गणपतींच्या निमित्ताने

Submitted by चिखलु on 27 September, 2012 - 15:54

तीन एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा २ वर्षाचा भाच्चा बाप्पांचे विसर्जन करायला आला होता तलावावर. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणून माझ्या भाउजीनी विसर्जन केले, आणि इकडे माझा भाच्चा ते पाहून जोर जोरात रडायला लागला. बाप्पा पाण्यात बुडतील, त्यांना त्रास होईल म्हणून तो रडत रडत, बाप्पाला पाण्यातून बाहेर काढायला पाण्यात जात होता. हा प्रकार आजू बाजूच्या लोकांच्या लक्षात आला आणि ते हसू लागले, यामुळे तर तो अजूनच वैतागला. माझे बाप्पा पाण्यात बुडत आहेत आणि हे लोक हसत आहेत, हे त्याच्या बाल मनाला पटत नसावे. कशीबशी समजूत काढून त्याला घरी आणले.

छोटीशी गोष्ट पण, बालपणीची हि निरागसता, सर्जनशीलता, भाव-विश्व कुठे गायब झाले तेच कळत नाही? १० दिवस सोबत राहिलेल्या बाप्पावर एवढा जीव जडतो पण ज्यांनी वाढवले, जन्म दिला त्यांच्यासाठी वेळ नसतो. रस्त्यावर आपल्यासमोर अपघात होतात, रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या कुणाला मदतीची गरज असते, कोणी आजोबा सिग्नलवर उभे असतात, त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो आणि आपण मात्र सगळ समजूनही ऑफिसला उशीर होईल म्हणून भुर्रकन निघून जातो.

आपण मला काय त्याचे? या थाटात वावरतो. सगळ्या भावनाच मारून गेल्या आहेत कि काय? सगळंच यंत्रवत का झालय? बालपणीचे प्रेम, ती निरागसता कुठे हरवलीये? कट्टी नंतर दो म्हणून क्षणार्धात जुळणारे मन, आणि आत्ता क्षुल्लक कारणावरून होणारे भांडण, दुखावणारी मने, आकाशापर्यंत वाढलेले इगो!!! आपण फक्त शरीरानेच वाढलो का? मनाच्या वाढीचे काय? आजच्या जगात असेच जगावे लागते असं म्हणून स्वतःशीच खोटे बोलावे लागते. निदान स्वता:शी मैत्री झाली तरी खूप असंच म्हणावे लागेल आता...

असो, बाप्पांची जायची वेळ जवळ आलीये, पण आशा आहे, यावेळेस माझ्यातल्या कोरडेपणाचेच विसर्जन होवो. बाप्पा मनामध्येच घर करून कायम राहोत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिखल्या, छान लिहलयं! Happy

माझ्यातल्या कोरडेपणाचेच विसर्जन होवो>>> अगदी अगदी! प्रत्येकाचे असे होऊ दे....

मलाही कधी कधी असचं वाट्तं .. आजकाल हा प्रयत्न करते की मदत करेन Happy माझ्यातल्या कोरडेपणाचेच विसर्जन होवो>>> +१

छान

छान !

धन्स टिल्लु, विद्याक निशदे
कोरडेपणाचे विसर्जन.....वा छान आहे शब्द प्रयोग
>>
ह्म्म लहान मुलेही कधी कधी शिकवुन जातात ते असे. Happy