एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक
इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण, कोणता वारसा घेतो? पूर्वसुरींची उद्दिष्टं, त्यामागचा विचार, त्यासाठींचा त्याग, संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात? आत्मसात काय होतं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काय पोचवलं जातं? परंपरा संक्रमित होते ती संघर्षाची की स्वतंत्र विचारांची की नुसतीच विभूतीपूजेची? पुढच्या पिढीच्या जडणघडणीत आपलं योगदान काय?
एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक हे आणि असे बरेच प्रश्न मांडते. 'इवली झालेली तलवार', 'आधीच पाठीतून वाकलेले (अनुयायी)', 'हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता' यांसारख्या प्रतिमा / ओळी अतिशय प्रभावीपणे येतात. शेवटी जगताना असे प्रश्न पडणंच महत्त्वाचं. 'साधी सोपी उत्तरं' असं काही नसतंही आणि नसावंही, नाही का?

याव्यतिरिक्त लक्षवेधी वाटलेली कविता :
कधीतरी.
एखाद्या साध्याच पण प्रामाणिक विचाराने, साध्यासोप्या पण अंत:करणापासून आलेल्या अभिव्यक्तीने तिच्या त्या सच्चेपणाच्या झळाळीमुळेच लक्ष वेधून घ्यावं आणि मग हळूहळू केवळ त्या झळाळीचाच उदोउदो वाढत जाऊन मूळ विचार हरवून जावा यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असेल? मुखवटे मिरवायची/नाचवायची सवय व्हावी आणि चेहरा असं काही नसतंच/नसावंच असं मानायचा प्रघात पडून जावा - असं होतं तेव्हा आपली स्वतःची सामान्यसुद्धा ओळख जपू पाहणार्‍याने कुठे जायचं असतं? समाजाच्या गतानुगातिकतेवर नेमकं भाष्य करणारी कविता.

----------
जाता जाता :
या महिन्यात निवडल्या गेलेल्या दोन्ही कविता एकाच कवीच्या आहेत हा एक योगायोग. या दोन्ही कविता आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिल्या होत्या हा त्याहून मोठा आणि दुर्दैवी योगायोग. या कवीच्या बाकी कविता कोणाला दिसूच नयेत आणि 'मायबोलीला रामराम' म्हणून लिहिलेली कविता तेवढी भलत्याच कारणांसाठी दखलपात्र व्हावी, हा कसला योगायोग? गेल्या महिन्यात सर्वोत्तम म्हणून निवडली गेलेली 'पाऊस बारावाटा' ही कविता अशीच दुर्लक्षित रहावी, आणि निवड झाल्यावर मात्र तिच्यावर अनुकूल अभिप्रायांचा पाऊस बारावाटांनी पडावा हा ही योगायोगच म्हणायचा का?
गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
'आताशा पूर्वीसारखे लिहिणारे राहिले नाहीत' हे वाक्य किती सहज म्हणतो आपण, पण आताशा पूर्वीसारखे वाचणारे/समजणारे राहिलेत का? आंतरजालासारख्या माध्यमामुळे आपले विचार एकाच वेळी अनेकांसमोर व्यक्त करणं सोपं झालं हे खरं, पण विचार 'पोचणं' इतकं कठीण का झालंय?

या संदर्भात वैभव जोशींची एक कविता आठवली ती त्यांच्या परवानगीने उधृत करत आहे :

कुसुमाग्रज
बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं...
तुम्ही मोठ्या उल्हासाने "कणा" पोस्ट केली असती
अन पापणी लवायच्या आत
तुमच्या आयडी वरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता
ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून
चर्चा इतकी रंगली असती की
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

दैव फारच मेहरबान असतं तर
वाचली असती एखाद्या विडंबन करणार्‍याने "कणा"
आणि मारून मोकळा झाला असता
कणाहीन विडंबनाच्या निमित्त्ताने
बायकांना आणखी एक टोमणा.
तुमचा (?) समस्त वाचकवर्ग धावत सुटला असता
पुरुषवर्गाच्या पोस्ट्स गडाबडा लोळायला लागल्या असत्या
स्त्रीवर्गाच्या पोस्ट्सवर पटापट स्माईल फुटलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा तुमच्या नशीबी आला असता
एखादा गज़लकार
ज्याने "कणा" या अचानक सुचलेल्या(?)
काफ़ियाशी मिळत्याजुळत्या कवाफ़ी जमवायला घेतल्या असत्या...
किंवा एखादा छायाचित्रकार
ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या
बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी
तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं
लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच
एक कविता आहे असं जाहीर केलं असतं
मात्र
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

किंवा
"कणा"ची लांबी रुंदी मोजली गेली असती
("खोली" नव्हे , ती 2 D मॉनिटरवर कळत नाही)
किंवा तुमची कविता वाचून कुणालातरी
स्वतःची (काही वर्षांपूर्वी) लिहीलेली कविता आठवली असती
किंवा कुणाला तत्क्षणी सुचली असती
ज्यांना कदाचित
प्रचंड लोकाश्रय मिळाला असता
ज्यांचं कदाचित नवी म्हणून वा
जुनीच पुन्हा पोस्ट केली म्हणून
तोंडभरून कौतुक केलं गेलं असतं
आणि
मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये
हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं..
थॅंक गॉड कुसुमाग्रज
तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं...

आणि कुसुमाग्रज,
मराठी वाचकांच नशीब जर
अगदीच -- असलं असतं तर
ह्यातलं काही एक घडलं नसतं ...
चंद्र, चांदण्या , प्राजक्त , मोगरा
काहीच दिसत नाही म्हणून
लोकांनी "कणा" कडे ढुंकून पाहिलं नसतं
आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान
अनुल्लेखाने काळवंडलं असतं...,कायमचं
मागे राहिल्या असत्या
"कणा"च्या लाखो स्पाईनलेस आवृत्त्या
हजारो ऑर्कुट प्रोफाईलस , शेकडो ब्लॉग्ज
ज्यांच्या मालकांनी आयुष्यभरासाठी
"कुसुमाग्रज" हे प्रोफाईल नेम घेतलं असतं ...
आणि मूळ कविता तिच्या कवीसकट हरवून गेली
हे कुणाच्याच लक्षात आलं नसतं
.. अगदी तुमच्यासुध्दा!

आता बोला कुसुमाग्रज
बरं झालं ना तुमच्याकाळी इंटरनेट नव्हतं ???

- वैभव जोशी.

--------------------------------------------------------------
सर्व कविता वाचून त्यातून वरील कविता निवडण्याचे काम या महिन्यात स्वाती आंबोळे यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

प्रकार: 

इथली चर्चा वाचल्यानंतर अधोरेखित कराव्याश्या वाटलेल्या काही बाबी :

१. 'सर्वोत्तम' कविता म्हणजे निवड करणार्‍याच्या मते सर्वोत्तम कविता. आज स्वाती आंबोळेंनी निवड केली म्हणून ही कविता सर्वोत्तम ठरली. नंदिनीने निवड केली असती तर 'पाऊसपान्हा' सर्वोत्तम ठरली असती. उमेश कोठीकरांनी निवडली असती तर 'श्वास' सर्वोत्तम ठरली असती. तस्मात इतपत सापेक्षता यात गृहित धरायला हवी.

२. बाळू सोनावणे : कुठली कविता निवडली जाते याचे काही ठरलेले निकष नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे ते निवडणार्‍यावर अवलंबून आहे. माझ्यापुरतं सांगायचा प्रयत्न करते. यात दोन बाबी येतात. 'काय' आणि 'कसे' (सहसा याच क्रमात). ही कविता मला 'काय' सांगते - मग तो एखादा विचार असेल, एखादी उत्कट भावना असेल - ते सुसंगतपणे मांडलेलं दिसलं, पटलं, भिडलं, आवडलं तर ती पहिली पायरी. मग 'कसे' हा भाग येतो. म्हणजे मग शब्द चपखल वापरलेत का, त्यांना नाद आहे का, कविता कुठल्या form मधे लिहिली आहे - तो form त्या 'काय'चं सौंदर्य खुलवतो आहे का, कविता पाल्हाळिक तर झाली नाही ना - अशा बाबी त्यानंतर येतात.

३. वेळेचा मुद्दा बराच महत्त्वाचा झालेला आहे. 'आवडलं होतं, पण (वेळेअभावी) अभिप्राय द्यायचा राहून गेला' किंवा 'कविता समजायला जितका वेळ द्यावा लागतो तितका आमच्याकडे नसतो' असे मुद्दे आलेत. यातही वेळेपेक्षा बांधिलकीचाच भाग जास्त आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्याला वाहत्या बाफवर गप्पा मारायला वेळ असतो त्याला (चार दिवसांपूर्वी वाचलेली आणि आवडलेली कविता शोधून) 'आवडली' इतका एक शब्द लिहायला वेळ नसतो हे थोडंसं तर्कदुष्ट वाटतं. हा 'चॅनल सर्फिंग मेन्टॅलिटी'चा प्रकार झाला नाही का? वाईट, हास्यास्पद लिखाण एकमेकांना दुवे देऊन देऊन वाचलं जातं हे मी पाहिलेलं आहे. आणि त्यात काही गैर आहे असंही नाही, किंवा ते स्वाभाविक आहे असं म्हणू. पण त्याचबरोबर आवडलेल्या लिखाणाचे दुवे (आणि लिहिणार्‍याला दुवा Happy ) आपण तितकेच आवर्जून देतो का - हा प्रश्न आहे.

साजिरा, यातच तुझ्या मुद्द्याचंही उत्तर आलं. वाईट लिखाणाची/लिहिणार्‍याची कानउघाडणी/खिल्ली हे स्वाभाविक, आणि आवश्यकही आहे असं म्हणताना १- चांगल्या लिखाणाला प्रोत्साहन म्हणून आपण काय करतो, आणि २- (जो मुद्दा वैभवच्या कवितेत आला आहे आणि ज्याला फारेंड यांनी 'एटिकेट्स' हा अतिशय चपखल शब्द वापरला आहे), की अभिप्राय (आणि अभिप्राय देणारे) मूळ कवितेपर्यंत पोचतात की नाही? 'तुम्ही किती लिहिता', 'या विषयावर का लिहिता', 'तुम्ही ब्लॉग लिहा' - अश्या प्रकारचे अभिप्राय देताना किंवा कवितेला कवितेचे किंवा विडंबनांचे झब्बू देताना आपण 'या कवितेवर' बोललेलोच नाही हे आपल्या लक्षात येतं का? एखादा माणूस सातत्याने आपल्याला न आवडणारंच लिहितो आहे असं वाटलं तर तेवढं वगळून बाकी वाचणं किती अवघड असतं?

जाईजुई, पुस्तक जसं रमतगमत वाचता येतं तसं प्रथमदर्शनी (कळलं नसलं तरी निदान) तथ्य वाटलेलं लिखाण प्रिंटआऊट घेऊन सावकाशीने वाचता येतंच ना?

४. मला अतिशय महत्त्वाचा वाटणारा मुद्दा : 'कवींना लोकाश्रयासाठी धडपडावं लागतंच हो!' किंवा 'लिहिणार्‍यांना प्रतिक्रिया हव्या आहेत' असं म्हणताना आपण ही गरज एकतर्फीच आहे असं तर समजत नाही आहोत ना? वाचणार्‍यांना चांगल्या साहित्याची गरज नसते का? 'लोकाश्रय' म्हणजे उपकार आहेत का?

५. हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा : जी कविता पहिल्या दृष्टीक्षेपात कळत नाही ती एलाईट्सची मालमत्ता (आणि जी कळते ती सुमार??) - इतकं सोपं गणित आहे का हो? एकाने लिहा, दुसर्‍याने समजावून सांगा, मग आम्ही वेळ तर मिळाला तर वाचू (किंवा मग 'इतकं सगळं कोण वाचणार?' असं म्हणू - आमच्या मूडवर आहे!) आणि मग त्याउप्परही वेळ असला तर अभिप्राय नोंदवू. मग यात आपला सहभाग काय? आणि मग जर तो सहभाग आपण देणार नसू, तर मग कोणत्याच लिखाणावर मल्लिनाथी करायचा आपल्याला अधिकार काय?

असो. या बाबतीत 'मतामतांचा गल्बला' अपेक्षितच आहे. मी मांडलेल्या चुका माझ्याही हातून होत नाहीत असं नाही. पण या निमित्ताने या मुद्द्यांवर विचारमंथन होतंय ही आनंदाची बाब आहे.

स्वातीचं मान्य आहे. जाईजुईचं अजून पटलं आणि साजिर्‍याचं एकदमच पटेश.
बाकी स्वातीला धन्यवाद.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

शेरलॉक, कवितेच विवेचन आवडलं. रुपकरुपी कविता सगळ्यांनाच कळते असं नाही. कधी कधी कविच्या मनात काय आहे ते तसच वाचणार्‍याच्या मनात येतच असं नाही. काहीवेळा वाचकपण आपल्या परीने अर्थ लावत असतो. कविने समजावून सांगितली की कवितेचा आस्वाद घेता येतो.

स्वाती, तुम्ही वरती मांडलेले सर्व मुद्दे पटले. खास करून मुद्दा #३ मधले हे लिहिलेले,

>>ज्याला वाहत्या बाफवर गप्पा मारायला वेळ असतो त्याला (चार दिवसांपूर्वी वाचलेली आणि आवडलेली कविता शोधून) 'आवडली' इतका एक शब्द लिहायला वेळ नसतो हे थोडंसं तर्कदुष्ट वाटतं. हा 'चॅनल सर्फिंग मेन्टॅलिटी'चा प्रकार झाला नाही का? वाईट, हास्यास्पद लिखाण एकमेकांना दुवे देऊन देऊन वाचलं जातं हे मी पाहिलेलं आहे. आणि त्यात काही गैर आहे असंही नाही, किंवा ते स्वाभाविक आहे असं म्हणू. पण त्याचबरोबर आवडलेल्या लिखाणाचे दुवे (आणि लिहिणार्‍याला दुवा ) आपण तितकेच आवर्जून देतो का - हा प्रश्न आहे>><<

आणि एखाद्याची कविता आवडून प्रतिक्रीया पटकन देणे न देणे हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते.... बांधिलकीच्या पुढेही.. वेळ असणे/नसणे हि बहुधा एक सबब असते. असो, ज्यास्त नकोच लिहायला आता इथे. #३ मध्ये ते मुद्दे आलेच. Happy
पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद हे मुद्दे शेवटी चर्चेत आणून काही गोष्टींची 'जाणीव' करून दिली म्हणून. Happy
माझ्या मते, तो जो एक उगीच गदारोळ उठायचा इथे कवितांवर तो जरा चांगल्या कारणासाठी असेल ही अपेक्षा व चांगली वृती दिसेल प्रतीक्रिया देण्यात. कारण थोडाफार वृतीचा भागही असतोच काही गोष्टीं होण्यात. असो,धन्यवाद. Happy

स्वाती,

तुम्ही सोनवणेंना सांगितलेला मुद्दा इथे लागू होतो. कवितेचे रसग्रहण हे एकादा लेख वाचून, कथा वाचून प्रतिक्रिया द्यावी एवढे सोप्पे मला तरी वाटत नाही. कदाचित माझी कवितेशी एकरुप होण्याची तेवढी कुवत नसेल. तुम्हाला कविता आवडतात.. आणि प्रिन्ट काढून त्या वाचाव्याश्या वाटतात. सगळे ह्या गटात मोडत नाहित हो.

खिल्ली उडवणे आणि एटिकेट्स पाळणे ह्या विषयावरची तुमची मते मान्य आहेत.

४था आणि ५वा मुद्दा फारच टोकाचा झालाय, नाही का? कवितेला पुरेसे प्रतिसाद येत नाहीत म्हणून कविता लिहिणे बंद करतो असे म्हणणे म्हणजेच लोकाश्रयाची गरज नाही का? आणि एकदा कोणी चांगले लिहितय असे कळले की वाचणारे, प्रतिक्रिया देणारे लोकही आहेत ना! इथे कोण कोणावर उपकार करतय का?
पण कविता हा तुमचा हृद्य विषय आहे आणि त्यावरच्या अनास्थेमुळे सात्विक संतापातून तुम्ही असे लिहिले असेल असे मी समजते.

माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कानसेन जसा एका दिवसात होत नाही तसाच कवितेचा रसिक देखिल नाही. जे लिखाण भावलय ते जर एकमेकांना सांगितलं नाही तर सर्व सामन्यांना कसे कळेल? तुम्ही चांगली आहे असे म्हणाल्यावर लोकांनी जाऊन वाचली आहे की? म्हणजे बरी आणि वाईट दोन्ही पब्लिसिटी दोन्ही काम करत आहे. तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा, हळू हळू परीस्थिती बदलेलं.

चांगल्या गोष्टी समाजात रुजवणे ही त्या त्या क्षेत्रातल्या बुद्धीजीवींची जबाबदारी आहे. शास्त्रीय संगीत पण अवघड आहे सगळ्यांना आवडणे. ते समाजात रुजावं म्हणून "स्पिक्-मॅके" (चु.भु.द्या.घ्या.) सारख्या संस्था प्रयत्न करतात ना? किती माणसे येतात ह्या कार्यक्रमाला? सहभाग देतात? असे म्हणून सोडून देत नाहीत.

>> कविता हा तुमचा हृद्य विषय आहे आणि त्यावरच्या अनास्थेमुळे सात्विक संतापातून तुम्ही असे लिहिले असेल असे मी समजते.

योग्य समजलात. Happy

मी 'गरज' ही कवी (एकूणच साहित्यिक) आणि वाचक दोहोंना एकमेकांची सारखीच असते (आणि म्हणूनच जबाबदारीही दोहोंवर सारखीच असते) इतकंच म्हणत्ये. 'आम्हांला नाही बुवा कळत' असं म्हणून ती संपत नाही. मग तुम्ही ज्यांना कळतं असं तुम्हाला वाटतंय त्यांना किंवा खुद्द कवीला विचारायची तसदी घेता का? त्यांनीच आपण होवून सांगावं हा तरी हट्ट का? (गरज त्यांना आहे म्हणून, बरोबर?)

आणि साहित्य/कविता हा विषय इतका हृद्य नसेलच, तर यातला कुठलाच प्रश्न उद्भवूच नये, नाही का? मग वाईट साहित्यावरही मत द्यायची गरज भासू नये.

स्वातीचं पहिल्या पोस्टमधलं मान्य आहे. दुसर्‍या पोस्टमधले ३,४ आणि ५ हे मुद्दे पटले नाहीत.
>>यातही वेळेपेक्षा बांधिलकीचाच भाग जास्त आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्याला वाहत्या बाफवर गप्पा मारायला वेळ असतो त्याला (चार दिवसांपूर्वी वाचलेली आणि आवडलेली कविता शोधून) 'आवडली' इतका एक शब्द लिहायला वेळ नसतो हे थोडंसं तर्कदुष्ट वाटतं. <<
हे ही थोडं अति वाटतं. अमुक एक केलं की बांधिलकी आहे आणि अमुक एक केलं की नाही अशी गणितं प्रत्येकाने केवळ आणि केवळ स्वतःपुरतीच मांडावीत. आपल्या समीकरणांमधे इतरांना तोलू नये ही विनंती. वाहत्या बाफवर गप्पा मारणे आणि कविता वाचणे--आवडणे--मुरणे यामधल्या internal involvement मधे जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे अर्थातच दिल्या जाणार्‍या वेळाचाही.

>>पण त्याचबरोबर आवडलेल्या लिखाणाचे दुवे (आणि लिहिणार्‍याला दुवा ) आपण तितकेच आवर्जून देतो का - हा प्रश्न आहे.<<
प्रत्येकाच्यामधे काय संवाद होत असतो याचा काही डेटाबेस आहे का ह्या अनुमानाच्या पुष्ट्यर्थ?

>>'तुम्ही किती लिहिता', 'या विषयावर का लिहिता', 'तुम्ही ब्लॉग लिहा' - अश्या प्रकारचे अभिप्राय देताना किंवा कवितेला कवितेचे किंवा विडंबनांचे झब्बू देताना आपण 'या कवितेवर' बोललेलोच नाही हे आपल्या लक्षात येतं का?<<
गवताच्या गंजीमधे सुई शोधण्याचा प्रकार आहे. तुम्ही प्रत्येक कवितेचे प्रिंट घेऊन वाचत असता. त्यामुळे सुटत नाही एखादीही. पण दुसर्‍यांकडून सुटली तर त्यामुळे दुसरा चुकीचा. त्याची बांधिलकी संशयास्पद हे काही बरोबर नाही.

>>एखादा माणूस सातत्याने आपल्याला न आवडणारंच लिहितो आहे असं वाटलं तर तेवढं वगळून बाकी वाचणं किती अवघड असतं?<<
सातत्याने वगळल्यानंतर एखाद्या वेळेला बोललं जातंच. दिवसाला १०-१५ या वेगाने पडणार्‍या कवितांवर दोन महिन्यांनी ( ६० गुणिले १० किंवा १५ इतक्या कवितांनंतर) एका कवितेला प्रतिक्रिया देणं हे दिसून येतं पण आधीचं दुर्लक्षिलेलं लिखाण का दिसत नाही?

>>वाचणार्‍यांना चांगल्या साहित्याची गरज नसते का? 'लोकाश्रय' म्हणजे उपकार आहेत का?<<
गरज असते आणि उपकारही नाहीत पण मग चांगलं वा वाईट ठरवायचा अधिकार वाचणार्‍यांच नाही का? दर्जाचा आग्रह धरण्याचा अधिकार वाचणार्‍याला का नाही?

>>मग यात आपला सहभाग काय? आणि मग जर तो सहभाग आपण देणार नसू, तर मग कोणत्याच लिखाणावर मल्लिनाथी करायचा आपल्याला अधिकार काय?<<
नक्की किती आणि कुठल्या सहभागावर हा अधिकार दिला जाणार आहे? आणि तो अधिकर कोण देतो? वाचणं हा सहभाग मल्लिनाथी (स्वातीच्या पोस्टमधे असं वाटतंय की मल्लिनाथी हा शब्द केवळ विरोधी प्रतिक्रियांसाठी आहे.) करायचा अधिकार देत नाही का?
तसेच न समजल्याने गप्प बसण्याबद्दल आक्षेप घेणं चुकीचं आहे. प्रत्येकाची कविता समजून/ उमजून/ जाणून घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असणार नाही का? कुणी वाचेल आणि नंतर परत वाचायला म्हणून ठेवून देईल. आत पोचल्यावरच प्रतिक्रिया देईल. कुणी वाचेल आणि समजली नाही म्हणून सोडून देईल. कुणी उघडपणे विचारेल समजलं नाही म्हणून आणि उघड चर्चा करून समजावून घेण्याचा प्रयत्न करेल. ह्या तिघांचाही सहभाग आहेच आहे माझ्या मते. केवळ उघड चर्चा केली म्हणजे सहभाग आणि बाकीच्यांचा नाही असे कसे? समजण्याची प्रक्रिया चालू आहे असे प्रत्येक वेळेला जाहीर करायला हवे का? समजण्याची प्रक्रिया एकाच महिन्यात पुरी होईल हा आग्रहही चुकीचा.
कुणी सोडून देणार असेल नाही समजली म्हणून तर तो त्याच्या interest चा भाग नाही म्हणून तो त्यात वेळ घालवत नाही असं म्हणता येणार नाही का? त्याला धारेवर धरायलाच हवे का?

आता अजून काही...........
आवडली असेल तर तशी प्रतिक्रिया आवर्जून देण्याबद्दल आग्रह आहे. तो समजला. मान्य आहे तो ही. नावडली असेल तर तिकडे दुर्लक्ष करण्याबद्दलचा आग्रह समजला. मान्य नसला तरी बहुतांशी वेळा दुर्लक्षच करतो आम्ही.

केवळ चांगल्याच आणि वा वा अश्या प्रतिक्रियांचा आग्रह आणि अपेक्षांचं काय करायचं. आवडली नाही अशी प्रतिक्रिया देणारी व्यक्ती सर्व वाईट गोष्टी एकवटलेली असते आणि आवडली ही प्रतिक्रिया देणारी व्यक्ती सगळं काही चांगलं अशीच असते. हे का?
आवडली नाही याच्या कारणांचा तपशीलात जाउन उहापोह केलेला असला तरी अशी प्रतिक्रिया देणारी ती व्यक्ती blacklisted असते.
नुसतं वा छान. अप्रतिम या शब्दांपलिकडे अभिप्राय न जाणारे सगळे मात्र जन्मोजन्मीचे मित्र असतात. असं का?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

गुलमोहोरावरच्या आपल्याला न आवडणार्‍या कवितांच्या (आणि कवींच्याही!) दर्जावरून गदारोळ करणं हा जसा आपल्याला हक्क वाटतो तशी चांगल्या लिखाणाची आवर्जून दखल घेणं, थोडा वेळ त्यासाठीही खर्च करणं ही जबाबदारी वाटते का?
<<<<

चांगल्या लिखाणामध्ये फक्त कविता अभिप्रेत आहेत की सर्वच लिखाण?

अजूनतरी माबोवर बरेच ललितलेख टाकून प्रतिसादच न मिळाल्याने कुणीही माबोचा निरोप घेतल्याचे ऐकिवात नाही. (माहिती चूक असेल तर दुरुस्त करावी.) त्यांचीही चर्चा कितीही चांगले असले तरी फार कुठे होत नाही. 'अमुक एक ललित फार आवडले, बघाच' म्हणूनही दुवे देताना फारसे कोणी दिसले नाहीये. फार काय, महिन्यातली सर्वोत्तम कथा वा ललित अजूनही निवडले जात नाहीये.
कवितांच्या बाबतीत असे का होत असावे याचा विचार कवींनीही करायला काय हरकत आहे?

माबोवर 'मायबोलीवरील नवीन लेखन' हा विभाग बघितला तर कधीकधी पानभर कविताच दिसतात. बर्‍याचदा कवीचे नाव बर्‍यापैकी ओळखीतले असेल किंवा एकदम वेगळेच नाव असेल (मरून पडलेले पिल्लू वगैरे नाव असेल तर हे काय? म्हणून) तर कविता वाचलीही जाते आणि बरेवाईट अभिप्राय आल्याने ती पहिल्या एकदोन पानांत राहते. मग त्यावर अजूनही अभिप्राय येऊ शकतात. जर कवी नवा असेल आणि त्याने कविता टाकली त्याचवेळी बाकी अनेक साहित्यप्रकारांचा महापूर आला तर ती कविता सहज तीनचार पाने मागे जाते आणि कुणीच बघितली नाही तर मागे जात राहते.

काहीच्या काही कवितांवर, सुमार कवितांवर गदारोळ होतो कारण दिवसाला एक किंवा अनेक या गतीने त्या येतात आणि कवीचे/कवयित्रीचे नाव ओळखीचे झाले आणि पहिल्या एकदोन पानांत रोज दिसू लागले की लोकही सरसावून बसतात.

ज्यांना कवितांमध्ये जास्त रस आहे अशी मंडळी वेळ मिळताच सर्वच कविता शोधून, वाचून बघतीलही. पण सगळेचजण असे कसे करणार? 'एखादी चांगली कविता लोकांच्या नजरेतून निसटून गेली तरी ती नजरेस आणून दिल्यावर तिथे जाऊन अभिप्राय नोंदवणारेही बरेच आहेत.' हे जाईजुईचे मत पटले. आणि 'सर्वोत्तम कविता' म्हणून निवडली गेल्यावर वा इतर मार्गांनी एखादी निसटून गेलेली कविता पुन्हा लोकांपुढे आणल्यावर मग त्यावर लोकांनी प्रतिसाद देणे, यात गैर काय?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

स्वातीची कवितांविषयी असलेली कळकळ आणि तळमळ पोचली तिने सर्व कविता वाचण्याचे कष्ट घेतले आणि तिने इथे केलेले आवाहन दोन्हीतून... त्यासाठी तिला खरेच hats off

संदेश ह्यांचे पण अभिनंदन... स्मारक खूप आवडली...

पण काही काही मुद्द्यांवर चर्चा व्हावी असे वाटतेय..
गरज लिहिणार्‍याला आणि वाचणार्‍याला सारखीच असते हे पटले नाही... ह्यात कविता करणार्‍यावर जास्ती जबाबदारी असते असे मला वाटते... कारण कवी म्हणून तो इतरांपेक्षा जास्ती संवेदनशिल (बहुतेक वेळा) असतो. तो सॄजनशिल वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. त्याची विचार करण्याची पद्धत जास्त प्रगल्भ असते. वाचकांमध्ये सर्व प्रकारचे वाचक असू शकतात... त्याची आवड, बौद्धिक पातळी किंवा एकाद्या कलाकृतीशी समरस होणे हे खूपच वेगवेगळे असू शकते.
तेव्हा वाचकाला सतत चांगले वाचायला देउन त्याला 'तयार' करणे हे काम लेखकाचे किंवा ज्यांना इतरांपेक्षा थोडी जास्त आस्था आहे किंवा ज्ञान आहे त्या लोकांचे आहे असे वाटते.

ह्याउलट एखाद्या कलाकृतीला नावे ठेवणे किंवा चांगली वाटली तरी प्रतिक्रिया नाही देणे हा पूर्णपणे वाचकांचा अधिकार आहे... एक रसिक वाचक म्हणून चांगल्या लिखाणाचा प्रसार करावा अशी इच्छा आपण व्यक्त करू शकतो पण ती त्याची जबाबदारी आहे असे नाही म्हणू शकत...त्याने ते केले तर ते सोने पे सुहागाच पण नाही केले तर तो दोषी आहे असे नाही मला वाटत

त्यापुढे जाऊन मला असे वाटते वाचक आणि कवी ह्यांना असे व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍यांचीही ही जबाबदारी आहे की चांगल्या लिखाणाला प्रोत्साहन मिळावे
आत्तापर्यंत प्रत्येक महिन्यात एक सोडली तर किती कवितांना मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळालाय? प्रकाश-चित्रे येतात, ललित येते, कथा येतात मग कविता का नाहीत? मान्य आहे की त्याला पर्याय म्हणून हा उपक्रम सुरू आहेच (जो इतर विभागात नाही) पण कवितांच्या संख्येच्या मानाने अगदीच नगण्य आहे... प्रयत्न सुरु आहेच पण तोकडा आहे असे वाटते.

अजून एक मुद्दा म्हणजे कवींनी हे सत्य पचवायला शिकलेच पाहिजे के इतर विभागांच्या मानाने कवितांना कायमच कमी प्रतिसाद मिळणार ... त्यातही विडंबने, हास्य कविता किंवा हलक्याफुलक्या कविता ह्यांना जास्त (बहुतांशी) प्रतिसाद मिळणार कारण ते एका वाचनात बहुतेक सर्व लोकांपर्यंत पोचते... हे कायम होत आले आहे आणि असेच होत रहाणार .. जोपर्यंत सामान्य वाचक/प्रेक्षक आहे तोपर्यंत दादा कोंडके आणि डेव्हिड धवन जास्ती चालणार कुसुमाग्रज आणि श्याम बेनेगल पेक्षा

तेव्हा वाचकांच्या प्रतिक्रिया काय व किती आहेत हे बघण्यापेक्षा आणि वाचकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या तर चांगले लिहिले की चांगल्या प्रतिक्रिया द्यावात हा आग्रह धरण्यापेक्षा कविने प्रत्येक प्रतिक्रियेतून काही शिकता येतेय का बघितले पाहिजे. नसेल येत तर त्या प्रतिक्रियेला सोडून देता आले पाहिजे... किती प्रतिक्रिया केवळ दोस्तीखातर येतात? किती प्रतिकिर्या ह्या केवळ mutual admiration club अंतर्गत येतात ह्यावर विचार करून कविने कोणत्या प्रतिसादांना किती महत्व द्यायचे हे ठरवावे...

वाचक काय लिहितात त्यापेक्षा आपण का व काय लिहितो आणि आपली काय प्रगती होते आहे हे कवीसाठी जास्ती महत्वाचे आहे..

मायबोलीवर पूर्वी इतक्या वाईट प्रतिक्रिया (काही अपवाद वगळता) कधीच पाहिल्या नाहीत मग आताच का ह्यासाठी कविंनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आणि जर खरेच ज्याला वाटतेय की ह्या वाईट प्रतिक्रियेमुळे चांगल्या लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे तर त्याने पुढाकार घेउन चांगल्या कवितेवर प्रतिक्रिया दिली पाहिजे... किती कविंनी ह्या इथे येउन चर्चेत भाग घेतला आहे? किती कविंनी स्लार्टी ने अनुवाद केलेल्या कवितेवर चर्चा चालली होती तिथे चर्चेत भाग घेतला? त्यांना कळकळ आहे तर ते अलिप्त का राहिले त्यापासून?

बाकी वैभवची वर उद्धॄत केलेली कविता आवडली हे सांगणे न लगे पण हे ही फक्त इंटरनेटपुरते मर्यादित नाही... प्रत्यक्ष जीवनात साहित्यिक आपापले कम्पू पाळून असतात हे सत्य आहे. एकमेकांना पाण्यात पहातात, राजकारण करतात आणि आपल्या कंपूतल्या लोकांचे कौतुक करतात... इतकेच काय राजरोस ढापाढापी पण करतात.. तेव्हा इंटरनेट ही खर्‍या जगातली एक प्रतिकृती आहे हेच खरे... फक्त इंटरनेट ला किंवा त्यावरच्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही..

जाता जाता : जाई-जुई तुमची विचार करण्याची पद्धत आणि ते मांडण्याची हातोटी आवडली.

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

>> प्रत्येकाच्यामधे काय संवाद होत असतो याचा काही डेटाबेस आहे का ह्या अनुमानाच्या पुष्ट्यर्थ?
नीधप, त्यासाठी फार लांब जायला नको. इथल्याच आधीच्या पोस्ट्स पाहिल्यास तरी लक्षात येईल ते. Happy
तसंच अनुकूल की प्रतिकूल अभिप्राय हा इथे मुद्दाच नाहीये.

श्र, तू म्हणतेस त्याप्रमाणे हे होणं स्वाभाविक आहे हे काही अंशी खरं. पण म्हणून हे असंच घडत रहावं हे तुला तरी पटतं का? केवळ समर्थनं देऊन प्रश्न सुटतात का? मुद्दा एक कविता दुर्लक्षित होण्याचा नाहीये, एक कवी मायबोली सोडून जाण्याचाही नाहीये. पण बहुतांश लोकांना न आवडणार्‍या कविता चुकीच्या कारणांसाठी चर्चेत रहाव्यात आणि चांगल्या कविता हरवून जाव्यात हे वारंवार होताना बघून तुला व्यक्तिश: वाईट वाटत नाही का? त्याबाबत कविता कळणार्‍यांनी काहीतरी सकारात्मक करायला हवं असं नीधप तुलाही वाटत नाही का?

स्वाती,
मुद्दा हा खरंतर..
>>यातही वेळेपेक्षा बांधिलकीचाच भाग जास्त आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्याला वाहत्या बाफवर गप्पा मारायला वेळ असतो त्याला (चार दिवसांपूर्वी वाचलेली आणि आवडलेली कविता शोधून) 'आवडली' इतका एक शब्द लिहायला वेळ नसतो हे थोडंसं तर्कदुष्ट वाटतं. <<
आणि
>> एखादा माणूस सातत्याने आपल्याला न आवडणारंच लिहितो आहे असं वाटलं तर तेवढं वगळून बाकी वाचणं किती अवघड असतं? <<
या दोन विधानांच्यात विरोधाभास आहे.

१. एखादी कविता आवडल्यावर 'आवडली' असं लिहिणं ही बांधिलकी असेल तर नावडल्यावर 'नावडली' असं लिहिणं हिसुद्धा बांधिलकीच नाही का? नावडली तर दुर्लक्ष करा हा आग्रह का?

२. मुळात नुसतं 'आवडली' असं लिहिण्याने काय साध्य होते? अनुभवातून सांगायचे झाले तर नुसतं 'आवडली' 'वा' 'छान' 'अप्रतिम' अश्या प्रतिक्रियांचा लिहित्याला काहीच उपयोग होत नाही पुढच्या लिखाणात. त्यापेक्षा एखाद्याने 'अमुक तमुक कारणांसाठी मला आवडली नाही.' असं analytically सांगितलं तर उपयोग होतो. स्वतःच्याच लिखाणाकडे लिहिणारा नवीन दृष्टीकोनातून बघू शकतो. निश्चित फरक पडतो. नंतरचा ड्राफ्ट हा थोडा अजून सुधारीत होतो. किंवा निदान घेतलेल्या आक्षेपांच्या संदर्भात विचार होऊन जे काही लिहिलं असेल ते पक्क व्हायला लिहित्याला मदत होते. हे जास्त गरजेचं नाही का एका 'आवडली' या शब्दापेक्षा?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

त्याबाबत कविता कळणार्‍यांनी काहीतरी सकारात्मक करायला हवं असं नीधप तुलाही वाटत नाही का?<<
मी कविता कळणारी नाही तरी मला सकारात्मक काहीतरी करायला/ घडायला हवं असं वाटतं. यात काही वादच नाही.
त्यासाठीच authentic, honest प्रतिक्रिया देता येणे/ देणे हे घडायलाच हवं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Happy ती ओळ शब्दशः घेत्येस. 'आवडली' हा एकच शब्द लिहावा असं नाही आणि नावडली तर दुर्लक्ष करा हे 'वाईट कवितांच्या पुरात चांगली कविता वाहून जाते' या मुद्द्याला एक possible उत्तर आहे.

कसलीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून कवीने मायबोली सोडली असे का उल्लेख केला जातोय?
मी 'मेसेज' ह्या कवीच्या 'एक पिल्लु मेले' ह्या कवितेखाली त्यांच्या मित्राने लिहिलेले कवीचे विवेचन वाचले. मेसेज ह्यां कवीनी तिथे नमूद केल्याप्रमाणे त्यांनी मा.बो. ला राम राम 'प्रतिसाद' मिळाल्याने केला नाही तसेच त्यांना प्रतिसादात 'वा वा छान' चीही अपेक्षा न्हवती. पण त्यांच्या मित्रालाच वाईट वाटले आणि त्याचा भ्रमनिरास होवु नये म्हणून त्यांनी राम राम म्हटले मा.बो. ला.
आता तेच अन त्यांचे मित्र खुलासा करु शकतात ह्यावर तोपर्यन्त त्यांच्या मित्राने त्यांचे निवेदन दिले होते ते हे,
>>
कवीचं निवेदन त्याच्याच शब्दात :
एका मित्राच्या आग्रहावरुन मी गेले काही दिवस माझ्या प्रकाशित संग्रहाव्यतिरिक्त असलेल्या कविता त्याच्या मार्फतच मायबोलीवर टाकतो आहे. मी स्वतः ईंटरनेट बाबत अशिक्षीत असल्याने मला या कविता स्वतः ईथे पोस्ट करणे शक्य नव्ह्ते. मायबोली वर जगभरातल्या मराठी माणसांचा प्रतिसाद मिळतो. तसा माझ्या काही कवितांना मिळालाही. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतू, मला माझ्या कवितांना सर्वांनी वा ! वा ! म्हणावं ही अपेक्षाच नव्हती. त्यामुळे ज्या माझ्या कवितांना अजिबात प्रतिसाद मिळाला नाही त्याबद्दल मित्राला वाईट वाटलं, मला नाही. मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की इथून मला आता काहीही "सिद्ध" करण्याचा उत्साह नाही, ईच्छा नाही ! मित्राचा आणखी भ्रम-निरास होऊ नये म्हणून मी ईथे कविता पोस्ट करण्याचं आता थांबवत आहे. परत एकदा मायबोली आणि मायबोलीकरांचे धन्यवाद !
<<

>>> त्याने ते केले तर ते सोने पे सुहागाच पण नाही केले तर तो दोषी आहे असे नाही मला वाटत

मिल्या, थोडी गल्लत होते आहे. 'दोषारोप' करणं हा या चर्चेचा उद्देश नाही. एक दुर्दैवी पायंडा पडत चालला आहे, त्याबाबत आपण काय करू शकतो, काही करू शकतो का - हा मुद्दा आहे. आणि सूचनांचं स्वागत आहे. तू म्हटल्याप्रमाणे बर्‍यावाईट घटना ज्या समाजात घडतात त्याचंच प्रतिबिंब इन्टरनेटवरही दिसतं. पण आपण वाईट बाजूच अधोरेखित करत रहायचं (कोणत्याही प्रकारे - कुप्रसिद्धीसुद्धा प्रसिद्धीच असते!) की चांगली बाजू उजेडात येण्यासाठीही प्रयत्न करायचे?

>>> चांगल्या लिखाणामध्ये फक्त कविता अभिप्रेत आहेत की सर्वच लिखाण?
>>> अजूनतरी माबोवर बरेच ललितलेख टाकून प्रतिसादच न मिळाल्याने कुणीही माबोचा निरोप घेतल्याचे ऐकिवात नाही. (माहिती चूक असेल तर दुरुस्त करावी.)

श्र, एका कवीच्या बाबतीत हे झालं, त्याने (किंवा त्याच्या मित्राने) तसं जाहीर करून मायबोली सोडून एक statement केलं म्हणून हा मुद्दा ऐरणीवर आला. या कारणासाठी मायबोली सोडणं चूक की बरोबर हा एक निराळा वादाचा मुद्दा होवू शकेल. माझा मुद्दा 'गुलमोहोरावरच्या चांगल्या साहित्याकडे चुकीच्या कारणांसाठी सातत्याने दुर्लक्ष होत असेल तर त्याबाबत आपण काही सकारात्मक करू शकतो का' हा (एवढाच) आहे.

मला हा सर्वोत्तम कविता निवडण्याचा वैभवने सुरू केलेला उपक्रम, किंवा चिनूक्स आणि त्याच्या सहकार्‍यांनी सुरू केलेला 'अक्षरवार्ता' हा उपक्रम - हे म्हणूनच स्पृहणीय वाटतात.

सर्वप्रथम संदेशजींचे आणि स्वातीजींचे मनापासून अभिनंदन ! Happy

वर बरीच चर्चा चालू आहे....अजुन वाचले नाही (ओझरते पाहीलेय!)

स्वाती, बाकीचे लोक काय म्हणतायत ते माहीत नाही.....पण तुमची निवड मला तर खूपच भावली.
थोर.....थोर ....... माझे मायबोलीबद्दलचे प्रेम द्विगुणीत केले तुम्ही !

~ प्रकाश ~

स्वातीचे बरेचसे मुद्दे मान्य आहेत, पण जाईजुई आणि मिल्या यांच्या पोस्ट्स जास्त पटल्या.

'वाचले, पण प्रतिक्रिया द्यायला वेळ नाही झाला' यावर एक उपाय आहे. 'मायबोली अशी सुधारता येईल' वर कुणीतरी असे सुचवले होते की 'बुकमार्क' ची सुविधा देण्यात यावी. ललित, कथा, किंवा कविता बुकमार्क करता आले तर वेळ असेल तेव्हा वाचून प्रतिक्रिया देता येतील.

>> आणि 'सर्वोत्तम कविता' म्हणून निवडली गेल्यावर वा इतर मार्गांनी एखादी निसटून गेलेली कविता पुन्हा लोकांपुढे आणल्यावर मग त्यावर लोकांनी प्रतिसाद देणे, यात गैर काय?

नाही, इतक्या लोकांना आवडण्यासारखी कविता आधी (चुकीच्या कारणांसाठी) निसटून गेली होती - आणि असं वारंवार घडत चाललंय - हे गैर; आणि त्याबाबत आपण काही करू शकतो का हे आजमावण्यासाठी ही चर्चा.

एक कल्पना: बिचार्‍या एकट्या स्वातींना चांगली कविता शोधायला लावायची या ऐवजी जरा तीन चार जाणते लोक एकत्र येऊन त्यांनी समिती बनवली, जसजशा कविता येतील त्यातल्या बक्षीसपात्र होऊ शकतील अश्या कविता एकमेकांच्या निदर्शनास आणून दिल्या, नि मग सर्वमताने जी कविता किंवा ज्या कविता उत्कृष्ठ ठरतील, त्यांची नावे जाहीर केली, असे केले तर?

म्हणजे काय, असे नको कि, एकट्या स्वातींना वाटले म्हणून ती कविता चांगली. ज्या अर्थी इतक्या अटितटीने इथे वाद चालू आहे, त्याअर्थी कविता कळणारे इथे अनेक लोक असावेत.

मध्यंतरी टण्या बेडेकर यांनी 'गुलमोहर' का काहीतरी नवीन धागा, फक्त कवितांसाठी उघडला होता, त्याचे काय झाले?
पहिली गोष्ट, तेथून माझी कविता(?!) नि त्यावरचे भाष्य उडवून टाकले का? मी स्वतःहून ते तिथे टाकले नव्हते, म्हणून मला ते उडवता आले नाही. पण तसल्या गोष्टींऐवजी चांगल्या कविता तिथे एकत्रित केल्या तर कदाचीत कविता सहजासहजी दुर्लक्षित होणार नाहीत.
असे आपले मला वाटते.

एक कल्पना: बिचार्‍या एकट्या स्वातींना चांगली कविता शोधायला लावायची या ऐवजी जरा तीन चार जाणते लोक एकत्र येऊन त्यांनी समिती बनवली, जसजशा कविता येतील त्यातल्या बक्षीसपात्र होऊ शकतील अश्या कविता एकमेकांच्या निदर्शनास आणून दिल्या, नि मग सर्वमताने जी कविता किंवा ज्या कविता उत्कृष्ठ ठरतील, त्यांची नावे जाहीर केली, असे केले तर?
-----------------------------------------------------
झक्की अतिशय सुंदर आयडीया...
"लक्षवेधी कविता" असा एखादा धागा उघडुन तिकडे "या" सगळ्या कविता move करायच्या.

दुसरी एक सुचना: जर कवीनी आपल्या कवितेबद्दल दोन तीन ओळीत सांगितले उदा. कविता कशी सुचली, आशय काय असे काहीतरी.. तर बर्‍याच (माझ्यासारख्या) लोकाना कविता समजण्यातही मदत होईल.

इतक्या कविता वाचुन त्यातील सर्वोत्तम कविता निवडण्याच्या स्वातीच्या परीश्रमांचे विशेष कौतुक करावे लागेल.

आणि शेवटी, कवीचे हार्दिक अभिनंदन..आता तरी कवी मायबोली सोडुन जाणार नाहीत ही आशा!

मनस्मी, तुमच्या
>>>>जर कवीनी आपल्या कवितेबद्दल दोन तीन ओळीत सांगितले उदा. कविता कशी सुचली, आशय काय असे काहीतरी.. तर बर्‍याच (माझ्यासारख्या) लोकाना कविता समजण्यातही मदत होईल.<<<

ह्या कल्पनेला १००% अनुमोदन. कवींना त्यांच्या स्वतःच्या कवितेचं थोडक्यात रसग्रहण करण्याची सक्ती करण्यात यावी.

माझ्या मते त्यामुळे वाटेल त्या कविता इथे येण्यावर थोडा आळा बसेल असे वाटते.

झक्कींची सूचनाही चांगली आहे.

कवींना त्यांच्या स्वतःच्या कवितेचं थोडक्यात रसग्रहण करण्याची सक्ती करण्यात यावी.>> नाही पटल. कविंना खरोखर आपली कविता वाचकांपर्यंत पोहोचावी अस वाटत असेल तर त्यांनी ते आपणहून केल पाहीजे.
वाचकाला "तयार" केले पाहीजे ह्या मिल्याच्या मुद्याला १००% अनुमोदन.

ते रसग्रहण सक्ती करण्याची बात सोडून झक्की व मन्स्वी यांचे बरेचसे मुद्दे पटले. एका वरची एवढी मोठी जबाबदारी सामूहीक रीत्या शेयर करणे तसे चांगलेच राहील. त्या रितीने कवी/वाचक ह्यांच्यात सुद्धा मस्त धागा(बीबी न्हवे) होइल. Happy आणि तो जो कुठला 'लक्षवेधी कविता' बीबी वर ह्या आठवड्यातील 'मला आवडलेली कविता' अशी लिन्क कोणीही (जी कोण आयडी वाचेल ती कविता पेस्ट करेल, कारण सगळ्या कविता काय सगळेजणांच्या दृष्टीस नाही ना पडत.) निदान कोणीतरी बघु तरी काय आवडले xyz आयडीला ह्या कवितेत(kind of word of mouth) सारखे चांगल्या कवितेचा प्रसार होइल. कवी सुद्धा काहीतरी सुधारणा करू शकतो जर असा positive feedback मिळाल्यावर्(हि एक आशा करु शकतो). किंवा करायच्या सुधारणा वगैरे सुचना का काय ते देवू शकतो कवीला. (पुन्हा कोणी काय द्याव घ्याव हा पुन्हा व्यातिगतच प्रश्ण असेल पण दोन्ही (कवी/वाचक ) बाजूने चांगले काही होइल अश्या प्रय्त्नाने अपेक्षा करण्यात काय वाईट?)
कवितांचे रसग्रहण हे खरेच मदत करेल जर नंतर असे वोटींग ठेवले तर.

बिचार्‍या एकट्या स्वातींना चांगली कविता शोधायला लावायची या ऐवजी जरा तीन चार जाणते लोक एकत्र येऊन त्यांनी समिती बनवली, जसजशा कविता येतील त्यातल्या बक्षीसपात्र होऊ शकतील अश्या कविता एकमेकांच्या निदर्शनास आणून दिल्या, नि मग सर्वमताने जी कविता किंवा ज्या कविता उत्कृष्ठ ठरतील, त्यांची नावे जाहीर केली, असे केले तर?<<
लक्षवेधी कविता म्हणून सर्वांनीच एका ठिकाणी त्या कवितांच्या लिंक्स शेअर करणे हे होईल. पण सर्वोत्तम कविता निवडताना समिती इत्यादी गोष्टी नकोत. वैभव ने अ‍ॅडमिन आणी स्वातीच्या सहाय्याने चालू केलेला उपक्रम आहे तसाच राहूदेत.

>>दुसरी एक सुचना: जर कवीनी आपल्या कवितेबद्दल दोन तीन ओळीत सांगितले उदा. कविता कशी सुचली, आशय काय असे काहीतरी.. तर बर्‍याच (माझ्यासारख्या) लोकाना कविता समजण्यातही मदत होईल.<<
अगदीच अमान्य. आणि अशी सक्ती करणे हे तर त्याहून अमान्य. मुळात कविता शब्दशः समजण्यापेक्षा त्यातून जाणवणारा अनुभव महत्वाचा असतो. ज्यांना सवय नाही अश्या अनुभवापर्यंत जाण्याची त्यांना सवय करावी/ लावावी लागेल. खूप खूप कविता वाचणं हा आणि हाच केवळ उपाय आहे त्यासाठी. एक क्षण असतो कवितापण उमगण्याचा तो जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण तोवर कविने स्वतःच कवितेचा 'अर्थ' समजावून सांगण्याने एकतर जे आपापल्या परीने कवितेच्या अनुभवाला सामोरे जातात त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांचा कवितेचा अनुभव खोटा होऊन जाईल आणि वाचणारे केवळ दिलेल्या अर्थानुरूपच मर्यादीत अनुभवाशी पोचतील त्यातून असे होईल की कवितेला कविने दिलेल्या एकाच 'अर्था'मधे जखडून कवितेच्या सर्व शक्यता नष्ट केल्या जातील. तेव्हा अशी सक्ती अजिबात करू नये.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

कविचे अभिनंदन आणि त्याहीपेक्षा स्वातीताई तुमचे....
अभिनंदनही आणि आभारही !!
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

मेसेज तुमचे हार्दिक अभिनंदन.

सर्वप्रथम संदेश चे अभिनंदन. संदेश ढगे सारखा कवी मायबोलीवर (कुणाच्याही आग्रहाखातर वा मार्फत) आला म्हणून मनस्वी आनंद झाला होता. डोंबिवलीच्या कार्यक्रमात जेव्हा संदेशने "थोड्याच कविता शिल्लक" हा त्याचा काव्यसंग्रह दिला होता तेव्हा नाव वाचूनच पाणी जरा वेगळं आहे हे कळलं होतं जे आजपर्यंत त्या संग्रहाने वारंवार माझ्यापुढे सिध्द केलं आहे. असं काय आहे संदेश ढगेमधे? प्रामाणिकता. कविता गहन की सोपी, कविता दुर्बोध की वाचक अबोध, कविता लांबलचक की छोटीशीच, कविता वृत्तबध्द की मुक्त ह्या भयानक वर्तुळात मी सध्या अडकलेलो असताना आणि कविता फक्त प्रामाणिक / अप्रामाणिक ह्या मतावर येऊन पोचलो असताना ही चर्चा स्वातीने घडवून आणावी हा देवाचा प्रसाद॑च.
मायबोली व्यवस्थापनाच्या "हो ! हे ब आणि क दर्जाच्या लोकांसाठीचे व्यासपीठ आहे " ह्या वाक्यावरून (कदाचित गैरसमजाने )रागावून धरलेला उपवास मी हा प्रसाद घेऊन सोडत आहे. म्हणजे "मी" काय "अ " दर्जाचा नाही काय असे स्वसंहारक प्रश्न तेव्हाही पडले नव्हते , मुद्दा होता "असेच कशावरून? आणि का ?" हे ही एकप्रकारे गृहितकच नव्हे काय?

जेथे एखादी कथा ऑलमोस्ट टाईप होता होता मुखपृष्ठावर येते , एखादा फोटो क्लिक होता होता मुखपृष्ठावर येतो तेथे "सर्वोत्तम" कविता "निवडण्याचा" मार्ग सुचवावा लागतो हे पचनी पडलं नव्हतं, अजूनही पडत नाही. एका दात्याने दिलेल्या जागेत चालणा-या ह्या वेगवेगळ्या वर्गांच्या स्वयंचलित शाळेकडे बाहेरून इन्स्पेक्शन करणारे कसे बघत असतील ही काळजी अजूनही पिच्छा सोडत नाही. त्यांनी बाहेरूनच जाऊ नये , आत येऊन तपासणी करून , शाळेला प्रशस्तिपत्र द्यावं ह्यासाठी शक्य तितकीच (पण योग्य रंगसंगतीची) तोरणं आपण दरवाज्यावर का लावत नाही अशी शंका मनात यायची , येते. कदाचित सध्या जी लावली जात आहेत तीच सुयोग्य तोरणं असू शकतात पण म्हणून एखाद्या वर्गाने पुढाकार घेऊन दुसरे पर्याय शोधायचेच नाहीत का? त्यातूनच कार्यशाळा, सर्वोत्तम कविता असे पर्याय समोर आले. अर्थातच ह्या प्रश्नांमधे सर्वच वर्गांचे प्रतिनिधित्व आहे पण सोयीसाठी मी आताचं मत "कविता" विभागाला समोर ठेवून लिहीतो आहे त्यामुळे श्रध्दा यांच्या मताची वेगळी दखल घेत नाही.

सर्वोत्तम कवितेच्या बाबतीतही पहिल्या महिन्यात माझं परीक्षण एकांगी होतंय हे लक्षात येताच मी असमर्थता व्यक्त केली होती. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे किमान सर्वोत्तम कवितेचं रसग्रहणही अचूक आणि मुद्देसूद असण्याची गरज लक्षात आली होती आणि हे आपल्याला जमणार नाही हे ही लक्षात आलं होतं. मागच्या महिन्यात मी श्री अ‍ॅडमिन ह्यांना लिहीलेल्या मेलमधे सद्य कवितांच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली होती ती आपण स्वतः कुणी फार श्रेष्ठ कवी आहोत अशा गैरसमजाने नव्हे तर एकाच पातळीवर कवितांचा बीबी खूप दिवस राहतो आहे हे लक्षात आलं होतं. कुठलाही कवी (कलाकार) कुठल्या ना कुठल्या क्षणी फ्रीक होतो , स्वतःचा विश्वास बसणार नाही इतक वेगळं (चांगलं किंवा वाईट) लिहीतो हे नक्कीच ,त्यामुळे अशा फोरम्स वरती अत्युच्च ते दर्जाहीन असं साहित्य सातत्याने येतच राहणार ह्यात शंका नाही. मला त्यातील प्रपोर्शन मधला इम्बॅलन्स खटकत होता म्हणून एखादी समिती नेमू या का, प्रकाशित करण्याआधी वाचन करण्यासाठी स्वयंसेवक हवे आहेत का अशी विचारणा मी माझ्या मेल मधे केली होती आणि त्यावर विचार आणि चर्चा नक्कीच सुरू आहे.

थोडीशी मदत हवी आहे ती वाचकांकडून . कलाकारांप्रमाणेच वाचकही फ्रीक मूडमधे असू शकतो ह्याची पूर्ण जाणीव आहे. एखादी कविता वाचताना वाचक कुठल्या मनस्थितीत असावा ह्यावर कुणाचाच ताबा असू शकत नाही . रंगमंचावरून कविता सादर करताना श्रोते केवळ त्या आणि त्याच गोष्टीकडे लक्ष देऊ शकतात तसं इंटरनेट / पुस्तक ह्या माध्यमातून पोचताना होवू शकत नाही हे ही मान्य आहे. त्यामुळे एखादी कलाकृती कुणाला का आवडते ह्याचे कुठलेही आडाखे नाहीत. पण काही गोष्टी करता येण्यासारख्या असाव्यात असे वाटते. कवीच्या नावावरून साधारण ह्याच्या कविता आपल्याला आवडतात किंवा नाही ह्याचा अंदाज यायला हरकत नाही (म्हणजे तिथे जाऊ नये असे नव्हे , for all we know he might have come up with a masterpiece that day) पण एक अनोळखी नवीन नाव पाहून त्याला डेव्हिड धवन किंवा श्याम बेनेगल ब्रँड करणे टाळले जावे. किमान एकदा वाचून आपले मत बनेपर्यंत तरी . हे आपल्या मॉनिटरवर असते , ह्यासाठी सिनेमासारखे उठून जाऊन , अव्वाच्या सव्वा पैसे देऊन ट्राय करावा लागत नाही. ह्याने एखादी चांगली कलाकृती आणि कलाकार (कुसुमाग्रज???)अर्काईव्हज नावाच्या सुशोभित रिसायकल बिन मधे जाण्याची शक्यता कमी होण्यास नक्कीच मदत होईल."थँक गॉड कुसुमाग्रज " ही कविता फक्त एका माध्यमाकडे बोट दाखवणारी नक्कीच नव्हती . कुसुमाग्रजांच्या आधी सुध्दा काही थोर कवी होवून गेले असतील ज्यांना पत्रं लिहायची सोय नव्हती , ऐपत नव्हती , संग्रह काढता येतात हे माहीत नव्हते त्याकाळी कुणीतरी त्या थोर कवीला उद्देशून असं लिहूच शकलं असतं की " बरं झालं अमुकतमुक , तुमच्या काळी काव्यसंग्रह नव्हते , नाहीतर पडून राहिला असतात खितपत , कुठल्यातरी अंधा-या गोदामात , स्वत:च्याच आवृत्त्यांच्या ढिगा-याखाली " .

" कलाकृती स्वयंभू असते , फूल उमललेलं सांगावं लागत नाही इथपासून ते कलेला लोकाश्रयाशिवाय पर्याय नाही , खिडकीत बसावंच लागतं " ही सगळी सापेक्ष मतं असू शकतात पण त्या त्या कलाकृतींना त्यांच्या त्यांच्या वकुबानुसार किंवा कुंडलीप्रमाणे कौतुक पदरात पडत असताना किमान आपल्याहातून वाचक/श्रोता / प्रेक्षक म्हणून काही राहून जात नाहीये ना?ही जाणीव कुठेतरी जिवंत असायला / ठेवायला काय हरकत आहे? एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण कुणीतरी आग्रह केला म्हणून मनाविरुध्द एखाद्या मैफलीला, सिनेमाला जातो आणि बाहेर येताना आग्रह करणा-याचे आभार मानत येतो , त्या कलाकाराचे कदाचित सर्वात मोठे फॅन होवून बसतो हे सर्वांच्याच बाबतीत घडत असावं. अशा वेळी "बरं झालं त्या दिवशी गेलो नाहीतर एका फार मोठ्या आनंदाला मुकलो असतो" असे विचार आपल्या मनात येतातच ना? आणि म्हणून सातत्याने आपला रडार ऑन ठेवून असे काहीतरी शोधत रहायलाच हवे असे काही नाही. आपल्या पध्दतीने मायबोली वाचत असताना , मित्रांशी गप्पा मारत असताना , आवडत्या लेखकाच/ कवीचं साहित्य वाचत असताना , नावडत्या लेखकाच्या / कवीच्या साहित्यावर गंमत सुरू असताना एखादी सरसरी नजर "अरे हा नवा दिसतोय , पाहू या तरी " अशा विचाराने पडावी ही इच्छा. माझ्यामते स्वातीच्या "जाता जाता" चा क्रक्स हा असावा.

ह्या चर्चेचे निदान लेखक/ वाचक , कवी / इतर असे गट पडले नाहीत हे बरेच म्हणायचे. माझ्या कवितेतूनही कुठले गैरसमज झाले नाहीत / नसावेत असे मी समजतो. छायाचित्रकारांबद्दल , विडंबनकारांबद्दल आणि कवितेचा उपप्रकार असलेल्या गझलकारांबद्दल मला नितांत आदर आहे. "कुसुमाग्रज" कवितेचा गाभा हा "गाभ्यावर" केंद्रित होता. मूळ कलाकृतींवरून प्रेरणा (..) मिळाल्याची हजारो उदाहरणं आपण कलेच्या सर्वच क्षेत्रात पाहतो. पण "काही झालं तरी ही वजन कमी करण्याचं मनावर घेत नाही , मग बायकोला दुर्जनगड म्हणा वा सज्जनगड म्हणा" ह्या वाक्याचा आनंद घेत असतानाच " पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा" ह्या नितांत सुंदर आणि सोप्या आणि छोट्या आणि आशयघन वाक्याचीही नोंद घेतली जावी असं "मला" वाटतं.

हे सोपं जावं म्हणून काही दिवसांपुर्वी उल्लेखनीय कवितांचं (सापेक्ष) रसग्रहण करायलाही सुरुवात केली होती पण तिथेही मूळ कविता सोडून/ पेक्षा रसग्रहण भावले अशा भाबड्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि ह्याचा मूळ लेखकावर विपरित परिणाम होवू शकतो अशी भीती वाटली म्हणून थांबवले. आणि नकोत ना रसग्रहणाच्या कुबड्या . आपण नवीन नावांवर क्षणभर थांबून आवडली/कळली नाही/ आवडली नाही अशा नोंदी तर घ्यायला लागू. चार वर्षापुर्वी ह्याच मायबोलीवर अशा काही सुजाण वाचकांनी माझ्या नावावर क्लिक केलं नसतं तर ??? तेव्हा मी कवितेला जे शीर्षक दिलं होतं ते वेगळं असलं असतं तर???हा विचार माझा थरकाप उडवून जातो. प्रश्न हजारो लोकांच्या आवडत्या किंवा हजारो लोकांच्या नावडत्या कलाकारांचा नाहीचे , प्रश्न ह्या दोन्हीत गुदमरून जाणा-या , आपल्या बागेत उमलू पाहणा-या एखाद्या जातिवंत कुसुमाचा आहे.

माझी ही पोस्ट अनाठायी असू शकते. एव्हाना तिथे चर्चेने वेगळाच रंग घेतलेला असू शकतो. तसे झाल्यास माफ करावे. ही पोस्ट कुणाला गहन वाटू शकते , कुणाला बाजारू , कुणाला लांबलचक वाटू शकते कुणाला मेलोड्रॅमॅटिक .. कुठल्याही कलाकृतीसारखीच. पण ही प्रामाणिक आहे. संदेश च्या कवितांसारखीच.. किमान माझ्यासाठी.

एकदम पटली तुमची पोस्ट. धन्यवाद.

वैभव,
वरची चर्चा एवढी लक्ष देउन वाचली नव्हती.ती चर्चा इथे पहिल्यांदा असल्यासारखे वाटले नव्हते म्हणुन दुर्लक्ष केलं.कंटाळा आलाय या सगळ्याचा आता(मलातर) !

पण तुमची पोस्ट आधी सहज म्हणुन वाचली ..परत एकदा लक्षपुर्वक वाचली,वाचू वाटली, ....वाचावीच लागली.

मनापासुन पटलं मला. धन्यवाद ! Happy

मायबोलीवरच्या बर्‍याच इतिहासजमा(माझ्याबाबतीत) गोष्टींचा, आढावा आला.
कोकणचा कॅलीफोर्नीया व्हावा.....यासारखाच, माझाही या संकेतस्थळाबद्दल एक फुकाचा आकांत होता.
आधी मीही माझ्या परिने हलवायचा,डिवचायचा प्रयत्न केला.पण झोपलेले नाहीये कुणी इथं ! हे त्यांच्या खेकसण्यावरून जाणवलं.....असो !
त्याची कुणावर जबरदस्ती करणं नैसर्गिक नाहीये ! ते शक्यही नाही ....ज्याला कुणाला ती खंत आहे त्याने आपापल्या परिने कार्यरत रहाणे...हेच खरे !

या कवितेची निवड मलाही आधी थोडी डिप्लोमॅटीक वाटली होती.(प्रामणिकपणे)
पण तसे काही नाहीये हे पटले.त्यापाठीमागचा चांगला पायंडा घालायचा हेतुही उदात्त आहे.

प्रकाश ~

वैभव आणि स्वाती परत एकदा धन्यवाद.
एका दिवसात एखादी कविता 'नवीन लेखना'च्या तिसर्‍या-चौथ्या पानावर जाते. बहुतेक जण कविता विभागात जाऊन बघत नसतील व बहुतेक जण 'नवीन लेखन'वर विसंबतात असा माझा अंदाज आहे. 'कविता निसटून जाणे' हे घडते आणि ते होऊ नयेच. उत्तम साहित्य वाचायला मिळणे यात आपल्या सर्वांचा स्वार्थ आहे. अशा 'नजरचुकी'मुळे स्वार्थ साधला न जाणे हा अव्वल दर्जाचा वेडेपणा आहे.

आपण नवीन नावांवर क्षणभर थांबून आवडली...
माझा मुद्दा 'गुलमोहोरावरच्या चांगल्या साहित्याकडे चुकीच्या कारणांसाठी सातत्याने दुर्लक्ष होत असेल तर त्याबाबत आपण काही सकारात्मक करू शकतो का' हा (एवढाच) आहे. >>>
हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा.
एक सूचना आहे - मायबोलीवर जेव्हा कोणी पहिल्यांदाच कविता प्रकाशित करत असेल तर 'माबोवरील नवीन कवी' म्हणून त्याच्या कवितांकडे लक्ष वेधता येईल का ? यासाठी
अ) माबोवर नवीन असलेल्याच्या पहिल्या २ किंवा ३ कवितांचे दुवे (माबोवरील पहिल्या) माबोच्या मुखपृष्ठावर देणे... त्यासाठी माबोच्या मुखपृष्ठावर वेगळा भाग करावा.
ब) वर नवीन लेखन, हितगुज, गुलमोहर... इ. ची पट्टी आहे, तिथे नवीन लेखन शेजारी 'नवीन कवीच्या कविता' असाही विभाग दिसावा. या विभागात नवीन कवीच्या पहिल्या २-३ कविता दिसतील. या कविता तिथे किती काळ दिसतील ? उदा. १५ दिवस. किती काळ पुरेसा ते बघावे लागेल. महिन्याभरात नवीन असे किती कवी माबोवर येतात ? तेही बघावे लागेल.
क) नवीन लेखन विभागातच २ भाग करावेत. वरच्या भागात नवीन कवींचे साहित्य दिसावे, खालील भाग नेहमीप्रमाणे. खालील भाग वाचकांच्या प्रतिसादाप्रमाणे बदलतो, वरील भाग तसा बदलणार नाही.

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    Pages