नव्हे.

३६] मेघागमनाने हृदय उचंबळून येते ह्याचे कारण 'नभासारखे रुप या राघवाचे' हेच नव्हे काय ?

३७] समोरच्या झाडाच्या पानात जो वेदमंत्र वाचू शकतो त्याला वेद समजला.

३८] ध्यानाला आसन, विचाराला चलन.

३९] पुराणकारांनी काल्पनिक देव उभे करुन त्यांची स्तुती केली. काल्पनिक राक्षस निर्माण करुन त्यांची निंदा केली. अशा रीतीने मनुष्याचे नाव वगळून 'न म्हणे कोणासी उत्तम वाईट' हे सूत्र सांभाळले आणि परभारे नीतिबोधाचे कार्य साधले. हे देव आणि राक्षस आमच्याच हृदयात रहात आहेत, एवढे आम्ही ओळखले पाहिजे.

४०] पौर्णिमेला कृष्णाचा मुखचंद्र पहावा, अमावस्येला कृष्णाची अंगकांति पहावी.

४१] 'जगाच्या पूर्वी काय होते?'
--- या तुझ्या प्रश्नाचा अभाव होता.

४२] 'आत्म्याचे अस्तित्व' हे शब्द पुनरुक्त आहेत. कारण, आत्मा म्हणजेच अस्तित्व.

४३] 'संन्यास घेणे' ह्याला काहीच अर्थ नाही. कारण संन्यास म्हणजेच 'न घेणे'.

४४] धुमसत असताना प्रगट करु नये. पेटल्यावर दिसेलच.

४५] देवा, मला भुक्ति नको, मुक्ति नको - भक्ति दे.
..... सिद्धि नको, समाधि नको - सेवा दे.

४६] प्राप्तीपेक्षा प्रयत्नाचा आनंद विशेष आहे.

४७] आग्रह महत्वाची शक्ति आहे. किरकोळ कामात वापरुन टाकणे बरे नाही.

४८] सकाळचा तेवढा रामप्रहर, आणि बाकीचे काय हरामप्रहर आहेत ? भक्ताला सर्व काळ सारखाच पवित्र असला पाहिजे.

४९] वारा आपणहून माझ्या खोलीत येतो. सूर्य आपणहून माझ्या खोलीत शिरतो. देवही असाच आपणहून भेटणार आहे. माझी खोली मोकळी असू दे म्हणजे झालं.

५०] वेदांतासारखा अनुभव नाही.
गणितासारखे शास्त्र नाही.
रसोईसारखी कला नाही.

५१] जीवन हे विचार, अनुभव आणि श्रद्धा ह्यांचे घनफळ आहे.

५२] साधक अग्नीसारखा असावा - विवेक ह्याचा प्रकाश, वैराग्य उष्णता.

५३] मनात साचलेली अडगळ साफ करुन मन मोकळे करणे हे अपरिग्रहाचे कार्य आहे.

५४] प्रत्यक्षाने अंध झालेल्या बुद्धीला सनातन सत्ये कशी दिसणार ?

५५] प्राप्त झालेल्या कशाहि परिस्थितीचे भाग्य बनवण्याची कला भक्ताजवळ असते.
'अवघी भाग्ये येती घरा | देव सोयरा झालिया ||'

५६] लाड करणारी आई असते म्हणून मुलाचे बोबडे बोलणे शोभते. क्षमाशील परमेश्वर आहे म्हणून मनुष्याचे अज्ञान शोभते.

५७] अति दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.

५८] कोणता तारा उंच आणि कोणता खाली ह्याला जो अर्थ आहे (म्हणजे मुळीच नाही) तोच कोणता माणूस उंच आणि कोणता नीच ह्याला अर्थ आहे. दोन्ही एकाच आकाशात भिन्न भिन्न जागी आहेत एवढेच म्हणावयाचे.

५९] नृसिंहाची पूजा, प्रह्लादाचे अनुकरण.

६०] वेदार्थ स्वच्छ समजत असेल, घटकाभर समाधि लागत असेल, नामस्मरणाने सात्विक भाव उमटत असतील म्हणून काय झाले ? आचरणात उतरेल तेच खरे.

६१] "आत्मा कशाने सिद्ध होतो?"
ह्या तुझ्या प्रश्नाने सिद्ध होतो.
माझे हे उत्तर तुला पटले, तर त्या पटण्याने सिद्ध होतो. न पटले, तर त्या न पटण्याने सिद्ध होतो.

६२] टेकडीसारखे उंच होण्याची मला मौज वाटत नाही. माझी माती आसपासच्या जमिनीवर पसरली जावी ह्यात मला आनंद आहे.

(१५ नोव्हेंबर - विनोबांचा पुण्ण्यस्मरणदिन - त्यानिमित्ताने.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोर माणसाचे विचार हे, आचरणात आणावे / अंगी बाणवावेत.. तेच शक्य आहे आपल्याला.

( मला नीट आठवत असेल तर, त्यांचा " चित्रकलेची दृष्टी " असा एक वेगळाच लेख आम्हाला अभ्यासायला होता. )

मला नीट आठवत असेल तर, त्यांचा " चित्रकलेची दृष्टी " असा एक वेगळाच लेख आम्हाला अभ्यासायला होता.>>>> दिनेशदा, कुठे वाचायला मिळेल हा लेख ?

दिवसाचे औचित्य जाणुन छान लेख लिहिलात.मलाहि विनोबा पुर्वि फारसे भावायचे नाहीत.समजशास्त्रात चळवळी शिकवताना त्यांच्या भुदान चळवळीच अपयशच सांगितला जायच,पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोळकरानी सांगितलेल्या आठवणिनंतर विनोबा नव्याने वाचले आणि समजुन घेण्याचा प्रयत्न केला..ति आठवण अशी,
इव्हान इलिच हे मोठ्ठॅ शिक्षणतज्ञ एकदा भारतात षिक्षणतज्ञ जे. पी.नाइकांकडे आले होते. ते काहितरी वाचत होते. जे.पि.नि विचारल काय वाचताय?ते म्हणाले तुमचे विनोबा वाचत होतो.मि अत्ता जे सांगतोय ते त्यानि २५ वर्षापुर्वीच सांगितल आहे.
गिता समजुन घेण्याच्या प्रयत्नात गिताई आणि गिता प्रवचने माला तरि उपयुक्त वाटली.
विचार पोथितलि सर्वचा मुद्दे वाटतात सोपे पणआचरण्यात आणण्यासाथि कठिण. १४ ,३१, ५४विशेश.आवडले.

खूप आवडला लेख. महान माणसांचा विसर पडण्याचे दिवस आहेत इतका गोंधळ चालला आहे देशात, अवतीभोवती.
शोभनाताईंनी उल्लेखिलेली भूदान चळवळ मलाही आठवली.. अशी जगावेगळी लोकचळवळ एक संतच उभारू शकतो. अशा चळवळीच्या तत्वातच तिच्या पराभवाची बीजे असतात हे जाणूनही विनोबाजींनी ती काही काळ तरी चालवली हेच विशेष..

प्रतिसाद लिहिला.
वाचला
हसलो.
उडवला.
३१. ३४.

शशांक पुरंदरे,

अप्रतिम लेख. काही वचनं विशेषकरून भावली. सोबत माझी मल्लीनाथी देतोय. बोबडे बोल आहेत कृपया गोड मानून घेणे.

>> ३] आत्मे सगळेच आहेत. पण आत्मवान् एखादाच.

तद्वत बुद्धी असणं वेगळं आणि बुद्धी प्रकाशित होणं वेगळं.

>> ११] शरीरनाश हा नाशच नव्हे. आत्मनाश होतच नाही. नाश म्हणजे बुद्धिनाश.

शरीर हे क्षणाक्षणाला जळून नाहीसे होत असते. शरीराचा हा अंशात्मक नाश शरीरधारणेसाठी आवश्यक आहे. (यालाच चयापचय म्हणतात) म्हणूनच शरीरनाश भ्रामक आहे. भ्रामक म्हणजे खोटा नव्हे, तर सतत सरकणारा किंवा सदैव अस्थिर असा.

जेव्हा बुद्धी शरीराला स्थिर समजते तेव्हा ती कडेलोट होण्याच्या बेतात असते. ती जेव्हा इंद्रियगम्य सुखाच्या मागे धावू लागते तेव्हा बुद्धीनाशास सुरुवात झाली असे मानावे.

>> १४] आत्मविषयक अज्ञान हे प्राथमिक अज्ञान. आपल्या ठिकाणी हे अज्ञान आहे ह्याची जाणीव नसणे म्हणजे
>> ते 'अज्ञानाचे अज्ञान' किंवा गणिताच्या भाषेत 'अज्ञानवर्ग'. आपण ह्या अज्ञानवर्गात सामील आहोत, ह्या
>> गोष्टीचा इनकार करणे म्हणजे 'अज्ञानघन'. ह्यालाच 'विद्वत्ता' म्हणतात.

गंमत म्हणजे एखाद्या स्वयंघोषित विद्वान अश्या अज्ञानघन मनुष्यास उपरती झाली तर तो अज्ञानवर्ग वगळून थेट प्राथमिक अज्ञानी या वर्गात जाऊन पडतो. ही परमेश्वराची कृपाच नव्हे काय?

>> १६] मनुष्य आणि पशु ह्यांच्यातील मुख्य विशेष वाणीचा आहे. जर पशूच्या ठिकाणी मनुष्यासारखी वाणी
>> कल्पिता आली तर त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी मनुष्यासारखा विचारही कल्पिता येईल. म्हणून वाणी
>> पवित्र राखणे हे मनुष्याचे स्वाभाविक कर्तव्य आहे.

अनृत ( = ऋत नाही ते = मनातला विचार मुद्दाम उलटापालटा करून) बोलण्याने वाणी अपवित्र होते. मनात वाईट विचार आला तर प्रयत्न करून चांगल्या विचाराच्या सहाय्याने त्याला हुसकावून लावले पाहिजे.

>> २५] उपासना म्हणजे देवाच्या जवळ बसणे, म्हणजेच बसल्या जागी देवाला आणणे.

अगदी अगदी!! पण त्यासाठी साधना असावी लागते. साधना ही मोठी विचित्र गोष्ट आहे. तिच्याशिवाय देव भेटत नाही. पण देव भेटण्यासाठी साधना खर्च करण्याची गरज नसते.

>> २८] 'हवेची खोली' म्हणून एखादी स्वतंत्र खोली नाही. सर्वच खोल्यातून हवा पाहिजे. तसे, धर्म म्हणून
>> स्वतंत्र विषय नाही. सर्व व्यवहारात धर्म पाहिजे.

धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम. या जगात अमर्याद असं काहीच नाही. मर्यादा प्रत्येकाला आहेत. आणि प्रत्येक माणसाला कर्तव्य असतेच. त्यामुळे धर्म सर्व व्यवहारांत आचरणात आणला पाहिजे.

>> ३४] अंध श्रद्धा म्हणजे काय ? - 'तर्क तो देव जणावा' ह्या श्रद्धेचे नांव अंध श्रद्धा.

तर्क हा अनुभवांवर आधारित असतो. प्रत्यक्ष अनुभूतीखेरीज तर्क रचणे व्यर्थ आहे.

>> ३९] पुराणकारांनी काल्पनिक देव उभे करुन त्यांची स्तुती केली. काल्पनिक राक्षस निर्माण करुन
>> त्यांची निंदा केली. अशा रीतीने मनुष्याचे नाव वगळून 'न म्हणे कोणासी उत्तम वाईट' हे सूत्र सांभाळले
>> आणि परभारे नीतिबोधाचे कार्य साधले. हे देव आणि राक्षस आमच्याच हृदयात रहात आहेत, एवढे
>> आम्ही ओळखले पाहिजे.

१००% अनुमोदन.

>> ५०] वेदांतासारखा अनुभव नाही.
>> गणितासारखे शास्त्र नाही.
>> रसोईसारखी कला नाही.

१००% अनुमोदन.

>> ५८] कोणता तारा उंच आणि कोणता खाली ह्याला जो अर्थ आहे (म्हणजे मुळीच नाही) तोच कोणता
>> माणूस उंच आणि कोणता नीच ह्याला अर्थ आहे. दोन्ही एकाच आकाशात भिन्न भिन्न जागी आहेत
>> एवढेच म्हणावयाचे.

ब्रह्मापासून मुंगीपर्यंत एकच चैतन्य वास करून आहे. हे ज्याला दिसते तो खरा योगी. (संदर्भ : भक्तलीलामृत अध्याय २९ श्लोक १०२)

आ.न.,
-गा.पै.

विनोबांच्या बहुभाषिकत्वावर आणि अनुवाद कौशल्यावर मी स्वतःस ओवाळून टाकायला तयार आहे.

मात्र त्यांच्या जीवनाचे खरे सार भूदान चळवळीत आहे.
निर्धन, पदयात्री, फकीराने जमिनदारांना त्यांची जमीन दान करायला सांगावी, त्यांनी ती करावी आणि शेकडो, हजारो एकर जमिनींचे हस्तांतरण बिनबोभाट व्हावे, असले दैदिप्यमान उदाहरण तर अखिल मानवी इतिहासात दुर्मिळच नव्हे तर केवळ अशक्यकोटीतले आहे.

त्यांच्या स्मृती उजागर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

त्यांच्या स्मृती उजागर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!>>>>>१०१

बाकी पुस्तकां बाबत कर्मदरीद्री आहोत. Sad

अहंकाराला वाटते. 'मी' नसलो तर जगाचे कसे चालेल ? वस्तुस्थिती अशी आहे की, मीच काय पण संबंध जग नसले तरी जगाचे चालण्यासारखे आहे.
>>> छान लेख

हा लेख कसा काय निसटला? विनोबांचे मुळात सोपे, सहज विचार पुन्हा मांडणं सोपं नाहीये... अतिशय सुरेख अप्रतिम लेख आणि संकलन.

<<वारा आपणहून माझ्या खोलीत येतो. सूर्य आपणहून माझ्या खोलीत शिरतो. देवही असाच आपणहून भेटणार आहे. माझी खोली मोकळी असू दे म्हणजे झालं<<>>

हा लेख कसा काय निसटला? विनोबांचे मुळात सोपे, सहज विचार पुन्हा मांडणं सोपं नाहीये... अतिशय सुरेख अप्रतिम लेख आणि संकलन. >> अगदी अगदी.

विनोबांचं लिखाण वाचलं नाहीये. पण हा लेख वाचून उत्सुकता निर्माण झाली आहे. धन्यवाद शशांक Happy

सुंदर लेख....
विनोबांच्या भुदान चळवळीचा विचार मलाही पटलेला नव्हता, अजुनही पटलेला नाही. पण तरीही केवळ एका फाटक्या माणसाच्या विनवणीवर इतक्या लोकांनी आपल्या जमीनी दान करून टाकल्या म्हणजे त्या माणसाचे पक्षी: विनोबांचे आत्मसामर्थ्य किती विलक्षण असले पाहीजे ! धन्यवाद शशांकदादा Happy

विनोबा वाचणारे, समजून घेणारे आणि आवडणारे असे कोणी अजूनही शिल्लक असतील असे वाटले नव्हते. या लेखाने ते न वाटणे खोटे पाडले .प्रकाण्ड पण्डित, प्रगाढ दार्शनिक कर्मयोगी विनोबा जेव्हा साध्यासोप्या भाषेत जीवनसार उलगडू लागतात तेव्हा विनम्र, मृदू, कुसुमकोमल अशा संताचे दर्शन होते. पाण्डित्याच्या आणि विद्वत्तेच्या प्रखरतेचा लवलेशही त्यांच्या लेखनातून जाणवत नाही. विनोबांना समजून न घेऊन महाराष्ट्राने एका शुचिर्भूत,स्थितधी प्रज्ञावंताला वाळीत टाकण्याचे पातक केले आहे असे वाटत रहाते.

>>विनोबा वाचणारे, समजून घेणारे आणि आवडणारे असे कोणी अजूनही शिल्लक असतील असे वाटले नव्हते. या लेखाने ते न वाटणे खोटे पाडले.
मी पण विनोबांच्या विचारांचा, लेखनाचा जबरदस्त पंखा आहे. अनेक पुस्तके संग्रही आहेत, हे माहिती नव्हते.
परिचयाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !

>>विनोबांच्या बहुभाषिकत्वावर आणि अनुवाद कौशल्यावर मी स्वतःस ओवाळून टाकायला तयार आहे.
शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचार फारच भारी होते. प्रा. राम शेवाळकर यांनी विनोबांवर पण व्याख्याने दिलेली आहेत. ती ऐकली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते आणि वाटते की अशा लोकांचा झरा एकदम आटला कसा भारतवर्षात ?

विनोबा वाचणारे, समजून घेणारे आणि आवडणारे असे कोणी अजूनही शिल्लक असतील असे वाटले नव्हते>>>>+१

विनोबांच्या बहुभाषिकत्वावर आणि अनुवाद कौशल्यावर मी स्वतःस ओवाळून टाकायला तयार आहे.>>>+१
माझ्याक्डे फक्त विनोबांची गीताई आहे ती मी अनेकदा वाचत असतो मला ती खूप आवडते

लेख का संपला संपायलाच नको होता असे वाटते आहे
विनोबांवर अजून लिहाच शशांक जी

वा, वा, वा, वा - इथे अनेक विनोबा विचारप्रेमी मंडळी आहेत हे वाचून खूप म्हणजे खूपच आनंद झाला.

विनोबांनी - शिक्षण, जीवन, संस्कार, आचरण इ. वर जे मौलिक विचार मांडले आहेत त्यासंबंधी कोणी सविस्तर लिहिले तर मा बो वरील अनेकांना त्याचा उपयोग होईल असे वाटते. विनोबा केवळ आश्रमवासी प्रवचनकार परमार्थी नव्हते तर समग्र जीवनाचा विचार करणारे, त्यावर प्रयोग करीत रहाणारे असे शास्त्रज्ञ-संत होते. शरीर परिश्रम, स्वावलंबन, शेती, शिक्षण, संस्कार, व्रते, रसोई, विज्ञान या सर्वांना त्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व होते - यासंबंधी ते सतत प्रयोग-चिंतन-प्रयोग असे करीत असत.

गीताई, गीता-प्रवचने ही पुस्तके अतिशय सोपी व अप्रतिम अशी आहेत -ज्यांना विनोबांचे विचार जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी किमान ही पुस्तके तरी वाचावीत अशी मी प्रेमाने विनंती करु इच्छितो.

विनोबांचे साहित्य कधीच वाचले नव्हते. त्यांच्या विचारांची पण काहीच ओळख नव्हती. पण तुमच्या या लेखाने आता 'विनोबांचे विचार जाणून घ्यायला हवेत' असे वाटू लागले आहे.

लेखातल्या ५ लोकविलक्षण गुणांत मी एक भर टाकूं का ? ६] प्रखर बुद्धिनिष्ठा, पांडित्य व विरक्ती यांचं पक्कं अधिष्ठान असूनही चळवळींमधे स्वतःला झोकून देण्याचं आत्यंतिक सामाजिक भान असणं.
<<अशा लोकांचा झरा एकदम आटला कसा भारतवर्षात ? >> सगळ्याच संवेदनशील माणसाना भेडसावणारा आहे हा प्रश्न ! पण म्हणूनच अशा झर्‍यांकडची वाट दाखवणार्‍या ह्या लेखासारख्या मार्गदर्शक फलकांचं अप्रूप. शशांकजीना मनापासून धन्यवाद.
<< विनोबांना समजून न घेऊन महाराष्ट्राने एका शुचिर्भूत,स्थितधी प्रज्ञावंताला वाळीत टाकण्याचे पातक केले आहे असे वाटत रहाते. >> महाराष्ट्राच्या माथीं आलेल्या सध्याच्या नेतृत्वाची एकंदरच पातळी पाहिली कीं त्याच पातकाचीं तर फळं भोगत नसावा ना महाराष्ट्र, असंही वाटतं !!

विनोबांचे तुकारामाचे संकलन सोडल्यास वाचले नाहीय.
एका स्नेह्याकडून ऐकले की त्यांचे गीतेवरचे कार्य मोठे आहे.
परिचयाबद्दल धन्यवाद.

'गीताई' १९३२ साली प्रकाशित झाली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते धुळ्याच्या जेलमध्ये बंदिवान होते. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही चालू होतेच. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा आनंदीच असायचे. १९३२ सालापासून आतापर्यंत 'गीताई'च्या लाखो प्रती घरोघर विकल्या गेल्या. २००३पर्यंत 'गीताई'च्या ३६ लाख २५ हजार प्रती छापल्या गेल्याची नोंद आहे. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे क्वचितच सापडतील.

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये संस्कृतमधील गीतेचे पठन व अध्ययन ही कठीण बाब होती. 'गीताई'ने ही ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी उघडली. गीतेच्या पंधराव्या अध्यायात 'पुरुषोत्तमयोग' विशद केलेला आहे. मानवी शरीराचे वर्णन करताना व्यासांनी शरीर उलट्या वृक्षाप्रमाणे असल्याचे म्हटले. 'ऊर्ध्वमूलमधशाखमवत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥' विनोबांनी हे सारे सोप्या मराठीत सांगितले. 'खाली शाखा वरी मूळ नित्य अवत्थ बोलिला। ज्याच्या पानांमधें वेद जाणे तो वेद जाणतो॥' 'गीताई' मराठी वाङ्मयाचा मैलाचा दगड बनला. आपल्या 'प्रेमपंथ अहिंसेचा'मध्ये विशद केलेली विनोबांची आठवण अधिक मनोवेधक आहे. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांचे प्रसिद्ध 'गीता प्रवचन' झाले आणि त्याची भारतातील अनेक भाषांत रूपांतरे झाली. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'चा आणि एक आणा विनोबांच्या दक्षिणेचा.' हे भाग्य किती लेखकांना लाभते?

- साभार - www.khapre.org या साईटवरील गीताईच्या प्रस्तावनेतून.....

Pages