पुनः (पुनःपुनः) सहप्रवास! - भारती बिर्जे डिग्गीकर

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 07:40

'सहप्रवास प्रतिष्ठान' हे आम्हा समविचारी (कधी अविचारीसुद्धा) मित्रमंडळींच्या एकत्र येण्याचं एक नाव. त्याचं असं झालं, प्रज्ञा हरणखेडकर (पूर्वाश्रमीची वैद्य) ही माझी शाळेतली जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यभर त्या मैत्रीला निभावणारी. आमची घरे एकाच इमारतीत. आम्ही एकाच शाळेत, एकाच वर्गात, एकाच बाकावर. आमच्या कुमारवयात एकमेकींसोबत आम्हाला खूप वेळ राहता आलं. व्रात्य खोड्या, नष्ट चकाट्या, अफाट कल्पना, अगोचर खेळणं, सोबत भोगलेल्या शाळकरी शिक्षा, मरेपर्यंत हसणं, हे मैत्रीचे पायाभूत घट्ट घटक. बाकी फरक अनेक... दोन भावंडांमध्येही असतात ना फरक! मी मनापासून अभ्यास करणारी, उरलेला वेळ तंद्रीत राहणारी. ती अभ्यासाचा मनापासून कंटाळा करणारी, चित्रकार असल्यामुळे गाणी ऐकत त्यांच्या तंद्रीत काम/अभ्यास करण्याची चैन करणारी.

तर बर्‍या-वाईट घटनांसह सुखद-दु;खद अपघातांसह आयुष्य पुढे सरकत गेलं. कॉलेजेस वेगळी, कार्यक्षेत्रं वेगळी. मित्र वर्तुळ वेगळं, अभ्यासविषय वेगळा. मग यथासांग लग्नं झाली. नव्या पारिवारिक नात्यांमध्ये, जबाबदार्‍यांमध्ये आम्ही गडप झालो समस्त स्त्रीवर्गाप्रमाणे.
पण एकमेकींशी आतून कनेक्टेडही राहिलो. सर्व महत्वाच्या सुखदु:खांमध्ये मनाने जवळ राहिलो. या ना त्या प्रकारे एकमेकींना सपोर्ट दिला. आमचा एक आवडता सिद्धांत असा की मैत्री ही फावल्या वेळाची गंमत नाही तर एक कायमची कमिटमेंट असली पाहिजे. नाती कशी कायम चिकटलेली असतात, तशी.

माझी एक कविता आहे 'सहप्रवास' (मायबोलीवर टाकलीय) ती प्रज्ञाला फार आवडते. त्याच नावाने बाईने हा ट्रस्ट स्थापन केला. ती अध्यक्ष आहे. विश्वस्त मंडळात मी, चित्रकार अविनाश शाळिग्राम, संगीतकार मिलिंद मधुसूदन सोमण ('तो' नाही हो!). एक खरे मित्र-रत्नाकर खरे, ठाण्याचे अजय केळकर...आयुष्याच्या प्रवासात आपापल्या कार्यक्षेत्रात भेटत, भावत गेलेली माणसे. समविचारी, क्रिएटिव्ह,काहीतरी करू, निर्मू इच्छिणारी आणि सभासद-प्रतिनिधी अनेक! आमच्या कुटुंबातले प्रियजन, आता नव्या दमाची नेक्स्ट जेन सुद्धा.

अविनाशच्या आग्रहावरून एक नाट्यधारा की धारावाहिक नाटकही लिहिले मी 'सहप्रवास ' याच नावाने. (हेही मायबोलीवरच टाकलेय! नाटके करायला वेळ नाही पण लिहिण्यासाठी काढला आवडीने!) त्यातही शेवटी आयुष्यभराचा मित्र-गोतावळा नात्या गोत्याच्या बंधनात जरी एकमेकांना अडकवता आले नाही तरी एकत्र येऊन सामाजिक काम करताना दाखवलाय.आम्ही सामाजिक, सांस्कृतिक कार्य करतो. अर्थात 'सहप्रवास' चा प्राण आहे प्रज्ञाच. ती सतत काहीतरी नवे शोधत असते. ते कृतीत उतरवण्यासाठी अस्वस्थ असते. अविनाशची सामाजिक कमिटमेंट आम्हाला आमच्या मूळ कलात्म प्रेरणांपेक्षा वेगळ्या वाटेवर नेते.

प्रथम आम्ही काही सांगितीक कार्यक्रम केले. मी अन सोमणांनी केलेल्या 'चंद्रस्वप्न एकले' या ध्वनिफितीला अल्फा गौरव पुरस्कार मिळाल्याचे निमित्त होते. जल्लोष केला.'पाचवी मिती - नवनिर्मिती' आणि 'श्रीशब्द अंतरीचा' असे दोन स्वरचित नव्या अन प्रचलित जुन्या गाण्यांचे कार्यक्रम अनुक्रमे ठाणे व अंधेरी येथे २००७ मध्ये केले. मग समाजकार्यासाठी वांगणी (बदलापूर जवळ) हा परिसर निश्चित केला. तिथे तेथील गरीब आदिवासी शेतमजुरांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, तेथल्या आश्रमशाळांसाठी आमच्या अनेक योजना आहेत. तिथे मोफत मेडिकल कँप्स घेतो (पोदार मेडिकल कॉलेज, वरळी, मुंबई यांच्या सहकार्याने) त्यांच्याच डॉक्टर्सची टीम आमच्याबरोबर असते. अलिकडेच २६ ऑगस्टला एक कँप झाला... मुलांसाठी विविध स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, अभ्यास शिबिरे, कार्यशाळा, आकाश-दर्शनाचे कार्यक्रम, नेचर ट्रेल्स... वाट हळुहळु निघत जाते. कार्य सिद्धीस नेणारी माणसे भेटतात.'राह बने खुद मंजिल' असं काहीतरी असतं. इतिश्री!

प्रश्न राहतो अर्थ-व्यवहाराचा. स्वतःच्या आनंदासाठी सुरू केलेला हा व्याप जमेल तिथवर आम्हीच चालवतो. आता देणग्याही घेतो. 'सहप्रवास प्रतिष्ठानला' दिलेल्या देणग्या 80 (No.DIT(E)/MC/80G/132/2012-13) अंतर्गत येतात. आमचा इमेल आयडी sahapravas@gmail.com असा आहे.
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी करण्याची सक्ती नाही. त्या प्रभावी होताहेत असं वाटेल तेव्हा हे सारं आवरायचं असं ठरलंय आमचं.

समारोपाचं सांगणं-आपापल्या आयुष्यात असं काहीसं केलं तर मैत्रीला एक प्रयोजन. एक आनंदनिधान मिळू शकतं. अर्थात ते सोपं नसतं. व्यवहाराच्या कटकटी अनंत, आपली शक्ती अन वेळ यावर तितकेच क्लेम्स. पण अशक्यही नसतं हे सारं.

सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारती ताई तुमच्या कार्याबद्द्ल छान माहिती दिलीत, तुमचा "सहप्रवास" असाच वेगवेगळ्या नविन कला कल्पनांनी समृद्ध होवो यासाठी मनापासुन शुभेच्छा Happy

मैत्रीतून फुललेला एक सुरेख उपक्रम. स्वतःच्या आनंदाबरोबरच इतरांनाही यथाशक्ती मदत करण्याची वृत्ती आवडली. Happy शुभेच्छा!

नुसतेच बोलणारे (माझ्यासारखे) खूपच असतात, करणारे फारच थोडे.....
तुम्ही सर्व मंडळी करणारांपैकी असल्यामुळे त्याचे मोल आगळेच...

मैत्रीतून फुललेला एक सुरेख उपक्रम. स्वतःच्या आनंदाबरोबरच इतरांनाही यथाशक्ती मदत करण्याची वृत्ती आवडली. शुभेच्छा! >>> +१००००....

छान

संयोजकांचे आभार गणेशोत्सवानिमित्त असा वेगळा विषय-सामाजिक उपक्रमांचा- दिल्याबद्दल.

सर्वांचे मनःपूर्वक आभार प्रतिसादांसाठी.

हा लेख प्रज्ञाच्या अदम्य (शब्दशः) कार्यशक्तीला अर्पण.

प्रेरणादायी.. मनात सगळ्यांच्याच असतं, पण कृतीत फार थोडे जण आणतात !

खूप आभार सर्वांचे,अन शुभेच्छा -असं काही तुमच्या आमच्या आयुष्यात घडत राहो.. :))
एक आवाहन, वांगणी परिसरातील आदिवासी/ शेतमजुरांच्या मुलांना निरनिराळे अभ्यासविषय सोपे करून शिकवण्याची कोणाला इच्छा/आवड असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क करावा.आम्ही तिथल्या शाळा/ आश्रमशाळांमध्ये असे उपक्रम करत असतो..