खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 28 June, 2012 - 11:43

खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.

हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.

१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी
५. दिवसभराचे टाइम शेड्युल / इंग्रजी- मराठी माध्यमे हे सगळे कसे मॅनेज करतो? याबाबतचे अनुभव.
६. एखाद्या इयत्तेसाठी एखादे चांगले पुस्तक, सीडी, गाइड असे काही रिकमांड करायचे असेल तर तेही लिहा.
..
..
शिकवणीला जानारे लोक/ पालक यांचीही मते, अनुभव असू शकतील. जे इथल्या व्यवसाय करनार्‍या लोकाना उपयोगी ठरु शकतील.

या व अशा अनेक गोष्टींच्या चर्चेसाठी हा बीबी आहे. ( खाजगी क्लासेस सत्य की थोतांड ? हा विषय इथे अपेक्षित नाही. Biggrin Proud ) हा बीबी शिक्षण याही विभागात ठेवायचा होता, पण तिथे फक्त परकीय शिक्षणाबाबत चर्चा आणि लिमिटेड लोकाना सामील व्हा, असे काहिसे दिसले, म्हणून व्यवसाय विभागात हा धागा उघडला. शिक्षण विषयाकडे हा धागा 'वर्ग' केलात तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी शिकवण्या घेण्याची सुरुवात शाळेत असल्यापासूनच झाली असे म्हणण्यास हरकत नसावी. कारण गणित हा विषय माझा अतिशय आवडता होता व अनेक मित्र गणिते समजावून घ्यायला व सोडवून घ्यायला माझ्याकडे येत असत व मीही त्यांच्या अडचणी त्यांना नीट समजेल अशा प्रकारे सांगत असे. हे अगदी SSC पर्यंत चालले. परीक्षेत मला चांगले गुण मिळाल्यामुळे माझ्या काकांनी आपल्या मुलासाठी शिकवणी घेण्याची मला विनंती केली व मी ती मानली. फीबद्दल काही बोलणे केले नव्हते. महिन्यानंतर माझा भाऊ पैसे घेऊन आला ते मी नाकारले. काकांनी स्वतः येऊन "तो दुसरी कडे गेला असता पैसे दिलेच असते ते तुला देतो " म्हणून पैसे घ्यायला लावले. त्यानंतर इतर काही भावंडे व वडिलांच्या मित्रांची मुलेही रीतसर पैसे देऊन येवू लागली. इंटरनंतर मी गणित विषय घेतला व शिकवण्या चालू राहिल्या. पदवीनंतर मी नोकरीला लागलो व शिकवण्या बंद केल्या. पुढे केंद्रिय सरकारी नोकरीनिमित्त मी मद्रासला गेलो. तिथे आधी मी शिकवण्या घेत नव्हतो. पण ३-४ वर्षांनंतर तिथे बदलून आलेल्या एका मराठी कुटुंबाची ओळख झाली व माझे गणित चांगले आहे हे कळतांच त्यांच्या मुलांना गणित शिकवण्याची मला गळ घातली. ३च महिन्यांत त्यांच्या मुलांनी चांगले यश मिळालेले पाहून त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी तसेच इतर काही मराठी कुटुंबानीही आपली मुले पाठवण्यास सुरुवात केली. १० ते ५ माझी नोकरी असे व ६ ते ९ माझ्या शिकवण्या चालत असत. लवकरच आय आयटी चे विद्यार्थी व नंतर GRE, CAT, MAT अशा परीक्षांना बसू इच्छिणारे विद्यार्थीही येऊ लागले. त्यांच्या परीक्षांसाठी उत्तरे देण्यास वेळ अगदी कमी म्हण्जे एका प्रश्नास फक्त ३० ते ४० सेकंद इतकाच वेळ असे. त्यासाठी मी शीघ्रगणिताच्या काही पद्धती शोधून काढल्या. तसेच वेदीक गणिताचे पुस्तक विकत घेऊन त्याचा अभ्यास केला.
यामुळे ऑलिंपियड्स, शिष्यवृत्तीच्या परीक्षांचे विद्यार्थीही माझ्याकडे येऊ लागले.
२५ वर्षे सेवा झाल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली व सेलम येथे स्थायिक होऊन तेथे शिकवण्या घेण्यास सुरुवात केली.
हल्ली मी शालेय अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धात्मक परीक्षांसाठीही शिकवण्या घेतो.
येथील एका नामवंत कोचिंग संस्थेने मला आय आय टी प्रवेशपरीक्षांसाठी व्याख्याने देण्यास बोलावले होते. नंतर मी तेथेच कॅंपस इंटरव्ह्यू साठी वर्ग घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक वर्गाला १५ ते २५ विद्यार्थी असत.
६ वर्षांत आमचा निकाल १००% होता. यामुळे नंतर मी तेथून बाहेर पडल्यावरही अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात. आनेक शाळा व कॉलेजेस ही मला शीघ्र गणित या विषयावर व्याख्यान देण्यास बोलावतात.
हल्ली मी बॅंक ऑफिसर्सच्या परीक्षांसाठीही शिकवण्या घेतो.
इथे सेलममध्ये शीघ्रगणित शिकवणारे फार थोडे प्राध्यापक आहेत. त्यातही विद्यार्थ्यांना नीट समजेल अशा
तर्‍हेने शिकवणारे अगदीच कमी. त्यामुळे मला येथे फारशी स्पर्धा नाही.

मुद्दे चांगले आहेत कमला ताई.

खाजगी शिकवण्या खूप वर्षांपूर्वी घेतल्या आहेत. अजूनी घेते मधुनमधुन.
फुकट, नाममात्र फी घेऊन, लष्करच्या भाकरी, अमकीच्या तमकीचा कोणीतरी.. अशी सुरवात झाली.
एकदा नाव झाले की व्यवसाय भराभरा फोफावतो, मग वेळेअभावी बंद करावा लागतो.
व्यवसाय वाढवलाच नाही. पण शिकवायला आवडते, भाषेच्या संपर्कात राहता येते. मजा येते.

आईपण घ्यायची उगाचच. खरंतर दिवसभराची डॉक्टरकी, घर, मुलं वगैरे सांभाळुन हेही म्हणजे वेळखाऊ प्रकरण होते.
वडलांचेही तेच. वैदिक गणितच शिकव वगैरे लभा भाजत.

घराण्याचा वाण. Sad
शिकायला येणार्‍यांच्यात गुंतायला होते म्हणुन काही काळ सगळे बंद करते, परत भुईछत्र्यांसारखे काहीतरी आपोआप उगवते.
पूर्णवेळ नोकरी आहे आणि हौस म्हणुन घेते त्यामुळे पैसे तर गेले काही वर्ष घेतच नाही. आणि शक्यतो रिझल्टओरियेंटेड पालकांपासुन दूर राहते.

आतापर्यंत जर्मन, इंग्रजी, संगीत शिकवले आहे.

मीदेखील नुकत्याच लष्करच्या भाकर्‍या भाजायला घेतल्या आहेत. पण चूल दुसर्‍याची. त्यातून ज्यांना वाढायचे त्यांना चावून खायची सवय/इच्छा नाही.गरज वाटत नाही. भाकर्‍या चावून खायला शिकवण्यात महिना गेला. हळू हळू पचनी पडतेय. त्यामुळे मला भाकरीबरोबर भाजी-आमटी करून खाऊ घालायची ऊर्मी येतेय ! पण ज्यांच्याकडे जाऊन भाकर्‍या भाजायच्या त्यांची वृत्ती खाणार्‍यांची लायकी काढणारी Sad

<शिकायला येणार्‍यांच्यात गुंतायला होते म्हणुन काही काळ सगळे बंद करत> माझं दोन महिन्यांतच असं झालंय. पुढे काय होईल?

मी मुंबईत आहे. दर रविवारी सकाळी मराठी स्पेशल शिकवायच्या विचारात आहे. येतील का विद्यार्थी?

मीदेखील नुकत्याच लष्करच्या भाकर्‍या भाजायला घेतल्या आहेत.>> मयेकर, कुठला विषय शिकवता?

मामी, एकापासून का होईना सुरुवात करा. विद्यार्थी येत जातात.

माझी आई माबोची सभासद नाही. पण ती गणिताच्या शिकवण्या घेते. खास करुन गणितात कच्च्या असलेल्या मुलांच्या.

लिहिले तर चालेल का?

मी एम. एस्सी. ला असताना एक -दोघंचे गणित घेतले होते. चांगले शिकवले असावे कारण अजुनही भेटले तर बोलुन दाखवतात. आता मात्र माझ्याच लेकीला शिकवण्याचा मह्त्प्रयास करतो

मी काहि फार मोठ्या प्रमाणावर शिकवणी घेतलीच नाही.
जे झालं ते सहजच. शिकवणी असा हेतुही नव्हता.
जिथे मेसला जेवायला जायचो त्यांच्या लहान मुली होत्या.
एक चौथीत तर एक पाचवीत.
त्याना बरेच विषय शिकवायचो. जास्त करुन त्याना इन्ग्रजी, गणित आणि विज्ञान मध्येच शिकवाव लागायच.
त्यांच्या परिक्षेच्या वेळी मात्र त्यांची उजळणी घेत असु. हे सर्व फारतर तासाच काम असायचं.
मला वाटत हे शिकवणं तिथे दोन वर्षे सुरु राहिल.
मुलीही हुशार आहेत.
फक्त हल्ली विषय समजुन घेणे ह्यापेक्षा पाठांतर आणि परिक्षेपुरता अभ्यास ही वृत्ती कशी वाढली आहे हे पाहुन थोडसं वेगळं वाटायचं.

धन्यवाद मयेकर. तुम्ही सीए असल्याचे कुठेतरी वाचले होते, म्हणून विचारले.
मामी, मयेकरांना तात्काळ संपर्क करा.

शासकीय नोकरीत प्रवेश करण्यापूर्वी माझी दूर कुठल्यातरी नदीकाठच्या एका शांत खेड्यात "शिक्षक" पदावर काम करण्याची खूप इच्छा होती. यामध्ये त्या गावातील मुलांना क्रमिक पुस्तकाच्या मर्यादेबाहेर जाऊन त्यांच्यात वाचन आवड निर्माण करून त्यायोगे उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे असाही एक सुप्त विचार मनी होता. पण पदवीनंतर झटदिशी नोकरी मिळाली ती ऑडिट खात्यात आणि पुढे त्या पदावरील पगारात आणि प्रा.शिक्षकाला (त्यावेळी) मिळणार्‍या पगारातील तफावत घरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यानी मला पहिली नोकरी सोडण्यास मज्जाव केला. घरची आर्थिक ओढाताण पाहाता त्यावेळेचे माझे वय काही बंडखोरी करण्यासारखे नसल्याने (शिवाय नाही म्हटले तरी आमच्या काळी सरकारी नोकरी म्हणजे हापूस आंबाच मानला जात असे) मी 'शिक्षक' रस्ता सोडून दिला होता.

तसे जरी झाले असले तरी माझ्यातील शिक्षणदानाची ती उर्मी गप्प बसू देत नव्हती. मग नोकरीचे तास संपल्यावर मी घरीच सायंकाळी माझ्या बहिणींच्या मुलामुलींचे 'इंग्लिश' चे क्लास घेण्यास सुरुवात केली (तोच माझ्या पदवी आणि पदव्युत्तरचा विषय आहे), ते एवढ्यासाठी की किमान त्या निमित्ताने का होईना माझे 'लिटरेचर' शी संबंध राहतील. झालेही तसेच. त्या मुलांना शिकविताना पाहिल्यावर सोसायटीच्या सेक्रेटरीनी मला त्यांच्या कॉलेजला जाणार्‍या दोन मुलांचे इंग्लिश घेण्याची विनंती केली जी मी मानली.....पुढे तर मग आमच्या अपार्टमेन्टचे टेरेस हा माझा गजबजलेला 'इंग्लिश ट्यूशन क्लास' च बनला.

मात्र दुसरीकडे मी शासकीय वेतन घेत असल्याने त्या व्यतिरिक्त 'आय' करणे हे नियमबाह्य असल्याने मी कोणत्याही विद्यार्थ्याकडून अगदी एक रुपयाही फी कधी आकारली नाही. तरीही परीक्षेतील उत्तम प्रतीचे गुण पाहून त्या मुलांचे पालक मला ड्रेस, बॅग, वॉलपीस, लेमनसेट, घड्याळ अशा छोट्यामोठ्या वस्तू भेट देत, ज्या मी आनंदाने स्वीकारीत असे....त्या नाकारणे उद्धटपणाचे दिसेल म्हणून.

पुढे ज्यावेळी मुलामुलीत "स्पर्धा परीक्षा" ला प्रविष्ठ होण्याची लाट आली (एमपीएससी, यूपीएससी इ.) त्यावेळी अशा परीक्षार्थींसाठी 'जनरल नॉलेज' आणि "इंग्रजी" हे दोन विषय किती महत्वाचे असतात याची जाणीव झाली. कोल्हापूरातील एका नावाजलेल्या कॉलेजमधील दोन प्राध्यापक मित्र माझ्या परिचयाचे होते, त्यानी आपल्या भागातील मुलांनी अशा स्पर्धा परीक्षांना बसून उच्च पदाच्या सरकारी नोकर्‍या मिळवाव्यात हा हेतू मनी धरून, मुलांना त्यासाठी प्रेरीत करण्याचे काम चालू केले होते. त्यानीदेखील 'लष्कराच्या भाकर्‍या भाजणे' या चालीवरच हा उपक्रम चालू केला आणि इंग्रजीसाठी माझी मदत अपेक्षित धरली, जी मी तात्काळ देवू केली (तसे पाहिल्यास कोचिंग क्लासचे तास रात्रीच्यावेळेसच असल्याने माझ्या शासकीय नोकरीत कसली अडचण येण्याची शक्यताही नव्हती).

"स्पर्धा परीक्षे" च्या निमित्ताने मात्र खुद्द माझ्या असलेल्या/नसलेल्या ज्ञानाचा कस लागला आणि त्यामुळे माझेही नित्यनेमाने इंग्रजी साहित्याचे वाचन होऊ लागले. मुले एमपीएसचीच्या परीक्षांना आत्मविश्वासाने हजेरी लावू लागली आणि योग्य त्या प्रमाणात त्याना लाभलेले यशही मला पाहण्यास मिळाले.

सांगण्यास विशेष आनंद होतो की ज्या काही मुलामुलीनी अशा परीक्षेत सुयश मिळविले त्यानी (विशेषतः उपजिल्हाधिकारी पदावरील दोघांनी) त्या त्या कॉलेजने केलेल्या त्यांच्या सत्काराच्यावेळी अत्यंत कृतज्ञतापूर्वक माझ्या नावाचा खास उल्लेख करून 'सर्वस्वी अनोळख्या अशा श्री.अशोक पाटीलसरांनी एकही पैसा न घेता आमच्यातून इंग्रजीची जी भीती घालविली त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू..: असे ज्यावेळी सांगितले त्यावेळी मलाही अशा सुयोग्य कारणासाठी आपला वेळ लागला याचा खूप आनंद झाला. पुढे त्या कॉलेजने या संदर्भातील कॅम्पसमध्येच स्वतंत्र असे युनिट चालू केले त्यावेळी मला त्यानी सन्मानपूर्वक त्या क्लासला टीचिंगचे निमंत्रण दिले. पण मी मानधन स्वीकारणार नाही या तत्वावर ठाम असल्याने, आणि कॉलेज मॅनेजमेन्टची कुणाकडून मोफत सेवा घेणे नाही अशी भूमिका असल्याने तो प्रकल्प राहिलाच. असो.

कोणत्याही प्रकारच्या शिकवण्या घ्यायच्या असतील तर त्या व्यक्तीकडे सर्वप्रथम काय हवे असे मला विचारल्यास मी "त्या व्यक्तीकडे उत्साह असला पाहिजे" असे उत्तर देईन. आपल्यासमोर बसलेल्या मुलाला/मुलीला आपण शिकविणार असलेल्या विषयातील काही म्हणजे काही येत नाही असे गृहित धरूनच जर शिकवायला सुरू केले तर मग कसल्याही प्रकारचे नैराश्य येत नाही. माझ्याकडे एमपीएससीला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ मुलांचे बी.ए.ला इंग्लिश स्पेशल होते, क्लासही मिळविला होता त्यानी. पण ३० पैकी २४ अन्य मुले समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि कॉमर्स विषयाची असल्याने 'इंग्रजी' मध्ये त्यांची उडी साहजिकच जेमतेमच होती. त्यामुळे या ३० ही मुलांना इंग्रजी येत नाही हे अनुमान मनी धरून मी त्याना अगदी मुळाक्षरापासून सुरुवात करीत असे, जे इंग्लिश बी.ए.च्या विद्यार्थ्यांनीही कधी कंटाळवाणे मानले नाही.

दुसरी गोष्ट....वे़ळ. मला का कोण जाणे शिकवणीसाठी रात्री ८.०० नंतरची वेळ खूप भावली...कदाचित हा परिणाम माझ्या नित्याच्या नोकरीचाही असेल. पण खरे हेच की एका कॉफीच्या कपानंतर रात्री ८ ते ११ मी अत्यंत उत्साहाने 'इंग्लिश सफरी' ला त्या मुलांसोबत जात असे आणि त्यानीही तितकाच उत्साह दाखविला. त्यामुळे वेळेचा तो स्पॅन पूर्ण वाढ झालेल्या मुलांच्याबाबतीत अगदी आदर्श मानावा.

बाकी फी बद्दल मी वर लिहिले आहेच. कुणाकडून कधीही फी घेतली नव्हती. त्यामुळे ट्यूशन सेक्टरमधील आर्थिक उलाढालीबद्दल मी अनभिज्ञ होतो....(भूतकाळ वापरत आहे. कारण प्रकृतीच्या कारणास्तव मी आता लार्ज स्केलवर शिकविण्यास जात नाही, मात्र स्पर्धा परीक्षेला प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यास या संदर्भात शहरात कोचिंग क्लासेससाठी कुणाकडे जावे, याचे मार्गदर्शन जरूर करीत असतो.)

अशोक पाटील

अशोक,
किती मस्त लिहिले आहेत. जेवणे खाणे, आवरा आवर आटोपल्यावर आठवड्यातून दोन तीन दिवस जरी इंग्रजी लिटरेचरची ट्युशन मिळाली तर मी आनंदाने जाइन ! आमच्या इथे चालू कराल का क्लास, कॉफीची सोय मी करीन Happy

BSc ला मैत्रिणींना Operations Research शिकवायचो (आणि एका मित्राला गणीत). MSc ला भौतिकशास्त्र.
रेग्युलर ट्युशन्स मात्र घेतल्या नाहीत. त्या संस्थेवर तसा विश्वास नाही. MSc ला असतांनाच एका कंटाळवाण्या प्राध्यापकांचे तास टाळण्याकरता त्यांच्याबरोबर डील करुन त्यांचे प्रॅक्टीकल्स शिकवले होते.

सत्य की थोतांड हा विषय जरी नसला तरी असे जरुर म्हणीन की जे ट्युशन्स घेतात त्यांचा असा प्रयत्न असावा की पुढील वर्षी त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ट्युशनची गरज भासु नये (तुमच्याच नाही तर कोणाच्याच) . विषय शिकवण्याबरोबर तो कसा शिकावा हे सुद्धा शिकवता आले तर शिकवावे. आय कमी होणार नाही, कारण इतर विद्यार्थी येतील. ज्याप्रमाणे मासा खायला देणे आणि मासे पकडायला शिकवणे तसेच हे. *

शिकवणे हे तसे खूप महत्वाचे - शिकवता शिकवता आपणही शिकतो.**

* व ** वर विनोद आठवले पण ते इथे देणे प्रस्तुत ठरणार नाही.

रविंद्र जी तुमच्यासारखे सर असते तर आम्हाला सुद्धा गणितात रुची निर्माण झाली असती.... Sad
.
.
मी कधीच शिकवणी लावली नाही........ ९वीत असताना गणिता मुळे एका शाळेतच शिकवणार्या सरांकडे शिकवणी लावली..पण इतके भयानक शिकवत होते..की १ महिण्यातच रामराम केला..........:)

'नेट'साठी दोनतीन वर्षं आमच्या प्रयोगशाळेत प्रोजेक्टवर काम करणार्‍यांना, आणि त्यांच्या मित्रांना रसायनशास्त्र शिकवायचो. सगळे मित्रच असल्याने फी कधी घेतली नाही. परीक्षा व्यवस्थित पार पडली की राधिका किंवा शिवसागर अशा ठिकाणी जेवायला जायचो.

त्यापूर्वी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेसाठी आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी काही मुलांना शिकवलं होतं. मग अकोल्याच्या एका शाळेत दिवाळीच्या आणि उन्हाळ्याचा सुट्टीत या परीक्षांचे वर्ग घ्यायला जायचो.

अजूनही घरी गेलो की दोनतीन शाळांमध्ये दररोज किंवा शनिवारी विज्ञान, मराठी हे विषय शिकवायला जातो.
शाळांमधले विद्यार्थी, आणि संशोधनक्षेत्रात जाऊ इच्छिणारे या दोघांनाही शिकवण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. शाळेतली मुलं, निदान आठवीपर्यंतची, जरा डोळे उघडे ठेवून शिकतात. बीएस्सी, एमएस्सीच्या मुलांना रसायनशास्त्र शिकवताना 'पाठांतर करू नका' हे समजवण्यातच वेळ जातो. केमिकल थर्मोडायनामिक्सची अख्खी गणितं पाठ करू येणारे काही मित्र होते. त्यांना त्यांच्या कॉलेजातच असं शिकवलं जाई.

चौथीपाचवीपासूनच्या मुलांना शिकवण्याची आता इच्छा आहे. या वयातच त्यांना पाठांतरापासून दूर करता येऊ शकेल.

हा व्यवसाय निवडणार्‍यांनी आधी उद्देश स्पष्ट ठेवावा असं वाटतं. म्हणजे कोणाला टार्गेट करायचे आहे. अभ्यासक्रमात एखाद्या विषयाची समज कमी पडते, त्यावर जास्त वेळ देण्याची गरज आहे म्हणून क्लासेसची गरज आहे असा एक वर्ग आहे. आणि प्रधानांनी लिहिले तसे स्पर्धात्मक परीक्षा, प्रवेश परीक्षा इ. प्रत्येक ठिकाणी वेगळे धोरण लागते. तुम्हाला कोणते आवडते/जास्त चांगले जमते ते पहाणे.

इथे सिन्सिअरली शिकविणार्‍यांचेच प्रतिसाद आहेत. शिकवणीचे दुकान (कोचिंग क्लासेस) बद्दल चर्चा नाही. म्हणून तो प्रतिसाद काढला, @
>>कु. कमला सोनटक्के | 29 June, 2012 - 20:54 नवीन
इब्लिसजी , तुमचा प्रतिसाद का काढला? तोही सुसंगतच होता.<<

अशोक पाटील, तुम्ही लिहिलेले खूप आवडले.
अस्चिग, पटले.
चिनूक्स , पाठांतराइतकाच भयंकर शत्रू गाइड्स हा आहे. मुले पाठ्यपुस्तके वाचायला तयार नाहीत. तेही भाषा विषयाची!

हो, गाइडबुकांमधून सरळ निबंध पाठ केले जातात.
खाजगी शिकवण्यांबद्दल पूर्वी मनात किंचित आकस होता. पण आता अनेक शाळांमधूनच पाठांतर आणि गाइडबुकं सर्रास माजले असल्यानं, जर खाजगी शिकवण्यांमध्ये मुलं या दोन्हींना फाटा द्यायला शिकत असतील, तर उत्तमच.

चिन्मय, किती खाजगी शिकवण्यांमध्ये शाळांमधून जे होतं त्यापेक्षा वेगळं होत असणार?

Pages