अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

मंदार,

इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडणे नव्हे. एकदा का इंग्राजी माध्यमामुळे इंग्रजी बिघडतं हे लोकांना कळू लागलं की आपसूकंच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं रूपांतर होईल.

आ.न.,
-गा..पै.

मंदार, अरे पण तू पूर्ण लेख नाहीच लिहीलास! असो. मी ते तुझ्या मराठीची परिक्षा घेण्यासाठी नव्हतं लिहीलेलं. एक आपलं उदाहरण म्हणून टाकलं होतं.

अरे चिमण, गैरसमज नको रे Happy
पूर्ण लेख लिहायला वेळ नाही रे. आणि तू माझी परिक्षा घ्यायला नव्हतं लिहीलेलं मला माहित आहे रे.
मी पण मला किती जमतंय ते बघायला करुन बघितलं. इनोव्हेटिव्हचं भाषांतर जमेल तर बरं असं वाटलं. Happy

मंदार ते मलाही माहिती आहे रे!
स्त्री इन्स्ट्रक्टरला प्रशिक्षक ऐवजी प्रशिक्षिका लिहीलं तर जास्त बरं वाटेल ना वाचायला?

मराठी भाषा समृध्द व्हावी यासाठी प्रयत्न करा. एकमेकांची उणिदुरी काढण्याचा प्रयत्न करत बसु नका .
अनावश्यक इंग्रजीचा उल्लेख नक्कीच टाळावा पण.जिथे गरज असेल तिथे नक्कीच इंग्रजी भाषेतुन उल्लेख करावा.

असं काय करता झक्की, अमेरिकेतल्या जागेसंबंधी होता ना तो लेख Proud
तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेचे 'मर्‍हाठी पिच्चर' बघितले नाहीत का...

लेख बर्‍यापैकी पटला. प्रयत्न करेन.

मंदार, तुम्ही मायबोलीवर इतरत्र दिलेले प्रतिसाद/लेख इ. पाहता मला वाटलं नाही की तुम्ही पूर्ण इंग्रजी माध्यमातून शिकला असाल....आणि मला वाटतं तुमचा हा लेख लिहायचा उद्देशही नकळत जे काही जास्तीचं इंग्रजी जे टाळता येण्यासारखं आहे ते टाळावं याविषयी आहे आणि त्याच्याशी सहमत...
काही वेळा जालीय लिखाण विशेष करून प्रतिक्रिया देताना घाईतही असे इंग्रजी शब्द वापरले जातात कारण कामावर बर्‍यापैकी लोक इंग्रजी वापरतात त्यामुळे काही हे घे ऐवजी "Here you go" असं पटकन टंकलं जाऊ शकतं...आणि ते तिथवर ठीकच असावं..तुमचा आक्षेप ते सुधारण्यावर असल्यास बरोबर आहे शक्य तिथे आपण आपली भाषा शुद्ध करायचा प्रयत्न करायला हवा....चांगलं आहे...
अवांतर...आता हे सर्वच्या सर्व प्रतिसाद वाचले नाही आहेत पण काही प्रतिसादांवरून असं वाटतं की काही वेळा काही मनोवृत्ती अशा असतात की ज्यांना विषय भरकटवण्यात मजा वाटते..म्हणजे मराठीचा उल्लेख आला की हटकून मुलांचं माध्यम काढणं इ...त्याला उडदामाजी म्हणावे का? मला माहित नाही...मी तसंही व्यक्तिशा कुणाला ओळखत पण नाही..पण तरी विषयाचं भान ठेवलं तर चर्चा चांगल्या फ़लदायी होऊ शकतात...आणि त्यातून जे शिकायचं ते सुजाण वाचक शिकु शकेल अशी आशा करूया...

http://www.maayboli.com/node/34165#comment-2016037

वरील दुव्यावरील पानावर वेबमास्तरांचं उत्तर समर्पक वाटलं म्हणून इथे डकवतो आहे:

webmaster | 10 April, 2012 - 07:44

>बी यांनी वाचू आनंदे मधे उघडलेला अमराठी कवितांवरचा धागा बंद झालेला दिसला
हा धागा इंग्रजी कवितेचा म्हणून बंद केला आहे.
> तुम्हाला जर चांगल्या चांगल्या ईंग्रजी कविता माहिती असतील तर त्याचे दुवे वा काही ओळी इथे द्याव्यात.
या धाग्यावर ईंग्रजी कवितेचे रसग्रहण नसून फक्त काही ओळी द्यावी अशी अपेक्षा होती.

>बायदवे बी ने वाचू आनंदे मध्ये धागा उघडला नसून कविता मध्ये होता.

या कारणासाठी नक्कीच हा धागा बंद केला नाही. हे कारण असते तर तो धागा आम्ही योग्य तिथे हलवला असता.

याबाबतचं धोरण असं आहे.

१) मायबोलीवर सगळ्या भाषांना एकाच तराजूनं तोललं जाणार नाही. मराठीचं पारडं सगळ्यात जड, त्यानंतर इतर भारतीय भाषा आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी. हे लिहायला मला कुठेही अवघड जात नाही कारण मायबोलीचा जन्मच त्यासाठी आहे. सगळ्या भाषांना समानता मिळावी म्हणून नाही. इंग्रजी आता भारतीय भाषा आहे असं कुणी म्हणालं तरी इंग्रजी, विशेषतः इंग्रजी साहित्य, इथे शेवटचं. कारण इंग्रजी साहित्यासाठी नेटवर इतरत्र भरपूर जागा आहे. एकदा सगळ्या भाषा इथे सारख्या नाही हे लक्षात घेतलं तर बरेचसे मुद्दे निकालात निघावेत.

२) रसग्रहण करणे आणि सरळ सरळ काही ओळी लिहणे यात फरक आहे. या आधिही जेंव्हा फक्त उर्दू गझला, फक्त हिंदी गाण्यांचा संग्रह यासाठी धागे निघाले तें बंद केले आहेत. इतर भाषेतल्या गोष्टींबद्दल मराठीतून लिहलं जातं, त्याचं रसग्रहण केलं जातं त्यामुळे या गोष्टी मराठीत येत आहेत म्हणून त्यांचं आपण स्वागत केलं. चित्रपटांबद्दलचं, पुस्तकांबद्दलचं, टीव्ही शों बद्दलचं लेखन रसग्रहण या सदरात मोडतं. आता मायबोलीचा पसारा वाढल्यामुळे काही अमराठी भाषेतले धागे (जे रसग्रहण नाहीत) चुकून अजून चालू असणे शक्य आहे, ज्यांच्याकडे अजून माझं लक्ष गेलं नाहीये.

३) हिंदी अनंताक्षरी हा वाहता धागा एक अपवाद म्हणून चालू ठेवला आहे. पण हिंदी विनोद, इंग्रजी विनोद, फक्त उर्दू गज़ला, हिंदी चारोळ्या, उर्दू शेर, इंग्रजी लिमरिक्स, इंग्रजी कार्टून्स (तसेच्या तसे टाकलेले), इंग्रजी पुस्तकांची नुसती यादी यांसाठी असलेले धागे आपण यापूर्वी बंद केले आहेत. यात फक्त कविता याच वाङमयप्रकाराला सापत्नभाव दिलेला नाही.

४)एका भाषेतून दुसरी भाषा शिकवणारे धागे आहेत पण त्यातली एक मराठी आहे म्हणूनच.

५) तांत्रिक विषयांवर इंग्रजीत लेखन चालू आहे ते नाईलाजाने. तिथेही काही जण शक्य तेंव्हा मराठी लिहत असतात हे स्वागतार्ह आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते चालू ठेवले आहे. एक उदा: गुंतवणूक या विषयावर मराठीत लिहलं जावं/वाचलं जावं म्हणून Investments वर इंग्रजीत लिहणं चालू आहे.

पण हा नियम कवितांना लावता येणार नाही. मराठी कविता केल्या जाव्या/वाचल्या जाव्या म्हणून इंग्रजी कवितांची गरज नाही.

६) मला वाटतं आपण सगळ्यांनी मायबोलीचा मूळ हेतू लक्षात घ्यावा. यात काही बाबतीत आमच्याकडून सगळ्याच बाबतीत सुसुत्रता किंवा सुस्पष्टता राहिली नसेल याची कल्पना आहे. आणि काही बाबतीत ती येणारही नाही. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आहोत.

.

इथे मायबोलीवरच आणि काही मराठी वृत्तपत्रात हिंदीतला "आयाम" हा शब्द उबग येईल इतक्या वेळा वापरला गेलेला दिसला. एकदा तर सकाळच्या संपादकीयात देखील!!

त्याला मराठीत "कंगोरे" हा सोपा शब्द आहे.

रेल्वेसिग्नल = अग्निरथविश्रामधामगमनागमनदर्शकलोहताम्रपटिका!

तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेचे 'मर्‍हाठी पिच्चर' बघितले नाहीत का... लक्ष्मीकांत बेर्डे कोण?
मी गेल्या चाळीस वर्षात फार तर तीन चार मराठी चित्रपट पाहिले असतील, त्यांची नावे, कथा काहीहि लक्षात नाही, तर इतर काही दूरच. मला राजा परांजपे, राजा गोसावी, रमेश देव, सीमा, जयश्री गडकर, शरद तळवलकर, सुलोचना, ललिता पवार, व दामूअण्णा यांची नावे फक्त आठवतात, बाकी काही नाही!

रेल्वेसिग्नल = अग्निरथविश्रामधामगमनागमनदर्शकलोहताम्रपटिका! >>>
रेल्वेसिग्नल = अग्निरथगमनागमनदर्शकरक्तहरीतदीपजडीतलोहपटिका!

आजच्या लोकप्रभामधला लेख वाचला का ? मराठीला म्हणे अजून केंद्र सरकारने
मान्यता दिलेली नाही, कारण त्यांच्या निकषात ती बसत नाही. काही मंडळी त्यासाठी
जोरदार प्रयत्न करत आहेत. (लेखाचे नाव मायबोली असेच आहे !)

"लोकप्रभे"च्या त्या लेखातील श्री.मोरे यांचे अखेरचे वाक्य

"केवळ ‘अभिजात' म्हणून पोकळ अभिमान बाळगण्यापेक्षा दैनंदिन व्यवहारात शक्यतो मराठीचा आग्रह धरणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे."

~ हे इथल्या धाग्यातील विषयाशी/चर्चेशी फार सुसंगत आहे. आवडले.

अशोक पाटील

अशोक, अनुमोदन. Happy
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न जरूर करावा, पण नाही मिळाला तर निराश न होता नंदिन व्यवहारात शक्यतो मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा.

नक्कीच. त्या लेखात म्हटल्याप्रमाणे :

"आपली मुले मराठी शाळेत शिकली तर मागे पडतील, असे वाटून अनेक मराठी पालक गरज आणि ऐपत नसतानाही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात. कोणताही नियम अथवा सक्ती नसतानाही बँकेच्या कामकाजात इंग्रजीचे बोट पकडतात....." मराठी पालकांची ही मनोवृत्ती मुंबईत कोणत्याही पक्षाचे शासन आले तरी ते बदलू शकत नाही. स्वतः 'मराठी विषय' घेऊन एम.ए. झालेले एक पालक मला माहीत आहेत की जे सकाळी सकाळी सेंट झेव्हियर्सच्या पाळीत मुलाच्या प्रवेशासाठी थांबले होते. पुढे त्याना मी त्याबद्दल हटकले तर त्यानी कावेबाजपणे उत्तर दिले, 'अहो पाटीलसर, मिसेसची इच्छा आहे की रंजू इंग्लिश स्कूलला गेला पाहिजे..." म्हणजे इथेही बनवेगिरी. स्वत:ची इच्छा काय होती हे सांगत नव्हते ते गृहस्थ.

अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी निकष पूर्ण करता येण्यासाठी भांडारकर संस्थेत शोध चालू आहे अशीही एक वार्ता वाचलि.
एखाद्या शत्रुसैन्यावर हल्ला करावा तसा हल्ला अशा संस्थांवर झाला तर कशाला उरतील पुरावे?
श्री मोरे यांचे जे विधान अशोक यांनी दिले आहे तोच खरा व्यावहारीक मार्ग आहे. परप्रांतीयांशी देखील सुरुवातीला मराठी बोलून पहावे. येत असेल तर तेही जरूर बोलतील. त्यांची अडचण वा फजिती करण्याचा उद्देश नसावा. महाराश्ट्रातले मुसलमान/ ख्रिश्चन देखील उत्तम मराठी बोलतात. कांहीजण तर उत्तम लिहितात देखील. पण मराठी लोकच त्यांच्याशी बोलतांना हिंदीत सुरुवात क्ररतात. हेही चूकच.

महाराश्ट्रातले मुसलमान/ ख्रिश्चन देखील उत्तम मराठी बोलतात. कांहीजण तर उत्तम लिहितात देखील. पण मराठी लोकच त्यांच्याशी बोलतांना हिंदीत सुरुवात क्ररतात. हेही चूकच.>>>>>+++१११

एखाद्या भाषेला "अभिजात" असा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा कमीतकमी २ हजार वर्षे जुनी आहे असे पुरावे असावे लागतात. मराठीतली सर्वात जुनी अक्षरे श्रवणबेळगोळ येथे इ.स. ९८३ मध्ये कोरलेली सापडली. अलिबाग/जंजीरा च्या जवळ ९ व्या शतकातला मराठीतला शिलालेख सापडला आहे म्हणे. पण यापूर्वीचा मराठी भाषा अस्तित्वात असल्याचा पुरावा अजून तरी सापडलेला नाही. त्यामुळे मराठी भाषा फक्त १०२९ वर्षांचीच आहे आणि म्हणूनच या भाषेला "अभिजात" असा दर्जा मिळालेला नाही. इसवीसनाच्या पहिल्या शतकातला मराठीचा काही पुरावा मिळाला (त्या काळात मराठीत रचले गेलेले काव्य, शिलालेख, नाणी इ.) तर "अभिजात" हा दर्जा नक्कीच मिळेल.

"परप्रांतीयांशी देखील सुरुवातीला मराठी बोलून पहावे. येत असेल तर तेही जरूर बोलतील......"

~ अगदी खरं आहे. बेळगांव तर राहू दे, पण मी हुबळी आणि कारवार या दोन पक्क्या कन्नड शहरातील दुकानदारांशी वस्तू खरेदीबाबत एक प्रयोग म्हणून मराठीतून संवाद साधला असता त्याला तात्काळ मराठीतूनच त्यानी प्रतिसाद दिला. खूप आनंद वाटला मला त्या क्षणी. मदुराईतील 'मीनाक्षी मंदिर' परिसरातील साड्यांचे दुकानदारही तुम्ही मराठी बोलू लागला की पूर्ण खरेदी होईतो मराठीतूनच तुमच्याशी बोलतात.

~ या उलट पुण्यातील एका खाजगी मत्स्यपालन केन्द्रात एका ओळखीच्या मुलाच्या घरी वाढदिवसाची भेट द्यावी म्हणून दोनचार मासे [त्या मुलाला मासे पाळण्याची हौस होती हे माहीत होते] खरेदी करण्यासाठी गेलो असता तिथे एक जोडपे अगोदरच त्या केन्द्राच्या मालकिणबाईशी दराच्या बाबतीत हिंदीत संवाद करताना दिसले. जागा अरुंद म्हणून मी थोडा वेळ दरवाजाजवळच थांबलो. दोनेक मिनिटानी जोडीतील स्त्री दुकानाच्या बाहेर आली आणि मोबाईलवरून चक्क मराठीतून आपल्या मुलीशी बोलू लागली, "सोनू, अगं ती बाई ५०० रुपये जोडीचे मागते ? फार महाग वाटतात." त्या सोनूने काय उत्तर दिले ते समजले नाही, पण आणखीन एकदोन मिनिटानंतर ती महाराष्ट्रीयन स्त्री नवर्‍यासह काही खरेदी न करताच बाहेर पडली. जाताना श्रीयुत केन्द्राच्या मालकिणीला, परत हिंदीतच, म्हणाले, "हम संडे को आते है |", 'जी जरूर आईये" असे उत्तर आतल्या बाईने दिले.

माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी थेट मराठीतूनच मग त्या दुकानदार स्त्रीशी बोलणे सुरू केले..."या जोडीची किंमत किती होईल ?" याला उत्तर म्हणून त्या बाईनी मराठीत "अडीचशे रुपयांची आहे. पण त्यापेक्षा जास्त किंमतीची हवी असेल तर या बाजूला बघा. ब्लॅक गोल्ड चांगले आले आहेत..."

मी चकीतच झालो. म्हणजे ही दुकानदार बाई मराठीच होती आणि मगाचे ते जोडपेही मराठीच ! मग यांचा त्या घाणेरड्या हिंदीत बोलण्याचा उद्देश काय ? मी त्याना विचारले, 'अहो बाई, तुम्ही तर मराठी दिसता, आणि आत्ता इथून गेलेले जोडपेही मराठी...मग तुम्ही हिंदीत संवाद करण्याचे काय कारण ?"
"अहो दादा, मी तरी काय करणार ? आल्या आल्या त्या बयेने हिंदीतच सुरुवात केली बोलायला, मग मी देखील हिंदीतच उत्तर देत राहिले...!"

ही वृत्ती आपल्या मातृभाषेविषयी....आणि तीही पुण्यासारख्या १००% मराठी इतिहासाच्या गावात !! काय उपयोग होईल केन्द्र सरकारने मराठील अभिजात दर्जा दिला तरी ?

अशोक पाटील

केंद्र सरकारचे राहू द्या हो! महाराष्ट्रात तरी मराठी ही अधिकृत भाषा आहे म्हणे! कोण हरीचा लाल पुण्या मुंबईत प्रत्येक मराठी वाक्यात निदान पन्नास टक्के तरी शब्द इंग्रजी वापरल्याखेरीज बोलतो का?
खरे तर टपोरी भाषा ही एकच अधिकृत राष्ट्रभाषा करावी, सगळ्यांना समजते, व्याकरणाचा त्रास नाही. हिंदी, मराठी, इंग्रजी वगैरे नुसते शब्द, त्यांना अर्थ काही नाही.
अमेरिकेत तरी कुणा राजकारणी व्यक्तीचा आर्थिक फायदा असेल तरच कुठलाहि कायदा होतो, भारतात काय करावे लागते माहित नाही.

३००

Pages