मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - सफरचंद-बटाटा थालिपीठ- तिखट -अगो

Submitted by अगो on 26 September, 2012 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम सफरचंद
२ छोटे किंवा १ मोठा बटाटा
गरजेनुसार तांदळाचे पीठ
जिरं
भरडलेले मिरे
दाण्याचं कूट
हिरवी मिरची
कोथिंबीर
मीठ
तूप

क्रमवार पाककृती: 

सफरचंद सालासकट किसून घ्यावे.
बटाटा साल काढून किसून घ्यावा. ( बटाटा कच्चाच किसावा, उकडून नव्हे. )
त्यात आवडीप्रमाणे दाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, भरडलेले मिरे, मीठ घालून थालिपीठ थापण्यासाठी लागेल तेवढेच तांदळाचे पीठ घालावे ( साधारण तीन-चार छोटे चमचे. )
तव्यावर तूप सोडून पातळ थालिपीठ थापावे. झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी खालची बाजू सोनेरी कुरकुरीत झाली की उलटावे. झाकण न ठेवता दुसर्‍या बाजूनेही शिजवून घ्यावे.
गरमागरम खावे Happy

thalipeeth1.jpgthalipeeth2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ थालिपीठे.
अधिक टिपा: 

झटपट होणारा प्रकार आहे.
सफरचंद असल्याने वेगळी साखर घालायची गरज नाही.
गोड-तिखट आवडेल त्याप्रमाणे सफरचंद-बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करु शकता.

माहितीचा स्रोत: 
उपासाच्या बटाट्याच्या थालिपीठाची कृती फेरफार करुन.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! अगो साधी सोपी आणि तरीही चविष्ट!(असणारच......पण खाऊन पाहिल्याशिवाय कसं कळणार? त्यासाठी करून पहावे लागेल!)

मी पण केले
फोटो काढायला एक शेवटी करायचं ठेवलेलं ते आईने कधी लावलं, आणी कोणी तरी कधी खाल्लं ते कळालच नाही Happy
पण मस्त झालेलं
वरचे वर होत राहिल बहुदा आता ही पाकृ Happy

अगोड सफरचंद घालायची अजिबात गरज नाही. उलट गोड सफरचंदच छान लागते जास्त >> ओह बर बर! माझी रिअ‍ॅक्शन << सफरचंद पाणचट चवीचं असावं. >> ह्यावर होती.
मी पण काल केलं होतं, छान झालं. मी रताळं घातलं बटाट्याच्या ऐवजी, आणि नुस्त्या तांदळाच्या पिठाऐवजी, हाताशी असलेली बरीच पिठं घातली.

मो, मला वाटलं तू मुद्दाम एखादं कुकिंग अ‍ॅपल वापरायचं म्हणत आहेस Happy
प्रयोग आवडला हे वाचून छान वाटलं रिया आणि मो.

परवा हे थालिपीठ केलं होतं. चवीला अफाट टेस्टी झालं होतं पण टेक्स्चर पार गंडलं म्हणून इथे लिहीलं नाही. माझ्या दोन चुका झाल्या बहुधा. एक म्हणजे सफरचंद किसल्यावर पाणी काढून टाकायला हवं होतं कारण पीठ कितीही घातलं तरी मिळून येत नव्हतं व दुसरं म्हणजे नॉनस्टीक तवा वापरला नाही.

आज परत ही थालिपीठं केली, मागच्या वेळच्या चुका सुधारून. आज एकदम बेस्ट झाली.

धन्यवाद अगो

अगो काल लेकाने थालिपीठाचा फोटो बघितला आणि कधी नवे ते मला म्हणाला मला खायचं आहे तुला येतं का? आता उद्या करायचं आहे थालिपीठ

अगो कृती आवडली. मुख्य म्हणजे बेसिक स्वयंपाक करता येणार्‍याला पण करून बघता येण्यासारखी आहे. लवकरच माझ्याकडे करण्यात येईल. केली की तुला सांगेनच.

आडो, मी वापरलेल्या सफरचंदाला अजिबातच पाणी सुटलं नाही. असं होऊ शकेल हे लक्षातच आलं नाही. बरं झालं इथे लिहिलंस ते Happy
रुनी आणि फुलपाखरु धन्यवाद. फुपा, नक्की कर. आवडेल लेकाला Happy

माझ्याकडे ही सफरचंदाला पाणी सुटलंच होतं पण मी त्यातच पिठ व्यवस्थित पेरल सो माझी थालिपिठ छान झालेली
सफरचंदांमध्ये पण फरक असु शकतो का?

मी सुद्धा केलं.

मी कच्चा बटाटा व सफरचंद किसून घेतले, त्यात दालचिनी पूड चिमटीभर, धणा-पूड, जीरा पूड घालून लगेचच डायरेक्ट तव्यावर घातले बटर टाकून.
पुर्ण तव्यावर पातळ थर टाकला. झाकण मारले. मग ती बाजू परतून घेवून दुसरी बाजू भाजयली ठेवली.

थापायची भानगडीत पडायचे न्हवते म्हणून मग जराश्या ताकात मिरची, बारीक कोंथीबीर चिरून त्यात तांदूळाचे पिठ कालवून पातळ मिश्रण ओतले ह्यावर . मग झाकण उघडून दोन्ही बाजू भाजून परतले. वरून मिरपूड.
कुरकुरीत लागले, डोसा कम हॅश ब्रॉउन लागलं.

अगो, धन्यवाद.

Pages