विषय क्र.१: आमच्या टीनएजमधला रहमान

Submitted by नताशा on 15 August, 2012 - 16:44

१५ ऑगस्ट १९९२. दक्षिणेकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला "रोजा" अन त्याबरोबरच नशीब उजळलं भारतातल्या तमाम संगितप्रेमींचं. दक्षिणेत सुरु झालेलं ए आर रहमान नावाचं वादळ हळूहळू सार्‍या देशात पसरलं आणि बॉलिवुड चित्रपटसंगीत पार बदललंच. आज रहमानच्या चित्रपटसृष्टीतल्या आगमनाला बरोबर वीस वर्षं पूर्ण झाली.

ज्या काळात "चढ गया उपर रे", "पायलिया हो हो हो","वो तो है अलबेला" इ.इ. गाणी "चार्टबस्टर्स" होती त्या काळात आमच्यासारख्या दहा वर्षाच्या पोराटोरांनाही त्यातला अन "दिल है छोटासा" मधला फरक सुस्पष्ट कळला अन हे काहीतरी फार चांगलं आणि वेगळंच आहे हे ही आपोआपच कळलं.
घरच्यांनीही हो-नाही न म्हणता घेऊन दिलेली ही पहिलीच कॅसेट असावी. ए आर रहमान हे नाव डोक्यात पक्कं बसलं. त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता. तसं वयही नव्हतं अन मुख्य म्हणजे गरजही नव्हती.
काही महिन्यानंतर हिंदीत ए आर रहमान आला तो "दुनिया दिलवालों की" या डब केलेल्या गाण्यांमधून. "मुस्तफा मुस्तफा" हे कॉलेज मध्ये जाणार्‍यांचं अगदी फेवरेट होतं. पण ही गाणी फार हिट नसल्याने कॅसेट मिळाली नाही. Happy
बाबांच्या नोकरीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावात अन बर्‍यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणात रहात असल्याचा फायदा म्हणजे आम्हाला नेहमीच साउथइंडियन मित्र्-मैत्रिणी असायचे. हा फायदा अशासाठी की या पोरांकडे नेहमीच रहमानचे लेटेस्ट म्युजिक असायचं. म्हणजे हिंदीत येण्याआधीच आम्हाला ते कळायचं. साधारण ९४ साली तामीळमध्ये रहमानचा "कादलन" आला अन आमच्या मित्रमंडळाच्या कृपेने आम्ही येताजाता "मुक्काला मुकाबला" अन "उर्वसी उर्वसी" (जसं ऐकु येईल तसं) जोरजोरात ओरडू लागलो. काही पोरं त्यावर प्रभुदेवा स्टाइल नाचूनही बघायची. Happy असं असलं तरी तामीळ कॅसेट घ्यायला घरातनं परवानगी नसल्याने या गाण्यांची कॅसेट घरात यायला "हमसे है मुकाबला" हा भयंकर सिनेमा हिंदीत यावा लागला. त्यातलं उर्वसी उर्वसी हे गाणं ऐकून घरच्यांनी डोक्याला हात मारला. या गाण्याला काही अर्थ तरी आहे का, हा कसला गायक कोकलतोय अन हिरो माकडासारखा डान्स करतोय अन ही असली आचरट गाणी काय ऐकायची वगैरे तमाम आयांचं (रीड: सनातनी मंडळी) मत पडलं. हो, "बगल सीट पे बुढ्ढी हो तो टेक इट इझी उर्वसी" हे लॉजिक त्या काळात पचणं शक्यच नव्हतं. गाणं म्हणजे कसं हळूवार प्रेमभावना नाहीतर दणादण देशभक्तीपर भांगडे नाहीतर उथळ कॅबरे/डिस्को वगैरे ओके होतं पण गाण्यात बुढ्ढी???:फिदी: तेव्हा आम्ही ठरवले, रहमानची गाणी तामिळमध्येच ऐकलेली बरी Wink इकडे सनातन्यांचा उर्वसीचा विरोध सुरु असेपर्यंतच आला "द जेंटलमन". चित्राच्या किनर्‍या आवाजातलं "रुप सुहाना लगता है" खरोखरच उर्वशी पेक्षा आवडायला लागलं.

खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो. म्हणजे आता पुढचा सिनेमा हिंदीतला येणार का "थिरुडा थिरुडा" हिंदीत येणार वगैरे. यथावकाश तो "थिरुडा थिरुडा" हिंदीत "चोर चोर" बनून आला पण त्यात काही फारशी मजा आली नाही.

९६ च्या मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या हंगामात आला "बॉम्बे". माझ्या मते हिंदीत रहमानला खरोखरच सिद्ध केलं ते बॉम्बेनेच. तोपर्यंत lyrics प्रेमी (रीड: सनातनी) जनतेसाठी "रहमान म्हणजे उथळ, काहीही अर्थ नसलेली गाणी देणारा संगीतकार, कधीतरी बरी असतात त्याची गाणी बाकी नुसताच गोंधळ" वगैरे वगैरे होता. "थीम ऑफ बॉम्बे" नी फिल्मी संगीताला शब्द असलेच पाहिजे हा समज पुसून टाकला. "तू ही रे" नी कुणालाच रहमानच्या टॅलेंटविषयी शंका ठेवली नाही. पण अर्थपूर्ण शब्द असले की रहमानची गाणी किती आर्त, व्याकुळ करतात ते आमच्यासारख्या "रहमानच्या संगीताला शब्दाची काय गरज?" सारख्या लोकांना जाणवलं. (अर्थात तेव्हा आर्त, व्याकुळ वगैरे शब्द डोक्यात येत नव्हते Wink पण impact जाणवत होता). नंतर आलेल्या "सपने" मुळे तर ते अधिकच जाणवलं. "स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.

रहमानच्या संगीताला न्याय देणारा त्याच्या तोडीचा गीतकार त्याला मिळायला जरा उशीरच लागला. त्यासाठी साल उजाडावे लागले ९८. सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. त्यातही सनातन्यांकडून "काय आजकालची गाणी, छैया छैया हे काय शब्द आहेत?" वगैरे टीका झालीच. पण आमच्यासारख्या बंडखोर टीनएजर्सनी तिकडे अजिबात लक्ष न देता दिवसरात्र "छैया छैया" वाजवणं सुरुच ठेवलं, ते जून्/जूलै ९९ मध्ये "ताल" येईपर्यंत.

"ताल" मात्र सर्वार्थानी सुरेल, सुमधूर गाणी असलेला सिनेमा. इतका सुश्राव्य, इतके चपखल शब्द, इतकी गोड ऐश्वर्या की अगदी सनातन्यांनाही काही बोलता येईनासे झाले. बाहेर पाऊस कोसळतोय अन टीव्हीवर "दिल ये बेचैन है" मध्ये ही कोसळतोय अन मी टीव्हीवर "बीफोरयु" नावाचे चॅनल बघत चहा पितेय हा दिनक्रम रोज दुपारी चालायचा. या "बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल? Happy आमच्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी आम्हाला ताल ची गाणी ऐकायला मिळाली, लकी पिढी नाही का? Happy

नंतर नव्या सहस्त्रकात रहमान आला तो २००१ मध्ये "लगान" सह. लगान ची गाणी आवडती असली तरी पिरियड मुव्ही असल्याने ती तशी मनात रुतून बसली नाहीत, निदान माझ्यातरी. या काळात कॉलेजात पाऊल टाकल्याने, आधीच कानात वारं शिरलेलं त्यात कॉलेज असा मस्त माहोल सुरु झाला. या माहोलला रहमानची साथ म्हणजे २००२ साली आलेला "साथिया". साथिया आला तो नोव्हें-डिसेंबरच्या सुमारास. त्यावेळी मी बंगलोरला होते. साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती. तिथले लोकही निमुट ऐकू द्यायचे. "ओ हमदम सुनियो रे" अन "साथिया..." म्हणजे सुपरहिटच्या पलिकडे. पण तरी मला मात्र त्यातलं श्रीनिवासच्या आवाजातलं "मांगल्यम तंतुवाद्येना.." हे अत्यंत आवडलं. नेहमीसाठी मनात बसलं. पण तो लग्नात म्हणायचा मंत्र आहे हे मला माझ्याच लग्नात कळलं. जेव्हा गुरुजींनी भसाड्या आवाजात तो म्हटला, तेव्हा मला स्वतःचाच इतका राग आला. असं कसं मला इतकी वर्षं कळलं नाही हे? आधी कळलं असतं तर मी नक्कीच रहमानचं व्हर्जन वाजवलं असतं लग्नात. Sad

२००२ नंतरचे युवा, रंग दे बसंती, स्वदेस ते आता आताचे रॉकस्टार हे सगळे फेवरेट हून ही अति फेवरेट. शिवाय तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल. पण इतक्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नसल्याने इथेच थांबते.

तर अशी ही रहमानच्या संगीताची माझ्या आयुष्यातल्या मह्त्वाच्या जडणघडणीच्या साधारण टीन-एजमधल्या दहा वर्षांशी घातलेली सांगड. आमच्या पिढीचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अन्नु मलिक, जूने झालेले लक्ष्मी-प्यारे, नदीम्-श्रवण वगैरे मंडळींपासून रहमानने वाचवले. क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली. आम्हीही म्हातारे झालो की आमच्या आयुष्यातल्या सनातन्यांसारखे सरसकट "नवीन ते सगळं रद्दी" म्हणणार नाही, याची खात्री दिली. संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या यादीत 'दौड' आणि "नायक" राहीले. Happy नायकचं "चलो चले मितवा" अजूनही छान वाटतं ऐकायला.

मोस्ट फेवरेट्ट गाण्यांची यादी चंदा रे, हू ला ला, सतरंगी रे, फुलोंजैसी प्यारी ( हमसे है मुकाबला ), प्यार ये जाने कैसा है, रहना तू ( देल्ही ६ ), नहीं सामने ( ताल ), बूंदोंसे बातें ( तक्षक ), चुपके से ( साथिया ) वगैरे शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अर्थात त्या यादीत वरच्या लेखातली आणि प्रतिक्रियांमधली गाणी गृहित धरलेली आहेत.

दिल ये बेचैन वे मधला पावसाच्या थेंबांचा इफेक्ट अप्रतिमच! ऐन उन्हाळ्यात पण पावसाळा साकारण्याची जादू आहे त्या गाण्यात. तीच गोष्ट प्यार ये जाने कैसा.. ची! ऐकून उगाचच हृदयात कळ वगैरे यायची. चंदा रे चं गारूड एकदा मनावर झालं की उतरणं कठीण. थिरूडा थिरूडा मधलं चंद्रलेखा गाणं त्यातल्या रिदम मुळे विशेष लक्षात राहीलं. रंगीलाचंच हाय रामा तर केवळ अविस्मरणिय!

बाकी लेख खूप छान झाला आहे. त्यावेळच्या सगळ्या आठवणी गाण्यांसकट ताज्या केल्याबद्दल धन्यवाद!

He kharay ki aaj kal rehmaanchi ji gaani yet aahet.....barechda tyatle shabd samjat nahit....tari mala hi he manya aahe ki tyachya musicchi zing chadhte....he je kahi magical ghadta te barach kahi express karun jata.....tyacha yuva film madhla 'fanna' gaana tar mala kititari divas samjat navhta(tyatle shabd).....pan tyatla je shevtch 'ni ni sa sa' sargam aahe ti apratim aahe aani ti aiklyavar ekdum dhanya vatat.....sargam pan ekdum disco genre madhli.....he baryach kami music directorsla jamta.....aani aata tyacha nuktach aalela 'infinite love' tar sundarach aahe
pratyekachi aapapli choice aste.....aachya pidhila 'humma humma' (aata hummacha arth gaayi aahe ka?) aavdat asel tar avdhu dyava.....te tyanna appeal karta.....hyachyat lifestylecha hi bhag aahe......shastriya sangeet aiklelya aaplya aaji aajobanchya pidhila tyanchya lifestyle nusar R D burman hi ruchle nahit.....thik aahe....ha tyancha drushtikon aahe.....aani RD ruchlelya aaplya aai babanchya pidhila rehman ruchat nahi(ascharya aahe).....chalaychach....choicecha bhag aala.....aaplyala kadachit 25/30 varshanni yenara aani tya velchya pidhila ved lavnara ekhada music director patnar nahi.....tatparyay kay tar 'suno(jo apko achha lage)...aur sunne(jo hume achha lage) do'......

>>>खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो.

हो! अगदी पटलं. मला पण सेम. आपण एकाच वयाच्या आहोत बहुतेक.

छान बायो आहे रहमानचा. आणि तुझ्या सगळ्या पॉईंट्स ला +१

मी रहमानबद्दल जरा जास्तच हळवी आहे. त्याचं कारण हेच असावं. की माझ्या आयुष्याच्या सगळ्या फेजेस मध्ये आठवणीतलं एकतरी रहमान गाणं आहेच!
आधी "डिस्कमॅन" वर रंग दे बसंतीची सीडी. मग नॅनो आयपॉडवर दिल्ली ६. मग शफल वर रॉकस्टार, मग आयफोन/अँड्रॉइड वर पुढे. कानात सतत रेहमानच असायचा आणि आजही असतो.

Pages