अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

महाराश्ट्रा ( ष्ट्रा) तले मुसलमान/ ख्रिश्चन देखील उत्तम मराठी बोलतात. कांहीजण तर उत्तम लिहितात देखील. पण मराठी लोकच त्यांच्याशी बोलतांना हिंदीत सुरुवात क्ररतात. हेही चूकच.>>>
महाराष्ट्रात वाढलेल्या,जन्म झालेल्या, शिक्षण घेतलेल्या ख्रिश्चन व मुसलमानांनी कुठली वेगळी भाषा बोलावी? हा तर्क मला अगम्य वाटला.धर्मावरून भाषा ठरत असली तर मग बौध्दांची वेगळी ,ज्यु लोकांची वेगळी -असे म्हणायचे आहे का?

Happy

>>मदुराईतील 'मीनाक्षी मंदिर' परिसरातील साड्यांचे दुकानदारही तुम्ही मराठी बोलू लागला की पूर्ण खरेदी होईतो मराठीतूनच तुमच्याशी बोलता>>
हा अनुभव मीही दोन वर्षांपूर्वी घेतला आहे.

मराठीतले शिलालेख जरी प्राचीन नसले तरी त्यापुर्वी ती बोलली जात असणारच.
त्याचे पुरावे कसे सापडतील ?
मराठीत बोलायचा अनुभव मला परदेशी पण आला आहे. माझ्या हातात मराठी पुस्तक
बघून, किंवा फोनवर मराठी बोलताना ऐकून, अनेक जण माझ्याशी मराठी बोलायला
पुढे येतात.
(तोंडावरुन मी मराठी वाटत नाही, असे मात्र आवर्जून सांगतात. म्हणजे काय ते मला
कळत नाही.)
ओमानमधला, एक स्थानिक अरब माणूस पण माझ्याशी मराठीत बोलत असे. (तो
पुण्यात शिकला होता.) मुंबईत तर बसमधे, पोस्टात मराठी बोलल्यास चांगली सेवा
मिळते, असे मी बघितलेय. रेल्वे मधे मात्र, त्यांच्या बिल्ल्यावरुन त्यांची भाषा कळते.

हिंदी चित्रपटातले अनेक अमराठी कलाकार, उत्तम मराठी बोलतात.

मराठीचा इतिहास हा महाराष्ट्री प्राकृत --> अपभ्रंश प्राकृत --> यादवकालीन मराठी --> मध्ययुगीन मराठी असा काहीसा ढोबळमानाने झाला आहे. भाषा सतत बदलती/ प्रवाही असते. तमिळ, संस्कृतसारख्या ज्या 'अभिजात' भाषा आहेत त्यांचे स्वरूपही असेच बदलते राहिलेले आहे. दोनहजार वर्षांपूर्वीची तमिळ भाषा कुठल्याही तमिळभाषकालाही सहजासहजी येत नाही, शिकावी लागते. संस्कृतमधेही वैदिक संस्कृत वेगळे, नंतरचे अभिजात (कालिदास वगैरे) वेगळे आणि मध्ययुगीन संस्कृत आणखी थोडे वेगळे आहे हे भेद आहेतच

हो आहेत की. महाराष्ट्री प्राकृतातलं साहित्य. अपभ्रंशातलं साहित्य. नंतरचे शिलालेख, ताम्रपट, इ. यादवकालीन आणि मध्ययुगीन मराठीवर शं. गो. तुळपुळेंनी मोठं काम करून ठेवलंय.
आणि जेव्हा आपण दिवे आगरचा ताम्रपट, श्रवणबेळगोळ चा लेख मराठीत आहे म्हणतो तो मध्ययुगीन मराठीपेक्षाही थोड्या वेगळ्या भाषास्वरूपात आहे हे लक्षात ठेवायचं. Happy

हो तेच पुरावे द्यावे लागतील. तशी मान्यता मिळाली तरच संशोधनासाठी निधी मिळणार आहे.
मी असे वाचले कि पुर्वी जैन लोक पण मराठी भाषाच वापरत असत. म्हणून तर बाहुबलीच्या मूर्तीखालचा शिलालेख तसा आहे. आता ती नाळ तूटलीय.
कोल्हापूरातले जैन लोक मात्र घरातही मराठी बोलताना ऐकलेत मी.

हो जैनांची धर्मभाषा जैन महाराष्ट्री प्राकृत म्हणून ओळखली जाते.

दिनेशदा, अभिजात ठरली म्हणून मगच निधी मिळणार आणि मगच संशोधन होणार वगैरे काही नसतं. ज्यांना करायचं असतं त्यांना इच्छा असेल तर संशोधनाचे आणि फंडिंगचे मार्ग उपलब्ध होते/ आहेत. संशोधन झालंही आहे अनेक. सर्वसामान्यांना माहित नसतं एवढंच. परदेशी विद्यापीठांत पण मराठीवर संशोधन होतं, शिकवली जाते.

पुरावे द्यायचं काम करायला तज्ज्ञ आहेतच. ते ऑलरेडी कामाला लागलेत. Happy

गाथासप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतातला (म्हणजे मराठीचं आद्यरूप किंवा मराठीची आई) सगळ्यात जुना ग्रंथ आहेच की उपलब्ध. तत्कालीन सातवाहन नाण्यांवरही एका बाजूला महाराष्ट्री प्राकृत आणि एका बाजूला आन्ध्र शैलीतलं प्राकृत आहे.

तेच ना वरदा. असे संशोधनपर लेखन सामान्याना वाचायला मिळत नाही.
अभिमान कशाचा धरायचा ते तरी कळू दे.

काय आहे ना, आपल्या अभिमानाचा एकमेव बिंदू शिवकाळ आहे/ असतो. ते चुकीचं आहे असं नाही पण त्याच्या पलिकडे इतिहास आहे का हे जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा किती 'इतिहासप्रेमी' करतात? जसं संशोधकांनी त्यांचं संशोधन सामान्य जनतेपर्यन्त पोचवायचे प्रयत्न करायचे असतात तसं इतरांनी माहित करून घ्यायला नको का? मराठीत यावर पुस्तकं नाहीत का? तर कोलते, तुळपुळे, आणि इतर अभ्यासकांनी पुस्तकं लिहिलीत. ती खपत नाहीत म्हणूनच आता आउट ऑफ प्रिन्ट आहेत. पण तशी ती पुस्तकं आहेत का याचाही शोध घ्यायचे कष्ट घेणार नाही, मसापच्या वाचनालयात बघणार नाही, अगदी गूगलवर मिळाली तरच कदाचित बघणार असं असेल तर कोण प्रत्येक वेळी तोंडात घास येऊन भरवणार? (आत्ता विकिपेडियावर पाहिलं तर तिथेसुद्धा मराठीची बरीच चांगली एन्ट्री आहे चक्क).

सर्वसामान्यांना त्यांचा इतिहास/ मानबिंदू सांगायची जबाबदारी जशी तज्ज्ञांची आहे तशीच त्यात उत्सुकता दाखवून जाणून घ्यायचा प्रयत्न करायची जबाबदारी समाजाची नाही का? प्रत्येक वेळी समाजाने त्यांच्या रोजच्या धकाधकीतून वेळ मिळत नाही म्हणलं तर ती धकाधकी संशोधकांनासुद्धा चुकलेली नाही. त्यांच्या रोजच्या व्यस्त दिनक्रमांतून ते पुस्तकं लिहितील पण त्याचं मार्केटिंग नाही करू शकत. आणि खप नाही म्हणून ही अशी पुस्तकंही घ्यायला, पुनर्मुद्रित करायला प्रकाशक नाखूष असतात

वरदा, एकदम मान्य!

हे अभिजात प्रकरण नक्की काय आहे? ही भारत सरकारची व्याख्या आहे की जागतिक? २००० वर्षे हा मानदंड कोणी ठरविला?

सहज सहज मिळाले तर ठीक नाहीतर तुझा वेळ त्यात जाउ नये एवढेच. विकीपेडिया वर क्लासिकल लॅन्ग्वेजेस मधे थोडीफार माहिती दिसते आहे. ती व तेथील संदर्भ बघतोच. पण ती १००% खरी असेल असे नाही. अधिकृत व्याख्या असेल तर हवी होती.

दिनेश आणि वरदा ~

छान चर्चा चालू आहे तुम्हा दोघात मराठीला 'अभिजात' दर्जा मिळण्यासंदर्भात.

या अनुषंगाने आजच्या "सकाळ" मध्ये एक आशादायक बातमी आली आहे, कदाचित ती तुमच्या पाहाण्यात आली नसेल म्हणून त्याची इथे लिंक देतो :

http://epaper.esakal.com/Sakal/21Apr2012/Enlarge/PuneCity/index.htm

निदान हा रथ काही अंगुळे तरी पुढे सरकला असे म्हणण्यास हरकत नाही.

?

या धाग्यावर एक अनुभव लिहावासा वाटतोय. भारतात येण्यासाठी एकदा दम्माम विमान तळावर मी एकदा जरूरी पेक्षा जास्तीच लवकर पोचलो. मग वेळ घालवायला सोबत घेतलेल मराठी पुस्तक काढून वाचत बसलो. माझ्या समोर एक तरूण मुलगा बसला होता, मस्त तगडा, उंच असा. त्याला बहुतेक माझ्याशी बोलावस वाटत होत कारण तो सारखा अधुन मधुन माझ्याकडे पहात होता. शेवटी न राहावून तो माझ्याबाजूला येउन बसला व त्यान विचारल "तुम्ही मराठी का?" म्हटल हो. "तुमच्या हातातल पुस्तक बघुन ओळखल होतच..... " अन मग बांध फुटल्यागत तो माझ्याशी बोलत सुटला. "सहा महिने झाले हो मराठीत बोलून !! तुमच्याशी बोलतोय तर किती बर वाटतय सांगू!! अनेक दिवस उपाशी, भुकेल्या माणसाला जेवण मिळाव तस झालय..." तो रत्नागिरीचा होता फिरोज त्याच नाव. एका रशीयन जहाजावर कामाला होता. सगळे सहकारी युक्रेनीयन आर्मेनीयन असे परदेशीच, जहाज महिनो न महिने समुद्रात. फोन/मोबाईल/इण्टरनेट ही नाही बोलणार कुणाशी? त्याला सुटी मिळाली अन जुबैल बंदरावर उतरून तो माझ्या विमानाने मायदेशी जायला निघाला होता. खूष होता गडी. माझ्याशी पाउणएक तास भरभरून बोलला दुर्दैवाने त्याला विमानात सीट माझ्या बाजूला मिळाली नाही. पण एका मराठी माणसाला जेव्हा मराठी बोलायलाच मिळत नाही तेव्हा त्याची कशी अवस्था होते ते मी फिरोज कडून अनुभवल.

>>> गाथासप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतातला (म्हणजे मराठीचं आद्यरूप किंवा मराठीची आई) सगळ्यात जुना ग्रंथ आहेच की उपलब्ध.

या ग्रंथनिर्मितीचा नक्की कोणता काळ (म्हणजे कितव्या शतकात हा ग्रंथ रचला गेला?)? ग्रंथकर्ता/ग्रंथकर्ती कोण?

masture, mazya navavar click kara. Tyat mazya lekhanat bagha. 'kalapravahi vahun gela..' asha sheeshakacha ek lekh ahe gathasaptashativar

वरदा, धन्यवाद. का कोणास ठाऊक पण या चर्चेत डीएमके आणि करूणानिधी/जयललिता वगैरेंची नावे येतील अशी शंका पहिल्यापासूनच होती. ती बर्‍यापैकी खरी ठरली. आजकाल हे निर्णय विषयाच्या मेरिट वर ठरता राजकीय समीकरणे बघून ठरतात असे दिसते.

पण त्या लेखातील बाकी माहिती चांगली आहे.

श्रीकांत, मी हे सध्या अनुभवतोय. दिवसभरात मी इंग्लीश, हिंदी, गुजराथी, स्वाहिली अशा भाषा बोलत असतो, मायबोलीवर जे काही खरडेन तेवढेच मराठी.
कधी कधी काही मायबोलीकर माझ्याशी स्काईप वर मराठी बोलतात, तेवढेच. नाहीतर
घरी फोन करेन तेवढाच.
--------------
पुस्तकाबाबत पण एक अनुभव सांगण्याजोगा. बरीच वर्षे झाली याला. पुण्यातील
मायबोलीकर सईला एक पुस्तक हवे होते. ते तिथा अप्पा बळवंत चौकात मिळाले नाही.
मला तिने मुंबईत चौकशी करायला सांगितले. मला खात्री होती मिळेल अशी. पण
मॅजेस्टीक, आयडीयल मधे नव्हतेच. त्याचे मुद्रण शासकिय मुद्र्णालयात झाले होते.
म्हणून तिथे गेलो. तर तिथल्या माणसाने ते पुस्तक मला लांबून दाखवले (कपाटात होते.)
चाळायला, हात लावायला सुद्धा मिळाले नाही. कारण काय तर म्हणे, ती एकच
प्रत आता आहे. हाताळून खराब होईल.
पुनर्मुद्रण कधी होईल विचारले तर होणार नाही म्हणाला. मी म्हणालो, आम्हाला हवेच आहे अगदी. तर म्हणाला, एकासाठी थोडीच छापणार ?
-----------
मालकीहक्क, लेखकाचे मानधन वगैरे मुद्दे नसते तर आपल्याकडची जुनी पुस्तके आपण
इथे मायबोलीवर उतरवून ठेवली असती, नाही का ?

---------------

मी एकदा दिल्ली विमानतळावर मंगला गोडबोले यांच, पर्स हरवलेली बाई, हे पुस्तक
वाचत होतो. मला भयंकर हसू येत होते आणि अर्थातच ते आवरण्याचे काही कारणच
नव्हते. (ते पुस्तक आहेच तसे.) मला एक सरदार न्याहाळत होता. त्याला रहावले
नाही, मला विचारले, भई बहुत बढीया किताब पढ रहे हो क्या, हमे भी तो बताओ.
काय उत्तर देणार त्याला ? त्यातले विनोद कळायला, मराठीच असणे गरजेचे आहे.

वरदा,

तुम्ही दिलेला इथला लेख वाचला :
http://casi.ssc.upenn.edu/system/files/The+Classical+Language+Issue.pdf

अभिजात भाषेसाठीचा पूर्वीचा १००० वर्षे प्राचीनतेचा निकष करुणानिधींनी २००० वर्षे केला हे खटकलं. त्यामुळे भाषेचा अभिजात दर्जा हे राजकारणाचे क्षेत्र बनले आहे. भाषेच्या विकासास या दर्जाचे कितपत सहाय्य होईल याची शंकाच आहे.

बाकी उर्वरित लेखाशी सहमत. विशेषत: आंतरभाषीय विद्वानांच्या वानवेवर नेमके बोट ठेवले आहे. दोन (वा अधिक) भाषांवर प्रभुत्व असलेले विद्वान दुर्मिळ होत चालले आहेत. फार पूर्वीपासून महाराष्ट्रातले लोक बहुभाषाकोविद म्हणून ओळखले जात. आपल्या मर्‍हाटी लोकांनी हे क्षेत्र आत्मसात करावे. Happy

आ.न.,
-गा.पै.

माझी त्या लेखाशी पूर्ण सहमती आहे म्हणून मी तो लेख टाकला नव्हता, तर त्यातले अनेक मुद्दे हे सर्वसामान्य मीडियात कधीच चर्चिले जात नाहीत म्हणून टाकला होता. आपल्याकडे भाषिक अभिमान वगैरे अत्यंत उथळ पातळीवर चर्चिले जातात. त्यामागचे व्यामिश्र वास्तव, राजकारण, इतिहास यांचे लागेबांधे कधीच समोर आणले जात नाहीत

Pages