विषय क्र.१: आमच्या टीनएजमधला रहमान

Submitted by नताशा on 15 August, 2012 - 16:44

१५ ऑगस्ट १९९२. दक्षिणेकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला "रोजा" अन त्याबरोबरच नशीब उजळलं भारतातल्या तमाम संगितप्रेमींचं. दक्षिणेत सुरु झालेलं ए आर रहमान नावाचं वादळ हळूहळू सार्‍या देशात पसरलं आणि बॉलिवुड चित्रपटसंगीत पार बदललंच. आज रहमानच्या चित्रपटसृष्टीतल्या आगमनाला बरोबर वीस वर्षं पूर्ण झाली.

ज्या काळात "चढ गया उपर रे", "पायलिया हो हो हो","वो तो है अलबेला" इ.इ. गाणी "चार्टबस्टर्स" होती त्या काळात आमच्यासारख्या दहा वर्षाच्या पोराटोरांनाही त्यातला अन "दिल है छोटासा" मधला फरक सुस्पष्ट कळला अन हे काहीतरी फार चांगलं आणि वेगळंच आहे हे ही आपोआपच कळलं.
घरच्यांनीही हो-नाही न म्हणता घेऊन दिलेली ही पहिलीच कॅसेट असावी. ए आर रहमान हे नाव डोक्यात पक्कं बसलं. त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता. तसं वयही नव्हतं अन मुख्य म्हणजे गरजही नव्हती.
काही महिन्यानंतर हिंदीत ए आर रहमान आला तो "दुनिया दिलवालों की" या डब केलेल्या गाण्यांमधून. "मुस्तफा मुस्तफा" हे कॉलेज मध्ये जाणार्‍यांचं अगदी फेवरेट होतं. पण ही गाणी फार हिट नसल्याने कॅसेट मिळाली नाही. Happy
बाबांच्या नोकरीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावात अन बर्‍यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणात रहात असल्याचा फायदा म्हणजे आम्हाला नेहमीच साउथइंडियन मित्र्-मैत्रिणी असायचे. हा फायदा अशासाठी की या पोरांकडे नेहमीच रहमानचे लेटेस्ट म्युजिक असायचं. म्हणजे हिंदीत येण्याआधीच आम्हाला ते कळायचं. साधारण ९४ साली तामीळमध्ये रहमानचा "कादलन" आला अन आमच्या मित्रमंडळाच्या कृपेने आम्ही येताजाता "मुक्काला मुकाबला" अन "उर्वसी उर्वसी" (जसं ऐकु येईल तसं) जोरजोरात ओरडू लागलो. काही पोरं त्यावर प्रभुदेवा स्टाइल नाचूनही बघायची. Happy असं असलं तरी तामीळ कॅसेट घ्यायला घरातनं परवानगी नसल्याने या गाण्यांची कॅसेट घरात यायला "हमसे है मुकाबला" हा भयंकर सिनेमा हिंदीत यावा लागला. त्यातलं उर्वसी उर्वसी हे गाणं ऐकून घरच्यांनी डोक्याला हात मारला. या गाण्याला काही अर्थ तरी आहे का, हा कसला गायक कोकलतोय अन हिरो माकडासारखा डान्स करतोय अन ही असली आचरट गाणी काय ऐकायची वगैरे तमाम आयांचं (रीड: सनातनी मंडळी) मत पडलं. हो, "बगल सीट पे बुढ्ढी हो तो टेक इट इझी उर्वसी" हे लॉजिक त्या काळात पचणं शक्यच नव्हतं. गाणं म्हणजे कसं हळूवार प्रेमभावना नाहीतर दणादण देशभक्तीपर भांगडे नाहीतर उथळ कॅबरे/डिस्को वगैरे ओके होतं पण गाण्यात बुढ्ढी???:फिदी: तेव्हा आम्ही ठरवले, रहमानची गाणी तामिळमध्येच ऐकलेली बरी Wink इकडे सनातन्यांचा उर्वसीचा विरोध सुरु असेपर्यंतच आला "द जेंटलमन". चित्राच्या किनर्‍या आवाजातलं "रुप सुहाना लगता है" खरोखरच उर्वशी पेक्षा आवडायला लागलं.

खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो. म्हणजे आता पुढचा सिनेमा हिंदीतला येणार का "थिरुडा थिरुडा" हिंदीत येणार वगैरे. यथावकाश तो "थिरुडा थिरुडा" हिंदीत "चोर चोर" बनून आला पण त्यात काही फारशी मजा आली नाही.

९६ च्या मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या हंगामात आला "बॉम्बे". माझ्या मते हिंदीत रहमानला खरोखरच सिद्ध केलं ते बॉम्बेनेच. तोपर्यंत lyrics प्रेमी (रीड: सनातनी) जनतेसाठी "रहमान म्हणजे उथळ, काहीही अर्थ नसलेली गाणी देणारा संगीतकार, कधीतरी बरी असतात त्याची गाणी बाकी नुसताच गोंधळ" वगैरे वगैरे होता. "थीम ऑफ बॉम्बे" नी फिल्मी संगीताला शब्द असलेच पाहिजे हा समज पुसून टाकला. "तू ही रे" नी कुणालाच रहमानच्या टॅलेंटविषयी शंका ठेवली नाही. पण अर्थपूर्ण शब्द असले की रहमानची गाणी किती आर्त, व्याकुळ करतात ते आमच्यासारख्या "रहमानच्या संगीताला शब्दाची काय गरज?" सारख्या लोकांना जाणवलं. (अर्थात तेव्हा आर्त, व्याकुळ वगैरे शब्द डोक्यात येत नव्हते Wink पण impact जाणवत होता). नंतर आलेल्या "सपने" मुळे तर ते अधिकच जाणवलं. "स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.

रहमानच्या संगीताला न्याय देणारा त्याच्या तोडीचा गीतकार त्याला मिळायला जरा उशीरच लागला. त्यासाठी साल उजाडावे लागले ९८. सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. त्यातही सनातन्यांकडून "काय आजकालची गाणी, छैया छैया हे काय शब्द आहेत?" वगैरे टीका झालीच. पण आमच्यासारख्या बंडखोर टीनएजर्सनी तिकडे अजिबात लक्ष न देता दिवसरात्र "छैया छैया" वाजवणं सुरुच ठेवलं, ते जून्/जूलै ९९ मध्ये "ताल" येईपर्यंत.

"ताल" मात्र सर्वार्थानी सुरेल, सुमधूर गाणी असलेला सिनेमा. इतका सुश्राव्य, इतके चपखल शब्द, इतकी गोड ऐश्वर्या की अगदी सनातन्यांनाही काही बोलता येईनासे झाले. बाहेर पाऊस कोसळतोय अन टीव्हीवर "दिल ये बेचैन है" मध्ये ही कोसळतोय अन मी टीव्हीवर "बीफोरयु" नावाचे चॅनल बघत चहा पितेय हा दिनक्रम रोज दुपारी चालायचा. या "बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल? Happy आमच्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी आम्हाला ताल ची गाणी ऐकायला मिळाली, लकी पिढी नाही का? Happy

नंतर नव्या सहस्त्रकात रहमान आला तो २००१ मध्ये "लगान" सह. लगान ची गाणी आवडती असली तरी पिरियड मुव्ही असल्याने ती तशी मनात रुतून बसली नाहीत, निदान माझ्यातरी. या काळात कॉलेजात पाऊल टाकल्याने, आधीच कानात वारं शिरलेलं त्यात कॉलेज असा मस्त माहोल सुरु झाला. या माहोलला रहमानची साथ म्हणजे २००२ साली आलेला "साथिया". साथिया आला तो नोव्हें-डिसेंबरच्या सुमारास. त्यावेळी मी बंगलोरला होते. साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती. तिथले लोकही निमुट ऐकू द्यायचे. "ओ हमदम सुनियो रे" अन "साथिया..." म्हणजे सुपरहिटच्या पलिकडे. पण तरी मला मात्र त्यातलं श्रीनिवासच्या आवाजातलं "मांगल्यम तंतुवाद्येना.." हे अत्यंत आवडलं. नेहमीसाठी मनात बसलं. पण तो लग्नात म्हणायचा मंत्र आहे हे मला माझ्याच लग्नात कळलं. जेव्हा गुरुजींनी भसाड्या आवाजात तो म्हटला, तेव्हा मला स्वतःचाच इतका राग आला. असं कसं मला इतकी वर्षं कळलं नाही हे? आधी कळलं असतं तर मी नक्कीच रहमानचं व्हर्जन वाजवलं असतं लग्नात. Sad

२००२ नंतरचे युवा, रंग दे बसंती, स्वदेस ते आता आताचे रॉकस्टार हे सगळे फेवरेट हून ही अति फेवरेट. शिवाय तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल. पण इतक्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नसल्याने इथेच थांबते.

तर अशी ही रहमानच्या संगीताची माझ्या आयुष्यातल्या मह्त्वाच्या जडणघडणीच्या साधारण टीन-एजमधल्या दहा वर्षांशी घातलेली सांगड. आमच्या पिढीचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अन्नु मलिक, जूने झालेले लक्ष्मी-प्यारे, नदीम्-श्रवण वगैरे मंडळींपासून रहमानने वाचवले. क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली. आम्हीही म्हातारे झालो की आमच्या आयुष्यातल्या सनातन्यांसारखे सरसकट "नवीन ते सगळं रद्दी" म्हणणार नाही, याची खात्री दिली. संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. मला वाटत होतं की तमिळ गाणी ऐकणारा मी एकटाच आहे का
काय. Proud मी अजूनही रोबोची तमिळ गाणी ऐकतो आहे. रैना, रहमॅनिया शब्द लई आवडला. Happy

रहमानची बरीच वैशिष्ट्यं आहेत. एक म्हणजे हिंदी चित्रपट संगीतामध्ये पूर्वीपासून चालत आलेले नियम तो हवे तसे धुडकावून लावतो. हा मुखडा, हा अंतरा, एका गायकानी एक गायला की मग दुसर्‍यानी दुसरा गायचा, मग परत पहिला हे त्याच्या गाण्यांमध्ये सापडेलच अशी ग्यारंटी नाही. दुसरं, बहुतेक संगीतकारांच्या दोन कडव्यांमध्ये टिपिकल संगीत असतं. रहमानच्या बहुतेक गाण्यांच्या दोन कडव्यांमधल्या संगीतामध्ये बराच फरक असतो. तिसरं, रहमानवर जगभरच्या संगीताचा प्रभाव आहे आणि तो याचा पुरेपूर उपयोग करतो. म्हणूनच कदाचित ज्यांना पारंपारिक भारतीय संगीतच हवं असतं त्यांना रहमान न आवडण्याची शक्यता जास्त. आणि म्हणूनच जगभरात तो लोकप्रियही झाला. (उगीच नाय टोपीकर नाचला जय हो च्या तालावर. :फिदी:)

तो प्रत्येक गाण्यात नवीन प्रयोग करतो. त्यामुळे त्याच्या संगीताची सवय असलेल्यांनाही पहिल्यांदा गाणं ऐकल्यावर हे काय ऐकतोय असं वाटतं. मग सवय झाल्यावर तेच गाणं जीव की प्राण होतं. रहमानचं गाणं हळूहळू मनात मुरावं लागतं. अपेक्षित नसणारे, एरवी विचित्र वाटणारे आवाजही त्याच्या गाण्यांमध्ये फिट्ट बसतात. छैंया छैंयाच्या सुरूवातीचा 'जिनके सर हो' किंवा 'कहीं आग लगे लग जाए'सारख्या रोमँटिक गाण्यातही ८-९ वर्षांचा आदित्य नारायण. रॉकस्टारमधलं सड्डा हक हिंदी चित्रपटांमधलं पहिलं खरंखुरं रॉक गाणं असावं. कुन फाया कुनसारखी कव्वाली फक्त रहमानच करू जाणे. मसक्कलीमध्ये मोहित 'मनमानी' म्हणताना जी मनमानी करतो तिला तोड नाही. गेंदा फूलसारख्या पारंपारिक रचनेमध्ये ड्र्मबीट?? तरीही गाणं आवडतच.

असामी, तुमचा प्रतिसाद वाचून हा व्हिडिओ आठवला.
http://www.youtube.com/watch?v=NnkRMVaWmaU

बेफिकीर व दिनेशदांशी सहमत.
सलील चौधरी, चित्रगुप्त, जयदेव, ही (कालातीत) नावे आमच्या कर्णेंद्रियांत कल्लोळ उठवतात. थेट शंकर-जयकिशनपर्यंत. ठराविक गाणी सोडली तर रहमान कुठेच बसत नाही.अर्थात तुम्ही त्यांचे संगीत ऐकलेच नसेल तर काय करणार?
पण बेफिकीर म्हणतात तसे,' माझ्या या कॉमेंटचा स्पर्धेशी संबंध नाही. आपला लेख सर्वांगसुंदर आहे.'

>> लील चौधरी, चित्रगुप्त, जयदेव, ही (कालातीत) नावे आमच्या कर्णेंद्रियांत कल्लोळ उठवतात. थेट शंकर-जयकिशनपर्यंत. ठराविक गाणी सोडली तर रहमान कुठेच बसत नाही.अर्थात तुम्ही त्यांचे संगीत ऐकलेच नसेल तर काय करणार?

पण जर आजच्या पिढीला ह्या संगीतकारांचं संगीत माहितच नाही (म्हणजे अजूनही ऐकू येत असतं तर माहित झालं असतं, ज्या अर्थी ह्यांची गाणी आता ऐकली जात नाहीत) तर ह्यानांही "कालातीत" कसं काय म्हणणार? Happy

सलील चौधरी, चित्रगुप्त, जयदेव, ही (कालातीत) नावे आमच्या कर्णेंद्रियांत कल्लोळ उठवतात. थेट शंकर-जयकिशनपर्यंत. >> ह्या सर्वांबद्दल सज्जाद हुसैनचे मत माहित आहे का ? Happy कोण श्रेष्ठ नि कोण नाहि ह्याला काहीच अर्थ नाहि.

सशल मी एका फोरम वर रहमान विरुद्ध इलाया राजा ह्यावर झालेली धूमःश्चक्री पाहिली आहे. त्याचा माझ्या द्रुष्टीने फायदा एव्हढाच झाला कि मला इल्लाया राजाची काहि अप्रतिम गाणी मिळाली. Happy

राज्काशाना, मनमानीबद्दल खूप मोदक. Happy
असामी, इथे लिहाल का कुठली गाणी ते.. किंवा रहमॅनिया फॅनक्लब काढून तिकडे चर्चा करू - इथे स्पर्धेच्या धाग्यावर चालणार नसेल तर.

>>रहमॅनिया फॅनक्लब काढून तिकडे चर्चा करू>>
मोदक. मला रहमानची माहित नसलेली तमिळ गाणी असतील तर हवी आहेत.

<<ए आर वॉज अ‍ॅट हिज बेस्ट इन रोजा, बॉम्बे, दिल से स्वदेस... >>
+१
यादी अजून बरीच वाढवता येईल मला. ताल, रंगीला इ.इ.

<< एक म्हणजे हिंदी चित्रपट संगीतामध्ये पूर्वीपासून चालत आलेले नियम तो हवे तसे धुडकावून लावतो. >>
हा एक मला त्याच्या संगीतातला कमालीचा आवडणारा गुण आहे.

रेहमान सर.. तुम लोग कुछभी बोलो पण आपुन रेहमानसर को मानताय :).. छान लेख.. भले त्याच्यातले शब्द नाही कळत पण संगीतामध्ये अडकून पडायला होते.. सुरवातीच्या काळात तर त्याने जादुची कांडी फिरवली होती.. मी त्याच्या संगीताचा फॅन आहे.. आताची काही नविन गाणी पण खुपच सुंदर.. अगदी नव्या रॉकस्टार मधले 'नादान परिंदे', 'फिरसे उड चला', 'कून फाया कून'... रेहमान फॅन्स तर नेहमीच म्हणतात ' त्याच्या गाण्यात धुंद होणारे विष आहे ज्याचा प्रभाव हळुहळू होतो.. जितके जास्त ऐकाल तितके जास्त आवडत जाते...' नि त्याचे काही ना काही नविन शोध सुरु असतात.. सोबत नविन आवाजदेखील..

मी एका फोरम वर रहमान विरुद्ध इलाया राजा ह्यावर झालेली धूमःश्चक्री पाहिली आहे. त्याचा माझ्या द्रुष्टीने फायदा एव्हढाच झाला कि मला इल्लाया राजाची काहि अप्रतिम गाणी मिळाली.>> Happy

<<आताची काही नविन गाणी पण खुपच सुंदर.. अगदी नव्या रॉकस्टार मधले 'नादान परिंदे', 'फिरसे उड चला', 'कून फाया कून'... >>
अगदी बरोब्बर........ संगीताच्या बाबतीत 'रॉकस्टार' वेगळा उल्लेख करण्यासारखाच आहे. कमालीची कंपोझिशन्स आहेत सगळॅएच.

सशल, इल्लयाराजाची लगेच आठवणारी हिंदी गाणी म्हणजे "चिनी कम". मला फार फार आवडतात -चिनी कम आणि जाने दो ना..

रहमॅनिया फॅन क्लब - मस्त आयडीया. तिथे दुवेही देता येतील. अन छान डिटेलमध्ये चर्चा करता येईल. Happy

राजकाशाना, मस्त. असं मला लिहिता येत नाही. आता तुम्हीच समजवा रहमानच्या जादुई दुनियेतल्या मगल्सना Happy

हे सगळे कलाकार फक्त आणि फक्त स्वतःशी आणि स्वतःच्या आधी केलेल्या कामाशी स्पर्धा करतायत....... तुलनेच्या पलिकडे जाऊन झपाटून काम करणारी माणसं आहेत ही....... जुनी नवी सगळीच...!!!

का उगाच आपण आपल्या आवडीनिवडीनुसार त्यांच्यात चढता उतरता क्रम लावू पाहतोय....... Sad

सगळे कलाकार हे आपापल्या जागी आपापल्या "गिवन सिच्युएशन" मध्ये बेस्टच देत असतात.....!!!

इलया राजाच्या वाद्यवृन्दात रहमान १४ व्या वर्षी दाखल होता फ्ल्यूट वादक म्हणून. इलय राजा त्याचा गुरु आहे. दोघांचाही कल सिम्फनीजकडे आहे. व्यवसाय म्हणून त्यानी चित्रपट संगीत केले. पन चित्रपट संगीताच्या बंदिस्तपणात बसणारे दोघांचेही संगीत नाही. रहमानने हिन्दीत एक स्थान मिळवल्याव्र तो जवळ जवळ त्यातून बाहेर पडल्यासारखाच आहे आणि त्याने आता आंतराष्त्रीय स्तरावरच काम करायला सुरुवात केली आहे. बॉलीवूडला तो अव्हेलेबलच होत नाही. किस्ना मध्ये त्याने एक का दोनच गाणी केली होती. २००६ नन्तर त्याचा प्रभाव ओसरण्याचे कारण हेच आहे. बोस ; फरगॉटन हीरो मध्ये गाण्यापेक्षा थीम्सच जास्त आहेत. बॉम्बे चित्रपतातील 'बॉम्बे थीम ' ऐकून तर अंगावर काटाच येतो.
लाईव कार्यक्रमातली ही बॉम्बे थीम म्हनजे तर कळसच आहे.
http://www.youtube.com/watch?v=dbiYEXNqksw

बाजो >>>>>>>>>>>>>>>

+१०००००००००००००००००००००००००००००००००००

नताशा, हो! जानेदोना पण.. मगाशी त्याचा उल्लेख राहिला.

तुझ्या धाग्यावर न येणं जमत नाही, आणि आले की न लिहीणं जमत नाही! Happy

हे अप्रस्तुत आहे इथे पण हि लिस्ट इल्लय्या राजाची मला सापडलेली. (हि लिस्ट मी बनवलेली नाहि)

1. "nilalkal" by Illayaraja
2. "moonram pirai" by illayaraja ( a kamal - sridevi starrer)
3. " mouna ragam" by illayaraja directed by Manirathnam
4. "Sindu bairave" by illayaraja
5. "veera" by illayaraja
6. "salangai oli" by illayaraja directed by K.Vishwanath
7. "johnny" by illayaraja ( a Rajnikanth - sridevi starrer)
8. " avatharam" by illayaraja ( this is a cassette that no one should
never miss , where raja just
giving the best of melodies
and a brilliant song of
combining the symphony music with
afolk song)
9. "Kadalukku Mariyadai " by illayaraja

इलाया राजाचे मला एकच गाणे आवडले... http://www.youtube.com/watch?v=iYBzzDlh4tw

शंकरा रागात आहे.

याच्यावरच हिंदी गाणे आले... http://www.youtube.com/watch?v=EquOwR9Curc

पण वरिजिनल साउथ इंडियन छान वाटते.. अशी त्यांची आणखी गाणी आहेत का?

बस्के लिही नं..मजा येतेय Happy
स्पर्धा संयोजक, इथे चाललेली चर्चा सुरु ठेवू का रेहमान फॅन्ससाठी नवीन धागा उघडून तिथे बोलू? Happy

मी सुद्धा रहमान फॅन. " स्लमडॉग" साठी जेव्हा त्याला ऑस्कर नॉमिनेशन होते तेव्हा रात्री २ वाजता उठून सगळा सोहळा याचि देही याचि डोळा पाहिला होता :). इकडे बरेचदा लाँग ड्राईव्झ करताना तासन तास रेहमानची गाणी चालू असली की प्रवास कसा संपला कळत नाही.

कंडुकोंडैन कोंडुकोंडैनचा उल्लेख मी पोस्टमध्ये करणं आवश्यक आहे Happy सिनेमा भाषा कळत नसूनही केवळ रेहमानच्या गाण्यांसाठी पाहिला होता Happy . क्रेझी डेज!!

बाँबे रीलिज झाला तेव्हा कडेकोट पोलिस बंदोबस्तात हा सिनेमा आम्ही पाहिला होता. जबरी दिवस होते ते.

हल्ली रेहमानचे लाईव्ह शोज युट्यूबवर बघताना अनेकदा ऐकलेल्या गाण्यांमधली मजा हरिहरन, शंकर महादेवन आणखीनच प्रेमाने उलगडून दाखवतात तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय आहे Happy

नताशा, आठवणींचं दालनच उघडलंस गं Happy
सातवी-आठवीत असताना बाबांच्या कॉलेजमधल्या मित्रांनी हॉल घेऊन मोठ्ठ गेटटुगेदर केलं होतं. मला वाटतं पहिलं आणि शेवटचंच. तिथे अर्थातच गुणदर्शनाचा कार्यक्रम होता. एक मुलगी अतिशय सुरेख डान्सर होती. तिचा पहिला डान्स अतिशय उत्तम झाला होता त्यामुळे दुसर्‍यांदा ती स्टेजवर आल्यावर मी अगदी उत्सुकतेने सरसावून बसले आणि गाणं सुरु झालं ..."दिल है छोटासा". रेहमानच्या संगीताशी ती पहिली ओळख. असं संगीत ह्यापूर्वी कधीच ऐकलं नाही असं वाटलं. त्या सुरावटीने भान अगदी हरपल्यासारखं झालं. ह्यापूर्वी गाणी कितीही आवडली तरी असं फीलिंग कधीच अनुभवलं नव्हतं. घरी आल्याआल्या पहिल्यांदा कुठूनतरी रोजाची कॅसेट पैदा केली Happy

ते गारुड नंतर अनेक वर्षं होतं, अजूनही आहे पण हल्ली काही काही गाण्यांत एकसुरीपणा का जाणवतो कोण जाणे ! अमृत अप्राप्य राहिलं नाही म्हणून त्याचं अप्रूप कमी झालं की फार मंथन झाल्यामुळे त्या अमृतातच आता जादू राहिली नाही हे मला ठरवता येत नाही.

बस्के, जेव्हा ते अमृत होतं तेव्हा त्यात खोटी नव्हतीच Happy
सगळे प्रतिसाद आत्ता वाचले. रैना म्हणते तसं वरचं विधान फार भग्न हॄदयाने करते आहे Happy

Pages