शब्दछटा

Submitted by मामी on 26 July, 2010 - 20:48

कधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब्द दिसायला लागतात.

त्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्‍या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की "ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल." मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.

मग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन!

उमळून हा शब्द खरतरं आपण उलटीची जाणीव होणे अशा अर्थी वापरतो. (उदा. मेलेला उंदिर बघून मला एकदम उमळून आले.) पण ती भावना तीच असते ना. आतून काहितरी बाहेर येणं!

आणि फुलाचं उमलणं तरी काय वेगळं असतं? मग वादळात झाड उन्मळून पडत म्हणजे मुळांसकट जमिनीबाहेरच येतं ना?

शिवाय आपल्याला काहितरी उमगतं, ते काय असतं? ते समजण्यापेक्षा नक्कीचं वेगळं असतं..... आतुन समजलेलं म्हणजे उमगलेलं!

भावना व्यक्त करताना आपण म्हणतो, "मला उचंबळून आले." हेहि तसेच की!

अगदी हिंदी भाषेत सुध्दा "घटा उमड आयी" म्हणतात. नभाच्या पोकळीत काही घडामोड होऊन पावसाळी ढग जमून आले. हा शब्द पण याच माळेतला का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमजणे - समजणे
उगवणे - सुर्य उगवणे, रोप उगवणे वै.
उमळसणे - वांतीचे सिम्पटम्प्स, मळमळणे (हा आमच्या गावाकडील शब्द)

मामी, त्यावेळी मी बहुदा रजेवर असणार नाहीतर इथे नक्कीच प्रतिक्रिया दिली असती.

असा एक शब्दप्रयोग मी गोव्याला ऐकला होता. पाण्याला ऊकळी फुटली, याचे वर्णन
उदकांक फुला आयली... (पाण्याला फुले आली ) असे ऐकले होते.
हे म्हणजे अगदी गवताला भाले फुटले.. असे वाटतेय.

मी कोकणात पीएचसी ला काम करत असताना, पेशंट म्हणायचे ,'' माझं हात पाय लय उकालतान''

म्हणजे माझे हातपाय उकळतात असं म्हणायचे. '' उकळणे'' चा हा गमतीशीर प्रयोग आठवून फार हसू यायचे.

हे निसर्गाच्या गप्पांवरून इथे आणत आहे. मला माहितही नव्हता हा भेद. अशा बारीकसारीक छटा असलेले कितीतरी शब्द असतील जे आपण सरधोपटपणे वापरून गुळगुळीत करून टाकतो.

***********************************************

जिप्सी | 22 June, 2012 - 09:26
सुप्रभात लोक्स!!!

प्रवीण दवणे यांनी एकदा शांताबाईंना ( शांताबाई शेळके ) एका कवितेबद्दल एक पत्र लिहिले की शांताबाई, तुम्ही या कवितेत " आकाश आणि आभाळ असे दोन्ही शब्द वापरलेत, अर्थ एकच ना !! "

त्यावर शांताबाई उत्तरादाखल म्हणाल्या " नाही..
'निरभ्र' असतं ते 'आकाश'
आणि
'भरून' येतं ते 'आभाळ' !!!!"

ज्ञानवृद्धीसाठी जितका छान आणि तितकाच मनोरंजकदेखील होऊ शकणारा हा विषय आहे.
"उमळून" सारखाच 'उसळी' हाही असाच विविध छटा असलेला शब्द. डाळभाजी प्रकारात येऊ शकणारी "उसळ" बहुतेकांना माहीत असते, पण तिचा आणि "चेंडूने बरीच उसळी घेतली" यांचा मिलाफ होत नसतो. इथे 'उसळी" ला एक प्रकारची अ‍ॅक्शन प्राप्त झालेली आहे.

"उचल" ही असाच बहुअर्थी शब्द. "बाबांनी बाळाला उचलले" होते तर 'नोकराने मालकाकडून गणेशचतुर्थीसाठी उचल घेतली" असाही. "ओझेही उचलता येते" तर "परीक्षेत नापास झालो तरी मी नव्या आशेने अभ्यासासाठी उचल खाल्ली" असा दिलासाही प्रकट होतो.

कोल्हापूरात "पाथरवट" समाजातील काही पुरुष गाढवाच्या पाठीवर पाटे-वरंवटे टाकून गल्लीगल्लीत साद घालीत हिंडत, विशेषतः दुपारच्या वेळेस. त्यावेळी त्यांची एक आरोळी आजही आठवते "पाटा उकटून घ्या हो ताई...". हे 'उकटणे' काय असेल तर पाट्याला त्यांच्याकडील 'छिन्नी' ने टाके पाडणे, म्हणजे उकटणे. हा नवीनच शब्द माझ्या स्मृतीत भर टाकून गेला. त्यांच्या तशा मजदुरीला तेच लोक 'दिवसभराची उकटाई' असे म्हणत.

खूप भर घालता येईल या धाग्यात.

अशोक पाटील

मस्त बाफ..

मला ५ अक्षरी शब्द.. जसे खळखळाट, गडगडाट हे भारी आवडतात.

रच्याकने... महेश कोठारेचे ५ अक्षरी वाले चित्रपट त्यातुन वगळावे.. Wink

माझ्या स्वयंपाकाच्या बाईने कालच मिरचिचा ठेचा केला, तेव्हा त्याचा प्रचंड खाट उठला होता... तिने एक्सप्लेन केलं की तेलात परतल्यावार मिरच्या अशा "उसळतात."

मस्त निरिक्षणे मामी.. मलाही काहीतरी आठवलेले, कुणीतरी लिहिलेले,..विषयांतर,पण समांतर :))

'**लावणे**' **ह्या क्रियापदाचा अर्थ !

'माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत.
पण चेन्नईहून थेट पुण्याला;मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर
मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ सांगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं वाक्य
लिहून आणायचंस,
नुसता अर्थ कसा सांगू? काहीही असू शकेल'.
'एका शब्दाचा/व्हर्बचा अर्थ काहीही ?'तिला कळेना.
'ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज'. ती म्हणाली.तिला वाटलं असतील दोन तीन
अर्थ! पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या
लावालावीतच घालवू.

'हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस '.
'ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास '. लगेच वहीत क्लास लावणे =जॉइंन असं
लिहिलं.
'क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस? पावडर लावलीस? '
'ओ येस '.
'आपण पार्टीला,फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू/टिकली लावतो. '
'येस,आय अंडरस्टँड '.---टु अप्लाय. तिनं लिहिलं.
'पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंडही लावतो.तिथे तो अर्थ नाही होत '.
'ओके; वी पुट ऑन दॅट''.ती पुटपुटली.

'आता बघ. मी चहाचा कप तोंडाला लावला, आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या
पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथे काय? प्रत्यक्ष
स्पर्श करतो. टच्! '
चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही
पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी; फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई
म्हणाली ना, पुस्तकाला पाय लावू नको. सो—टु टच्.
मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव. मीन्स शट् द डोअर '.
'हो. दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच '.
'मीन्स लाव,बंद कर सेम! पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता, देअर इट इज
ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर!'
'बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत लाव = शट् = बंद कर. पण दिवा लाव = स्विच
ऑन. म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई! संदर्भ/रेफरन्स शिवाय नुसता लाव कसा
समजणार? आणखी खूप ठिकाणी लावणे हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या
गोंधळात नाही टाकत. '

'नो,नो. प्लीज टेल मी मोअर '. म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.
'बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी.व्ही, रेडिओ इ. लावतो तेव्हा
स्विच ऑन करतो.पण देवासमोर नीरांजन,उदबत्ती,समई लावतो तेव्हा काय करतो? लाइट ऑन!
पेटवतो.फटाके लावतो,आग लावतो, .
गॅस लावतो = पेटवतो.'ती भराभरा लिहून घेत होती.
तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. 'बघ,मी कुकर लावलाय'. दोघी हसलो.
आधीचा कुठला अर्थ आहे का यात? खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत
शब्द—**लावलाय.**
'आंघोळीचं पाणी लावलंय मधे असंच! ''
'मी रोज सकाळी अलार्म लावते. ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओह्!
एव्हरीथिंग इज सो डिफरंट!'

'सो कनक्लूजन? –एव्हरी लाव इज डिफरंट!*'
जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या भाच्याला मी हाक मारली. तर तो म्हणाला, 'थांब गं
आत्या! मी हे लावतोय ना! '
हेय,लुक. तो लावतोय= ही इज अरेंजिंग द पीसेस. टु अरेंज! '
'**तो शहाणा आहे.वह्या-पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो. कपाट छान लावलेलं असतं
त्याचं '.
वहीत लिहून घेऊन ती उठली,'गुड बॉय',असं त्याचं कौतुक करून ती घरी
गेली.
पण माझं विचारचक्र चालूच राहिलं.आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव,लावते
लावले हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं..

**रोजच कोणालातरी आपण फोन लावतो.
**बडबड**, **कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो**, **ए**, **काय लावलंय मगापासून**?
**आजीने कवळी लावली = फिक्स केली आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते.(यूज)**
**पट्टा लाव=बांध. बकल**, **बटन लाव = अडकव**
**बिया लावणे**, **झाडे लावणे = पेरणे**, **उगवणे.**
**इतके इतके मजूर कामाला लावले.(एम्प्लॉइड.)**
**वजन ढकलणारा**,**ओढणारा नेट/जोर लावतो. (अप्लाइज स्ट्रेंग्थ)**
**आपण वडिलांचं**, **नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो**?
**सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानंही मला वेड लावलं.**
**इतक्यात आमची बाई आली. आल्याआल्याच म्हणाली**, '**विचारलं काओ सायबांला**?' (
**मुलाच्या नोकरीबद्दल)**
'**विचारलं की**, **पाठव म्हणाले उद्या **'.

'**हा**, **मंग देते त्याला लावून उद्या**'. (**ओहो! लावून देते = पाठवते!)**
**आणि लावालावी मधे तर कोण**,**कुठे काय लावेल!**'...

अशी आपली ही मायमराठी! शिकणाऱ्याला अवघड,पण आपल्याला सुंदर..' इतिश्री..

मैत्रीणीच्या तोंडी एकदा शब्द ऐकलेला.
'अगं नाही गेले आज कुठे, "उमका' च नाहीये बघ.
हा उमका म्हणजे आतूनच काही करावसं वाटत नाहीये बघ.. या अर्थी!

'निरभ्र' असतं ते 'आकाश'
आणि
'भरून' येतं ते 'आभाळ' !!!!" >> Happy

भारती बिर्जे, तुमची पोस्ट वाचताना मज्जा आली.

डॉक्टर....

पश्चिम महाराष्ट्रात 'खाट' शब्द दोन अर्थाने वापरला जातो. एकतर 'कॉट' चे मराठी रुपांतर 'खाट' मध्ये आपसूक झाले (त्या अगोदर 'बाजले' म्हणत असत) आणि भाजीला/आमटीला तेलाची फोडणी देताना वापरत असलेल्या मसाल्यामुळे एरव्ही छान चवीचा गंध येतो, पण जर ते तेल खूप तापले असेल आणि त्यामुळे मोहरी करपून गेल्याने जो वास स्वयंपाकघरात पसरतो त्याला का कोण जाणे 'खाट' असेच नामाधिमान प्राप्त झाले. कदाचित 'खकाणा' ही 'खाटा'ची Etymology असण्याची शक्यता आहे.

[मात्र तुम्ही वर प्रतिसादात दिलेला 'खंक' इकडे 'रिकामा' या अर्थाने वापरला जातो. विशेषतः जुगार्‍यांच्या बाबतीत.]

@ भारती बिर्जे - "लावणे" क्रियापदावरील सविस्तर पोस्ट खूप आवडली.

अशोकजी, बरोबर
खंक हा शब्द तुम्ही सांगितलात त्या अर्थानेही वापरतात, पण खंक सुटणे म्हणजे मिरची कुटताना, वा फोडणीत घालून जो तिखट वास सुटतो, ठसका लावणारा, त्या अर्थाने वापरतात.

बिर्जे जी,
कपाट नीट लावल्यानंतर दार ही लावलेलंच असेल नं? Happy
छान लिहिलं आहात!

अरे मस्त धागा आहे हा मामी!
सर्वांच्या पोष्टी मस्त! भारती........ "लावणे" चा अजून एक "वाक्यात उपयोग" :
संध्याकाळ झाली की मालक आणि त्यांचे मित्र "लावायला" बसतात.

कुठल्या तरी ......बहुतेक शंकर पाटील......कथेत वाचलं होतं.."च्या(चहा)च्या पान्याला लई "उस्साळा" येऊन र्‍हायला व्हता"

आणि मामी ...पूर्वी नागपंचमीच्या आधी लाह्या फोडायला द्यायचा कार्यक्रम असायचा. त्यासाठी रात्री ज्वारीला पाणी लावून झाकून ठेवत्(नक्की प्रोसेस माहिती नाही कारण ते आईच करायची).
पण त्याला "उमलं" म्हणायचे. मला वाटतं नंतर ही ज्वारी उमलून त्याच्या लाह्या होतात, म्हणून उमलं!

'निरभ्र' असतं ते 'आकाश'
आणि
'भरून' येतं ते 'आभाळ' !!!!"

>>>>

आभाळ म्हणजे अभ्राळ ...आभ्राळ .. ज्यात अभ्रे जमा झाली आहेत असे आकाश

व्युत्पत्तिच्या संदर्भात गोंधळात टाकणारेही शब्द भेटतातच. उदा. ' तडक' -
त्याने तडक जावून तिला विचारलंच;
असा निर्णय तूं तडकाफडकीं कां घेतोयस ?;
तडकेल ना कांच अशाने;
साला तो सॉलीड तडकलाय तुझ्यावर !;
त्याचा तडच लागत नाही;
सचिनने काय तडकावलाय शेन वार्नला !;
... आतां हिंदीतून डाल तडका पण आलाय !!
वापरामुळे शब्दछटांची इतकीं पुटं चढत असावी कांहीं शब्दांवर कीं मूळ शब्द शोधणंच कठीण ! हल्लीं 'माठ' संबोधन बरंच प्रचलीत झालं आहे. तें 'मठ्ठ' वरून आलंय कीं रिकाम्या 'माठ'/'मडकं' यावरून ?

मामी, मजा आली हा धागा वाचताना, मलाही एक असाच शब्द आठवला, मारणे

१. मारणे - शिक्षकांनी मुलांना मारले - फटके मारणे
२. मारणे - काय थापा मारतोस? - खोटे बोलणे, फसवणे
३. मारणे - एक पेग/ मारला - दारु पिणे
४- मारणे - मी तिला दम मारला - ओरडणे
५- मारणे- सिगरेटचा दम मारला - ओढणे (इथे दम शब्दाचेही २ अर्थ आलेत).
६. मारणे- भिंतीला रंग मारला - लावणे, काढणे
७. मारणे- जेवणावर आडवा हात मारला - भरपुर जेवणे
८. मारणे- किती फेर्‍या मारतोस? - सारखे एकाच ठिकाणी फिरणे
९. मारणे - पाण्यात हात मारायला शिक- हात हलवणे
१०. मारणे - नुसती माशा मारतेय - टाइमपास करणे
११ मारणे- तुला किती हाका मारल्या - बोलावणे
१२. मारणे - चल गप्पा मारुया - दोन किंवा अधिक व्यक्तींचे बोलणे

खरंच "माझ्या मराठीची काय सांगु कवतुके | परी अमृतातेही पैजा जिंके ||

भाऊ, तडक शब्द तर अ‍ॅक्शन ओरीएंटेड वाटतो. तडक शब्द म्हणताना जो ध्वनी आणि जोष निर्माण होतो त्याप्रमाणेच त्याचा अर्थ (कृती) आहे.

आशिका, फारच छान!

<< तडक शब्द म्हणताना जो ध्वनी आणि जोष निर्माण होतो त्याप्रमाणेच त्याचा अर्थ (कृती) आहे.>> 'तडक' शब्दाबाबत हें बव्हंशीं खरं आहे पण शिव्यांच्या बाबतींत नेमकं उलटं असावं; तिथं मुख्यतः ध्वनी व जोष यासाठीच शब्द रचले/वापरले जातात व त्यांतून ध्वनित होणारा अर्थ [कृति] दुय्यम किंवा फारसा लक्षात न घेण्यासाठीच असतो ! Wink

Pages