विषय क्र.१: आमच्या टीनएजमधला रहमान

Submitted by नताशा on 15 August, 2012 - 16:44

१५ ऑगस्ट १९९२. दक्षिणेकडच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला "रोजा" अन त्याबरोबरच नशीब उजळलं भारतातल्या तमाम संगितप्रेमींचं. दक्षिणेत सुरु झालेलं ए आर रहमान नावाचं वादळ हळूहळू सार्‍या देशात पसरलं आणि बॉलिवुड चित्रपटसंगीत पार बदललंच. आज रहमानच्या चित्रपटसृष्टीतल्या आगमनाला बरोबर वीस वर्षं पूर्ण झाली.

ज्या काळात "चढ गया उपर रे", "पायलिया हो हो हो","वो तो है अलबेला" इ.इ. गाणी "चार्टबस्टर्स" होती त्या काळात आमच्यासारख्या दहा वर्षाच्या पोराटोरांनाही त्यातला अन "दिल है छोटासा" मधला फरक सुस्पष्ट कळला अन हे काहीतरी फार चांगलं आणि वेगळंच आहे हे ही आपोआपच कळलं.
घरच्यांनीही हो-नाही न म्हणता घेऊन दिलेली ही पहिलीच कॅसेट असावी. ए आर रहमान हे नाव डोक्यात पक्कं बसलं. त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता. तसं वयही नव्हतं अन मुख्य म्हणजे गरजही नव्हती.
काही महिन्यानंतर हिंदीत ए आर रहमान आला तो "दुनिया दिलवालों की" या डब केलेल्या गाण्यांमधून. "मुस्तफा मुस्तफा" हे कॉलेज मध्ये जाणार्‍यांचं अगदी फेवरेट होतं. पण ही गाणी फार हिट नसल्याने कॅसेट मिळाली नाही. Happy
बाबांच्या नोकरीमुळे आम्ही वेगवेगळ्या गावात अन बर्‍यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणात रहात असल्याचा फायदा म्हणजे आम्हाला नेहमीच साउथइंडियन मित्र्-मैत्रिणी असायचे. हा फायदा अशासाठी की या पोरांकडे नेहमीच रहमानचे लेटेस्ट म्युजिक असायचं. म्हणजे हिंदीत येण्याआधीच आम्हाला ते कळायचं. साधारण ९४ साली तामीळमध्ये रहमानचा "कादलन" आला अन आमच्या मित्रमंडळाच्या कृपेने आम्ही येताजाता "मुक्काला मुकाबला" अन "उर्वसी उर्वसी" (जसं ऐकु येईल तसं) जोरजोरात ओरडू लागलो. काही पोरं त्यावर प्रभुदेवा स्टाइल नाचूनही बघायची. Happy असं असलं तरी तामीळ कॅसेट घ्यायला घरातनं परवानगी नसल्याने या गाण्यांची कॅसेट घरात यायला "हमसे है मुकाबला" हा भयंकर सिनेमा हिंदीत यावा लागला. त्यातलं उर्वसी उर्वसी हे गाणं ऐकून घरच्यांनी डोक्याला हात मारला. या गाण्याला काही अर्थ तरी आहे का, हा कसला गायक कोकलतोय अन हिरो माकडासारखा डान्स करतोय अन ही असली आचरट गाणी काय ऐकायची वगैरे तमाम आयांचं (रीड: सनातनी मंडळी) मत पडलं. हो, "बगल सीट पे बुढ्ढी हो तो टेक इट इझी उर्वसी" हे लॉजिक त्या काळात पचणं शक्यच नव्हतं. गाणं म्हणजे कसं हळूवार प्रेमभावना नाहीतर दणादण देशभक्तीपर भांगडे नाहीतर उथळ कॅबरे/डिस्को वगैरे ओके होतं पण गाण्यात बुढ्ढी???:फिदी: तेव्हा आम्ही ठरवले, रहमानची गाणी तामिळमध्येच ऐकलेली बरी Wink इकडे सनातन्यांचा उर्वसीचा विरोध सुरु असेपर्यंतच आला "द जेंटलमन". चित्राच्या किनर्‍या आवाजातलं "रुप सुहाना लगता है" खरोखरच उर्वशी पेक्षा आवडायला लागलं.

खर्‍या अर्थाने रहमान बॉलिवुड्मध्ये आला तो "रंगिला" मध्ये, बहुतेक जुलै ९५ साल असावं. अन खरोखरच आमच्यासारख्या चिल्लर पोरांनाही रहमान आता हिंदीत म्युजिक देणार याचा फार आनंद झाला. आम्ही शाळेत, ग्राउंडवर सगळीकडे सारखी त्याचीच "चर्चा" करायचो. म्हणजे आता पुढचा सिनेमा हिंदीतला येणार का "थिरुडा थिरुडा" हिंदीत येणार वगैरे. यथावकाश तो "थिरुडा थिरुडा" हिंदीत "चोर चोर" बनून आला पण त्यात काही फारशी मजा आली नाही.

९६ च्या मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या हंगामात आला "बॉम्बे". माझ्या मते हिंदीत रहमानला खरोखरच सिद्ध केलं ते बॉम्बेनेच. तोपर्यंत lyrics प्रेमी (रीड: सनातनी) जनतेसाठी "रहमान म्हणजे उथळ, काहीही अर्थ नसलेली गाणी देणारा संगीतकार, कधीतरी बरी असतात त्याची गाणी बाकी नुसताच गोंधळ" वगैरे वगैरे होता. "थीम ऑफ बॉम्बे" नी फिल्मी संगीताला शब्द असलेच पाहिजे हा समज पुसून टाकला. "तू ही रे" नी कुणालाच रहमानच्या टॅलेंटविषयी शंका ठेवली नाही. पण अर्थपूर्ण शब्द असले की रहमानची गाणी किती आर्त, व्याकुळ करतात ते आमच्यासारख्या "रहमानच्या संगीताला शब्दाची काय गरज?" सारख्या लोकांना जाणवलं. (अर्थात तेव्हा आर्त, व्याकुळ वगैरे शब्द डोक्यात येत नव्हते Wink पण impact जाणवत होता). नंतर आलेल्या "सपने" मुळे तर ते अधिकच जाणवलं. "स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.

रहमानच्या संगीताला न्याय देणारा त्याच्या तोडीचा गीतकार त्याला मिळायला जरा उशीरच लागला. त्यासाठी साल उजाडावे लागले ९८. सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. त्यातही सनातन्यांकडून "काय आजकालची गाणी, छैया छैया हे काय शब्द आहेत?" वगैरे टीका झालीच. पण आमच्यासारख्या बंडखोर टीनएजर्सनी तिकडे अजिबात लक्ष न देता दिवसरात्र "छैया छैया" वाजवणं सुरुच ठेवलं, ते जून्/जूलै ९९ मध्ये "ताल" येईपर्यंत.

"ताल" मात्र सर्वार्थानी सुरेल, सुमधूर गाणी असलेला सिनेमा. इतका सुश्राव्य, इतके चपखल शब्द, इतकी गोड ऐश्वर्या की अगदी सनातन्यांनाही काही बोलता येईनासे झाले. बाहेर पाऊस कोसळतोय अन टीव्हीवर "दिल ये बेचैन है" मध्ये ही कोसळतोय अन मी टीव्हीवर "बीफोरयु" नावाचे चॅनल बघत चहा पितेय हा दिनक्रम रोज दुपारी चालायचा. या "बीफोरयु" चॅनलवर रोज तीच तीच गाणी त्याच त्याच वेळेस लागायची. आठवतंय का कुणाला हे चॅनेल? Happy आमच्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी आम्हाला ताल ची गाणी ऐकायला मिळाली, लकी पिढी नाही का? Happy

नंतर नव्या सहस्त्रकात रहमान आला तो २००१ मध्ये "लगान" सह. लगान ची गाणी आवडती असली तरी पिरियड मुव्ही असल्याने ती तशी मनात रुतून बसली नाहीत, निदान माझ्यातरी. या काळात कॉलेजात पाऊल टाकल्याने, आधीच कानात वारं शिरलेलं त्यात कॉलेज असा मस्त माहोल सुरु झाला. या माहोलला रहमानची साथ म्हणजे २००२ साली आलेला "साथिया". साथिया आला तो नोव्हें-डिसेंबरच्या सुमारास. त्यावेळी मी बंगलोरला होते. साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती. तिथले लोकही निमुट ऐकू द्यायचे. "ओ हमदम सुनियो रे" अन "साथिया..." म्हणजे सुपरहिटच्या पलिकडे. पण तरी मला मात्र त्यातलं श्रीनिवासच्या आवाजातलं "मांगल्यम तंतुवाद्येना.." हे अत्यंत आवडलं. नेहमीसाठी मनात बसलं. पण तो लग्नात म्हणायचा मंत्र आहे हे मला माझ्याच लग्नात कळलं. जेव्हा गुरुजींनी भसाड्या आवाजात तो म्हटला, तेव्हा मला स्वतःचाच इतका राग आला. असं कसं मला इतकी वर्षं कळलं नाही हे? आधी कळलं असतं तर मी नक्कीच रहमानचं व्हर्जन वाजवलं असतं लग्नात. Sad

२००२ नंतरचे युवा, रंग दे बसंती, स्वदेस ते आता आताचे रॉकस्टार हे सगळे फेवरेट हून ही अति फेवरेट. शिवाय तामीळमधले "एन्ना सोल्ला पोगिराई" ते "मूनबे वा" ही एक वेगळीच लेखमाला होईल. पण इतक्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नसल्याने इथेच थांबते.

तर अशी ही रहमानच्या संगीताची माझ्या आयुष्यातल्या मह्त्वाच्या जडणघडणीच्या साधारण टीन-एजमधल्या दहा वर्षांशी घातलेली सांगड. आमच्या पिढीचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अन्नु मलिक, जूने झालेले लक्ष्मी-प्यारे, नदीम्-श्रवण वगैरे मंडळींपासून रहमानने वाचवले. क्लासिक/अभिजात म्हणजे काय हे समजायची अक्कल दिली. आम्हीही म्हातारे झालो की आमच्या आयुष्यातल्या सनातन्यांसारखे सरसकट "नवीन ते सगळं रद्दी" म्हणणार नाही, याची खात्री दिली. संगीताला शब्दाचं, भाषेचं बंधन नसतं हे कळायला मदत केली. आणि मुख्य म्हणजे आमच्यातल्या टीनएजर बंडखोरीला व्यक्त करायला एक सुरेल माध्यम दिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेहमान बद्दल लिहिल्यामुळे (जरा) जास्तच आवडल Happy

ते बिफोरयु म्हण्जे मेजवानी असातची नै? सगळ्या कसेट्स कोण घेउन देणारच्या काळात तर नक्कीच Wink

मस्त गं.

आवडलं ..

पण मी थोडी आधीच्या जनरेशनची त्यामुळे "'त्याआधीचा एकही संगीतकार वगैरे माहीत नव्हता' हे वाचून आर् डी बर्मनही माहित असू नये???" असा विचार आला डोक्यात .. Happy

सिनेमा "दिलसे", गीतकार गुलजार. यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे. >>>>>>>
सत्य आहे.
छान लेख लिहिला आहे. अभिनंदन व शुभेच्छा.

थँक्स नताशा. रहमॅनिया जागवल्याबद्दल. Happy

साथियाची गाणी फुकट ऐकायला ब्रिगेड रोड्च्या प्लॅनेट एम मध्ये जाणे, यात लाज बिज काही नव्हती.>> क्रेक्ट. मी २००० मध्ये ब्रिगेड रोडवरच कण्डुकोन्डे ची अशीच फुकटात ऐकली.

रहमानची अनेक गाणी मी त्याने स्वतःही ऐकली नसतील इतक्या वेळा ऐकलीत.

'स्वदेस' आला तेव्हा जपानात होते. 'ये जो देस है तेरा' आणि त्याचे शहनाई व्हर्जन डोळ्यातल्या पाण्यासमवेत ऐकले.
२००६ नंतर रहमानला चळ लागला असे माझे स्पष्ट, फुकटचे, (भग्न) हृदयाच्या तळातून व्यक्त झालेले प्रामाणिक मत आहे. Proud गझिनी च्या गाण्यांना गाणी का म्हणावे च्यायला? महबुबचाही आला नव्हता तितका राग आला होता तेव्हा. मग काही वर्षांनी जोधा अकबर आला तेव्हा पूर्वीचा रहमान आठवला.

'ताल'च्या गाण्यांनी माझी आणि एका मैत्रिणीची मैत्री पार तुटेपर्यंत ताणली. मग तिच्या वाढदिवसाला तीच कॅसेट भेट देऊन पापक्षालन केले होते. त्या काळी रहमानची गाणी नावडायचीही सोय नव्हती अजिबात. Proud

"दिल है छोटासा" .>>>>>>>>>>> माझ्याही तेंव्हाच्या छोट्या दिलाच्या खूप आठवणी आहेत .. नंतर लिहीनच पण तो प्रवास आपल्या लेखातून पुन्हा अनुभवला..... खूप खुप शुभेच्छांसह!!!!!!!!!!

जबरी लिहिलय. Happy
रेहमान असा कानातुन, मेंदुतुन, सर्वांगात झीरपत गेलाय.
कानाला हेडफोन लावुन कॅसेटवाला वॉकमन लावुन एकाच दिवसात आशा भोसले यानी म्हणलेलं तनहा तनहा किती वेळा एकलय ह्याची गणती नाही... त्यातल फ्ल्युट की काय खुपच जबरी....
रेहमान फॅन मी ही...
घरी टिव्ही घेतला तेव्हा सोबत सीडी प्लेयर फ्री मिळालेला. (२००२ साली)
पहिली सीडी मी एका मित्राकडुन बनवुन घेतलेली रेहमान स्पेशल.
वट्ट ६० रुपये खर्च केले त्यासाठी...

ए आर रेहमान म्हणाले की मला पहिला रोजा मधील दिल है छोटासा आठवते..

पण तरीही त्यांच्या बर्‍याच गाण्यांमध्ये मला मेलोडी मिसिंग वाटते... Sad

डीडीएलजे, दिल तो पागल है, साजन, हम आपके है कौन, जो जीता वही सिकंदर या चित्रपटांमध्ये असलेली माझी काही सुपर फेवरेट गाणी ए.आर.रेहमान यांच्याकडून बनू शकत नाही असे वाटते..

असो, ही माझी वैयक्तिक आवड झाली.. पण ए.आर.रेहमान यांनी आपली स्वताची एक ओळख बनवली, एक स्वताची स्टाईल बनवली, भारतभरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वताचे आणि भारतीय संगीताचे नाव नेले याबद्दल त्याचा सार्थ अभिमान आहेच.

यांचा स्वदेस हा माझा फेवरेट अल्बम.. एक चांगला चित्रपट, चांगला विषय जो केवळ एक डॉक्युमेंटरी फिल्म सारखा बनून राहिला असता पण शाहरुखखानच्या स्टारडमने आणि ए.आर.रेहमानच्या वर्ल्डक्लास संगीताने हा सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवला.

लेख छानच आहे, रेहमानसाहेबांच्या सार्‍या गाण्यांची उजळणी झाली.. Happy

मस्त लेख. माझा पण रेहमान खुप आवडीचा. आणि तु विश्वास नाही ठेवणार पण अगदी कालच हा विशय आमच्या घरी निघालेला. पण मला रेहमानची सुरवातिची गाणी वेड्यासारखी आवडायची. कदाचीत हल्लीच्या 'दिल्ली ६' मधली गाणी एखाद गाण सोडल तर पण खुपच छान. पण 'स्लमडॉग मिलेनीयरची' नाही आवडलीत. त्याच 'सुन री सखी मेरी प्यारी सखी रे', सपने मधली गाणी...
नताशा वाह छान आठवणी जाग्या केल्यास. धन्यवाद.

सुंदर लेख. Happy (आर.डी. बर्मनवरच्या प्रतिसादासाठी मात्र - अगदी, अगदी!! Wink )

माझ्यापेक्षा वयाने ८-१० वर्षांनी लहान असलेल्या चुलत-मामे-आत्ये भावंडांकडे असलेली रेहमानची दक्षिणी गाणी आठवतायत मला.

'ताल' रिलीज होण्याच्या मार्गावर होता. त्याचं संगीत रेहमानचं आहे, की नाही यावरून मी माझ्या एका मित्राशी पैज लावली होती, जी अर्थातच मी जिंकली होती.

लग्न करून भरूचला गेलो, तेव्हा सोबत एक वॉकमन आणि 'रोजा'ची कॅसेट इतकंच होतं. बाकी फोन नाही, टी.व्ही. नाही, रेडियो नाही, कंप्युटरचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. (घरातल्या इतर आवडत्या कॅसेटस् मंजीनं नेऊ दिल्या नाहीत :फिदी:) तोपर्यंत हिंदी सिनेसंगीत ऐकल्याशिवाय एकही दिवस न घालवलेल्या मला तेव्हा वर्षभर रेहमाननंच तारून नेलं.
'रंगीला'ची गाणी मला विशेष भावली नाहीत कधीच. पण साथिया, लगान - एक नंबर.

thanks all.
Rehman came first in my life with roja n kadhalan. R d burman came later with 1942 a lovestory. Happy

रहमान मला व्यक्तीशः आवडत नाही. पण लेख फर सुंदर झाला आहे. अनेक प्रकारची नवीन माहितीही मिळाली.

"स्ट्रॉबेरी आंखे, पुछती क्या है?" असले तद्दन भिकार शब्द रहमानच्या गाण्याला देण्यार्‍या मेहबुब नामक गीतकाराचा मला खरंच मनापासून राग येतो.>> Lol हे भारीच आहे

यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे.<<< सुंदर वाक्य

शुभेच्छा नताशा

रहमॅनिया मध्ये मी पण मी पण!! मी समहाऊ गाणी ऐकताना म्युझिकला खूप महत्व देते. शब्द असो नसो माझे लक्षच नसते.. त्यामुळे रहमानच्या गाण्यामधील विचित्र लिरिक्स मला कधीच टोचली नाहीत. पण टेलिफोन धुन हे गाणं रहमानचे आहे म्हणून बरं! नाहीतर त्या लिरिसिस्टचे काही खरे नव्हते.. Proud

रोजाची गाणी हा त्या दशकातील मॅजिकल क्षण असेल. आपण ऐकतोय ते काहीतरी जग्गात भारी आहे हे शेंबड्या पोराला देखील कळले असेल! पहिल्यांदा हम्मा हम्मा ऐकले तेव्हा पावसात भिजत होते. तो पाऊस कधी विसरणार नाही मी. नंतर शाळेत फेमस झालेले विडंबन- एका बैलाला भेटली गाय.. Rofl
शाळेतून आले की रो-ज मुकाबला व उर्वशी ऐकत बसायचे. चिक्कु बुक्कु रैले तर ऐकून ऐकून कॅसेट झिजवली. मंगता है क्या मधील लास्ट हार्मनी ऐकून अजुनही काटा येतो!
!बापरे.. नुस्ती गाणी व त्याच्याबरोबरच्या आठवणी आदळतायत डोक्यात! पण किती लिहायचे!?
जाउदे, मी ठार वेडी आहे त्याच्या म्युझिकसाठी! Happy

तू हे लिखाण कितीदा एडीट केलेस!? किती अवघड आहे ए आर रहमान बद्दल डोकं शांत ठेऊन सुसंगत लिहीणे! Happy

रहमॅनिया ...कसला भन्नाट शब्द आहे रैना हा.
रहमॅनिया मध्ये मी पण.
ऐकताना अक्षरशः वेड लागतं ....
<< यात गुलजारच्या शब्दांनी रहमानच्या संगीताला उंची मिळते का रहमानच्या संगीतानी गुलजारचे शब्द उठून दिसतात, हे ठरवणं खरंच कठीण आहे >> अगदी अगदी !
लेख खूप आवडला Happy
कन्डुकोन्डेन बांद्राच्या गेटी की गॅलक्सीमध्ये पाहिला होता. त्यातली मोगर्‍याच्या फुलांमध्ये नावं दाखवलेल्या फ्रेमनेच अर्धं घायाळ केलं. भाषेचा गंध नसताना पूर्ण पिक्चर अधाशासारखा ऐकला आणि बघितला होता.

धन्यवाद लोकहो. प्रतिसाद वाचूनही मजा आली.

असामी: येन्ना सोल्ल पोगिराई "कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन" मधलंच आहे की. खरं तर अजून बरीच आवडती गाणी राहिलीय या लेखात.

रैना: रहमॅनिया..येस्स, दॅट्स द वर्ड! या नावाची रहमानची वेबसाइटही आहे मला वाटतं..
२००६ नंतर रहमानला चळ लागला असे माझे स्पष्ट, फुकटचे, (भग्न) हृदयाच्या तळातून व्यक्त झालेले प्रामाणिक मत आहे>> गझिनी नंतर मलाही असंच वाटायला लागलं होतं. इथेच कुठल्यातरी धाग्यावर रॉकस्टारची गाणीही खास नसल्याच लिहिलं होतं. पण आता मात्र रॉकस्टारची गाणी फार आवडाताहेत. Happy

झकासराव: रेहमान असा कानातुन, मेंदुतुन, सर्वांगात झीरपत गेलाय.>> परफेक्ट वर्णन.

अभिषेक, बेफिकीर: काय हे? वय काय तुमचं? ७० वगैरे नाही ना? मग रहमान आवडत कसा नाही म्हणते मी? Proud Light 1 रोजा, बॉम्बे, दिलसे च्या गाण्यांनी खूप आत काही तरी हलल्यासारखं नाही वाटत का? हे खरंच विचारतेय.

सशल, ललिता: आमच्या लहानपणी आरडी बर्मनचे कुठले सिनेमे आलेच नाही बहुतेक. पहिला आला तो १९४२ अ लव्ह स्टोरी. अन शिवाय त्या वेळेस मी तरी सिनेमाच्या बाबतीत एकदम यडबंबू होते. ५-७ नट नट्या माहीत होत्या फक्त (त्यात एक अमिताबच्चन Proud ). "संगीतकार असतो" हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून तर रहमानचा इमपॅक्ट इतका जाणवला. खोटं वाटेल पण मी पहिला सिनेमा थेटरमध्ये जाऊन पाहिला तो "हम आपके है कौन?" Happy

बस्के, रुणु, भ्रमर, रीमा : तुमचं वेड प्रतिसादातूनही जाणवतंय. Happy

किती अवघड आहे ए आर रहमान बद्दल डोकं शांत ठेऊन सुसंगत लिहीणे! >> सुसंगत वाटतंय? धन्यवाद. Happy मी कालची सुट्टी म्हणून लिहावं असा विचार केला. काय अन किती लिहावं हे सुचेना, मग दिवसभर नुसती गाणीच ऐकली. शेवटी लिहायचा मुहुर्त लागला तेव्हा वाजला होता रात्रीचा १. मग काय जसं मनात येइल तसं लिहिलं. एडिट करायला वेळ नव्हताच. त्यामुळे इंडियन, जीन्स, नायक वगैरे निस्टून गेले. पण पूर्ण दिवस अस्सा मस्त गेला.

माझे पण बेफि सारखेच मत झालेय.

लेख उत्तम, तरीही रहमान सर्वश्रेष्ठ हे आमची पिढी कधीच कबूल करणार नाही.
त्याला अनेक पिरियड फिल्म्स मिळूनही, कधीही त्या काळाला शोभेल असे संगीत त्याला देता आले नाही.
(लगान, असोका वगैरे )

अनेकदा तंत्राचा आणि तालाचा अतिरेक होतो त्याच्या संगीतात. आवाज चोरून गायचा वाईट पायंडा पाडलाय त्याने.
कलाकाराची ओळख त्याने पुसून टाकली (त्याच्या गाण्यातली कुठली ओळ, कुठल्या गायकाने गायलीय, ते सांगता येत नाही.)

त्याच्या संगीताबरोबर एफ एम चा उदय झाला (त्याचबरोबर आयपॉड्स आणि एम पी थ्री पण) त्यामूळे तूमची इच्छा असो वा नसो, त्याची गाणी तूमच्या कानावर आदळण्यात आली.

किती तो आडमुठेपणा... जुन्या पिढीचा. Proud मला एकदम गदर मधला सनी आठवला. तुम्हारा पाकिस्तान जिंदाबाद, वांदा न्हई. लेकिन हिंदुस्तान मुर्दाबाद कायको?

छान लेख नताशा. Happy

दिनेशदा, असोकाचे संगीत अनु मलिकचे होते, त्यामूळे रहमानला त्याला शोभेलसे संगीत देता येणे शक्यच नव्हते Happy

jokes apart, "अनेकदा तंत्राचा आणि तालाचा अतिरेक होतो त्याच्या संगीतात" हे मान्य करूनही त्याचे गारुड उतरत नाही हेही तेव्हढेच सत्य आहे. तसाही कोण सर्वश्रेष्ठ हा प्रश्न पडलायच कोणाला. जे आहे ते चांगले आहे तर त्याची विभागणी करण्यापेक्षा त्याचा आनंद लुटूया ना.

त्याच्या संगीताबरोबर एफ एम चा उदय झाला (त्याचबरोबर आयपॉड्स आणि एम पी थ्री पण) त्यामूळे तूमची इच्छा असो वा नसो, त्याची गाणी तूमच्या कानावर आदळण्यात आली.>> माझा एक अनुभव सांगतो. दिल्से (CD) नुकताच आली होती. दिल से रे ने झपाटल्याची सुरूवात होती. इथे New Hampshire मधे फॉल कलर्स अतिशय सुंदर असतात. कुठल्यातरी no name treck वर जात एका पायवाटेवरून एका ओहोळाच्या काठावर लंच करताना, portable CD player वत दिलसे लावून बसलो होतो. थोड्या वेळाने तिथे एक म्हातारे अमेरिकन कपल उगवले. मी त्यांना distrurb होउ नये म्हणून आवाज कमी केला तेंव्हा त्या म्हातार्‍याने मला थांबवले नि म्हणाला कि ते पलीकडच्या बाजूला बसले होते नि हे गाणे ऐकून आवाज शोधत आले. त्या नंतर तासभर आम्ही सगळे दिलसे ऐकत होतो. एक काडिचाही शब्द न कळता त्या दोघांनी तासभर दिलसे ऐकली नि माझ्याकडून हि सीडी कुठे मिळेल ह्याची माहिती घेऊन निघून गेले. माझी सीडी मला त्यांना देववली नाही. :). I guess that was magic of rehman.

नताशा, येन्ना सोल्ल पोगिराई निसटला नजरेतून पण कडव्या रेहमान फॅनच्या लेखात "कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन" वर एक पॅरा असणे मस्ट आहे Happy

बेफिकीर: काय हे? वय काय तुमचं? ७० वगैरे नाही ना? मग रहमान आवडत कसा नाही म्हणते मी?<<<<<<

(ही फक्त चर्चा आहे, स्पर्धेशी संबंध नाही) Happy

पण नकळतपणे तुम्ही 'एखाद्या श्रेष्ठतेचा' 'वयाशी' संबंध जोडून 'कालातीतते'चे महत्व अव्हेरता आहात Happy

रोजा, बॉम्बे, दिलसे च्या गाण्यांनी खूप आत काही तरी हलल्यासारखं नाही वाटत का? हे खरंच विचारतेय. <<<<

खरंच नाही झालं नताशा. रोजा, बॉम्बे यातील गीते त्या काळात 'नव्या स्वरुपाची' व 'मेलडीचा भास निर्माण करू शकणारी' होती हे खरे, पण मेलडी वॉज लॉस्ट बाय हिंदी (भारतीय नाही म्हणता येणार, कारण भोजपुरी, बांग्ला चित्रपट यांचा अनुभव जवळपास नाहीच) सिनेमा इन अर्ली नाईन्टीज! (खरे तर, अगदी प्रामाणिक मत असे आहे की मेलडी खूपच पूर्वी गेली, अगदी शम्मीच्या थोडी आधी आणि शम्मीच्या वेळी. राजेश खन्ना आणि अमिताभ यांच्या अभिनीत गीतातील मेलडी व काही इतर उदाहरणे ही निव्वळ 'दर्जा अजूनही टिकून आहे' असे दाखवणारी होती इतकेच. अन्यथा लोकांनी मवाली, पातालभैरवी, पापको जलाकर राख्ग कर देंगे, कातिलोंके कातिल अश्या' प्रकारच्या - अश्याच वा ह्याच नव्हे - चित्रपटांना संगीतच द्यायला नको होते.)

(एक 'महत्वाचे' (?) अवांतर - सत्या हा त्या दृष्टीने महत्वाचा व 'वेनस्डे' हा अत्यंत महत्वाचा चित्रपट ठरतो. संगीताचा वापर कमीतकमी, थीमवर फोकस) (मी असे म्हणत नाही आहे की संगीत नसावे, पण कालातीतता नसले तर निव्वळ रेहमान वगैरे नावांना भुलण्यात दम नाही)

यातील (वरील) कोणतेही मत हे आपल्या लेखाबद्दल नसून स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुमचा लेख अत्यंत परफेक्ट व मोस्ट कन्सिडरेबल आहे यात शंकाच नाही. Happy लेख खरोखरच मस्त आहे.

-'बेफिकीर'!

असेच शाहरुखचा देवदास बघताना झालेले मत आहे. बागेश्रींच्या धाग्यावर ते स्वतंत्रपणे लिहीन.

काही कलाकृती 'अजरामर' जरी नसल्या तर एका विशिष्ट कालमर्यादेपुरत्या 'कालातीत' ठरू शकतात व हे 'त्या विशिष्ट कालमर्यादेतील' लोकांना नाकारता येत नाही. नंतरच्यांना येईलही. त्यामुळे खोया खोया चाँद, लग जा गले, किसीके मुस्कुराहटोंपे हो निसार, रमैय्या वैस्तावय्या, आजा सनम, अशी हजारो गीते खुद्द रहमानलाही आवडत असतील आणि त्याला असेही वाटत असेल की ऑस्कर या गीतांना मिळायला हवे होते. Happy

'शंभर वर्षे' ही ती 'विशिष्ट कालमर्यादा' मानली तर 'द फर्स्ट हाफ' हॅज रिअली रूल्ड (अ‍ॅन्ड हॅज स्टिल बींग रुलिंग) द हार्ट्स! Happy

लेख अत्यंत आवडला........ रेहमानबद्दल असल्यानेच नाही तर तुम्ही अतिशय उत्तम अवलोकन केले आहे.
फालतू शब्दांमुळे रेहमानची मजा कधी कमी झाली नाही. संगीत कळायला लागल्यापासून तोच सर्वोत्कृष्ट वाटत आला आहे. माझ्यासाठी तरी 'रोजा' हा रेहमानचा सर्वोच्च अल्बम. संगीत अगदी अलगद मनाला जाऊन भिडते. रेहमान्-हरिहरन-गुलजार हे त्रिकूट एकत्र येऊन अक्षरशः सौंदर्य निर्माण करून गेलेय.

दिनेशदा, तर तुम्ही सनातन्यांचे लीडर दिसताय.. Wink तुम्ही आणि बेफिकीर.. "तुमने तो पी ही नही" का काय तसं म्हणावसं वाटतंय मला Wink

रहमान सर्वश्रेष्ठ हे आमची पिढी कधीच कबूल करणार नाही.
>> तो आहेच. कबूल करा की नको. Light 1 "मोझार्ट फ्रॉम एजिया" उगाच नाही म्हणत त्याला. असो. कानांवर झालेल्या संस्कारांचा परिणाम असावा तो. मला तरी रहमानशिवाय दुसरा कुणी तितका आवडतच नाही हो . खरं म्हणजे रहमानच्या संगीतातली सौंदर्यस्थळं दाखवून देण्याइतके माझे कान अन लेखणी दोन्ही तयार नाहीत. तुमची इच्छा असल्यास रैना, दाद, ट्यागो अशी मंडळी मदत करु शकतील. रहमान सोडून नवीन पिढीचं प्रायोगिक म्युजिक ऐकायचं असेल तर एमटीव्ही कोक स्टुडिओ ला पर्याय नाही.

असामी, दिलसेचा किस्सा भारी Happy
मंदार, मस्त.

मला मात्र जुनी गाणी मनापासून खरंच नाही आवडत. इन फॅक्ट, बस्के म्हणते तसं संगीत ऐकताना माझंही शब्दांकडे लक्षच जात नाही. त्यामुळेच मी सगळ्या भाषांतली गाणी ऐकते. मला आवडतात. आजकाल तर वाटायला लागलंय की शब्द नकोच समजायला. उगाच कधीतरी अर्थात अडकतो. (मी मॅड बिड तर नाही नं?)

चर्चा वाचून मी एक मत ऐकलं होतं ते लिहीतेय .. कदाचित नवा-जुना वाद सोडून थोडी वेगळी चर्चा होईल .. Happy

कोणीतरी मला म्हंटलं होतं की रहमान ला उगीच हाईप केलंय .. इलाया राजा रहमान पेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रेष्ठ आहे ..

ह्यावर काय मत नव्या-जुन्यांचं?

माझ्या बाबतीत मी इलाया राजा चं म्युझिक फार ऐकलेलं नाही पण जेव्हढं ऐकलंय (सदमा, शिवा) त्यावरून मी अजिबात सहमत नाही वरच्या मताशी ..

सशल, पा मधले मुडी मुडी इत्तेफाकसे ऐकलेस का? मला त्या गाण्यावरून तरी इलायराजा खरंच भारी वाटला होता. पण अजुन कुठली गाणी आहेत ते पाहिले नाही.

बाकी कोणाचे मत काहीही असो. रहमान बेस्टे!!

बस्के, मी पा चं म्युझिक ऐकलंच नाहीये आणि सिनेमाही नाही बघितलेला त्यामुळे त्याबद्दल नाही बोलू शकत .. पण सदमा चं आणि शिवाचं "जगडी जगडी" म्युझिक ऐकून मला असं वाटतं की दोघांचे जॉनराज् वेगळे आहेत त्यामुळे कंपेअर करणं कठिण आणि केवळ रहमान खूप जास्त परिचयाचा तेव्हा मला तरी तोच जास्त आवडतो .. Happy

इलाया राजा च्या आत्तापर्यंत ऐकलेल्या संगीतावर बाराचसा दाक्षिणात्य प्रभाव जाणवतो मला .. रहमानचं म्युझिक खूप जास्त जेनेरीक वाटतं ..

Pages