विषय क्र.१: आमच्या टीनएजमधला रहमान

Submitted by नताशा on 15 August, 2012 - 16:44

१५ ऑगस्ट १९९२. दक्षिणेकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला "रोजा" अन त्याबरोबरच नशीब उजळलं भारतातल्या तमाम संगितप्रेमींचं. दक्षिणेत सुरु झालेलं ए आर रहमान नावाचं वादळ हळूहळू सार्‍या देशात पसरलं आणि बॉलिवुड चित्रपटसंगीत पार बदललंच. आज रहमानच्या चित्रपटसृष्टीतल्या आगमनाला बरोबर वीस वर्षं पूर्ण झाली.

ज्या काळात "चढ गया उपर रे", "पायलिया हो हो हो","वो तो है अलबेला" इ.इ. गाणी "चार्टबस्टर्स" होती त्या काळात आमच्यासारख्या दहा वर्षाच्या पोराटोरांनाही त्यातला अन "दिल है छोटासा" मधला फरक सुस्पष्ट कळला अन हे काहीतरी फार चांगलं आणि वेगळंच आहे हे ही आपोआपच कळलं.
घरच्यांनीही हो-नाही न म्हणता घेऊन दिलेली ही पहिलीच कॅसेट असावी. ए आर रहमान हे नाव डोक्यात पक्कं बसलं. त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता. तसं वयही नव्हतं अन मुख्य म्हणजे गरजही नव्हती.
काही महिन्यानंतर हिंदीत ए आर रहमान आला तो "दुनिया दिलवालों की" या डब केलेल्या गाण्यांमधून. "मुस्तफा मुस्तफा" हे कॉलेज मध्ये जाणार्‍यांचं अगदी फेवरेट होतं. पण ही गाणी फार हिट नसल्याने कॅसेट मिळाली नाही. Happy
बाबांच्या नोकरीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावात अन बर्‍यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणात रहात असल्याचा फायदा म्हणजे आम्हाला नेहमीच साउथइंडियन मित्र्-मैत्रिणी असायचे. हा फायदा अशासाठी की या पोरांकडे नेहमीच रहमानचे लेटेस्ट म्युजिक असायचं. म्हणजे हिंदीत येण्याआधीच आम्हाला ते कळायचं. साधारण ९४ साली तामीळमध्ये रहमानचा "कादलन" आला अन आमच्या मित्रमंडळाच्या कृपेने आम्ही येताजाता "मुक्काला मुकाबला" अन "उर्वसी उर्वसी" (जसं ऐकु येईल तसं) जोरजोरात ओरडू लागलो. काही पोरं त्यावर प्रभुदेवा स्टाइल नाचूनही बघायची. Happy असं असलं तरी तामीळ कॅसेट घ्यायला घरातनं परवानगी नसल्याने या गाण्यांची कॅसेट घरात यायला "हमसे है मुकाबला" हा भयंकर सिनेमा हिंदीत यावा लागला. त्यातलं उर्वसी उर्वसी हे गाणं ऐकून घरच्यांनी डोक्याला हात मारला. या गाण्याला काही अर्थ तरी आहे का, हा कसला गायक कोकलतोय अन हिरो माकडासारखा डान्स करतोय अन ही असली आचरट गाणी काय ऐकायची वगैरे तमाम आयांचं (रीड: सनातनी मंडळी) मत पडलं. हो, "बगल सीट पे बुढ्ढी हो तो टेक इट इझी उर्वसी" हे लॉजिक त्या काळात पचणं शक्यच नव्हतं. गाणं म्हणजे कसं हळूवार प्रेमभावना नाहीतर दणादण देशभक्तीपर भांगडे नाहीतर उथळ कॅबरे/डिस्को वगैरे ओके होतं पण गाण्यात बुढ्ढी???:फिदी: तेव्हा आम्ही ठरवले, रहमानची गाणी तामिळमध्येच ऐकलेली बरी Wink इकडे सनातन्यांचा उर्वसीचा विरोध सुरु असेपर्यंतच आला "द जेंटलमन". चित्राच्या किनर्‍या आवाजातलं "रुप सुहाना लगता है" खरोखरच उर्वशी पेक्षा आवडायला लागलं.

खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो. म्हणजे आता पुढचा सिनेमा हिंदीतला येणार का "थिरुडा थिरुडा" हिंदीत येणार वगैरे. यथावकाश तो "थिरुडा थिरुडा" हिंदीत "चोर चोर" बनून आला पण त्यात काही फारशी मजा आली नाही.

९६ च्या मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या हंगामात आला "बॉम्बे". माझ्या मते हिंदीत रहमानला खरोखरच सिद्ध केलं ते बॉम्बेनेच. तोपर्यंत lyrics प्रेमी (रीड: सनातनी) जनतेसाठी "रहमान म्हणजे उथळ, काहीही अर्थ नसलेली गाणी देणारा संगीतकार, कधीतरी बरी असतात त्याची गाणी बाकी नुसताच गोंधळ" वगैरे वगैरे होता. "थीम ऑफ बॉम्बे" नी फिल्मी संगीताला शब्द असलेच पाहिजे हा समज पुसून टाकला. "तू ही रे" नी कुणालाच रहमानच्या टॅलेंटविषयी शंका ठेवली नाही. पण अर्थपूर्ण शब्द असले की रहमानची गाणी किती आर्त, व्याकुळ करतात ते आमच्यासारख्या "रहमानच्या संगीताला शब्दाची काय गरज?" सारख्या लोकांना जाणवलं. (अर्थात तेव्हा आर्त, व्याकुळ वगैरे शब्द डोक्यात येत नव्हते Wink पण impact जाणवत होता). नंतर आलेल्या "सपने" मुळे तर ते अधिकच जाणवलं. "स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.

रहमानच्या संगीताला न्याय देणारा त्याच्या तोडीचा गीतकार त्याला मिळायला जरा उशीरच लागला. त्यासाठी साल उजाडावे लागले ९८. सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. त्यातही सनातन्यांकडून "काय आजकालची गाणी, छैया छैया हे काय शब्द आहेत?" वगैरे टीका झालीच. पण आमच्यासारख्या बंडखोर टीनएजर्सनी तिकडे अजिबात लक्ष न देता दिवसरात्र "छैया छैया" वाजवणं सुरुच ठेवलं, ते जून्/जूलै ९९ मध्ये "ताल" येईपर्यंत.

"ताल" मात्र सर्वार्थानी सुरेल, सुमधूर गाणी असलेला सिनेमा. इतका सुश्राव्य, इतके चपखल शब्द, इतकी गोड ऐश्वर्या की अगदी सनातन्यांनाही काही बोलता येईनासे झाले. बाहेर पाऊस कोसळतोय अन टीव्हीवर "दिल ये बेचैन है" मध्ये ही कोसळतोय अन मी टीव्हीवर "बीफोरयु" नावाचे चॅनल बघत चहा पितेय हा दिनक्रम रोज दुपारी चालायचा. या "बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल? Happy आमच्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी आम्हाला ताल ची गाणी ऐकायला मिळाली, लकी पिढी नाही का? Happy

नंतर नव्या सहस्त्रकात रहमान आला तो २००१ मध्ये "लगान" सह. लगान ची गाणी आवडती असली तरी पिरियड मुव्ही असल्याने ती तशी मनात रुतून बसली नाहीत, निदान माझ्यातरी. या काळात कॉलेजात पाऊल टाकल्याने, आधीच कानात वारं शिरलेलं त्यात कॉलेज असा मस्त माहोल सुरु झाला. या माहोलला रहमानची साथ म्हणजे २००२ साली आलेला "साथिया". साथिया आला तो नोव्हें-डिसेंबरच्या सुमारास. त्यावेळी मी बंगलोरला होते. साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती. तिथले लोकही निमुट ऐकू द्यायचे. "ओ हमदम सुनियो रे" अन "साथिया..." म्हणजे सुपरहिटच्या पलिकडे. पण तरी मला मात्र त्यातलं श्रीनिवासच्या आवाजातलं "मांगल्यम तंतुवाद्येना.." हे अत्यंत आवडलं. नेहमीसाठी मनात बसलं. पण तो लग्नात म्हणायचा मंत्र आहे हे मला माझ्याच लग्नात कळलं. जेव्हा गुरुजींनी भसाड्या आवाजात तो म्हटला, तेव्हा मला स्वतःचाच इतका राग आला. असं कसं मला इतकी वर्षं कळलं नाही हे? आधी कळलं असतं तर मी नक्कीच रहमानचं व्हर्जन वाजवलं असतं लग्नात. Sad

२००२ नंतरचे युवा, रंग दे बसंती, स्वदेस ते आता आताचे रॉकस्टार हे सगळे फेवरेट हून ही अति फेवरेट. शिवाय तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल. पण इतक्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नसल्याने इथेच थांबते.

तर अशी ही रहमानच्या संगीताची माझ्या आयुष्यातल्या मह्त्वाच्या जडणघडणीच्या साधारण टीन-एजमधल्या दहा वर्षांशी घातलेली सांगड. आमच्या पिढीचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अन्नु मलिक, जूने झालेले लक्ष्मी-प्यारे, नदीम्-श्रवण वगैरे मंडळींपासून रहमानने वाचवले. क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली. आम्हीही म्हातारे झालो की आमच्या आयुष्यातल्या सनातन्यांसारखे सरसकट "नवीन ते सगळं रद्दी" म्हणणार नाही, याची खात्री दिली. संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा,

हरकत नाही... लेखातील मूळ भावना पोचल्या. पण मुळात लेखात "ईतर" संगीतकारांशी तुलनात्मक (तेही दर्जा च्या अनुशंगाने) उल्लेख आल्याने वरील लेख हा निव्वळ अनुभव वा मतप्रदर्शन न राहता बायस्ड वाटतो एव्हडेच. हेच पहा ना:
>>इतरांकडेही तितके अन तेच रिसोर्सेस असले तरी ते रहमानसारखं संगीत नाही बनवू शकणार.
Happy

असो, या निमित्ताने रेहमानच्या "चांगल्या दिवसांची" आठवण झाली, हेही नसे थोडके. Happy

योग, बायस आहेच मनात. अमान्य करायचा प्रश्नच येत नाही. Happy शिवाय आमच्या रहमान फॅन जनरेशन ला "काय आजकालची गाणी, नुसता धांगडधिंगा, काही अर्थ नाही" इ. अनेक बायसेस चा सामना करावा लागलाय. Proud त्यावर भरपूर वाद घातलेत आधीच्या पिढीच्या लोकांशी. अन आमची आवड चुकीची नव्हती हे रहमाननी प्रुव्ह ही केलंय वेळोवेळी. त्यामुळे आम्हालाही अधिकार आहेच "रहमानच बेस्ट" म्हणण्याचा. Happy
पण या लेखातून रेहमानेतर संगीतप्रेमी लोकांना दुखवण्याचा अजिबात हेतु नव्हता/नाही. मला स्वतःलाही रहमान सोडून अनेक लोक आवडतात. उदा. शंकर-एहसान्-लॉय, हॅरिस जयराज, विशाल भारद्वाज वगैरे.. पण माझ्या दुर्दैवाने मला जुने कुठलेच हिंदी फिल्म म्युजिक विशेष आवडत नाहीत.

पण माझ्या दुर्दैवाने मला जुने कुठलेच हिंदी फिल्म म्युजिक विशेष आवडत नाहीत.

>>>
यात पुष्कळच अंतर्विरोध आहे. खरे तर शंकर जयकिशनचे बॅटन आरडीने पुढे नेले. आरडीचे बॅटन रहमान पुढे नेतो आहे. एक स्कूल म्हणून नव्हे तर ट्रेन्ड सेटर म्हणून..

खरे तर रहमानचे म्युझिक अ‍ॅप्रिशियेट होतेय म्हण्जे संवेदना इतक्या सक्षम आहे की ज्याला रहमान आवडतो त्याला के एल सेहगल आवडायलाच पाहिजे. त्यामुळे जुने म्युझिक आवडत नसेल आणि रहमान आवडत असेल तर अन्तर्विरोध नक्कीच आहे. मग रेहमान केवळ टेकनो-विझार्ड म्हणूनच आवडतो की केवल पाश्चात्य वाद्याकरता की केवळ ठेक्याकरता.....

नताशा, मदनमोहनना नाही ऐकलस कधी? रहमानची बरीचशी गाणी मलाही खूप आवडतात आणि मुळात तुलना करणं मला पटत नाही, पण खरंच, मदनमोहन, सज्जाद हुसेन हे कधीच नाही ऐकलेस? आणि नसले ऐकले तर काही बायस न ठेवता एकदा ऐकशील का? Happy

नताशा, छान लेख Happy पण आपल्या जन्माच्या आधीचीही गाणी ऐकून पहा कधीतरी. इथे बर्‍याच जणांनी तुला जुने संगीतकार ऐकायचा सल्ला दिला आहे तो योग्यच आहे. काळाच्या कसोटीला कित्येक गाणी उतरली आहेत. अर्थात, ए. आर. रेहमानसारख्या टॅलेंटेड कलाकाराची बरीच गाणी मलाही आवडतातच पण त्या पलिकडेही बरंच काही सुंदर ऐकण्याजोगं आहे Happy

शैलजा, अश्विनी, अनुमोदन.

रेहमानचं संगीत उत्कृष्ट आहेच. मी ही त्याची फॅन आहे. आणि नताशा, तू लिहिलंयस तसं त्यानं आताच्या पिढीला सकस असं संगीत देऊ केलंय. त्यात वादच नाही. पण म्हणून, जुन्या संगीताला असं सरसकट बाजूला सारू नकोस. आमच्यासारख्यांनी जसा रेहमानच्या संगीतासाठी आपला कान तयार केला, त्याप्रमाणेच तू ही कर आणि बघ, जुन्या संगीतातूनही तुला अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळेल.

माझ्या दुर्दैवाने मला जुने कुठलेच हिंदी फिल्म म्युजिक विशेष आवडत नाहीत. >>> खरच दुर्दैव आहे.

आता कोणीतरी हिमेशीया पण लिहा रे...

मला एक जेन्युईन प्रश्न आहे! मलाही नताशा सारखेच जुने म्युझिक तितकसं आवडत नाही(काही गाणी आवडतात, पण नावडीची कावड जड.) मग प्रॉब्लेम काय आहे? लगेच असे सल्ले का येतात, दुर्दैव आहे अँड ऑल! थोडेफार ऐकूनच मत बनलेले असते. नाही आवडले तर झाले. मला आधुनिक वाद्यंच आवडली तर काय बिघडले? खरंच खूप जेन्युईन प्रश्न आहे. :|

नताशा, तुझ्या धाग्यावर वाद नाही करायचेत, पण हे विचार घोळत होतेच कायम. इथे वाचा फुटली. Happy

बस्के, प्रॉब्लेम काहीच नाहीय, पण आमच्यासारख्यांचं म्हणणं इतकंच, की एकदा त्यासाठी कान तयार करून ऐकून तर पहा...
कारण, सरसकट 'जुनी गाणी आवडत नाहीत' हे विधान जरा धाडसी (आणि धक्कादायक सुध्दा) आहे.

बस्के तुझ्या जेन्युइन प्र्श्नाला हे माझं जेन्युइन उत्तर ..

मला वाटतं य दुर्दैवी हा शब्दप्रयोग जुनं संगीत न ऐकल्यामुळे आणि म्हणूनच न आवडल्यामुळे चांगल्या संगीताची आवड असूनही तुम्ही कदाचित चांगल्या संगीताला मुकत आहात त्याबद्दल असावा असं वाटतंय ..

जर रहमान एव्हढा आवडतो, पोचतो, कळतो तर जुने संगीतकारही भावतील हे सांगण्याचा प्रयत्न असावा ..

अर्थात मी जुनं संगीत थोडंफार ऐकते, एंजॉय करते त्यामुळे माझ्याही मनात त्याबद्दल बायस असण्याची शक्यता नाकारता येत नाही .. पण रहमान हे तुमच्या आणि त्यांच्या, माझ्या आवडीतलं इंटरसेक्शन आहे तर काही जुने संगीतकारही या इंटरसेक्शनचा भाग होऊ शकतील आणि त्यायोगे त्यांच्या म्हणजे जुन्या संगीताची आवड असलेल्य्यांची आवड पुढच्या पिढीतही जोपासली जाईल ह्याबद्दलची तळम ळ असेल ती ..:)

मला वाटते रहमानसारखाच जुन्या संगीतकारांचा धागा काढून गाणी तिथे लिस्ट करूया. आठवणी लिहूया. मग मला पडताळून पाहता येईल की माझे मत(माझ्या आवडीबद्दलचे) बरोबर आहे की नाही.
अर्थात माझ्या एकटीसाठी हा खटाटोप गरजेचा नाही. Happy पण स्वतः गुगल करून गाणी शोधण्यापेक्षा इथल्या लोकांवर जास्त भरवसा आहे माझा.

दुर्दैव नाही वाटत मला अजिबात :).
नताशाने लिहिलय कि ऐकलीच नाहीत याचं थोडं आश्चर्य जरुर वाटलं कारण रेडिओ आणि टी.व्ही वर इतकी म्युझिक चॅनल्स आहेत सध्या आणि भरपूर मारा चालु असतो नव्या जुन्या गाण्यांचा.
किती तरी ट.व्ही सिरियल्स ची नावं सुध्दा जुन्या गाण्यांच्या ओळी आहेत ..त्यामुळे जुनी गाणी ऐकली नाहीत याचं आश्चर्य वाटलं.
अगदी नव्या रिमिक्स वाल्यांनीही आरडी च्या कुठल्या क्लब हिट्स ना सोडलं नाहीये :).
ऐकून आवडलं नाही तर गोष्टं वेगळी, पण ऐकलच नसेल तर 'मे बी यु आर मिसिंग समथिंग, एवढीच माझी प्रतिक्रिया .
आरडी तरी ऐक नक्की, नताशा .. एंडलेस खजिना आहे.. रेहमान आवडतो तर आरडी पण आवडेल !

बस्के एव्हढा खटाटोप करूनही नाहीच काही फरक पडला तर मग असं म्हणता येईल का (आम्हाला) की तुम्हाला चांगल्या संगीताची जाणच नाही .. Proud Wink

दुर्दैवाने ' हा शब्द मूळ लेखिकेनेच वापरला आहे म्हणजे जुने संगीत एन्जॉय करता येत नाही याची खंत आहेच. शास्त्रीय संगीताच्या बाबतीतही (माझ्यासकट) बर्‍याच जणांचा हा प्रॉब्लेम असू शकतो. पण बरेच लोक हे सांगताना संकोचतात. डॉ दत्ता सामन्त या कामगार पुढार्‍याच्या एका मुलाखतीत त्यांनी सरळच सांगितले होते ' आय डोन्ट लाईक क्लासिकल म्युझिक. ईट बोअर्स मी' . जानकारांनी त्यांच्या अभिरुचीची किती किम्मत केली असेल!

गैरफिल्मी गाणे चित्रपटातून आले की लोकांना आवडते . म्हणजे त्याला ग्लॅमरच पाहिजे का? तसा हा फारच वैय्यक्तिक विषय आहे...

बायदवे, मला आरडी अर्थातच आवडतो. ओपी नय्यर, शंकर जयकिशन थोडेफार.. यांच्या आधीचे फारसे नाही अपील होत.. असो. हा वेगळा विषय आहे. बास करते आता.

आमच्या लहानपणीची रहमान येण्याआधीची सुपरहिट्ट गाणी म्हणजे तेजाब, मैप्याकि, आशिकी, दिवाना वगैरे. आणि रहमान सोबतच सुपरहिट्ट असलेली गाणी म्हणजे बाझीगर, डर, हआहैकौ, खिलाडी सिरीज, डीडीएल्जे इ. ही सगळी त्या वेळेस कमी-अधिक आवडली होतीच. पण यापैकी एकही "टाइमलेस्/क्लासिक" या वर्गात येतात का? मला तरी नाही वाटत

हे ज्याचे त्याचे पर्सनल मत असते..... मैनेप्यार्कित्या, आशिकी, दिवाना, बाजीगर, हम्हैराहीप्यार्के हे आजही क्लासिकच आहेत... क्लासिकच्या संख्येत रहमान सोडून इतरांचेही काँट्रिब्युशन प्रचंड आहे.

रहमान कितीही श्रेश्ठ असला तरी तो एकमेव नाही.

..... मैनेप्यार्कित्या, आशिकी, दिवाना, बाजीगर, हम्हैराहीप्यार्के
>> यातली किती गानी पाश्चात्य संगीतावरून ढापलेली आहेत याची लिष्ट हवी आहे का शेळीताई....
नुसतेच इन्स्पिरेशन नाही तर निर्लज्ज ढापूगिरी.

अर्रे खूप पोस्टी आल्या की जुनी गाणी आवडत नाही म्हटल्यावर Happy
सरसकट सगळीच जुनी आवडत नाही असं नाहीये लोकहो. अन रहमान फक्त चकाचक टेक्निकसाठी आवडतो असं तर अजिबात नाही. नाहीतर इंडियन क्लासिकल कसं आवडलं असतं मला? विशाल भारद्वाज कसा आवडला असता? फोक म्युजिक तर फार आवडतं. एमटीव्ही कोक स्टुडिओ तर मी नवीन नवीन प्रयोग ऐकण्यासाठी आवर्जून बघते. आवडतात मला.
मी सुद्धा काल विचार केला यावर. मला वाटतं ज्या गाण्यात पहिलं कडवं, त्यासारखंच दुसरं असा प्रकार असतो ते मला फार मोनोटोनस वाटतं. शिवाय फार सरळसोट शब्द असले की पण बोअर होऊन मी ते बंदच करते. (कवितेला चाली लावल्यासारखं वाटतं ते). म्हणजे काय? मला अजून नाही एक्सप्लेन करता येणार.
जुन्यामध्ये माझी चॉइस सांगितली तर लक्षात येइल कदाचित मला काय म्हणायचंय ते.
१. फिरसे आए बदरा बिदेसी- अत्यंत आवडतं
२. इंस्टंट कर्मा - यातली सगळी जुनी गाणी रिमिक्स व्हर्जनमध्येच जास्त आवडतात. पण ओरिजिनलही आवडतातच.
३. नीला आसमान (सिलसिला)
४. यारा सिली सिली (हे फार जुनं नाहिये तरी..)
५. रिमझिम गिरे सावन वगैरे..

शैलजा, अश्विनी, ललिता, दीपांजली: हम्म्म. आता आरडी फॅक्ल मध्ये जाऊन येते..:)

रेहमानबद्दलची माहिती देणारा आणि रेहमॅनिया (प्रतिसादात हा शब्द आलाय) वाला हा लेख चांगला लिहिलाय.

पण, प्रतिसादांतील चर्चेमुळे मूळ लेख थोडा मागेच पडल्यासारखा वाटला. खरं तर "अमुक एक सर्वश्रेष्ठ" अशी विधाने करणे तितकेसे योग्य वाटत नाही. त्याचप्रमाणे एखादा कलाकार(म्हणजे त्याची कलाकृती) आवडणे/न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष असल्याने, एखादी उच्च दर्जाची कलाकृती न आवडण्यातही काही गैर नाही.
परंतु, व्यक्तिगत आवडी-निवडीवर कलाकृतीचा दर्जा ठरवणे हे मात्र नक्कीच चुकीचे आहे.

उदाहरणार्थ मला अमिताभ बच्चन आवडत नाही. परंतु तो दर्जेदार अभिनेता आहे हे मी कधीच अमान्य करत नाही.
(सिनेमाबाहेरचा विशेषकरून ’कौन बनेगा करोडपती’ मधील अमिताभ मला आवडतो)

रहमान सोडून नवीन पिढीचं प्रायोगिक म्युजिक ऐकायचं असेल तर एमटीव्ही कोक स्टुडिओ ला पर्याय नाही...<<<
नताशा अगदी बरोबर्..हा कार्यक्रम खरच खूप सुंदर आहे..
बाकी रेहमान विरुद्ध बाकी संगीतकार हा वादच अनावश्यक वाट्तो.
मला स्वतःला रवी , नोशाद , आर्.डी यांची गाणी आवडतात... पण रेहमान च्या गाण्यातला गोडवा वादातीत आहे. हे सगळेच संगीतकार महान आहेत.

बाकी रेहमानच्या "कही तो होगी वो दुनिया जहा तू मेरे साथ हे" या जाने तू या जाने ना या चित्रपटातील गाण्याने कॉलेज मध्ये असताना खरच वेड लागले होते. शब्दांपेक्षा म्युझिक वर भर असलेल्या आजकालच्या जमान्यात शब्द आणि म्युझिक या दोन्हींचा सुंदर मेळ या गाण्यात आहे.

बाकी रेहमान विरुद्ध बाकी संगीतकार हा वादच अनावश्यक वाट्तो
>>
असा काही वादही नाही आहे. तसा होण्याचे कारण नाही. मला निळा शर्ट्/साडी आवडतो/ते, तुला नाही तुला पिवळ्याची आवड आहे इतके सोपे आहे ते. उगीच सफरचंदे आणि आंबे याची तुलना करणे अशास्त्रीयच आहे.
भीमसेन जोशींना कव्वाली गायला नीट जमलेलेच नाही असे म्हणण्यासारखे आहे ते.:फिदी:

हे सगळेच संगीतकार महान आहेत.>
खर. आणि मुख्य म्हणजे हे सगळे कलाकार आहेत. ते त्यांच्या कुवती प्रमाणे, चित्रपटाच्या गरजे प्रमाणे, त्या त्या वेळेच्या सिच्युएशन प्रमाणे, त्या काळातल्या लोकांच्या आवडी प्रमाणे ई संगीत देण्याचा प्रयत्न करतात.
जसा काहींना एम एफ हुसेन आवडतात तर काहींना गायतोंडे आवडतात, काहींना गोलमाल आवडतो तर काहींना बोल बच्चन आवडतो. ह्या सगळ्या कलाक्रुती आहेत ज्या त्या त्या व्यक्तिची निर्मीती आहेत. त्यांच्यामध्ये तुलना होउच शकत नाही.
माझी ४ वर्षांची पुतणी आहे ती घरात जुनी गाणी लागली की बंद करायला लावते नवीन गाणी लागली की नाचायला लागते. हेच गाण्यांच्या भेंड्या लागल्या की पण लक्षात येत. तरूण मुल - शाळेतली मुल ह्याच काळातली गाणी सहज म्हणतात पण आपल्याला येत नाहीत (म्हणजे मला हां बाकीच्यांच माहीत नाही) मला आशा लता किशोर ई यांचीच जास्त गाणी सुचतात.
त्यामुळे कोण महान संगीतकार आहे हा वाद घालण बरोबर नाहीच. आता माझ्या बाबतीत रेहमान मला पण खुप आवडतो पण त्यामुळे ओ पी नय्यर किंवा जतीन ललीत आवडत नाही अस नाही.

हायला, ह्या लेखाचं शीर्षक वाचून मला 'रहमान' म्हणजे 'साहब,बिबी, गुलाम' मधला 'साहब' रहमान आठवला. मग लेख वाचायला घेतल्यावर चूक लक्षात आली. Proud

>>"बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल?

अजून आहे की हे म्युझिक चॅनेल.

मला जुनी गाणीही आवडतात (के एल सहगल सोडून) आणि रहमानचीही आवडतात (जय हे सोडून). नताशा, सपनेमधलं 'रौशन हुई रात' चांगलं आहे की ग.

>>तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल.

त्वरीत करावी. वाचायला आवडेल फक्त अर्थ सोबत दे म्हणजे झालं Happy

लेख छान आहे.

Pages