अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

छान

career या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द काय?
career म्हणजे निवडलेल्या क्षेत्रात अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून अधिकाधिक यश मिळवणे हा अर्थ मला अभिप्रेत आहे.
कारकीर्द हा शब्द बहुधा राजे, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष इ. अत्युच्च्य पदी काम करणार्‍यांबद्दल वापरला जातो व कर्तबगारी हा शब्दहि फारसा बरोबर वाटत नाही.

career = नोकरीतली वाटचाल

असे म्हणावे का? अर्थातच ते फक्त नोकरीसाठी लागू होईल. व्यवसाय असेल तर 'व्यवसायातली वाटचाल' असे म्हणता येईल.

पुण्यात पौडफाट्यावरच्या सावरकर उड्डाणपुलाच्या खाली एक पाटी आहे
"माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम जयंती निमित्त.........."

हे वाचून जाम दचकलो. पाडा, मराठीचा खून पाडा!! अरे गेल्यानंतरची पहिली जयंती असली तरी प्रथम जयंती काय? तो जितवा वाढदिवस असेल तितका आकडा वापरतात. उदा. ९०वी जयंती. हाच घोटाळा एबीपी माझा वाहिनीवर बातमी देताना केला गेला. आनंद आहे.

माणसे "भेटतात" . . . वस्तू "मिळतात" .

काही ठिकाणी वस्तूही भेटतात.. तुम्हाला असे शब्द वापरणारे लोक मिळाले नाहीत काय?

बरेचदा बोलिभाषेत विशेषतः विदर्भात मराठी हिंदीचं व्याकरण वापरुन बोलली जाते.

त्यामुळे (वस्तू) मिली क्या? याचं रुपांतर (वस्तू) भेटली का?

असच काहिसं इतर प्रांतबाबत होत असावं. त्याचा आनंद लुटा.

वर कोणीतरी म्ह्टलं होतं (याला बोललेला असही म्हणतात), "जे पुण्याबाहेरुन आलेले आहेत, त्यांच्या भाषेला हिणवू नका"

मराठी न बोलण्याचं कदाचित हे ही एक कारण असेल ?

ह्या बाबतीत स्टार प्लस वरच्या सा नि सा मधल्या कोकिलाबेन चे संवाद मला फार आवडतात (मालिका कितीही टूकार असली तरी). किती शुद्ध (का शुदध) बोलते. इतर पात्रांच्या तोंडीही कधी कधी मधेच इंग्लिश शब्द येतात , पण हिच्या तोंडी मात्र व्यवस्थित हिंदीच शब्द दिलेत, एकही इंग्लिश शब्द नाही. ती सुद्धा ते ओढून-ताणून न म्हणता सहजपणे म्हणते. तसच काहीसं आपल्याला मराठीच्या बाबतीत जमायला हवं.

>>>> career या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द काय?
career म्हणजे निवडलेल्या क्षेत्रात अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून अधिकाधिक यश मिळवणे हा अर्थ मला अभिप्रेत आहे.
कारकीर्द हा शब्द बहुधा राजे, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष इ. अत्युच्च्य पदी काम करणार्‍यांबद्दल वापरला जातो व कर्तबगारी हा शब्दहि फारसा बरोबर वाटत नाही. <<<<

>>> career = नोकरीतली वाटचाल
असे म्हणावे का? अर्थातच ते फक्त नोकरीसाठी लागू होईल. व्यवसाय असेल तर 'व्यवसायातली वाटचाल' असे म्हणता येईल. <<<<

माझ्यामते, करियर या शब्दाअंतर्गत ते ते सर्व प्रयत्न/आत्मसात कौशल्ये/कालावधी येतात जे माणसाच्या "उपजिविके" करताचे असतात. त्या अर्थाने माझी उपजिविका असे मी म्हणू शकतो की करियर ऐवजी. Happy (चू.भू.द्या.घ्या.)

>>>>> वर कोणीतरी म्ह्टलं होतं (याला बोललेला असही म्हणतात), "जे पुण्याबाहेरुन आलेले आहेत, त्यांच्या भाषेला हिणवू नका"
मराठी न बोलण्याचं कदाचित हे ही एक कारण असेल ? <<<<<
नाही. ठामपणे नाही.

अगदी सर्व इंग्रजी शब्द बदलणे कठिण आहे, पण जास्तीत जास्त मराठीचा वापर नक्कीच शक्य आहे,
आपल्याकडे १०-१२ वी नंतर जवळपास सर्व अभ्याक्रमाचे माध्यम इंग्रजी अस्ल्याने दैनदिन वापरात इंग्रजी शब्द येणे स्वाभाविक आहे, मात्र इथे गरज आहे त्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द माहित असण्याची, बोलण्याची नाही.

मूळातच इंग्रजीच्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघतात तसे मराठीत होत नाही , मराठी भाषा त्या मनाने खूप प्रगल्भ आहे. त्यामुळे परिस्थीतीनुसार वेगवेगळे शब्द उपलब्ध आहेत.

अहो.. एवढ किचकट करण्याची खरच गरज आहे का ?
मला तर ते ओढुन ताणुन वाटत... आणि भाषेच्या नैसर्गिक प्रवाहा बरोबर आहे अस नाही वाटत..

त्या पेक्षा ते दुसर्‍या भाषेतील शब्द काही बदल करुन वा जसेच्या तसे आपल्या भाषेत स्वीकारले जातील तशी एकादी "प्रोसेस" पहावी...

भाषे मध्ये अशी दुसर्‍या भाषेतील शब्द न स्वीकारण्याची "रिजीडिटी" नाही चालत..
खाली दिलेल्या सुची प्रमाणे मराठीमध्ये असे शेकडो शब्द दुसर्‍या भाषेतुन जसेच्या तसे वा थोडे बदल करुन स्विकारलेले आहेत.. मग आताच कशाला एवढी अलवचीकता ?

पोर्तुगीज - ते - मराठी
ईस्त्री ( कपड्यान करतो ती)
अननस
चावी (मुळ मराठी शब्द कळ)
जुगार
पगार
पाव ( वडापाव चा पाव )
नाव ( पाण्यतील नाव)

कन्नड - ते - मराठी
मका,
वेलची

प्रशियन - ते - मराठी
बाजार,
दरवाजा
ताजा, (ताजी भाजी )
रो़ज ( प्रत्येक दिवस)
शहर
पसंत
चकमक
खरेदी
बाजी ( जाणकारानी या शब्दावर नीट प्रकाश पाडावा माझी माहिती कदाचीत चुकीची असु शकते)
गरीब
हिशोब
खुर्ची
शरबत ( लिंबु शरबत)
खरा मुद्दा हा आहे..
- शब्दसंग्रहचे प्रमाणिकरण करतबसण्या ऐवजी अशी प्रक्रीया निवडावी ज्याणे नवीन शब्द स्वीकारणे सोपे जावे...

प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर राज्यात दरवर्षी दोन लाख मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असल्याची धक्कादायक कबुली शिक्षण खात्याने दिली असून हा वळता प्रवाह रोखण्यासाठी उपायांची जंत्री सुचवली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मराठी शाळांकडे फिरवली जाणारी पाठ चिंताजनक आहे. या विषयावर शासन गंभीर असल्याची बाब त्यातल्या त्यात सकारात्मक म्हणता येईल.

मराठी शाळांतील पटसंख्या रोडावत असल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची बैठक पुणे येथे मंगळवारी बोलावली होती. त्यात मुख्याध्यापकांनी कमी होत जाणारी विद्यार्थीसंख्या व परिणामी अतिरिक्त होणारे शिक्षक या पैलूकडे आयुक्तांचे लक्ष वेधले होते. कमी पटसंख्या असल्यासही शिक्षकांना अतिरिक्त न ठरवण्याचा मुख्याध्यापकांचा आग्रह आहे. त्यावर शिक्षण आयुक्तांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला. मराठी शाळांमध्ये दाखल होण्याची शक्यता असणारी दोन लाख मुले केंद्रीय मंडळाच्या इंग्रजी शाळेत दाखल होत असल्याची आकडेवारी मांडली. पहिली ते चौथी दरम्यानचे विद्यार्थी केंद्रीय शाळेकडे वळतात. ते थांबवणार कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही मुले मराठी माध्यमांच्या शाळेत येण्यासाठी गुणवत्ता सुधारण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने गुणवत्तेचा मुद्दा अग्रक्रमावर ठेवला आहे. ‘व्हर्च्यूअल क्लासरूम’साठी केंद्राचे पन्नास व राज्याचे शंभर कोटी अशा दीडशे कोटी रुपयांत मॉडेल तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मराठी शाळेतील शिक्षकांनाच प्रशिक्षण दिले जाईल. विना अनुदानित शाळांनाही शालेय पोषण आहार व मोफ त पाठय़पुस्तके देण्याची व्यवस्था करून पटसंख्येची अट न ठेवता शाळा तिथे मुख्याध्यापक पद ठेवले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

या बैठकीत उपस्थित असलेले विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप म्हणाले की, मराठी शाळांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे या बैठकीत दिसून आले. केंद्रीय मंडळांच्या शाळांकडे वाढणारा ओघ ही मराठीसाठी चिंतेची बाब आहे. गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकांकडून होतच असून पालकांनीही या शाळांवर विश्वास टाकला पाहिजे.

‘सेमी इंग्रजी’ची मागणी

मराठी शाळांमध्येही सेमी इंग्रजी माध्यम ठेवल्यास गळती थांबण्याची शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. प्राथमिक पातळीवर अशा माध्यमास मंत्रालयातून परवानगी दिली जाते. संस्थेच्या सोयीसाठी अशी परवानगी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मिळावी, या मागणीवर आयुक्तांनी तात्काळ होकार दिला. शिक्षकांचे वेतन तीस तारखेलाच करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी शाळेतील शिक्षक तसेच अन्य सुविधांबाबत शासन सकारात्मक असून मुख्याध्यापकांनीसुद्धा स्थानिक पातळीवर मराठी शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले.

व्हॅटसप वर फोटो फिरत आहे

कोणत्या तरी मराठी समितीने शासन दरबारी अर्ज दिले आहेत , मराठी डावलू नका

पोलीस स्टेशन वरचा स्टेशन शब्द काढा आणि प्रत्येक पोलीस स्टेशनवर पोलीस ठाणे लिहा

Proud

माझी शंका आहे की मग त्या पोलीस शब्दाचे काय ? की तो मराठीच आहे ??

पोलीस शब्दाचे काय ? की तो मराठीच आहे ?? >> पोलीस हा शब्द मराठीच आहे. इन्ग्रजीतून घेतला आहे. इन्ग्रजीत त्याला पुलीस म्हणतात. शिवाय बस, रिक्षा वगैरे शब्द पण मराठीत घेण्यात आले आहेत. बसचं अनेकवचन 'बसगाड्या' , तर रिक्षाचं अनेकवचन रिक्षा असंच होतं मराठीत.

Pages