कुणी नसणार आई....

Submitted by वैवकु on 16 October, 2012 - 12:33

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसे मग सूख बसले मनाच्या वळचणीला>>> ही अक्षम्य सूट आहे वैभव.

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नोकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणी-फणीला>>> प्रामाणिक.

रचना गझल म्हणून विस्कळीत वाटली. तू ह्यापेक्षा चांगले लिहीतोस पण..

शुभेच्छा!

वेणीफणी आवडला.
वैवकु, ही रचना मला इतकी प्रभावी नाही वाटली. काही तरी मिसींग आहे.
प्रकाशनाची घाई केली असे उगाच वाटून गेले.

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

हा शेर खूप सुमार वाटला. आपण घोटीव गझल लिहिता याबद्दल खात्री आहे म्हणून हे सगळे सांगायचे धाडस केले.
राग आला असल्यास, वै. म समजून पुढे चालावे.

हा शेर खूप सुमार वाटला<<<

चर्चेच्या उद्देशाने - का सुमार वाटला?

(आईचे कांबळे, गोधडी काव्यात चालते, तिच्या उबेने, गंधाने आई आठवते, मग पैठणी का नाही?)

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

<<<

अर्थ - रुढी , प्रथा यांचे प्रस्थ इतके वाढले आहे की प्रेम सिद्ध करण्याचीही प्रथाच मूळ प्रेमाच्या व्यक्तीपेक्षा महत्वाची ठरते. समोर साजण असूनही साजणी चंद्रच पाहात राहते

मैंने रोते हुए पोंछे थे किसी दिन आँसू
मुद्दतों माँ ने नहीं धोया दुपट्टा अपना

जब तक रहा हूँ धूप में चादर बना रहा
मैं अपनी माँ का आखिरी ज़ेवर बना रहा

कुछ नहीं होगा तो आँचल में छुपा लेगी मुझे
माँ कभी सर पे खुली छत नहीं रहने देगी

मुझे कढ़े हुए तकिये की क्या ज़रूरत है
किसी का हाथ अभी मेरे सर के नीचे है

===============

मुनव्वर 'राना'

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला

हा एक शेर आवडला.

'तुझा' मी शेर जेंव्हा मुळी केलाच नाही
गझल मुकलीच माझी खर्‍या साकारणीला

आणि हा साफ नावडला!!
मला पहिली ओळ सहज वाटली नाही. तिथे 'मुळी केलाच नाही' ही शब्दरचना कुणास ठाऊक का, पण खटकली.
दुसर्‍या ओळीतील 'च' अनावश्यक वाटला.
एकूण दोन्ही ओळी मिळून मला ह्या शेरातून विशेष अनुभूती आली नाही.

क्षमस्व..

कसा दिसणार होतो म्हणा मी साजणीला
बिलगला चंद्र होता तिच्या त्या चाळणीला

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला >>>>>

या ओळी फार आवडल्या ! छान रचना !!

चर्चेच्या उद्देशाने - का सुमार वाटला?

(आईचे कांबळे, गोधडी काव्यात चालते, तिच्या उबेने, गंधाने आई आठवते, मग पैठणी का नाही?)>>>

तुला जाऊन आता किती वर्षे उलटली
अजुनही गंध येतो तुझा या पैठणीला >>>

ह्यात आई कुठे आहे ? बरं नसूद्या पण
आशय? किती व्यामिश्र / बहुपदरी आहे तरीही हाती काहीच लागत नाही.

चर्चा म्हणूनच घ्यावे...!

'अनीलजी ते शामजी' -पर्यंत सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार !!

सूख मध्ये अक्षम्य चूक झाली क्षमस्व .सौख्य हा बदल छान आहे पण अजून काही सुचतेय का विचार चालू आहे ....लवकरच बदल करीन .. कणखरजी व कावळोजी विशेष आभार !

पैठणीला ...चा शेर सुमार वाटणे हे वैयक्तिक आवडीवर अवलंबून असावे असे मला वाटते .काही प्राकाराचे शेर आपल्याला नेहमीच आवडतात काही अगदीच नाहीत असे अनेकांच्या बाबतीत होते .हे अगदी कॉमन आहे .
माझा एक शेर होता <<<< "यंदाही अमच्याइकडे पाऊस फिरकला नाही" >>>त्यावर शामजी म्हणाले होते बघ ....असे शेर मला नेहमीच आवडतात म्हणून ....आठवतंय का ? तात्पर्य काय की असं होतं बरेच वेळा !!

बेफीजीनी सांगितलेला मतल्याचा अर्थ सुंदरच आहे .....माझ्या मनातला अर्थ इतका सुंदर नव्हता!बेफीजींनी दिलेली लिंक .... त्यातला जाजम चा शेर आठवलाच होता पैठणी केल्याकेल्या ;आता मुनव्वरी मक्त्यावरून .... मला माझा शेर आठवला

जिला वाचून माझ्या वेदनांची काहिली शमते
मला ती बेफिकीरी अन तिचा दे दाह आयुष्या

जीतूने दिलेले मुनव्वर चे शेर छान !!
(जीतू तुला न आवडलेला शेर माझा विठ्ठलाचा शेर आहे रे डायरेक्ट उल्लेख नसल्याने समजला नसेल बहुधा ! आणि तू कशाला रे क्षमस्व ; मीच क्षमस्व !! )

पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार !!

आपला कृपाभिलाषी
-वैवकु

_____________________

घोटीव गझल म्हणजे काय कृपया सांगाल का कुणी !

सूख ला पर्याय सुचलाय ...कसा वाटतोय ते कळवावे ही सर्वाना विनन्ती

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
सा मग मोह बसला मनाच्या वळचणीला

प्रतिक्षेत ......................

आपला
-वैवकु !!

साच्यातून काढलेला गणपती

आणि

हाताने बनवलेला गणपती

ह्यात काय जास्त प्रमाणबद्ध असेल वैभव? ते घडीव......

सॉरी कणखरजी कन्फ्यूज झालो मी
कणखरजी मी तुम्हाला सन्ध्याकाळी फोनच करू का नै तर किन्वा मग वेळ कधी असणार आहे ते सान्गा मी फोन करीन

ह्यात आई कुठे आहे ? <<<

ह्या तुमच्या खालच्या शेरात तुम्हाला कोण अभिप्रेत आहे?

>>>वेळीच तिला पदराला जर जपता आले असते
वार्‍याने सुद्धा नसते भिडण्याचे धाडस केले<<<

==================

घोटीव व सुमार ही दोन पूर्णपणे भिन्न विशेषणे आहेत, शेर घोटीव असला की तो सुंदर असेल असे नाही

ही एक घोटीव गझल उदाहरणार्थः श्री. प्रदीप कुलकर्णींच्या पूर्वपरवानगीशिवाय! आशा आहे की त्यांना समजल्यास ते मला माफ करतील.

===========

ऑगस्ट 29, 2009 - 7:01 pm
...................................
दुःख गोठलेले मी... !
...................................

दुःख गोठलेले मी; ओघळायचो नाही !
अन् कधी कुणालाही मी कळायचो नाही !

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

ब्याद मी स्वतःसाठी अन् बला तुझ्यासाठी...
टाळले तरी आता मी टळायचो नाही !

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो की...
मी पुन्हा मलासुद्धा आढळायचो नाही !

ही धरा धरेना का कोंब एकही साधा ?
मी इथे पुन्हा आता कोसळायचो नाही !

सांग सांग गतकाळा, सांग हे भविष्याला...
गाडला न गेलो मी...मी जळायचो नाही !

पाळल्या न दोघांनी दोन या अटी साध्या...
त्रास तू न मज द्यावा...मी छळायचो नाही !

मान मी तुझी कविते का बरे झुकू द्यावी ?
तोल मी तुझा आहे...मी ढळायचो नाही !

चीड येत गेली मज यामुळेच माझीही...
वादळायचे तेव्हा वादळायचो नाही !

मी मुळात मातीचा; राहणार मातीचा...
मी हवेमुळे काही उन्मळायचो नाही !

पेटलोच आहे मी; पेटवीन अंधारा...
मी असा तसा आता मावळायचो नाही !

- प्रदीप कुलकर्णी

==================================

(सुरेश भट या स्थळावरून साभार)

ये समीप; घे हाती हात...बोल तू काही....
दोन-चार शब्दांनी मी मळायचो नाही !

दाट दाट स्मरणांच्या जंगलात शिरलो की...
मी पुन्हा मलासुद्धा आढळायचो नाही !

व्वा, मस्त शेर!

पहिले तीनही शेर चांगले वाटले मला.
('सूख' चे काहीतरी करता येईलच.)

गझलकाराचे नाव वाचून काही प्रतिसाद आलेले आहेत असे वाटले.
असो !

बेफीजी विषेश आभार
ज्ञानेशजी धन्यवाद . माझ्या गझलेवर आपला प्रतिसाद ही अत्यन्त दुर्मीळ बाब आहे .
निष्णात गझलकाराकडून असे कौतूक झाले की कॉन्फिडन्स वाढतो!!

________________________

अवान्तर : माझे नाव ऐकून माझ्या लेखनकडे अजिबातच न फिऱकणारे अनेक जण आहेत. अनेक जण फक्त वाचतात पण कधी प्रतिसाद नसतो. त्यामुळे .......माझे नाव वाचून प्रतिसाद येणे मला शक्य वाटत नाही आहे तरी ज्यानी दिले असतील त्या सर्व प्रतिसादकर्त्यान्चे शतशः आभार.
मी त्यान्चाही ऋणी आहे !
_______________________-

असाच अगदी सहज माझा एक शेर आठवला ....

तुझ्या गझलेवरी तेन्व्हा सखे मी भाळलो होतो
तुझ्यावर भाळल्याचा आळ मी फेटाळतो आहे

पुनश्च धन्यवाद !

सूख बाबत असा बदल सुचतो आहे

इथे दुःखेच दुःखे कुठे जागाच नव्हती
तसे विश्रान्तले सुख मनाच्या वळचणीला

कसा वाटतो आहे बदल??
सम्पादित करू का ?

Pages