एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक
इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण, कोणता वारसा घेतो? पूर्वसुरींची उद्दिष्टं, त्यामागचा विचार, त्यासाठींचा त्याग, संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात? आत्मसात काय होतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काय पोचवलं जातं? परंपरा संक्रमित होते ती संघर्षाची की स्वतंत्र विचारांची की नुसतीच विभूतीपूजेची? पुढच्या पिढीच्या जडणघडणीत आपलं योगदान काय?
एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक हे आणि असे बरेच प्रश्न मांडते. 'इवली झालेली तलवार', 'आधीच पाठीतून वाकलेले (अनुयायी)', 'हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता' यांसारख्या प्रतिमा / ओळी अतिशय प्रभावीपणे येतात. शेवटी जगताना असे प्रश्न पडणंच महत्त्वाचं. 'साधी सोपी उत्तरं' असं काही नसतंही आणि नसावंही, नाही का?

याव्यतिरिक्त लक्षवेधी वाटलेली कविता :
कधीतरी.
एखाद्या साध्याच पण प्रामाणिक विचाराने, साध्यासोप्या पण अंत:करणापासून आलेल्या अभिव्यक्तीने तिच्या त्या सच्चेपणाच्या झळाळीमुळेच लक्ष वेधून घ्यावं आणि मग हळूहळू केवळ त्या झळाळीचाच उदोउदो वाढत जाऊन मूळ विचार हरवून जावा यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असेल? मुखवटे मिरवायची/नाचवायची सवय व्हावी आणि चेहरा असं काही नसतंच/नसावंच असं मानायचा प्रघात पडून जावा - असं होतं तेव्हा आपली स्वतःची सामान्यसुद्धा ओळख जपू पाहणार्‍याने कुठे जायचं असतं? समाजाच्या गतानुगातिकतेवर नेमकं भाष्य करणारी कविता.

----------
जाता जाता :
या महिन्यात निवडल्या गेलेल्या दोन्ही कविता एकाच कवीच्या आहेत हा एक योगायोग. या दोन्ही कविता आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिल्या होत्या हा त्याहून मोठा आणि दुर्दैवी योगायोग. या कवीच्या बाकी कविता कोणाला दिसूच नयेत आणि 'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गेल्या महिन्यात सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली 'पाऊस बारावाटा' ही कविता अशीच दुर्लक्षित रहावी, आणि निवड झाल्यावर मात्र तिच्यावर अनुकूल अभिप्रायांचा पाऊस बारावाटांनी पडावा हा ही योगायोगच म्हणायचा का?
गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
'आताशा पूर्वीसारखे लिहिणारे राहिले नाहीत' हे वाक्य किती सहज म्हणतो आपण, पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का? आंतरजालासारख्या माध्यमामुळे आपले विचार एकाच वेळी अनेकांसमोर व्यक्त करणं सोपं झालं हे खरं, पण विचार 'पोचणं' इतकं कठीण का झालंय?

या संदर्भात वैभव जोशींची एक कविता आठवली ती त्यांच्या परवानगीने उधृत करत आहे :

कुसुमाग्रज
बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं...
तुम्ही मोठ्या उल्हासाने "कणा" पोस्ट केली असती
अन पापणी लवायच्या आत
तुमच्या आयडी वरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता
ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून
चर्चा इतकी रंगली असती की
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

दैव फारच मेहरबान असतं तर
वाचली असती एखाद्या विडंबन करणार्‍याने "कणा"
आणि मारून मोकळा झाला असता
कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने
बायकांना आणखी एक टोमणा.
तुमचा (?) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता
पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या
स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा तुमच्या नशीबी आला असता
एखादा गज़लकार
ज्याने "कणा" या अचानक सुचलेल्या(?)
काफ़ियाशी मिळत्याजुळत्या कवाफ़ी जमवायला घेतल्या असत्या...
किंवा एखादा छायाचित्रकार
ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या
बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी
तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं
लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच
एक कविता आहे असं जाहीर केलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा
"कणा"ची लांबी रुंदी मोजली गेली असती
("खोली" नव्हे , ती 2 D मॉनिटरवर कळत नाही)
किंवा तुमची कविता वाचून कुणालातरी
स्वतःची (काही वर्षांपूर्वी) लिहीलेली कविता आठवली असती
किंवा कुणाला तत्क्षणी सुचली असती
ज्यांना कदाचित
प्रचंड लोकाश्रय मिळाला असता
ज्यांचं कदाचित नवी म्हणून वा
जुनीच पुन्हा पोस्ट केली म्हणून
तोंडभरून कौतुक केलं गेलं असतं
आणि
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

आणि कुसुमाग्रज,
मराठी वाचकांच नशीब जर
अगदीच -- असलं असतं तर
ह्यातलं काही एक घडलं नसतं ...
चंद्र, चांदण्या , प्राजक्त , मोगरा
काहीच दिसत नाही म्हणून
लोकांनी "कणा" कडे ढुंकून पाहिलं नसतं
आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान
अनुल्लेखाने काळवंडलं असतं...,कायमचं
मागे राहिल्या असत्या
"कणा"च्या लाखो स्पाईनलेस आवृत्त्या
हजारो ऑर्कुट प्रोफाईलस , शेकडो ब्लॉग्ज
ज्यांच्या मालकांनी आयुष्यभरासाठी
"कुसुमाग्रज" हे प्रोफाईल नेम घेतलं असतं ...
आणि मूळ कविता तिच्या कवीसकट हरवून गेली
हे कुणाच्याच लक्षात आलं नसतं
.. अगदी तुमच्यासुध्दा!

आता बोला कुसुमाग्रज
बरं झालं ना तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं ???

- वैभव जोशी.

--------------------------------------------------------------
सर्व कविता वाचून त्यातून वरील कविता निवडण्याचे काम या महिन्यात स्वाती आंबोळे यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

प्रकार: 

पण माझ्याबाबतीत बरेचदा अस होत की मला समजलेला किंवा न समजलेला अर्थ आणि कवीला अभिप्रेत असलेला अर्थ जेव्हा वेगळा आहे हे समजत तेव्हा कविचा अर्थ बरेचदा मला जास्त आवडतो.<<
आता हा तर वैयक्तिक मुद्दा झाला त्यावर मी काय बोलणार. पण कदाचित कधीतरी कवीने सांगितलेले 'खुद्द' कवीने स्वतःच सांगितलेय म्हणजे ते योग्यच असणार अश्या कंडिशनिंगमुळेही होत असेल क? नेहमीच असं नाही पण काही वेळा तरी?

कारण कविला प्रतिभेची देणगी मिळालेली असते प्रत्येक वाचक कितीही वाचन केल तरी त्या पातळीवर विचार करु शकेलच अस नाही.<<
हे नाही मान्य. वाचकही प्रगल्भ असतो. वाचकही संवेदनशील असतो. फक्त कवी जे शब्दांत मांडून अनुभवतो ते वाचक वाचून अनुभवतो. आणि अजून एक म्हणजे कवीच्याच पातळीवर विचार व्हायला हवा असा आग्रहच सोडून दिला तर. कवीचं आयुष्य आणि वाचकाचं आयुष्य वेगळं असणार (कुठल्याही दोन माणसांची वेगळीच असतात म्हणूनच केवळ..) तेव्हा कवीचं अनुभवणं आणि वाचकाचं अनुभवणं यात फरक(चांगलं वाईट नाही, केवळ फरक) असणारच. आणि तो असणं हे जास्त छान आहे. त्याने कविता वाढते. त्याने कवीही वाढतो आणि वाचक तर वाढतोच वाढतो.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>> एक कविता दहा वाचकांना हात धरून शंभर गावांना घेऊन जाऊ शकते. (अज्जुका म्हणते आहे तो 'अनुभव' हा.) अशी 'संदर्भासहित स्पष्टीकरणं' लिहिल्याने एकच एक अर्थ वाचकांवर लादला जाऊन कवितेतील बाकी शक्यतांवर अन्याय होतो. आणि त्यात पुढचा धोका म्हणजे त्या 'ट्रेनिंग व्हील्स'ची सवय लागून जाऊ शकते. वैभवने म्हटल्याप्रमाणे 'कवितेपेक्षा/ऐवजी स्पष्टीकरणच आवडलं' असं होत राहणंही चूक आणि कवीवर अन्यायकारक नाही का?
बघा पटतं का.<<
स्वाती,
वादासाठी म्हणून नाही पण सहज वाटले म्हणून लिहितेय,
कविता म्हणजे कवींच्या मनातील त्या वेळी अनुभवलेले वा त्याला जाणवलेले भाव. मग ते समजून घेणे हेच महत्वाचे ना? तसे नसते तर शालेय पुस्तकात का मग ओळख देतात की कवीला येथे काय जाणवले आणि ही कविता काय express करायला लिहिली. त्याचे काय म्हणणे होते ह्या ओळींतून. मग reference to context हा प्रकार नसताच ना? मग जो कोणी टिचर नी त्याची कवितेची जाण जी काही असेल तसेच त्याने मग पाहिजे तो अर्थ समजावून सांगितला असता प्रत्येक वर्गात नी ते ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या टिचरने.
अर्थात, कवी काय म्हणू इच्छितो? त्याचे काय म्हणणे किंवा कवीची काय कळकळ का मेसेज काय आहे ह्या कवितेतून हे वाचकला स्वताहून कळले नाही तर रसग्रहण सांगू शकेल नाहीतर तसेही प्रत्येक जण नाही कळले तर स्वताला जो काही अर्थ कळतो तो काढतोच ना? योग्य अर्थ कळल्यानंतर वाचकला मग कुठे ती कविता घेवून जाते ही वाचकाची अनुभती असु शकते.

एक गमतिशीर उदाहरण द्यायचे झाले तर,
'तरूण आहे रात्र अजूनी' हे गाणे मी स्वतः एकले तेव्हा मला कळलेला अर्थ होता; एक तरूणी आपल्या प्रियकराला मनवतेय. काही मैत्रीणींनी आणखी पुढे गमतीत, एक बिचारी पत्नी रात्रीचा ओटा आवरून काम करून येइपर्यन्त तिचा नवरा घोरत झोपला होता नी तरूणी सकाळच्या कामासाठी उठवत होती. :फिदी:.
नंतर माबो वर दोन नवीन अर्थ कळले,
बी ह्यांनी , आई बाळाला उठवते असा घेतला होता. Happy त्याच चर्चेत हे शोकगीत आहे कळले. मग पुन्हा मी ओळी एकून, हो असे असेल सुद्धा म्हणून समजून गाणं एकून मन दुखी वगैरे झाले(उगीच केले).
आता परवा सारेगमप मध्ये पंडितजी म्हणाले, त्यांनी जे काही एकले श्री सुरेश भटाकडूंन त्या अर्थी हे प्रेमगीत आहे. Happy

(इथे माबो प्रथेनुसार कोणाच्याही पोस्टचा जो तो स्वताच्या पर्सेपशनने अर्थ काढतोच ना? (जे वादाला खाद्य असते) Proud

ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कवीने रसग्रहण दिलेच पाहीजे त्याच्या कवीतांचे पण साधारण विचार काय हे कळले तर मदत होवु शकते. मला तर 'स्मारक' सारखी कविता कधीच आयुष्यात कळली नसती. :).

पण ह्या बीबीमूळे एक कळले,तसे आपण एकटेच इथे कविता न समजणारे नाहीत,चांगले भरपूर वाचन केलेले,लेख लिहिणारे माबोवरचे लेखक/कवी (माझ्या मते)त्यांना सुद्धा समजत नाही पाहून बरे वाटले. Happy

क्लिओ, नवीन आणि चांगल्याचा काहीच संबंध नाही Happy पण माबोवर 'कवी' म्हणून ओळखले जाण्याचा नक्कीच आहे.
जे प्रस्थापित कवी आहेत, त्यांच्याकडे लगेच वाचकांचे लक्ष जाते, याचे प्रमुख कारण 'ते नाव कवी म्हणून ओळखीचे असते, त्या कवीच्या कविता आवडत असतात' हे आहे. ती कविता निदान वाचली तरी जातेच. दिवसाला ५० कविता आल्या तरी त्या कवीची कविता वाचली जाण्याची शक्यता खूप असते.
इथे वर अनेकांनी असे सांगितले आहे की, कविता वाचलीच नाही, कारण ती निसटली. नवीन कवींबाबत हा मोठा प्रश्न आहे. तर कविता निदान वाचली जावी या उद्देशातून मी ते सुचवले आहे. कवितेवर प्रतिक्रिया देणे/न देणे यावर चर्चा सुरू आहेच.
क्लिओ या नावाला पुरेशी ओळख नाही असे वाटत असेल, आपले साहित्य इथे वाचलेच जात नाही, असे वाटत असेल तर 'नवीन कवी' होऊन अवश्य या. म्हणजे निदान तुमची कविता वाचायला लोकांना पुरेपूर संधी दिली असे होईल. आताच्या प्रणालीमध्ये वाचकांना 'नवीन कवी'साठी अशी पुरेपूर संधी दिली जात नाही.

  ***
  लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
  खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

  मला साध गद्यातल बोललेल धड समजत नाही (अस लिम्बीचही ठाम मत हे Proud ), तर कुणी पद्द्यातून काही सान्गायचा प्रयत्न केल्यास काय डोम्बल कळणारे?
  म्हणून मी सहसा कोणत्याच कवितेच्या वाटेला जात नाही!
  वर उल्लेखिलेल्या कवितान्च्या वाटेसही अजुन गेलेलो नाहीये! Happy
  मात्र कुठे तरी कधीतरी क्वचित कोणत्या कवितेवर प्रतिक्रिया देतोही
  पण याचा अर्थ असा नव्हे की ते आवडलेलेच असते वा नावडलेले अस्ते! Happy
  बस्स, वाहत्या गर्दीतल्या रस्त्यातुन जाताना रस्त्यावर एखादे कुत्र्याचे गोन्डस पिल्लु दिसावे वा एखादा अ‍ॅक्सिडेन्ट दिसावा, अन कुतुहलाने आत डोकवावे, अरे किती छान पिल्लु आहे किन्वा अरेरे,वाईट झाल अशी समयोचित प्रतिक्रिया उमटावी तद्वतच, येथिल पोस्टस्च्या वहात्या प्रवाहात होते!
  थोडक्यात काय? मायबोलीवर उतरणार्‍या प्रत्येक पोस्टची समिक्षा व्हावीच व्हावी असा आग्रह धरुन चालणार नाही! माझ्यापुरते बोलायचे तर मी यस्जिरोडवर लिहिलेल्या साध्या साध्या पोस्टला देखिल असन्ख्यवेळेस प्रतिसाद मिळत नाही! पण त्याबद्दल माझी तक्रार नस्ते!
  तरीही, स्वातीजीन्नी जो प्रश्न उधृत केला, त्या सम्बन्धाने.....
  रस्त्याने जाताना, वेगळे काही दिसले, तरच जसे लक्ष जाते, नेहेमीच्या गर्दिकडे जराही लक्ष नस्ते तसे काहीसे कवितान्च्या बाबतीतही होत नाहीना याची खरी काळजी कविन्नीच घ्यायची आहे! ती म्हणजे आपल्या कविता रस्त्यावरील गर्दीप्रमाणे कोसळत पडू नयेत! अन जर "एखाद पिल्लु मेल" किन्वा "राम राम' अशासारख्या शीर्षकान्च्या कविता गर्दीतल्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे वा अ‍ॅक्सिडेण्टप्रमाने "आम्हा सामान्यजनान्चे" लक्ष वेधून घेऊन प्रतिक्रियेस भाग पाडत असतील तर दोष प्रतिक्रिया देणार्‍यान्चा कसा काय बोवा? की रस्त्यावर थाम्बू नये या आरटीओच्या नियमाच्या आधारे दोषी???? Lol
  असो
  मी आधीच कबुल केल आहे की मला कविता समजत नाही!
  मागल्याच आठवड्यातील सारेगमपच्या कोणच्याश्या भागात ज्ञानेश्वरान्च्या एका विराणीचा उल्लेख झाला! त्यावर कौशल इनामदार यान्नी छान टिपण्णी केली होती, (फक्त ते त्यास अभन्ग म्हणले, पन्डीतजीन्नी दुरुस्ती करुन विराणी असे सान्गितले) तर कौशलजी असे म्हणाले की ज्ञानेश्वरान्सारख्या सन्ताच्या रचना, कोणीतरी त्यास सुन्दर सन्गित दिले, कोणतरी ते उत्कृष्ट पणे गायिले (ती पल्लवी बडबडबडते तसे "म्हणले" नाही, "गायिले") अन ते आमच्या पर्यन्त गाण्याच्या रुपात आले, म्हणून त्यातले - मूळ रचनेतील शब्द, अर्थ, भावार्थ, गर्भितार्थ इत्यादी कळले, आमच्यापर्यन्त पोहोचले! (अन्यथा मूद्दामहून कोण वाचायला जाणारे ज्ञानेश्वरी वा गाथा वा मनाचे श्लोक????)
  हे असे जर ज्ञानेश्वरान्बाबत घडू शकते, त्याची जाहीर कबुली दिली जाते, तर आजकालच्या कविन्च्या रचनान्ना लगेच "वाचून" प्रतिसाद मिळेल वा मिळावा, हे कशाच्या जोरावर ठरवले जाते?
  वरील प्रश्नान्ची ही बाजूदेखिल समजुन घेतली पाहिजे असे मला वाटते! Happy
  ...;
  ***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****

  अन जर "एखाद पिल्लु मेल" किन्वा "राम राम' अशासारख्या शीर्षकान्च्या कविता गर्दीतल्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे वा अ‍ॅक्सिडेण्टप्रमाने

  या कवितेचे कवीने दिलेले शिर्षक "एक मरुन पडलेलं पिल्लू" एवढंच आहे. कविता वाचलीत तर(च) त्याची समर्पकता समजेल. "मा.बो. ला राम राम" हे माझ्या frstration मधुन आलेलं addition आहे. एका अपरिचीत कवीच्या काही "ताकदवान" रचना मायबोलीवर काही काळापुरत्या होत्या हे तरी निदान सुजाण वाचकांना लक्षात यावं म्हणून हे addition मी टाकलं होतं. कवीची याला परवानगी ही नव्हती आणि अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा त्याला हव्यासही नाही. वैभव जोशीनी त्याचं केलेलं वर्णन अगदी सुस्पष्ट आणि योग्य आहे.

  गद्य ही न समजण्याचे सांगुन अकारण "शालजोडी"तले देणार्‍यांनी कृपया याची नोंद घ्यावी ! धन्यवाद !

  त्याच चर्चेत हे शोकगीत आहे कळले. >>> रसग्रहणाची नितांत, अनिवार्य, आवर्जुन... ई. ई. गरज आहे Happy

  स्वाती .. तुमचे-आमचे >> चुक झाली कान पकडतो. पण खर तुमचे हा शब्द विचार पुर्वक लिहला होता. कारण प्रामाणिक पणे मी खरच कुठेलेही प्रयत्न केलेले नाहीत कींवा इतर कुणी केलेले मला दिसले नाहीत. उगाच सभेच्या वेळी झेंडे घेउन, आपण सुद्धा पक्षाचे मोठे कार्यकरते आहोत अस मिरवल्या सारख झाल असत. Happy

  चला खुप चर्चा झाली, अजुन झाली तर ती वेगळ वळण घेईल त्या आधिच ही चर्चा थांबवुन योग्य निष्कर्श काढावा हे योग्य.

  त्याच चर्चेत हे शोकगीत आहे कळले. >>> रसग्रहणाची नितांत, अनिवार्य, आवर्जुन... ई. ई. गरज आहे<<
  बाबारे
  'उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
  तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे'
  अश्या ओळी आणि तेवढीच sensuous चाल ऐकूनही कोणाला जर शोकगीत वाटणार असेल तर रसग्रहणाने तरी काही फरक पडणारे का? Wink

  तटी: हे केवळ विनोदापुरतेच घ्या ते जमलं नाहीतर सोडून द्या. तलवारी काढून ओरडायला येऊ नका.

  ----------------------
  हलके घ्या, जड घ्या
  दिवे घ्या, अंधार घ्या
  घ्या, घेऊ नका
  तुमचा प्रश्न आहे!

  ते शोकगीत आहे ती तिकडच्या कुठल्या एका बीबीत कुणीतरी आधीच केलेली चर्चेत म्हटले होते.

  हो, मी पण वाचलंय ते. युद्धभुमीवर हुतात्मा झालेल्या वीराच्या पत्नीचे समोर ठेवलेल्या पतीच्या कलेवराशी हे बोलणे आहे. Sad
  ************
  धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

  एक उत्तम चर्चा बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाली. आणि त्या निमित्तानेच काही निसटून गेलेल्या चांगल्या कवितासुद्धा वाचायला मिळाल्या. त्याबद्दल स्वातीचे आभार!

  वरील चर्चांमध्ये "कवितेचे रसग्रहण असावे/नसावे" यावर बरेच मुद्दे मांडले गेले आहेत. त्या अनुषंगाने एक करता येईल का? जसे काही दिवसांपूर्वी दीपांजलीने हिंदी सा रे गा मा बरोबरच त्यासाठी एक स्पॉयलर अलर्ट चा बा. फ. पण सुरू केला होता. त्याच धर्तीवर जर एखाद्या चांगल्या कवितेच्या रसग्रहणाचा वेगळा बा. फ. सुरू केला तर ज्या लोकांना "रसग्रहणाच्या कुबड्यांशिवाय" कवितेचा आनंद घ्यायचा आहे ते हा रसग्रहणाचा बा. फ. न वाचता कवितेचा आनंद घेऊ शकतील. आणि ज्यांना कविता समजून घेण्यासाठी रसग्रहणाची आवश्यकता भासते किंवा रसग्रहणामुळे त्या कवितेचे आकलन नीट होते त्यांची पण सोय होईल.

  रसग्रहण वाचकाने केलेले असावे. कवीने नाही निदान सुरवातीला तरी नको. इतकीच अपेक्षा आहे.

  ----------------------
  हलके घ्या, जड घ्या
  दिवे घ्या, अंधार घ्या
  घ्या, घेऊ नका
  तुमचा प्रश्न आहे!

  नी, अनुमोदन!!

  रसग्रहणाच्या बाबतीत मला स्वाती आणि नीरजाचे संपूर्ण पटतेय. कवितावाचनाचा अनुभव, ती कळण्याचा, उमजण्याचा अनुभव संपूर्णपणे वैयक्तिक असतो आणि असावा.
  कविच्या शब्दांत काय इतर कुणाच्याही शब्दांत रसग्रहण नकोच. केलंच तर त्याचा बीबी अभी म्हणतोय तसा वेगळा असू द्या.
  मायबोलीवरच्या कविता मी फारच कमी वाचते आणि प्रतिक्रिया तर त्याहून कमी देते त्यामुळे मला खरतर त्यावर बोलायचा फारसा अधिकार नाही पण स्वाती, वैभव जोशी, अज्जुका ह्यांच्या कविता इथेच भेटल्या आणि भिडल्या, आणि त्या कोणत्याही रसग्रहणाशिवाय आतपर्यंत पोचल्या.
  कविता 'प्रचंड' प्रमाणावर मायबोलीवर आदळतात हे वर कोणीतरी लिहिलय ते खरंच आहे. पण त्यातल्या काहीच कवितांच्या गावी मुक्काम करावासा वाटतो. ओळखीचे नाव दिसले तर पाय रेंगाळतात, आणि काही कविता वाचून त्या समजून घेतल्याशिवाय पुढे हलूच नये असं वाटलेलं असतं. शब्द, लय, नाद, अर्थ, गाज अशी अनेक कारणं मुक्काम करावासा वाटण्याची असतात. कविता अनेक वाटांनी आपल्यापर्यंत येऊन पोचत असते.
  मनस्विनीने शाळेतल्या रसग्रहणाचं उदाहरण दिलं आहे. मला वाटत त्याचा उद्देशच मुळी त्या पहिल्या पायरीनंतर पुढच्या इयत्ता आपल्याआपण चढता येणं शक्य व्हावं हा असतो. बोरकर, मर्ढेकर, इंदिराबाई शाळेत भेटतात त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या वाटांनी त्यानंतरच्या काळात भेटतात हा अनुभव आपण प्रत्येकानेच घेतलेला असेल. ' घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटे न अजून?' किंवा 'सावल्यांच्या पावलांनी नको चांदण्यात भेटू' किंवा 'पाठीतून जंबिया मधाचा घाली काळजात' अशा ओळी ज्या कवितेत असतात त्या कविता शब्दार्थांच्या दृष्टीने सहजसोप्या असूनही खर्‍या अर्थाने समजलेल्या असतात त्या वयाच्या विशिष्ट मुक्कामांवर पोचल्यावरच नां?
  ग्रेस, गालिब, गुलजार, साहिर, बुल्लेशाह, कोलाटकर, सुर्वे, खानोलकर अशा कित्येक गावांचे नकाशे तपासत बसण्याची वेळ कधी कोणावर येऊ नये. यांची रसग्रहणं कोणी करावित आणि कशी? अर्थ उलगडून सांगितला तरी ती कविता त्यातून समजेल कां? ती आपली आपणच समजून घायची असते. ही गावं काखोटीला मारुनच आपण पुढच्या मुक्कामी जायचं असतं. वाटेतच कधीतरी अर्थ अजून उलगडत जातात. कधी एखाद्या मार्गावर समजलीय असं वाटणारी कविता उमजते खूप पावलं पुढे चालून गेल्यावर.
  एखादी कविता नाहीच समजली, दुर्बोध वाटली तर आपल्याला तिच्यापर्यंत पोचायचा रस्ता सापडत नाहीये आत्ता तर तो सोडून द्यायचा असतो. पुढल्या गावाकडे वळावं. वाटेतल्या प्रवासात कधीतरी आधीच्या गावाकडे पोचवणारा रस्ता अकस्मात सापडतो. तो आनंद अवर्णनीय असतो. आपला आपणच अनुभवायचा असतो.

  जियो ट्यु...
  अगदी हे आणि हेच...
  ----------------------
  हलके घ्या, जड घ्या
  दिवे घ्या, अंधार घ्या
  घ्या, घेऊ नका
  तुमचा प्रश्न आहे!

  ट्यु.. एकदम पटेश!! Happy

  [माझी वरील सूचना हि केवळ त्याचसाठी होती की रसग्रहणाशिवाय कविता "अनुभवायला" मिळावी] Happy

  ..

  तथ्याला "शालजोडीतले देखिल" म्हणतात वाटते! नव्यानेच कळले Happy
  शेरलॉक, मी मला भावलेली फ्याक्ट सान्गितली, हव तर ही देखिल छापून तुझ्या त्या मित्राला जरुर दाखव, माझी खात्री आहे, त्याला यात शालजोडी वगैरे वाटणार नाही!
  माझी पोस्ट, त्या कवितान्ना उद्देशून नव्हतीच तर या बीबीच्या सुरवातीला "जाता जाता" (कुणि बरे?) लिहिलेल्या "अन्य" मजकुरास धरुन तसेच मायबोलीवर अन्यत्र झालेल्या "चर्चान्चा" मागोवा घेऊन त्या सन्दर्भात ही सर्व पोस्ट वाचलीत तर यात शालजोडी वगैरे काहीही नसून एक मायबोलीकर म्हणून माझ्या अनुभवास आलेले/येत असलेले केवळ निखळ वास्तव मान्डले असे लक्षात येईल! Happy
  (ज्या प्रकारे वैभव जोशीन्नी त्यान्च्या वर उधृत केलेल्या कवितेत, त्यान्ना जाणवलेले वास्तव मान्डले आहे, त्याची दूसरी बाजू मी मान्डली आहे असे मला वाटते! कुसुमाग्रजान्च्या वेळेस इन्टरनेट अस्ते तर काय झाले अस्ते याचे चपखल वर्णन त्या कवितेत आहे, मी मात्र माझ्या पोस्ट मधे, जर कुसुमाग्रजच आत्ता इथे कविता पोस्ट करु लागले तर त्यान्नी देखिल घ्यायच्या खबरदारीविषयी आडमार्गाने लिहीले आहे!
  शॉवर खालील आन्घोळ सुखावह होते, तर धो धो धबधब्याखाली वेळेस अन्ग शेकाटून निघते, आपापल्या कविता स्वतःच तावुन सुलाखुन तपासुन बघुन निवडक त्या त्या टाकाव्यात की धोधो धबधब्याप्रमाणे ओतून वाचकान्ना शेकाटून काढावे ही तो कविन्ची मर्जी! Proud या उप्पर मी काय बोलणार???? )
  असो
  कविचे अभिनन्दन! (त्यान्ना कळवा) Happy

  एका वृद्धाचे मनोगत या जागूच्या कवितेवरील चर्चेत साजिर्‍यास दिलेले उत्तर, मुद्दामहून इथे देत आहे! Happy

  limbutimbu | 9 मे, 2009 - 12:26
  साजिर्‍या, वास्तव मान्डले, म्हणजेच निराशावादी असे नसते! तर वास्तवामुळे, भविष्याबाबत जो कुशन्का घेतो, तो निराशावादी!
  मान्डणी चान्गली हवीच, पण आशयही तितकाच महत्वाचा! मान्डणी चान्गली असेल पण आशय अगदीच कुचकामी असेल तर चालणार नाही! कविला जे काय "लोकांस" सान्गायचे आहे, त्याची आशयघनता जर वाचकास भिडणारी असेल, तर ती कविता मान्यता पावते! पण कवितेत विशेष असा आशयच नसेल, केवळ र ला ट अन फ जोडत कविता केलेली असेल, तर माण्डणी कितीही चान्गली असेल, यमक अनुप्रासादिक बाबी असतील तरी वाचकास कविता भावणार नाही!

  बाकि मायबोलीवर सद्ध्या चालू असलेल्या चर्चेनिमित्ताने (एप्रिल कविता) अजुन एक लक्षात घे, मी स्वयम्पाक केला, माझ्या आत्मानन्दासाठी, मी तो वाढून घेतला व गिळलो, माझ्या क्षुधाशान्तीसाठी, अन समजा त्यात काही तिखटमीठ वगैरे कमीजास्त पडले तरी, त्यास मीच जबाबदार व भोगणाराही मीच!
  अगदी तसेच कवी व त्याच्या कवितान्चे अस्ते! जोवर कवि त्याच्या आत्मानन्दासाठि कविता करतो, व कदाचित स्वतःच पुन्हापुन्हा वाचतो, तोवर ती कविता, काय, कशी याची जबाबदारी पूर्णपणे त्याचीच अस्ते!
  पण ज्याक्षणी तो त्याची कविता जनान्समोर उघड करतो, त्याक्षणी, तिखटमीठ कमीजास्त झाल्यामुळे, करपल्यामुळे वा कच्चे राहिल्यामुळे स्वयम्पाकास जशी गिळणारा अन्य कोणी, नावे ठेविल, त्याच पद्धतीने कविता जर समजली/उमजली नाही, आशयघनता भिडली नाही, माण्डणी पटली नाही तर वाचक एकतर त्यास बरावाईट प्रतिसाद देईल वा अनुल्लेख करेल! वाचकाच्या नेमक्या या स्वातन्त्र्यावरच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातय, कदाचित तशी फ्याशन असावी!
  शिवाय, एखादे अन्नछत्र असेल, तर माणूस जेवेलही तिथे कदाचित, पण पाचपन्चवीस अन्नछत्रे उघडलेली असल्यावर बकासुराचा अवतार जरी आला, तरी तो सर्व ठि़काणी गिळू शकणार नाही, तद्वतच, पाचपन्नास अन्नछत्रे उघडल्याप्रमाणे कवितान्चा ओघ धो धो असेल, तर वाचक, सगळ्याच कविता वाचायच्या भानगडीत देखिल पडणार नाही! पण बरेच जणांस, हेच अमान्य आहे, कदाचित याचीही फ्याशन असावी!
  असो
  बरच विषयान्तर केल, माफी असावी!
  (मी मात्र आता क्यान्टीनचे गिळून येतो, मी शिव्या घातल्यास, त्या खायची जबाबदारी मात्र त्याची )

  मि गेल्या काही दिवसापासुन ही चर्चा वाचतो आहे, त्याच्या अनुशंगाने मला जाणवलेले काही मुद्दे..
  ही चर्चा वाचकांच्या प्रतीसादा बद्दल आहे, रसग्रहण करावे की करु नये याबद्दल आहे... मला एकच प्रष्ण आहे.. मायबोलीवर खरोखर कविता कळणारे, त्या कलाकृतीला खर्या अर्थाने समजुन घेउ शकणारे किती लोक आहेत.. काही ठराविक लोक सोडले ( दुर्दैवाने ही संख्या खुप कमी आहे) तर बाकीचे माझ्यासारखे लोक या कवितांकडे तेव्हड्या सीरीअसली नाही बघत.. केवळ एकदा जाता जाता वाचली आणी मनाला भावली तरच त्या कविकडे पुढच्या वेळी लक्ष जाते, किंबहुना द्यावेसे वाटते.. याचे खरे कारण वरवर कविता वाचुन त्या कवितेचा समजलेला अर्थ, लय, किंवा नाद मनाला भावलेला नसतो.. पण एखाद्या जाणकार किंवा कवितेतील दर्दी व्यक्तीने त्याचे रसग्रहण केले किंवा त्याचा अर्थ समजावुन सांगीतला, तर ती कविता किंवा कलाकृती मनाला एकदम भावते.. वैभव, ट्युलीप, नीधप स्वाती या किंवा या सारख्या दर्दी लोकाना प्रत्येक कलाकृती मध्ये वेगळा अर्थ जाणवु शकतो, पण सामान्य वाचकांचे काय?
  वैभव नी आणी त्याच्या मित्रानी जो पर्यंत कार्यशाळेच्या माध्यमातुन गझल आणी तिच्या रचने विषयी माहिती दिली न्हवती, तोपर्यंत किती लोकाना गझलेची रचना, मात्रा, वॄत्त, मतला वगैरे गोष्टींची जाणीव होती.. माझ्या सारख्या बर्याच लोकाना कविता कुठली आणी गझल कुठली हे खरेच माहिती न्हवते... (जाताजाता ...ही माहिती थोड्याफार प्रयत्नाने माबोच्या बाहेर ही मिळाली असती, पण ती जाणुन घेण्यासाठी काही कष्ट करायची मानसीक तयारी न्हवती, किंवा मि काही कवि नाही, मला याचा काय उपयोग ही भावना ही होती) माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की उत्तम वाचक घडवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे.. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाले पाहीजेत...
  माझा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी म्हणुन मि भगवतगितेचे उदाहरण देतो.. एखाद्याने नुसती गिता वाचली तर त्याला त्यातील श्लोकांचा , तत्वज्ञानाचा अर्थ कळेल का?? त्यासाठी एखाद्या जाणकाराचे विवेचन लागतेच, तसेच एखाद्या चांगल्या कलाकृतीचे जाणकारानी रसग्रहण केले किंवा त्याच्यावर उद्बोधक चर्चा झाली, तर इतर वाचकाना हे हळुहळु का होइना नक्की कळेल की, कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा असतो, कुठल्या रुपकांचा कसा अर्थ असु शकतो, कवि नेमक्या शब्दात कुठली कल्पना मांडतो आहे..वगैरे...
  बाकी चु.भु.द्या.घ्या.

  आता एक नवीन धागा सुरु करा. कवितांचे, गाण्याचे निरनिराळे अर्थ.

  वर दोन तीन उदाहरणे आलीच आहेत. अशी अनेक गाणी आहेत ज्यांना निरनिराळे अर्थ आहेत. मला जी एकदोन गाणी माहित आहेत, ती म्हंटली तर विरह/प्रेम गीते, किंवा एकदम अध्यात्माशी संबंधित. असे दोन्ही अर्थ एकाच गाण्यात आहेत. उदा. 'कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी.' आणि ज्ञानप्रबोधिनीच्या लोकांच्या मते 'नववधू प्रिया मी बावरते!' वगैरे.

  Happy Light 1

  तर एकंदरीत ईथे कविता व ईतर सर्व साहित्त्य प्रकाराचं जतन, संवर्धन व्हावं म्हणजेच लिहीणार्‍यांन्ना भरपूर प्रोत्साहन मिळावे, शिवाय प्रतिक्रीया देणार्‍यांन्ना स्वातंत्र्यही असावं (देण्याच वा न देण्याच, कशाही देण्याच।), शिवाय वेळ नसला तरी आवर्जून प्रतिक्रीया पटकन देता यावी, आणि "तरिही" या सर्वातून प्रत्त्येक महिन्यातील सर्वोत्तम कविता निवडता यावी असं काही सर्वसमावेशक करता येईल का? तर यावर तारे-मानांकन किंव्वा अक्षर मानांकन पध्धत हा एक उपाय होवू शकतो:
  * कळली पण आवडली नाही
  ** आवडली पण कळली नाही (असं पण होवू शकतं?). दोन तारे का तर यात "रसग्रहणाचं" पोटेन्शियल आहे जे पहिल्यात नाही
  *** कळली पण आणि आवडली पण (होतं अस कधी कधी). यात साहित्त्यीक आदान प्रदान ला खूपच वाव आहे
  **** गूढ वाटते. चार तारे कारण गूढ ऊकलायची (महिला वर्गाने "गॉसिप" असं वाचावं) नैसर्गिक प्रवृत्ती आपल्यात असते त्यामूळे वाचक अशा कविता पुन्हा पुन्हा वाचेल अन चर्चा व रसग्रहणास आपसूक उद्युक्त होईल
  )( कळलीही नाही आणि आवडलीही नाही. अगदीच वाईट परिस्थिती. थोडक्यात तारा निखळणे- कविचाही अन वाचकाचाही.
  () व्याकरण, शुद्धलेखन, शब्द वापर, वाक्प्रचार, टिंब, चिन्ह, विसर्ग, परिच्छेद या सर्व नियमात बसेल अशी पहिले कविता लिहा मग बघू प्रतिक्रीया द्यायचं का नाही ते (थोडक्यात हे कविला जाहीर आव्हान, की अशी कविता "पाडूनच" दाखव गड्या!)

  आता चार तार्‍यांपेक्षा जास्त टाईप करायला वेळ नसेल शिवाय वरील पैकी कुठल्याच पर्यायात वाचकाची प्रतिक्रीया बसत नसेल तर खालील अक्षर-मानांकन पध्धत वापरता येईलः

  अ: "अनुल्लेख". कविता कितीही महान असली तरी एखाद्या आयडीविरुध्ध जाहीर आकस/निषेध नोंदवायचा असल्यास. अर्थात अनुल्लेख "नोंदवल्यावर" त्याची मजा काय? असे वाटणार्‍यांनी हा पर्याय वापरू नये पण मि तुझा अनुल्लेख करतोय हे एकदा तरी ठासून कळायलाच हव ना तेव्हा एकदा तरी हा पर्याय वापरावाच लागेल. पुढील खेपेला कवी आप्सूक समजून जाईल.
  बः बापरे! सर्वांनीच वाह वाह म्हटले आहे तर मि एकटा/एकटीच कसे नाक मुरडू?
  कः कविता कशी का असेना माझ्या मित्र/मैत्रीण (सरळ "कंपू" म्हणा ना राव) ने "वाह" किंव्वा "वाईट" काहीही म्हटले असेल तर त्याला अनुमोदन. यात मूळ कविता वाचणे सक्तीचे नाही. अर्थात यात कुणितरी प्रथम (सरळ कंपूचा "म्होरक्या" म्हणा ना राव) प्रतिक्रीया द्यायलाच हवी. मग बाकीच्यांना असे अनुमोदन देणे सोपे आहे. पण ज्यांन्ना असे कंपूचा "मुख्ख्य" बनण्याचे धाडस नाही त्यांनी या पर्यायाच्या वाट्याला जावू नये.
  डः आधी माझ्या कवितेला प्रतिक्रीया द्या मग तुमच्या कवितेला देतो या साठी हा पर्याय. अर्थातच तुम्ही माझ्या कवितेला कुठले तारे वा अक्षर मानांकन देता त्यावर माझ्या प्रतिक्रीयांचे स्वरूप अवलंबून असेल. बहुतांशी आपले "तारे" वा "अक्षर" जुळेल यात शंका नाही. आणि हो याचा अर्थ आपली मनेही जुळली आहेत असे मुळीच नाही.
  इ/ई: अगदीच सोप आहे. काहीच्या काही कवितांसाठी पण ज्या चुकून कविता विभागात पोस्टल्या आहेत अशा कवितांसाठी. थोडक्यात सभ्य शब्दात कवितेबद्दल "निषेध" नोंदवणे. इ/ई हा भावनाप्रधान स्वर मराठीत तेव्हड्याच साठी राखून ठेवला आहे. निषेध कमी असेल तर "इ" वापरा, तीव्र निषेध असेल तर "ई" वापरा. शिवाय याने कविता योग्य विभागात हलवली जाईल, उडवली जाणार नाही. म्हणजे पुन्हा "जतन" केल्यासारखच आहे.

  आता एव्हडे पर्याय वाचून लक्षात ठेवायला वेळ नाही म्हणता? मग ईकडे काय करताय? अन एव्हडा बाऊ कशाला करायचा, हळू हळू सवय होईल ना जे काय आहे ते "स्पष्ट" लिहायची. कविच्या कविता दुर्बाध्/दुर्बोध असू नयेत अशी अपेक्षा असेल तर वाचकाच्या प्रतिक्रीयाही सुस्पष्ट असाव्या अशी कविने अपेक्षा ठेवली तर काय गैर आहे? अशाने "वेळ नव्हता", "आधी वाचली तेव्हा कळलीच नाही" मग "नंतर कळली तोवर वाहून गेली होती", "दुसर्‍या बा.फ. वर टवाळी करण्यात वेळ गेला", "चुकलच माझ" अशी कारणेही द्यावी लागणार नाहीत.

  याचा एक सर्वात मोठा फायदा असा होईल की याने कविला नेमकी आपल्या कवितेबद्दल वाचकाच्या कशा प्रतिक्रीया आहेत त्याहीपेक्षा त्या तशा "का" आहेत हेही कळेल. अशाने पुढील कविता लिहीताना त्याचा भ्रमनिरास होणार नाही तद्वतच वाचकालाही ऊगाच फालतू कारणे देत बसावे लागणार नाही.

  आणि शेवटी तारे वा अक्षर मानांकन बघून या महिन्यातील सर्वोत्तम कविता निवडायला अगदीच सोपे होईल. आणि ते काम कुणीही करू शकेल. मग त्या कवितेचे निरूपण नको, चर्चा नको, रसग्रहण तर नकोच नको. शिवाय वाचकालाही भलताच धक्का बसण्याचा "योगायोग" संभवणार नाही.

  अर्थातच एकंदर कविता अन मराठी साहित्याबद्दल थोडीफार कळकळ असल्याने (स्वाती ताईंएव्हडी नाही) हे सर्व सुचवले. बाकी याचे (या पोस्टचे किंवा एकंदरीत या सर्वाचे) काय करायचे ते व्यवस्थापन ठरवतीलच. अन्यथा 'ऊपवास" अन पुन्हा "प्रसाद" हा मार्ग आहेच!

  जाता जाता: सर्वोत्तम कविता हा "उपक्रम" सुरू केला तेव्हाच ईथेच व्यवस्थापकांना विचारले होते की पूर्वीसारखे "mods choice" का नाही ठेवत प्रत्त्येक विभागाला? त्यावर आजतागायत काही अधिकृत उत्तर नाही. अर्थात तसे उत्तर देण्यास ते बांधील नाहीत. पण तरिही..
  __________________________
  हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
  अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

  योग, आयडीया चान्गली आहे! ( एकखाम्बी तम्बुच्या म्होरक्याची ही पहिली "क" प्रतिक्रिया योगच्या पोस्टला Proud )
  यात थोडे अजुन पर्याय देऊन, प्रतिसादामधेच आपण लिहू शकतो Happy
  पण ते "गुप्त मतदान' पद्धतीस मारक ठरते, त्यामुळे स्वतन्त्र स्टार किन्वा अ ब क ड ई असे मानांकन हवेच
  अनुमोदन (ग्रेड "क")

  या प्रत्येक नामांकनाचा अर्थ लक्षात कसा रहावा? की प्रत्येक कवितेच्या खाली रेडिओ बटन्स ठेवायची, अर्थासकट? कोणतेहि एक निवडा!

  त्यापेक्षा चालू आहे ते काय वाईट आहे? ज्यांना समजते ते ठरवतील, नि सांगतीलहि का पहिला नंबर ते. तेव्हढे कष्ट घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही पण लिहा, तुम्हाला कुठली कविता सर्वात चांगली वाटते आणि का ते.

  माझ्या मते शंभरी निदान पाच तरी कविता (सध्याच्या कविता 'पाडण्याच्या' दराने) चांगल्या असाव्यात.

  एका जुन्या स्टार ट्रेक प्रसंगात असे दाखवले होते, की २२२३ साली लोक आपआपसात स्पर्धा करण्या ऐवजी 'मी काल कसा होतो, नि आज त्याहून चांगला झालो आहे का?' अशी स्वतःशीच स्पर्धा ठेवतात. तेंव्हा तुमच्या बर्‍या वाईट प्रतिक्रिया वाचून, कवींना कळेलच की आपण सुधारतो आहोत का?

  Happy Light 1

  >>>>> तेंव्हा तुमच्या बर्‍या वाईट प्रतिक्रिया वाचून, कवींना कळेलच की आपण सुधारतो आहोत का?
  अहो झक्की, आत्ताशीक २००९ साल सुरू आहे, अन २२२३ साल यायला बक्कळ टाईम हे! तोवर काय करायच?
  मला वाटत की खाली प्रतिक्रियेची बटन्स ठेवावीत!
  एक क्लिक, की काम तमाम! Proud

  >तेव्हढे कष्ट घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही पण लिहा, तुम्हाला कुठली कविता सर्वात चांगली वाटते आणि का ते.
  झक्की, सगळ्या मुद्द्याचा पॉईंन्टच मिसलात की Happy
  नेमकी हेच तर वर लिहीलाय ना... अशा मानांकन पध्धतीने कविता निवडल्या गेल्यावर तुम्ही आम्ही कुणिही निवडा काय फरक पडतो? शिवाय कविंचीही तक्रार नाही वाचकांचीही नाही.
  आणि मि आधीच ईतके लिहून थकलोय की "आवरतं घेतो" Happy
  हे बघा: http://www.maayboli.com/user/176
  अजून किती लिहायचं? नविन लोकांन्ना वाव नको का द्यायला? Happy
  __________________________
  हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
  अब तो हर वक्त यही बात सताती है हमे.

  Pages