एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक
इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण, कोणता वारसा घेतो? पूर्वसुरींची उद्दिष्टं, त्यामागचा विचार, त्यासाठींचा त्याग, संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात? आत्मसात काय होतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काय पोचवलं जातं? परंपरा संक्रमित होते ती संघर्षाची की स्वतंत्र विचारांची की नुसतीच विभूतीपूजेची? पुढच्या पिढीच्या जडणघडणीत आपलं योगदान काय?
एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक हे आणि असे बरेच प्रश्न मांडते. 'इवली झालेली तलवार', 'आधीच पाठीतून वाकलेले (अनुयायी)', 'हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता' यांसारख्या प्रतिमा / ओळी अतिशय प्रभावीपणे येतात. शेवटी जगताना असे प्रश्न पडणंच महत्त्वाचं. 'साधी सोपी उत्तरं' असं काही नसतंही आणि नसावंही, नाही का?

याव्यतिरिक्त लक्षवेधी वाटलेली कविता :
कधीतरी.
एखाद्या साध्याच पण प्रामाणिक विचाराने, साध्यासोप्या पण अंत:करणापासून आलेल्या अभिव्यक्तीने तिच्या त्या सच्चेपणाच्या झळाळीमुळेच लक्ष वेधून घ्यावं आणि मग हळूहळू केवळ त्या झळाळीचाच उदोउदो वाढत जाऊन मूळ विचार हरवून जावा यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असेल? मुखवटे मिरवायची/नाचवायची सवय व्हावी आणि चेहरा असं काही नसतंच/नसावंच असं मानायचा प्रघात पडून जावा - असं होतं तेव्हा आपली स्वतःची सामान्यसुद्धा ओळख जपू पाहणार्‍याने कुठे जायचं असतं? समाजाच्या गतानुगातिकतेवर नेमकं भाष्य करणारी कविता.

----------
जाता जाता :
या महिन्यात निवडल्या गेलेल्या दोन्ही कविता एकाच कवीच्या आहेत हा एक योगायोग. या दोन्ही कविता आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिल्या होत्या हा त्याहून मोठा आणि दुर्दैवी योगायोग. या कवीच्या बाकी कविता कोणाला दिसूच नयेत आणि 'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गेल्या महिन्यात सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली 'पाऊस बारावाटा' ही कविता अशीच दुर्लक्षित रहावी, आणि निवड झाल्यावर मात्र तिच्यावर अनुकूल अभिप्रायांचा पाऊस बारावाटांनी पडावा हा ही योगायोगच म्हणायचा का?
गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
'आताशा पूर्वीसारखे लिहिणारे राहिले नाहीत' हे वाक्य किती सहज म्हणतो आपण, पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का? आंतरजालासारख्या माध्यमामुळे आपले विचार एकाच वेळी अनेकांसमोर व्यक्त करणं सोपं झालं हे खरं, पण विचार 'पोचणं' इतकं कठीण का झालंय?

या संदर्भात वैभव जोशींची एक कविता आठवली ती त्यांच्या परवानगीने उधृत करत आहे :

कुसुमाग्रज
बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं...
तुम्ही मोठ्या उल्हासाने "कणा" पोस्ट केली असती
अन पापणी लवायच्या आत
तुमच्या आयडी वरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता
ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून
चर्चा इतकी रंगली असती की
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

दैव फारच मेहरबान असतं तर
वाचली असती एखाद्या विडंबन करणार्‍याने "कणा"
आणि मारून मोकळा झाला असता
कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने
बायकांना आणखी एक टोमणा.
तुमचा (?) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता
पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या
स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा तुमच्या नशीबी आला असता
एखादा गज़लकार
ज्याने "कणा" या अचानक सुचलेल्या(?)
काफ़ियाशी मिळत्याजुळत्या कवाफ़ी जमवायला घेतल्या असत्या...
किंवा एखादा छायाचित्रकार
ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या
बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी
तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं
लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच
एक कविता आहे असं जाहीर केलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा
"कणा"ची लांबी रुंदी मोजली गेली असती
("खोली" नव्हे , ती 2 D मॉनिटरवर कळत नाही)
किंवा तुमची कविता वाचून कुणालातरी
स्वतःची (काही वर्षांपूर्वी) लिहीलेली कविता आठवली असती
किंवा कुणाला तत्क्षणी सुचली असती
ज्यांना कदाचित
प्रचंड लोकाश्रय मिळाला असता
ज्यांचं कदाचित नवी म्हणून वा
जुनीच पुन्हा पोस्ट केली म्हणून
तोंडभरून कौतुक केलं गेलं असतं
आणि
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

आणि कुसुमाग्रज,
मराठी वाचकांच नशीब जर
अगदीच -- असलं असतं तर
ह्यातलं काही एक घडलं नसतं ...
चंद्र, चांदण्या , प्राजक्त , मोगरा
काहीच दिसत नाही म्हणून
लोकांनी "कणा" कडे ढुंकून पाहिलं नसतं
आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान
अनुल्लेखाने काळवंडलं असतं...,कायमचं
मागे राहिल्या असत्या
"कणा"च्या लाखो स्पाईनलेस आवृत्त्या
हजारो ऑर्कुट प्रोफाईलस , शेकडो ब्लॉग्ज
ज्यांच्या मालकांनी आयुष्यभरासाठी
"कुसुमाग्रज" हे प्रोफाईल नेम घेतलं असतं ...
आणि मूळ कविता तिच्या कवीसकट हरवून गेली
हे कुणाच्याच लक्षात आलं नसतं
.. अगदी तुमच्यासुध्दा!

आता बोला कुसुमाग्रज
बरं झालं ना तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं ???

- वैभव जोशी.

--------------------------------------------------------------
सर्व कविता वाचून त्यातून वरील कविता निवडण्याचे काम या महिन्यात स्वाती आंबोळे यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

प्रकार: 

दोन्ही बाजूची मते पटताहेत...
गजबच आहे.. मी स्थितप्रज्ञ होऊ लागलोय की काय!
कवितेवर बोललोच नाही अजून्पण...
पण कधिपासून मायबोलीवरच्या कविता वाचणं कमी झालेय...

वैभव म्हणतो तसेच वाचकालाही थकवा जाणवतो असे वाटतेय!
_________________________
-Impossible is often untried.

वैभव, खूप छान लिहिलं आहे तुम्ही. पटलं १००%

गिरिराज, तुम्ही एकटेच नाही दोन्ही बाजूची मतं पटणारे. परवा स्वातीने लिहिलं तेव्हा तिचं मत १००% पटलं. पण मग जाईजुई, नीधप, श्रद्धा यांनी लिहिल्यावर त्यांच्याही मतात तथ्य आहे असं वाटलं. त्यामुळे बाजू न घेता छान चर्चा नुसती वाचायची नी काहीतरी नवीन शिकायचं.

जर कवीनी आपल्या कवितेबद्दल दोन तीन ओळीत सांगितले उदा. कविता कशी सुचली, आशय काय असे काहीतरी.. तर बर्‍याच (माझ्यासारख्या) लोकाना कविता समजण्यातही मदत होईल.<<
अगदीच अमान्य. आणि अशी सक्ती करणे हे तर त्याहून अमान्य. मुळात कविता शब्दशः समजण्यापेक्षा त्यातून जाणवणारा अनुभव महत्वाचा असतो. ज्यांना सवय नाही अश्या अनुभवापर्यंत जाण्याची त्यांना सवय करावी/
-----------------------------------------------------------------------------
अच्छा अच्छा..म्हणजे तुम्हाला नाही कळली तर कविता वाचणे बंद करा..तुमची कविता वाचण्याची लायकी नाही..आधी खुप कविता वाचा, लायकी मिळवा आणि मग या इथे Happy असे सरळ सांगा ना Happy

Seriously...
सक्ती करणे (कोणत्याही गोष्टीची) मलाही एकदम अमान्य आहे. पण अर्थ्/आशय सांगण्यात काही वावगे आहे असे मला स्वत:ला तरी वाटत नाही.

वैभव आणि स्वाती तुमची ह॑ळहळ आणि तुमची कळकळ आणि तुमचे प्रयत्न हे खरच स्तुत्य आहेत. पण आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात आल आहे का? की कवितावर येणार्‍या एकुण प्रतिक्रिया आणि कविता वाचक वर्ग हा फार छोटा आहे त्या मानाने. कविता हा मानला तर फार सोप्पा विषय मानला तर फार गहन आणि प्रत्येक वाचकाची अभिरुची वेगळी.
स्वातीच हे "पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का?" हे विधान मात्र पटल नाही. माझ्या मते कविता हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. काही कविताचा आनंद स्वतः वाचुन जास्त येतो, कारण त्या कवितांना आपण आपल्या अनुभवांशी जुळवुन घेतो आणि कविच्या शब्दांवर आपण आपलं कल्पना विश्व रचतो. तर काही कविता ह्या सादर करव्या लागतात, अशा कवितांत आपण कविचं बोट घरुन त्याच्या कल्पना विश्वात रममाण होतो आणि एक वेगळी अनुभुती घेतो. तर काही कविता चाल लावल्यावर फुलतात. ह्या पुढे जाउन काही कविता वेगवेगल्या प्रसंगाला अनुरुप असतात तर काही विशिष्ठ मुड ला अनुरुप असतात.पिकनिकला म्हंटली जाणारी गाणी वेगळी आणि बैठकीतली गाणी वेगळी त्या त्या प्रसंगानुरुप त्यात उजवं डावं करता येत नाही. वाचणारा वाचतेवेळी काय मुड मध्ये असतो त्यावेळी त्याला काय भावतं आणी तो कशावर काय प्रतिक्रिया देतो ह्याची सांगड त्याच्या अभिरुचीशी घालणं हे मला तरी पटत नाही.

प्रकाश काळेल ने प्रोच्या "कोंबडी भुकायला लागलि" जे स्पष्टीकरण दिल ते थक्क करणारं होत. मी खरतर हास्यात उडवलेल्या ह्या ओळींचा अर्थ खरच इतका गहन आहे, असा विचार मी कधीच केला नव्हता. हा दोश जसा माझा आहे तसा प्रोंचापण आहे.

माझ्या मते "महिन्यातली सर्वोत्तम कविता" हा उपक्रम चांगल्या कलाकृती वाचकां समोर आणण्या साठी आहे. जशी तू ह्या महीन्यात निवडलेली कविता. "हे वाचलत का? किती सुंदर कविते पासुन तुम्ही मुकला आहात, हे तुम्ही सुद्धा वाचाव आणि त्याचा आनंद घ्यावा" अशा प्रकारे मांडली जायला हवी होती..जेणे करुन त्या कलाक्रुतीला योग्य न्याय मिळेल आणि कविता चोखंदळपणे वाचल्या जातिल.

वरिल विधानाने वाचक "मला कवितेच ज्ञान नाही" "आपल्या बुद्धी पलिकडच आहे हे सगळ" असं समजुन अकारण न्युनगंडाचे बळी होतिल.काही बळी पडले सुद्धा Happy तुमची कळकळ, तुमचे प्रयत्न, तुमचं इस्पित अशा विधानांनी साध्य होणार आहे का? तर "नाही" अस मला वाटतं.

वरील प्रतिक्रिया आणि त्यावर वाचकांनी माडलेले विचारांनवर दॄष्टीक्षेप टाकता मला वाटत वाचकांना मार्गदर्शनाची गरज आहे. गझल कार्यशाळेच्या वेळी वैभव, तू, मिल्या, नचिकेत ह्यांनी घेतलेले कष्ट हे शब्दातित आहेत. त्याच प्रकारचं कविताविश्वाचही दर्शन तुमच बोट धरुन करायला समस्त मायबोलीकरांना नक्कीच आवडेल.

वैभवने कविता रसग्रहणाचे केलेले प्रयत्न आणि योग्य ते इस्पित साध्य होत नसल्याने त्याने घेतलेला निर्णय हा वाखाणण्या जोगा आहे. तुमचे प्रयत्न आणि तुम्ही घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक कराव तितक थोड आहे.

एकच कविता का? जेवढ्या चांगल्या वाटतिल तेवढ्या आणि विषेश्तः ज्या कविता खर्‍या अर्थान दुर्लक्षिल्या गेल्या आहेत त्या निदर्शनास आणुन देण्याच काम आपण करायला हवं.

तुझी निवड आणि "चुकली वाट" तू निदर्शनास आणुन दिलीस त्या बद्दल तुझे 'शतशः आभार'.

स्वाती कधीतरी तुझ्या कविता सुद्धा पोस्ट करत जा की वैभवच्या उपवासा प्रमाणे तू सन्यास घेतला आहेस? Happy आणि हो माझी तुझ्याकडे एक तक्रार आहे की लोकांनी कवितांना चांगल्या कविताना प्रतिक्रिया न देण्याबद्दल कान पिळणारी पण तू, तुझ्या प्रतिक्रियांच काय? की फक्त सर्वोकृष्ठ कवितेलाच प्रतिसाद द्यायच ठरवल आहेस? Happy

वैभवा उपवास सोडलास म्हणालास, प्रसाद पणं ग्रहण केलास, आता जरा दान धर्माच पण बघा, आम्ही याचक वाट पहातो आहोत:)

- कुणाला दोश देण्याचा अजिबात हेतू नाही, जे वाटल ते लिहीलं इतकच. चु.भु.द्या.घ्या.

वैभव, मस्त पोस्ट. बर्‍याच महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्यास.

स्लार्टी, कल्पना चांगली आहे. सर्वांच्याच सूचना स्वागतार्ह आहेत. यावर जरूर विचार आणि कार्यवाही व्हावी.

मनस्मी, तसं नाहीये ते. पण त्यात दोन भाग असतात.

एक तर कवी त्याला जे म्हणायचं आहे ते म्हणून मोकळा झालेला असतो. त्याने तोच content पुन्हा गद्यात आणि सविस्तर सांगावा, किंवा त्याच्या आजूबाजूचा (कवितेचा विचार करता) फापटपसारा (जो त्याला कधी सांगायचाच नव्हता म्हणून तर त्याने कविता लिहिली - नाहीतर मोठा ललित लेखच लिहिता नाही का?) सांगावा - हे कवीसाठी त्रासदायक ठरू शकतं.

दुसरं, (जो मुद्दा वैभवच्या पोस्टमधे आला आहे) - एक कविता दहा वाचकांना हात धरून शंभर गावांना घेऊन जाऊ शकते. (अज्जुका म्हणते आहे तो 'अनुभव' हा.) अशी 'संदर्भासहित स्पष्टीकरणं' लिहिल्याने एकच एक अर्थ वाचकांवर लादला जाऊन कवितेतील बाकी शक्यतांवर अन्याय होतो. आणि त्यात पुढचा धोका म्हणजे त्या 'ट्रेनिंग व्हील्स'ची सवय लागून जाऊ शकते. वैभवने म्हटल्याप्रमाणे 'कवितेपेक्षा/ऐवजी स्पष्टीकरणच आवडलं' असं होत राहणंही चूक आणि कवीवर अन्यायकारक नाही का?
बघा पटतं का.

सत्यजित,
>> स्वातीच हे "पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का?" हे विधान मात्र पटल नाही.

हो - संदर्भ सोडून वाचलं तर नाहीच पटणार. Happy

ज्याची त्याची आवड हा भाग सापेक्षच आहे हे आधीच म्हटलं आहे. पिकनिकची गाणी की सुप्रभातम् की 'बीडी जलायले' हा इथे मुद्दाच नाहीये. मला स्वतःलाही वेगवेगळ्या मनःस्थितीत यातलं कुठलंतरी एकच वाचावंसं / ऐकावंसं वाटतं.

तेव्हा 'आत्ताच्या वाचणार्‍यांना समज कमी आहे' असं म्हटलेलं नाही. पण तू सांग, 'गुलमोहोरावर पूर्वीसारखी मजा नाही.' हे वाक्य तू इतक्यात किती वेळा ऐकलंस / म्हटलंस? 'कधीही बघा - बेक्कार कविता आणि त्यावरचे वादच दिसतात' असं किती वेळा मनात आलं? आणि ते म्हणतानाच 'अरे, चांगलं साहित्यही आलं होतं, तिथेच होतं, पण लक्षच गेलं नाही' अशी हळहळ किती वेळा वाटते? त्या हळहळीचं पुढे काय होतं? 'इतक्या कवितांमधे कोण शोधत बसणार? वेळ कोणाला आहे? सहज 'कविता' विभागात गेलं, समोर काहीतरी दिसलं, ते हास्यास्पद दिसलं तर त्यावर कमेन्ट्स करण्यात टाईमपास केला, जे ठीक वाटलं ते वाचलं-न-वाचलं, नाहीतर पुढे गेलं' (जिला काल मी 'चॅनल सर्फिंग मेन्टॅलिटी' म्हणाले) - असं बहुतांश (सुजाणसुद्धा) वाचकांचं सतत होताना दिसतं ही बाब एक कवी म्हणून तुला खिन्न करत नाही?

मुळात 'कविता' या विषयाबद्दल (का कोण जाणे) तू म्हणालास तसा एक मेन्टल ब्लॉक असतो बर्‍याच लोकांच्या मनात. त्यात त्यांना सतत डोळ्यासमोर हास्यास्पद कविता आणि बाफ भरूनच्या भरून चाललेला त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार - इतकंच चित्र दिसत असेल तर एकूणात कविता हा विषयच हास्यास्पद ठरवला गेला नाही तर काय नवल? एक कवी म्हणून तुला याचा त्रास होत नाही?

गेल्याच आठवड्यात इथे 'मराठी साहित्याची दशा' आणि 'मराठी संगीताची दशा' असे दोन बाफ सुरू झाले होते. 'कुठे हो हल्ली काही चांगलं वाचायला मिळतं' हे विधान करणं सोपं असतं. वाईट लिखाणाची खिल्ली उडवणं सोपं असतं. ती ही बांधिलकी असेल, पण चांगलं लिखाण वेळ पडली तर शोधून वाचणं ही त्या बांधिलकीची पुढची पायरी नाही का?

तेव्हा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत यात दुमत नसावं. सर्वोत्तम कविता निवडणं हा त्या प्रयत्नांतला एक भाग आहे. पण जसं 'चांगलं साहित्य यावं म्हणून सरकारने काहीतरी केलं पाहिजे' असं म्हणून मोकळं होणं चूक तसंच 'मायबोली प्रशासनाने काहीतरी करावं, कोणीतरी कविता निवडाव्यात' असं म्हणून मोकळं होणंही चूक. चांगलं साहित्य वाचू इच्छिणार्‍या सगळ्यांचीच ही जबाबदारी होते. केवळ प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न पुरेसे नसतात. उलट ही जबाबदारीची जाणीव सगळ्यांनाच झाली, तर काही परिणाम दिसायची शक्यता अधिक.

>> तुमची कळकळ, तुमचे प्रयत्न, तुमचं इस्पित अशा विधानांनी साध्य होणार आहे का?
हे वाक्य 'आपली कळकळ, आपले प्रयत्न, आपलं इप्सित' - असं यायला हवं आहे मला. Happy

'तुझ्या अभिप्रायांचं काय' हा (कळीचा Happy ) प्रश्न विचारला आहेस. मी काही निराळ्या कारणांनी व्यथित होवून गुलमोहोरावर कोणत्याच बर्‍यावाईट प्रतिक्रिया देणं मध्यंतरीच्या काळात बंद केलं होतं. कवितेबद्दलची कळकळ स्वस्थ बसू देईना म्हणून वैभवच्या या उपक्रमात सहभागी झाले. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी ही यातला माझा वाटा (चुकांतलाही आणि सुधारणेतलाही) अमान्य करत नाहीये. Happy

>>एक तर कवी त्याला जे म्हणायचं आहे ते म्हणून मोकळा झालेला असतो. त्याने तोच content पुन्हा गद्यात आणि सविस्तर सांगावा, किंवा त्याच्या आजूबाजूचा (कवितेचा विचार करता) फापटपसारा (जो त्याला कधी सांगायचाच नव्हता म्हणून तर त्याने कविता लिहिली - नाहीतर मोठा ललित लेखच लिहिता नाही का?) सांगावा - हे कवीसाठी त्रासदायक ठरू शकतं.

दुसरं, (जो मुद्दा वैभवच्या पोस्टमधे आला आहे) - एक कविता दहा वाचकांना हात धरून शंभर गावांना घेऊन जाऊ शकते. (अज्जुका म्हणते आहे तो 'अनुभव' हा.) अशी 'संदर्भासहित स्पष्टीकरणं' लिहिल्याने एकच एक अर्थ वाचकांवर लादला जाऊन कवितेतील बाकी शक्यतांवर अन्याय होतो. आणि त्यात पुढचा धोका म्हणजे त्या 'ट्रेनिंग व्हील्स'ची सवय लागून जाऊ शकते. वैभवने म्हटल्याप्रमाणे 'कवितेपेक्षा/ऐवजी स्पष्टीकरणच आवडलं' असं होत राहणंही चूक आणि कवीवर अन्यायकारक नाही का?
बघा पटतं का.<<

स्वाती आभार! आणि यासाठी अर्थातच अनुमोदन.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

जर कवीनी आपल्या कवितेबद्दल दोन तीन ओळीत सांगितले उदा. कविता कशी सुचली, आशय काय असे काहीतरी..
--- कविता कशी सुचली, त्यामागची भावना या गोष्टी थोडक्यात कळाल्या (येथे संपुर्ण रसग्रहण मला अपेक्षीत नाही आहे) तर रसिकाला कवितेचा अस्वाद अजुन चांगल्या प्रकारे घेता येतो असे मला पण वाटते. भा रा तांबेंच्या मधू मागसी माझ्या... च्या मागे त्यांची असलेली भावना समजल्यावर त्या गिताचा गोडवा अजुनच वाढतो...

तर रसिकाला कवितेचा अस्वाद अजुन चांगल्या प्रकारे घेता येतो असे मला पण वाटते.<<
तुम्ही दिलेलं एक उदाहरण चपखल असेल कदाचित पण त्यांची भावना माहीत नसती तरी त्या गीताच्या 'अनुभवण्यात' काही फरक पडला असता का? किंवा अजून अनेक प्रकारे तेच गीत अनुभवता आले असते जी शक्यता बंद झाली कवीला अभिप्रेत असलेली भावना सांगितली गेल्याने असे वाटत नाही?

एक उदाहरण देते..
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
हे गाण ऐकल्यावर किंवा नुसती ही कविता वाचल्यावर एक उदासवाणेपणा, सुन्नता, भकासपणा, काहीतरी संपलंय, तुटलंय अशी भावना, हरवलेपण हे सगळं अंगावर येत नाही? ते हरवलेपण प्रेयसी हरवल्यामुळे/ बहीण हरवल्यामुळे/ आई हरवल्यामुळे/ मैत्रिण हरवल्यामुळे/ आजी हरवल्यामुळे (स्त्री वाचकच घेतलंय कारण शब्दात 'ती गेली' आहे) आहे हे वाचणार्‍याच्या मनस्थितीवर, आयुष्यातल्या घटनांवर आधारीत नाही का? (हाच अनुभव)
आता कवीच्या आयुष्यातल्या कुठल्या स्पेसिफिक तुटण्यातून, हरवलेपणातून हे आलंय याची गरज असतेच का?

बघा विचार करून..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मला कवितांमधल काहीही कळत नाही.
पण एखादी गोष्ट आवडली म्हणुन अभिप्राय देण , किंवा एकुणच एखाद्या व्यक्ती कडुन काही चांगल शिकायला मिळाल असेल ते अप्रिशिएट करण हा प्रकार एकुणच कमी नाही का झालाय?. मायबोलीवरच नव्हे सगळीकडेच. "वेळ नाही " इ. एक्सुजेस दीली जातात. मी पण देते.These days people are lacking in social graces. आजुबाजुला जे चाललय ते मायबोलीवर just represent होतय.
इथे छान चर्चा चालु आहे. पण ती कविते पुरती मर्यादीत असु नये अस वाटत म्हणुन हे लिहिलय.
आपल्या ओळखीच्या व्यक्तीन लिहिल कि आठवण ठेवुन अभिप्राय लिहायचा आणि अनोळखी असेल (आणि जरी लिहिलेल आवडल असेल,किंवा ते वाचल्यामुळ रोजच्या आयुष्यात थोडा तरी फरक पडला असेल) तर अभिप्राय लिहायची बांधिलकी वाटुन घ्यायची नाही हे तर दररोज दीसत. कधी कधी वाटत इंटरनेट हे शाप आहे कि काय. choices इतके unlimited आहेत कि आपण 'नाही' अभिप्राय दीला तर काय बिघडत असा विचार. बरेचवेळा तर तो विचार सुद्धा मनात येत नाही इतके आपण ignorant होवुन जातो.
मुद्दाम कुणीच काही करत नाही फक्त "just ignorance"
लिहिणार्‍याला मात्र वाटत प्रतिक्रिया आली नाही म्हणजे "चांगल" लिहिल नाही.
अभिप्राय आणि गुणवत्ता याचा अर्थाअर्थी काही संबध राहुच नये पण रहातो हे खर आहे.
आणि चार लोकानी छान म्हटल्याशिवाय कळणार तरी कस.
मला इतकच म्हणायच आहे कि ही चर्चा फक्त कवितांना लागु नको (स्वाती तु इतका सुंदर मुद्दा लिहिलयस ना म्हणुन) तर कथा,ललित, रेसिपीज, टाकलेली इतर माहिती सगळ्याच चांगल्या गोष्टीना प्रोत्साहनाची गरज आहे.

>>मुळात 'कविता' या विषयाबद्दल (का कोण जाणे) तू म्हणालास तसा एक मेन्टल ब्लॉक असतो बर्‍याच लोकांच्या मनात. त्यात त्यांना सतत डोळ्यासमोर हास्यास्पद कविता आणि बाफ भरूनच्या भरून चाललेला त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार >- इतकंच चित्र दिसत असेल तर एकूणात कविता हा विषयच हास्यास्पद ठरवला गेला नाही तर काय नवल? एक कवी म्हणून तुला याचा त्रास होत नाही?
गेल्याच आठवड्यात इथे 'मराठी साहित्याची दशा' आणि 'मराठी संगीताची दशा' असे दोन बाफ सुरू झाले होते. 'कुठे हो हल्ली काही चांगलं वाचायला मिळतं' हे विधान करणं सोपं असतं. वाईट लिखाणाची खिल्ली उडवणं सोपं असतं. ती ही बांधिलकी असेल, पण चांगलं लिखाण वेळ पडली तर शोधून वाचणं ही त्या बांधिलकीची पुढची पायरी नाही का?<<

स्वाती, आता पुन्हा तू सर्व छान मुद्दे लिहिलेस. बरेच दिवसापासून वरचे हे काही ठळक गोष्टी खटकतच होत्या.पण तू व्यव्थित मुद्द्याला हात घातलास ह्या निम्मेताने. असो.

दुसरे असे की,आता नक्कीच आशा आहे की मी ही प्रय्त्न करेन कविता स्वताहून वाचून समजावून घेण्ञाचा.

श्र, तू म्हणतेस त्याप्रमाणे हे होणं स्वाभाविक आहे हे काही अंशी खरं. पण म्हणून हे असंच घडत रहावं हे तुला तरी पटतं का? केवळ समर्थनं देऊन प्रश्न सुटतात का? मुद्दा एक कविता दुर्लक्षित होण्याचा नाहीये, एक कवी मायबोली सोडून जाण्याचाही नाहीये. पण बहुतांश लोकांना न आवडणार्‍या कविता चुकीच्या कारणांसाठी चर्चेत रहाव्यात आणि चांगल्या कविता हरवून जाव्यात हे वारंवार होताना बघून तुला व्यक्तिश: वाईट वाटत नाही का?

नाही, इतक्या लोकांना आवडण्यासारखी कविता आधी (चुकीच्या कारणांसाठी) निसटून गेली होती - आणि असं वारंवार घडत चाललंय - हे गैर; आणि त्याबाबत आपण काही करू शकतो का हे आजमावण्यासाठी ही चर्चा.
<<<<

चांगली कविता ही गोष्ट सापेक्ष आहे, हा मुद्दा वर आलाच आहे. स्वाती आंबोळे यांनी निवडली म्हणून 'अ' कविता उत्तम ठरली, नंदिनी यांनी निवडली असती तर 'ब' कविता उत्तम ठरली असती हेही वर लिहिलं गेलं आहे. नवीन लेखन विभागात एक चक्कर मारली तर बहुतांश कवितांना दोन आकडी प्रतिसाद मिळाले आहेत हे दिसतं. मग 'चांगल्या कविता हरवून जाव्यात हे वारंवार होतेय' हा मुद्दा कितपत बरोबर आहे?

नवीन लेखन या विभागाच्या सध्याच्या स्वरुपामुळे हे निसटून जाणं इतर साहित्यप्रकारांबाबतही होतंच आहे की!

दिवाळी अंकांमध्ये लेखन करणारे लोक आपले साहित्य बर्‍यापैकी अभ्यास करून लिहितात, त्यावर संपादकीय संस्कार होतात. या प्रक्रियेतून गेलेले साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट होते तेव्हा त्यावर किती प्रतिक्रिया येतात? दिवाळी अंकाच्या साहित्याच्या मानाने त्यावर आलेल्या प्रतिसादांची संख्या अतिशय कमी असते, तरी त्यावर कुणी तक्रार केल्याचे वा ते दुर्दैवी असल्याचे मतही कुणी मांडताना दिसले नाही.

मायबोलीवरच्या कथा, ललित, प्रकाशचित्रे, व्यंगचित्रे, चित्रकला इत्यादी ललितकलाप्रकारांबद्दलही हेच होताना दिसते. लोक ह्या सर्व प्रकारांतले लिखाण करत असतात, काही गोष्टींवर त्यांना प्रतिसाद मिळतात, काही गोष्टींवर नाही. तरीही लोक सातत्याने लिखाण करत असतातच. मग एका कवींनी कवितांना अजिबात प्रतिक्रिया न आल्याने, मित्राचा भ्रमनिरास वगैरे होऊ नये (हा मुद्दा अजिबात कळला नाही बाकी!) म्हणून मायबोली सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर तो वाचकांचा दोष का आणि कसा? वैभव यांनी आपल्या पोस्टात म्हटल्याप्रमाणे श्री. ढगे हे चांगले कवी असतीलही, आणि ते सातत्याने लिखाण करत राहिले असते तर मायबोलीवर त्यांच्या कविता कधी ना कधी लक्षात आल्या असत्या. योग्य त्या प्रतिक्रिया, चर्चाही त्यावर घडल्या असत्या; तेवढी चिकाटी इथे कुठल्याही प्रकारचे लेखन करणार्‍या व्यक्तीला आवश्यक आहे असे वाटत नाही का?

कविता या साहित्यप्रकारात जास्त रस आणि जाण असलेल्या लोकांनी सर्वोत्तम कविता निवडणे, एकमेकांच्या विचारपुशीत आवडलेल्या कवितेचा दुवा देऊन 'वाचच!' असे सांगून चांगल्या कविता पुढे आणणे, कवितांचा एकंदरीत दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणे हे सगळे योग्य आहे. पण वरच्या बहुतांश पोस्टांत आले आहे तसे 'सर्वोत्तम कविता म्हणून निवडली गेल्यावर मग त्या कवितेला भरभरून प्रतिसाद येणे दुर्दैव आहे, वाचकांची बांधिलकी नसते म्हणून प्रतिक्रिया द्यायला आळस होतो, वगैरे' दोषारोपण कशासाठी?

रसग्रहणावर येणार्‍या 'भाबड्या' (आवडलं/भावलं छापाच्या) प्रतिक्रियांविषयी: सुरुवातीला असे प्रतिसाद आले तरी काय हरकत आहे? एखाद्या व्यक्तीची कविता या प्रकाराबाबत पूर्णपणे कोरी पाटी असू शकते पण त्याला त्या विषयामध्ये रस घ्यावेसे वाटू शकते. अशा वेळेस कुणी रसग्रहण केले, ते वाचून त्याला कवितेकडे बघायची काही दृष्टी मिळाली आणि त्या भरात त्याने 'रसग्रहण भावले' छापाच्या प्रतिक्रिया दिल्या तरी अडचण काय? त्याच ओघात 'रसग्रहणावर प्रतिक्रिया पुरे; कवितेकडे बघा' या आशयाची सूचना देता येऊ शकते. कवीचा/कवयित्रीचा त्याबाबत गैरसमज होऊ नये म्हणून ईपत्र वगैरे पाठवून पूर्वकल्पना देता येऊ शकते. 'रसग्रहणाच्या कुबड्या कशाला?' वगैरे म्हणताना जे कवितेबाबत बिगरी यत्तेत आहेत आणि ज्यांना त्यावेळी त्या रसग्रहणाचा आधार वाटतोय, नवीन गोष्टी कळून येत आहेत, त्या लोकांच्या मनात 'रसग्रहण वाचून कविता समजावून घेणे' चुकीचेच असाही ग्रह उभा राहू शकतो. (पुढेमागे त्यांच्या कविता समजून घेण्याच्या पद्धतीत योग्य ते बदल होतीलही!) रसग्रहण करावेच अशी सक्ती अर्थातच नाही, पण कुणी केले तर त्याला किमान कुबड्यांचे लेबल तरी लावले जाऊ नये. नुसतेच 'आवडली/आवडली नाही/आवडली की नाही माहीत नाही' वगैरे नोंद घेण्याने नक्की काय साध्य होईल?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

श्र,
रसग्रहणाबद्दलचा तुझा मुद्दा अयोग्य वा अस्थानी नाही पण ते कविने स्वतःच केलेलं नसावं. वाचणार्‍याने केलेलं असावं.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>> कविता या साहित्यप्रकारात जास्त रस आणि जाण असलेल्या लोकांनी सर्वोत्तम कविता निवडणे, एकमेकांच्या विचारपुशीत आवडलेल्या कवितेचा दुवा देऊन 'वाचच!' असे सांगून चांगल्या कविता पुढे आणणे, कवितांचा एकंदरीत दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणे हे सगळे योग्य आहे.

इतकं एकमत झालं म्हणजे सार्थक झालं. Happy

या आनंदात मी बाकीचे (>> 'सर्वोत्तम कविता म्हणून निवडली गेल्यावर मग त्या कवितेला भरभरून प्रतिसाद येणे दुर्दैव आहे..' इत्यादि) विपर्यास मनावर घेत नाही. Happy

बाकी विषयांतराचा धोका पत्करून :

>> दिवाळी अंकांमध्ये लेखन करणारे लोक आपले साहित्य बर्‍यापैकी अभ्यास करून लिहितात, त्यावर संपादकीय संस्कार होतात. या प्रक्रियेतून गेलेले साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट होते तेव्हा त्यावर किती प्रतिक्रिया येतात? दिवाळी अंकाच्या साहित्याच्या मानाने त्यावर आलेल्या प्रतिसादांची संख्या अतिशय कमी असते, तरी त्यावर कुणी तक्रार केल्याचे वा ते दुर्दैवी असल्याचे मतही कुणी मांडताना दिसले नाही.

याबद्दल तू संपादक मंडळातल्या कोणाशी बोलल्येस का? Happy
आणि वादासाठी असं धरून चालू की त्याबद्दल कोणी बोललं नाही. म्हणून याबद्दलही कोणी बोलू नये - हे कुठलं तर्कशास्त्र?

त्याहीपुढे जाऊन :

मुद्द्याला प्रतिमुद्दा हे ठीक आहे, पण हा जो एकूण 'हे असंच चालत आलेलं आहे आणि असंच चालू राहणार. चूक की बरोबर हा प्रश्नच नाही. ज्यांना नसेल पटत तो त्यांचा प्रॉब्लेम आहे' असा काहीसा अविर्भाव दिसतोय तो मजेशीर आहे. Happy

स्वाती,
चल ते सगळं मुद्द्याला मुद्दा बाजूला जाउदे.
आता बोल ना काय करायचं ते. खरंच.
कविता अनुभवणे याबद्दल मत मांडल्यावर तलवार उगारून आला एक जण..
अनुभवण्याची संकल्पना स्पष्ट करायचा प्रयत्न केल्यावर अनुल्लेख...
आता सांग.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अजून अनेक प्रकारे तेच गीत अनुभवता आले असते जी शक्यता बंद झाली कवीला अभिप्रेत असलेली भावना सांगितली गेल्याने असे वाटत नाही? >> कवीला अभिप्रेत असलेला अर्थ वाचकाला समजलेल्या किंवा न समजलेल्या अर्थापेक्षा चांगला असेल तर वाचक त्या अनुभवाला मुकतो असे नाही वाटत?

कवीला अभिप्रेत असलेला अर्थ वाचकाला समजलेल्या किंवा न समजलेल्या अर्थापेक्षा चांगला असेल तर वाचक त्या अनुभवाला मुकतो असे नाही वाटत?<<
एक अर्थ चांगला आणि एक अर्थ कमी चांगला असे कसे होऊ शकते? अशी अर्थांमधे/ अनुभवांमधे प्रतवारी करता येणे शक्य आहे/ करणे योग्य आहे असे मला तरी वाटत नाही.
एकच अर्थ सांगितला गेल्यावर वाचक इतर १० शक्यतांना मुकतो. चांगल्या वाईट उत्तम मध्यम अधम कश्याही असल्या तरी त्या १० वेगळ्या शक्यता आहेत ना.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

खरंच आता वाद पुरे. Happy

१. 'सर्वोत्तम कविता' हा उपक्रम सुरूच राहील. (निवडणारे बदलतील - म्हणजे त्यातही एकसुरीपणा यायला नको.)

२. मी माझ्यापुरतं इतकं करायचं ठरवलं आहे : (मिनोतीने म्हटलं होतं त्याप्रमाणे) एकवेळ न आवडलेल्या कवितेवर लिहायला वेळ झाला नाही तरी चालेल, पण आवडलेल्या कवितेवर (फक्त कवितेवर नाही - गुलमोहोरातल्या सगळ्याच कलाप्रकारांवर) आवर्जून अभिप्राय देईनच.

तो देताना त्यातलं मला काय कळलं आणि आवडलं ते ही थोडक्यात लिहायचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे कवीलाही 'कोणापर्यंत तरी यातलं काहीतरी खरंच पोचतं आहे' हे समाधान मिळेल आणि इतर वाचकांना त्याचा झाला तर फायदा होवू शकेल.

स्वाती,
याही पलिकडे वरची चर्चा चाललीये ती मला वाटतं विचारात घ्यायला हवी.
कविता अनुभवणं/ पोचणं आणि कवितेचा शब्दशः अर्थ समजणं तो कवीने स्वतःहून सांगणं या सगळ्यांवर मतांतरे आहेत आणि त्या गोष्टी चर्चेला आल्याने कदाचित माझ्यासारखीला तरी फायदा होतोय असं वाटतं तेव्हा इथे पडदा टाकायचा असला तर नवीन मंचावर ह्या संदर्भातली चर्चा सुरू करावी.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>>>गुलमोहोरातल्या सगळ्याच कलाप्रकारांवर) आवर्जून अभिप्राय देईनच.

रंगीबेरंगी राहिलं गं! Wink

हो हो आय् टी Proud

नीधप - त्याचसंदर्भात माझी वरची पोस्ट संपादित केली गं.
पण हा tricky मुद्दा आहे खरा. नवीन चर्चाही करायला हरकत नाही. Happy

मिल्या, थोडी गल्लत होते आहे. 'दोषारोप' करणं हा या चर्चेचा उद्देश नाही. एक दुर्दैवी पायंडा पडत चालला आहे, त्याबाबत आपण काय करू शकतो, काही करू शकतो का - हा मुद्दा आहे. आणि सूचनांचं स्वागत आहे. तू म्हटल्याप्रमाणे बर्‍यावाईट घटना ज्या समाजात घडतात त्याचंच प्रतिबिंब इन्टरनेटवरही दिसतं. पण आपण वाईट बाजूच अधोरेखित करत रहायचं (कोणत्याही प्रकारे - कुप्रसिद्धीसुद्धा प्रसिद्धीच असते!) की चांगली बाजू उजेडात येण्यासाठीही प्रयत्न करायचे?>>>

स्वाती गल्लत खरेच होत नाहीये इथे माझी... ह्या चर्चेचा उद्देश चांगल्या कवितांना (किंवा कलाकृतिंना) प्रतिसाद मिळायला हवा हा आहे आणि बहुतेक त्याबाबतीत इथे लिहिणार्‍या कुणाचेच दुमत नसावे कारण सगळे आपल्या लिखाणात तेच सांगत असावेत ( त्यामुळेच गिर्‍याला सगळ्यांचेच म्हणणे पटले Happy ) पण चांगल्या कवितांना प्रतिसाद का मिळत नाहीये ह्याची जी कारणे तुला वाटतात आणि मला किंवा इतर एक्-दोन जणांना वाटतात त्याबाबतीत दुमत आहे

मला नाही वाटत काही चुकीचा पायंडा पडत आहे.. तू जाऊन जर शेवटच्या ७२ तासांचे लेखन बघितलेस तर त्यात ५७ कविता आहेत आणि इतर विभागातल्या ११ अश्या ६८ संख्या ही कवितांची आहे. (तासाला एक Happy ). कथा ११ (९+२) आणि ललित ८ आहेत... ह्या ५७ कवितांवर जर जाउन बघितले तर किती कवितांवर त्यांची खिल्ली उडवणारे प्रतिसाद आहेत? किंवा खिल्ली उडवणारे सोड किती प्रति़कूल प्रतिसाद आहेत? एकाही कवितेवर मला सापडले नाहीत... मान्य आहे वाहत्या बीबीवर , गुलमोहराचा बहर ह्यावर टिका टिपण्णी चालते पण तशी ती माबो. वरच्या सगळ्याच 'ज्वलंत' विषयांवर चालते... ललित, कथा किंवा V&C (ग्रूप मध्ये) चर्चा सर्वांवरच चालते पण चांगल्या कथा, ललितला प्रतिसाद मिळतातच पण कवितांबाबत का नाही?

माझ्यामते दोन कारणे आहेत
१. मुळात कविता हा प्रकार कमी लोकांना आवडतो त्यातही काही विचारात पाडणार्या कविता अजून कमी आणि
२. त्यात कवितांच्या भरमसाठ मार्‍यांमुळे चांगल्या कविता निसटू शकतात...
जसे स्मारक ही कविता माझ्याकडून निसटली कारण ती कधीच इतर कवितांच्या मार्‍यात मागे गेली होती...

तेव्हा वाचकांनी काही करण्यापेक्षा कवीनीच काहितरी उपाय करणे गरजेचे आहे असे नाही वाटत का?

जे कवी आहेत ते वाचक ही असतातच (दुसर्‍यांच्या कवितांचे) अश्या कवी-वाचक लोकांनीच ह्याबाबतीत जास्ती पुढाकार घेतला पाहिजे...

श्र ने वेगळा मुद्दा मांडला आहेच... आवडणे हे सापेक्ष असल्याने वाचकांना जे आवडते त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्याच आहेत जसे की 'श्वास' किंवा 'पाऊसपान्हा'

तुला माझे म्हणणे पटायलाच पाहिजे असे नाही आणि तुझे सगळेच मला पटेल असेही नाही तेव्हा ही चर्चा इथेच सोडून चांगल्या कवितांना योग्य प्रतिसाद मिळावेत म्हणून काय करता येईल ह्यावर आपापली मते मांडू

१. जे कवी आहेत त्यांना एखादी कविता आवडली तर आवडली म्हणून त्या कवितेवर (मेल करून किंवा विपुत नव्हे :)) प्रतिसाद देणे.

२. प्रशासनाने आपल्याला कानोकानी ची सोय दिली आहे.. तिचा वापर करून चांगल्या कलाकृतींचा प्रसार करणे.. सद्ध्या फार लोक ते वापरत नाहीत.. लोक का वापरत नाहीत ह्यावर विचार करून लोक ही सोय कशी वापरतील ते पहाणे... एक उपाय म्हणजे प्रत्येक कलाकृतीच्या पानावर खाली कानोकानी चा दुवा असावा ज्यावर टिचकी मारता ती कलाकृती कानोकानीत आपोआप समाविष्ट व्हावी

३. प्रशासनाकडून कविता विभागाकडे बाकीच्या विभांगांपेक्षा दुर्लक्श होते असे मला स्वतःला वाटते त्यात सुधारणा व्हावी

४. ज्यांना कविते विषयी कळते त्यांनी त्यांचे रसग्रहण चांगल्या कवितेवर जरूर करावे

५. चांगल्या आणि वाईट (किंवा कमी चांगल्या ) कवितांमधला फरक सामान्य वाचकांना उलगडून सांगावा किंवा कुसुमाग्रज किंवा तत्सम प्रसिद्ध कवितेची एखादी कविता घेऊन ती आपल्याला का आवडली आणि तिची सौदर्यस्थळे कोणती हे उलगडून सांगता येईल. जसे चिनुक्स ने पुस्ताकांविषयी सुरु केलेला उपक्रम
(४ आणि ५ हे मुद्दे वाचक किंवा कवीसुद्धा 'तयार' करणे ह्या अंतर्गत आहेत Happy )

६. शेवटचा आणि ज्या मुद्याबाबत मी स्वतः द्विधा मनस्थितीत आहे तो म्हणजे एका आठवड्यात एक किंवा दोनच कलाकृती टाकता येतील असे बंधन प्रशासनाने घालावे .. मान्या आहे हे टोकाचे असू शकते आणि मला स्वःतालाही फारसे पटत नाहीये पण म्हणून ह्यावर विचार होऊच नये असे नाही...
(मा.बो. प्रशासनाचे धोरण आहे की लोकांनी लिहिते राहिले पाहिजे मग काही का लिहेनात हे ठीक आहे पण जिथे घटना बदलू शकते तिथे बदलत्या परिस्थितिचा विचार करता धोरण बदलले जाऊ शकते)

शेवट सांगायचे म्हणजे ह्यातले सर्व मुद्दे मी स्वतः अमलात आणू शकत नाही हे आधीच स्पष्ट करतो (लोका सांगे ब्रम्हज्ञान Happy ) पण म्हणून मी ते माडूंच नयेत असे नाही...

चला आता सर्वजण आपापली मते मांडा की खरेच काय करता येईल
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

एक अर्थ चांगला आणि एक अर्थ कमी चांगला असे कसे होऊ शकते?>> तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. चांगला/कमी चांगला हे व्यक्तीसापेक्ष आहे. पण माझ्याबाबतीत बरेचदा अस होत की मला समजलेला किंवा न समजलेला अर्थ आणि कवीला अभिप्रेत असलेला अर्थ जेव्हा वेगळा आहे हे समजत तेव्हा कविचा अर्थ बरेचदा मला जास्त आवडतो. कारण कविला प्रतिभेची देणगी मिळालेली असते प्रत्येक वाचक कितीही वाचन केल तरी त्या पातळीवर विचार करु शकेलच अस नाही.

मिल्या,

>> एक उपाय म्हणजे प्रत्येक कलाकृतीच्या पानावर खाली कानोकानी चा दुवा असावा ज्यावर टिचकी मारता ती कलाकृती कानोकानीत आपोआप समाविष्ट व्हावी>>
ही सोय प्रत्येक धाग्याखाली आधीच दिलेली आहे.

अ‍ॅडमिन त्रिवार माफी पण तिच्याकडे आत्ता तुम्ही सांगेपर्यंत माझेतरी लक्ष गेले नव्हते... हा फक्त माझा दोष आहे आणि बाकीचे कानोकानी वापरतात भरपूर का एकंदरीतच कानोकानीचा प्रसार करायची गरज आहे? तुमचे काय निरिक्षण आहे...?

आता तुम्ही मुखपृष्ठावर ही त्याला स्थान दिले आहेच पण त्या दुव्याचे नाव फक्त कानोकानी असे न ठेवता काही आकर्षक ठेवले तर? जसे 'आवडले लिखाण मग दुसर्‍याला पण सांगा' तत्सम काहितरी.. एक आपली आगाऊ सुचना.

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

इथे मांडलेली अनेकांची मतं मला पटली आहेत. Happy

परवा लोकसत्तेत वाचलेल्या एका लेखाचा हा दुवा. या विषयाशी मला संबंध जाणवला, म्हणून इथे देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20090503/lr11.htm

चांगल्या कवितांना प्रतिसाद मिळायलाच हवेत. पण एवढ्या कवितांतून चांगल्या कवितांपर्यंत खरंच कठीण आहे. हे मी माझ्यापुरतं बोलतो आहे. कविता समजावून घेण्यासाठी मला बरेच प्रयत्न करावे लागतात. आणि एखादी मला आवडेल अशी कविता सापडेपर्यंत इतर १०-१५ कविता वाचून उत्साह मावळलेला असतो.

शिवाय, कविता समजावून घेऊन प्रतिसाद देण्यात आळस होतो, हा मुद्दा केवळ कवितांनाच लागू आहे का?

'स्वरार्थरमणी रागरससिद्धांत' या पुस्तकाचा काही भाग गेले १० दिवस मुखपृष्ठावर आहे. ७ प्रतिक्रिया आहेत. किती जणांनी ते वाचून समजावून घेण्याचा प्रयत्न केला? भाषा अवघड आहे, विषय अनवट आहे, हे मान्य. म्हणजे, जे सहज समजत नाही, ते समजवून घेण्याचा प्रयत्न फारसा केला जातच नाही. हे अर्थातच मलाही लागू आहेच. पण सांगायचा मुद्दा हा की केवळ कवितांनाच प्रतिसाद मिळत नाही, हे तितकंसं योग्य नाही, अनेक उत्तम लेखांनाही कमी प्रतिसाद मिळतो.

>> शिवाय, कविता समजावून घेऊन प्रतिसाद देण्यात आळस होतो, हा मुद्दा केवळ कवितांनाच लागू आहे का?
>> भाषा अवघड आहे, विषय अनवट आहे, हे मान्य. म्हणजे, जे सहज समजत नाही, ते समजवून घेण्याचा प्रयत्न फारसा केला जातच नाही.
>> पण सांगायचा मुद्दा हा की केवळ कवितांनाच प्रतिसाद मिळत नाही, हे तितकंसं योग्य नाही, अनेक उत्तम लेखांनाही कमी प्रतिसाद मिळतो.

- पूर्ण अनुमोदन.
- विषय कवितेवरून निघालेला असला तरी कवितेपुरताच मर्यादित नाही, हे म्हटलंच आहे रे.

लेखाच्या दुव्यासाठी धन्यवाद. झकास आहे. Happy

ही चर्चा खूप आवडतेय.. जर इथे अप्रस्तुत वाटली तरी दुसरीकडे चालू ठेवा प्लीज!
सर्वांचीच मते पटत आहेत असं विचित्र काहीतरी झाले आहे! Happy पण मला काही गोष्टी ठळकपणे जाणवतात..
१) सगळ्याच कवीता सरळ साध्या सोप्या नसतात.. की वाचल्या वाचल्या कवितेचा गाभा कळला.. बर्‍याच खूपदा वाचाव्या लागतात (माझ्यासारख्या सामान्य वाचकाला.. जिला कवीता वाचायची फार सवय/पेशन्स नाहीये पण करून घ्यायला आवडेल!)
२) खूप फास्ट झालंय सगळं.. १ मिनिटात कळली ना तर भारी! किंवा मग तिचा कंटेंट इतका जबरदस्त असला पाहीजे की कितीही मोठी असली तरी खिळून राहायला होईल.. (असे साहीत्यप्रकार अर्थात कमीच सापडतात!)
३) कविता प्रचंड प्रमाणात येऊन आदळतात इथे.. वाक्य वाईट आहे मान्य! पण असंच होते.. माझा स्वतःचा इंटरेस्ट गद्य,ललित,चित्रकला,फोटोग्राफ्स इत्यादी गोष्टींमधे जास्त आहे.. हे सगळं मी नेहेमीच आधी बघते.. पण हे सगळं बघून कविताही वाचायचे त्राण राहात नाहीत! वेळही नसतो.. एखादी बेहद्द आवडली तर प्रतिक्रिया आपसूक जातेच जाते.. पण एकंदरीत कविता 'कळून' घेण्याचा वेळ कमी होत जातोय..

आणि बरेच काही.. मला स्वतःलाही जाणवते की काही सुंदर कविता निसटतात हातून.. पण या नवीन फॉर्मॅट मधे आणि एकंदरीत ओघ वाढल्यामुळे नाही जमत आहे.

बांधिलकीचा मुद्दा नाही पटला.. माझे प्रेफरन्सेस वर दिल्याप्रमाणे असल्यामुळे मला जेव्हा महीन्यातली उत्तम कविता येते तेव्हाच बर्‍याचदा कळते.. त्यामुळे इथे आल्यावरच कवितेला रिप्लाय का दिला इत्यादी गोष्टी चूक वाटतात.

रसग्रहण.. करू नये असं मलाही एकीकडे वाटते. परंतू सहजा सहजी न कळणार्‍या काही कवितांना ऑन डिमांड रसग्रहण यावे.. तेही वाचकांची इच्छा असेल तरच.. अदरवाईज प्रत्येकाला तो वेगवेगळा अनुभव मिळत असतो.. तो तसाच राहावा..

www.bhagyashree.co.cc

कवी संदेश यांचे अभिनंदन. कविता सुन्दर आहेत. या उपक्रमाबद्दल अ‍ॅडमिन टीम आणि स्वातींचे आभार.

चांगल्या कवितांकडे दुर्लक्ष होते हे मान्य आहे आणि तुम्ही दोष दिला नसला तरी गिल्टी वाटलेच. संख्या जास्त असल्याने सगळ्या नाही तरी बर्‍याचश्या माझ्याकडून वाचल्या जातात. आता आवडल्यास तसे आणि का आवडली ते लिहीन. अर्थात ती वैयक्तिक समज आणि आवड पण त्याला जोड म्हणून हा उपक्रम आहेच ज्यामुळे दुसर्‍याच्या- जाणकाराच्या दृष्टीकोनातून चांगलं ते वाचायला मिळेल, समजेल.

शोधून वाचण्यात वेळ जातो, कधी कधी तर एकाच व्यक्तीच्या एका दिवशी ५-६ कविता असतात. सगळ्या कविताप्रेमींनी इथली चर्चा वाचली असेलच तेव्हा त्यांनी जरा स्वतःहून यावर नियंत्रण ठेवले तर एक महत्वाचा प्रॉब्लेम तरी कमी होईल आणि आशा आहे यासाठी वेगळा काही उपाय करावा लागणार नाही.

स्लार्ती, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तोच महत्वाचा मुद्दा आहे. चान्गल्या कवितांकडे दुर्लक्ष होण्याचा पण तुम्ही उपाय सुचवलेत ते 'नवीन' कवींकडे लक्ष वेधण्याचे. नवीन आणि चान्गले हा संबंध कळला नाही. आणि माझ्या कवितेकडे लक्ष जावे म्हणून मग मीच 'नवीन' कवी होऊन येऊ का? Happy

कवीनेच आशय लिहावा ही सक्ती करणे मलाही योग्य वाटत नाही. रसग्रहण कोणी वाचणार्‍याने करावे हे नीधप यांचे पटले. सर्वांनाच दुर्बोध वाटल्यास कवीला विचारता येईल.

लोकसत्तेतील लेख! धन्य त्या लोकांचे टाळके, सतत आपले वेगळेच काहीतरी मनात! एक शब्द वाचला की उचकलेच!! आपल्या मनात सतत जे काही असते तसाच अर्थ लोक कवितेतून काढतात. असले लोक ज्ञानेश्वरांच्या ओव्या नि तुकारामाच्या अभंगातूनहि अश्लील अर्थ काढतील.

एम एफ हुसेनची चित्रे मला अश्लील नि घाण वाटली! कारण मनात सारखे हेच की तो मुसलमान आहे, आपल्या हिंदू देवांचा द्वेष करतो.

काही लोक ओव्या नि अभंगांतून अध्यात्म शोधतात. मनात फक्त चित्रकला असणारे लोक हुसेनच्या चित्रांबद्दल म्हणतात, 'नाही, नाही, ती चित्रे कलात्मक दृष्ट्या उत्कृष्ठ आहेत, त्यात बीभत्स रसाचे चित्रण आहे!'

काही नुसतेच अभंग, ओव्यांची भाषा किती सुंदर आहे एव्हढेच म्हणतील. जसे तुमच्या मनात असेल तसे कवितेत दिसते.

कुठल्याहि शब्दातून अश्लील अर्थ काढणे कठीण नाही, पण त्यातून आध्यात्मिक अर्थहि काढता येतील.

चिन्मयानंदांचे गीतेवरील भाष्य वाचले की लक्षात येते, की आपली बुद्धी जर भगवंताच्या दिशेने वळवली तर ती मनाला नि मन इंद्रियांना आवर घालू शकते. नि हातून चांगली कर्मे घडतात. नाहीतर तीच बुद्धी आपल्या हातून दुष्कर्मे करवून आपलाच नाश करू शकते!

पण कुणाचाहि आग्रह नाही की तुम्ही यावर विश्वास ठेवा, किंवा असेच करा!

शिवाय दुसरे असे की लोक अमुक करतात नि करत नाहीत यामुळे आपल्या मनाला का क्लेश करून घ्यावेत? आपण आपले चांगल्या कविता शोधाव्यात, त्या लोकांना समजावून द्याव्यात, नि त्यांचा आनंद आपण घेऊन लोकांमधे वाटावा! अगदी पहिला क्रमांक नि दुसरा क्रमांक करण्याची पण आवश्यकता नाही! चांगले आहे ना, एव्हढीच कसोटी.

असे आपले मला वाटते.

Pages