चंदेरी धबधब्यांची माळ (- मोठी प्रचिसहीत)

Submitted by धनश्री on 1 May, 2012 - 16:14

चंदेरी धबधब्यांची माळ अर्थात Silver Falls State Park. अमेरिकेच्या उत्तर्-पश्चिम भागातील ऑरिगन राज्यात हे स्टेट पार्क आहे. पोर्टलँड या शहरापासून अंदाजे दीड तासाच्या अंतरात हे ठिकाण येते. निसर्गाने उदंड हस्ते लयलूट केलेली एक देखणी जागा. दहा सुंदर धबधब्यांचा नजारा आणि डोळ्यांना थंडावा देणारी हिरवीगार शाल. परवाच एप्रिलमधल्या शेवटच्या विकांताला २ दिवस तिथे कॅम्पिन्ग ला गेलो होतो. त्याचा हा प्रचि वृत्तांत. काही प्रचि मी तर काही नवर्‍याने काढली आहेत.

हे पार्क खूप जुने आहे. अंदाजे ९००० एकरात पसरले असून प्रचंड मोठी डग्लस फरची झाडे सर्वत्र दिसतात. यातील काही झाडे १०० पेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत.

प्रचि १

दहा धबधब्यांची ट्रेल हा येथील महत्त्वाचा पर्यटन भाग असला तरी कॅम्पिन्ग, एका दिवसाची सहल, उन्हाळ्यात लहान मुलांसाठी जुनिअर रेंजर कॅम्प, घोडेस्वारांचा कॅम्प, इ. अनेक गोष्टी करता येतात. पार्कच्या अगदी जवळ वस्ती फारशी नाही त्यामुळे मुक्कामाला जाताना अन्न, पाणी, अंथरूण-पांघरूण, औषधे, कॅम्पफायरचे सामान, हे सर्व नेहमीचे सामान नीट घेऊन जावे. आम्ही बर्‍यापैकी "राजेशाही" कॅम्पिन्ग करतो. राजेशाही अशासाठी की लहान मुलीसोबत मला तंबू ठोकून राहायला जरा भीतीच वाटते. Happy ऑरिगन मधला बारामाही पडणारा पाऊस, काही सरपट्णारे प्राणी, आणि अन्नाच्या वासाने रात्री येणारी जनावरे यापासून संरक्षण म्हणून आम्ही लाकडी केबीन आरक्षित करून राहतो. हे हॉटेल सारखे अगदी आरामदायी नसते. पण विजेचा दिवा असतो. काही ठिकाणी केबीन मधेच लहान नहाणीघरची सोय असते. पण बहुतेक ठिकाणी चार लाकडी भिंती, लाकडी जमीन, आणि डोक्यावर छप्पर असते. नंबर १ आणि २ साठी, आंघोळीसाठी कॉमन सोय असते. पण ती बर्‍याच ठिकाणी आधुनिक असते. होल वावर इज अवर किंवा भारतातल्या लोटा परेड सारखी नाही. Happy

प्रचि २

ही आमची केबीन.

शुक्रवारच्या रात्री मुक्कामाला गेलो. रात्री गेल्यावर केबीनमधे सामान नीट लावले. बाहेर जरासं भुरभुरत होतं म्हणून त्या रात्री कॅम्पफायरभोवती बसायचा मोह टाळला. पण दुसरे दिवशी सकाळी छान उजाडले होते. लगेच शेकोटी भोवती येउन बसलो.

प्रचि ३

मग तिथेच चहा, नाश्ट्याची तयारी सुरु केली.

प्रचि ४ (from cell)
009.JPG

वाफाळणारा टोस्ट Happy आणि गरमागरम मसाला चहा.

प्रचि ५

चला पटकन घ्या.

प्रचि ६

आता आवरून भटकंती सुरु करुया. ही साऊथ फॉल्सच्या दिशेने जाणारी वाट.

प्रचि ७

हा आहे आमचा लाडका साऊथ फॉल्स (उंची १७७ फूट). याच्यामागून ट्रेल जाते. खूप निसरडी आणि बर्‍यापैकी धोकादायक वाटत असली तरी जाताना खूप मजा येते. लहान मुलांना घट्ट पकडावे लागते. आता माझी मुलगी ८ वर्षाची आहे पण हा ट्रेक आम्ही ती ३ वर्षांची असल्यापासुन करतो. तेव्हा जास्त काळजी घ्यावी लागे.
धबधब्यामागे गेलं की पाण्याचे तुषार अंगावर उडतात. मस्त फील असतो तो.

प्रचि ८

धबधब्याचे सौंदर्य न्याहाळताना नवरा आणि माझी लेक. फोटोत मागे जो पांढरट ठिपका दिसतोय ती माणसे आहेत.
प्रचि ९

हा तोच फॉल्स पण ट्रेल पार करून खाली गेल्यावर.
प्रचि १०

मग प्रवाहाच्या काठाकाठाने आपला प्रवास सुरु होतो पुढे जवळजवळ ८ मैल.
प्रचि ११

वाटेत अशी गच्च हिरवाई भेटते.
प्रचि १२

पुढे लोअर साऊथ फॉल्सला बरेच उतरावे लागते. तेव्हा या पायर्‍या आहेतच.
प्रचि १३

मग येतो लोअर साऊथ फॉल्स (उंची ९३ फूट)
प्रचि १४

या धबधब्याच्यापण मागे जाता येते. बघा येणार का? Happy
प्रचि १५

कसं फसवलं!! हे प्रचि थोडं फसवं आलंय. ही आहे खरी वाट. पण तिथून जाताना पाण्याचा प्रचंड आवाज आणि अंगावर उडणारे थेंब (भिजवणार्‍या धारा म्हणायला पाहिजे) यामुळे भान हरपते. निसर्गाचं एक रौद्र पण लोभस रुप दिसते.

प्रचि १६

चला आणखी पुढे. आता थोडं अंतर चालून गेलात की ओळीने ३-४ धबधबे थोड्या थोड्या अंतरात दिसतील.

हा लोअर नॉर्थ फॉल्स - उंची - ३० फूट
प्रचि १७

हे आवळेजावळे - ट्विन फॉल्स - उंची - ३० फूट
प्रचि १८

हा आहे दुहेरी किंवा डबल फॉल्स - उजवीकडे एक छोटुसा धबधबा दिस्तोय का? या दोन्हीची मिळून उंची आहे १७८ फूट.
प्रचि १९

मग येतो हा मिडल नॉर्थ १०६ उंचीचा आणि रपारपा पडणारा. जवळचा माणूस काय बोलतोय हे पण समजत नाही. Happy
प्रचि २०

प्रचि २१

मग काही अशा वाटा येतील.
प्रचि २२

काही ठिकाणी असं स्वच्छ, निर्मळ पाणी दिसेल.
प्रचि २३

आणि मग मुख्य ट्रेल पासून एक फाटा लांबवरच्या नॉर्थ फॉल्स कडे जाईल आणि एक फाटा फक्त हिवाळ्याच्या आसपास कोसळणार्‍या विंटर फॉल्स कडे जाईल. नॉर्थ फॉल्स कडे जाऊन आल्यावर परत याच वाटेने विंटर फॉल्स कडे जाउया.

हा नॉर्थ फॉल्स (उंची - १३६ फूट) ट्रेल याच्यामागून पण जाते. पण अगदी लागून नाही. छान रुंद अशी वाट आहे. पण वरून धो धो कोसळणार्‍याचा दरारा जाणवतो.

प्रचि २४

या फॉल्सपासुन १/३ मैलावर अप्पर नॉर्थ फॉल्स (६५ फूट उंच) आहे. तो प्रचि काढण्यासाठी अप्रतिम आहे.
प्रचि २५

मग परत वळून आधीच्या वाटेवर या. क्षणभर विश्रांती घेउया.
प्रचि २६

आता विंटर फॉल्स बघुया. उन्हाळ्यात हा पार आटून जातो.
प्रचि २७

धबधब्यांची उंची कंसात दिली आहे. धबधब्याची नावे अगदीच रुक्ष आहेत. कदाचित त्या त्या ठिकाणानुसार असल्याने लक्षात ठेवण्यास सोपे. पण मला तर वाटले की धबधब्याच्या रुपानुसार रौद्रप्रपात, धुवांधार, आनंदवर्षा अशी छान छान नावे देता आली असती.

येथील कॅम्पग्राउंड बर्‍यापैकी गजबजलेले असते. तरीही अगदी स्वच्छ आणि निसर्गाला पूर्णपणे जपणारी व्यवस्था आहे.
प्रचि २८

परतीच्या वाटेवर लांबून म्हणजे पार स्टेटरोड्वरून रुबाबदार दर्शन देणारा हा नॉर्थ फॉल्स. कामाचा शिणवटा घालवून नवा उत्साह देणारा हा विकांत हवाहवासा वाटत होता.
प्रचि २९

-----------------------------------------------------------------------------

टीपः आतापर्यन्त मायबोलीवर प्रतिसाद देण्याइतपतच लेखन केले आहे. तरी काही चुका असतील तर अवश्य कळवाव्या.

गुलमोहर: 

मस्तय Happy

सुंदर जागा.
प्रचि जर पिकासावरुन देता आली, तर मोठ्या आकारात देता येतील. या प्रचिंसाठी मोठा आकारच हवा.

हायला,
काय जबरी जागा आहे. Happy
फोटो मस्तच आहेत.
सुशेगात तिथेच रहायला मिळावं. आयत खायला मिळावं अस वाटतय. Happy

डोळे निवले गं बाई ! असाच सतत तुझा प्रवास होवुन आम्हालाही नेट सफर घडु दे. आणी तुलाही निसर्गाच्या जवळ रहायला मिळू दे. धन्यवाद फोटो शेअर केल्याबद्दल.

सुंदर प्र.ची. अन ट्रेकही मस्तच , छोटी एवढं चालली ग्रेट Happy
, मला तर वाटले की धबधब्याच्या रुपानुसार रौद्रप्रपात, धुवांधार, आनंदवर्षा अशी छान छान नावे देता आली असती.>>>>> अगदी अगदी मनातलं ल्हिवलत बगा ...........

Pages