शब्दछटा

Submitted by मामी on 26 July, 2010 - 20:48

कधी कधी अचानकच एखादा चपखल शब्द आपल्याला मिळतो. त्यात एक सूक्ष्म छटा असते. विचार केल्यावर त्याच्या आजूबाजूचे इतर शब्द दिसायला लागतात.

त्या दिवशी तसचं झालं. मी माझ्याकडे काम करणार्‍या विठाला सांगितले की स्वैपाकघरातलं सिंक तुंबतय तर ते जरा साफ कर. ती म्हणली की "ताई, मला ते किवी ड्रेनेक्स द्या, आज संध्याकाळी टाकते, उद्या सकाळी कचरा कसा 'उमळून' येईल." मला हा शब्द फारच योग्य वाटला. मी नक्कीच तो वापरला नसता. कचरा वर येईल वगैरे काही बोलले असते.

मग डोक्यात सुरुच झाले एक विचारावर्तन!

उमळून हा शब्द खरतरं आपण उलटीची जाणीव होणे अशा अर्थी वापरतो. (उदा. मेलेला उंदिर बघून मला एकदम उमळून आले.) पण ती भावना तीच असते ना. आतून काहितरी बाहेर येणं!

आणि फुलाचं उमलणं तरी काय वेगळं असतं? मग वादळात झाड उन्मळून पडत म्हणजे मुळांसकट जमिनीबाहेरच येतं ना?

शिवाय आपल्याला काहितरी उमगतं, ते काय असतं? ते समजण्यापेक्षा नक्कीचं वेगळं असतं..... आतुन समजलेलं म्हणजे उमगलेलं!

भावना व्यक्त करताना आपण म्हणतो, "मला उचंबळून आले." हेहि तसेच की!

अगदी हिंदी भाषेत सुध्दा "घटा उमड आयी" म्हणतात. नभाच्या पोकळीत काही घडामोड होऊन पावसाळी ढग जमून आले. हा शब्द पण याच माळेतला का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिकाजी यांच्या 'मारणे' शब्दावरून सुचलेला संवाद -

बाबा- काखोटीला कसलं पुस्तक मारून उभा राहीलाहेस ?
मुलगा - बाबा, प्रगति पुस्तक आहे. सही मारून द्या ना.
बाबा- बाळा, 'सही करून द्या', म्हणावं.
मुलगा- पण तुम्ही मारूनच सही करणार ना !
बाबा - कां? असं काय घोडं मारलं आहेस तूं ?
मुलगा- बाबा, यावेळीं पेपरांत मास्तरानी जाम 'गुगली' मारले होते.
बाबा - मग प्रगतिपुस्तकांत तूं किती 'गोल' मारले आहेस ?
मुलगा- बाबा, 'मारणं' शब्द 'मरणा'वरून आला आहे का हो ?
बाबा - उगीच वेळ मारून नेवूं नकोस ! पुस्तक बघूं.
मुलगा- मुलांच्या जिज्ञासेवर अशी काट मारणं.......
बाबा - गप्पा मोठ्या मारतोस.. आण तें प्रगतिपुस्तक ...
मुलगा - बाबा, मुलांनीं मन मारून इतका अभ्यास करायचा ...
बाबा- मुलांचं नको सांगूस. तूं अभ्यासाला टांग मारत होतास तें बोल.
मुलगा - बाबा, 'टांग मारणें' 'टांच मारणें' यांत काय फरक आहे ?
बाबा - अरे, तें कळण्यासाठींच बैठक मारून अभ्यास व वाचन कर असं सांगतो ना मीं तुला !
मुलगा [हंसून] - बाबा, उत्तर माहीत नाहीं म्हणून आतां कल्टी मारताय तुम्ही ...
बाबा - 'कल्टी' ?
मुलगा - जावूंदे तें बाबा. तुम्हाला नाही कळणार तें. पटकन सही मारा बघूं इथें.

अवलोकन संपादन
शशिकांत ओक | 8 July, 2014 - 02:05
शब्द छटा

खडा

मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!

भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो.
ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो.
डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते.
पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे.
ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते.
खा पुढे डी समुद्राशी सलगी करते.
खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते.
डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते.

अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!

मला एक प्रश्न पडला आहे. कुणी मदत करू शकेल काय?

'दोन ओळींची कविता' या अर्थाने 'द्वीपदी' हा शब्द बरोबर आहे की 'द्विपदी'?

Pages