खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 28 June, 2012 - 11:43

खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.

हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.

१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी
५. दिवसभराचे टाइम शेड्युल / इंग्रजी- मराठी माध्यमे हे सगळे कसे मॅनेज करतो? याबाबतचे अनुभव.
६. एखाद्या इयत्तेसाठी एखादे चांगले पुस्तक, सीडी, गाइड असे काही रिकमांड करायचे असेल तर तेही लिहा.
..
..
शिकवणीला जानारे लोक/ पालक यांचीही मते, अनुभव असू शकतील. जे इथल्या व्यवसाय करनार्‍या लोकाना उपयोगी ठरु शकतील.

या व अशा अनेक गोष्टींच्या चर्चेसाठी हा बीबी आहे. ( खाजगी क्लासेस सत्य की थोतांड ? हा विषय इथे अपेक्षित नाही. Biggrin Proud ) हा बीबी शिक्षण याही विभागात ठेवायचा होता, पण तिथे फक्त परकीय शिक्षणाबाबत चर्चा आणि लिमिटेड लोकाना सामील व्हा, असे काहिसे दिसले, म्हणून व्यवसाय विभागात हा धागा उघडला. शिक्षण विषयाकडे हा धागा 'वर्ग' केलात तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही संख्या अगदी कमी आहे, हे मान्य. माझे काही परिचित, वडिलांचे शिक्षक, एकदोघं मित्र असे खाजगी शिकवण्या घेतात. मी त्यांच्या वर्गांमध्ये बसलो आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी असे विषय मुळातून विद्यार्थ्यांना समजवून सांगणं, त्यांना विषय इतका उत्तम यायला हवा, की उत्तरं पाठ करायची गरज भासणार नाही, याची काळजी घेणं, गाइडं वापरू नका, हे सांगणं, मी बघितलं आहे. ही मंडळी व्यवसाय म्हणून, किंवा आवड म्हणून खाजगी शिकवण्या घेतात. पण शाळांपेक्षा जास्त चांगलं शिकवतात, असं माझं मत आहे. (या लोकांकडे येणारी मुलं ज्या शाळांमध्ये जातात, त्या शाळा मी बघितल्या आहेत, अकोला, नागपूर आणि पुणे इथल्या, म्हणून असं विधान करतो आहे. )

सध्याच्या शिक्षणपद्धतीमधे असलेल्या त्रुटींवर (पाठांतर, गाईड्स, पाठ करून निबंध इ.)काही सोल्यूशन म्हणून कोणी खाजगी शिकवणीत प्रयोग केले आहेत का ?
उदा. व्यक्त होणारे लिखाण इ.

@ मेधा ~ अहो कॉफी मिळणार असेल तर मग मी तुम्हाला शेक्सपीअरच काय तर अगदी चॉसर आणि ख्रिस्तोफर मार्लोव यांच्या काळापासून इंग्रजी शिकवायला सुरुवात करीन.

खरं सांगायचं झाल्यास कॉलेज आणि विद्यापीठ सुटल्यानंतर त्यापुढील चारपाच वर्षे नोकरीत अशी काही ड्राय गेली की एखाद्या सुन्न करण्यार्‍या भूभयाण रात्री ऑडिटच्या गावी रेस्ट हाऊसच्या अंगणात बाजल्यावर एकट्याने पडून वर आकाशातील तार्‍यांकडे पाहताना मनी असे विचार यायचे की, नेमक्या कोणत्या कारणासाठी आपण इंग्लिश विषय निवडला ? का शिकलो इतके? काय उपयोग होत आहे ह्या इंग्लिशच्या ज्ञानाचा माझ्या सध्याच्या सरकारी नोकरीत ? मग त्याच खिन्न अवस्थेत जर त्याच गावात शनिवारी रविवारी राहणे भाग पडले तर स्थानिक शाळेतील शिक्षकांना विनंती करून तिथल्याच सहावी सातवीच्या मुलांसाठी मी गंमत म्हणून इंग्रजीचे काही प्राथमिक पाठ देण्यास सुरू केले, जे दोन्ही पक्षांना भावले. त्यातून मलाही थोडाथोडा विश्वास येऊ लागला की जरी थेट मी शिक्षक नसलो तरीही हौसेखातर का होईना विद्यादानाचे एक चांगले कार्य तर माझ्या हातून होईलच शिवाय इंग्रजी वाचनाची भूकही त्या निमित्ताने भागत जाईल. झालेही तसेच.

@ भरत मयेकर ~ शिकवणीसंदर्भातील माझा अनुभव तुम्हाला आवडला हे वाचून मलाही तितकाच आनंद झाला. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए.इंग्लिश सिलॅबसमध्ये 'इंडियन रायटिंग इन इंग्लिश' असा १०० मार्क्सचा एक पेपर असतो. या अंतर्गत नेमस्त केलेले लेखक कवि आणि समीक्षक यांच्या साहित्यांचे वाचन पूर्वी मी विद्यार्थी असताना हुकले होते, पण 'शिकवणी' च्या प्रसंगाने ही मंडळी अगदी उरी भेटावी तशी भेटल्यावर मला झालेला वाचनाचा आनंद पाहून माझे विद्यार्थीही अचंबित झाले होते. इंग्लिश साहित्याची ही मोहिनी जबरदस्त अशीच आहे.

कॉलेजमध्ये असताना परिस्थितीमुळे शिकवणी केली....ज्या पालकांना कदाचीत स्वत: शिकवायला वेळ नसेल अशी काही मुलं होती...मुख्य गणित आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि कधीतरी हिंदी..

त्यांना गणित शिकवायचा (कमाई सोडून) मला फायदा असा झाला की माझीच उजळणी झाली...काही मुद्दे विसरल्यासारखे किंवा तेव्हा न कळलेले आणि मी मराठी माध्यमात शिकले पण शिकवण्या इंग्रजी माध्यमातल्या त्यामुळे माझे तेच विषय इंग्रजीतूनही शिकून झाले....:)
कॉलेजमध्ये जाणार्^यांनि खरं तर फावल्या वेळात छोट्या मुलांना (सोसायटी इ. तल्या) गरज असेल त्याप्रमाणे पैसे घेऊन किंवा न घेता अशा प्रकारे शिकवल्यास खरं तर एक प्रकारे वेळ सार्थकी लागेल असं हे लिहिता लिहिता मनात आलं...:)

मी गेल्यावर्षापासून बी.एस्सी ला बायोटेक विषय शिकवीते. आणि ११ वीतली तीन मुले घरी बायो शिकण्यासाठी येतात. तीघही जण ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे. विषयबद्दल "फक्त जबरदस्तीने घ्यावा लागलेला विषय" इतपतच आवड. शिकवणीसाठी मी सांगितले नाही किंवा मुले स्वतः विचारायला आली नाहीत. असेच एका मुलाच्या वडीलांसोबत मेकॅनिकच्या दुकानात बोलणे झाले आणि तिघेजण यायला लागलीत.
अकरावीतल्या मुलांना अगदी मुळापासून शिकवीताना मझी विषयाची उजळणी होत होती. काही अवयवांचे काम समजावून सांगताना मग युट्युब हाताशी आली. अर्थात हे सगळे मोठ्या खजगी क्लासेस मधे रोजच असतात पण माझ्यासाठी तो एक नवीन अनुभव होता. मुलांनासुधा विषय आवडू लागला. परिणाम असा झाला की ते आता बारावीसाठी पण शिकायला येत आहेत.
शिकवण्यांचे मी पैसे घेते . कारण कॉलेजमधे मी " कंत्राटी" आहे Proud

रितेशद१३ यांची "शिकवण्यांचे मी पैसे घेते, कारण कॉलेजमधे मी " कंत्राटी" आहे" ही कबुली स्वागतार्हच मानली पाहिजे. "विद्यादान" कितीही पवित्र म्हटले जाणारे कार्य असले तरी ते मोफत देवूही नये, घेणार्‍याने घेवूही नये. माझ्यासारखे जे काही फुटकळ लोक क्लासेससाठी 'फी' आकारत नाहीत, त्यांच्याकडे उत्पन्नाची अन्य भक्कम स्त्रोत्रे असू शकतात. सरकारी नियमांचे मी पालन करीत असल्याने वेतनाव्यतिरिक्त अन्य आर्थिक कमाई मी करीत असेन तर माझ्या लेखा विभागाला त्याचा गोषवारा देणे माझ्यावर बंधनकारक असते.....इन्कमटॅक्ससाठी.

दुसरीकडे मी थेट 'आर्थिक' लाभ मिळवित नसलो तरी मूळ प्रतिसादात दिलेल्या कबुलीप्रमाणे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकडून वर्षाअखेरीस मिळणार्‍या कौटुंबिक भेटी स्वीकारण्यामध्ये मला संकोच वाटत नाही. कारण शेवटी तशा भेटी या त्यांच्या प्रेमाचा आणि शिक्षकापोटी असलेल्या कृतज्ञतेचा भाग समजण्यास हरकत नसावी.

कॉलेजमध्ये 'कंत्राटी' [ज्याला सरकारी भाषेत On Contract Basis किंवा On Clock Hour Basis...तासिका तत्वावर असे म्हटले जाते. अगदी पीएच.डी. वाला, नेट/सेट वालाही ९० रुपये तासिकेवर तिथे नाईलाजास्तव हजेरी लावतो, हे पाहून त्याच्या क्वालिफिकेशचा तो अपमान वाटतो. पण असो, तो विषय सर्वस्वी वेगळा आहे.] पद्धतीने नियुक्त्या झालेल्या प्राध्यापकांचे वेतन किती तुटपूंजे असू शकते याची मला पूर्ण आणि अधिकृत कल्पना आहे. सबब त्याना आपल्या उत्पन्नाला बळ देण्यासाठी जर शिकविण्या घ्याव्या लागल्या तर त्याचा मोबदला त्यानी जरूर घेतला पाहिजे.

अशोक पाटील

अभियांत्रिकी स्पर्धा/प्रवेश परीक्षांसाठी ट्युशन घेणार्‍यानी कृपया अनुभव लिहाल का?

अवांतरःएखादा अतिशय हुशार विद्यार्थी असेल आणि त्याला थोडे मार्गदर्शन करुन मदत होणार असेल (आणि त्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नसेल) तर नाममात्र किंवा फुकट शिकवणे ठीक आहे पण सरसकट फुकट शिकवणे मला बरोबर वाटत नाही. आणि सप्लीमेंटल इन्कम साठी कोणी ट्युशन घेतल्या तर त्यात वावगे काय आहे?

एम्.एस्सी केल्यानंतर लगेच बाबांची बदली पुण्याला झाली. आयुक्काच्या आवारातच नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च प्रॉजेक्टच्या क्वॉर्टरला रहात होतो. जवळपास कुठे क्लासेस नाही म्हणुन शेजारच्या काकुंनी विचारल्यावर त्यांच्या २ मुलींना शिकवण्याचे कबुल केले व १ वर्ष शिकवले. मुली ५वी व २रीतल्या.
अर्थातच मी ही शिकाऊ असल्याने पैसे घेत नव्हते पण काकु बळजबरीने महीना झाला की ५० रु. हातात कोंबायच्या. सुदैवाने मुली चांगल्या मार्कांनी पास झाल्या. Proud
पण आता घरी पोरालाही शिकवणं जमत नाही. Sad

खरं तर रिटायर्मेंट नंतर इन्कम सोर्ससाठी हाच उद्योग सुरु कराय्चा विचार आहे. इथे तुमचे अनुभव नक्की टाका लोक्स. मला उपयोग होईल.

या विषयावर काही लिहील तर इन्कमट्याक्स वा शिक्षण विभागाची धाड पडणार नाही याची खात्री काय आहे? Wink

अशोकजी, ज्याला स्वतःस आकललेले दुसर्‍यास "शिकवण्याची" आत्यन्तिक उर्मी अस्ते, तो माणूस कधीच स्वस्थ बसत नाही. तुमचे देखिल असेच आहे असे वाटते.
(अवांतरः ज्योतिषाच्या भाषेत "गुरु ग्रह" चान्गला असेल तर माणूस दुसर्‍यास "मार्गदर्शन" या अर्थी शिकविणारा असा असतो. त्यातुन रवि देखिल चांगला असेल, तर "शिकवणे" हा त्याचा धन्दा नस्तो, इतर ग्रह, कोणत्या विषयात शिकवील ते ठरवतात! असो)

माझे दत्तक वडील आणि सासू बाई पुण्याच्या एस. एन डीटी महा विद्यालयात संगीत शिकवत त्यामुळे फार आधी पासून म्हणजे १९५१ - ५२ पासून वडिलांचा गावात व मग डेक्कन वर घाटे संगीत विद्यालय हा क्लास होता. कॉलेजात असताना ते शिकवत नसत पण मी सहावी असताना ते रिटायर झाले व पूर्णवेळ शिकविण्या चालू केल्या.
चिल्ल्या पिल्ल्या फुलपाखरी वयातील मुलींचा क्लास ते पस्तिशीपुढील ललनांचा विशारदचा क्लास असे वर्ग असत. ती पुस्तके लावणे, क्लास झाल्यावर तंबोरे पेट्या जागेवर ठेवणे हे मी कधी कधी करत असे. गांधर्व महा विद्यालयाच्या परीक्षा घेतल्या जात. एकदम बिजी शेड्यूल असे बाबांचे. त्या व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचा रियाज, अभ्यास, संशोधन असे चालत असे. क्लासेस चालू असताना बाहेर उभे राहून ऐकणे व सूर मिळविणे हे माझे आवड्ते काम होते. संध्याकाळी सर्व मुलींची बॅच मर्म बंधातली ठेव ही व अशी गाणी म्हणायला लागले की मन आनंदाने भरून येई.

साबा अगदी आताआता परेन्त संगीत शिकवत. त्यात कॉलेजातील बीए एम एचे वर्ग, स्पेशल क्लासेस, बालाजी तांब्यांच्या इथे येणारे परदेशी विद्यार्थी इत्यादी कायम येत. साबा चीजा नव्याने बनवून पण शिकवत. ह्या सर्व विद्यार्थिनी घरच्याच होत.

इकडे माझी बायॉलॉजिकल मदर शिक्षिकाच शाळेतून एकाठिकाणी क्लासेस घ्यायला जात असे व नऊ वाजेपरेन्त रात्री शिकवून मग घरी येऊन बहिणींना शिकवत असे. ह्यासर्वांनी आमची शिक्षणे लग्नकार्ये इत्यादी साठी ट्यूशन्स वर भर दिला होता.

शिकविताना फार मेहनत असते व थकवा येतो. मधल्यावेळात स्वतःचे खाणे व इतर कामे करावी लागतात.
मी स्वतः लोकांना चित्रपटातील सुगम संगीत शिकविले आहे. व हैद्राबादेत एका इन्स्टिट्यूट मधे क्रिएटिव रायटिंग चा पेपर शिकविला आहे. पर अवर बेसिस. Happy

नववी, दहावीत असताना गणिताचे एक सर क्लास घेत उत्कर्ष लायब्ररीच्या गल्लीत. व तांबे सर मराठी स्पेशल शिकवत. गरवारेतले पट्वर्धन सर इंग्रजी शिकवत. कमला नेहरू उद्याना समोर एका बंगल्यात श्री व सौ ओक
गणित, शास्त्र, इंग्रजी शिकवत. एक वेगळी खोली होती. ओक बाई ग्रेट होत्या. कॉलेजात जोग सरांचे क्लास लावलेले. ते केमिस्ट्री फार छान शिकवत. एक बायॉलॉजीचे सर रानडे ते ही फार थाटात बायॉलोजी शिकवत.
एक शब्द होता रामेंटा तो आला कि फिदिफिदी हसायचे असे माझा व एका मैत्रीणीचा पॅक्ट होता. एक दिवस सरांनी बाहेर काढलेले.

हैद्राबादेत. सीएस ट्राय करताना रेड्डी सर अकाऊंट्स, इनकम टॅक्स शिकवत ते क्लासेस लावले खरे पण मन कधीच त्यात रमले नाही. सर फार मस्त शिकवत पण माझे मन इकडे तिकडे भिरभिरत असे.

अवांतर : लिंबुजी गुरु हा ज्ञान देण्याचे म्हणजे वाटण्याचे काम करतो, बुध ते घेण्याचे काम करतो, म्हणजे ग्रास्पिन्ग पॉवर ज्याची उत्तम असते त्यांच्या पत्रिकेत बुध देखील पॉवरबाज असतो. अशोकजींनी छान लिहीले आहे, तसेच त्यांचे कौतुक की ते या पवित्र कामात मनापासुन सहभागी झाले. बाकी शिक्षक ( पेशाने नव्हे पण मनाने आणी तनाने देखील आहेत ) त्यांचे पण कौतुक. छान वाटले वाचुन.

कमलाबाई धागा उत्तम काढलात.

हा धागा वाचताना जाणवले, अरे कधी काळी आपणही थोडेफार शिकवले आहे!

बारावीच्या मुलींना अकाउंटस, इको. एम बी ए च्या मुलांना अकाउंटस, हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांना कॉमर्स संबंधी विषय असं मधुन-मधुन! पैसे मिळावेत ही अपेक्षा होती असे नाही पण मिळत गेले.

सगळ्यात लक्षात राहिलेली शिकवणी. इथे येण्यापुर्वी मी ज्या कंपनीत काम करायचे त्या कंपनीचे एक जी एम जे स्वतः सी ए आहेत, त्यांनी त्यांच्या नुकत्याच अकरावीत प्रवेश घेतलेल्या मुलीला कॉमर्सचे सगळेच विषय शिकवण्याची विनंती केली. त्यांची मुलेगी दहावी मराठी माध्यमातुन झालेली असल्याने अकरावीत तिला कठीण वाटत होते. तिचा कॉन्फिडन्स वाढवण्याचे काम त्यांनी मला दिले होते. रोज ऑफिस सुटल्यावर त्यांच्या घरी जाऊन तिला शिकवायचे. सरांच्या घरी जॉईन्ट फॅमिली होती. त्यामुळे गजबजलेल्या घरात एका कोपर्‍यात बसुन शिकवणी चालायची. सहा महिन्यांनंतर तिला कॉन्फिडंट वाटु लागले/वर्गातले समजु लागले तेव्हा मी तिला शिकवणे बंद केले. पैसे घ्ययला मी नकारच दिला होता पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले, तु भरपुर कष्ट घेतले आहेत, मी तुझा बॉस आहे हे विसरुन जा, वगैरे त्या काळाच्या मानाने बरीच घसघशीत रक्कम दिली होती!

मला शिकवायला खूप आवडतं. अधे मधे ओळखीतल्या/ आजुबाजुच्या मुलांना गणितात मदत करत होते तेव्हा पैसे घेत नव्हते. आता १० वी चं हिंदी शिकवणी म्हणुन सुरू केलय त्याचे मात्र पैसे घेते. किती ते मी सांगितले नाही पण इतर ठिकाण देतात तितके द्यायला सुरूवात झाली मग तेच सुरू राहीलं. पैसे घेण्याचं कारण असं की नाही घेतले तर त्याची इथे तरी किंमत रहात नाही आणि काहीवेळा लोक खूप गृहीत धरतात. पैसे घेतले की निदान आपण मुर्ख आहोत असं वाटत नाही.

छान प्रतिसाद येत आहेत.
<<
हो ना!
अग्दी गोग्गोड प्रतिसाद.
सगळे कसे ज्ञानाचे दान द्यायला निघालेत अन रच्याकने कुणी स्वखुशीने दक्षिणा देतेच आहे म्हणून नाईलाजाने स्वीकारतही आहेत.
गुरू उच्चीला अन पाठबळ सूर्याचे. सगळे विद्यार्थी बुधवारीच जन्मलेले! वा!
उष्ट्राणांहि विवाहेषु...

***
-पहिली/दुसरी च्या 'सर्व' विषयांची ट्यूशन फक्त ४-५ हजार रुपयात घेणारे..
-इंग्लिशच्या 'मिस' चे एक अंकल ट्यूशन घेतात. तिथे जाणार्‍या गर्ल्स बॉइजनाच चांगले मार्क्स मिळतात....
-फिजिक्स चे लेक्चरर घरी येऊन 'मार्गदर्शन' करतात. लिमिटेड लोकांनाच हं. तुझे ८-१० च फ्रेंड्स. बाकी इंटर्नल चे २० मार्क असतात हो १२ला..
-१२वी? अन आमच्या कडे अ‍ॅडमिशन? ह्यॅ! ८वी पासून अ‍ॅडमिशन घेतली तरच आम्ही सीईटीचे क्लासेस घेतो. सीईटी चे फक्त १२ के. अन आमच्या फुल झाल्यात ऑलरेडी...

हे असले प्रकार कुणी ऐकले/अनुभवलेच नाहियेत का?

डॉक्टर.....जरूर ऐकले आहेत आणि प्रत्यक्षात अनुभवलेही आहेत मी स्वतः तुम्ही उल्लेखिलेले संतापजनक प्रकार. या प्रथेविरूद्ध माझ्या खात्यातर्फे उच्च शिक्षण अनुदान खात्यातील [Higher Education Grants] काही जबाबदार अधिकार्‍यांना व्यक्तीशः विनंती करून शासकीय गलेलठ्ठ पगार घेऊनही 'खास घरी' जाऊन वा विद्यार्थ्याला घरी बोलावून स्पेशल ट्यूशन्स देणार्‍या लेक्चरर्स यांची रितसर चौकशी करण्यास भाग पाडले होते.

काय रिझल्ट्स आले त्यातून ? सांगितले तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. बायोकेमिस्ट्रीचे दोन प्राध्यापक, प्लॅन्ट प्रोटेक्शनच्या एक मॅडम, स्टॅटिस्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे प्रत्येकी एक आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे एक प्राध्यापक त्या शोध मोहिमेत रंगेहाथ सापडले. आता कायद्यानुसार त्यांच्यावर खात्यातर्फे कारवाई करणे आले. विद्यापीठाला नित्याच्या कोर्टकचेर्‍याचे नियम लागू नसून तिथे 'ट्रायब्यूनल' असते. त्यांच्यासमोर हे खेंगटू उभे करायचे म्हणजे संबंधित मुलामुलींच्या जबान्या घेण्याचे किचकट काम आले. या गोष्टीला तीन दिवस झाले असतील नसतील तर ट्यूशनला जाणार्‍या मुलांच्या पालकांनी (जे स्वतः उच्चशिक्षित, उच्चपदस्थ होते) आपल्या मुलांना कोणत्याही कागदपत्रावर सह्या करण्यास प्रतिबंध घातला. मुलांनी तर स्पष्टपणे आधीच नकार दिला होता. "काही शंका निरसन करण्यासाठी सरांनी आम्हाला घरी बोलाविले होते...." बस्स इतकीच जबानी, अन् तेही तोंडी.

कायदा सांगतो पुरावा द्या. रेड हॅण्ड पकडले हे ठीक पण ते लेक्चरर्स पैसे घेऊन शंकानिरसन करीत होते हे सिद्ध करणे अशक्यप्राय असे काम झाले. अधिकारी वर्गाने हताशपणे फक्त संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांकडे त्या लेक्चरर्सविरुद्ध तक्रार केली. त्यावर प्राचार्यांनी 'योग्य ते जरूर करतो' असे भेंडीभात बुळबुळीत आश्वासन दिले. संपला तो कारवाईचा फार्स. महिना दोन महिन्यानंतर "उद्या परत हाच खेळ" सुरूही झाला.

ही झाली शिक्षक पदाचे रितसर शासकीय वेतन घेणार्‍यांच्याबाबतीतील रामकहाणी. मग ज्या योग्य ती शैक्षणिक अर्हता धारण करणार्‍या व्यक्ती आहेत (एम.ए.; एम.कॉम.; एम.एससी; नेट सेट, बी.एड. एम.एड.. पीएच.डी. सुद्धा) आणि आजही त्याना शिक्षकाच्या/प्राध्यापकाच्या नोकरीपासून वंचीत राहावे लागले आहे, अशानी स्वत:चे नियम स्वतःच बनवून खाजगी क्लासेस चालविले (आणि बर्‍यापैकी यशही मिळविले) तर मग त्यांच्या नियमांना आपण डोळे वटारून चालणार नाही. मान्य नसेल तर आपल्या पाल्याला तिथे शिकवणीला न पाठविण्याचे स्वातंत्र्य संबंधित पालकांना असतेच असते.

(वर तुम्ही प्रतिसादात एक वाक्य लिहिले आहे :: "कुणी स्वखुशीने दक्षिणा देतेच आहे म्हणून नाईलाजाने स्वीकारतही आहेत." या व्याख्येत मी जरूर बसतो, म्हणून नम्रपणे सांगू इच्छितो की, माझ्या शिकवणीपोटी मी स्वीकारलेल्या भेटी [ज्याची बाजारी किंमत करणे देणार्‍याचा अवमान करण्यासारखे होईल] ह्या नाईलाजाने स्वीकारल्या नसून मुलांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणूनच घेतल्या होत्या. उद्यमनगरमध्ये काम करणार्‍या एका लोहाराच्या मुलीने १० वी उत्तीर्ण झाल्यावर स्वयंपाकघरात येऊन एक सांडशी आणि चिमटा भेट म्हणून दिले, जे मी अत्यंत आनंदाने स्वीकारले होते. इथे या वस्तूंची किंमत पैशात कशी काय करता येईल ? शिष्याकडून येणार्‍या भेटवस्तू "नाईलाजाने" स्वीकारता येत नसाव्यात अशी माझी धारणा आहे. असो)

अशोक पाटील

वेगळाच आणि छान धागा Happy

मी १२वी झाल्यानंतर २ वर्षं ५वी ६वी च्या २ मुलांना शिकवलं होतं. एका मुलाला सगळे विषय आणि एका मुलाला गणित, इंग्रजी. स्वतःच्या कॉलेजची फी व शिक्षणाचा इतर खर्च स्वतः करायचा या भावनेतून शिकवण्या केल्या होत्या. नंतर रैना म्हणते तसं गुंतत गेले व त्रास व्हायला लागला. मुलांनी अभ्यास केला नाही तर स्वतःवरच चिडायला होऊ लागलं तेव्हा सोडून दिलं. गिरगावात धुण्या भांड्याला गडी असत. त्यांच्या मुलांना मी पैसे न घेता किंवा त्यांचा पगार न कापता किंवा जास्तीचं काम न करवून घेता शिकवत असे. पण त्यांनाच शिकायची इच्छा नसल्याने मारुन मुटकून शिकवणं मला जास्त जमलं नाही. ती मुलं ७-८वीत शाळा सोडून बसली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं.

माझ्या आईने मात्र १० वर्षं ५वी ते १० वी गणित आणि इंग्रजीच्या शिकवण्या घेतल्या. एक एक तासाच्या ५ बॅचेस असायच्या. रविवारी सुट्टी असे. मुलं जमिनीवरच सतरंजीवर बसत. वहीखाली धरायला बाबांनी मस्तपैकी फळ्या तयार करुन दिल्या होत्या. मी आणि भाऊ मात्र तिच्यापाशी बसून कधीच अभ्यास केला नाही. मुलं आमच्याकडे शिकवणीला यायची आणि त्यावेळेला मी मात्र खाली अंगणात मैदानी खेळ खेळत बसे. भावाच्याच वर्गातला जेमतेम ५०-५५% मिळवणारा एक मुलगा ६-७वीला आईकडे गणित आणि इंग्रजीसाठी येऊ लागला. अभ्यासाची एकंदरच गोडी त्याला कमी होती. पण नंतर त्याचे या दोन विषयांमधले मार्क्स वाढू लागल्यावर त्याला आपसुकच इतर विषयांचाही अभ्यास करावासा वाटू लागला. असं करत करत त्याला १०वी ला ८२% मिळाले. नंतर तो मुलगा चक्क सी.ए. झाला Happy गेल्या आठवड्या पुण्याला एका लग्नाला गेले असताना तो मुलगा तिथे दिसला होता पण आता आई नाही हे त्याला सांगायचा धीरच न झाल्याने त्याला मनाविरुद्ध टाळलं. आई तिच्या लग्नाआधीही शाळेत शिक्षिकाच होती, पण मुंबईत आल्यावर एकत्र कुटुंब, मुलं, जबाबदार्‍या पार पाडताना मी ४थीत गेल्यावर तिने पुन्हा शिक्षकाची भुमिका घ्यायचे ठरवले होते. संसाराच्या गाड्याला हातभार, आजोबांचं प्रोत्साहन आणि शिक्षिकेचा पिंड असल्याने मनाचंही समाधान.

ज्यांना शिकवण्याची आवड आहे पण फार वेळ देऊ शकत नाहीत किन्वा कमिटमेंट नको आहे अशांसाठी नवा पर्याय उपल्ब्ध आहे. आपल्या शिकवण्याचे व्हीडेओ तयार करून ऑनलाईन चढवू शकता. आजकाल विशेषकरून सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिन्ग चे असंख्य ट्रेनिंग विडीओ ऑनलाईन फ्री उपल्ब्ध आहेत. जर उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही चिकाटीने प्रयत्न चालू ठेवलेत तर आर्थिक प्राप्ती पण होऊ शकते.

पहिली/दुसरी च्या 'सर्व' विषयांची ट्यूशन फक्त ४-५ हजार रुपयात घेणारे..

त्यात वावगे काय आहे ? त्या ट्युशनला जायची प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष सक्ती होत नाही तोवर त्यात काही वावगे नाही.

-इंग्लिशच्या 'मिस' चे एक अंकल ट्यूशन घेतात. तिथे जाणार्‍या गर्ल्स बॉइजनाच चांगले मार्क्स मिळतात....

हे मात्र निषेधार्ह आहे.

-फिजिक्स चे लेक्चरर घरी येऊन 'मार्गदर्शन' करतात. लिमिटेड लोकांनाच हं. तुझे ८-१० च फ्रेंड्स. बाकी इंटर्नल चे २० मार्क असतात हो १२ला..

हेही चुकिचे आहे. युजीसी स्केल वर पोत्याने पगार ओढणार्‍या प्राध्यापकांना ट्युशन घ्यायला बंदी हवी.

-१२वी? अन आमच्या कडे अ‍ॅडमिशन? ह्यॅ! ८वी पासून अ‍ॅडमिशन घेतली तरच आम्ही सीईटीचे क्लासेस घेतो. सीईटी चे फक्त १२ के. अन आमच्या फुल झाल्यात ऑलरेडी...

इथेही काही चुकिचे नाही. मागणी तसा पुरवठा हा बाजारपेठेचा नियमच आहे. इथे अमेरिकेत शालेय शिक्षण मोफत आहे पण वर्षाला चाळीस हजार डॉलर्स फी घेणार्‍या खासगी शाळाही आहेतच.

<हे असले प्रकार कुणी ऐकले/अनुभवलेच नाहियेत का?>

आलेले बहुसंख्य प्रतिसाद 'हौशी' शिकवण्या घेणार्‍यांचे आहेत. मीही त्यातलाच एक. आमच्या शाळेत शिक्षकदिनी दहावीचे विद्यार्थी शाळा चालवायचे. मी दहावीत असताना आठवीच्या वर्गांचा संस्कृतचा वर्ग घेतला होता. तेव्हाच कुठेतरी हे काम करायला मला आवडेल असे बीज रुचले होते; पण शिकवण्याबरोबर ६० मुलांचा वर्ग हाकणे अजिबात झेपणारे नाही, असेही वाटले. करियरची वाट ठरविताना पोटासाठी , घरच्यांसाठी....असल्या शब्दांत शिक्षक हा शब्द दिसणे शक्य नव्हते. वर अशोक यांनी लिहिल्यासारखीच स्थिती (हे लिहिताना मला श्याम मनोहरांचे 'उत्सुकतेने मी झोपलो' आठवतेय.) आता पैसे कमविण्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही अशा स्थितीला आल्यावर हाती पुस्तक आणि खडू घ्यायची संधी मिळाली. एका कॉन्व्हेन्ट शाळेशी संलग्न ऑर्फनेजमधील मुलांना मराठी शिकवणीची गरज असल्याचे कळले. तिथे माझ्यासारखेच आणखी काही जण येतात. निवृत्त शिक्षिका, गृहिणी, कॉल सेंटरमध्ये नाइट शिफ्ट करून घरी जाऊन झोप काढण्याआधी मुलांना आपले दोन तास देणारे, इंजिनीयरिंगचे विद्यार्थी, इ.. हो, एक डॉक्टरसुद्धा आहेत. यात कोणतेही अर्थार्जन नाही. काही जणांना तर रोजचा २०-३० रुपये प्रवासखर्च आहे.

सत्यमेव जयतेच्या हेल्थकेअरवरच्या भागात मी शिक्षक आणि डॉक्टर या दोघांना एकाच पारड्यात बसवले होते. शिक्षकांना ह्युमन रिसोर्स इंजिनीयर समजून त्यांना डॉक्टर्स, इंजिनीयर्स, व्यवस्थापक यांच्या दर्जाचेच वेतन/मोबदला मिळायला हवे असे मला वाटते. सरकारी शाळांतल्या शिक्षकांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जाऊ नये. वेतनाच्या पावतीवर लिहिलेली रक्कमच खिशात पडावी. म्हणजे आताच्या काळातल्या अशोक आणि माझ्यासारख्या मंडळींना आपले आवडीचे क्षेत्र निवडता येईल.

इब्लिस, तुम्ही दिलेली उदाहरणे 'परीक्षार्थींना' अधिकाधिक गुण मिळवून देणार्‍या फॅक्टरीजशी संबंधित आहेत. हा दोष शिक्षणपद्धतीतलाच आहे. आपल्या पाल्याला खरेच ट्युशनची गरज आहे का , असेल तर कशा प्रकारच्या याचा विचार पालकांनी करायला हवा. शहरी भागात एका शिक्षकाखाली असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आटोक्याबाहेरचेच आहे. त्यामुळे वैद्यकव्यवस्थेत जशी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे तशीच इथेही आहे. म्हणजे कदाचित खाजगी शिकवणीच्या वर्गांची गरज फक्त ज्यांना एक्सलंस मिळवायचे आहे आणि वर ढकलले जायचे आहे अशा दोनच प्रकारच्या विद्यार्थ्यांना राहील. या दोन्हीसाठी फॅक्टरी प्रॉडक्शन लाइन कुचकामी आहे हे मान्य व्हावे.

माझ्या धाकट्या बहिणीचं शिकवणं हेच प्रोफेशन आहे. एम.एस्सी झाल्यावर तिची गुरू व मैत्रिणही म्हणता येईल तिच्या छोटेखानी क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली. घरी त्यावेळेस १-२ ओळखीतलीच मुलं यायची शिकायला. नंतर जशी या प्रोफेशनमध्ये वर्ष जायला लागली तशी थोड्या मोठ्या क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली तिने. अशा क्लासमधलं पॉलिटिक्स व इतरही अनेक बाबी यांचे भले-बुरे अनुभव घेतच होती ती. त्यातच तिने साईड-बाय-साईड दादरला प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली. प्रचंड मेहनत व कष्ट बघितले आहेत तिचे. त्यात नुसत्या पैशांवर समाधान मानणार्‍यातली ती नाही त्यामुळे मुलांवरही खूप मेहनत घेते ती. त्यावेळेस ती डोंबिवलीतल्या एका क्लासमध्ये शिकवायची. सकाळी डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ अशा ब्रँचेसमध्ये लेक्चर्स घेऊन दुपारी ती दादरला जायची ते रात्री १०.३० वा. परत यायची.

नंतर तो क्लास त्यांच्याच ढिसाळ कारभारामुळे बंद पडला. मग घरीच मुलं यायची शिकायला. १०-१५ मुलं येत असतील. पण का कोण जाणे बिल्डिंगमधल्या लोकांच्या पोटात दुखायला लागलं अचानक आणि तिच्या घरच्या ट्युशन्स बंद करायला लावल्या त्यांनी. तिचं स्वप्नं होतंच स्वतःचा क्लास काढायचं पण इतकंही सोप्पं नव्हतं ते खरंतर. पण ट्युशन्स बंद करायला लागल्यावर तिने जिद्दीने स्वतःच्या छोटेखानी क्लास काढलाय आमच्याच एरियात.

मधे एक-दोन वर्ष ती मे महिन्याच्या सुट्टीत घरीच पाचवी-सहावीच्या मुलांसाठी गणिताची वर्कशॉप्स घ्यायची, जेणेकरून त्यांचा पाया पक्का होईल.

आता जवळपास ५ वर्ष झाली तिने क्लास काढून. दुसर्‍यांच्या क्लासला जाऊन शिकवण्याइतकं सोप्पं नाहीये ते. शिक्षकांचे प्रॉब्लेम्स, मुलांचे एक ना अनेक प्रॉब्लेम्स व इतरही भानगडी असतात. सुरुवातीला घरी येणारी मुलंच क्लासमध्ये शिफ्ट झाली. यापैकी काही मुलं तिच्याकडे अगदी ५ वी पासून यायची. अर्थातच त्यांचे पालक त्यांच्या प्रगतीवर खुश होते. पण जशी ती मुलं ९ वी त आली तसं त्यांच्या पालकांना वाटलं की हिचा क्लास छोटा आहे, थोडक्यात प्रोफेशनल नाही त्यामुळे आपल्या पाल्याला १० वीत हल्ली जितके मार्क लागतात तितके मार्क मिळतील की नाही कोण जाणे. त्यामुळे त्यांनी मोठ्या क्लासला अ‍ॅडमिशन घेतली. बहीण अर्थातच खूप दुखावली या अनुभवाने कारण ५ वी पासून शिकवून तिने त्यांचा पाया अगदी पक्का करून घेतला होता आणि ज्यासाठी इतकी मेहनत घ्यायची ती वेळ आल्यावर त्यांनी पाठ फिरवली. मुलांमध्ये शिक्षकांची भावनिक गुंतवणूक असतेच की. पण तीही त्यातून नवा धडा शिकली.

आत्तापर्यंत तरी क्लासचा रिझल्ट चांगलाच लागलाय. पण अजुनही पालकांना मोठ्या क्लासचंच आकर्षण असतं, मग भले त्यांनी नाही शिकवलं तरी चालतं त्यांना त्यांचं तिला फार वाईट वाटतं. यावर्षी ती तिच्याच पूर्वीच्या विद्यार्थ्यांना १२ वी चं गणित शिकवतेय. त्यांनी १० वी झाल्यावर ११ वीसाठी चांगल्या तगड्या फिया भरून मोठ्या क्लासला अ‍ॅडमिशन घेतली पण तिथे जे शिकवलं ते सगळं डोक्यावरून गेलंय.

तिचा दिवस सकाळी ७ वाजता सुरु होतो ते मधले २-३ तास सोडले तर रात्री १२-१२.३० ला संपतो.

चांगला धागा.
हाताखालच्या ज्युनिअर्सना शिकवणे, इतकाच अनुभव आहे.
आणि हो...मी स्वतः दहावीत असताना माझ्या भाचरांना (पाचवी आणि तिसरी इयत्ता) सगळे विषय शिकवत होते.
बाबा २५-३० जणांच्या बॅचला गीता, शंकराचार्यांची स्तोत्रे हौसेखातर शिकवत असत.
मुलांना मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा आणि सुभाषिते शिकवायला आवडेल. देशात गेल्यावर चालू करायचा विचार आहे.

अशोक पाटील सर, मयेकरजी, श्री. कुलकर्णी.
आपले प्रतिसाद वाचले.
माझ्या प्रतिसादाच्या अनुषंगाने चर्चेत मते मांडल्याबद्दल धन्यवाद.
१. मूळ शाळा कॉलेज सोडून इतरत्र शिकवणी करण्याची/लावण्याची आजकालच्या विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर गरज का वाटते आहे?
२. कोणत्या कॉलेजला दांड्या मारून चालते, व ट्यूशन अटेंड करायला वेळ मिळतो हे पाहूनही मुले ११-१२वी ला अ‍ॅडमिशन ठरवितात. (ठरविण्याची चैन परवडणारी मुले नक्कीच ९०+ % वाली हुषार असतात हेही खरेच)
३. मग कॉलेज/शाळेचा उपयोग फक्त इन्टरनल प्रात्यक्षिक परिक्षेचे मार्क विकणे इतकाच आहे का? तसे असेल तर खासगी ट्यूशन क्लासेसनाच डीम्ड युनि सारखा डीम्ड स्कूल चा दर्जा का देऊन टाकू नये??
४. शाळा/कॉलेजात प्रमाणापेक्षा जास्त पटसंख्या असते म्हणून नीट शिकवणे होत नाही काय? तसे असेल तर मग पॉप्युलर खासगी क्लासवाले १००-१५० मुलांच्या वर्गाला लाऊडस्पिकर अन सीसी टीव्ही लावून शिकवतात त्याचे काय?
५. अमुक शाळेत घातले तर मुलांना शिकवणीची गरजच लागणार नाही असा कॉन्फिडन्स उत्पन्न होईल अशा शाळा आहेत काय? कोणत्या? (रियल लाईफ मे ऐसा होता है क्या?)
एकंदरीतच आपल्या देशात मुलांच्या शिक्षणाचे काय सुरू आहे व काय व्हायला हवे अशी चर्चा वाचायला व त्यात सहभागी व्हायला मला आवडेल.

धन्यवाद!

सगळे कसे ज्ञानाचे दान द्यायला निघालेत अन रच्याकने कुणी स्वखुशीने दक्षिणा देतेच आहे म्हणून नाईलाजाने स्वीकारतही आहेत. >>>>> माझ्यापुरतं सांगायचं तर मी खरचच आधी पैसे घेतले नाहीयेत. तुम्हाला खरं वाटत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. 'स्वखुशीने दक्षिणा' हा माझ्याबाबतीत प्रश्नच नाही मी स्पष्ट लिहीलय शिकवणी म्हणुन सुरू केली. त्याचं कारणही लिहीलय.

इब्लिस इथे खूप कमी जणांनी प्रोफेशनल खाजगी ट्युशन्स घेण्याबद्दल लिहीलय. बहुतेक जण १०पेक्षा कमी विद्यार्थी शिकवणारे, हौस म्हणुन, आवड म्हणुन करणारे दिसताहेत. तुम्ही लिहीलय तशी परिस्थिती आहेच. तसं नाहीच्चे असं या बाफावर कुणी म्हंटलं नाहीये. पण इथे लिहीणारे जे खरोखर पैसे न घेता शिकवतात त्यांच्याबाबतीत तुमची पोस्ट कारण नसतांना सरकास्टीक झालीये.
आणखीही एक धागा आहे जिथे या विषयावर चर्चा झालीय. शोधुन लिंक देते.
http://www.maayboli.com/node/31223 इथे बघा.

मनोरंजक चर्चा .>>>>> Uhoh

@ पाटील सर,
या व्याख्येत मी जरूर बसतो, <<<
गुरुजी, ते तुम्हास वैयक्तिक नव्हते, इन जनरल जो सूर सगळ्याच प्रतिसादांतून दिसला त्याबद्दल होते. तुम्ही ते वैयक्तिक घेतले नसेलच असे वाटते...
तसे शिकवायला मलाही मनापासून आवडते. म्हणूनच या खासगी ट्यूशन प्रकरणाच्या चर्चेत सहभागी झालो आहे.
वरील प्रतिसादा अनुषंगाने तुमचे विचार वाचायला आवडेल.

Pages