फराळी मिसळ

Submitted by मंजूडी on 12 May, 2009 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रात्रभर भिजवून उकडलेले शेंगदाणे - दिड वाटी
बटाट्याच्या फोडी - १ वाटी
सुरणाच्या फोडी - १ वाटी
हिरव्या मिरच्या - २
जीरे - २ मोठे चमचे
चिंचेचा कोळ - २ मोठे चमचे
दाण्याचे कूट - ४ चमचे
ओलं खोबरं - अर्धी वाटी
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी तूप
वरून घेण्यासाठी : अगदी बारीक चोचवलेली काकडी, बटाट्याच्या किसाचा तळलेला चिवडा, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. थोड्या जिर्‍याबरोबर हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात.
२. कढईमध्ये तूप तापवून त्यात उरलेले जीरे घालून फोडणी करावी.
३. त्यात बटाट्याच्या व सुरणाच्या फोडी घालाव्यात. मग मिरची - जिर्‍याचे वाटण घालून परतावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
४. बटाटा आणि सुरण शिजत आले की त्यात उकडलेले शेंगदाणे घालून परतावे.
५. त्यात दाण्याचं कूट, खोबरं, चिंचेचा कोळ घालावा. साधारण भांडंभर पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
६. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावे.
७. मिसळ सरसरीतच असावी. गरज वाटल्यास अजुन पाणी घालून एक उकळी काढावी.

खायला देताना डिशमध्ये बटाट्याचा चिवडा घेऊन त्यावर ही मिसळ घालावी. वरून चोचवलेली काकडी आणि कोथिंबीर घालून सजवावे आणि सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी पोटभर
अधिक टिपा: 

किंचीत आंबट, गोड आणि तिखट अश्या चवीची ही मिसळ होते.
बटाट्याच्या किसाचा चिवडा नसेल तर आवडीप्रमाणे कुठलाही उपासाचा चिवडा घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
दादरची तमाम महाराष्ट्रीय हॉटेल्स आणि माझी आई :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कृती. आस्वादची फराळी मिसळ आठव़ली.
मंजू सुरणाला कुठला पर्याय चालेल ?

अरे वा! सहीये कृती आणि सोपीही आहे. नक्की करणार
धन्यवाद मन्जू Happy

मंजु.. उपवासाला सुरण खातात? अन काकडी/ कोथिंबीर? एरव्ही अशी सहज करुन खायला जरा वेगळी अन छान आहे मिसळ.

रैना, तुला 'आस्वाद' माहिती आहे?? ह्या मिसळीचा उगम तिथलाच, पण तिकडे सुरुवातीला ह्या मिसळीत साबुदाण्याची खिचडी घालायचे. Sad त्यामुळे ती अगदी गिच्च लागायची. आता बरेच दिवसात खाल्ली नाहीये..

सुरण नसला तरी चालेल. कारण मुळातच सुरणाला अंगची अशी काहीही चव नसते. भाज्या पोटात जायला हव्यात म्हणून मी ह्यात सुरण घालते.

भावना, अगं सगळी कंदमूळं उपासाला चालतात. कोथिंबीरीच्या बाबतीत जरा लोकांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण आम्ही उपासाला कोथिंबीर खातो.

मंजू- आता नाही घालत ते साबुदाण्याची खिचडी. तु लिहिल्येस तशीच करतात. यम्मी लागते.
त्यासोबत नारळाची चटणी.

दादरला पणशीकरांकडे मिळते. पण त्यात थोडा साबुदाणा असतो आणि नारळही. या मिसळीची खसियत म्हणजे कुठल्याही हवामानात ती खाता येते. सोबत घट्ट दही.
सुरण, कोनफळ, कच्चे केळे, कणंग, रताळे, लाल भोपळा, केळफूल सारख्या भाज्या आईला उपासाला चालतात.

रताळे, कच्चे केळे सुद्धा ह्यात वापरले तरी चालेल. पण फोडी फार मोठ्या नसाव्यात. लाल भोपळा वापरला तर त्याची चव मला फारशी आवडली नाही.. त्याचे भरीतच करावे. Happy

फराळी मिसळ माझी खूप आवडती... आता नक्की अशी करून पाहीन....

मंजू, मी आज केलीसुद्धा ही मिसळ. सुरण नाही घातल. मस्तच झाली. पुढ्च्यावेळी सुरण सुद्धा घालुन पाहाणार आहे.

क्या बात है.. गिरगावात सांडू कडे फर्स्ट क्लास फराळी मिसळ मिळते.. त्याचा भाव एक आकडी असल्या पासून खातोय आता खूप महाग झाली असेल (३५-४० रु. वगैरे).. पण असली चव.. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

मी आजवर ही मिसळ कधीही म्हणजे खरंच कधीही खाल्लेली नाही. नावावरुन उपासाची असेल असं वाटलंच मला. पण चांगली वाटतेय रेसिपी.

अहाहा ! खरच आस्वादची आठवण झाली.
तिथे पूर्वी सा.खी. घातलेली आणि अलीकडे वरच्या पद्धतीनी केलेली, असे दोन्ही प्रकार खाल्ले आहेत.
आज घरी गेलो की हिच फर्माईश.

ठाण्याला गोखल्यांकडे पण मिळते ना अशीच मिसळ ?

मामा काणेंकडे पण अशीच मिळते... बर्‍याच वर्षांपूर्वी खाल्ली होती.
मंजे, तोंडाला पाणी सुटलंय ना!

भाग्य, मामा काणे आहे अजुन तग घरुन. पण तू बहुतेक त्याच लाईनमधल्या पणशीकरांकडे खाल्ली असणार. मामा काणेचा बटाटावडा फेमस होता.

दादर ची हि दोन दुकाने मस्तच. पणशीकर नी मामा काणे. लहानपणी आत्येकडे गेल्यावर आत्या संध्याकाळी उपवास सोडायची आत्येचा उपास असला की पण उपवासाचे तिला जर घरी करायला कंटाळा आला की आम्हा सर्व लहान मुलाना दुपारी जेवणाएवजी सर्व गँग पणशीकरांकडे घेवून हे असले अ‍ॅटम खायला घालायची. सा. ब वडा एक प्लेट, मिसळ एक प्लेट नी मग दोन दोन ग्लास पियुष असे प्रत्येक जण हादडून आम्ही पण उपास करतो असे सर्वांना सांगायचो. Proud
(मामा काणे बंद झाला वाटते त्यामुळे पणशीकर हेच मला आठवते आता, पण आत्येच्या तोंडून मामा काणेचे खूप कौतूक एकले होते. त्यांची वेज जेवण खूप फर्मास वगैर्(इती आत्या)).

मामा काणे आमच्या यांच्या Proud नात्यातले आहेत. बहुतेक ते अजूनही चालू आहे.

मंजे, आत पुढच्या आषाढीला किंवा अंगारकीला करेन ही मिसळ!!
--------------
नंदिनी
--------------

मंजे, आत पुढच्या आषाढीला किंवा अंगारकीला करेन ही मिसळ!!

त्याच्या आधी 'वटपौर्णिमा' येईल की.... तेव्हा तुला करता येईल ही मिसळ. Wink

मंजुडी , मस्तच आहे ग ही कृती. करुन बघायला हवी. कधीच खाल्ली नाहीये- मुंबईत एवढी वर्षे राहुनही Sad

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

आज करुन पाह्यली. बेष्ट. धन्यवाद मंजू.

मन्जु,
वाव! तोंडाला पाणी सुटलं एकदम तुझी पाककृती वाचून. पुण्यात बादशाही मध्ये ही मिळते उपवासाची मिसळ. ती ही चांगली लागते, पण तुझी पाककृती खासच. Happy

बादशाहीत साबुदाण्याची खिचडी टाकतात त्यामुळे गिचका होतो शेवटी शेवटी खाताना.

ही रेसिपी आवडली आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मस्त पोटभरु आणि ऑल इन वन पदार्थ मिळाला.