नर्मदे हर!

Submitted by मंजूताई on 3 April, 2012 - 08:25

चार-पाच वर्षांपूर्वी निवेदिता खांडेकरचे प्रत्यक्ष अनुभव ऐकण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबद्दल फारसं ऐकलं वा वाचले नव्हते. दोनएक वर्षापूर्वी जगन्नाथ कुंट्यांच 'नर्मदे हर' वाचण्यात आलं. त्यानंतर अमरकंटकलाही जाण्याचा योग आला. सध्या अनेक संस्थळांवर नर्मदा परिक्रमेवर लेख, चर्चा वाचण्यात आल्या. कधीतरी आपणही परिक्रमेचा अनुभव घ्यावा असं वाटू लागलं . अजून तरी योग आला नाही. पण प्रतिभाताईंनी मानस परिक्रमा घडवून आणली. नुकतीच माझ्या मैत्रिणीने सौ प्रतिभा चितळ्यांची, त्यांनी दोनहजार सात साली केलेल्या परिक्रमेच्या अनुभवकथनाची तबकडी ऐकायला दिली. त्यांचे अनुभवकथन ऐकले अन भारावूनच गेले आणि हे मी ज्योती कामतच्या 'नर्मदेच्या तटाकी' पुस्तक परीक्षणाच्या प्रतिसादात लिहिलं. ते वाचून तिने मला सीडीबद्दल लिहायला सांगितले. त्या सीडीबद्दल लिहिण्याचा हा माझा प्रयत्न.

पुण्याचे सौ प्रतिभा चितळे व त्यांचे पती श्री सुधीर (व्यवसायाने व काहीसे वृत्तीनेही मेकॅनिकल इंजिनियर) चितळे ह्यांनी दोनहजारसातसाली दीडवर्षाची नर्मदा परिक्रमा केली. त्यांच्या अनुभवकथनाची ही सीडी. त्यावर कुठलीही माहिती लिहिलेली नाही कुठल्या कंपनीची, कोणी केली, किंमत इ. त्यांच्याच घरात रेकॉर्ड केली असावी असं वाटतं. त्या आपल्यासमोर एका खुर्चीत बसून नुकत्याच करून आलेल्या परिक्रमेविषयी उत्स्फूर्तपणे, उत्साहाने वर्णन करताहेत. साधी साडी, रंगरंगोटी विरहित पण प्रसन्न व बोलका चेहरा आणि मर्यादित हातवारे! सांगण्यात कुठेही आत्मप्रौढी (बघा, किती कठीण काम करून आलेय, बघा, मला कित्ती अनुभवायला मिळाले)किंवा दर्प नाही. हातात किंवा समोर कागद नाही. साधी सोपी बोलीभाषा. कुठेही भाषेचा अवजडपणा नसल्यामुळेच की काय त्या आपल्याशी गप्पा मारताहेत असंच वाटतं. पूर्ण सीडी ऐकायला पाच तास लागतात म्हणजे एकदा ऐकायला बसलो की आपण पाच तास जागचे हालतच नाही. अक्षरशः आपण खिळूनच बसतो. मध्ये-मध्ये कथनाच्या अनुषंगाने येतील तेवढीच दृश्यचित्रे. सीडीला सुरुवात होते ती पुरुषी आवाजातील प्रास्ताविकाने त्यानंतर त्यांनीच म्हटलेल्या 'नर्मदाष्टकाने'. नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर! म्हणत त्या सांगतात ती त्यांची कौटुंबिक माहिती व त्यांची 'प्रेरणा'. त्यांची प्रेरणा त्यांचे वैद्यमामा. वैद्यमामांनी तीनदा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची परिक्रमा केली. तिसरी केली तेव्हा त्यांचे वय ब्याऐंशी, तर मामीचे पंचाहत्तर. प्रत्येक वेळेला त्यांचे अनुभव ऐकून एखाद्याची परिक्रमा करण्याची इच्छा पेक्षा धाडसच झाले नसते. पण त्यांची इच्छा तीव्रच होत गेली. ही अतिशय खडतर तीनहजार किमी (धरणामुळे आता साडेतीन) परिक्रमा आहे. एकंदरीत चौदाकोटी पावलं चालावी लागतात. तिथे लागतो तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस आणि हो श्रद्धेचाही! हे कोण्या येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. परिक्रमा नर्मदेचीच का? तर त्याची कथा अशी - नर्मदा व गंगा तपश्चर्येला बसतात. शिवजी बघतात. शिवजी गंगेवर प्रसन्न होतात. गंगा वर मागते, मला तुमच्यात सामावून घ्या. गंगेला शिवजींच्या जटेत स्थान मिळतं. कालांतराने नर्मदेवर प्रसन्न होतात. नर्मदा वर मागते, तुमच्या पंचायतनासकट माझ्यात सामावून जा. शिवजी शेवटचे देव म्हणून तिची परिक्रमा. अमरकंटक तिचे उगमस्थान. मोठ्यांचे आशीर्वाद व लहानांच्या शुभेच्छांसह सत्तावीस नोव्हेंबर दोनहजारला ते निघतात पुण्याहून आणि गाठतात ओंकारेश्वर, ठाम संकल्प व श्रद्धेने! परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक सर्व साधन-साम्रगीसह वाहनाने, दुसरी काही अंतर किनाऱ्याने पायी व काही वाटेने, व तिसरी पूर्ण किनाऱ्याने अनवाणी. तिसऱ्या प्रकारात बरेच कडक नियम आहेत. अनवाणी चालायचं, संग्रह नाही (वस्तूंचा अथवा माणसांचा), आसक्ती नाही आणि 'मी'पणा विसरायचा, कोणाला काही मागायचं नाही, कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. ही शहरातील बाई पायी कशी काय परिक्रमा? असं बऱ्याच लोकांना वाटलं. ओंकारेश्वरातील साधू-संत, मार्गदर्शकांनी पूर्ण पायी करण्याऐवजी काही अंतर बसने व काही पायी किनाऱ्याने करावी असं सुचवलं. पण ह्या दोघांनी तिसऱ्या प्रकाराने करायचे ठरवले. पती सुधीरह्यांनी पायात गरज पडेल तेव्हा वहाणा घालायच्या तर प्रतिभाताईंनी साडी ऐवजी पांढरा सलवार-कुर्ता घालण्याच स्वातंत्र्य घेतलं. विधिवत कन्यापूजन व भोजन, सज्जन असल्याचं प्रमाणपत्र घेऊन संकल्प घेतला आणि पहिलाच अनुभव असा काही आला की त्यांची श्रद्धा आणखी दृढ झाली. त्यांनी ही परिक्रमा एक तपश्चर्या म्हणून करायचे ठरवले न काही इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरिता. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ओंकारमांधाताची परिक्रमा करावी लागते व संपल्यावर ऋणक्तेश्वराला जावं लागतं. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ऋणमुक्तेश्वर काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून जातात. वाटेत एक हॉटेल लागतं. त्या हॉटेलात 'दाल-बाफले'चा फलक असतो. हा नवीन प्रकार खाऊन बघायची इच्छा होते व त्यायोगे जवळचे पैसेही संपतील, येताना खाऊ असा विचार करून मंदिरात जातात. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना आतून आवाज येतो नर्मदे हर! भोजन प्रसादी लो मैय्या. हातावर थोडासाच प्रसाद घेऊ अन हॉटेलात 'दाल-बाफले' खाऊ असा विचार करून आत जातात. पण तिकडे प्रसाद हातावर देत नाही व जेवावं लागतं. आता दाल बाफले कधी खाणार, मनात विचार येतो. प्रसाद घेतला. पानात वाढलेला प्रकार नवीन वाटला म्हणून शेजाऱ्याला विचारलं हे काय आहे, तो म्हणाला, ' दाल बाफले! ' 'जो जे वांछील तो ते लाहो' असा हा पहिला प्रत्यय आला नंतर तर अनेक वेळा आला. कन्याभोजन व पूजन (यथाशक्ति कुमारिकांना दान देणे) बाटल्यांमध्ये जल उचलले (म्हणजेच परिक्रमा उचलणे), दोन सुपाऱ्या (गणपती) मिळतात ज्यांचं परिक्रमा पूर्ण झाल्यावर विसर्जन करायचं असतं, असे विधी केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायचं. आता त्या मैय्याजी अन त्यांचे पती बाबाजी. दोघांजवळ दोन सॅक. त्यामध्ये एक कपड्याचा जोड, एक पाण्याची बाटली, एक चादर, टॉवेल, कमंडलू (कडीचा स्टीलचा डबा), पूजेचं साहित्य, एक काठी आणि दोघात मिळून एक सतरंजी. ओंकारेश्वरला त्रिपुरी पौर्णिमेला दीपदानाचा सोहळा असतो. लाखो भाविक तिथे गोळा होतात. असाच एका भाविकाचा बुटाचा पाय प्रतिभाताईंच्या अंगठ्यावर इतक्या जोरात पडतो की अंगठ्याचं नख उखडतं. अनवाणी चालायचं आहे. पहिला पाच किमीचा पडाव अतिशय कठीण. घनदाट जंगल. आजूबाजूला चिटपाखरूही नाही. वाटेत एक खडा पहाड. खाली धोधो वाहणारी मैय्या. हातपायांची बोटं खोबणीत रुतवून पहाड पार करायचा. पायाचा अंगठा कामातून गेलेला. पाय घसरला तर... वाटेत एकालाही काही झालं तरी दुसऱ्याने पूर्ण करायची. नर्मदे हर! नर्मदे हर! समोर दोन परिक्रमावासी उभे. नमस्कार चमत्कार, कोण, कुठले विचारपूस होते. चालू लागतात. मागेपुढे परिक्रमावासी मैय्याजी व बाबाजी. जिथे पुढचा परिक्रमावासी बोटं रुतवत होता त्याच खोबणीत बोटे रुतवून चालायला लागलो. कलियुगात विश्वास बसणार नाही अशी घटना. पाय कुठे टेकलाच नाही. अलगद डोंगर पार कसा झाला कळलंच नाही. जोरात गजर केला नर्मदे हर! नर्मदे हर!

रोज सकाळी सहाला चालायला लागायचं. सकाळी दोन तास आरामात चालणं व्हायचं. जवळपास घाट बघून अंघोळ व पूजाअर्चा. पोट हेच घड्याळ. भुकेची जाणीव झाली की जवळपास गाव बघून जेवणाची सोय बघायची. गाव कधी किनाऱ्याच्या जवळपास असायचे तर कधी तीन-चार किमी. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पाण्याच्या हापश्या आहेत. पन्नास टक्के जेवण आश्रमात होतं तीस टक्के भिक्षा मागून वीस टक्के लोकं बोलावतात किंवा सदावर्त. सदावर्त म्हणजे कुठल्याही घरासमोर नर्मदे हर! म्हणायचं. घरातल्यांना कळतं हे परिक्रमावासी आहे. ते विचारतात, 'कितनी मूर्ती'? मूर्ती म्हणजे कितीजण? मूर्तींच्या हिशोबाने ते जेवण आणून देतात किंवा डाळ-तांदूळ व मिठाचा खडा असा शिधा देतात. शिजवायला साधन नाही सांगितल्यावर एक पातेलं व झाकायला ताटली मिळते. त्याच ताटलीत जेवायचं अन धुऊन पुसून परत करायची. एकाने शिधा आणेपर्यंत दुसऱ्याने काटक्या गोळा करून दगडांची चूल पेटवायची अन खिचडी शिजवायची. समजा आटा न गुळाचा खडा मिळाला तर पळसाच्या दोन पानात कणिकेचा गोळा ठेवून ते पानग्या सारखं शेकायचं अन गुळाच्या खड्या बरोबर खायचं. आम्ही परिक्रमा करून आल्यावर लोक विचारायचे अलौकिक अनुभव काय? तर भुकेने जीव कळवळतो त्या वेळेला ही जी अमृततुल्य खिचडी, गूळ-रोटी मिळते किंवा तहानेने व्याकुळ झालेलो असतो त्या वेळेला पाणी मिळतं ना, ते अलौकिक असतं. "कवडीने बांध गाँठको मांगने सब जाए, पीछे पीछे हरी फिरे भक्त ना भूखा जाए". लोकं त्यांच्या घासातला घास काढून खायला देतात. रोज सरासरी पंधरा ते वीस किमी चालणं होतं. क्वचित जास्तही होतं. नगावचा पटेल खूपच अगत्यशील. तो तीन-चार दिवस जाऊच देत नाही. परिक्रमावासियांची सेवा करण्याचं पुण्य जास्तीत जास्त मिळविण्याकरिता. आपल्याला आसक्ती वाटायला नको किंवा यजामानाला विरक्ती, वैराग्य यायला नको म्हणून एका जागी जास्त दिवस थांबायचं नाही. तेलियाभट्टमला सियाराम नावाचे पंचाहत्तर-ऐंशी वर्षाचे सडसडीत साधू राहतात. त्यांना आजपर्यंत त्यांच्या खोलीतून बाहेर येताना वा जाताना कोणी बघितले नाही. त्यांना खूप कमी ऐकायला येतं. त्यांची फरशी बसवलेली स्वच्छ खोली. कोपऱ्यात एक स्टोव्ह. परिक्रमावासी आले की त्यांना चहा देणार. एका पातेलीत आधण ठेवून मुठीने अंदाजे चहा साखर टाकतात. त्या छोट्याश्या पातेलीत केलेला चहा चाळीसएक लोकांना देताना बघून आश्चर्य वाटतं. असे अगणित अनुभव. सियाराम बाबांसारखे कितीतरी सिद्धीप्राप्त साधुसंताचे दर्शन होते, सहवास लाभतो. पण सज्जन कोण, दुर्जन कोण हे ओळखायचं कसं? त्याची कथा अशी: एक व्यापारी असतो. त्याचा एक मुलगा असतो. मुलगा वडिलांना रेसरकार मागतो. वडील पक्के व्यापारी. तू प्रथमश्रेणीत उत्तीर्ण हो मी तुला कार देईन, वडील अट घालतात. मुलगा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होऊन घरी येतो. वडिलांकडे गाडीची किल्ली मागतो. वडील त्याला एक सोनेरी पाकीट देतात. मुलगा पाकीट उघडतो त्यात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं भागवत असतं. वडील रोज एक पान भागवत वाचायचे. मुलगा चिडतो. मला किल्ली हवीय, भागवत नको, तुम्ही माझ्याशी खोटेपणाने वागले म्हणत रागाने पाकीट भिरकावून देतो. स्वबळावर कार घेण्याची प्रतिज्ञा करत घराबाहेर पडतो. कार घेतल्यावर घरी फोन करतो. फोन नोकर उचलतो. मुलगा म्हणतो 'वडिलांना फोन दे'. 'तू कोण? तुझे वडील तर गेले', नोकर उत्तर देतो. मुलगा घरी येतो. नोकराला विचारतो, माझ्यासाठी वडिलांनी काय ठेवलंय? नोकर सांगतो तू जे पाकीट फेकून दिलंस, तेवढंच आहे. मुलगा पाकीट उघडतो. त्यात तीच भागवताची प्रत. पहिलं पान उघडतो, त्यात कारची किल्ली! होश आणि जोश दोन्हीमध्ये राहता आलं तर पाकिटाच्या आतली किल्ली आपोआप गवसते. असे अनेक कथा-किस्से! अनेक अद्भुत घटना! नर्मदे हर! नर्मदे हर!

निष्ठेने व श्रद्धेने केलेल्या संकल्पात काय ताकद असते त्याची कथाही अशीच बोधप्रद. संकल्प असा करावा जेणेकरून दुसऱ्याला दु:ख नको. आम्ही घरी संपर्क न करून घरच्यांना दु:खी करत होतो. आणि म्हणून तो मोडला गेल्याचं दु:ख झालं नाही. संकल्प पुर्तिचा आनंद तर आहेच आहे. झाडीतून म्हणजेच भिल्लांच्या जंगलातून आता जायचे होते. जवळ मागच्या गावातून मिळालेला शिधा आहे. एका शाळेत टेकत नाही तो आवाज आला. नर्मदे हर! पासमें घर है वहाँ आसन लगाओ. घरी मुलगी होती आईवडील बाजाराला गावात गेले होते. आसन लावले तेवढ्यात आई आली. भोजन प्रसादी बना देते है म्हणत सैंपाक बनवायला लागली. शिध्याच ओझं नको आणि उद्या नाहीतरी झाडीतून जातांना लुटल्याच जाणार आहे तर ते तू वापर असे म्हणताच ती हसली. मामाजी यायचेच होते. आम्ही जेवलो अन घरात झोपी गेलो. पहाटे उठलो तर बाहेर शेकोटी पेटवून गब्बरसिंगसदृश्य मामाजी बसलेला. आम्ही परिक्रमावासी असून घरात झोपलो होतो अन मामाजी एवढ्या थंडीत बाहेर झोपले होते. कोणी भेटलं की कोन गांवके? अन कोन जातके? हे दोन प्रश्न अगदी ठरलेले. तो ह्या झाडीतल्या भिल्लांचा टोळीप्रमुख. ती बाई का हसली ते कळलं. झाडीत अजूनही धनुष्यबाण चालतात. ते विषारी धनुष्यबाण बनवायचा ह्याचा व्यवसाय. खूप वर्ष हा व्यवसाय केला, खूप लोकांना लुटलं. लोकांना लुटून घेण्यात काय मजा येते, हे पाहण्यासाठी म्हणून त्याने तीनवर्षे तीन महिने तीन दिवसांची परिक्रमा केली वेष न बदलता, नियमपूर्वक. खूप त्रास झाला. आता तो वाल्याचा वाल्मीकी झालाय अन परिक्रमावासियांची सेवा करतो. पुढे रेवाकुटीला दिगंबरदासांचा आश्रम आहे. इथे ठरतं कुठल्या मार्गाने जायचं. झाडीतून की सरळ रस्त्याने. असं म्हटलं जातं की नर्मदेच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. अमरकंटकला तिचं डोकं आहे. समुद्राजवळ तिचे पाय आहेत, झाडीत तिचं हृदय आहे. कोणाच्या हृदयात शिरणं कठीण. संपूर्ण वीस दिवस दाट जंगलझाडीतून पहाडावरून चालायचं आहे. दिगंबरदासांनी कुठल्यातरी गटाबरोबर जाण्याचं सुचवलं. दोन दिवस थांबूनही त्यांना बरोबर घेऊन जायला कोणीही तयार नाही कारण कुठल्याही स्त्रीची विटंबना होताना बघणं शक्य नाही अन तिथे कोणी काही करूच शकत नाही. बाबाजींना मात्र घेऊन जायला तयार. तुमच्या कर्माच्या फळांचा हिशोब इथे कळतो. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला चांगले वाईट अनुभव येतात. बाभळीचे काटे बोचतात ना तेव्हा कळतं कितीजणांना टोचून बोललोय ते. वाटेत बोरखेडी गाव लागतं. तिथे रावतमामाकडे उतरायची सोय होते. भिल्लांच्या मुखियाला 'मामा' म्हणायचं. तो असतो खबऱ्या. उद्या काय होणार आहे, हे त्याला माहीत असतं. त्याला काय वाटले माहीत नाही तो ढसढसा रडून विनंती करतो की इथून जाऊ नका. निर्धार पक्का आहे. कर्माची फळं इथे नाहीतर अजून कुठे तरी प्रारब्धानुसार भोगावीच लागणार आहेत तर इथेच भोगू विचार करत पाच-सहा डोंगर पार केले. आता लुटण्याची ठिकाण येतं. समोर प्रत्यक्ष 'शोले' सिनेमाचा सेट. चारी बाजूला डोंगर. डोंगरावर सशस्त्र भिल्ल दरोडेखोर. खाली मैया. सामान खाली ठेवलं. लुटा, काय लुटायचं ते 'दीनबंधू दीनानाथ मेरी लाज तेरे हाथ' मनातल्या मनात भजन गायल्या जातं. बाबाजी खाली मान घालून उभे. वाट बघत बसलो. आत्ता खाली उतरतील मग खाली उतरतील. काही हालचाल नाही. सगळे थिजल्यागत! शेवटी विचारलं, लुटायचं नाही का? आश्चर्य म्हणजे नही मैया, आगे बढो, उस पहाडसे निकल जाव. विश्वासच बसत नाही. अश्या अनेक विश्वासच बसत नाही टाईप कितीतरी घटना! एक पैसा जवळ न ठेवता निघालेलो खर्च मात्र केले चौदा-पंधरा हजार. चातुर्मासात परिक्रमा करायची नसते म्हणून जिथे थांबलो तिथे एका खोलीत भांड्या-कुंड्यांसहित संसार थाटल्या गेला. न मागता मिळतंच जातं, मिळतंच जातं. मैया किती देशील दोन्ही करांनी. नर्मदे हर! नर्मदे हर!

ऋणमुक्तेश्वरला आलो. विधिवत परिक्रमेची सांगता केली. कुटुंबासह कन्याभोजन पूजन केले. पुण्याला सकाळी दहाला परतलो. खूप लाड कौतुक झाले. खूप गप्पा-टप्पा झाल्या. संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही. लक्षात आलं एक सॅक गायब. सामान आवरायला घेतले. सामान फार काही नव्हतेच. त्याच दोन सॅक. त्यात मिळालेले काही दगड, शाल, कोणी भेट म्हणून दिलेलं मोती, पोळ, शिवलिंग, डोंगरे महाराजांच एक पुस्तक आणि बाबांच्या . त्या दोन सॅक पैकी बाबांची सॅक दिसत नव्हती. त्यात बाबांनी लिहिलेल्या डायऱ्या होत्या. डायऱ्या गेल्या म्हणजे दीड वर्षात गमवलेलं सगळं गेलं असं बाबांना वाटतं होते. खूप शोधाशोध, फोनाफोनी केली. सात-आठ तासानंतर सॅक स्थानकावर मिळण्याची शक्यता नव्हती तरी पण प्रयत्न करून बघू विचार करत मधला मुलगा रेल्वे स्थानकावर गेला. शोधाशोध करू लागला. उकिरड्यावरल्या एका म्हातारीने विचारले काय शोधतोय? हीच बॅग ना? ती सॅक तिच्याजवळ कशी आली सांगत तिने सॅक दिली. मुलगा आनंदाने ओरडतच आला मी काय आणले बघा! ती म्हातारी कोण होती मला माहीतच होते पण मुलालाही कळले.

नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्तच आहे! श्रद्धेने अनेक गोष्टी साध्य होतात. चितळे पतीपत्नींचे अनुभव खरंच अतर्क्य म्हणण्यासारखे. त्यांच्या ८२ वर्षांच्या मामांबद्दल वाचूनही आश्चर्य वाटलं. तसेच भिल्लांच्य वस्तीतले अनुभवही विश्वास न बसण्याजोगे!

मंजू, हे अनुभव इथे आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद! तुला ऐकताना नक्कीच वेगळाच अनुभव मिळाला असणार. नशीबवान आहेस!

शहारे आले खरोखर, नर्मदे हर वाचल्यावरही भयंकर भारावल्यागत झाले होते. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.

फारच छान लिहिलंय - आधी गोनिदा, मग जगन्नाथ कुंटे, त्यानंतर ज्योती कामतमुळे श्री. गुणे व आता तुमच्यामुळे हे श्री. चितळे - अशा अनेक जणांचे अनुभव वाचून आपणही ही परिक्रमा करावी असं वाटायला लागलंय.
इथे वर्णन केलेले चितळ्यांचे अनुभव वाचताना डोळ्यांच्या कडा केव्हा ओलावल्या हे कळलेच नाही - यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. ही सी डी कुठे मिळू शकेल, काही मदत करु शकाल का याबाबत ?

माझ्याकडेही आहे ही सीडी.त्यात दिलेल्या फोन नंबरवर मी श्री व सौ चितळेंशी फोनवर बोलले आहे.त्यांचे अनुभव खरोखर रोमांचक आहेत.

सुंदर अनुभवकथन... सलग पास तास ऐकण म्हणजे पर्वणीच म्हणायची. Happy छान लिहिलयं

जगन्नाथ कुंटेंचं नर्मदे हर असेच भावलेले >>> अगदी अगदी.. खरच ते वाचून एकदा तरी 'नर्मदे हर' करायची इच्छा होते.

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद! लेखात लिहिल्याप्रमाणे सीडीवर काहीच लिहिलेलं नाहिये.
@समई - सीडी कुठे मिळेल ? मी माझ्यामैत्रिणीकडून आणली व माझ्या पीसी उतरवून घेतली लिहिण्याच्या निमीत्त्याने बरेचवेळा ऐकली अन अजूनही ऐकवीशीच वाटते.

अनुभव चांगले आहेत, पण मला एक प्रश्न पडला आहे.
एवढ्यातच नर्मदा परिक्रमा केलेल्या अनेक लोकांनी आपले अनुभव प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे की काय ?

सुर्रेख लिहिलय!!!
सुखद शहारे आले अंगावर!

नर्मदा परिक्रमेची सिडी मी नारेश्वरहुन घेतलीये. पण त्यात संपुर्ण रुट, प्रत्येक गाव,वै. सांगितलाय.

ही सीडी कुठे मिळेल प्लीज सांगा.

खुपच सुंदर लिहिले आहे. मागच्या भारतवारीत गोनिदा आणि जगन्नाथ कुंटे ह्यांचे अनुभव वाचले होतेच. काही वर्षा पासुनच माझ्या आई-बाबां ना ही परिक्रमा करायची खुप इच्छा होतीच आणि आता ह्या २ एप्रिल पासुन त्यांची नर्मदा परिक्रमा सुरु झालीये. Happy
नर्मदा माई त्यांची ही परिक्रमा सुखद करेलच ..
नर्मदे हर!!!

Thanks for all the support and feedback.

For Narmada Parikrama DVD Set please contact the following:

Vishram Sudhir Chitale - +91 9764995522

Radha Vishram Chitale- +91 8600890801

Address:
3/39, Gopinath Nagar, Near Gandhi Bhavan,
Kothrud, Pune 411029

वा!! शेअर केल्याबद्दल धन्यवाद मंजू.
विश्वास नाहीये, पण अविश्वासही नाही, अतिंद्रीय अनुभवांचे, चमत्कारांचे आकर्षणही नाही. तरीही परिक्रमा कराविशी वाटते.

Pages