वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

माझे आईवडील गावातल्या हायस्कूलवर नोकरी करायचे. एक नात्याने लांबचे पण मनाने जवळचे काका काकू पण त्याच शाळेत नोकरी करायचे. त्यांची मुलं मी आणि माझा धाकटा भाऊ, आमच्याच आगेमागेच्या वयाची. तेव्हा दर शनवार रविवार आम्ही तरी काकांकडे नाहीतर दोघं चुलत भावंडं आमच्याकडे मुक्काम टाकून उनाडत असायची. डोंगरावर जाऊन दिवस दिवस उन्हातान्हात फिरून कैर्‍या काजू खात बसा वगैरे सुटीचे उद्योग, तर एरवी आम्ही चौघंजणं शेजारच्या पोरांना गोळा करून क्रिकेट, लगोर्‍या वगैरे खेळायचो.

गावात एकूण वातावरण बर्‍यापैकी जुन्या पद्धतीचं. गावातले अनेक पुरुष मुंबईत किंवा बोटीवर नोकर्‍या करायचे आणि त्यांच्या बायका हिंमतीने घरं चालवायच्या, शेती करायच्या आणि मुलांवर आणि गुराढोरांवर पण लक्ष ठेवायच्या. गावात एक पटवर्धन आजी होत्या. त्या कीर्तन करायच्या म्हणून त्यांना लोक "बुवा" म्हणायचे. त्या खर्‍या मुंबईतल्या पण पटवर्धन आजोबा रिटायर होऊन गावाला आले तशा आजी पण त्यांच्याबरोबर आल्या. आणखी एक गोरे बाई होत्या. त्या खूप श्रीमंत. पण सासरी त्यांचं पटलं नाही म्हणून घटस्फोट झाला होता. आणखी एक अलका म्हणून घटस्फोट झालेली बाई होती, ती तर वडाची पूजा वगैरे पण करायची. सगळे प्रकार होते, पण आम्हाला त्यात काही विशेष वाटायचं नाही. स्त्रीमुक्ती वगैरे शब्द तर कधी कानावर पण आले नव्हते.

ही पार्श्वभूमी का सांगतेय तर वासंती भाटकरची चित्तरकथा सांगण्यासाठी. आम्ही नेहमी काकांकडे रहायला जायचो, तेव्हा एकदा एक साधारण आमच्याच वयाची मुलगी घासलेली भांडी काकूच्या स्वयंपाकघरात ठेवून पटकन आमच्याबरोबर खेळायला आली. बहिणीने सांगितलं ती "आशी" म्हणजे आशा. मग हळूहळू कळलं की आशाची आई वासंती भाटकर काकूकडे घरकाम करायला यायची. आशाला आणखी तीन भावंडं होती. मोठा पक्या, नंतर कुंदा, नंतर आशा आणि मग पिंट्या. या पोरांचा बाप वसंता भाटकर. तो एक स्पेशल नग होता. ही मंडळी रस्त्यापलीकडे काही अंतरावर रहायची. काकूकडे जाताना त्यांचं केंबळी घर दिसायचं.

वसंता भाटकर नावापुरती एका गलबतावर खलाशाची नोकरी करायचा. ती नोकरी बहुधा ६-८ महिने असावी. मग उरलेल्या वेळात वसंता घरी असायचा. घरी म्हणजे काय गुत्त्यात. वसंता अट्टल दारुड्या होता. गावठी प्यायचा. शुद्धीवर आला की परत गुत्त्याची वाट धरायचा. वासंतीचं आयुष्य इतर गरीब बायकांसारखंचं कमी अधिक प्रमाणात चाललेलं. दोन तीन घरची धुणी भांडी करून किडूकमिडूक जोडत होती. काकूचा तिला बराच आधार होता. वासंतीची मुलं पास-नापास होतं थोडंफार शिकत होती. जरा वेगळेपण म्हणजे वसंता पिऊन आला की वासंतीला भरपूर मारायचा. नाहीतर दारूला पैसे हवेत म्हणून मारायचा. शेजारचे लोक बघत असायचे. त्याना तरी दुसरी करमणूक काय? वासंतीला जास्तच मार पडला की कुंदा नाहीतर आशा काकूकडे कामाला यायच्या. बहुतेकवेळा संध्याकाळी कोणतरी पोरं सांगत यायची वसंता पिऊन कुठेतरी पडलाय म्हणून. मग वासंती आणि तिची पोरं शिव्याशाप देत त्याला कशीबशी घरी आणायची.

हे नेहमीचं झाल्यानंतर हळूहळू कही बदल व्हायला लागले. म्हणजे वसंताची तब्ब्येत उतरत चालली. एकदा वसंता वासंतीला मारता मारता पक्याने कंटाळून त्याला ढकलून दिलं आणि तो पडला. मग यांच्या लक्षात आलं की आता वसंताला घाबरायचं कारण नाही. मग हळूहळू कधीतरी वसंताला ढकलून गप्प बसवणं नेहमीचं झालं. रस्त्यात पडला तर पोरं त्याला ढकलत घरी आणून टाकायला लागली. पोरं नाहीतर वासंती कधीतरी वसंतावर हात उचलायला लागली. शेजार्‍यांना तीही करमणूक झाली. पावसाळा संपला की वसंता गलबतावर कामाला जायचा. मग वासंतीला जरा शांतता मिळायची.

अशीच वर्षं चालली होती. दरम्यान आणीबाणी येऊन गेली. जनता पार्टीचं सरकार येऊन गेलं. गावात बर्‍याच जणांकडे रेडिओ आले. साखरतरवर पूल झाला. रत्नागिरीला थेट बस सुरू झाल्या. मग काका काकू मुलांच्या शिक्षणासाठी रत्नागिरीला जाऊन राहिले. आमच्याही आयुष्यात बरेच बदल झाले. आणि आम्ही पण रत्नागिरीला रहायला गेलो. तरी आई आणि काका काकू बसणीला रोज नोकरीसाठी जायचे त्यामुळे गावात काय चालू आहे याच्या बातम्या मिळायच्या. अशीच आणखी काही वर्षं गेली. आमची कॉलेज शिक्षणं संपली. नोकर्‍या वगैरे सुरू झाल्या. बसणीतले पटवर्धन आजोबा गेले. आणखी काही लोक गेले. अशीच एकदा बातमी मिळाली की वसंता भाटकर पण दारू पिऊन मरून गेला. जरा हळहळ वाटली.

आता वसंती काय करत असेल? काकू रत्नागिरीत रहायला आली आता तिला कोणाचा आधार असेल? मग हळूहळू वासंती भाटकर मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी मागे राहून गेली. एकदा कुणाच्या तरी मंगळागौरीसाठी बसणीला जायचा योग आला. काका काकू पूर्वी रहायचे तिथेच शेजारी माझ्या वर्गातली सख्खी मैत्रीण रहायची. बसणीला गेलेच होते तर तिच्याकडे पण गेले. जाताना वाटेत वासंतीचं घर होतं तिथे एक चांगलं कौलारू रंगीत घर दिसलं. जरा चुटपुट लागली. नवरा मेल्यावर वासंती देशोधडीला लागली की काय? त्या घरात आता कोण रहात होतं? मैत्रिणीकडे चौकशी केली. तर ती हसायला लागली.

"अग, ते वासंतीचं घर आहे."

"म्हणजे? वसंता मेल्यावर त्यांची परिस्थिती एकदम सुधारली की काय?"

"हो. तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं की वसंता मेला. वासंतीच्या दोन कामांवर त्यांचं काही भागेना. पक्याची शाळा दहावीत संपली. मग काय! वासंतीने हातभट्टीची गाळायचा धंदा सुरू केला! गावातले बाकी गुत्ते पार बसले."

मी थक्कच झाले. नवर्‍याच्या पाठीमागे हिंमतीने मुलांना शिकवल्याच्या वगैरे कहाण्या आपण खूप ऐकतो. पण ज्या दारूने नवर्‍याचा बळी घेतला, तिचाच धंदा करून पैसे कमवायचे आणि त्या धंद्यातल्या आधीच्या लोकांना घरी बसवायचं हे प्रकरण जबरदस्तच! अशा प्रकारे वसंती भाटकर यशस्वी उद्योजक झाली आणि तिच्यापुरती बसणीत झाली एकदाची स्त्रीमुक्ती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्योती, आठवण छान लिहिलीयस.
बाकी यातून स्त्री मुक्ती वैगेरे काही झाली नाही. Wink
वासंतीने पैसे कमावण्याचा तिला जमणारा सोप्यात सोपा मार्ग शोधला.
आणखी अनेक स्त्रीयाम्ची आयुष्ये बरबाद करण्यास हातभार लावला.

साती, खरं आहे. ही सत्यघटना आहे. पात्रांची नावे पण बदलली नाहीत! वासंतीने आपल्यापुरता रस्ता शोधला. पण तिच्यामुळे आणखी बायका नवर्‍यांचा मार खायला लागल्या असतील. दारू कोणीतरी विकली असतीच, ती वासंतीने विकली एवढंच!

एक किस्सा म्हणून छान आहे.
वासंती भाटकरचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्या गावातील इतर दारुड्यांच्या बायकांनी पण हातभट्टी नाही लावली ना.

तिच्यामुळे आणखी बायका नवर्‍यांचा मार खायला लागल्या असतील >>> तिच्यामुळे???!!!!
पुरुष पूर्ण शुद्धीत, स्वतःचे पैसे खर्च करून तिच्याकडे दारू प्यायला आला, आणि इतका प्यायला की नंतर घरी जाऊन स्वतःच्या बायकोला बदडले तर हे सगळं वासंतीमुळे!! पण ह्याच पुरुषाने पूर्ण शुद्धीत दुकानात जाऊन बायकोसाठी पाटी पेन्सील आणली तर तो सुधारक. की पाटी पेन्सील चा दुकानदार तिथे शिक्षणमहर्षी ??

दारू कोणीतरी विकली असतीच, ती वासंतीने विकली एवढंच!>> इतक सोप्पा असत खेड्यातल जीवन ?? हा 'कोणीतरी' जो असतो त्याला किती 'जुगाड' करावे लागतात कारण खेड्यात इतर कोणताही व्यवसाय तग धरणे म्हणजे कष्ट असतात. दारू मध्ये झटपट आणि बर्यापैकी पैसा मिळतो म्हणून तिथे भरपूर पोवरप्ले चालतो. तिथे एका बाईने व्ययसाय करण स्त्री मुक्ती नाही पण निश्चित खूप धाडसाचे आहे....

सिमन्तिनी, ही घटना घडली १९८५ च्या आसपास. आमच्या गावातली परिस्थिती मी लिहिलीच आहे. मला इथे फक्त एक जगावेगळी गोष्ट सांगायची होती. मी स्त्रीमुक्तीबद्दल वगैरे काही टिप्पणी करत नाहिये.

ती वासंती बिचारी ४ पोरं पदरात. तीही शिकायला बरी नव्हत अशी. कोणाचा आधार नाही. पैसा नाही.फक्त दारूशीच संबंध आलेला. अशा वेळी दुसरं काही करता येणार नाही, त्यामुळे दारू गाळण्याकडे वळली असावी. यात अंतर्विरोध बघा. इतकी वर्षं ती मार खात होती आणि दारू विकणार्‍यांबरोबर तिची भांडणं झालेली आम्हाला माहिती होती, आता ती स्वतःच दुसर्‍या बाजूला होती, आणि कदाचित दुसर्‍या काही बायका तिला शिव्या शाप देतही असतील.

दारू कोणीतरी विकली असतीच, नव्हे विकत होतेच! पण त्यांचं दुकान जरा लांब होतं तर हिने अगदी वस्तीत दारू गाळायला सुरू केलं आणि त्या धंद्यात जम बसवला! तिला काय म्हणावं कळत नाही. एकीकडे दया पण येते, एकीकडे दारू विकते म्हणून राग पण येतो.

सिमन्तिनी,
मी बसणी गावात काम केलंय. माझ्या पी एच सी चं सबसेंटर होतं ते. आठवड्यातून एकदा ओ पीडी चालवत असे मी तिथे.

' बाकी पाटी पेन्सिल विकणारा शिक्षणमहर्षी?' हे आवडलं . Happy

>>तिला काय म्हणावं कळत नाही. एकीकडे दया पण येते, एकीकडे दारू विकते म्हणून राग पण येतो >> वासंतीचा राग करुन तरी काय? तिचा संसार सावरायची तिच्या परीने तिने शिकस्त केली.

गोष्ट म्हणुन आवडली. जगण्याची धडपड मिळेल , जमेल त्या मार्गाने प्रत्येक जण करतच असतो. विनाकारण नावात स्त्री-मुक्तीचे शेपूट जोडल्याने गैरसमज होतायेत.

डेलिया ++१

रच्याकाने, मी माझ्या लहानपणी आजीबरोबर बसणीला उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचे. तिथे आजीचे माहेर होते. "बसणी" नाव वाचून त्या सगळ्या सुट्ट्या आठवल्या Happy

साती, दिनेशदा, विजय आंग्रे, सीमन्तिनी, इब्लिस, मामी, सायो, शैलजा, डेलिया, अनुडॉन आणि मी नताशा, सर्वांना धन्यवाद!
काहीजणांना लेखाच्या नावातले "स्त्रीमुक्ती" हे शब्द आवडले नाहीत. पण ते जरा उपरोधाने लिहिले होते. तरी बहुमत असेल तर शीर्षक बदलायला माझी हरकत नाही!

हो, ज्योतीताई ते उपरोधानेच लिहिलं आहे असंच प्रतीत होत होतं आणि कळालं होतं. दुपारीच लिहिणार होते मी तसं पण कामापुढे राहून गेलं. काही चूक नव्हती शीर्षकात.

पण ते जरा उपरोधाने लिहिले होते. >> हे इथल्या सर्व वाचकांच्या ध्यानात आले आहेच. आणि म्हणुनच गोष्ट चांगली असूनही तिच्या कन्टेन्ट ला कमी महत्व देऊन या दोन शब्दांवरच तुम्हाला उलट सुलट प्रतिक्रिया जास्त मिळाल्या आहेत.
बाकी ह्यात तुम्हाला 'उपरोधिक' का लिहावेसे वाटले हे ( अंदाज आहेच ) पण अजुन तुमच्याच शब्दात स्प्ष्ट करून लिहीलेत , तर त्यावर अजुन भरपूर प्रतिसाद मिळतील हे नक्की.

मला तरी या गोष्टीचा आणि स्त्री मुक्तिचा दूर दूर पर्यंत संबंध दिसत नाही. फक्त कथानायिका ही स्त्री आहे , कथेत नायका एवेजी नायिका आण्ली आणि तिने संघर्ष , कष्ट करून पैसे मिळवले की लगेच 'स्त्री मुक्ति' असे वाटते की काय?

जर कोणाला हे बसणी गाव माहित असेल तर ह्या वासंती बाईंची मुलाखत घ्यायला पाहिजे. उपरोधाने नाही म्हणत आहे मी तर उत्सुकतेने. ही स्त्री मुक्ती नाही पण वासंती मुक्त स्त्री कशी झाली ह्याचा हा प्रवास अगदी प्रत्येक स्तरावर - मानसिक, सामाजिक, आर्थिक - खूप वेगळा असेल. चांगला कि वांगला हे पुढच ...आधी कोणीतरी हा प्रवास समजून घेतला पाहिजे.

डेलिया, Happy धन्यवाद! मला खरे तर माझ्या लेखावर स्वतः प्रतिक्रिया द्यायला फार आवडत नाही. पण पण काही गोष्टी आणखी लिहायला हव्या होत्या, त्या आता लिहिते.

वासंतीच्या बाबतीत स्त्रीमुक्ती झाली का? अजिबात नाही. तिने फक्त आपल्या परिस्थितीतून जमेल तसा मार्ग काढला. एक लक्षात घ्या, की ही घटना १९८५ च्या आसापास घडलेली. तेव्हा घरकाम करून महिन्याचे ५० रुपये वगैरे मिळत असत! आणि ते गाव इतकं लहान आहे की ४/५ घरं सोडता इतर कोणाकडे घरकाम मिळण्याची शक्यता नव्हती. शेतमजुरी कधी केलेली नाही. त्यामुळे वासंतीने हा सर्वात सोपा पैसे मिळण्याचा मार्ग निवडला असावा. हा माझा अंदाज.

स्त्रीमुक्ती म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित झाला तर माझं उत्तर असेल की स्त्री आर्थिक, मानसिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, सबल झाली पाहिजे आणि स्वतःचे निर्णय तिला जाणीवपूर्वक घेता आले पाहिजेत. वासंतीच्या बाबतीत यापैकी काय घडलं? ती आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली, नवरा मरून गेल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची संधी तिला मिळाली इतकंच. पण हे सगळं तिने जाणीवपूर्वक केलं असं मला वाटत नाही. काहीसं प्रवाहपतित असं तिचं वागणं होतं.

तिच्या नवर्‍याला ज्यांची दारू वर्षानुवर्षे पिऊन मरण आलं आणि ज्यांच्यामुळे वासंतीला आयुष्यभर त्रास झाला त्या दारू विकणार्‍यांवर तिने एकप्रकारे सूड उगवला. पण हे करताना तिने जो मार्ग स्वीकारला त्यामुळे कदाचित आणखी काही स्त्रियांचे शिव्याशाप तिला खावे लागले असतील. मी तिच्याकडे नायिका किंवा खलनायिका म्हणून बघत नाही. तर एक माणूस म्हणून बघते. तिला जो रस्ता सगळ्यात सोपा दिसला, तो तिने पकडला.

२५-३० वर्षांपूर्वी जगापासून तुटलेल्या एका खेडेगावात स्त्रीमुक्ती वगैरे शब्द कानावर येणं शक्यच नव्हतं. आणि तिथल्या इतर स्त्रियांबद्दल मी लिहिलंय, त्यातही घटस्फोट झाल्यानंतर वडाची पूजा करणारी अलका पण होती. ही तिथली परिस्थिती. गुवाहाटीमधे एका मुलीवर दुर्दैवी हल्ला झाला त्याबद्दल आणखी एकीकडे झालेल्या चर्चेत स्त्रीमुक्तीमधे दारू प्यायचे स्वातंत्र्य असले पाहिजे वगैरे विचार ऐकून मी थक्क झाले होते. माझ्यासाठी तरी ही स्त्रीमुक्ती नाही. मग मनात असा विचार आला की दारू प्यायचं स्वातंत्र्य म्हणजे स्त्रीमुक्ती असेल तर दारू विकणारी वासंती म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याची अगदी प्रतीकच झाली की!

माझ्या लेखाला हा उपरोधाचा संदर्भ होता, तो मी लेखात पूर्णपणे लिहिला नाही हे कबूल करतेच. पण त्याचवेळी तुम्हाला ही विनंती की ही वासंतीची चित्तरकथा म्हणूनच प्लीज या लेखाकडे बघा!

सीमंतिनी, वासंती मला आठवते ती १९७५ च्या आसपास चाळिशीतली. त्यालाही आता सुमारे ३५ वर्षे झाली. आता ती आहे का तेही माहिती नाही. पण जेव्हा कधी तिकडे जाईन, तेव्हा नक्कीच ती असेल तर तिला भेटून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करीन!

सर्वांना पुन्हा धन्यवाद!