चिक्की

Submitted by तृप्ती आवटी on 17 January, 2013 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तीळ किंवा दाण्याचा कूट, १ वाटी गूळ, १ टे स्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

तीळ मंद आचेवर रंग न बदलू देता भाजून घ्यावेत. एका पसरट ताटात गार करायला ठेवावेत. दाण्याची चिक्की करायची असल्यास भाजलेल्या दाण्यातले १०-१२ दाणे सालं काढून अर्धे करुन घ्यावेत. उरलेल्याचा जरा भरड कूट करावा.

teeL4.jpg

एका थाळ्याला आणि वाटीच्या तळाला (बाहेरुन) तूपाचा हात लावून ठेवावे. कढईत अथवा जरा खोलगट पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात गूळ घालावा. आंच एकदम मंद ठेवावी. गूळ किसलेला नसल्यास कढईतच खडे जरा मऊ करुन फोडावेत. गुळाचा पाक होऊन फसफसायला लागेल. पाक सतत ढवळत रहावा.

teeL3.jpg

एका वाटीत गार पाणी घेऊन त्यात थेंबभर पाक घालावा. पाक लगेच कडक होउन छान खुटखुटीत झाला तर तयार झाला समजायचा (हो, खाऊन बघावा). पाक-चाचणी फेल गेल्यास आणखी थोडा वेळ फसफसु द्यावा. पाक झाल्यावर आंच बंद करावी. आता पाकात भाजलेले तीळ अथवा दाण्याचा कूट घालून भराभरा हलवावे आणि लगेच मिश्रण थाळ्यात घ्यावे. वाटीच्या तळाने सरसर पसरवावे. आपल्या (खाण्याच्या/देण्याच्या) कुवतीप्रमाणे जाडी ठेवावी. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात लावून एक सारखे करुन घ्यावे. वड्या पाडायच्या असतील त्याप्रमाणे सुरीने थोड्या खाचा करुन घ्याव्यात म्हणजे नंतर वड्या तुटत नाहीत.

teeL11.jpg

पाचेक मिनिटात वड्या बर्‍यापैकी गार होउन निघायला लागतात. थाळ्याला चिकटल्याच तर थाळा अगदी पाच सेकंद गरम करावा. चिक्की तय्यार!

603151_594775723871687_892435503_n_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
नक्की आठवत नाही पण साधारण २०-२५ पातळ वड्या होतात
अधिक टिपा: 

मी पॉलिश्ड तीळ वापरलेत पण अशा चिक्कीसाठी साधे- गावराण हावरी- तीळ घ्यावेत. मस्त खमंग लागतात ते तीळ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त एकदम झकास दिसतीय चिक्की,
करायला जमेल का नाही माहिती नाही, त्या पाक प्रकाराची जरा भितीच वाटते.

मस्त झालीये चिक्की.. Happy माझी एक टीप : गुळात तीळ्/दाणे घालायच्या आधी चिमटीत मावेल इतकाच खायचा सोडा टाकून ढवळून घ्यावे मग मिश्रण घालावे. किचन कट्ट्यावर गोळा तूपावर गोल गोल हाताने दाबून फिरवून लाटण्याने लाटल्यास चिक्की हवी तितकी पातळ होते. चिमटीभर सोड्याने चिक्की खुटखुटीत होते.

पाकाचे कौशल्य तर मुख्य आहेच ग, पण चिमुटभर ( प्रत्येक घाण्याला) सोड्याने जास्त खुटखुटीत होते असा अनुभव आहे. Happy अन हो, तीळ नाही भाजले तरी चालतात चिक्कीला. अन मोळी सिंग ( मीठ नसलेली) वापरायची दाणेचिक्कीला.

शेवटचा फोटो एकदम कातील.. Happy
मी सेम अशीच गुळा ऐवजी साखरेची करते.. ती पण मस्त खुटखुटित होते
आत नेक्ट बॅच गुळ घालुन करेन..

तीळाचा इतका मोठा पंखा नसल्यामुळे आता हा प्रश्न क्रमप्राप्त आहे. शेंगदाण्याची चिक्की ह्याच कृतीनी बनवता येइल का?

बुवा, दाण्याच्या कुटाची करणार असाल तर कृतीत प्रमाण दिले आहे. आख्खे भाजलेले दाणे जरा हातानेच सुटे करुन घेतले तर चालतील. डाळ्याची पण चांगली होते ह्या कृतीने.

जो काही घटक घ्याल तो कुरमुरीत होइपर्यंत भाजलाच पाहिजे. नाही तर कच्चट चव लागते.

Pages