नर्मदे हर!

Submitted by मंजूताई on 3 April, 2012 - 08:25

चार-पाच वर्षांपूर्वी निवेदिता खांडेकरचे प्रत्यक्ष अनुभव ऐकण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबद्दल फारसं ऐकलं वा वाचले नव्हते. दोनएक वर्षापूर्वी जगन्नाथ कुंट्यांच 'नर्मदे हर' वाचण्यात आलं. त्यानंतर अमरकंटकलाही जाण्याचा योग आला. सध्या अनेक संस्थळांवर नर्मदा परिक्रमेवर लेख, चर्चा वाचण्यात आल्या. कधीतरी आपणही परिक्रमेचा अनुभव घ्यावा असं वाटू लागलं . अजून तरी योग आला नाही. पण प्रतिभाताईंनी मानस परिक्रमा घडवून आणली. नुकतीच माझ्या मैत्रिणीने सौ प्रतिभा चितळ्यांची, त्यांनी दोनहजार सात साली केलेल्या परिक्रमेच्या अनुभवकथनाची तबकडी ऐकायला दिली. त्यांचे अनुभवकथन ऐकले अन भारावूनच गेले आणि हे मी ज्योती कामतच्या 'नर्मदेच्या तटाकी' पुस्तक परीक्षणाच्या प्रतिसादात लिहिलं. ते वाचून तिने मला सीडीबद्दल लिहायला सांगितले. त्या सीडीबद्दल लिहिण्याचा हा माझा प्रयत्न.

पुण्याचे सौ प्रतिभा चितळे व त्यांचे पती श्री सुधीर (व्यवसायाने व काहीसे वृत्तीनेही मेकॅनिकल इंजिनियर) चितळे ह्यांनी दोनहजारसातसाली दीडवर्षाची नर्मदा परिक्रमा केली. त्यांच्या अनुभवकथनाची ही सीडी. त्यावर कुठलीही माहिती लिहिलेली नाही कुठल्या कंपनीची, कोणी केली, किंमत इ. त्यांच्याच घरात रेकॉर्ड केली असावी असं वाटतं. त्या आपल्यासमोर एका खुर्चीत बसून नुकत्याच करून आलेल्या परिक्रमेविषयी उत्स्फूर्तपणे, उत्साहाने वर्णन करताहेत. साधी साडी, रंगरंगोटी विरहित पण प्रसन्न व बोलका चेहरा आणि मर्यादित हातवारे! सांगण्यात कुठेही आत्मप्रौढी (बघा, किती कठीण काम करून आलेय, बघा, मला कित्ती अनुभवायला मिळाले)किंवा दर्प नाही. हातात किंवा समोर कागद नाही. साधी सोपी बोलीभाषा. कुठेही भाषेचा अवजडपणा नसल्यामुळेच की काय त्या आपल्याशी गप्पा मारताहेत असंच वाटतं. पूर्ण सीडी ऐकायला पाच तास लागतात म्हणजे एकदा ऐकायला बसलो की आपण पाच तास जागचे हालतच नाही. अक्षरशः आपण खिळूनच बसतो. मध्ये-मध्ये कथनाच्या अनुषंगाने येतील तेवढीच दृश्यचित्रे. सीडीला सुरुवात होते ती पुरुषी आवाजातील प्रास्ताविकाने त्यानंतर त्यांनीच म्हटलेल्या 'नर्मदाष्टकाने'. नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर! म्हणत त्या सांगतात ती त्यांची कौटुंबिक माहिती व त्यांची 'प्रेरणा'. त्यांची प्रेरणा त्यांचे वैद्यमामा. वैद्यमामांनी तीनदा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची परिक्रमा केली. तिसरी केली तेव्हा त्यांचे वय ब्याऐंशी, तर मामीचे पंचाहत्तर. प्रत्येक वेळेला त्यांचे अनुभव ऐकून एखाद्याची परिक्रमा करण्याची इच्छा पेक्षा धाडसच झाले नसते. पण त्यांची इच्छा तीव्रच होत गेली. ही अतिशय खडतर तीनहजार किमी (धरणामुळे आता साडेतीन) परिक्रमा आहे. एकंदरीत चौदाकोटी पावलं चालावी लागतात. तिथे लागतो तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस आणि हो श्रद्धेचाही! हे कोण्या येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. परिक्रमा नर्मदेचीच का? तर त्याची कथा अशी - नर्मदा व गंगा तपश्चर्येला बसतात. शिवजी बघतात. शिवजी गंगेवर प्रसन्न होतात. गंगा वर मागते, मला तुमच्यात सामावून घ्या. गंगेला शिवजींच्या जटेत स्थान मिळतं. कालांतराने नर्मदेवर प्रसन्न होतात. नर्मदा वर मागते, तुमच्या पंचायतनासकट माझ्यात सामावून जा. शिवजी शेवटचे देव म्हणून तिची परिक्रमा. अमरकंटक तिचे उगमस्थान. मोठ्यांचे आशीर्वाद व लहानांच्या शुभेच्छांसह सत्तावीस नोव्हेंबर दोनहजारला ते निघतात पुण्याहून आणि गाठतात ओंकारेश्वर, ठाम संकल्प व श्रद्धेने! परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक सर्व साधन-साम्रगीसह वाहनाने, दुसरी काही अंतर किनाऱ्याने पायी व काही वाटेने, व तिसरी पूर्ण किनाऱ्याने अनवाणी. तिसऱ्या प्रकारात बरेच कडक नियम आहेत. अनवाणी चालायचं, संग्रह नाही (वस्तूंचा अथवा माणसांचा), आसक्ती नाही आणि 'मी'पणा विसरायचा, कोणाला काही मागायचं नाही, कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. ही शहरातील बाई पायी कशी काय परिक्रमा? असं बऱ्याच लोकांना वाटलं. ओंकारेश्वरातील साधू-संत, मार्गदर्शकांनी पूर्ण पायी करण्याऐवजी काही अंतर बसने व काही पायी किनाऱ्याने करावी असं सुचवलं. पण ह्या दोघांनी तिसऱ्या प्रकाराने करायचे ठरवले. पती सुधीरह्यांनी पायात गरज पडेल तेव्हा वहाणा घालायच्या तर प्रतिभाताईंनी साडी ऐवजी पांढरा सलवार-कुर्ता घालण्याच स्वातंत्र्य घेतलं. विधिवत कन्यापूजन व भोजन, सज्जन असल्याचं प्रमाणपत्र घेऊन संकल्प घेतला आणि पहिलाच अनुभव असा काही आला की त्यांची श्रद्धा आणखी दृढ झाली. त्यांनी ही परिक्रमा एक तपश्चर्या म्हणून करायचे ठरवले न काही इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरिता. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ओंकारमांधाताची परिक्रमा करावी लागते व संपल्यावर ऋणक्तेश्वराला जावं लागतं. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ऋणमुक्तेश्वर काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून जातात. वाटेत एक हॉटेल लागतं. त्या हॉटेलात 'दाल-बाफले'चा फलक असतो. हा नवीन प्रकार खाऊन बघायची इच्छा होते व त्यायोगे जवळचे पैसेही संपतील, येताना खाऊ असा विचार करून मंदिरात जातात. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना आतून आवाज येतो नर्मदे हर! भोजन प्रसादी लो मैय्या. हातावर थोडासाच प्रसाद घेऊ अन हॉटेलात 'दाल-बाफले' खाऊ असा विचार करून आत जातात. पण तिकडे प्रसाद हातावर देत नाही व जेवावं लागतं. आता दाल बाफले कधी खाणार, मनात विचार येतो. प्रसाद घेतला. पानात वाढलेला प्रकार नवीन वाटला म्हणून शेजाऱ्याला विचारलं हे काय आहे, तो म्हणाला, ' दाल बाफले! ' 'जो जे वांछील तो ते लाहो' असा हा पहिला प्रत्यय आला नंतर तर अनेक वेळा आला. कन्याभोजन व पूजन (यथाशक्ति कुमारिकांना दान देणे) बाटल्यांमध्ये जल उचलले (म्हणजेच परिक्रमा उचलणे), दोन सुपाऱ्या (गणपती) मिळतात ज्यांचं परिक्रमा पूर्ण झाल्यावर विसर्जन करायचं असतं, असे विधी केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायचं. आता त्या मैय्याजी अन त्यांचे पती बाबाजी. दोघांजवळ दोन सॅक. त्यामध्ये एक कपड्याचा जोड, एक पाण्याची बाटली, एक चादर, टॉवेल, कमंडलू (कडीचा स्टीलचा डबा), पूजेचं साहित्य, एक काठी आणि दोघात मिळून एक सतरंजी. ओंकारेश्वरला त्रिपुरी पौर्णिमेला दीपदानाचा सोहळा असतो. लाखो भाविक तिथे गोळा होतात. असाच एका भाविकाचा बुटाचा पाय प्रतिभाताईंच्या अंगठ्यावर इतक्या जोरात पडतो की अंगठ्याचं नख उखडतं. अनवाणी चालायचं आहे. पहिला पाच किमीचा पडाव अतिशय कठीण. घनदाट जंगल. आजूबाजूला चिटपाखरूही नाही. वाटेत एक खडा पहाड. खाली धोधो वाहणारी मैय्या. हातपायांची बोटं खोबणीत रुतवून पहाड पार करायचा. पायाचा अंगठा कामातून गेलेला. पाय घसरला तर... वाटेत एकालाही काही झालं तरी दुसऱ्याने पूर्ण करायची. नर्मदे हर! नर्मदे हर! समोर दोन परिक्रमावासी उभे. नमस्कार चमत्कार, कोण, कुठले विचारपूस होते. चालू लागतात. मागेपुढे परिक्रमावासी मैय्याजी व बाबाजी. जिथे पुढचा परिक्रमावासी बोटं रुतवत होता त्याच खोबणीत बोटे रुतवून चालायला लागलो. कलियुगात विश्वास बसणार नाही अशी घटना. पाय कुठे टेकलाच नाही. अलगद डोंगर पार कसा झाला कळलंच नाही. जोरात गजर केला नर्मदे हर! नर्मदे हर!

रोज सकाळी सहाला चालायला लागायचं. सकाळी दोन तास आरामात चालणं व्हायचं. जवळपास घाट बघून अंघोळ व पूजाअर्चा. पोट हेच घड्याळ. भुकेची जाणीव झाली की जवळपास गाव बघून जेवणाची सोय बघायची. गाव कधी किनाऱ्याच्या जवळपास असायचे तर कधी तीन-चार किमी. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पाण्याच्या हापश्या आहेत. पन्नास टक्के जेवण आश्रमात होतं तीस टक्के भिक्षा मागून वीस टक्के लोकं बोलावतात किंवा सदावर्त. सदावर्त म्हणजे कुठल्याही घरासमोर नर्मदे हर! म्हणायचं. घरातल्यांना कळतं हे परिक्रमावासी आहे. ते विचारतात, 'कितनी मूर्ती'? मूर्ती म्हणजे कितीजण? मूर्तींच्या हिशोबाने ते जेवण आणून देतात किंवा डाळ-तांदूळ व मिठाचा खडा असा शिधा देतात. शिजवायला साधन नाही सांगितल्यावर एक पातेलं व झाकायला ताटली मिळते. त्याच ताटलीत जेवायचं अन धुऊन पुसून परत करायची. एकाने शिधा आणेपर्यंत दुसऱ्याने काटक्या गोळा करून दगडांची चूल पेटवायची अन खिचडी शिजवायची. समजा आटा न गुळाचा खडा मिळाला तर पळसाच्या दोन पानात कणिकेचा गोळा ठेवून ते पानग्या सारखं शेकायचं अन गुळाच्या खड्या बरोबर खायचं. आम्ही परिक्रमा करून आल्यावर लोक विचारायचे अलौकिक अनुभव काय? तर भुकेने जीव कळवळतो त्या वेळेला ही जी अमृततुल्य खिचडी, गूळ-रोटी मिळते किंवा तहानेने व्याकुळ झालेलो असतो त्या वेळेला पाणी मिळतं ना, ते अलौकिक असतं. "कवडीने बांध गाँठको मांगने सब जाए, पीछे पीछे हरी फिरे भक्त ना भूखा जाए". लोकं त्यांच्या घासातला घास काढून खायला देतात. रोज सरासरी पंधरा ते वीस किमी चालणं होतं. क्वचित जास्तही होतं. नगावचा पटेल खूपच अगत्यशील. तो तीन-चार दिवस जाऊच देत नाही. परिक्रमावासियांची सेवा करण्याचं पुण्य जास्तीत जास्त मिळविण्याकरिता. आपल्याला आसक्ती वाटायला नको किंवा यजामानाला विरक्ती, वैराग्य यायला नको म्हणून एका जागी जास्त दिवस थांबायचं नाही. तेलियाभट्टमला सियाराम नावाचे पंचाहत्तर-ऐंशी वर्षाचे सडसडीत साधू राहतात. त्यांना आजपर्यंत त्यांच्या खोलीतून बाहेर येताना वा जाताना कोणी बघितले नाही. त्यांना खूप कमी ऐकायला येतं. त्यांची फरशी बसवलेली स्वच्छ खोली. कोपऱ्यात एक स्टोव्ह. परिक्रमावासी आले की त्यांना चहा देणार. एका पातेलीत आधण ठेवून मुठीने अंदाजे चहा साखर टाकतात. त्या छोट्याश्या पातेलीत केलेला चहा चाळीसएक लोकांना देताना बघून आश्चर्य वाटतं. असे अगणित अनुभव. सियाराम बाबांसारखे कितीतरी सिद्धीप्राप्त साधुसंताचे दर्शन होते, सहवास लाभतो. पण सज्जन कोण, दुर्जन कोण हे ओळखायचं कसं? त्याची कथा अशी: एक व्यापारी असतो. त्याचा एक मुलगा असतो. मुलगा वडिलांना रेसरकार मागतो. वडील पक्के व्यापारी. तू प्रथमश्रेणीत उत्तीर्ण हो मी तुला कार देईन, वडील अट घालतात. मुलगा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होऊन घरी येतो. वडिलांकडे गाडीची किल्ली मागतो. वडील त्याला एक सोनेरी पाकीट देतात. मुलगा पाकीट उघडतो त्यात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं भागवत असतं. वडील रोज एक पान भागवत वाचायचे. मुलगा चिडतो. मला किल्ली हवीय, भागवत नको, तुम्ही माझ्याशी खोटेपणाने वागले म्हणत रागाने पाकीट भिरकावून देतो. स्वबळावर कार घेण्याची प्रतिज्ञा करत घराबाहेर पडतो. कार घेतल्यावर घरी फोन करतो. फोन नोकर उचलतो. मुलगा म्हणतो 'वडिलांना फोन दे'. 'तू कोण? तुझे वडील तर गेले', नोकर उत्तर देतो. मुलगा घरी येतो. नोकराला विचारतो, माझ्यासाठी वडिलांनी काय ठेवलंय? नोकर सांगतो तू जे पाकीट फेकून दिलंस, तेवढंच आहे. मुलगा पाकीट उघडतो. त्यात तीच भागवताची प्रत. पहिलं पान उघडतो, त्यात कारची किल्ली! होश आणि जोश दोन्हीमध्ये राहता आलं तर पाकिटाच्या आतली किल्ली आपोआप गवसते. असे अनेक कथा-किस्से! अनेक अद्भुत घटना! नर्मदे हर! नर्मदे हर!

निष्ठेने व श्रद्धेने केलेल्या संकल्पात काय ताकद असते त्याची कथाही अशीच बोधप्रद. संकल्प असा करावा जेणेकरून दुसऱ्याला दु:ख नको. आम्ही घरी संपर्क न करून घरच्यांना दु:खी करत होतो. आणि म्हणून तो मोडला गेल्याचं दु:ख झालं नाही. संकल्प पुर्तिचा आनंद तर आहेच आहे. झाडीतून म्हणजेच भिल्लांच्या जंगलातून आता जायचे होते. जवळ मागच्या गावातून मिळालेला शिधा आहे. एका शाळेत टेकत नाही तो आवाज आला. नर्मदे हर! पासमें घर है वहाँ आसन लगाओ. घरी मुलगी होती आईवडील बाजाराला गावात गेले होते. आसन लावले तेवढ्यात आई आली. भोजन प्रसादी बना देते है म्हणत सैंपाक बनवायला लागली. शिध्याच ओझं नको आणि उद्या नाहीतरी झाडीतून जातांना लुटल्याच जाणार आहे तर ते तू वापर असे म्हणताच ती हसली. मामाजी यायचेच होते. आम्ही जेवलो अन घरात झोपी गेलो. पहाटे उठलो तर बाहेर शेकोटी पेटवून गब्बरसिंगसदृश्य मामाजी बसलेला. आम्ही परिक्रमावासी असून घरात झोपलो होतो अन मामाजी एवढ्या थंडीत बाहेर झोपले होते. कोणी भेटलं की कोन गांवके? अन कोन जातके? हे दोन प्रश्न अगदी ठरलेले. तो ह्या झाडीतल्या भिल्लांचा टोळीप्रमुख. ती बाई का हसली ते कळलं. झाडीत अजूनही धनुष्यबाण चालतात. ते विषारी धनुष्यबाण बनवायचा ह्याचा व्यवसाय. खूप वर्ष हा व्यवसाय केला, खूप लोकांना लुटलं. लोकांना लुटून घेण्यात काय मजा येते, हे पाहण्यासाठी म्हणून त्याने तीनवर्षे तीन महिने तीन दिवसांची परिक्रमा केली वेष न बदलता, नियमपूर्वक. खूप त्रास झाला. आता तो वाल्याचा वाल्मीकी झालाय अन परिक्रमावासियांची सेवा करतो. पुढे रेवाकुटीला दिगंबरदासांचा आश्रम आहे. इथे ठरतं कुठल्या मार्गाने जायचं. झाडीतून की सरळ रस्त्याने. असं म्हटलं जातं की नर्मदेच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. अमरकंटकला तिचं डोकं आहे. समुद्राजवळ तिचे पाय आहेत, झाडीत तिचं हृदय आहे. कोणाच्या हृदयात शिरणं कठीण. संपूर्ण वीस दिवस दाट जंगलझाडीतून पहाडावरून चालायचं आहे. दिगंबरदासांनी कुठल्यातरी गटाबरोबर जाण्याचं सुचवलं. दोन दिवस थांबूनही त्यांना बरोबर घेऊन जायला कोणीही तयार नाही कारण कुठल्याही स्त्रीची विटंबना होताना बघणं शक्य नाही अन तिथे कोणी काही करूच शकत नाही. बाबाजींना मात्र घेऊन जायला तयार. तुमच्या कर्माच्या फळांचा हिशोब इथे कळतो. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला चांगले वाईट अनुभव येतात. बाभळीचे काटे बोचतात ना तेव्हा कळतं कितीजणांना टोचून बोललोय ते. वाटेत बोरखेडी गाव लागतं. तिथे रावतमामाकडे उतरायची सोय होते. भिल्लांच्या मुखियाला 'मामा' म्हणायचं. तो असतो खबऱ्या. उद्या काय होणार आहे, हे त्याला माहीत असतं. त्याला काय वाटले माहीत नाही तो ढसढसा रडून विनंती करतो की इथून जाऊ नका. निर्धार पक्का आहे. कर्माची फळं इथे नाहीतर अजून कुठे तरी प्रारब्धानुसार भोगावीच लागणार आहेत तर इथेच भोगू विचार करत पाच-सहा डोंगर पार केले. आता लुटण्याची ठिकाण येतं. समोर प्रत्यक्ष 'शोले' सिनेमाचा सेट. चारी बाजूला डोंगर. डोंगरावर सशस्त्र भिल्ल दरोडेखोर. खाली मैया. सामान खाली ठेवलं. लुटा, काय लुटायचं ते 'दीनबंधू दीनानाथ मेरी लाज तेरे हाथ' मनातल्या मनात भजन गायल्या जातं. बाबाजी खाली मान घालून उभे. वाट बघत बसलो. आत्ता खाली उतरतील मग खाली उतरतील. काही हालचाल नाही. सगळे थिजल्यागत! शेवटी विचारलं, लुटायचं नाही का? आश्चर्य म्हणजे नही मैया, आगे बढो, उस पहाडसे निकल जाव. विश्वासच बसत नाही. अश्या अनेक विश्वासच बसत नाही टाईप कितीतरी घटना! एक पैसा जवळ न ठेवता निघालेलो खर्च मात्र केले चौदा-पंधरा हजार. चातुर्मासात परिक्रमा करायची नसते म्हणून जिथे थांबलो तिथे एका खोलीत भांड्या-कुंड्यांसहित संसार थाटल्या गेला. न मागता मिळतंच जातं, मिळतंच जातं. मैया किती देशील दोन्ही करांनी. नर्मदे हर! नर्मदे हर!

ऋणमुक्तेश्वरला आलो. विधिवत परिक्रमेची सांगता केली. कुटुंबासह कन्याभोजन पूजन केले. पुण्याला सकाळी दहाला परतलो. खूप लाड कौतुक झाले. खूप गप्पा-टप्पा झाल्या. संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही. लक्षात आलं एक सॅक गायब. सामान आवरायला घेतले. सामान फार काही नव्हतेच. त्याच दोन सॅक. त्यात मिळालेले काही दगड, शाल, कोणी भेट म्हणून दिलेलं मोती, पोळ, शिवलिंग, डोंगरे महाराजांच एक पुस्तक आणि बाबांच्या . त्या दोन सॅक पैकी बाबांची सॅक दिसत नव्हती. त्यात बाबांनी लिहिलेल्या डायऱ्या होत्या. डायऱ्या गेल्या म्हणजे दीड वर्षात गमवलेलं सगळं गेलं असं बाबांना वाटतं होते. खूप शोधाशोध, फोनाफोनी केली. सात-आठ तासानंतर सॅक स्थानकावर मिळण्याची शक्यता नव्हती तरी पण प्रयत्न करून बघू विचार करत मधला मुलगा रेल्वे स्थानकावर गेला. शोधाशोध करू लागला. उकिरड्यावरल्या एका म्हातारीने विचारले काय शोधतोय? हीच बॅग ना? ती सॅक तिच्याजवळ कशी आली सांगत तिने सॅक दिली. मुलगा आनंदाने ओरडतच आला मी काय आणले बघा! ती म्हातारी कोण होती मला माहीतच होते पण मुलालाही कळले.

नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> ज्या देशात अजूनही स्त्री भ्रूण हत्या होतात तिथे अश्या प्रथांची गरज आहे. निदान यामुळे का होईना लोकांमध्ये योग्य संदेश जाईल. > आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी झालं हे तर. यापेक्षा स्त्रीगर्भपात का होतात त्याचे कारण जाणून ते दूर करायचा प्रयत्न केला तर जास्त योग्य होईल.
===

> अॅक्च्युअल अनुभव हे नंतर मुलामा चढविल्यासारखे व ग्लॅमराइझ केल्यासारखे वाटले. ते मुद्दाम केले आहेत असे म्हणायचे नाही पण मागे वळून पहाताना आपल्याला कसे बालपण किंवा गतायुष्य नेहमी सुंदर व आदर्शवतच वाटते कारण तेव्हाच्या हार्ड्शिप्स, कष्ट आपण विसरलेलो असतो तरी किंवा त्याकडे डोळेझाक तरी करतो. > तुझं बरोबर आहे सामो.
Almost all memories are fiction.
आपल्या आठवणी खऱ्या नसतात. त्या ग्लॅमराईझ केलेल्या असतात. सोयीस्कररित्या स्वतःला हिरॉईक किंवा व्हिक्टिमाईझ केलेले असते. म्हणूनच न्याय देताना कोर्ट साक्षीदारांवर 'पूर्ण विश्वास' शक्यतो ठेवत नाही, बाकी मनुष्य असंबंधीत गोष्टीदेखील बघते.

नाशिकच्या भारती ठाकूर ह्यांनी आपल्या मैत्रिणी बरोबर परिक्रमा केली.त्यात त्यांनी निसर्गाचेही सुंदर वर्णन केले आहे.आता त्नर्मदेकाठीच एक आदिवासी मुलांसाठी शाळा त्यांनी काढली आहे.चितळे पतिपत्नी सुद्धा दरवर्षी नर्मदेकाठी काही महिने परिक्रमावासीयांसाठी सर्व सामान घेऊन सेवा करतात असे ऐकले आहे.

वरील चर्चा आवडली. एसआरडी म्हणतात ते खरंच आहे. मागच्या महिन्यात माळवा ट्रीपला गेलो असता ओंकारेश्वरला गजानन संस्थानात उतरलो होतो. एका दिवसात दहाएक परिक्रमावासींना भेटलो. त्यापैकी एकजण त्यांच्या पहिल्या परिक्रमेनंतर मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून दुसर्यांदा करायला निघाले होते. त्यानंतर मी भारतीताईंकडे आठ दिवस सेवा द्यायला गेले होते त्या दरम्यान दोन ट्रॅव्हल कंच्या दोन बसेस आल्या होत्या व पंधराएक परिक्रमावासी मुक्कामाला होते. एक अनुभव सांगते तिघं नातेवाईक आमच्याबरोबर भोजनप्रसादीकरिता होते. आश्रमातली मुलं वाढण्याचं काम करतात. जेवण झाल्यावर मुलं त्यांची ताटं उचलू लागली ती त्यांनी (परिक्रमावासींनी) उचलू दिली पण भारतीताई त्यांना म्हणाल्या की तुम्ही परिक्रमा करताय तर नियमाप्रमाणे तुम्ही तुमची ताटं धुवा .... असो!
दहा वर्षात बरंच काम केलंय भारतीताईंनी सविस्तर त्यांच्याबद्दल लिहायचं आहे पण आता शिबिराच्या गडबडीत असल्याने निवांत गप्पा झाल्या नाहीत.
प्रतिभाताईंना आलेले अनुभव फार प्रामाणिक वाटतात हेमावैम.
भारतीताई, नागपूरची निवेदिता खांडेकर व उष:प्रभा पागे अशी तिघींनी केला पण त्यापैकी उषाताईंची पूर्ण झाली नाही. भारतीताई व निवेदिता दोघी विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या पण वेगवेगळ्या काळात पूर्वांचलमध्ये काम केलेल्या. दोघी एका शिबिरात दोघींची जुजबी ओळख झाली होती. निवेदिताला परिक्रमा करायची होती पण मोठं कोणी सोबत असल्याशिवाय आई परवानगी देत नव्हती. तिच्या डोक्यात भारतीताईंना विचारावं कसं काय आलं देव जाणे! इकडे नाशिकमध्ये भारतीताई विचार करत होत्या आयुष्यात फार काही अपेक्षा नाहीत पण ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या. कैलासमानसरोवरही झालं नर्मदा परिक्रमा मात्र राह्यली. तेव्हाच निवेदिताचा फोन आला.... ह्याला काय म्हणावं?
रामकृष्ण शारदा निकेतनमधल्या शिबिरात एक रामकृष्ण मठाचे स्वामीजी प्रवचन देत होते ... मला लोकं विचारतात की काही चमत्कारिक अनुभव आले का ? हो, येतात ना .... काही नोकरी धंदा न करता दोनवेळेस पोटभर जेवायला मिळतंय ना ....
दोघींची भारतीताई व प्रतिभाताईंची आपआपल्यापरीने सेवा देताहेत..... स्पृहणीय आहे _/\_

चितळ्यांचे विडिओ मीही पाहिलेत आणि अनेकदा पाहिलेत. ते बघून कोणाला परिक्रमा अगदी सोपी आहे असे वाटत असेल तर मला आश्चर्य वाटेल. अनुभव ऐकताना नुसते जे सांगितले तेवढेच ऐकले तर सगळे सोप्पे वाटेल. अनुभव ऐकत असताना न सांगताही बरेच सुचवलेले असते तेही समजून घ्यायचे असते. पुढच्या गावात सोय होईल की नाही, झाली तर किती याची काहीही खात्री नाही, सोय झाली नाही तर आपल्याकडे स्वतःसाठी कसलीही सोय नाही हे न सांगताही लक्षात येते व हे ऐकूनही कोणाला परिक्रमा सोपी वाटत असेल तर आश्चर्य वाटते. चितळ्यानी दोन गोष्टी सांगितल्यात. पहिली म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची जात विचारली जात होती व ब्राम्हण कळल्यावर मिळणारी ट्रीटमेंट वेगळी असायची, स्पेशल असायची. आणि दुसरी ही की त्यांच्या पतीने तितक्या भाविकतेने यात्रा केली नाही, सोबत राहूनही त्यांना वेगळे अनुभव आले. या दोन गोष्टी इतरांच्या बाबतीत किती समान असमान असतील त्याप्रमाणात अनुभव येणार. त्यामुळे कोणी चितळ्यांचे अनुभव वाचून जात असेल तर त्यातले बहुतांश दोन दिवसात दगडगोट्यात अनवाणी चालून दमणार, खायला निखार्यावर शेकलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाड भाकऱ्या व नुसता गुळाचा खडा खाऊन वैतागणार व परतणार.

>>>>>>>>>>>>>>>> अनुभव ऐकत असताना न सांगताही बरेच सुचवलेले असते तेही समजून घ्यायचे असते. पुढच्या गावात सोय होईल की नाही, झाली तर किती याची काहीही खात्री नाही, सोय झाली नाही तर आपल्याकडे स्वतःसाठी कसलीही सोय नाही हे न सांगताही लक्षात येते व हे ऐकूनही कोणाला परिक्रमा सोपी वाटत असेल तर आश्चर्य वाटते.>>>>>> पटले.

>>>>>>>>>>>>>>>> अनुभव ऐकत असताना न सांगताही बरेच सुचवलेले असते तेही समजून घ्यायचे असते. पुढच्या गावात सोय होईल की नाही, झाली तर किती याची काहीही खात्री नाही, सोय झाली नाही तर आपल्याकडे स्वतःसाठी कसलीही सोय नाही हे न सांगताही लक्षात येते व हे ऐकूनही कोणाला परिक्रमा सोपी वाटत असेल तर आश्चर्य वाटते.>>>>>> पटले.

चितळ्यांनी दररोजचा प्रवास मांडलेला नाही तर प्रवासादरम्यानचे अनुभव मांडले आहेत. ते जोडपे वर्षभराची परिक्रमा करत होते बहुतेक, नीट आठवत नाहीये आता. मध्ये पावसाळा सुरू झाला तेव्हा भाड्याचे घर घेऊन राहिले असे सांगितलंय. तर या दीर्घ काळात जे सांगण्यासारखे अनुभव आले ते त्यांनी सांगितले. ट्रॅव्हलॉग लिहिलेला नाही, तो हेतू नसावा. त्यामुळे रोजच्या रोजचे अनुभव नाहीत, कुठे कशी व्यवस्था आहे, टॉयलेट वगैरे याबाबत काहीही बोलले गेले नाही.

बाकी इच्छा केली व मिळाले हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही थोडे खटकले. पण असेही असेल की दहा इच्छा झाल्या असतील मनातल्या मनात व विस्मरणातही गेल्या असतील. पण त्यातल्या काही पूर्ण झाल्या व त्या सांगावाश्या वाटल्या Happy Happy

आपल्याला असे होणार नाही असे वाटते कारण एकतर देव असा लगेच धावेल यावर विश्वास नसतो आणि तो जरी धावत असला तरी तो माझ्यासाठीही धावेल हे खरे वाटत नाही. पण हे असे अनुभव कित्येक सामान्यांनीही घेतलेले आहेत.

साधनाताई अगदी किरकोळ ईच्छाही चमत्कार वाटाव्यात अशा पद्धतीने पुर्ण होतात. आता तुझा जर विश्वासच नाही मग बोलण्यात काहीच अर्थ नाही. ठाम आस्तिक असावं किंवा ठाम नास्तीक. अनुभव येतोच. अधले मधले हे नेहमीच अधले मधले राहतात.

चांगली ओळख. हा जुना धागा आज वाचनात आला!
चितळे यांचे ३-४ व्हिडीयो पाहिले. एक भाबडा प्रश्न पडला - रोज सकाळी उठून ५-७ किलोमिटर अनवाणी चाललं, जो दिसेल त्याला फालतू गॉसिप न करता 'नर्मदे हर' म्हणून चालतं झालं, कामवाली किती खाडे करते नि किती व्हिमबार फसाफसा वापरते ह्याचे हिशेब न मांडता आपलं आपलं कपडे-भांडी आवरून घेतलं, सून्/सासू जे वाढेल ते चूपचाप खाल्लं, इतर कुटूंबियांकडे काही मागितलं नाही तर घरीच राहून २ वर्षात भरपूर इच्छा पूर्ण होतील की.... का नाही होणार?
बिकट (हार्डशिप), अनिश्चित (अनसर्टन), अज्ञात (अननोन) परिसर असल्याशिवाय आम्ही सुधरणार नाही अशा मंडळीसाठी परिक्रमा ठीक आहे असे वाटले. बाकी लोकांना 'संसारातच ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको' हे अनंत फंदीचे वचन जास्त आश्वासक वाटत असावे.

मला चमत्कारासाठी जायचं नाही. एक ट्रेक म्हणून तीनचार दिवस फिरायचं आहे. मी सवय नसल्याने अनवाणी जाणार नाही. धार्मिक/अध्यात्मिक भावना शून्य आहेत. कुठे अन्न मिळेल ते विकत घेणार, आसरा पाहणार. नियमबियम काही नाही. तो परिसर नर्मदेकाठचा कसा आहे तेवढेच पाहायचे आहे.
-----
साधेसुधे वाटणारे ट्रेकसुद्धा कसे अवघड होतात हे माहीत आहे. नवीन मुंबईत महापेजवळ (नोसिल कंपनीच्या मागे) एक डोंगर आहे छोटासा. गवळीदेव. तिथे पावसाळ्यात सकाळी अकराला गेलो. मोठ्या डासांनी अंग फोडून परत पाठवलं .फक्त दीडशे मिटर्स उंची परंतू फारच कठीण गेलं.
कुणी म्हणेल भाविक नसल्याने शिक्षा मिळाली. बाकी बुद्धाने सांगितलं की शरीराला क्लेश दिलेच म्हणजे प्रगती वगैरे काही नाही, ज्याच्याकडे नाही त्यास आधार द्या.

Submitted by सीमंतिनी on 5 January, 2020 - 18:39
>> एकदम सत्य, डोळे उघडणारं झणझणीत अंजन.

कुंटेंचं 'नर्मदे हर' वाचायची तलफ झालेली पुन्हा एकदा. किंडलवर ते सुरू केलेलं. आणि मग साईड बाय साईड यूट्यूबवर परिक्रमेबद्दलचा काही चांगला कंटेंट मिळतोय का ते शोधत होतो. अनेक व्हिडिओज् थोडेथोडे चाळून झाल्यावर तीन व्हिडिओज चांगले सापडले. त्याबद्दल थोडंफार.

१. पैकी एक प्रतिभा चितळेंचा.
https://m.youtube.com/watch?v=OTLkbyx5P9g&pp=ygUgU2hyaWRoYXIgZ3VuZSBOYXJ...

हा ऐकायला सुरुवात केली आणि अडीच तास बाकी सगळं सोडून सलग ऐकून संपवला. कारण आवडलंच म्हणजे. बाईंचा परिक्रमेकडं बघण्याचा ॲप्रोच चांगला आहे. त्यांचं मन नर्मदेच्या रंगात रंगून गेलेलं आहे, त्यामुळे ऐकणाऱ्याच्याही मनाला भरती येत राहते सारखी सारखी.

२. दुसरा एक व्हिडिओ आण्णा महाराज बावस्कर-जोशींचा.
https://m.youtube.com/watch?v=EwNjidYYXuQ&pp=ygUeQW5uYSBtYWhhcmFqIGJhdmF...

जोशीबुवा गोष्टीवेल्हाळ आहेत. गोष्टी रंगवून रंगवून सांगण्याची हातोटी आहे. यांनी सांगितलेला गुजरातच्या मणिभाई नावाच्या व्यापाऱ्याचा एक किस्सा आवडला. त्याला व्यापारात खोट आलेली असते. त्याच्यानं नैराश्यग्रस्त, सुसाईडल झालेला असतो. नर्मदातटी भटकत एका आश्रमात येतो. म्हणतो, 'बाबाजी, वापस बडोदा गया तो लोग मुझे मारेंगे'
तो आश्रमातला बाबाजी त्याला म्हणतो,
'नर्मदामैय्या की क्रिपा है. भांडार भरा है. जितने दिन चाहे रहो'
आसऱ्याला आलेला असतो पूर्ण खचलेल्या मनस्थितीत. आयुष्यानं झोडपून काढलेल्या, कुठेच थारा न मिळणाऱ्या माणसाला, काही काळ आसरा घेण्यासाठी असं एखादं निरपेक्ष दार उपलब्ध असणं, ही कल्पनाच भन्नाट आहे. पुढे होतं त्याचं बरं.

परिक्रमेदरम्यानचे काही चमत्कारांचे किस्से येतात यांच्या बोलण्याच्या ओघात. खरं असेल, खोटं असेल, भासही झाले असतील, माहिती नाही. पण उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काल्पनिक किस्से तयार करून सांगतायत असं वाटत नाही. कारण त्यासाठी जी धूर्तता, बनेलपणा लागतो तो काही यांच्यामध्ये दिसत नाही. दिसायला एकदमच साधाभोळा माणूस वाटतो. एक बालसुलभ निरागस भाव दिसतो चेहऱ्यावर. तोच आवडला.

तर मला ह्या चमत्कारांवर अविश्वास करू वाटेना. फार तर्कानं बघू‌ वाटेना या सगळ्याकडे. हे जे बोलतायत त्याची खिल्ली उडवू वाटेना. हे जे बोलतायत त्यामागचा 'भाव' तेवढा बघावा म्हटलं. तो लोभस वाटतो.

बाकी, फार बुद्धीनं चालणाऱ्यांनापण त्यांची त्यांची अशी ठिकाणं असतात. कठोर इंटलेक्चुअल असले तरी शेवटी माणूसपणाच्या काही गरजा असतातच. जेव्हा जगदुनियेकडून सगळीकडूनच ठोकरा बसायला लागतात, विचारधारेवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागलेला असतो, तेव्हा जरा पेस स्लो-डाऊन करण्यासाठी, चिंतन मनन करण्यासाठी, मनावरचं मळभ दूर करण्यासाठी, थोडाकाळ समविचारी लोकांसोबत राहण्यासाठी, किंवा समजा एकमेकांच्या खांद्यांवर डोकं ठेवून रडण्यासाठी, या लोकांचीपण त्यांची त्यांची ठिकाणं असतात. जेएनयू वगैरेसारखी. तसंच हे ही.

३. तिसरा व्हिडिओ, शंतनु गुणेंचा. https://m.youtube.com/watch?v=mVi7ntLfOGw&pp=ygUfc2hhbnRhbnUgZ3VuZSBuYXJ...

श्री. गुणेंचं वाचन चांगलं दिसतं आहे. डोळस/शोधक दृष्टीनं बघतात. परिक्रमा या संकल्पनेचं त्यांचं इंटरप्रिटेशन आवडलं.
मुळात 'मी' च भ्रामक आहे. तर या 'मी' च्या पायावर जे जे काही उभं आहे तेही भ्रामक च आहे. 'जीवनाच्या लयीशी तादात्म्य'. 'वैराग्याचा अंश'. वगैरे थोडी वरच्या लेव्हलची भाषा येते बोलण्यात.

यामध्ये त्यांनी एका दृश्याचं वर्णन केलेलं आहे, जे ऐकताना अंगावर शहारा आलेला.
एका पहाटे मंदिरात उठून बसल्यावर समोर नर्मदेचं विस्तीर्ण पात्र. त्यावर धुकं. सभोवताली दाट जंगल. पलीकडे पहाडांच्या रांगा. त्यावरून उगवत्या सूर्याची किरणं. आणि अशात दूरवरून कुठूनतरी नर्मदाष्टका ची लकेर उठते. आणि इकडे यांच्या शरीरात आनंदाच्या लाटा उठायला लागतात. भावविभोर, उन्मनी अवस्था. जणू याच क्षणासाठी होतं हे सगळं.!

शिवाय एक विक्राळ जटाधारी साधू यांना स्वतः रांधून, स्वतःच्या ताटात जेवू घालतो, तो एक प्रसंग. आणि एका गावात चालून चालून अंगात त्राण नाही म्हणून अक्षरशः थकून पडल्यावर त्यांना उठवून भजी खायला घालणारी बाई. हे काही प्रसंग मुळातून ऐकण्यासारखे आहेत.

मस्त पोस्ट. मी कुंटेंचं "नर्मदे हर" तीन चार वेळा वाचलेलं आहे आणि चितळेंची परिक्रमा पण ऐकली आहे. समहाऊ आता मी ह्या स्टेजमधून बाहेर पडले आणि हे मागे पडलं पण एकेकाळी नितळ आनंद आणि स्वतःशीच कनेक्ट होण्याची अनुभूती दिली आहे ह्या गोष्टींनी. सगळा अट्टाहास त्यासाठीच असतो खरेतर.

निसर्गाच्या वर्णनातून सुद्धा ती गोष्ट साध्य होते. नदी, पहाड, सूर्योदय, सूर्यास्त हे सगळं पॅकेज एकत्र आहे तेथे. शिवाय न संपणारा स्वसंवाद. रोजच्या कोलाहलात आपलाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही. म्हणून एकांत सेवावा! सॉलिट्यूड , so you can see your own mind!

हो हो भरत. अगदी ज्ञानेश्वरीत सुद्धा शांत, झाडी असलेल्या, नदीचा आवाज येणाऱ्या जागी ध्यानासाठी दर्भासनावर पद्मासनात बसा लिहिले आहे. मग ते कुठेही असले तरी काय? ते फक्त आपल्याला एकांत, स्वसंवादासाठी वाव आणि निसर्गाचे सान्निध्य मिळावे म्हणून सुचवले आहे. एकदा हे पटलं की हे विश्वची माझे घर वाटून सगळं चराचर आपलंच वाटतं आणि कुठल्यातरी विशिष्ट ठिकाणी जाऊन हा सोपस्कार करणं ही फक्त एक औपचारिकता आहे हे लक्षात येते आणि ही यात्रेची ओढच संपते. सगळं आपलंच होऊन जातं. पण ती स्टेज यायला आधी यातून जावं लागतं. आपलं अंतरंग शुद्ध झालं की कुठेही ते कनेक्शन मिळतं आणि तुम्ही सगळ्या यात्रांमधून मुक्त होता. मग तो फक्त एका प्रवासाचा अनुभव आहे.

आणि तुम्ही सगळ्या यात्रांमधून मुक्त होता. >> Happy
अस्मिता,
याबाबतीत कुठेतरी काही वाचलं होतं पूर्वी.‌ आणि मला ते पटलेलं. त्याचा आशय साधारण असा होता:
"म्हणजे जेव्हा माणूस पर्वतांवर, समुद्रावर, माळरानांवर, जंगलामध्ये‌ जातो आणि समोर अफाट विस्तार बघतो तेव्हा त्याच्या ईगो ला ते सहन होत नाही. ईगो त्या अफाटापुढं टिकाव धरू शकत नाही.‌ ईगो त्याच्याशी डीलच करू शकत नाही. त्याला ते शक्यच नसतं.
'अरे बापरे! हे तर आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे!', असं म्हणून ईगो मान टाकतो, पोबारा करतो काही काळ. त्यामुळे माणसाला आनंद होतो. परंतु यामुळे माणसाला भ्रम होतो की हा जो आनंद आहे त्याचं कारण कुठेतरी 'बाहेर' आहे. बाहेरच्या या दृश्यामुळं सूर्योदय सूर्यास्तामुळं समुद्रामुळं, नदीमुळं आपल्याला आनंद झालेला आहे. मग त्या किक साठी तो सारखा सारखा त्याच दृश्यांच्या शोधात जायला बघतो.
त्याला माहिती नसतं की आनंदाचा स्त्रोत बाहेर नसून आतच आहे. आणि या आनंदापासून वंचित ठेवणारा खरा कलप्रिटही आतच दडून बसलेला आहे.

एरव्हीच्या रूटीनमध्ये आजूबाजूला जे क्षुद्र, नेहमीचं, ओळखीचं, तेचतेच दिसतं, ते ईगोच्या आवाक्यातलं असतं त्यामुळे ईगो त्याच्यापुढं फणा काढून उभा राहू शकतो. आणि त्याखाली आनंद दबला जातो.

माणसाला जर बसल्या जागी कुठेही कधीही एका झटक्यात ईगो लोएस्ट पातळीवर नेता आला तर त्याखाली दबलेल्या आनंदाचा झरा मोकळा होतो. म्हणजे आनंद बसल्या जागी कुठेही कधीही हाताशी उपलब्धच असतो."

धनवन्ती, लिंकसाठी धन्यवाद. फोटोज चांगले आहेत त्यावरचे.

किती वर्षांनी धागा वर आला.
धनवन्ती तो धागा फॉलो करत होते. कुंटे व गुणेंचं पुस्तके वाचली आहेत
खूप सुंदर चर्चा अस्मिता आणि संप्रति! चितळ्यांची सीडी ऐकल्यावर लगेच उठून परिक्रमा करावी वाटतं होती ती इच्छा अनेक वर्षे मनात होती. बसने वैगरे कराविशी वाटली नाही. आता अस्मिता म्हणते तसं ती एक औपचारिकता वाटायला लागली आहे ओढ वाटतच नाही. मला शब्दात मांडता येत नाही पण तुम्ही दोघांनी छान मांडलंय. धन्यवाद!

संप्रति-
Here we go on a pathless path again! Happy
कैलास मानसरोवर वगैरे आपण बघतो तेव्हा ह्या ब्रह्मांडाच्या अफाट पसाऱ्यात आपण काहीच नाही हे लक्षात येते. कुठल्याही यात्रेचा हेतू तसा अहंकार कमी करून स्वीकार वाढविण्यासाठीच असतो. निसर्ग आपल्याला आपल्या सोबतचे कनेक्शन लवकर घडवितो, तेच घरी बसून ती स्थिरचित्तता येत नाही. पण हे कुठेतरी फिजिकल कनेक्शन आहे आणि तात्पुरतं ठरतं आणि चक्क ती high/ kick पुन्हा मिळावी म्हणून पुन्हा पुन्हा जावं लागतं. त्या किक साठी नसतं हे. किक म्हणजे पुन्हा इगो. त्यामुळे सगळ्या यात्रा सगळ्यांना सारखंच देत नाहीत, परत आले की पुन्हा षड्रिपु तयार. शिवाय त्याला आता आध्यात्मिक अहंकाराची जोड मिळते. हा तर सगळ्यात बेकार, कारण दिसूच देत नाही काही. "मी किती यात्रा केल्या, काय खडतर प्रवास होता. मी किती पुण्य कमावलं!" सगळ्यात वाईट इगो आहे स्पिरिच्युअल इगो. तुम्हाला ते सगळं undo , unlearn केल्याशिवाय सुटका नाही. अर्थात हे आधी दिसायला हवं. त्या साठी स्वसंवाद लागतो.

मी तर आता चक्क या मतावर आले आहे, जगातील सगळी पुस्तकं वाचली, सगळ्या यात्रा केल्या तरी स्वतःचे मन वाचता आले नाही तर तुम्हाला स्पिरिच्युॲलिटीतले ओ का ठो येत नाही. मुक्ताईने चांगदेवाला "पाटी कोरी आहे" म्हंटले ते इथे चपखल बसते. इगो कुठेही जाणार नाही, तो असणारच आहे. पण हा इगो आहे मी नाही एवढं कळाले तरी डिटॅचमेंट येऊन मोकळे होता येते. फक्त वेगवेगळे दिसले की झाले.

स्पिरिच्युॲलिटी, सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी एकच आहेत. वेगवेगळ्या पायऱ्या आहेत मनाच्या ! आनंद जरूर घ्यावा प्रवासाचा, वाचनाचा पण तो बाहेरून मिळणारा आनंद म्हणजे "तुम्ही" नाही. एवढे लिमिटेड नाहीत आपण. इगो आपल्याला "लिमिट" करतो. जो अहंकार आपण पोसतोय त्यानेच आपल्या अश्वत्थाच्या मुळाशी तांब्याच्या तारा बांधून आपलं "बोन्साय" केलं आहे. नेति नेति! Happy

मंजूताई, तुमचा धागा आहे हे पाहूनच मोकळेपणाने लिहितेय. Happy

बापरे !! किती जुना धागा वर आलाय ! सध्या मीही माहिती गोळा करत आहे नर्मदा परिक्रमेची सध्या वाचनात आलेलं अजून एक पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा हे उदयन आचार्य यांचं पुस्तक .. किंडलवर आहे.. अति अप्रतिम पुस्तक आहे त्यांचे तुनळी वर videos पण आहेत.. आणि वर कुठे मागे mention केलाय कि माहिती नाही पण भारती ठाकूर यांचं नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा हे पुस्तक
अर्थात हे सगळं खूप जुनं वर्णन आहे आता मार्गात बराच बदल झालेला आहे अनेक धरणांमुळे..
मागे मायबोलीवर त्या ह्यांनी (नाव आठवत नाहीये) धागा काढला होता इथे तरी त्याला आता ७/८ वर्ष झाली असावींत>> https://mazinarmadaparikrama.blogspot.com/ हा त्यांचा ब्लॉग

अस्मिता. >> मम!!

Pages