बाळ कैरीचे लोणचे..

Submitted by सुलेखा on 4 April, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१० -१२ बाळकैर्‍या.
४ टे.स्पुन मीठ.
१ टे.स्पुन मेथीदाणा.
१/४ टी.स्पुन्.खास लोणच्यासाठीचा हिंग.
१/२ टे.स्पुन हळद.
२ टे.स्पुन लाल तिखट.
४ टे.स्पुन मोहोरीची डाळ.
१/२टे.स्पुन बडीशोप.
१ /२ टे स्पुन तेल [जे रोज वापरत असाल ते.]
१ वाटीभर सरसो /मोहोरी चे तेल.[नेहमीचे घेतले तरी चालेल]

क्रमवार पाककृती: 

बाळ कैर्‍या धुवुन ,पुसुन त्याची डेखे काढावीं. नंतर सुरीने कैरीला उभा चिर देवुन त्यातील कोय काढावी.या कैर्‍यांना १ चमचा मीठ लावुन एका टोपात ७ ते ८ तास तशाच झाकुन ठेवाव्या.मीठ लावलेल्या कैर्‍या अशा दिसतील.
bal kaireeche lonache.. 0011.JPG
७-८ तासानी या कैर्‍यातले मीठाचे पाणी टाकुन द्यायचे आहे.
त्यानंतर आता लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे.
त्यासाठी मसाल्याचे साहित्य एका ताटात सज्ज आहे.balkaireeche lonache22.JPG
यातील मेथीदाणा १/२ टी स्पुन तेलावर मंद आचेवर परतुन घ्यावा.लालसर रंग आला कि लगेच त्यात हळद व हिंग घाला.गॅस बंद करुन परता,हिंग फुलल्याने मेथीदाणा व हिंगाचा वास येवु लागेल.मेथीदाणा व हिंग बारीक वाटुन घ्या.[मिक्सरमधे १ टे.स्पुन मोहोरीची डाळ टाकुन बारीक वाटले जाईल]
सर्व मसाल्याचे सामान एका ताटात एकत्र कालवा.
हा मसाला बाळकैर्‍यांमधे भरा.
पुन्हा झाकुन निदान एक दिवस तसेच ठेवा.
दुसर्‍या दिवशी सरसो तेल/शेंगदाणा तेल/रोज वापरातले तेल एका कढईत चांगले गरम करुन थंड करा.
थंड तेल लोणच्यावर ओता व चमच्याने लोणचे हळुवार पणे ढवळुन घ्या.
मी चीनी मातीच्या दगडी मधे हे लोणचे ठेवले आहे .
balkaireeche lonache33.JPG
३-४ दिवस मुरल्यावर हे लोणचे अधिकाधिक स्वादिष्ट लागते.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक तर हवीच.
अधिक टिपा: 

हे लोणचे करायला सुरवात करुन ते मुरेपर्यंत ४ -५ दिवस तरी लागतात .
मसाला भरलेल्या कैर्‍यांवर वरपर्यंत तेल दिसायला हवे.तरच लोणचे टिकेल.
मेथीदाण्याचे प्रमाण या लोणच्यात नेहमीपेक्षा जास्त असते.लोंणचे मुरल्यानंतर मेथीचा कडुपणा अजिबात जाणवत नाही.
जर तयार लोणचे मसाला वापरला तर त्यात जास्तीच्या खारासाठी मोहोरीडाळ व त्याप्रमाणात मीठ घालुन मसाला तयार करावा.
मुरलेल्या लोणच्यातील बडीशोपेची चव ही छान लागते.

माहितीचा स्रोत: 
पिढी दर पिढी चीच पद्धत ...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!!.............................

भारीये की. आता कैर्‍या आणून करूनच बघावी...........तोंपासु!

सायो,
होय्,वडुच्या इतपत.
बाळकैरी म्हणजे आकाराने लहान .त्यातील कोय रंगाने पांढरी,कच्ची असते.पण तोतापुरी,हापुस्,लाल पट्टा,गोला कैरी वगेरे प्रकारच्या कोवळ्या बाठ न धरलेल्या कैर्‍या असतील तर त्याच्या मोठ्या फोडी करुन या पद्धतीने लोणचे करावे.
दक्षिणा,हे लोणचे मुरल्यावर [३-४ दिवसांनी]यातलेच थोडे तेल काढुन त्यात चवीप्रमाणे अंदाजाने [लोणच्याची कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे] गुळ चिरुन घेवुन एकजीव करावा.हे गुळ मिश्रीत तेल सर्व लोणच्यात मिसळावे.गोडसर चवीचे लोणचे तयार होईल.
दिनेशदा,आंध्रा पद्धतीने मडक्यात ठेवलेले ,मुरलेले बाळकैरीचे लोणचे अप्रतिम लागते.लोणचे साठवण्याची लहान तोंडाची ,विशिष्ट मडकी असतात.गुजरात मधे आमच्या जवळच एक "राव"अंकल रहायचे त्यांची आठवण आली.

ऐ शप्पत!! कस्ला तोंपासू फोटोय!.. कॉमेंट लिहिता येत नाहीये ना!!...............तोंड पुस्ता पुस्ता.....

मीठ लावलेल्या कैर्‍यांचा फोटो पाहूनच काल दात इतके शिवशिवायला लागले की ऑफिसातून घरी जाताना बिट्ट्या कैर्‍या विकत घेतल्याच. एक तशीच न धुता कचाकच खाल्ली तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. Happy मग घरी गेल्यावर उरलेल्या कैर्‍या तिखट मीठ लावून लेक आणि भाचीसह खाल्ल्या.

आजी करायची ते 'मिडी' चं लोणचं आठवलं... छोट्या कैर्‍या कोयीसकट..
मुरलेल्या मिडीच्या लोणच्यातल्या काजूएवढ्या छोट्या बीयांसारख्या कोयी जाम भारी लागतात Happy

मंजुडी,आज पहिल्यांदा जेवताना डावीकडे हेच लोणचे वाढले पण इतर कालवणापेक्षा चवीला उजवे ठरले हो.खारात मुरलेल्या कैरीचा आंबट-चिंबट स्वाद "अप्रतिम"आहे.

सुलेखा ..............मस्त!
बघतेच त्या बाळकैर्‍या कुठे मिळतात का!
आणि आत्ताच उटीहून मसाल्याचं सामान आणलं आहे त्यात लोणच्यासाठी मुद्दाम तिकडचा हिंग आणला आहे.
बाळकैर्‍या म्हणजे किती बाळ?>>>>>सायो........! छान प्रश्न आहे!

सुलेखा कालच मिळाल्यात देसी ग्रोसरीत बाळकैर्‍या. तयार लोणचे मसाला घालून केल्या तर चांगलं लागेल का हे लोणचं? खार जास्त सुटण्यासाठी मोहोरी डाळ घालू का?

प्रॅडी,तयार लोणचे मसाला घालुनही छान लागेल्.पण जर खार जास्त आवडत असेल तर मसाला व कैर्‍यांच्या प्रमाणात मोहोरी डाळ +थोडेसे मीठ घातले तर चालेल्.

धन्यवाद सुलेखा !! अजून एक बेसिक प्रश्ण... मोहोरीची डाळ तशीच घालू ना की मिक्सरवर फिरवून वगैरे घालायची?

Pages