टोमॅटोची चटणी किंवा भाजी

Submitted by मराठमोळा on 9 July, 2012 - 01:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नमस्कार मंडळी,
कधी काय भाजी करावी हे बराच वेळ विचार करुन पण नाही सुचले तर हा प्रकार नक्की करुन पहा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही टोमॅटोची चटणी किंवा भाजी. घ्या साहित्य.

३ मोठे रसरशीत गर असलेले लाल टोमेटो चिरुन
२ मध्यम कांदे बारीक चिरुन
२ ईंच गुळाचा खडा चिरुन किंवा किसून
३-४ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ छोटा चमचा मोहोरी
१ छोटा चमचा जिरे
१/२ छोटा चमचा हिंग
१ छोटा चमचा गरम मसाला
२ छोटे चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ कप शेंगदाण्याचा कुट किंवा किसलेले सुके खोबरे
तेल
चवीनुसार मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१ कढईत पळीभर तेल टाकून त्यात मोहोरी घाला.
२. मोहोरी तडतडली की त्यात जिरे आणि लसूण घाला.
३. लसूण खरपूस तळला गेला की त्यात हिंग घालून कांदा परतायला घ्या.
४. कांदा कमी आचेवर खरपूस होईपर्यंत परतत रहा.
५. यात शेंगदाण्याचा कुट किंवा खोबरे घाला. ४-५ मिनिटे परता.
६. आता गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घालून चांगलं परता तेल सुटेपर्यंत परता.
७. किसलेला गुळ घालून २ मिनिटे गूळ वितळू द्या.
८. यात आता चिरलेला टोमॅटो घालुन ५-१० मिनिटे मंद आचेवर परता.
९. भाजी किंवा चटणी चांगली रसरशीत झाली की मीठ घाला.
१० चपाती किंवा जीरा राईसबरोबर कोथिंबीर सजवून वाढा.

IMG_0079.JPGIMG_0072.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

चपातीपेक्षा गरमागरम तुप-जीर्‍याची फोडणी दिलेल्या भाताबरोबर जास्त चवदार लागते हा वैयक्तीक अनुभव.
वरील साहित्यात प्रमाण कमी जास्त करुन तुमच्या पद्धतीने यात बदल करु शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो उपासाच्या दिवशी असे तोंपासु मेन्यु नको हो टाकत जाऊ.:अरेरे:

बाकी तुमची सजावट मस्तच. भरली मिर्ची आणी ही भाजी उर्फ चटणी संध्याकाळी उपास सोडताना करणार.

Zakas photo!
mishtarana hee bhajee/chaTaNee faar avaDate. lagech karate.
dhanyavaad mamo.