तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?

Submitted by सतीश देवपूरकर on 1 September, 2012 - 02:53

गझल
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!

साद वा-याने दिलेली वाटते तितकी न साधी;
ती तुला पाहून त्याने घातलेली शीळ आहे!

कोण हे सांगेल त्याला? ठेच त्याचा तोच खातो!
तोच वाटेतील त्याच्या एक मोठी खीळ आहे!!

कावळे संतापले अन् काय लालीलाल झाले!
ज्या क्षणी त्यांना कळाले....एक मी कोकीळ आहे!!

रंगलो आपादमस्तक मी तुझ्या रंगात पुरता!
होय, प्रेमाची मलाही जाहली कावीळ आहे!!

मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजरं, उंदीर, कावळे, कोकीळ काय कविता आहे का प्राणीसंग्रहालय आहे हो सतीश देवपूरकर? तीळ, खीळ आणि कावीळ काय वाट्टेल ते लिहायला लागला आहात. मोगलाई आहे का मोगलाई? परवा तुम्ही बिनपावसाचे मोर नाचवलेत अन वर स्वतःच लिहिलेत की म्हणे असे कसे मोर नाचती हे. आज म्हणताय कावळे लालीलाल झाले. बेसिक्समध्ये घोळ आहेत. कावळा हा पक्षी काळा असतो काळा. तुम्ही कोकीळ आहात हे ऐकून कावळे लालीलाल झाले? उपचार का करून घेत नाही आहात? डोके फिरायची वेळ आली.

तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!

साद वा-याने दिलेली वाटते तितकी न साधी;
ती तुला पाहून त्याने घातलेली शीळ आहे! ...............

मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!......... हे सारेच अफलातून________ हॅट्स ऑफ///

रंगलो आपादमस्तक मी तुझ्या रंगात पुरता!
होय, प्रेमाची मलाही जाहली कावीळ आहे!! --------> हे फारसे रुचले नाही, म्हणून

रंगलो आपादमस्तक् मी तुझ्या रंगात् जेंव्हा!
अंतरीचे दु:ख माझे जाहले घननीळ आहे
._____________ असे केले. Happy

मोहिनी पवारबाई!
ही गझल म्हणजे प्राणीसंग्रहालय झाले असते हो, पण त्यात आपला समावेश/उल्लेख राहून गेला हो, त्यामुळे तसे वाटत नाही हो, काय करू सांगा!
मला वाटते आपण लवकरात लवकर कवितेची शिकवणी लावायला हवी, कारण कावळे लालीलाल झाले म्हणजे संतापाने/रागाने लालबुंद/लालीलाल झाले. (जसे कुणाचे डोके फिरते ना तसे)
ही काव्याची भाषा आहे पवारबाई.........आपल्या डोक्यावरची आहे तूर्तास तरी!
इथे कावळ्याचा रंग काळा, मग लालीलाल कसे?......हा प्रश्न फारच बाळबोध झाला हो पवारबाई!
तेव्हा आपण कवितेची शिकवणी लवकरात लवकर लावावी, म्हणजे आपल्या फिरणा-या डोक्यावर वेळीच उपचार होतील व आपल्या तोंडची वाफही दवडली जाणार नाही.
..........प्रा.सतीश देवपूरकर

छान आहे. पण तुमच्या या आधीच्या काही चांगल्या गझलांची उंची नक्कीच नाही गाठली गेली असे उगाच वाटून गेले. असो. उडदामाजी काळे गोरे चालायचेच.

सतीश देवपूरकर मी बाळबोध तर बाळबोध बाई पण मला सांगा तुम्ही इतके डोकेबाज आहात तर की प्रेमाची कावीळ झाल्यावर माणूस समोरच्याच्या रंगात आपादमस्तक कसा काय रंगेल? कैच्याकै लिहायचे का कवितेत? त्या सुधाकराने दिलेला 'घननीळ' हा पर्याय एकदा विचारात घ्या, मग समजेल कविता कशी प्रासादिक भाषेत लिहायची असते ते. कुठे घननीळ कुठे कावीळ. एकटाकी गझल म्हणजे काय ते अजून सांगितलेलेच नाही आहेत तुम्ही. आमच्या जालन्याचा एक सुतार सकाळी उठून नाश्ता करून एक पव्वा चढवायचा आणि दहा वाजता जो कामाला लागायचा तो रात्री आठ वाजताच थांबायचा. एकटाकी सुतार होता तो. तसल्या या कविता यायला लागल्यायत मायबोलीवर. कावळे, कोकीळ, उंदीर, मांजरं, मोर!

http://www.maayboli.com/node/17621

'' तीळ''

जीव घेणारा तुझ्या ओठांवरी जो तीळ आहे
दोष डोळ्यांचा,फुकाचा काळजाला पीळ आहे.

सप्तरंगी बोलपट तू,वेड तव सर्वत्र आहे
''मी'' ,कुणी बघणार नाही,तो डब्यातील रीळ आहे

मी मुळी चावट न किंतु,दर्शनी तव कोण जाणे,
का निसटते माझिया ओठांतुनी ही शीळ आहे

मी कसा मिळवू तुला? नवकोट श्रीमंती तुझी अन
मी भिकारी सदन माझे,उंदराचे बीळ आहे.

हा गुलाबी प्रेमज्वर की,पीतज्वर मुळचा तुझा हा?
प्रेम झाले की तुला '' कैलास '' ची कावीळ आहे?

डॉ.कैलास गायकवाड.

ओह माय गॉड .............

आयला !!................ देवसर आणि चक्क चोरी /डाका????? ओह नो........!!

माझा विश्वास बसत नाही आहे या वर

कावळ्या तू मस्करीतर करत नाहीयेस ना रे ?????प्लीज करू नकोस मी सहन नाही करू शकत आहे ..प्लीज !!

कावळयाचा प्रतिसाद जर चेष्टा नसेल तर ..............
धन्यवाद कावळ्या देवपूरकरान्ची चोरी उघड केलीस त्याबद्दल

अवघ्या मायबोली तर्फे शतशः आभार

-वैवकु

कावळे संतापले अन् काय लालीलाल झाले!
ज्या क्षणी त्यांना कळाले....एक मी कोकीळ आहे!!

कावळे कविता जशीच्यातशी उचलल्यामुळे लालीलाल झाले होय, मला वाटले सतीश देवपूरकर कोकीळ असल्याचे कळल्यामुळेच संतापले. काय हो सतीश देवपूरकर, याला काय उत्तर देणार तुम्ही? गायकवाड तुम्ही भरा खटला काव्यचौर्याचा. वैभ्या, बघतोस काय? दे तुझा घणाघाती प्रतिसाद. मी विटले होते या कवितांना, आता तर चोर्‍यामार्‍याच सुरू झाल्या. म्हणे कावळे लालीलाल झाले. लिटल जिमी, चल आपण घरी जाऊ, येथे गुंड जमले आहेत.

वैभ्या, बघतोस काय? दे तुझा घणाघाती प्रतिसाद>>>>>>>>>>

मोहिनीजी ; देवपूरकर सरान्नी केलेला हा प्रकार पाहून मी पुरता हवालदिल झालोय
माझे घणाघाती प्रतिसाद देण्याचे बळच सम्पले आहे जणू
क्षमस्व

मागे देवपूरकरांच्या एका 'तरही गझलेत' (येत जा देऊन थोडी कल्पना - बहुतेक) इतरांच्या तरही गझलांतील शेरांची छाप दिसल्याचे कुणी तरी नजरेस आणून दिले होते. तेव्हा मला तो योगायोग असेल किंवा अपघाती असेल, असं वाटलं होतं.
कदाचित त्यांनी डॉक.साहेबांची तशी रीतसर परवानगी किंवा त्यांना सांगून तसे लिहिले असेल... अशी मी मनाची समजूत घालून इथून पुढे प्रत्येक गझल 'बचावात्मक' पवित्र्याने वाचायचे ठरवतो.

कावळा व इतर मित्रांनो,

आपल्या सर्वांबद्दलच मनात आदर आहे. कावळा यांनी तातडीने सादर केलेली लिंकसुद्धा महत्वाची आहे, विशेषतः आंतरजालीय लेखनात जेथे एकच पान एकाचवेळी शेकडो हजारो जण वाचत असतात, अश्या ठिकाणी अधिकच महत्वाची आहे.

मात्र एक प्रामाणिक विनंती आहे. प्रोफेसर देवपूरकर यांच्यावर असे आरोप करू नयेत. त्यांना कोणाच्याही गझलेच्या जमीनीवर आपली गझल , त्या मूळ गझलकाराला न सांगता, करण्याची अजिबात गरज नाही. सांगूनसुद्धा करण्याची गरज नाही. त्यांच्या स्वतःच्या गझला वाचून आत्तापर्यंत निदान इतके तरी जाणवायला हवे होते असे मला ठामपणे वाटते. प्रोफेसरांनी आजवर स्वतःहूनच काय, पण प्रवृत्त केल्यानंतरही अपशब्द काढलेला नाही, वाटेल त्या शब्दातील टीका ऐकून घेतलेली आहे, स्वतःचा तोल ढळू दिलेला नाही, मराठी गझल क्षेत्रात ते गेले अडीच ते तीन दशकांपासून आहेत आणि एक जुने मराठी गझलकार व गझलचिंतक म्हणून जाणले जातात. प्रोफेसर साहेबांच्या पर्यायी शेरांवर आणि चर्चांवर हवी ती थट्टामस्करी करा, पण त्यांच्यावर चौर्याचा आरोप कृपया करू नयेत. कैलासरावांच्या गझलेच्या जमीनीत त्यांची ही गझल असणे हा निव्वळ योगायोग आहे हे माझे मत आहे. प्रोफेसरांना असे प्रकार करायची काहीही आवश्यकता नाही कारण ते स्वरचित गझलांनी समृद्ध गझलकार म्हणून आधीच मान्यता पावलेले आहेत.

मला त्यांची ही गझल अजिबात आवडली नाही, पण हे गझलेबाबतचे वैयक्तीक मत झाले. बाकी प्रोफेसर सतीश देवपूरकर यांच्यावर हा आरोप, जो कावळा यांच्या लिंक देण्यातून होत आहे, तो खरा असूच शकत नाही.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

डॉ. गायकवाड ह्यांनी वापरलेले काफिये - तीळ, पीळ, रीळ, शीळ, बीळ, कावीळ
प्रो. देवपूरकर ह्यांनी वापरलेले काफिये - तीळ, पीळ, शीळ, खीळ, कोकीळ, कावीळ, बीळ.

इतका कसा योगायोग असावा ?

मला कुठलाही आरोप करायचा नाही. प्रोफेसर साहेबांबद्द्ल मलाही अत्यंत आदर आहे. पण इतका योगायोग पचायला जड जातो आहे.

आज मला अतिशय दु:ख झाले आहे. हे फार दुर्दैवी आहे. योगायोगाने तरी योगायोग टळायला हवा होता.

माझ्याकडून कुठलाही अपमान झाला असल्यास मी आधीच क्षमा मागतो. पण मी व्यथित झालो आहे.

रसप, काफियांचा क्रम चकीत करणारा असला तरी गझलेत शेरांच्या क्रमाला (मतला व असल्यास मक्ता) सोडून काय महत्व असते नाही का? Happy

कुणी तरी नजरेस आणून दिले होते.>>>>>>> रणजित ; मीच तो!
____________________

बेफीजी पहिल्या प्रतिसादात जे म्हणाले ते अगदी तसेच मलाही वाटते. कावळ्याने लिन्क दिली तेन्व्हा मला का कुणास ठावुक पण टवाळी/चेष्टा वगैरे होत आहे असे वाटले मी तसे म्हणालोदेखील

पुन्हा एकदा मी स्वतः जेन्व्हा डॉ. साहेबान्च्या 'माझे लेखन' मधे जावून पहिले तर समजले की कावळा खरे बोलतोय वगैरे .मग आता रणजितने त्याच्या दुसर्‍या प्रतिसादात म्हटले आहे तशाच माझ्याही भवना झाल्या अन् मी माझा दुसरा प्रतिसाद दिला

देवपूरकरसराना विनन्ती की त्यान्नी स्वतः या मुद्द्यावर पडदा टाकावा
(असे करणे त्याना ऊचित वाटल्यासच!.......माझा .कोणताही आग्रह नाही आहे ; कृ. गै. न. )

वैवकु

चर्चा होतेच आहे तर मित्रांनो, ऐकण्या-वाचण्या किंवा कशाच्याही प्रभावाखाली न येता, अशीच एक गैरमुरद्दफ रचना मी ही काही दिवसांपुर्वी केली होती... मी माझी ही गझल मागे घेण्याचा (अप्रकाशीत) करण्याचा विचार करीत आहे ... कायमची...

काय ही साहित्यचोरी आहे?? आपले मत कृपया कळवावे ही नम्र विनंती


..................................

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी

पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे
धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी

पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे
मातीत मातलेला आवेगही तुफानी

सोसून सोसवेना गात्री अलक्ष धारा
प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी

प्राणात हूड वारे हलतेच झाड आहे
त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी
................................................ शंकर रामाणी

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
--------------------------------- मंगेश पाडगावकर

डोळ्यामधे कुणाच्या आणू नकोस पाणी
सांगू नको जगाला माझी-तुझी कहाणी..

जर न्यायचेच होते सारेच न्यायचे ना
तू वादळा कशाला ठेवायची निशाणी..

एकांत पाहुनी ती घेते रडून आता
अन् माणसांत हसते माझी व्यथा शहाणी..

समजू नकोस साधे आहेत शब्द माझे
रक्तास जाळुनी मी लिहिलीत आज गाणी..

रे 'शाम' या जगाची बदलून रीत गेली
राधा न प्रेमवेडी मीरा नसे दिवाणी..

(माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी)

,.................................................शाम

देवपूरकर सर हे एक सिद्धहस्त गझलकार आहेत. माझ्या मतल्याशी साधर्म्य असलेला मतला असणे हे निव्वळ ''खयाल टकराना '' हा प्रकार आहे. बाकी गझलेची जमीन्,काफिये ही कुणाची मक्तेदारी नसते. कुणीही कोणत्याही जमिनीत गझल करु शकतो.

त्यामुळे सरांवर चौर्यकर्माचा आरोप सर्वथा गैर आहे.

रसिकमित्रमैत्रिणिंनो!
आज कामात व्यग्र असल्याने, आता रात्री ११.३०ला नेट उघडले. सहज मायबोली गझल उघडले, अन् माझ्या “तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे” या गझलेवरील प्रतिसाद बघितले अन् चकीतच झालो! श्री. कावळे यांनी दिलेली लिंक उघडून पाहिली. सदर गझल डॉ. कैलास गायकवाड यांची वाचली. सदर गझल पोस्ट केल्याची तारीख आहे ७ जुलै २०१०. माझे मायबोलीवर आगमन झाले २० आठवडे व ४ दिवसांपूर्वी. आपण माझे सदस्यत्व मधे जावून तपासू शकता.
मी डॉक्टर साहेबांची ही गझल आता प्रतिसाद देताना पहिलयांदा वाचत आहे.

मला डॉक्टर साहेबांना नम्रपणे विचारावेसे वाटते की, त्यांनी साधारणपणे ही गझल कधी लिहिली? पोस्ट केल्याची तारीख वर दिल्याप्रमाणे आहे.
समस्त मायबोलीकरांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, ही माझी गझल मी दिनांक १० जानेवारी १९९५ रोजी लिहिली आहे, जी परवा मी मायबोलीवर टाकली. सुदैवाने या गझलेच्या खाली माझ्या गझलेच्या डायरीत तारीख नोंदवलेली आहे, ती आहे १०-०१-१९९५, व खाली माझी सही आहे. दुर्दैवाने ही गझल मी स्वत:च बाजूस सारली असल्याने, ती कुठेही प्रसिद्ध झालेली नाही, अन्यथा मी कात्रणच मायबोलीवर टाकू शकलो असतो. माझा scanner बिघडला आहे, नाही तर मी माझ्या डायरीचे ते हस्तलिखित पानच scan करून मायबोलीवर टाकू शकलो असतो. तरीही ज्या कुणाला खातरजमा करून घ्यायची असेल, त्याने खुशाल या पामराकडे यावे व स्वत:च्या डोळ्यांनी माझ्या डायरीतील माझ्या हस्ताक्षरातील ही गझल पहावी, तिच्याखालील तारीख व माझी सही पहावी. अनेक मुशाय-यांत व खाजगी सभांमधून ही गझल मी पेश देखिल केली आहे. मी मुशाय-यात नेहमी ताज्या व नवीन लिहिलेल्या गझलाच वाचतो. किती टाळ्या मिळतील, किती वाहवा होईल, याची मी कधीच फिकीर करत नाही, व त्या गोष्टीला मी तशी फार किंमत देखिल देत नाही. असो.

आता अनेक प्रतिसादकांनी तोडलेल्या ता-यांविषयी थोडेसे..........

डाका काय? चोरी काय? तारेच तोडले आहेत की!

मला एक विचारावेसे वाटते की, काफियांवर, रदीफांवर, प्रतिकांवर कुणाची मालकी असते काय हो?

प्रतिमा, खयाल हे स्पर्शून जावू शकत नाही का?

तसेही जर माझ्या व डॉक्टरसाहेबांच्या प्रत्येक शेराची तुलनाच केली तर, आपणास आमच्या दोघांच्या पिंडामधील फरक नक्कीच जाणवेल, जर उघड्या डोळ्यांनी वाचले तर!

अनेकांचा सात्विक संताप, कळवळा, उमाळा, गझलप्रेम, उचंबळ, हतबलता, गलितगात्रता पाहून मी तर अवाकच झालो आहे!

खटले काय? चोरी काय? घणाघाती प्रतिसाद काय? चो-यामा-या काय? सगळेच थक्क करणारे आहे.

कुणी कुणी तर गलितगात्र, हतबल, हताश झालेला दिसतो आहे!

तेच काफिये, तोच रदीफ वापरून अभिव्यक्त व्हायला काय परवाना घ्यायला लागतो कुणाचा?

प्रत्येकाचा पिंड वेगळा! शब्दकळा वेगळी! शैली वेगळी! धाटणी वेगळी! जीवनस्तर वेगळा! मानसिकता वेगळी! खयाल वेगळा!

काफियांचे, रदीफांचे, शब्दांचे, प्रतिमांचे, वृत्ताचे, जमिनीचे काय कुणी पेटंट घेतलेले असते काय?

कुठे चार दोन वा सर्व काफिये समान असले म्हणजे ती काय चोरी होते काय?

अनेक जण तर व्यथित, उद्विग्न झालेले दिसतात, घायाळ, रक्तबंबाळ झालेले दिसत आहेत! असो.

आपण तरही गझल तरी कशाला लिहितो? एकप्रकारचेच काफिये, एकच रदीफ, एकच वृत्त घेवून अनेक जण आपापल्या पिंडानुसार अभिव्यक्त होतात. तेच शब्द, तेच वृत्त पण किती नाना त-हेचे खयाल आपणास पहायला मिळतात! ती काय चोरी असते काय?

काव्य हे काही शब्दात नसते. ते कवीच्या हृदयात असते. तो गझलकाराच्या आत्म्याचा उद्गार असतो! गझलकाराचे व्यक्तीत्व त्या शब्दांना चिकटलेले असते, व त्यामुळे प्रत्येकाच्या शेराचा बाज हा वेगळा असतो. आपल्या गझलेवर आपली छाप, आपली मोहर ही उमटतेच! आपली शब्दकळा, आपला बाज, आपला डौल शेवटी आपलाच असतो, मग तो भले कसाही असो! प्रत्येक शायर शेवटी आपली मोहर, आपला ठसा हा प्रयात्नांती उमटवतोच! आपली एक ओळख निर्माण करतो.
काव्य लिहिणे म्हणजे काही एकाने म्हटलेले गाणे दुस-याने taperecorder सारखे म्हणणे नव्हे! सच्चा गझलकाराचा प्रवास हा बाहेरून आत असा असतो. त्यालाच तो शोधत असतो. तो एक आत्मशोध, अंतीम सत्याचा शोध असतो.
शब्द, काफिये, रदीफ, प्रतिमा, प्रतिके, ही फक्त माध्यमे असतात,साधने असतात, साध्य नव्हे. शेवटी शब्दांनी व शायराने बाजूस व्हायचे असते व अर्थांच्या तरंगांनी, सत्याच्या उद्गारांनी निनादत रहायचे असते. म्हणूनच कामयाब गझला, कामयाब शेर आपणास परत परत वाचावेसे वाटतात, ते आपल्याला अस्वस्थ करतात, ते आपल्या ओठांवर रेंगाळतात, ते आपल्या कायमचे स्मरणात, काळजात रहातात.

अन्यथा आहो डिक्शन-या हातात घेवून गाळलेल्या जागा भरल्यासारख्या अनेक गझला पाडता आल्या असत्या की, खरे आहे ना?

डिक्शनरीलाही तिच्या तिच्या मर्यादा असतात. शब्दांचे सर्वच अर्थ डिक्शनरीत नसतात. आपण त्या शब्दांचा वापर कसा करतो, त्यावर त्या शब्दांना एक वेगळा अर्थ प्राप्त होत असतो! म्हणूनच शब्दब्रम्ह असे म्हणतात. शब्दांवर सखोल चिंतन करणे आवश्यक असते. ती एक न संपणारी अघोरी तपस्या, साधना आहे, असे मी म्हणेन, जी कुठल्याही सहृदयी रसिकाला, कवीला, गझलकाराला प्रयत्नांती साध्य होते. त्या करता हवी सबूरी!

मला जे समजले ते लिहिले. पटले तर घ्यावे!
डॉक्टर साहेब, भूषणराव! माझ्यावर दाखवलेल्या श्रद्धेबद्दल, विश्वासाबद्दल अनेक धन्यवाद!
..........प्रा.सतीश देवपूरकर
...........................................................................................

एक गोष्ट इथे मला आवर्जून सांगाविशी वाटते.

काफिये एकसारखे असणे म्हणजे काव्यचौर्य नव्हे. आणि देवपूरकर सर स्वतः इतके शब्द समृद्ध आहेत की त्यांच्याकडून आपण (किमान मी तरी ) खूप काही शिकण्यासारखे आहे.
आपण इथे तरहीचे किती उपक्रम राबवले आहेत. त्यातही जितक्या लोकांनी भाग घेतला त्यांनी काय इतरांच्या गझलेतले काफिये वापरले नाहीत का? नक्कीच वापरलेत. किंबहुना,मतला नक्की झाल्यावर त्याला साजेसे कफियेच आधी आपण निवडतो. आणि त्यानुसार शेरांची बांधणि होते. मग काफिये एकसारखे आले तर यात नवल काय? मुळात कुठलीच गोष्ट ही ओरिजिनल नसते. ती कशावरुन तरी प्रेरीत झालेलीच असते.

वरती श्याम नी जे साधर्म्य दाखवून दिले आहे त्याच काफियांमध्ये माझीही एक गझल आहे.. कहाणी, गाणी, वाणी, राणी, विराणी ई. पण म्हणून ते काव्य चौर्य होत नाही. खयाल वेगळे आहेत, शेरांची बांधणी वेगळी आहे. जसेच्या तसे लिहिले असेल तर नक्कीच चोरी होते. पण देवपूरकर सरांच्या बाबतीत ते ही शक्य नाहीये कारण त्यांचेच काव्य चोरीला जाण्याची शक्यता जास्त आहे.. तेव्हा इतर वेळी मस्करी खेचाखेची ठीक आहे.. पण इतका गंभीर आरोप करतना हजारवेळा विचार करायला हवा होता..
असो.. माझ्या दृष्टीने ही चोरी नाहीये..मी अजूनही देवपूरकर सरांच्या गझलांची तितकीच चाहती आहे..

-प्राजु

सर्वना धन्यवाद !! विशेषतः देवसराना (मी कोणताही आग्रह न करता देखील त्यान्नी स्वतः या वादावर पडदा टाकून माझ्या म्हणण्याला एकप्रकारे मानच दिलाय)
________________________________________
मुळात वाद सुरूच व्ह्यायला नको होता.
तो व्हावा म्हणून निदान मी तरी ते प्रतिसाद दिले नव्हते
माझ्या मते देवसरान्च्या रचनेवर काहीनकाही अच़कट प्रतिसाद देणे हा जणू काही एक रूटीनचा भाग झाल्यागत मी माझे ते प्रतिसाद देवून बसलो आहे !!

( त्यातही मी २ ओळीन्कडे आपले लक्ष वेधू इच्छितो
<<<<<<<<<<,कावळ्या तू मस्करीतर करत नाहीयेस ना रे ?????प्लीज करू नकोस मी सहन नाही करू शकत आहे ..प्लीज !!
<<<<<<<<<<कावळयाचा प्रतिसाद जर चेष्टा नसेल तर ..............)
____________________________________________________-
वादाचा ट्रिगर ३ जागी लपलेला आहे
१-कावळा यान्नी दिलेली पहिली लिन्क
२-माझे चोरी/डाका हे शब्द
३-मी माबोतर्फे कावळा यान्चे मानलेले आभार ..इ.
यातील ३ पैकी २ थेट माझ्याशी सम्बन्धित आहेत त्यामुळे मी माझी जबाबदारी स्वीकारून सर्वान्ची माफी मागतो विशेषतः देवसरान्ची
___________________________________________________

देवसरानी दिलेले दोन मुद्दे मला अभ्यासावे असे वाटतात
१)काव्य हे काही शब्दात नसते. ते कवीच्या हृदयात असते. तो गझलकाराच्या आत्म्याचा उद्गार असतो! गझलकाराचे व्यक्तीत्व त्या शब्दांना चिकटलेले असते, व त्यामुळे प्रत्येकाच्या शेराचा बाज हा वेगळा असतो.

२)डिक्शनरीलाही तिच्या तिच्या मर्यादा असतात. शब्दब्रम्ह असे म्हणतात. शब्दांचे सर्वच अर्थ डिक्शनरीत नसतात. आपण त्या शब्दांचा वापर कसा करतो, त्यावर त्या शब्दांना एक वेगळा अर्थ प्राप्त होत असतो! म्हणूनच

धन्यवाद सर हे लिहिलेत त्याबद्दल
माझे काव्य समजून घेण्यात हे मुद्दे मला महत्त्वाचे वाटले

वैभ्याला आत्ता अक्कल आली, आता मोठा होऊ पाहतोय माफी मागून. देवपूरकर २०१० नंतर जे लेखन केलं आहेत तेवढंच देत चला इथे. अख्ख्या विसाव्या शतकातल्या कविता इथे पेस्ट करत राहिलात तर तुम्हालाच समजायचं नाही की आपण काय करतोय. आता करा पाहू गेंडा रानगवा आणि मगर या प्राण्यांवरची कविता?

देवपूरकर २०१० नंतर जे लेखन केलं आहेत तेवढंच देत चला इथे. अख्ख्या विसाव्या शतकातल्या कविता इथे पेस्ट करत राहिलात तर तुम्हालाच समजायचं नाही की आपण काय करतोय. >>>>>>

मी तर म्हणतो त्यान्नी एखादा गझलसन्ग्रह प्रकाशित करून (एव्हाना झाला नसेल तर ) 'एकजथ्था' पद्धतीने सर्वच गझला एकदाच काय त्या आम्हाला वाचनाकरिता उपलब्ध कराव्यात
त्यानन्तर सुचलेल्या गझलाच इथे पेश कराव्यात
म्हणजे नव्या -जुन्या सगळ्याच आम्हाला वाचायला मिळतील

टीप : आर्थिक परिस्थिती नसलेल्या माझ्यासारख्या चाहत्याना त्या सन्ग्रहाच्या प्रती फु़कट वाटण्यात याव्यात अशी मी हक्काची मागणी करत आहे !!!!;)

एका चांगल्या 'नोट'वर प्रकरण मिटत असलेलं पाहून आनंद वाटला.
माझ्या कुठल्याही वक्तव्याने कुणाला काही त्रास झाल्या असल्यास मी क्षमा मागतो !

लगे हाथ, मीही एक विनंती करतो देवसरांना की..... स्वाक्षरीमध्ये एक ओळ अजून जोडून 'दिनांक'सुद्धा टाकावा. नेमका माहित नसल्यास अंदाजे तरी (वर्ष, इसवी सन, शके.... काहीही) टाकावा. Happy

Pages