अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

परदेशात फ्यू मंथ्स् स्टे
करून इंडियात परत
आलेल्यांना मराठी वर्डस्
रिमेम्बर करायला खूप
डिफिकल्ट जातं.>>>अरे वा मास्तुरे उर्फ सतीश माढेकर.

मन्दार मस्त लेख रे.१००% सहमत.
अशोकना पण अनुमोदन. खरच लहान उपनगरातून इंग्रजाळलेली मराठी जास्त पहायला मिळते. सकाळी झी मराठीवर "रामराम महाराष्ट्र " पहाताना प्रत्येकवेळी " शुभेच्छा दिल्या आहेत मम्मी, पप्पा, मोठी मम्मी, मोठे पप्पा "
हे ऐकले की चीड येते.
आमच्या शेजारची (मराठवाडीची ) गाडी रिपेरियरला दिली आहे म्हणते. अगं दुरुस्तीला दिली आहे म्हण ना बाई. एवढा इंग्रजी शब्द वापरण्याचा हव्यास कशाला? एकदा बस मधून प्रवास करत असताना शेजारची एक बाइ मुलाला सिट, गो, स्टँड ईट. असं सतत बोलत होती. मी त्या मुलाला विचारलं "कुठल्या वर्गात आहेस तू? " तर ती बाई मला हसून म्हणाली, "त्याला कुठल्या क्लासमध्ये आहेस विचारा. त्याला मराठी समजत नाही." तो मुलगा फट्कन म्हणाला, "मम्मी मला समजतं. मी तिसरीत आहे." म्हणजे त्या मुलाला समजत होतं पण त्या बाईला ते समजू द्यायचं नव्हतं. दक्षिणेतले लोक थोडे आगाऊ असतात हे खरे आहे. ते काहीही झाले तरी त्यांच्याच भाषेत बोलतात. पण त्यामुळे त्यांची भाषा टिकली आहे. ते कितीही शिकलेले असू देत ते आपल्याच भाषेतून पत्रिका छापतील. आपण मात्र फार उदारपणे दुसर्‍याला समजलं पाहिजे ,एवढा पण दुराभिमान नको म्हणालो आणि आपल्याच भाषेची भेळ करून ठेवली. इंग्रजी शब्द वापरू नयेत असे म्हणणे नाही. पण जितकं मराठी स्वच्छ बोलता येइल तेवढे बोलायलाच पाहिजे. विनाकारण इंग्रजी शब्द घुसडू नयेत.
मी आज सारी पेटिकोट आणला.
मी हे 'थर्टी फायुला' विकत घेतलं.
आज आमच्या मुलाच्या स्कूलला हॉलीडे आहे.
हाफडे केंव्हा पासून आहे?
मी मंडेला शॉपिंगला जाणार आहे.
आज माझी मम्मी स्कूलमध्ये येणार आहे टीचरला पनिशमेंट देऊ नको असे सांगायला (मुलं)
आत्ताच तो एग्झाम लिहून आला आहे.

अशी कितीतरी वाक्यं आहेत ज्याला मराठीत सहज सोपे माहित असलेले शब्दं आहेत. अशी कितीतरी वाक्य आहेत ती सगळी लिहिली तर एक मोठ्ठा लेखच होइल. ही दोनचार वाक्य मी उदाहरणादाखल दिली आहेत. आम्ही आंध्रात अमराठी प्रांतात राहतो म्हणून आम्हाला मराठीची किंमत कळलेली आहे.

एक काळ असा होता, कि आपल्याला थोडेफार इंग्रजी येते, हे दाखवणे
बायकांसाठी अत्यावश्यक बाब होती. हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या आसपासचा
होता. (टिळक आणि आगरकर या नाटकात. भक्ती बर्वे एका विकेशा स्त्रीची
भुमिका करत असे, आणि तिच्या तोंडी असे अनेक शब्द होते.)

मी दहावीपर्यंत मराठी माध्यमातच शिकलो, आणि पुढेही बारावीपर्यंत
उच्च मराठी होते. तरीही मी असेच म्हणेन कि या मानसिकतेतून आमच्या
तोंडी अनेक इंग्रजी शब्द रुळले होते. ते इंग्रजी आहेत याचे भान नव्हते
आणि मराठी प्रतिशब्दही माहीत नव्हते.

उदा. आयडीया, टाईमप्लीज, एस्क्यूज मी, प्रॉब्लेम, सॉरी, थँक यू
असे अनेक शब्द, त्याकाळात शाळेत इंग्रजी सुरु व्हायच्या आधीच
जिभेवर रुळले होते.

आणखी एक मुद्दा म्हणजे, इंग्रजांच्याच प्रभावाने एस टी च्या क्षेत्रात अनेक
इंग्रजी शब्द चिखलात पाय रुतावा, एवढे रुळलेत.

एस. टी. (स्टेट ट्रान्सपोर्ट ), डेपो, टेंपरवारी, रिजर्वेशन, ष्टापचा माणूस,
शिटा, प्याशिंजर, वायपर, पंप, फलाट. तिकीट, पंच, कन्सेशनचा पास,
स्टॉप, एक्स्प्रेस, ड्रायव्हर, कंडक्टर... या शब्दांना मराठी प्रतिशब्द योजण्याचे
प्रयत्न झाले तरी ते शब्द रुळले नाहीत.
या बाबतीत, काल नविन काळे यांच्या एका लेखात वाचले कि भाषा हि अशीच
बदलत राहणार.
त्याकाळात माऊलींनी सामान्य लोकांना समजावी म्हणून, भावार्थदिपीका लिहिली,
आज आपल्याला ती भाषा कळणे कठीण जातेय.

सुरेखा कुलकर्णी यांच्या वरील प्रतिसादातील "आम्ही आंध्रात अमराठी प्रांतात राहतो म्हणून आम्हाला मराठीची किंमत कळलेली आहे." या मताशी सहमत.

आंध्र, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी दक्षिणेकडील या चार राज्यांनी आपापल्या मातृभाषेचा जो अभिमान बाळगला आहे तो योग्यच मानला पाहिजे. त्याला अट्टाहासाचे काही वेळी रूपडे प्राप्त होत असले तरी त्याची तिथल्या लोकांना फिकिर नसते. तुम्ही आमच्या राज्यात आला आहात ना, मग इथल्या मातीतील भाषेतच तुमच्यासमवेत संवाद अपेक्षित आहे. भाषा जगते ती अशा स्वाभिमानातून. या चार राज्यात काय इंग्रजी नाही ? जरूर आहे. किंबहुना महाराष्ट्रापेक्षाही इंग्रजीचे तिथे महत्व अधिक मानले जाते, पण रोजच्या व्यवहारात तिथला कोणत्याही पातळीवरील दुकानदार आणि अन्य व्यावसायिक राजभाषेचाच वापर करीत असतात. हिंदीला तर जागा नाहीच, पण हैद्राबाद, चेन्नई, त्रिवेन्द्रम आदी प्रमुख 'मल्टीलिंग्वल' शहरे सोडली तर अन्य छोट्याछोट्या शहरातून पुढे जाताना आमच्यासारख्या प्रवाशांनी इंग्रजीतून विचारलेल्या चौकशीला उत्तर इंग्रजीतूनच मिळेल याची शाश्वती नसते. तिथे नोकरीनिमित्य वास्तव्य असलेल्या काही मराठी बांधवांनी तर कन्याकुमारीच्या दिशेने जाताना रस्ता-मार्गदर्शनाबाबत काही चौकशी करायचीच झाल्यास ती फक्त पोलिस स्टेशन अथवा रस्त्याच्या बाजूला कुठेनाकुठे तरी लागू शकणार्‍या एखाद्या नॅशनलाईज्ड बॅन्केत जाऊनच करावी असा योग्य सल्ला दिला होता.

@ दिनेश ~
"या शब्दांना मराठी प्रतिशब्द योजण्याचे प्रयत्न झाले तरी ते शब्द रुळले नाहीत." - खरे आहे; आणि अट्टाहासाने कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हेही तितकेच सत्य. तरीही मी ज्या ज्या वेळी एस.टी.ने प्रवास करतो [असे बर्‍याचदा घडतेच, नोकरीमुळे] तिथे कंट्रोल रूममधून [आता कंट्रोल रूम नामही बोटात किती रुळले आहे ते पाहा] वेळोवेळी अधिकार्‍यांकडून पुकारा होतो त्यावेळी 'अमुक क्रमांकाच्या फलाटावर तमुक क्रमांकाची गाडी थांबली आहे, तिच्या चालक आणि वाहकांनी रुमशी संपर्क साधावा'. ड्रायव्हर आणि कंडक्टरऐवजी 'चालक, वाहक' बर्‍यापैकी रुळल्याचे आढळून येते.

पण पोलिस, पोस्टमन, बॅन्क, कॉलेज [विद्यार्थीवर्ग कधीही 'मी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे' असे क्वचितच म्हणत असेल. इथे 'फर्ग्युसन कॉलेज' असाच स्वाभाविक उच्चार मुखातून बाहेर पडतो. मात्र 'पुणे विद्यापीठ' हे नाम 'पुणे युनिव्हर्सिटी' पेक्षा जास्त प्रचलित असल्याचा माझा अनुभव आहे.] अशी नावे जशीच्या तशीच राहणार आणि त्याबद्दल तक्रारीला जागाही नाही; कारण सार्‍या देशात कोणत्याही भाषेत यांचा उच्चार इंग्रजी नामाप्रमाणेच होतो.

भाषेचे स्थित्यंतर हे असे होत राहाणार यात दुमत नाही. पण आपल्याकडील आधुनिक विचाराची पालकमंडळीं आपल्या पाल्याने मराठीतून बोलू नये याचा जो अट्टाहास धरतात तो संतापजनक आहे.

"बेबी, श्रीखंड स्वीट आहे ? से येस !!" असे जेव्हा कानावर पडते त्यावेळी त्रयस्थ म्हणून का होईना ऐकणार्‍याच्या मनी चीड निर्माण होणारच.

अशोक पाटील

ह्याचे मुळ मराठी माणसांच्या न्युनगंडात आहे! तसेच राज्याच्या प्रथम भाषा द्वितीय भाषा ह्या बिंडोक शैक्षणिक धोरणात आहे. ह्या धोरणामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठी भाषा न शिकल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पण आजच्या भारतात ईंग्रजी न येण्याने होणारे सामजीक व आर्थिक नुकसान तुलनेने मोठे आहे. मराठीस नुसते प्रथम भाषा करून काय उपयोग ? त्या भाषेतून नवनवीन ज्ञान उपलब्द करून देण्यात मराठी माणुस व शासन दोन्ही प्रंचंड कमी पडले व पडत आहेत. माझ्या मते हे एक खुप मोठे कारण आहे महारष्ट्रातील मराठी शाळा (प्रथम भाषा) कमी होण्याचे. मग द्वितीय भाषा असलेल्या शाळातून द्वितीय भाषा मराठी शिकलेल्या मराठी लोकांकडुन कुठल्या व कसल्या प्रकारची भाषा अपेक्षीत आहे?

मला माहीती आहे इथे अनेक जण द्वितीय भाषा मराठी असलेल्या शाळतून शिकले आहेत व त्यांची मराठी प्रथम भाषीकां इतकीच (किंबहुना अधीकच) उत्तम आहे. पण त्या मागचे कारण तशी मराठी आजुबाजुला आत्मसात करण्यासाठी उपलब्ध होती. ह्या पुढच्या काळात जेंव्हा अजुबाजुला द्वितीय भाषा मराठी हीच व्यापक प्रमाणात असल्यावर करायचे काय?

भाषा बिघडली नसून ती वापरणारा समुदाय हा वैचारिक गोंधळात आहे व हा गोंधळ त्याच्या भाषेतून दिसतो आहे. नवनिर्माणची प्रक्रिया मराठी समाजात कितपत आहे हे मला माहीत नाही पण ते नवनिर्माण,व्कल्पना मराठीत व्यक्त होत नाहीत.,मराठी येण्यामुळे मराठी माणसाचे आर्थिक फायदे होत नाहीत. असे असताना मराठी बिघडली असले गळे काढण्यात काय अर्थ आहे हे मात्र मला समजत नाही.

मंदारजी,
महत्वाचा विषय, योग्य भूमिकेतून व्यवस्थित मांडल्याबद्दल धन्यवाद! गामा पैलवान आणि अशोक यांनीही चांगले मुद्दे मांडले आहेत.
कोणीतरी मांडलेला हा एक मुद्दा
>> सावरकरांनी मराठीवरचा फारसी प्रभाव नष्ट करुन मराठीचे 'संस्कृत'करण करण्याचा घाट घातला होता. << दिशाभूल करणारा आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि आजच्याही काळात मराठीवर प्रामुख्याने इंग्रजीचाच अनावश्यक प्रभाव आहे. त्यावेळचा आणि आताचा प्रश्न इंग्रजीचा प्रभाव कमी करणे हाच मुख्यत: आहे. तोच सावरकरांनी प्रामुख्याने हाताळला. त्यांनी दिलेले प्रतिशब्द 'संस्कृत्'मधूनच येणे नैसर्गिकच आहे. त्यांनी दिलेले शेकडो शब्द आता आपल्या आंगवळणी पडले आहेत.
शासनाने प्रतिशब्द कोष निर्मितीसाठी कमिटी नेमली होती. त्यांनी दिलेले बहुतांश शब्द संस्कृतमधूनच आलेले आहेत.
मराठी भाषेवर फारसीचा प्रभाव शिवरायांच्या काळी होता. तो कमी करण्यास शिवरायांनी मराठी शब्दकोष निर्माण केला. त्यांनाही संस्कृताचीच मदत घ्यावी लागली. आणि 'घाट घातला' असे म्हणण्यासारखे त्यात गैर ते काय आहे?

कालच एका दूरदर्शन वाहिनीवर ( हा शब्द आठवावा लागला Wink ) एक पाककलेवरचा कार्यक्रम चालू होता. त्यातल्या स्वयंपाकी की सूत्रसंचालक इतके अनावश्यक इंग्रजी शब्द वापरत होता. शेवटी कंटाळून मी वाहिनी बदलली Happy अन आज हा लेख वाचनात आला. त्यामुळे अगदी १०० टक्के पटला Happy
मंदार अगदी खरं! अनाठाई इंग्रजी शब्दांचा मराठीत वापर टाळला गेला पाहिजे. मी तर म्हणेन कोणतीही भाषा बोलताना, लिहिताना हे भान पाळले गेले पाहिजे. जिथे शक्य आहे तेथे तिथे त्या त्या भाषेतले शब्द वापरले गेले पाहिजेत, अर्थात आतताईपणा, हट्टाग्रहही नसावा.
रच्याकने मला 'धन्स' हा शब्द मात्र आवडतो बरं का Wink त्यात एक प्रकारचा गोडवा आहे असे वाटते, धन्यवाद मध्ये जsssरा अलिप्तता, परकेपणा वाटतो, तो या धन्स मध्ये नाही वाटत, हे माझे वैयक्तिक मत बरे Happy

कोणीतरी मांडलेला हा एक
मुद्दा
>>
सावरकरांनी मराठीवरचा फारसी प्रभाव
नष्ट करुन मराठीचे
'संस्कृत'करण
करण्याचा घाट
घातला होता. <<
दिशाभूल करणारा आहे.
स्वातंत्र्यवीर
सावरकरांच्या आणि आजच्याही काळात
मराठीवर प्रामुख्याने
इंग्रजीचाच अनावश्यक
प्रभाव आहे.
त्यावेळचा आणि आताचा प्रश्न
इंग्रजीचा प्रभाव
कमी करणे हाच मुख्यत: आहे.
तोच
सावरकरांनी प्रामुख्याने
हाताळला. त्यांनी दिलेले
प्रतिशब्द 'संस्कृत्'मधूनच
येणे नैसर्गिकच आहे.
त्यांनी दिलेले शेकडो शब्द
आता आपल्या आंगवळणी पडले
आहेत.
शासनाने प्रतिशब्द कोष
निर्मितीसाठी कमिटी नेमली होती.
त्यांनी दिलेले बहुतांश
शब्द संस्कृतमधूनच आलेले
आहेत.
मराठी भाषेवर
फारसीचा प्रभाव
शिवरायांच्या काळी होता.
तो कमी करण्यास
शिवरायांनी मराठी शब्दकोष
निर्माण केला.
त्यांनाही संस्कृताचीच
मदत घ्यावी लागली.
आणि 'घाट घातला' असे
म्हणण्यासारखे त्यात गैर
ते काय आहे?>>>>www.myvishwa.com/public/PublicBlog/readblog/4955126799762422664 हि लिंक बघा, त्यात तारिख ऐवजी दिनांक,तहसील ऐवजी प्रांत ई ई शब्द सावरकरांच्या संस्कृतकरणाची साक्ष देत आहेत.

जेम्स बाँड... जमस बंध>> जामोप्या,.....नाय जमले तुला माझ्या नावाचे संस्कृतकरण.

हे आवडते का पहा!! जेम्स
बाँड-- जमसबंध---जमसमंध!!>>तुम्ही का 'नावा'ड्याचे काम करत आहात?

नावाडी Lol कोटी आवडली. तुम्ही मात्र नाव आवडल की नाही ते सांगीतल नाही. जाउद्या,अवांतर होतय.
एक साधी गोष्ट पहा,बोलताना आजकाल मराठी आकडे, मराठी वार, कमीच वापरतात लोक. खासकरून मोबाईल नंबर जर मराठीत सांगितला तर ना अनेकदा समोरच्याला कळतच नाही. (सत्याणव चौसष्ट साठ छत्तीस पंच्याणव>>> भल मोठ प्रश्नचिन्ह चेहर्‍यावर ) . आता काय करायच ही एक समस्याच आहे.

ज्या गोष्टींचा शोध आपण लावलेला नाही, त्याचे उगाच्च आपल्या भाषेत कशाला नाव ठेवायचे? त्याचे मूळ नावच स्वीकारायचे. नायट्रोजन-नत्र, ऑक्सिजन- प्राणवायु... नुसते शब्द बदलले म्हणजे प्रगती झाली का?

असे लोक तर विशेष नामाचेही रुपांतरण करतात.. मॅक्सम्युलर-मोक्षमुल्लर ! मोहम्मद - महामद, महामूढ ! Proud

ज्या गोष्टींचा शोध आपण
लावलेला नाही, त्याचे
उगाच्च आपल्या भाषेत
कशाला नाव ठेवायचे?
त्याचे मूळ नावच
स्वीकारायचे.
नायट्रोजन-नत्र,
ऑक्सिजन- प्राणवायु...
नुसते शब्द बदलले म्हणजे
प्रगती झाली का?>>>भाषासम्राटांनी 'इंग्लिश' या शब्दाचे 'इंग्रजी' असे रुपांतर केले, तर बाकिच्या इंग्लिश शब्दांची काय कथा.

< त्यांनी दिलेले
प्रतिशब्द 'संस्कृत्'मधूनच
येणे नैसर्गिकच
आहे.>>>ज्ञानेश्वरांनी दुर्बोध
संस्कृत भाषेला फाटा देऊन
जनसामान्यांना समजेल
अशा मराठीत
ज्ञानेश्वरी आणि भावार्थदिपिका लिहिली ,मग
सावरकरांना काय गरज
होती या दुर्बोध भाषेच्या आधाराची?

जेम्स बाँड,

हाच प्रश्न शिवाजीमहाराजांच्या संदर्भातही विचारता येऊ शकतो. शिवाजीमहाराजांना काहीतरी गरज वाटली होतीच ना? त्या गरजेचा शोध घ्या. मग सावरकरांना का गरज वाटली त्याचा उलगडा होईल. Happy

आ.न.,
-गा.पै.

मराठी समाज म्हणून आपला ज्या ज्या लोकांशी संबंध येत गेला, त्या लोंकाच्या
भाषेतले शब्द आपल्या भाषेत येत गेले. इंग्रजीशिवाय फारसी आणि कानडी
लोकांशी आपले संबंध येत गेले. कानडीतून अण्णा, अप्पा, अडकित्ता असे
शब्द आलेच.
हिंदीशी जास्त संबंध दूरदर्शनमूळे येत गेला. आरक्षण सारखे शब्द नंतर आले.
मध्यंतरी, एका गाण्यामूळे खल्ली वल्ली हा अरेबिक शब्द फ़ार रुढ झाला होता.
आता तो परत विस्मरणात गेला.
पूर्व आफ़्रिकेत जी स्वाहिली भाषा बोलतात ती कानाला फार गोड वाटते.
पण हकुना मटाटा (तोही गाण्यामूळेच) हे शब्द सोडले तर आपल्याला ती
भाषा परिचयाची नाहीच. (कारण कधी संबंधच आला नाही.)
काही शब्द बघा सानी (थाळी) बाकुती (वाडगा) मगेनी (पाहुणे) चकुला (जेवण)
चकोरा (चोर) मकारा (कोळसा) मफ़ेरा (पेरु) मसिंदा (संत्रे) अलाफ़ू (नंतर)
रफ़िकी (मित्र) बराबरा (रस्ता) मिंगी (पुष्कळ) मझे (मोठा माणूस) मामा
(मोठी बाई) सही (बरोबर) गापी (किती) वापी (कुठे) केशो (उद्या) मझिवा (दूध)
स्वाला (हरण) ट्विगा (जिराफ़)

जेम्स बाँड,

शाब्बास तुमच्या रुस्तुमीची, दिलेरीची आणि सफेजंगीची! हे वाक्य पेशवेकालीन बोली मराठीत सर्रास चालंत होतं. तर पेशवेपूर्व शिवाजीमहाराजांना मराठीतले फारसी, तुर्की, अरबी शब्द का काढून टाकावेसे वाटले?

विचार करा! उत्तर सापडेल! Happy

आ.न.,
-गा.पै.

जमस बंधा... ढकलत ढकलत
हा बीबीपण
तुझ्या आवडत्या रुळावर
आणलास का?>>रुळ नव्हे जंक्शन Proud

गा .पै. संस्कृतकरणाचा अर्थ कळतो का?नसेल कळत तर मास्तुरे उर्फ सतीश माढेकरांना विचार.

जेम्स बाँड,

संस्कृतपासून मराठी उत्पन्न झाली आहे, हे आपल्याला माहीत असेलंच! मग या संदर्भात आपणच संस्कृतकरणाचा अर्थ समजावून सांगा!

असो.

शिवाजीमहाराजांना मराठीतले फारसी, तुर्की, अरबी शब्द काढून त्याऐवजी संस्कृतमधून शब्द का घ्यावेसे वाटले? प्रश्न साधा आहे. उत्तरही सोपं आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

संस्कृतपासून
मराठी उत्पन्न
झाली आहे, हे
आपल्याला माहीत असेलंच!>>>मराठीच काय पण इंग्लिश, जापनीज, स्वाहीली, लॅटीन या सर्व भाषा संस्कृतचीच अपत्यं आहेत.

या मायबोलीवरच कुसुमाग्रजांविषयी बरेच काही काही लिहीले आहे. ते सर्व उत्कृष्ठ मराठी असून ते लिहिणार्‍या सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे.

माबो वर सर्रास वापरले जाणारे 'धन्यु' आणि 'धन्स'!
असे मुद्दाम विनोद निर्मितीसाठी करतात, नेहेमी तसे बोलत नसावेत, अशी आशा आहे.

सहज मराठी प्रतिशब्द उपलब्ध असताना

अहो, तिथेच सगळ्यात मोठी पंचाइत आहे. आता लहानपणापासून इंग्रजी माध्यमात शिकायचे, सगळ्यांशी इंग्रजीत बोलायचे, आई बाबा सुद्धा घरी मान वेळावत वेळावत, ईट हं क्विकलि' असे म्हणतात, मराठी पुस्तके वाचत नाहीत, मग मराठी प्रतिशब्द 'सहज' कसे सुचणार?
म्हणजे एरवी भावना व्यक्त करायला मराठी शब्द माहित आहेत काही काही. पण जेंव्हा इंटेन्स इमोशन्स असतात, त्या एक्सप्रेस करायला इंग्रजी वर्ड्स च कन्व्हिनिअंट पडतात ना!
कठीण आहे.
त्यातून शास्त्र, वैद्यकशास्त्र, इंजिनियरिंग, काँप्युटर या सगळ्यात इंग्रजी शिवाय पर्यायच नाही. हे विषय उपजत नसतात, शिकायचे नि तेही त्यात भरपूर ज्ञान मिळवायचे, असे असेल, तर शिकतानाच इंग्रजी शब्द शिकावेत, पुढे तेच उपयोगी येईल.

पूर्वी फ्रेंच, इटालियन, जर्मन लोकांनी शास्त्रात इतकी प्रगति केली की उच्च ज्ञान मिळवायचे तर त्या भाषा शिकाव्या लागत! तसे कुणि मराठीतून काही शोध लावले तर लोक आपणहून येतील मराठी शिकायला. इंग्रजांनी जगभर जाहिरात केली की इंग्रजी वाङ्मय उच्च नि आपले लोक वेड्यासारखे धावले तिकडे, संस्कृत नि मराठी विसरून, मग इंग्रजी शिकणे प्राप्त झाले. मराठीचे तसे होणार आहे का?!
पुष्कळ पाश्चात्य अजूनहि संस्कृतचा अभ्यास करतात. कारण त्यांना त्या भाषेतील उच्च तत्वज्ञान, सुंदर काव्ये इ. वाचायची आहेत.
आपण संस्कृत म्हंटले म्हणजे ब्राह्मणांना शिव्या, नि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून हिंदू धर्माला शिव्या, नि मग करायचे काय संस्कृत शिकून, मराठी शिकून?

वस्तुस्थिती मान्य करा - ज्यांना भाषेचे सौंदर्य म्हणजे काय ते कळते, तेच फक्त मराठीकडे लक्ष देतील. बाकी 'पोटभरे' लोक तिकडे दुर्लक्ष करतील.
जेंव्हा अशी वेळ येईल की मराठीत इतके उच्च दर्जाचे साहित्य निर्माण होईल की त्याचा आनंद घेण्यासाठी मराठीला पर्याय नाही, तेंव्हाच लोक मराठी शिकतील.

Pages