कागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर

Submitted by अवल on 20 September, 2012 - 08:27

माझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.

आठव्या मजल्याच्या फायर एक्झिटमध्ये सोसायटीचा गणपती बसवला आहे. म्हणून आम्ही लिफ्टने आठव्या मजल्यावर गेलो. अन दार उघडताच नाचणा-या या राजस्थानी युवतीने आमचे स्वागत केले.
तिच्या गिरकीचा आम्हाला धक्का लागू नये म्हणून सांभाळून बाजूला उभे राहून न्याहाळू लागलो.

DSC_0401.jpg

गितांजलीने रेखलेली ही रांगोळी. तिच्या मैत्रिणी आणि लेकीने रंगवायला हातभार लावला होता.
गितांजलीने सांगितले की राजस्थानची थीम घेतली आहे. बोलता बोलता आत आलो तर समोरच भला मोठा वड उभा होता. अन त्याच्या पारावर चालू होता कठपुतळ्यांचा खेळ. झाडही कागदी, पारही कागदीच.

DSC_0392.jpg
वडाला वळसा घालून आत आलो. आतून पूर्ण झाड दिसत होते. संपूर्ण कागदाने तयार केलेला वटवृक्ष ! बुंधा कागदाचा, पानं कागदाची. अन तो सजवायला संपूर्ण सोसायटीची मुलं आली होती हे आवर्जून सांगितलं, गितांजलीने. लहानांना आपल्या कलेत सामावून घ्यायची ही गितांजलीची कला मला भावून गेली.

DSC_0396.jpg

आता नजर उजवीकडे वळली. अन मी सरळ राजस्थानातल्या एका खेड्यात प्रवेश केला. समोर किल्ल्याची भिंत होती, मध्ये दरवाजा होता. अन उंटावर बसून आमचा वाटाड्या आम्हाला वाट दाखवत होता. पुढे दोन राजस्थानी बायका पाणी भरायला निघालेल्या. गितांजलीच्या हातातल्या चित्रकलेची ही एक चुणूक. कलर पेन्सिलीने साकारलेले.

DSC_0393.jpg

हे सगळी कागदी विश्व तयार करताना झालेला कचरा एकत्र करून त्यावर वाळू पसरून मस्त वाळवंटाचा आभास तयार केला होता.

DSC_0410.jpg

समोरच झोपडी उभी होती. दाराची कडी वाजवून आत जावं असा विचार केला. अन लक्षात आलं, झोपडीही कागदाचीच. शेजारी उखळ आणि दांडाही कागदाचाच. शेजाती बाजल्यावर मिरच्या वाळत ठेवल्या होत्या, त्या मात्र ख-याच होत्या.

DSC_0394.jpg

अन मग पुढे सारा राजस्थानची कला होती. बांधणीचे कापड, खास राजस्थानी रंगकामाचे कापड, मीरा, कृष्ण, आणि कितीतरी वस्तूंचा बाजार मांडला होता.

DSC_0395.jpg

अन डावी कडे होते कुंभाराचे चाक, अर्थातच कागदी. अन शेजारी कागदीच दगडी भिंत.

DSC_0397.jpg

वर राजस्थानी पद्धतीच्याच किरणने घरीच तयार केलेल्या माळा रुळत होत्या.

DSC_0398.jpg

आता डावी कडे कागदाचे बनवलेले सुंदर मंदीर दिसत होते. कोनाडा असलेली भिंत, गोलाकार खांब, त्या खालचे चौकोनी दगड, वरची नाजूक किनार, वरच्या घुमटाचा किंचितसा दिसणारा भाग; सारे काही कागदाचे. त्यावर केलेली कलाकुसर जाड दोरा- नाडीची.

DSC_0414.jpg

समोर दिसनारी ही कोनाड्याची भिंत आतून पोकळ आहे. आधारासाठी आतून मोकळी, जुनी खोकी घातली आहेत.
आणि हा गणपती बाप्पा ! बाजूला नाचणारे मोर. हो हो ते ही कागदाचेच आहेत. त्यांचा पिसारा पहा. मागची मखरही कागदाची.

DSC_0404.jpg

डावी कडचा कोनाडा मघाशी बघितला. उजवी कडची ही झरोक्यांची जाळी. तीही कागदाची, अमृताने केलीय.

DSC_0387.jpg

अन हा मंदिराचा घुमट, आतून. जवळ जवळ १० फुटाचा व्यास असलेला हा घुमट. अन मधले झुंबर. हे सारे पंख्यासाठी असलेल्या हुकला अशा कौशल्याने अडकवले आहे की त्यांनी सांगितल्या शिवाय मला कळलेच नाही हे वर अधांतरी कसे ? कारण म्हणावा असा कोणताच आधार नाही त्याला. खाली आहे ती भिंत अन खांबही कागदाचेच. त्यावर हे घुमट टिकणे अवघड होते.
त्याची कलाकुसरही पहा, अतिशय सारखे पणा आहे त्यात.

DSC_0384.jpg

हे संपूर्ण कागदी राजस्थान घडविणारे कलाकार :
गितांजली प्रधान, सोनाली माधमशेट्टीवार आणि किरण सुतार.

DSC_0409.jpg

आणि त्यांना मदत करणारे हे बालकलाकार :
सानिका प्रधान, आरुषी माधमशेट्टीवार, अमृता सुतार

DSC_0413.jpg

या शिवाय आरुष माधवशेट्टीवार आणि इतरही अनेक छोट्यांनीही मदत केली. गितांजली, सोनाली आणि किरण या तिघींणी सर्व काम आपल्या जबाबदारीवर पार पाडले. अगदी घुमट वर चढवण्याचे, झाडाची पाने वर पर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनीच केले. या सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच, हो ना Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विस्मयकारक! खरोखर थक्क झालें पाहताना. वड, उंटाचे चित्र असलेली भिंत, मोर, मखर, झुंबर सगळेच अप्रतिम आहे. संकल्पना आणि मांडणी दोन्हीचे खूप खूप कौतुक!

शागं, आशू खरोखर थक्क झाले मी हे पाहून.
यातले एखाद दुसरे करणे शक्य आहे. परंतु एव्हढ्या मोठ्या प्रमाणात केवळ तिघींनी करणे अन तेही अगदी मोजक्या दिवसात खरोखरी खुप कौतुक वाटते मला.
आजच दुपारी पाहिलं राहावलच नाही इथे शेअर केल्याशिवाय Happy

अवल, खुप्प्प्प्प्प्प्प्प्च सुरेख झालय हे सगळं ... कल्पना आणि मांडणी तर मस्त आहेच पण ईतक्या पेशंसने हे सर्व करणे म्हणजे खरेच हॅट्स ऑफ टु ऑल ऑफ देम.
बादवे, कोणती सोसाएटी ?

Awesome..खरच किति creative आहेत! भरपुर वेळ आणि पेशन्स लागले असतिल नाहि. आणि हे सगळे कागदाचे म्हणजे खुपच अप्रतिम! शब्द्च नाहित express करायला.

वरील सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन Happy
आरतीताई तुमच्याकडे सगळेच कलाकार भरलेत की काय ग?
खुप सुंदर आहे हे
त्यांचं कौतुक आणि तुझे आभार Happy

वॉव खुपच सुंदर...... कागदापासुन किती अप्रतिम देखावा बनवला आहे

वॉव. खूपच मस्त. अभिनव कल्पना अणि त्याची अंमलबजावणीही एकदम चांगली केली आहे.
सगळ्या कलाकारांचे खूप कौतुक वाटले. त्यांच्यापर्यंत आमच्या शुभेच्छा नक्की पोचवा.

धन्यवाद सर्वांना.
ही लिंक पाठवली आहे गितांजलीला. शिवाय आज तिला पोहचवते तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा अन कौतुक Happy
रीया Happy

मस्त, सुंदर .. Happy

>> आठव्या मजल्याच्या फायर एक्झिटमध्ये सोसायटीचा गणपती बसवला आहे.

हे मजेशीर वाटलं .. आपला विघ्नहर्त्यावर ठाम विश्वास आहे .. Lol

Pages