खाजगी ट्युशन्स घेणार्या लोकांचे हितगुज
बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.
हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.
१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी
५. दिवसभराचे टाइम शेड्युल / इंग्रजी- मराठी माध्यमे हे सगळे कसे मॅनेज करतो? याबाबतचे अनुभव.
६. एखाद्या इयत्तेसाठी एखादे चांगले पुस्तक, सीडी, गाइड असे काही रिकमांड करायचे असेल तर तेही लिहा.
..
..
शिकवणीला जानारे लोक/ पालक यांचीही मते, अनुभव असू शकतील. जे इथल्या व्यवसाय करनार्या लोकाना उपयोगी ठरु शकतील.
या व अशा अनेक गोष्टींच्या चर्चेसाठी हा बीबी आहे. ( खाजगी क्लासेस सत्य की थोतांड ? हा विषय इथे अपेक्षित नाही.
) हा बीबी शिक्षण याही विभागात ठेवायचा होता, पण तिथे फक्त परकीय शिक्षणाबाबत चर्चा आणि लिमिटेड लोकाना सामील व्हा, असे काहिसे दिसले, म्हणून व्यवसाय विभागात हा धागा उघडला. शिक्षण विषयाकडे हा धागा 'वर्ग' केलात तरी चालेल.
@श्रुतीजी. पण इथे लिहीणारे जे
@श्रुतीजी.
पण इथे लिहीणारे जे खरोखर पैसे न घेता शिकवतात त्यांच्याबाबतीत तुमची पोस्ट कारण नसतांना सरकास्टीक झालीये.<<
मान्य आहे. भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.
पण थोडे इब्लिसपणे उचकवल्याशिवाय लोक तावातावाने चर्चेत भाग घेत नाहीत
बघा बरे वर : ३ खरेच छान प्रतिसाद आलेत.
इब्लिस इथे आधी कोचिंग क्लासेस
इब्लिस इथे आधी कोचिंग क्लासेस बद्दल चर्चा झालेली आहे.
तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा त्या धाग्यावर पुढे चालविता येऊ शकेल.
आगाऊ, तुमचा विस्तृत प्रतिसाद अपेक्षित होता, आहे.
तो धागा क्लासेस सत्य की
तो धागा क्लासेस सत्य की थोतांड यासाठी आहे. इथे क्लास हा व्यवसाय असलेल्या लोकांची चर्चा अपेक्षित आहे.
१. मूळ शाळा कॉलेज सोडून
१. मूळ शाळा कॉलेज सोडून इतरत्र शिकवणी करण्याची/लावण्याची आजकालच्या विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर गरज का वाटते आहे?
आपापल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे जावे असे सर्वांनाच वाटते. एवितेवी इतका खर्च करतोच आहोत तर ट्यूशन लावायला काय हरकत आहे असा विचार सर्वजण करतात. सरकारी सुविधा सुधारण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यापेक्षा चार पैसे देऊन आपल्यापुरती सुविधा विकत घेण्याचे वाढत चाललेली मानसिकता. गावोगावी सरकारी मोफत दवाखाने असताना खासगी दवाखान्याची गरज काय? माफक दरात सेवा देणारी एस टी असताना ट्रॅव्हल्स , वढाप यांची गरज काय ? यांची उत्तरे हीच आहेत. एक चांगला डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील, गायक, केशकर्तनकार, वगैरे जर निष्ठेने आपले काम करत असतील आणी त्याचे खणखणीत दाम वाजवून घेत असतील तर आपल्याला चूक वाटत नाही. खाजगी क्लास वाल्यांनीच सांदिपनी ऋषीसारखे गरीबीत रहावे असा आग्रह का? आजकाल युजीसी स्केल ला घाबरून कॉलेजेस मध्ये प्राध्यापकांची भरती कमी झालेली आहे. त्यातूनही ओपन कॅटेगरीमध्ये नोकरी मिळणे अजूनच अवघड. मग एम एस्सी, एम कॉम एम फिल वगैरे झालेल्या व्यक्तींनी नोकरीच्या मागे न लागता क्लासेस घेऊन चार पैसे कमावले तर बरेच आहे ना?
३. मग कॉलेज/शाळेचा उपयोग फक्त इन्टरनल प्रात्यक्षिक परिक्षेचे मार्क विकणे इतकाच आहे का? तसे असेल तर खासगी ट्यूशन क्लासेसनाच डीम्ड युनि सारखा डीम्ड स्कूल चा दर्जा का देऊन टाकू नये??
हळूहळू तेही होईलच. हैदराबाद मध्ये ज्यूनियर कॉलेजेस म्हणजे नेमके हेच करतात.
४. शाळा/कॉलेजात प्रमाणापेक्षा जास्त पटसंख्या असते म्हणून नीट शिकवणे होत नाही काय? तसे असेल तर मग पॉप्युलर खासगी क्लासवाले १००-१५० मुलांच्या वर्गाला लाऊडस्पिकर अन सीसी टीव्ही लावून शिकवतात त्याचे काय?
शाळा कॉलेज मध्ये शिक्षकांची कायम नोकरी असते. यू जी सी स्केल असेल तर पगारही भरपूर आणी नोकरी अगदीच पक्की. याऊलट खाजगी क्लासेस मध्ये स्पर्धा असते. तुम्ही नीट शिकविले नाही तर मुले दुसरीकडे जाणार. पाट्या टाकण्याची मनोवृत्ती असेल तर क्लास टिकत नाही. एखादा पूल बांधायचे काम पी डब्ल्यू डी ला आणी तसाच दुसरा पूल बांधायचे काम खाजगी कंपनीला दिले तर? "नोकरी पक्की, पूल कच्चा, नोकरी कच्ची, पूल पक्का" असे शरद जोशी म्हणतात ते फारसे खोटे नाही.
आमच्या लहानपणी ( असे लिहिले की आपण किती मोठे झालो ही जाणीव टोचून जाते. परवाच बर्गर किंग मध्ये कॉफी आणायला गेलो होतो. काऊंटर वरची सुंदर मुलगी पाहून "आपकी आंखे बहुत सुंदर है, जहां भी देखती है एक रिश्ता कायम करती है" हा संवाद आठवला. कोफीचे फक्त साठ सेंट्स घेतले, वर म्हणते कशी, सिनियर डिस्काऊंट !) खाजगी शिकवणीला जाणार्या मुलांकडे तुच्छ्तेने पाहिले जायचे. खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये जाणार्याकडेही. सध्या सगळीकडे खाजगीकरणाचे वारे आहे, शिक्षण क्षेत्र तरी अपवाद कसे राहील ?
शिकवण्यांची गरज आहे की नाही
शिकवण्यांची गरज आहे की नाही यावर काही जण मते मांडत आहेत. माझ्या मते साधारण विद्यार्थ्यांना शिकवणीची गरज नाही. पण ज्या मुलांना समज कमी असेल अशांना खासगी शिकवणी, तीही वैयक्तीक लक्ष देणारी आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी स्पर्धात्मक किंवा इतर बुद्धीचाचणी परीक्षांना बसत असतील त्यांना मात्र खास शिकवणीची गरज असतेच. कारण यांसाठीचा अभ्यास हा शाळांतून शिकवला जात नाही. जलद उत्तरे काढण्यासाठी आवश्यक असणार्या शीघ्रपद्धती शाळांतून शिकवल्या जात नसतात. तिथे सविस्तर उत्तरे व सर्व स्टेप्स लिहिणे आवश्यक आहे हेच शिकवले जाते. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये याउलट स्थिती असते. ३० ते ४० सेकंदात उत्तर काढण्यासाठी खरेतर सर्व पायर्या टाळाव्या लागतात.
ज्या विद्यार्थ्यांना अशा तर्हेच्या परीक्षांना बसायचे असेल त्यांच्यासाठी मी ब्रेन मॅपींग अकॅडेमीची पुस्तके उत्कृष्ट आहेत असे सुचवतो.
इथे शिकवण्या कश्या असाव्यात हा बाफ आहे. पण जर कोणाला स्पर्धात्मक परीक्षांबद्दल विशेष माहिती हवी असेल ते माझ्याशी संपर्क साधू शकतात.
ब्रेन मॅपींग अकॅडेमीची
ब्रेन मॅपींग अकॅडेमीची पुस्तके महाराष्ट्रातील सी इ टीला चालतील का?
महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि
महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि मेडिकलला दोन सी इ टी असतात का? एम सी क्यु साठी पुस्तके कोणत्या प्रकाशनची घ्यावीत?
मयेकरजी, धन्यवाद. तो बाफ
मयेकरजी,
धन्यवाद. तो बाफ पाहिलेला आहे. माझे ४-२ प्रतिसादहि तिथे असतील कदाचित.
इथे मी काढलेला विषय अवांतर होतो आहे असे दिसते.
तेंव्हा थांबतो.
डॉक्टर ~ तुमच्या प्रतिसादातील
डॉक्टर ~
तुमच्या प्रतिसादातील काहीवेळेची औपरोधिक शैली काहीजणांना खटकत असली तरी मी ती नेहमीच खेळकरवृत्तीने घेतो, त्याला कारण तशा प्रतिसादातून तुमची अभ्यासूवृत्तीही तितक्याच प्रकर्षेतेने प्रकट होत असते. त्यामुळे किमान माझ्याकडून तरी तुम्हाला नेहमीच नीट उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करीत असतो. तुम्ही उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांच्या संदर्भात माझ्यावतीने उत्तरे देत आहे :
१. मूळ शाळा कॉलेज सोडून इतरत्र शिकवणी करण्याची/लावण्याची आजकालच्या विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर गरज का वाटते आहे?
उत्तर : इथे 'आजकालच्या विद्यार्थ्यांना' हे प्रयोजन फसवे आहे. 'खाजगी शिकवणी' चे पेव आमच्या काळी मॅट्रिकची परीक्षा होती त्यावेळीही फुटलेच होते. १९६० ते १९७० पर्यंत 'शिकवणी' म्हणजे फक्त मॅट्रिकमधील गंपू आणि चंपूसाठी असायची आणि तीही इंग्लिश आणि गणित या दोनच विषयासाठी. {त्यावेळी "टायपिंग" हा एक ऑप्शनल विषय होता, ते शिकविण्याची शाळेत सोय अर्थातच असायची नाही, म्हणून त्यासाठी खाजगी टाईपरायटिंग क्लासला मुलेमुली जात}. पुढे इंटरनंतर मेडिकल/इंजिनिअरिंगच्या वाटा फुटत, त्यावेळी तिथल्या अंतिम वर्षासाठी काही ब्रॅन्चेससाठी खाजगी क्लासेस जरूर असत; पण ते अत्यंत मर्यादित स्वरूपात. शासनाच्या १०+२+३ अभ्यासक्रम रचनेनंतर मात्र खाजगी क्लासेचचा वारू चहुबाजूने उधळला, कारण बारावीच्या गुणावरच मेडिकल इंजिनिअरिंगचे प्रवेश निश्चित केले जायचे असल्याने. १० व १२ ला गेल्यावर अभ्यासाचा 'ताण' पडेल या भीतीने मग इ. ५ वी पासूनच बाळ्याला आणि बेबीला क्लास लावला पाहिजे असे पालकांना आवर्जून वाटू लागले. इथून खर्या अर्थाने विविध विषयांसाठी 'क्लास कल्चर' ने बाळसे धरले. गरज निर्माण झाली ती स्पर्धेमुळे आणि पालकांकडे असलेल्या त्रोटक वेळेप्रमाणे. जे पालक मुलांचा घरी अभ्यास घेऊ शकत नव्हते (कारण कोणतेही असो) त्याना अशा क्लासेसचा आधार वाटू लागला यात दुमत नाही. मग शाळा-कॉलेजमध्ये अध्यापक/प्राध्यापक शिकवित नाहीत का ? जरूर शिकवितात. पण मुलांपेक्षा पालकांचा कॉलेज कॅम्पसमधील अभ्यासावर विश्वास राहिलेला नाही हे सत्य आहे. किंबहुना कॉलेजमध्ये टाईमटेबलनुसार वर्गात पाट्या टाकणारे हीच प्राध्यापक मंडळी (विशेषतः सायन्स शाखेकडील) आपल्या विद्यार्थ्यांना सायंकाळी घरी कोचिंगसाठी बोलावू लागले आणि त्यासाठी वेगळी फी देणेही पालकांना भाग पाडू लागले. गरज आणि नाईलाज यांची सांगड घातली की मग क्लास संस्कृतीच्या फोफावण्याचे उत्तर सापडते.
२. कोणत्या कॉलेजला दांड्या मारून चालते, व ट्यूशन अटेंड करायला वेळ मिळतो हे पाहूनही मुले ११-१२वी ला अॅडमिशन ठरवितात. (ठरविण्याची चैन परवडणारी मुले नक्कीच ९०+ % वाली हुषार असतात हेही खरेच)
उत्तर : कॉलेजला दांड्या मारण्याचा प्रश्नच उदभवत नाही, डॉक्टर. सारे काही संबंधित प्राध्यापक 'मॅनेज' करतात. कॉलेजमध्ये यायचे ते फक्त लॅबोरेटरीत प्रॅक्टिकल्स अटेंड करायला. लॅब.जर्नल साईन केले गेले नाही तर वार्षिक प्रॅक्टिकल परीक्षेला प्रविष्ठ होता येत नाही, केवळ या भीतीने ही मुले कॉलेज अटेन्ड करतात. थिअरीला ही डोकेदुखी नसते. सर्वच कॉलेजीस मुलांच्या संख्येने दुथडी भरून चाललेली दिसत असल्याने उलटपक्षी प्राचार्य आणि पर्यवेक्षकाना जितकी मुले गैरहजर राहतील तितके बरेच असे म्हणण्याची वेळ आली आहे
.३. मग कॉलेज/शाळेचा उपयोग फक्त इन्टरनल प्रात्यक्षिक परिक्षेचे मार्क विकणे इतकाच आहे का? तसे असेल तर खासगी ट्यूशन क्लासेसनाच डीम्ड युनि सारखा डीम्ड स्कूल चा दर्जा का देऊन टाकू नये??
उत्तर : पहिल्या भागाच्या प्रश्नाचे उत्तर वर आहे. दुसर्या भागाबद्दल बोलायचे झाल्यास इतकेच म्हणता येईल की कोणताही खाजगी क्लासेसवाला कधीही प्रॅक्टिकल्स अरेंज करू शकत नाही. त्याचा संबंध फक्त ८० मार्कांच्या थिअरीशी. युजीसीकडे डीम्ड युनिव्हर्सिटीचे अधिकार असतात, राज्य शासनाकडे नाहीत. उलटपक्षी उद्या चाटे वा आगरवाल क्लासेसना युजीसीने डीम्डचा दर्जा देतो म्हटले तरी त्यांची मॅनेजमेन्ट ती स्वीकारणार नाही. कारण ? कारण उघड आहे. एकदा का तुम्ही युजीसीचे तसले प्रमाणपत्र स्वीकारले की पुढील वाटचाल त्यांच्या नियमसूत्रांचे बंध बांधून करावी लागेल, जे चाटे आणि को. ला कधीच भावणार नाही.
४. शाळा/कॉलेजात प्रमाणापेक्षा जास्त पटसंख्या असते म्हणून नीट शिकवणे होत नाही काय? तसे असेल तर मग पॉप्युलर खासगी क्लासवाले १००-१५० मुलांच्या वर्गाला लाऊडस्पिकर अन सीसी टीव्ही लावून शिकवतात त्याचे काय?
उत्तर : नाही. कॉलेजमधील पटसंख्येचा आणि पॉप्युलर खाजगी क्लासकडील पटसंख्येचा कसलाही संबंध नाही. कॉलेजमधील संख्या फुगते ती त्या त्या भागातील लोकसंख्येचा प्रमाणात. ठराविक खाजगी क्लासवाले जरूर प्रमाणापेक्षा जास्त मुले अॅडमिट करीत असतील पण त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नक्कीच असते. कॉलेजकडे तशी सुविधा बिलकुल नसते. तिथे गर्दी झाली आहे अशी पालकानी तक्रार केली तर प्राचार्य "तसे वाटत असेल तर मुलाची टीसी आत्ता लागलीच देतो" असा निरूत्तर करणारा जवाब देतात. खाजगी क्लासवाले लाऊडस्पीकर आणि सीसीचा वापर करतात ही तर त्यांच्या लोकप्रियतेची एक निशाणी मानली जाते आणि पालक मग तसल्याच क्लासमध्ये आपला मुलगा जाईल हे पाहतात.
५. अमुक शाळेत घातले तर मुलांना शिकवणीची गरजच लागणार नाही असा कॉन्फिडन्स उत्पन्न होईल अशा शाळा आहेत काय? कोणत्या? (रियल लाईफ मे ऐसा होता है क्या?)
उत्तर : याचे उत्तर मी कोल्हापूरपुरतेच देऊ शकतो कारण हे माझे गाव आहे. वेल, अशा दोनतीन शाळा (लोहिया, पद्माराजे, विद्यापीठ हायस्कूल्स) माझ्या पाहण्यातील आहे, जेथील शिक्षकवर्ग अगदी तनमन अर्पण करून विद्यादान करीत असल्याचे मी अनुभवले आहे. मात्र कॉलेजीसच्याबाबतीत या शहरात असे एकही कॉलेज नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. पूर्वी "न्यू" आणि 'विवेकानंद' अशी दोन चांगली महाविद्यालये या शहरात होती. पण अफाट विद्यार्थीसंख्येने या दोन्हीचाही अक्षरशः बोर्या झाला आहे.
एकंदरीतच आपल्या देशात मुलांच्या शिक्षणाचे काय सुरू आहे व काय व्हायला हवे ?
उत्तर : शिक्षणाची रेलगाडी अजूनतरी अपनी पटरीसे नीचे उतरी नही, असे म्हटले तर मग मी बर्यापैकी आशावादी आहे असे माझ्यापुरते तरी मी म्हणेन. मुले अभ्यासू आहेत (त्यातही मुली जास्तच) आणि त्यांच्या कर्तृत्वाला दाही दिशा मोकळ्या आहेत. त्याना हवा आहे तो एक आत्मविश्वास आणि योग्य ते मार्गदर्शन. आत्मविश्वास देण्याचे काम पालकांनी करावे तर मार्गदर्शन त्याच्या शिक्षकांनी. आता असे शिक्षक त्याला नियत शाळेच्या/कॉलेजच्या प्रांगणात भेटतील तर चांगलेच पण उद्या ते एखाद्या खाजगी क्लासच्या चार भिंतीत भेटले तरी त्याचे कल्याणच होईल, असे मानू या डॉक्टर.
अशोक पाटील
छान
छान
अशोक, मस्त लिहिलेत.
अशोक, मस्त लिहिलेत.
पाटील सर, तुमचे विश्लेषण
पाटील सर,
तुमचे विश्लेषण वाचले. सुंदर लिहिले आहेत.
माझ्या म्हण्ण्याचा एकंदर रोख असा होता :
आजकालच्या १२वी च्या मार्कांना फार किंमत राहिलेली नाही. मुले सीईटी चा जास्त अभ्यास करीत असतात. शाळा/कॉलेजे करून घेत असलेली ती तयारी त्यांना पुरेशी वाटत नाही. अन १२वीची बोर्ड परिक्षा संपल्या नंतर फक्त सीईटी साठी त्यांना कुणी अनुभवी क्लासवालेही घेत नाहीत.
यामुळे या मुलांची स.५ ते रात्री ८-९ पर्यंत फक्त कॉलेज, क्लासेस अटेंड करणे व येणे जाणे इतक्यातच दमछाक होत असते. अभ्यास स्वतःचा केव्हा करतात कुणास ठाऊक.
इतके करून मार्क मिळवतात, पण परिक्षार्थी अन विद्यार्थी यातला मूलभूत फरक तसाच राहून जातो..
मग पुढे प्रोफेशनल कोर्सला गेले, तर विद्यार्जन होतच नाही. कारण कसे करायचे ते ठाऊक नाही.
इतर प्रोफेशनल कोर्सेसचे ठाऊक नाही, पण वैद्यकिय शिक्षणाची वेगळी शोकांतिका आहे. संपूर्ण यू.जी. इन्टर्नशिपसह, फक्त अन फक्त पी.जी. एन्ट्रन्स या एकमेव ध्येयाने पार पडतात. या मुलांना रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर म्हणून शून्य कॉन्फिडन्स व उणे शून्य इतके प्रत्यक्ष डॉक्टरकीचे ज्ञान असते.. 'हे' वाचून पहा.(युवकांचा ऑक्सिजन अशी लोकमतची या अठवड्याची पुरवणी) मी काय म्हणतो ते थोडे स्पष्ट होईल. तरुण डॉक्टरांच्या प्रतिक्रिया वाचल्यात, तर आम्हाला 'शिकायलाच' मिळाले नाही असे मुळात म्हणणे आहे असे दिसते.
शालेय स्तरावरच्या बर्याच परिक्षा रद्द करून शासनाने काय साधले हेही कळायला मार्ग नाही.
परिक्षेचे टेन्शन नाही म्हणून खर्या अर्थाने मुले विषय शिकतात/शिकतील काय? शिक्षकांची मानसिकता परिक्षेची 'तयारी करून घेणे' पासून, माझ्या विद्यार्थ्याला विषय समजावा, तो अधिक जाणून घ्यायची गोडी लागावी या प्रकारात बदलणार आहे का? असे अनेक प्रश्न उभे रहातात.
मुले अभ्यासू आहेत, कष्ट करण्याची त्यांच्यात प्रचण्ड उर्जा व शक्ती आहे, आकलनशक्तीही मागील पिढ्यांपेक्षा चांगली आहे. त्यांची ध्येये आपल्या काळापेक्षा जास्त सुस्पष्टपणे त्यांना ठाऊक आहेत. हे जरी बरोबर असले, तरी आपल्या शिक्षणपद्धतीने त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी काय करणे भाग पाडले आहे?
त्यांना आपण ज्ञानपिपासू बनवित आहोत, की मार्क कमावणारी मशीन्स?..
(बेस्ट ऑफ ४ मधे १००%पेक्षा जास्त मिळविणारी मुले. कसे मिळतात १०० अन त्या पेक्षा जास्त टक्के? : शाळाच 'स्पोर्ट्स' चे मार्क खिरापतीसारखे वाटते. तिथपासून भ्रष्टाचाराचे 'बाळकडू'?..)
केजी पासून कसल्या हो शिकवण्या लावता?.. त्या ३-४ वर्षे वयाच्या मुलाला देण्यासाठी तुमच्या जवळ वेळ नसेल, तर नका घालू ना शाळेत इतक्यात.. अन घातलेच आहेत तर किमान शिकवणी तरी बसवू नका मानगुटिवर. भरपूर आयुष्य बाकी आहे त्याच्या जवळ शिकायला. २ अन अडीच वर्षांची मुलंही प्लेग्रूपच्या नावाखाली शाळेत.. काय चाल्लंय काय??
फक्त तुमच्या मित्र मैत्रिणींना 'आमच्या बब्डूने बघा स्टार मिळवलाय रिपोर्ट कार्डावर' इतके सांगता यावे म्हणून त्यांना आपण दामटतो आहोत काय..
अभ्यासाशिवायच्या इतर 'क्लासेस' म्हणजेच शिकवण्यांचे काय? कराटे, स्विमिंग, चेस, अबॅकस, वैदिक गणित, गेलाबाजार 'संस्कार वर्ग' तरी आहेतच..
बेबिसिटींग ला सबस्टिट्यूट म्हणून शिकवणी वापरली जातेय का?
इ.
इ.
ता.क. : हे वर लोकमत मुद्दाम
ता.क. : हे वर लोकमत मुद्दाम दिले आहे, कारण लोकमतचे 'मालक' दर्डा महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री की काय आहेत असे वाटते..
कु. कमला सोनटक्के : ब्रेन
कु. कमला सोनटक्के : ब्रेन मॅपींग अकॅडेमीची पुस्तके महाराष्ट्रातील सी इ टीला चालतील का? >>>
माफ करा. मला महाराष्ट्रातील CET परीक्षेच्या Syllabus बद्दल माहिती नाही. पण BMA ची पुस्तके IITJEE च्या परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत. यावर्षी सेलम मधील माझ्या ३ विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळाला. हे तिघेही आठवीपासून माझे विद्यार्थी होते व CBSE शाळेत होते.
चांगली चर्चा. वाचते
चांगली चर्चा. वाचते आहे.
सध्या आजुबाजूला जी लहान मुलं आणि त्यांचे पालक पहाते त्यांचे थोडे अनुभव इथे लिहीते. या विषयात बसत नसेल तर कृपया सांगा.
ज्या शाळेत मुलगी जातेय त्यांना शाळेतच सगळा अभ्यास करुन घ्यायचा आहे. शक्यतो गृहपाठही नाही द्यायचा असे त्यांना वाटते. मला शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे हे विचार ऐकुन खरच आनंद झाला. शाळेत ज्या प्रकारे शिकवत आहेत ते ठिकच वाटतेय. खुप फास्ट नाहीये. मुलांच्या कलाने घेत आहेत असे वाटते.
पण इतर पालकांचे म्हणणे काय आहे ते ऐकल्यावर असले पालक शाळांना अभ्यास वाढवायला जबरदस्ती करतात का काय असे वाटले.
- काय हे? शाळा सुरु होऊन एक महिना झाला. अजुन काही सुद्धा अभ्यास घेत नाहीत?? असली कसली शाळा. पिटीएला विचाराचे का?
- छे! या शाळेत अभ्यास घेतच नाहीत.
- काही होमवर्कच देत नाहीयेत शाळेत. मुलांना कसे येणार. चार पाच वेळा लिहील्याशिवाय कसे कळणार मुलांना?
- मी सरळ ट्युशनच लावलीये. सहाला शाळा सुटली की साडेसहा ते नऊ ट्युशन ( इयत्ता १ली ). तुम्हीपण लावा. सांगु का पत्ता?
- शाळेत कर्सिव का शिकवत नाहीयेत लिहायला? कर्सिव शिकवणे महत्वाचे आहे!! पीटीएला बोलणार आहे मी.
- आता माझ्या मुलाला पण ट्युशनला घालणार आहे. समोरच्या एक 'मिस' म्हणाल्यात कि त्या कर्सिवपण शिकवणार आहेत.
अशा प्रतिक्रीया ऐकल्यावर वाटले कि पालकांनाच मुलांना ट्युशनला घालायला आवडते का? आणि एखादी शाळा चांगले प्रयोग करत असेल तर तेही करु नयेत यात पालकांचाही सहभाग असतो का? यातले कुणीच मुलांना विषय कळतो का नाही याचा विचार करताना दिसत नाही. फक्त लिखाण , गृहपाठ हवा म्हणतात.
( हे सर्व अगदी लहान म्हणजे १ली २री वगैरेच्या मुलांबद्दल आहे कारण माझा अनुभव तितकाच आहे. )
माझ्याकडे शिकवणीला मुले येतात
माझ्याकडे शिकवणीला मुले येतात ती म्हणतात शाळेत पूर्ण स्वाध्याय सोडवून घेत नाहीत. व्याकरणही शिकवत नाहीत.. ( व्याकरनाचे प्रश्न सोडवून घेतात.... नाउन ओळखा.. तर त्यातल्या वाक्यातल्या नाउन खाली रेघ मारली की झाले... पोराना नाउन , त्याचे प्रकार असे काही माहीत नसते.
वाचते आहे.
वाचते आहे.
माझा ताजा अनुभव : इंग्रजी
माझा ताजा अनुभव :
इंग्रजी सहाव्या इयत्तेत शिकणार्या मुलांची मराठी/देवनागरीची अक्षरओळख पक्की नाही. शिकवलेल्या आणि वाचून घेतलेल्या धड्यातली एक ओळ तेरा मुलांपैकी एकालाच संपूर्ण वाचता आली. बहुतेक मुलांना जोडाक्षरे वाचता आली नाहीत. ४-५ मुलांना अॅट रँडम दाखवून वाचायला सांगितलेली मुळाक्षरे वाचता आली नाहीत. ओळीत वाचायला सांगितली तर पाठ केलेली बर्याच मुलांना म्हणता आली. वाचली का ते कळले नाही . ङ, ञ यांचा उच्चार 'ज्ञ'/'न' असा करतात.
इंग्रजी नवव्या इयत्तेतील मुलांना स्वतःविषयी पाच वाक्ये इंग्रजी आणि मराठीत लिहा असे सांगितले. सरसकट सगळ्यांनी ''माझा नाव xxx आहे." असे लिहिले आहे. (विभक्ती प्रत्यय नववीच्या अभ्यासक्रमात आहेत.)
काही नमुने : माझा आई चे नाव गवरी आहे.
माझा बीबा चे नाव .....(वाक्य अपूर्ण.)
माला फूटबाल खेळयला आवळतो.
माझा आबरता/तो (खाडाखोड) संगाअ नाइले (हेच वाक्य इंग्रजीत my faravit is colour is Blue) असे आहे.
and my faviorite subject English, and I don't like Hindi, Marathi, Maths rest all subject I like.
मला बोरढग आवडतो ( I like boarding school.)
*नववीतल्या एका विद्यार्थ्याने मी प्रथमच मराठी मोठ्याने वाचतो आहे असे सांगितले.

एक विद्यार्थ्याने "माझी अवडती विशाय मराठी आहे|" असे लिहिले आहे.
(No subject)
(No subject)
बापरे भरत.
बापरे भरत.
चर्चा वाचली.मला चौथी आणि
चर्चा वाचली.मला चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचे आणि क्रमिक मराठीचे (१ ते १० वी तृतीय/प्रथम भाषा)क्लास घ्यायचे आहेत. यावर्षी स्वतः तयारी करून पुढच्या शालेय वर्षापासून सुरूवात करायची आहे.
मी काही क्लासधारी लोकांशी बोलले. अभ्यासाच्या तयारीसाठी कोणीही सुचना दिल्या नाहीत :अओ:(माबोकरांनी दिल्या तर फार बरे)
पण क्लास कसा सुरू कर ह्यावर मात्र भरपूर मिळाल्या. त्यात २ मत गट असे होते की -
१. सुरूवात चकाचक करा. सायक्लोस्टाईल नोट्स, क्लासच्या नावाच्य बॅग्स (?), वेलकम कीट, ई.
२. सुरूवात घरगुती कर.. मग हळू हळू वाढव!
अनुभवींनी कृपया मार्गदर्शन करावे.
जाईजुई, मी जिथे जातो तिथे
जाईजुई, मी जिथे जातो तिथे हिंदी शिकवणार्या बाईंनीही चकाचक नोट स्पायरल बाइंडिंग करून मुलांच्या हाती सोपवल्या आहेत.
भाषाविषयांच्या अध्यापनात धडे शिकवण्यापेक्षा भाषा शिकवण्यावर भर हवा (माझ्या शाळेचे मुख्याध्यापक शं.ना.दीक्षित ऑफ पिरियडला वर्गावर आले की सांगायचे आज मी अमकी भाषा शिकवतोय.) धडे शिकवण्याबरोबरच मी प्रत्येकाचा लेखन(स्वतंत्र; फळ्यावरून/नोट्सवरून उतरवून घेणे नव्हे), वाचन, भाषण यांचा सराव करून घेतोय. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह किती आहे, तसेच त्यांचे इंग्रजीचे ज्ञानही कितपत आहे याची मला कल्पना नसल्याने अर्थ नेमके कोणकोणत्या शब्दांचे आणि कसे समजवायचे याचा अंदाज यायला वेळ लागला. वहीत शब्दार्थ उतरवून घ्या हे मुलांना सांगायला लागते. सगळे सरळ पुस्तकातच पेन्सिलीने अर्थ लिहून ठेवतात.
नववीच्या द्वितीय मराठी भाषेच्या पुस्तकातील 'पन्हाळादर्शन' हा पाठ शिकवताना नेटवरून पन्हाळ्याशी संबंधित प्रकाशचित्रे दाखवल्याने बुरूज, खिंड, कडा इ. शब्द समजवणे शक्य झाले, तसेच कंटाळवाणा धडा थोडा रंजक करता आला. दहावीचा से.ले.रामराव राणे हा पाठ शिकवताना काश्मीरचा नकाशा, तोफांची चित्रे दाखवली.
र्हस्वदीर्घाचे नियम आणि वाक्यप्रकार (विधानार्थ, प्रश्नार्थ) शिकवलेत आणि ते डोक्यात बर्यापैकी बसलेय. माधुरी पुरंदरेंच्या 'लिहावे नेटके'चा आधार घेतोय.
विभक्तीप्रत्यय शिकवणे सगळ्यात किचकट असेल असे वाटतेय.
१. पहिलीते दहावी घेणारे अनेक
१. पहिलीते दहावी घेणारे अनेक लोक असतात.
) पाचवीच्या पुढची पोरे गावात कुठूनही कुठेही जाऊ शकतात.
२. या गटाला सायक्लो स्टाइल नोट्स मी तरी कुठे पाहिल्या नाहीत.
३. शक्यतो, ५- १० घ्या. १-४ शिकवणी म्हणजे दंगा असतो. पालकांची मागणी असते आमची दोन पोरं एक पहिलीत एक चौथीत.. दोन्ही एकदमच पाठवणार... एकाच वेळेत घ्या.... त्यामुळे १-४ एकाच तासात घेऊशकता..
१-४ मध्ये जास्त लांबची पोरे येत नाहीत... जवळच्या गल्लीबोळातीलच येतात.... त्यामुळे चार किंवा किमान २-२ वर्ग एकत्र घेतलेत तर चालेल. ( तरच परवडेल..
४. स्कॉलरशिप हल्ली शाळेतच जादा तास घेतात.. आधी चौकशी करा.... शिवाय क्लास डेवलप व्हायला स्कॉलरशिपचा उपयोग शून्य आहे.. कारण तो एकच वर्ष असतो.. जर रेग्युलर रोजचा विषय घेतलात तर चौथी चा पाचवीत, पाचवीचा त्याच्या पुढच्या वर्षी वगैरे येत राहीलच. तसा फायदा स्कॉलरशिपला नाही.
५. पाचवी ते सातवी मराठी आणि सेमि दोन्हीचा पोर्शन्सोपा आहे.. त्यामुळे आम्ही दोम्ही मुले एकाच तासात घेतो. एकाच ठिकाणी दोन फळे.. एक यांचा एक त्यांचा.... आधी मराठीतुन सांगणे... ते सेमि वाले ऐकतातच.. मग त्याना तेच पान इंग्रजीत सांगणे... दोघाना शेवटी सगळे क्वेश्चन डिक्टेट करुनही एकच तास अभ्यास घेऊन आमचा पोर्शन शाळेच्या पुढे आहे. पोरे खुश आहेत.
६. ५- ७ साठी दोन दिवस सायन्स, दोन दिवस गणित आणि दोन दिवस इंग्रजी.
७. सध्या १-७ सुरु आहे. पुढच्या वर्षी १-४ बंद करुन याच पद्धतीने ८-१० सुरु करणार आहे.
८. पण ८-१० साठी मराठी + सेमि एकत्र घ्यायला रोज दीड तासाची ब्याच घ्यावी लागेल. ते प्लॅनिंग या वर्षी करून मग सुरु करणार.
९. दर महिन्याच्या शेवटी तीन दिवस तीन पेपर.. रोजे एका विषयाचा.
१०. नुसते गणित, नुसते संस्कृत, नुसते इंग्रजी असेही घेतात.. त्यांच्या प्लॅनिंग बद्दल कल्पना नाही. शक्यतो तीन विषय घेणार्याना जास्त डिमांड असते.
इथून पुस्तके पाहून प्लॅनिंग करा... http://balbharati.abweb.in/ , http://balbharati.abweb.in/index1.htm
११. फार पूर्व तयारीची गरज नाही..
१२. आता नवा क्लास चालू करणे अशक्य आहे.. जुलै महिना आला. तरी पेप्रातून पँप्लेट टाकून बघा. जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात बाहेर पडली पाहिजे, तसेच क्लास सुरुही झाला पाहिजे, तर पोर्शन पूर्ण होतो.
मराठी विषयाचे चे क्लास घेतात
मराठी विषयाचे चे क्लास घेतात हे आजच ऐकले..... इंग्लिश, विज्ञान, गणित हेच विषय चालतात.. संस्कृत वगैरे क्वचित. बाकी विषयाचे क्लास बहुदा कुणी लावत नाही. मराठी म्हणजे मराठी विषय म्हणताय की माध्यम ? मी मराठी माध्यमाबद्दल लिहिले आहे.
प्लॅनिंग केलेत तर क्लास चालेलच... ते नसेल तर 'शिकवणी अमर रहे' म्हणायची वेळ येईल
जाईजुई यांनी मराठी
जाईजुई यांनी मराठी प्रथम/तृतीय भाषा असे लिहिले आहे.
मुंबईसारख्या ठिकाणी मातृभाषा मराठी नसलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या शिकवणीची गरज असू शकते.
मयेकरजी, इंग्रजी (धेडगुजरी)
मयेकरजी,
इंग्रजी (धेडगुजरी) माध्यमाच्या मातृभाषा मराठी असलेल्या विद्यार्थ्यांनाही मराठी शिकवणी गरजेची आहे.
माझी बहिण घरी क्लासेस घेते
माझी बहिण घरी क्लासेस घेते आहे गेले ३-४वर्ष. पहिली काही वर्ष छोटीच मुल येत होती आता मोठी ही येतात. गेल्यावर्षी दोन दहावीची मुल होती पण अगदी दिव्य ज्ञानी होती (म्हणुनच कदाचित तिच्या छोट्या क्लासमध्ये येत होती ) पण तिने त्यांच्याकडून मेहनत करवुन घेतली आणि ते ४०-४२% मिळवुन पास झाले. ह्यावर्षी तिच्या कडे ८-९वी ची थोडी मुल आहेत त्यांच इंग्रजी फार कच्च आहे. ती १०वीत जाण्याआधी ते सुधाराव म्हणुन त्यांचे पालक तिच्याकडे एक्स्ट्रा क्लासची मागणी करत आहेत. त्यांना नक्की काय शिकवाव व कुठून सुरवात करावी हे तिला समजत नाही आहे. याबाबत कुणी मदत करु शकेल का? कोणती पुस्तक वापरावीत ते ही सुचवा.
मराठी विषयाचे चे क्लास घेतात
मराठी विषयाचे चे क्लास घेतात हे आजच ऐकले>>> क्लास कुठला लावायचा यावर जरी क्लास काढलात तरी त्याला गर्दी होइल.
भरत अगदी डिप्लोमा इंजिनियरींग ला आलेल्या बर्याच मुलांची अवस्था अशीच आहे. तो सब्जेक्टच वेगळा आहे.
मी सी.ए. झाल्यावर ठाण्यात ३
मी सी.ए. झाल्यावर ठाण्यात ३ वर्षे, अकाऊंट्स आणि इनकम टॅक्स शिकवत होतो. सी.ए. झाल्यावर प्रॅक्टीस करायची नाही, हे आधीच ठरले होते. पण विषयाशी संपर्क रहावा म्हणून शिकवत होतो.
इथे माझे विषय मी प्रॅक्टीकल पद्धतीने शिकवायचो, ते शिकून त्या काळात तरी स्वतंत्र सल्लागार होता येईल इतपत तयारी मी करून घेत असे. मला जे अति उत्तम शिक्षक लाभले, त्यांचा वारसा पुढे चालवला.
पण आता माझाच भारतीय करांशी संपर्क तूटल्याने, आता ते शक्यच नाही.
इथे मला अधून मधून, पाककलेचे वर्ग घ्यायचा आग्रह होत असतो, पण त्याचे तंत्र मला अवगत नाही.
Pages