विषय क्र.१: आमच्या टीनएजमधला रहमान

Submitted by नताशा on 15 August, 2012 - 16:44

१५ ऑगस्ट १९९२. दक्षिणेकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला "रोजा" अन त्याबरोबरच नशीब उजळलं भारतातल्या तमाम संगितप्रेमींचं. दक्षिणेत सुरु झालेलं ए आर रहमान नावाचं वादळ हळूहळू सार्‍या देशात पसरलं आणि बॉलिवुड चित्रपटसंगीत पार बदललंच. आज रहमानच्या चित्रपटसृष्टीतल्या आगमनाला बरोबर वीस वर्षं पूर्ण झाली.

ज्या काळात "चढ गया उपर रे", "पायलिया हो हो हो","वो तो है अलबेला" इ.इ. गाणी "चार्टबस्टर्स" होती त्या काळात आमच्यासारख्या दहा वर्षाच्या पोराटोरांनाही त्यातला अन "दिल है छोटासा" मधला फरक सुस्पष्ट कळला अन हे काहीतरी फार चांगलं आणि वेगळंच आहे हे ही आपोआपच कळलं.
घरच्यांनीही हो-नाही न म्हणता घेऊन दिलेली ही पहिलीच कॅसेट असावी. ए आर रहमान हे नाव डोक्यात पक्कं बसलं. त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता. तसं वयही नव्हतं अन मुख्य म्हणजे गरजही नव्हती.
काही महिन्यानंतर हिंदीत ए आर रहमान आला तो "दुनिया दिलवालों की" या डब केलेल्या गाण्यांमधून. "मुस्तफा मुस्तफा" हे कॉलेज मध्ये जाणार्‍यांचं अगदी फेवरेट होतं. पण ही गाणी फार हिट नसल्याने कॅसेट मिळाली नाही. Happy
बाबांच्या नोकरीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावात अन बर्‍यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणात रहात असल्याचा फायदा म्हणजे आम्हाला नेहमीच साउथइंडियन मित्र्-मैत्रिणी असायचे. हा फायदा अशासाठी की या पोरांकडे नेहमीच रहमानचे लेटेस्ट म्युजिक असायचं. म्हणजे हिंदीत येण्याआधीच आम्हाला ते कळायचं. साधारण ९४ साली तामीळमध्ये रहमानचा "कादलन" आला अन आमच्या मित्रमंडळाच्या कृपेने आम्ही येताजाता "मुक्काला मुकाबला" अन "उर्वसी उर्वसी" (जसं ऐकु येईल तसं) जोरजोरात ओरडू लागलो. काही पोरं त्यावर प्रभुदेवा स्टाइल नाचूनही बघायची. Happy असं असलं तरी तामीळ कॅसेट घ्यायला घरातनं परवानगी नसल्याने या गाण्यांची कॅसेट घरात यायला "हमसे है मुकाबला" हा भयंकर सिनेमा हिंदीत यावा लागला. त्यातलं उर्वसी उर्वसी हे गाणं ऐकून घरच्यांनी डोक्याला हात मारला. या गाण्याला काही अर्थ तरी आहे का, हा कसला गायक कोकलतोय अन हिरो माकडासारखा डान्स करतोय अन ही असली आचरट गाणी काय ऐकायची वगैरे तमाम आयांचं (रीड: सनातनी मंडळी) मत पडलं. हो, "बगल सीट पे बुढ्ढी हो तो टेक इट इझी उर्वसी" हे लॉजिक त्या काळात पचणं शक्यच नव्हतं. गाणं म्हणजे कसं हळूवार प्रेमभावना नाहीतर दणादण देशभक्तीपर भांगडे नाहीतर उथळ कॅबरे/डिस्को वगैरे ओके होतं पण गाण्यात बुढ्ढी???:फिदी: तेव्हा आम्ही ठरवले, रहमानची गाणी तामिळमध्येच ऐकलेली बरी Wink इकडे सनातन्यांचा उर्वसीचा विरोध सुरु असेपर्यंतच आला "द जेंटलमन". चित्राच्या किनर्‍या आवाजातलं "रुप सुहाना लगता है" खरोखरच उर्वशी पेक्षा आवडायला लागलं.

खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो. म्हणजे आता पुढचा सिनेमा हिंदीतला येणार का "थिरुडा थिरुडा" हिंदीत येणार वगैरे. यथावकाश तो "थिरुडा थिरुडा" हिंदीत "चोर चोर" बनून आला पण त्यात काही फारशी मजा आली नाही.

९६ च्या मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या हंगामात आला "बॉम्बे". माझ्या मते हिंदीत रहमानला खरोखरच सिद्ध केलं ते बॉम्बेनेच. तोपर्यंत lyrics प्रेमी (रीड: सनातनी) जनतेसाठी "रहमान म्हणजे उथळ, काहीही अर्थ नसलेली गाणी देणारा संगीतकार, कधीतरी बरी असतात त्याची गाणी बाकी नुसताच गोंधळ" वगैरे वगैरे होता. "थीम ऑफ बॉम्बे" नी फिल्मी संगीताला शब्द असलेच पाहिजे हा समज पुसून टाकला. "तू ही रे" नी कुणालाच रहमानच्या टॅलेंटविषयी शंका ठेवली नाही. पण अर्थपूर्ण शब्द असले की रहमानची गाणी किती आर्त, व्याकुळ करतात ते आमच्यासारख्या "रहमानच्या संगीताला शब्दाची काय गरज?" सारख्या लोकांना जाणवलं. (अर्थात तेव्हा आर्त, व्याकुळ वगैरे शब्द डोक्यात येत नव्हते Wink पण impact जाणवत होता). नंतर आलेल्या "सपने" मुळे तर ते अधिकच जाणवलं. "स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.

रहमानच्या संगीताला न्याय देणारा त्याच्या तोडीचा गीतकार त्याला मिळायला जरा उशीरच लागला. त्यासाठी साल उजाडावे लागले ९८. सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. त्यातही सनातन्यांकडून "काय आजकालची गाणी, छैया छैया हे काय शब्द आहेत?" वगैरे टीका झालीच. पण आमच्यासारख्या बंडखोर टीनएजर्सनी तिकडे अजिबात लक्ष न देता दिवसरात्र "छैया छैया" वाजवणं सुरुच ठेवलं, ते जून्/जूलै ९९ मध्ये "ताल" येईपर्यंत.

"ताल" मात्र सर्वार्थानी सुरेल, सुमधूर गाणी असलेला सिनेमा. इतका सुश्राव्य, इतके चपखल शब्द, इतकी गोड ऐश्वर्या की अगदी सनातन्यांनाही काही बोलता येईनासे झाले. बाहेर पाऊस कोसळतोय अन टीव्हीवर "दिल ये बेचैन है" मध्ये ही कोसळतोय अन मी टीव्हीवर "बीफोरयु" नावाचे चॅनल बघत चहा पितेय हा दिनक्रम रोज दुपारी चालायचा. या "बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल? Happy आमच्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी आम्हाला ताल ची गाणी ऐकायला मिळाली, लकी पिढी नाही का? Happy

नंतर नव्या सहस्त्रकात रहमान आला तो २००१ मध्ये "लगान" सह. लगान ची गाणी आवडती असली तरी पिरियड मुव्ही असल्याने ती तशी मनात रुतून बसली नाहीत, निदान माझ्यातरी. या काळात कॉलेजात पाऊल टाकल्याने, आधीच कानात वारं शिरलेलं त्यात कॉलेज असा मस्त माहोल सुरु झाला. या माहोलला रहमानची साथ म्हणजे २००२ साली आलेला "साथिया". साथिया आला तो नोव्हें-डिसेंबरच्या सुमारास. त्यावेळी मी बंगलोरला होते. साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती. तिथले लोकही निमुट ऐकू द्यायचे. "ओ हमदम सुनियो रे" अन "साथिया..." म्हणजे सुपरहिटच्या पलिकडे. पण तरी मला मात्र त्यातलं श्रीनिवासच्या आवाजातलं "मांगल्यम तंतुवाद्येना.." हे अत्यंत आवडलं. नेहमीसाठी मनात बसलं. पण तो लग्नात म्हणायचा मंत्र आहे हे मला माझ्याच लग्नात कळलं. जेव्हा गुरुजींनी भसाड्या आवाजात तो म्हटला, तेव्हा मला स्वतःचाच इतका राग आला. असं कसं मला इतकी वर्षं कळलं नाही हे? आधी कळलं असतं तर मी नक्कीच रहमानचं व्हर्जन वाजवलं असतं लग्नात. Sad

२००२ नंतरचे युवा, रंग दे बसंती, स्वदेस ते आता आताचे रॉकस्टार हे सगळे फेवरेट हून ही अति फेवरेट. शिवाय तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल. पण इतक्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नसल्याने इथेच थांबते.

तर अशी ही रहमानच्या संगीताची माझ्या आयुष्यातल्या मह्त्वाच्या जडणघडणीच्या साधारण टीन-एजमधल्या दहा वर्षांशी घातलेली सांगड. आमच्या पिढीचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अन्नु मलिक, जूने झालेले लक्ष्मी-प्यारे, नदीम्-श्रवण वगैरे मंडळींपासून रहमानने वाचवले. क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली. आम्हीही म्हातारे झालो की आमच्या आयुष्यातल्या सनातन्यांसारखे सरसकट "नवीन ते सगळं रद्दी" म्हणणार नाही, याची खात्री दिली. संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह इथल्या वादां नंतर सुरु झाला का फॅन क्लब :).
कोण श्रेष्ट कोण नाही या बाबतीत सगळ्यांची वैयक्तिक मतं असु शकतात पण एखादा संगीतकार 'आवडुच शकत नाही/ मान्य करणार नाही' वगैरे मुद्दा मला नाही पटत :).
नावडत्या संगीतकारांची सुध्दा मला बोटावर मोजण्या इतकी गाणी का होइना पण आवडतात !
उदा. 'कल्याणजी आनंदजी' म्युझिक मला नाही आवडत पण कुर्बानी मधली गाणी आवडतात.
आवडणार्य अम्युझिक मधे मलाही नौशाद, एस.डी बर्मन, शंकर जय किशन, जयदेव, सलील चौधरी, खय्याम, ओ.पी हे सगळे आवडतात.
पण......... मी 'फॅन' फक्त आरडी बर्मन आणि ए.आर. रेहमान ची होउ शकते :).
त्या दोघां सारखी प्रचंड रेंज मला कोणाकडे दिसली नाही, दे आर सम्थिंग एल्स !!
ऐकायला काय कोणतही ठेका धररणारं म्युझिक ही चांगलं वाटतं अगदी कॉपीकॅट प्रीतम , बप्पीदांचीही गाणीही एंजॉय करता येतात पण जेंव्हा आरडी किंवा रेहमान ची गाणी लागतात, ती एंजॉयमेन्ट जगा वेगळी :).

पण......... मी 'फॅन' फक्त आरडी बर्मन आणि ए.आर. रेहमान ची होउ शकते >> प्रचंड काडी टाकणारे विधान Happy

मी समहाऊ गाणी ऐकताना म्युझिकला खूप महत्व देते. शब्द असो नसो माझे लक्षच नसते.. त्यामुळे रहमानच्या गाण्यामधील विचित्र लिरिक्स मला कधीच टोचली नाहीत>> सेम टु सेम Happy
चर्चा वाचताना मजा आली..
वाचताना कानात व्हर्च्युअली दिल से रे SSSSSSSSSs वाजतय त्याच्या सगळ्या म्युजिक पिसेससह आपोआप. Happy

नताशा, सुंदर लेख... माझ्या लेकामुळे रेहमान ऐकला... आवडला. रेहमान बहुतेकदा आवडतो... वाजणार्‍या अनेक वाद्यांच्या लेयर्समधून लाटालाटांनी अंगावर घेता आला तर...
तू ही रे... ह्या गाण्यासाठी त्याला ऑस्कर मिळालं असतं तर मी समजू शकले असते... जय हो? ... (वेगळा वादाचा विषय).
दिल से... हाय...
मी कदाचित घराबाहेरच त्याच्याविरुद्धं काही बोलू शकते... इतका माझा मुलगा त्याला धार्जिणा आहे.
<<<<ए आर वॉज अ‍ॅट हिज बेस्ट इन रोजा, बॉम्बे, दिल से स्वदेस... >>+ १... आणि रंग दे बसंती?
असो... सुंदर लेख

बाजो, असामी, राजकाशाना- मस्त पोस्टी. फार आवडल्या. Happy

वाजतय त्याच्या सगळ्या म्युजिक पिसेससह आपोआप >> +१. बरीचशी रहमान गीते अशीच वाजतात.

मस्त चर्चा. मजा येतेय वाचायला Happy

नवं-जुनं, सिम्फनी विरुध्द मेलडी, कोण श्रेष्ट, कोण नाही हा मुद्दा नकोच ना... संगीत आवडतं, तर जो चांगलं संगीत देतो, गुंगवून टाकतो, त्याच्या संगीतावर प्रेम करा, बस्स! इतकं सोपं आहे. Happy

मस्तच! पण ह्यात सिवाजी राहिलाना राव. पुबाSSवा

हिंदीतील भाषांतरीत अत्याच्यारापेक्षा मलाही तामीळ ऐकायला आवडते.

>>>नवं-जुनं, सिम्फनी विरुध्द मेलडी, कोण श्रेष्ट, कोण नाही हा मुद्दा नकोच ना... संगीत आवडतं, तर जो चांगलं संगीत देतो, गुंगवून टाकतो, त्याच्या संगीतावर प्रेम करा, बस्स! इतकं सोपं आहे.
+१ लली गुडवन ...म्हणून कधी कधी मला प्रीतम चं संगीत देखील आवडतं Happy

रहमान बेस्टच आहे. सुरुवातीच्या काळात 'सिली' गाणी जी आली त्याचे कारण रहमानने एकदा सांगितले की सुरुवातीस सगळे त्याला 'डान्स नम्बरच' मागायचे.. त्यामुळे त्याच्या संगीतात एक मोनोटोनी आली होती. पुढे ती ताल वगैरे मुळे फुटली. दरम्यानच्या काळात रहमानने बर्याच पाट्या टाकल्या. त्या डब होउन हिन्दीतही आल्या. रहमानच्या प्रत्येक चित्रपटाची गाणी माझ्याकडे आहेत. त्यावेळी मी कॅसेटस घेत असे. पुढे रहमान हिंदीत सिरिअस झाला . आता तर मोठ्या निर्मात्यानाही त्याची असाईन मेन्ट मिळत नाही. दिनेश म्हनतात ते खरे आहे पिरिअड फिल्म मिळून त्याला त्याचे चीज करता आले नाही. पण रहमानचे 'ड्रमिंग' अफलातूनच आहे.
रहमानने पहिल्यांदाच वादकांची, स्टुडिओची नावे कॅसेट्/सीडी रॅपरवर छापण्याचा आग्रह धरला. बाकी जसे शास्त्रीय संगीतात चीजेच्या शब्दांची 'ऐशीतैशी' करून टाकतात तसेच रहमान गायकांना केवळ 'वाहक' बनवतो.किती तरी नवीन गायक्/गायिका. पण त्याने पहिलाच षटकार मारला तोच इतका अफलातून की बस. 'दिल है छोटासा..' ती मिन्मिनी नन्तर क्वचितच ऐकू आली. बुजुर्ग संगीतकार अनिल विश्वास हयात असताना त्यांची एक मुलाखत चॅनेल वर लागली होती. अपेक्षेप्रमाणे नव्या पिढीतील कोणता संगीतकार आश्वासक वाटतो असे विचारले असता' वो है ना 'दिल है छोटासा' वाला' असे म्हणून त्यान्नी त्या गाण्याची खूपच प्रशंसा केली होती.
रहमानची बरीचशी गाणी ते चित्रपटच डब झाल्याने हिन्दीतही डब झाली. त्यामुळे मीटर सांभाळता सांभाळता शब्दांची एवढी तारांबळ उडाली की मेहबूब मियांनी एकदम नॉन्सेन्स लिरिक्स दिली.
(आणखी एक पी के मिश्रा नावाचा प्रकार होता त्या डब च्या काळात)पण रेहमानची मूळ साऊथ इंदियन गाणीच ऐकावीत. एकदम नैसर्गिक वाटतात..
रहमानची बहुसंख्य गाणी 'प्रमोट' न केल्यामुळे वाया गेली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'बोस' ची गाणी.
असामान्य गुणवत्तेची ही गाणी चित्रपटाची नीट प्रसिद्धीच न झाल्याने लोकापर्यन्त पोचलीच नाहीत. याबाबत सहाराचे सुब्रतो आणि शाम बेनेगल यांचीच पुष्कळ 'तूतू मैंमैं' झाली. त्यामुळे खेडेकर आणि रहमान यांची गुणवत्ता वाया गेली.
त्याचा व्यक्ती म्हणून असलेला साधेपणा हा तर वेगळाच विषय होईल..
एक थरारक लाईव शो: रहमान, बालसुब्र, हरिहरन, कविता कृ. , काय इम्प्रोवायझेशन आहे !
http://www.youtube.com/watch?v=IWUo2rNf5uM&feature=related

ता क. रॉकस्टारमधले 'कुन फाया कुन' हे मला वाटते सर्वोत्तम सूफी गाणे असावे हिन्दीतले. आणि त्याच्या स्पर्धेत पुन्हा रहमान्चीच गाणी आहेत :)' ख्वाजा मेरे ख्वाजा', पिया हाजी अली' इ.
कुन फाया कुन ची लिरिक्स कसले जबरदस्त आहेत .इर्शाद कामिल् ला लै लै मार्क द्यायला हवेत Happy

नताशा,
अग्ग खरेच उगाच विरोधाला विरोध म्हणून नाही.. पण मी माझ्या पहिल्या पोस्टमध्येही लिहिले आहे मला नाही मेलोडी सापडत त्याच्या गाण्यांमध्ये.. त्या संगीताने भारावून जायला होते पण ते क्षणिक तरी असते नाही तर वरवरचे तरी असते.. रेहमानसाहेबांच्या गाण्याला कमी लेखणे अश्यातला प्रकार नाही पण माझी जी आवड आहे त्यात त्यांची गाणी फिट बसत नाही एवढेच म्हणेन.. कदाचित माझी आवडच हटके असेल तर त्याचा दोष सर्वस्वी माझा.. उदाहरणादाखल माझ्या आवडीचे एक गाणे सांगतो जे मी कधीही किती वेळाही ऐकू शकतो.. "रूठ के हमसे सनम, जब चले जाओगे तुम, ये ना सोचा था कभी कितने याद आओगे तुम -- जो जीता वही सिकंदर"

अवांतर - मागे महिनाभर मी रॉकस्टारची "साडा हक आणि नादान परींदे" गाणी लाऊन घरच्यांचे अक्षरशा डोके उठवायचो.. पण आता मूड गेला तर गेला.. एकदा पोट भरल्यावर जसे समोरचे पक्वान्न परत बघायचीही इच्छा होत नाही तसे काहीसे झाले.. जे माझे रेहमानच्या सर्वच गाण्यांशी होते..

>>एकदा पोट भरल्यावर जसे समोरचे पक्वान्न परत बघायचीही इच्छा होत नाही तसे काहीसे झाले.. जे माझे रेहमानच्या सर्वच गाण्यांशी होते..>>
अभिषेक, असं प्रत्येक संगीतकाराच्या बाबतीत होतं. कुठलंही गाणं, कितीही चांगलं असलं तरी सतत ऐकता येत नाही. थोड्या वेळानं कंटाळा येतोच. मग परत सहा पहिने, वर्षानी ऐकावसं वाटतं किंवा नाही वाटत.

माझे उलटे आहे. रहमानचे नवीन गाणे आले की ते अजिबात आवडत नाही. नन्तर ते जसजसे 'मुरूं' लागते तसे ते लोणच्यासारखे टेस्टी होते आणि नन्तर तर ते ऑल द टाईम फेवरिट होऊन जाते...

मस्त लेख!
तरीही रहमानच्या काही अल्बम्सचा उल्लेख आवश्यक होताच- साथिया, १९४७ अर्थ (यातले थीम म्युझिक आणि रात की दलदल है काली रे हे महान गाणे) आणि 'जाने तू या जाने ना'.
एक नम्र सूचना- सगळ्या तुलना करा, वाद घाला, फक्त आरडीला तेवढं या सगळ्यापासून लांब ठेवा!!!

>>नवं-जुनं, सिम्फनी विरुध्द मेलडी, कोण श्रेष्ट, कोण नाही हा मुद्दा नकोच ना... संगीत आवडतं, तर जो चांगलं संगीत देतो, गुंगवून टाकतो, त्याच्या संगीतावर प्रेम करा, बस्स! .. >> अगदी, अगदी. तुलना करायचीच कशाला?

राजकाशाना,
माझ्या जुन्या एका मोबाईल मध्ये मेमरी कार्ड नव्हते, त्यात मी जेमतेम २२-२४ गाणी ठेऊ शकायचो, त्यात मी माझ्या आवडीची ऑल टाईम फेवरेट, कितीही वेळा मी ऐकले तरी वैताग येणार नाही अशी गाणीच ठेवली होते.. आणि त्यात रेहमानसाहेबांचे एकही नव्हते.. आणि हो, ती गाणी गेल्या १५-१६ वर्षातीलच होती..

आणखी एक गोष्ट - मी कोणत्याही संगीतकाराचा चाहता नाही, तर संगीताचा चाहता आहे. संगीतकाराचा चाहता बनले तर मग त्याचे काहीही आवडायला लागण्याचा धोका असतो.. त्यामुळे मला जी गाणी आवडतात त्यापैकी बर्‍याच गाण्यांचे संगीतकार कोण हे देखील मी माहीत करून घ्यायला जात नाही, समजले तर समजले नाही तर नाही.. Happy

एक नम्र सूचना- सगळ्या तुलना करा, वाद घाला, फक्त आरडीला तेवढं या सगळ्यापासून लांब ठेवा!!!
>>>>>>>>>>>>>
ते बॉस आहेत, (संदर्भ - झंकार बीटस) लांबच राहणार, निश्चिंत राहा.. Happy

काही प्रतिसाद वाचून असे वाटत आहे की वाद झाला असावा असे काहींचे म्हणणे असावे. माझ्याकडून तरी झालेला नाही. Happy

मी फक्त वैयक्तीक आवड निवड उल्लेखून लेखाबाबत स्वतंत्रपणे लिहिलेलेच आहे. तरी काही गैरसमज कोणाच्या मनात असल्यास क्षमस्व Happy

अभिषेक, असेच काही नाही. आवडत्या संगीतकारांची नावडती गाणी असतातच की. बर्‍याचदा त्यानी ती घाई, चित्रपटातील विचित्र सिच्युएशन वगैरेनी दिलेली असतात. हे अगदी चित्रपट संगीताच्या सुरुवातीच्या काळापासून आहे. अगदी पाट्या न टाकनार्‍या एस डी बर्मन यांनीदेखील (मिली,छुपा रुस्तुम), मदनमोहनचे शेवटचे पिक्चर यात पाट्याच टाकल्या आहेत . ती गाणी नावडतीच आहेत.

बाळू जोशी,
एकदम शब्दशा घेऊ नका माझ्या वाक्याचा अर्थ.. पण नाही म्हणाले तरी होते तसे.. परद्याआडच्या कलाकाराबाबत तुलनेत कमी होत असावे.. पण एखादा अभिनेता/हिरो आपल्या आवडीचा असेल तर त्याचा एवरेज चित्रपटातूनही काहीतरी शोधून एवढा काही वाईट नव्हता हे जस्टीफाय करायचा प्रयत्न केला जातोच..
मला शाहरुखखान नावाचा वादग्रस्त खान आवडत असल्याने माझ्याशी बर्‍याचदा होते हा स्वानुभव आहेच. Proud

अवांतर - मिली म्हणजे अमिताभ जयाचाच ना.. त्यात मैने कहा फूलो से हे एक गाणे होते ना चांगले. इतर काही आठवत नाहीत.

बेफिकिर
+१

छान लिहिलं आहे. अख्ख्या रहमानचा आढावा इतक्या कमी शब्दांत घेता येणं अवघड आहे खरं तर. रोजा, दिलसे, रंगीलाचे जादूई दिवस आठवले. 'टीनएजर बंडखोरी'शी तंतोतंत रिलेट केलं मी. Happy

लेख नाही आवडला फारसा.

चर्चा भारी चालू आहे. रहमान ऑल टाईम फेवरीट नाही माझा... पण त्याची जी मोजकी गाणी आवडतात ती मात्र वर झक्याने म्हटल्याप्रमाणे कानातून, मेंदूतून, सर्वांगात झीरपत जातात. Happy

कलाकाराची ओळख त्याने पुसून टाकली (त्याच्या गाण्यातली कुठली ओळ, कुठल्या गायकाने गायलीय, ते सांगता येत नाही.)>>>>

हा मुद्दा तर अगदी आकसातूनच मांडल्यासारखा वाटला.
आताचं माहिती नाही, पण आम्ही कॉलेजवयीन असताना ए. आर. रहमानच्या प्रत्येक गाण्याच्या कॅसेटवर सगळ्या गायकांची, वादकांची आणि अगदी कोरस गायकांची सुद्धा नावं असायची. माझ्या आठवणीप्रमाणे रहमाननेच हा पायंडा पाडला.

नताशा, लिडरकी करायची सवयच नाही मला.
मी माझ्या मूळ पोस्टमधे फक्त रहमानच्या संगीताच्या, मला वाटलेल्या उणीवा लिहिल्यात. मी कुणालाही जिंदाबाद
वगैरे म्हंटलेलं नाही.

जे आवडत नाही, आवडलं नाही, ते स्पष्टपणे लिहायची सवय मात्र आहे मला...

म्हणजे लेख आवडला, पण रहमान आवडत नाही... हेच ते मत. Happy

सगळ्यांच्या पोस्टला उत्तरे देत नाही, पण एक प्रातिनिधीक म्हणून मंजूडीच्या आकसाने या शब्दाला मात्र हरकत घेतल्याशिवाय रहावत नाही.

कॅसेटवर नाव लिहिणे आणि प्रत्यक्ष गाणे ऐकून आवाज ओळखणे, यात काही फरक आहे, असे नाही का वाटत ?

शेवटी नेहमीचाच घोळ, माझ्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा, रहमान कसा ग्रेट आहे, हे लिहा कि रे !

ध्वनिमुद्रिकेवर गायकाची नावे टाकायचा आग्रह लताने केला. आणि पुर्णही केला. पुर्वी सिनेमातील कलाकारांची नावे असत.

दिनेशदा, तर तुम्ही सनातन्यांचे लीडर दिसताय.. तुम्ही आणि बेफिकीर.. "तुमने तो पी ही नही" का काय तसं म्हणावसं वाटतंय मला
<<<

हे वाचले नव्हते. Happy तसे काही नाही. नवे खूप काही आवडते. पण रहमानबाबत मात्र ती आवड नाही निर्माण होऊ शकली. Happy

नताशा , मस्त लेख आहे. मी पण रेहमानची पंखी त्यामुळे लेख अजुनच भिडला. अत्ता 'दिल से रे'' ऐकतच कॉमेंट् लिहीत आहे:)

निव्वळ प्रतिक्रीयांची संख्या पाहून लेखा वाचला (माबो वरच्या जुन्या सवई जात नाहीत...). अर्थात सर्व वाचल्यावर प्रतिक्रीयांची संख्या जास्त का हे मात्र ऊमगले!
बाकी लेखाबद्दलः (लेखिकेच्या) टिनेजमधला रेहमान असे शीर्षक असल्याने अर्थातच त्यामागची भूमिका लक्षात आल्यावर मग रेहमान बेस्ट आहे वा नाही किंवा कसा याला फारसे महत्व रहात नाही . Happy आणि लेखकाची ती पार्श्वभूमी लक्षात घेतली की अर्थातच मग लेखातून काय अपेक्षित आहे ते समजल्यावर अपेक्षाभंग देखिल होत नाही!( दोन्ही अर्थाने).

शेवटच्या परिच्छेदात मात्र फारच परस्परविरोधी विधाने वाचल्यागत वाटले. मुळात लेखिकेने सुरुवातच तीच्या टिनेजपासून आणि त्या अनुशंगाने रेहमान च्या "ऊदया" बद्दल केल्यावर त्यात पूर्वीच्या संगीतकारांपासून "वाचवले" म्हणणे हा फारच मोठा विरोधाभास वाटतो.

आणि त्याही ऊपरः

>>क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली.

हे म्हणजे काय? खरच नाही कळलं.. क्लासिक अभिजात संगीत समजायला काहीतरी वाईट आधी कानावर पडलेलं आणि मग नंतर काहितरी चांगलं कानावर पडलेलं हवं असं काही सुचवायचं आहे का? निव्वळ मत म्हणून हे वाचलं तरी त्याच्या आधीचे दिलेले संदर्भ निश्चीतच खटकतात.

>> संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.
हे पटलं.

पु.ले.शु.

योग, तुम्ही रेहमानविषयी न लिहिता लेखाविषयी लिहिलेत यासाठी धन्यवाद. Wink

..पूर्वीच्या संगीतकारांपासून "वाचवले" म्हणणे हा फारच मोठा विरोधाभास वाटतो...>> आमच्या लहानपणीची रहमान येण्याआधीची सुपरहिट्ट गाणी म्हणजे तेजाब, मैप्याकि, आशिकी, दिवाना वगैरे. आणि रहमान सोबतच सुपरहिट्ट असलेली गाणी म्हणजे बाझीगर, डर, हआहैकौ, खिलाडी सिरीज, डीडीएल्जे इ. ही सगळी त्या वेळेस कमी-अधिक आवडली होतीच. पण यापैकी एकही "टाइमलेस्/क्लासिक" या वर्गात येतात का? मला तरी नाही वाटत. याउलट त्याचवेळची रहमानची रोजा, बॉम्बे च काय अगदी जंटलमन अन चोर-चोर सुद्धा मला अजूनही फ्रेश वाटतात. पुढची अनेक वर्ष त्यातली मजा संपणार नाही माझ्यासाठी. आता जर रहमान आलाच नसता तर अन्नु मलिक, आनंद-मिलिंद, नदीम्-श्रवण यांच्या भरोशावर किती वर्ष निघाली असती आमची?? म्हणून "रहमानने आम्हाला वाचवले" असं म्हटलं आले. (अगदी संदर्भासहित स्पष्टिकरण झालं नाही?)

क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली.>> हे मी तुमच्यासारख्या गानपारंगताला कसं समजवू मला कळत नाहिये. रोजा ची गाणी ऐकली तेव्हा मी असेन ११-१२ वर्षाची. गाण्यातलं काहीही कळत नव्हतं, अजूनही नाही कळत. पण मी लिहिलंय ना वर, तसं खरोखर त्याआधी जे काय कानावर पडायचं त्यापेक्षा "हे फार वेगळं, सुंदर अन ओरिजिनल आहे" असं काहीतरी जाणवायचं, जाणवतंय. (आधीचं वाईट होतं असं नाही पण काहीतरी मिसिंग होतं.)
त्याचं प्रत्येक गाणं अगदी जिंगल का असेना, त्यावर त्याचे स्वतःचे संस्कार असतातच जे इतर कुणीही कॉपी करु शकत नाही (अन जे अगदी पहिल्या ५ -१० सेकंदात "हे रहमानचंच असणार" असं ओळखता येतं.) आजच्या तांत्रिक करामतींच्या काळात खरंतर कॉपी करता यायला हवं होतं. इतरांकडेही तितके अन तेच रिसोर्सेस असले तरी ते रहमानसारखं संगीत नाही बनवू शकणार.

Pages