अन्नं वै प्राणा: (८) - (२)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ह्या विशाल पृथ्वीचे असे कितीसे आहे मला ज्ञान?
देशोदेशीची किती नगरे - किती राजधान्या...
माणसाची किती कर्तृत्वे - किती नद्या, किती सागर, किती वाळवंटे,
किती अज्ञात जीव, किती अनोळखी वृक्ष...
कितीतरी राहून गेले आहे पाहायचे
विशाल विश्वाचे हे आयोजन.
एका क्षुद्र कोपर्‍यात गुंतून राहिलेय माझे मन.
त्या क्षोभामुळेच वाचत असतो प्रवासवर्णने
अक्षय उत्साहाने
जिथे घडते एखादे चित्रमय दर्शन -
लगेच घेतो टिपून.
माझ्या ज्ञानातल्या उणिवा काढतो भरून
अशा त्या भीक मागून मिळवलेल्या धनातून.

annamvaipart81.jpg

"कुठल्यातरी फालतू पुस्तकाचा अनुवाद वाचून ती बाई आयुष्यात पहिल्यांदा भेटणार्‍या माझ्याबद्दल मत बनवूच कसं शकते?" शेजारच्या खोलीतून अनाहितेचा चढा आवाज आला म्हणून मी तिथं डोकावलो. तिचे मास्तर एका परिषदेच्या निमित्तानं कुठेशी गेले असल्यामुळे तिच्या प्रयोगशाळेत दंगा होणं साहजिक होतं, पण ती इतकी वैतागली कशामुळे, आणि कुठलं पुस्तक वाचून कोणी तिचा अपमान केला, हे काही मला कळेना. "लोकांना समोरच्यांबद्दल मतं बनवण्याची इतकी घाई का असते? काय संबंध माझा आणि तिचा? किंवा तिचा आणि माझ्या देशाचा? माझ्याबद्दल, माझ्या देशाबद्दल अशी कितीशी माहिती आहे तिला? माझा अपमान केला ते ठीक, पण एक पुस्तक वाचून माझ्या देशाचा अपमान तिनं का करावा?" अनाहिता विलक्षण संतापानं नॉनस्टॉप बोलत होती, आणि ती का संतापली आहे, हे काही मला अजूनही कळत नव्हतं.

अनाहिता मूळची इराणची. तेहरानजवळच्या कुठल्याशा गावात तिच्या वडिलांचा फर्निचर बनवण्याचा कारखाना होता. बी.एससी करण्यासाठी ती पुण्यात आली, आणि आता आमच्या प्रयोगशाळेत पोस्ट डॉक करत होती. अनाहिता विलक्षण बुद्धिमान. तिच्याशी गप्पा मारताना, वाद घालताना तिचे विचार किती स्पष्ट आहेत, हे जाणवायचं. भावनेच्या आहारी जाऊन विधानं करणं तिच्या स्वभावात नव्हतं. त्यामुळे त्या दिवशी ती का संतापली, याचं मला कुतूहल होतं. दोनेक दिवसांनंतर ती भेटली, तेव्हा मग सगळा उलगडा झाला. झालं असं की, मास्तर गावाला गेल्यामुळे अनाहितेला प्रयोगशाळेत काम करण्याची इच्छा नव्हती, म्हणून ती विद्यापीठातल्या एका मैत्रिणीकडे गेली. या मैत्रिणीच्या प्रयोगशाळेत एरवीही काम करण्याची पद्धत रूढ नसल्यानं ती अनाहितेला 'माझ्याबरोबर जरा चल बाहेर', असं म्हणत कोथरुडातल्या कुठल्याशा ब्यूटी पार्लरात घेऊन गेली. मैत्रिणीच्या शेजारी राहणार्‍या काकूंचं ते पार्लर होतं. अनाहितेला आणि तिच्या डोक्याला बांधलेल्या रुमालाला पाहताक्षणी काकूंनी 'ही कोण?' असं म्हणत चौकशी आरंभली. ती इराणची आहे, हे कळताच काकूंचा चेहरा बदलला.
'तू बुरखा नाही घालत?', काकूंनी अनाहितेला विचारलं.
'नाही'.
'इराणमध्ये?'
'तिथे गेले सुट्टीत की बाहेर जाताना हिजाब असतो. एरवी नाही.'

काकू क्षणभर घुटमळल्या आणि मग अनाहितेच्या मैत्रिणीच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. त्या मैत्रिणीचा चेहरा खर्रकन पडला. 'चल, जाऊयात आपण', असं म्हणत ती अनाहितेला खेचतच बाहेर घेऊन गेली. त्या काकूंनी नुकताच 'नॉट विदाउट माय डॉटर'चा मराठी अनुवाद वाचला होता ('गाथा इराणी' तेव्हा लिहिलं गेलं नव्हतं!). सगळ्या इराणी स्त्रिया अस्वच्छ आणि इराणी पुरुष क्रूर असतात, त्यांची नाकं शेंबडानं बरबटलेली असतात, जगात त्यांच्याइतक्या अडाणी त्याच, असा त्यांचा समज झाला होता. 'मी तुझ्या या मैत्रिणीला हातही लावणार नाहीये. ती इराणी आहे, आणि या बायका भारी अस्वच्छ असतात. काय बाई एकेकीची वर्णनं आहेत त्या पुस्तकात... गलिच्छ असतात अगदी हे लोक. आणि भारी दुष्ट. ही तुझी मैत्रीण आहे दिसायला देखणी, आणि चांगली गोरीगोमटी दिसते आहे. पण ते इथे पुण्यात. तिथे इराणमध्ये कशी राहत असेल, काय करत असेल कोण जाणे...त्यात ही मुसलमान, उगाच मी हिचे आयब्रो केले, आणि कोणी मोर्चाबिर्चा आणला माझ्या घरावर तर? नकोच ते. तू बस खुर्चीवर', असं त्या म्हणाल्या होत्या.

"मी इतकी चिडले होते ना त्या दिवशी.. त्या काकूंना काय वाटतं यामुळे खरंतर मला काही फरक पडायला नको. पण नाही होत तसं. वाईट वाटतं, आणि रागही येतो. एक पुस्तक वाचून तुम्ही माझ्या देशातल्या सगळ्या स्त्रियांबद्दल मत कसं बनवता? त्या लेखिकेला आले अनुभव तसे, आणि तिनं त्यांबद्दल लिहिलं. पण सगळ्यांनाच तसे अनुभव कसे येतील? सगळ्याच इराणी बायका शेंबड्या कशा असू शकतील? आहे आमच्या देशात डोकं, चेहरा झाकण्याची पद्धत. ज्या दिवशी ती पद्धत जाचक वाटेल, त्या दिवशी आम्ही ती झुगारू. तुम्ही कोण त्यावर टीका करून आमची कीव करणारे? आमच्या स्त्रियांच्याही काही धार्मिक भावना असतीलच की. त्यांनाही वाटत असेल त्यांच्या धर्मात जे सांगितलं आहे, त्याप्रमाणे वागावं. किंवा त्यांना सुरक्षित वाटत असेल, किंवा अगदी जबरदस्तीही होत असेल त्यांच्यावर. अनेक कारणं असतील. पण त्याबद्दल काय करायचं, हे त्या ठरवतील. एखादी अन्याय्य, अवमानकारक प्रथा त्या निमूटपणे सोसत असतील, तर ती त्यांची चूक. त्यासाठी जबाबदार त्याच, पण म्हणून तुम्ही तुमच्या खुर्चीत बसून तुमचे नियम त्यांना लावू नका. कारण तुमचं म्हणणंच बरोबर, हे कशावरून? आणि मुख्य म्हणजे आमच्या देशाची किंमत तुम्ही चादोर, हिजाब यांच्यावरून कशी करता? तेवढंच आहे फक्त इराणबद्दल बोलण्यासारखं? अनेक मुली, बायका स्वखुशीनं हिजाब, चादोर स्वीकारतात. हिजाब घालणार्‍या स्त्रिया संशोधन करतात, नोकर्‍या करतात. त्या आईबापांबरोबर राहत नाहीत. तेहरानसारख्या शहरात एकट्या राहतात. मीही इतकी वर्षं भारतात आहे, पण कोणीही आजवर माझ्या आईवडिलांना त्यावरून बोललेलं नाही. आणि तरी सगळ्या इराणी बायका मागास? आणि मला सांग, तुम्ही देता का रे स्त्रियांना मानाची वागणूक? तुमच्या देशातही दलितांवर रोज अत्याचार होतात ना? इतकं कशाला, तुमच्या देशातही तुमच्याच लोकांबद्दल तुम्ही सतत सरसकट मतं बनवता. बंगाल्यांबद्दल, दाक्षिणात्यांबद्दल, कोकणस्थांबद्दल, मराठ्यांबद्दल, मुसलमानांबद्दल तुमची ठरलेली मतं असतात. पण तुम्ही भारतीय तसेच, पाश्चिमात्य जगाला सतत पाण्यात पाहणारे आम्ही इराणीही तसेच. आणि आडनावांवरून अतिरेकी असल्याचा संशय घेणार्‍या अमेरिकेबद्दल तर बोलायलाच नको.. मजा बघ, अख्खी मानवजात, त्यांचे स्वभाव आपण बारा राशींमध्ये कोंबतो. म्हणजे लेबलं लावणं, आणि एकावरून सर्वांना जोखणं आपण किती सतत करत असतो... "

अनाहितेचं बोलणं ऐकताना मला फार वर्षांपूर्वी वाचलेली डेव्हिड कॅम्प्टनची 'अस अ‍ॅण्ड देम' ही एकांकिका आठवली. कुठल्यातरी एका माळरानावर मनुष्यप्राण्याचे दोन गट वस्तीसाठी येतात. खरं म्हणजे त्यांनी एकत्र राहायला हरकत नसते काही, दिसतात सारखेच ते. पण तरी उगाच एकमेकांशी संबंध नको, म्हणून जमिनीवर मध्ये एक रेष आखली जाते. जमिनीवरच्या धुळीतली ती रेष कायम कशी राहणार? ती सतत पुसली जाते, म्हणून त्या रेषेवर काटक्या आणून टाकल्या जातात. मग कालांतरानं काटक्यांची एक भिंतच उभी राहते. मग काही काळानंतर दगडी भिंत तिथे उभारली जाते. मग भिंतीची उंची वाढते. हळूहळू पलीकडचं दिसेनासं होतं. मग आवाजही ऐकू येणं बंद होतं. खरं म्हणजे आता दोन्ही गटांनी शांतपणे जगायला हरकत नसते. पण तसं होत नाही. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल सततचा संशय. हे पलीकडचे आपल्याविरुद्ध नक्की काहीतरी कारस्थान करत असणार. च्यायला, ऐकूही येत नाही काही पलीकडचं..संशयाचं रूपांतर भीतीत होतं. दोन्ही गट मग एकमेकांवर हल्ल्याची तयारी करतात, आणि सारं उद्ध्वस्त होतं. बचावलेल्यांना पश्चात्ताप होतो, पण आता नेहमीप्रमाणे उशीर झालेला असतो. त्या दगडी भिंती नाहीशा करणं तसं सोपं होतं, मनातल्या भिंतींचं काय?

थॉमस रो भारतात यायला निघाला तेव्हा त्याचं लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते. पण त्याला भारतात येणं भाग होतं, कारण डोक्यावर प्रचंड कर्ज होतं. भारतात येऊन व्यापाराची परवानगी मिळाली तर त्या पैशातून ते कर्ज फेडता येणार होतं. त्यामुळे इच्छा नसतानाही तो भारतसफरीला तयार झाला. प्रवासात खलाश्यांनी त्याला भरपूर त्रास दिला. या खलाश्यांमध्ये काही जन्मठेपेचे कैदीही होते. त्यांना सांभाळतासांभाळता रो थकला. अनेक खलाशी आजारी पडले, एकदोन छोटी बंडंही झाली. पण सहा महिन्यांच्या प्रवासानंतर तो सुखरूप सुरतेस पोहोचला. त्यानं बंदरावर पाय ठेवला, आणि त्याला मुघलांच्या जकात अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली, सामानाची नासधूस केली. हे प्रकरण निस्तरून तो कसाबसा बाहेर पडणार तोच जहाजावरच्या एका स्वयंपाक्यानं दारूच्या अमलाखाली एका मुघल अधिकार्‍याच्या कानाखाली आवाज काढला. मग परत मुघलांची मनधरणी करणं आलं. दिवसभराच्या कटकटींनंतर रात्री झोपायच्या तयारीत असताना त्याच्या दाराशी एक वेश्या आली. मुघलांनी आपल्या पाहुण्यासाठी तिला धाडली होती. त्या वेश्येला त्यानं परत पाठवल्यानं तिथल्या मुघल सरदाराचा अपमान झाला. 'यजमानांचा अपमान करताना लाज नाही वाटत? चालते व्हा आत्ताच्या आत्ता!' असं म्हणत त्या सरदारानं रोचं सामान बाहेर फेकायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे रो प्रचंड वैतागला. बादशाहाला भेटून आता लवकरात लवकर व्यापाराची परवानगी मिळवायची, आणि बायकोकडे इंग्लंडला परत जायचं, असं ठरवून तो कामाला लागला. पण जहांगीर बादशाह वस्ताद निघाला. त्यानं थॉमस रोला चांगलंच झुलवलं. अनेक महिने तो त्याला भेटलाच नाही. मग दरबारात प्रवेश दिल्यावर त्यानं रोला कायम उभं ठेवलं. इतर सगळे बसले असताना रो मात्र कायम उभा असे. बादशाह आपल्याला मुद्दाम त्रास देतो, हे त्याला माहीत होतं, पण तो आपल्या जनान्याची करमणूक करण्यासाठी हे प्रकार करतो, असा त्याचा समज होऊन तो अधिकच कष्टी झाला. या अपमानापुढे इथल्या पावसाळ्याचा, उन्हाचा, धुळीचा, किड्यांचा त्रास काहीच नव्हता. यामुळे झालं असं की, थॉमस रोला हा देश मनापासून कधीच आवडला नाही. त्याच्या आधी जहांगीराच्या दरबारात आलेल्या विल्यम हॉकिन्सानं इथली जीवनपद्धती मनापासून स्वीकारली होती. रोनं मात्र असं काही केलं नाही. इतर व्यापार्‍यांप्रमाणे त्याने कधी भारतीय, पांढरे, सुती कपडे घातले नाहीत. लाल, निळ्या रंगाचे, इंग्लंडहून मागवलेल्या कापडाचे सूट तो कायम घालत असे. त्याच्या पदरी जहांगीरानं दिलेला एक मुसलमान स्वयंपाकी असला तरी रोजचा स्वयंपाक इंग्रज आचारीच करत असे. खुर्चीवर बसून, टेबलावर चांदीची थाळी ठेवूनच तो जेवत असे.

suratfactory1.jpgथॉमस रोसारखेच अनुभव ब्रिटनहून भारतात आलेल्या अनेकांना आले. इथल्या हवामानाशी, वातावरणाशी, माणसांशी जुळवून घेणं त्यांना जड गेलं. पण यस्मिन देशे यदाचार: हे तत्त्व स्वीकारून त्यांनी इथल्या संस्कृतीशी नातं जोडायचा प्रयत्न केला, आणि त्यात यशस्वीही झाले. सतराव्या शतकात रोबरोबर, आणि त्याच्यानंतर आलेल्या असंख्य ब्रिटिश व्यापार्‍यांनी मुघल जीवनशैलीचा स्वीकार केला. व्यापाराच्या निमित्तानं भारतीय दलालांशी, व्यापार्‍यांशी आणि ग्राहकांशी रोजच संबंध येई. सप्टेंबर-नोव्हेंबर या धंद्याच्या टायमाला तर सुरतेच्या वखारीत भारतीयांची गर्दी उसळलेली असे. त्यामुळे ब्रिटिशांना इथली माती अंगाला लावून घेणं जड गेलं नाही. इथल्या व्यापारात त्यांना भरपूर पैसा मिळत होता. पावसाळ्यात कंपनीचा व्यापार बंद असतानाही त्यांना इथल्या व्यापार्‍यांशी खाजगी सौदे करून पैसे मिळवता येत होते. स्कर्व्ही, हत्तीपाय, मलेरिया अशा रोगांमुळे अनेकांना त्रास होत होता हे खरं, पण पैशाचं आकर्षण होतंच. कितीही अडचणी आल्या, तरी हे ब्रिटिश व्यापारी इथे टिकून राहिले, आणि मुख्य म्हणजे इथल्या चालीरीती स्वीकारण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. अल्बर्ट मँडेल्सो या जर्मन सरदारानं सुरतेच्या ब्रिटिश व्यापार्‍यांबद्दल लिहून ठेवलं आहे. १६३८ साली हा मँडेल्सो पर्शियाला गेला होता. तिथे त्याला भारतातून इंग्लंडला परतणारे तीन ब्रिटिश व्यापारी भेटले. या व्यापार्‍यांकडून भारतातल्या सुबत्तेच्या चित्तचक्षुचमत्कारिक कहाण्या ऐकल्यावर खातरजमा करून घेण्यासाठी, आणि शक्य झाल्यास पिशवीभर रत्नंमाणकं आणण्यासाठी एका दुभाषाला आणि तीन नोकरांना बरोबर घेऊन तो भारतात आला. ब्रिटिशांनी सुरतेस त्याचं स्वागत केलं, आणि मँडेल्सो तिथल्या वखारीत सहा महिने राहिला. त्यानं लिहिलं होतं - ’सुरतेस राहणारे ब्रिटिश हे अनेक बाबतींत मुघलांचं अनुकरण करतात. रोजच्या प्रार्थना ख्रिस्ती पद्धतीनं होत असल्या तरी बाकी मुघल जीवनशैलीचंच अनुसरण केलं जातं. एका मोठ्या खोलीत सर्व व्यापारी एकत्र जेवायला बसतात. मुघलाई पद्धतीचे कबाब, पुलाव, रोटी जेवणात असतात. या पदार्थांमध्ये भरपूर काळी मिरी असते, तरी हे व्यापारी चवीनं जेवत असतात. रोजच्या जेवणात कमीत कमी पंधरा मांसाहारी पदार्थ असतात. शिवाय दोनतीन गोड पदार्थही सकाळसंध्याकाळ असतात. या गोड पदार्थांमध्ये सुक्यामेव्याची खीर असतेच असते. शहरातल्या बगिच्यांमध्ये हे व्यापारी रोज संध्याकाळी फिरायला जातात. रात्री जेवणानंतर हुक्का ओढतात, किंवा बुद्धिबळ खेळतात. रोज रात्री वखारीत नाचकाम करणार्‍या स्त्रिया येतात. हातात दारूचे चषक घेऊन त्यांचा नाच बघायला व्यापार्‍यांना फार आवडतं. खरं म्हणजे या स्त्रियांचं काम फक्त नाच करणं, पण हे व्यापारी खूप पैसे बाळगून असल्यानं त्या गरीब स्त्रिया त्यांची लैंगिक भूकही भागवतात’.

सतराव्या शतकातल्या ब्रिटनमध्ये फ्रेंच खाद्यसंस्कृतीचा शिरकाव नुकताच होत होता. ब्रिटिशांच्या खानपानावर खरा प्रभाव होता तो अरबांचा. त्यामुळे पदार्थांमध्ये मसाल्यांचा भरपूर वापर ब्रिटनमध्ये प्रचलित होता. अरबांची मसाल्याच्या व्यापारावरची पकड ढिली झाल्यावर सामान्यांच्या स्वयंपाकातही मसाल्यांनी शिरकाव केला. 'द इंग्लिश हस-वाइफ'सारख्या पाककृतींच्या पुस्तकात तर चिकन पायसारखे पदार्थही असतील नसतील ते सारे मसाले घालून केलेले दिसतात. त्यामुळे बिर्याण्या, कबाब, दमपोक्ड तितर ब्रिटिश व्यापार्‍यांना आवडले यात नवल वाटण्यासारखं काही नाही. भारतीय काटेचमचे वापरत नाहीत, हातानंच जेवतात याचंही या ब्रिटिश व्यापार्‍यांना अप्रूप वाटलं नसणार. कारण ब्रिटनमध्ये काटेचमच्यांनी प्रवेश केला सतराव्या शतकाच्या सुरुवातीला. जहांगीर बादशाहाला भेटायला थॉमस कोर्येटी भारतात ब्रिटनहून चालत आला, त्याआधी तो युरपच्या सफरीवर पायी गेला होता. इटलीहून तो ब्रिटनला परतला तेव्हा त्याच्या झोळीत होते काही काटेचमचे आणि एक छत्री. थॉमस कोर्येटीनं ब्रिटिशांना काटेचमचे कसे वापरायचे, हे शिकवलं, आणि इंग्रजी भाषेला अंब्रेला हा नवा शब्द दिला.

खाण्यातल्या, खाण्याच्या पद्धतींमधल्या थोड्याशा साम्यामुळे ब्रिटिश व्यापारी भारतात लगेच रुळले, आणि त्यांनी इतरही अनेक भारतीय सवयी आपल्याशा केल्या. सुरतेत राहणारे ईस्ट इंडिया कंपनीचे हे व्यापारी भरपूर दारू प्यायचे. त्यांचं आवडतं पेय होतं ताडी. बर्नियेला ताडी पोलिश ब्रॅण्डीइतकी जहाल वाटली होती, आणि त्यामुळे ती ब्रिटिशांना आवडते, याबद्दल त्याला आश्चर्य वाटलं होतं. बंगालात तयार झालेली ताडी ब्रिटिशांना जास्त आवडायची. गोव्यातली ताडी त्यामानानं सौम्य असल्यानं बहुतकरून ती यीस्ट तयार करण्यासाठी वापरली जाई. ताडी पिऊन तर्र होणारे अनेक होते, तसंच आरोग्यासाठी उत्तम म्हणून ताडीपान करणारेही काही होते. अमुक एक गाणं ऐकलं की पोट साफ होतं, असं सांगणारे विद्वान तेव्हा नसल्यानं दुसरा दिवस आनंदात जावा, म्हणून रात्री ताडीचं सेवन करण्याचा काहींचा रिवाज होता. शिवाय ताडीनं शरीरातली उष्णता कमी होते, असा समज होता. हे फारसं खरं नसावं, कारण ’इंग्रज रात्री बेदम ताडी पितात, आणि त्यामुळे त्यांच्या शरीराची लाहीलाही होते. रात्री अंगातले कपडे उतरवून रस्त्यात, किंवा गवतावर पडलेले अनेक इंग्रज तुम्हांला सापडतील’, असं अठराव्या शतकात कॅप्टन सिम्प्सनानं त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं होतं. सुरतेला आलेल्या ब्रिटिशांनी भारतीयांकडून पान खायची सवयही उचलली. लालचुटून ओठांचे, रक्त ओकणारे आपले देशबंधू बघून सुरतेस नव्यानं दाखल होणारे ब्रिटिश व्यापारी चांगलेच दचकायचे. हळूहळू त्यांनाही मग विड्याची चटक लागायची. भारतातल्या मुघल नवाबांसारखंच जगणार्‍या या ब्रिटिश व्यापार्‍यांना मग नबॉब हे नाव मिळालं.

housenabob.jpgनबॉबांचं हे भारतीय होणं फक्त व्यसनांपुरतं किंवा कबाबबिर्याण्यांपुरतंच मर्यादित राहिलं नाही. त्यांनी इथल्या स्त्रियांशी राजरोस संबंधही ठेवले. रोनाल्ड ह्याम या ब्रिटिश इतिहासकाराच्या मते, पैसा मिळवण्याइतकंच काळ्या स्त्रियांशी संबंध ठेवणं, हे नबॉबांसाठी आकर्षण होतं. काळ्या स्त्रियांशी संभोग केल्यानं शरीरातली उष्णता कमी होते, आणि भारतातला असह्य उकाडा सहन करता येतो, असा शोध पोर्तुगिजांनी लावला होता. भारतीय स्त्रियांशी संबंध ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती म्हणून त्यांनी शाहजहाँकडे केली होती. पाहुण्यांच्या मागणीचा अव्हेर कसा करणार? त्यानं मोठ्या मनानं हिंदू स्त्रियांशी संबंध ठेवण्याची पोर्तुगिजांना परवानगी दिली. ब्रिटिशांनीही पोर्तुगिजांचाच कित्ता गिरवला. उन्हाळा सहन व्हावा, म्हणून त्यांनी स्थानिक स्त्रियांशी संबंध ठेवायला सुरुवात केली. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात नबॉबांची संख्या वाढली. यांपैकी अनेक नबॉब इथे बरीच वर्षं राहत होते. त्यांची कुटुंबं इंग्लंडात होती. अनेकांनी लग्नं केली नव्हती. शरीरसुख मिळवायचं कसं, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता, कारण ब्रिटिश स्त्रिया भारतात येणं शक्य नव्हतं. इथल्या हवामानात नबॉबच कसेबसे तग धरून होते, शिवाय ईस्ट इंडिया कंपनीत स्त्रियांना प्रवेश नव्हता. सुरुवातीला ब्रिटिशांनी पोर्तुगिजांच्या विधवांशी लग्नं केली. पण कंपनीला ते काही रुचलं नाही. मग ब्रिटिशांनी पोर्तुगिजांचं दुसरं धोरण अवलंबलं. भारतातल्या पुरुषांसाठी त्यांनी मायदेशातून स्त्रिया आणायला सुरुवात केली. कुलीन आणि इतर अशी या स्त्रियांची विभागणी केली होती. वर्षभर कंपनीनं या स्त्रियांची राहण्याची आणि जेवणाची सोय करायची, आणि या स्त्रियांनी स्वत:साठी नवरे शोधायचे, अशी योजना होती. पण या स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या भलतीच जास्त होती. १७९० साली कलकत्त्यात चार हजार ब्रिटिश पुरुष आणि फक्त दोनशे वीस ब्रिटिश स्त्रिया होत्या. एकाशी लग्न करण्यापेक्षा वेश्याव्यवसाय केला, तर भरपूर कमाई होईल, हा विचार अनेकींनी केला, आणि या सोशल इंजीनियरिंगचा पुरता फज्जा उडाला. भारतातून या स्त्रियांच्या छचोर वागण्याची तक्रार करणारी अनेक पत्रं कंपनीच्या लंडनच्या कार्यलयात गेली, आणि कंपनीनं ही योजना बंद केली. अशा परिस्थितीत नबॉबांनी इथल्या भारतीय स्त्रियांशी घरोबा करणं साहजिकच होतं.

zoffany.jpgसतराव्या आणि अठराव्या शतकात नबॉबांचा मोठा जनाना असणं, हे अप्रुपाचं राहिलं नव्हतं. अनेकांनी लग्न न करताच भारतीय स्त्रियांशी संबंध ठेवले होते, तर अनेक अधिकार्‍यांच्या आणि सैनिकांच्या एकापेक्षा अधिक बायका होत्या. भलामोठा जनाना असणं ही प्रतिष्ठेची बाब असे. हा उभयपक्षी सोयीचा मामला होता. भारतीय स्त्रियांच्या या अधिकार्‍यांकडून फारशा अपेक्षा नसत, शिवाय गोर्‍या साहेबामुळे आपोआपच त्यांना संरक्षण मिळे. नबॉबांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं शरीरसुख. त्याकाळच्या इंग्लंडात शरीरसुख घेणं, त्याबद्दल लिहिणं, बोलणं हे पाप, असंच समजलं जाई. इथे तो मामला नव्हता. शिवाय या स्त्रियांमुळे त्यांना पटकन स्थानिक भाषा, चालीरीती शिकता येत. सतराव्या शतकात इंग्लंडहून भारतात जहाजानं यायला सहा महिने लागत. लग्न करायला एखादी स्त्री तयार झालीच, तर तिला बोटीनं भारतात आणायला पाच हजार रुपये लागत. भारतीय स्त्रियांवर मात्र अगदी थोडा खर्च त्यांना करावा लागे. जेवण आणि कपडे मिळाले की त्या खूश असत. त्या संबंधांतून मूल झाल्यास आईची जात तीच मुलाची जात असे, त्यामुळे अनौरस मुलांचा, त्यातून ओढवणार्‍या धार्मिक कटकटींचाही प्रश्न नसे. या भारतीय स्त्रियांमुळे नबॉबांचा पेहराव, त्यांचं खाणंपिणं हे बर्‍यापैकी भारतीय झाले. भात, करी, लोणची हे त्यांच्या खाद्यजीवनाचा अविभाज्य अंग बनले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र नबॉबांनी भारतीय स्त्रियांशी संबंध ठेवणं हळूहळू कमी होत गेलं, कारण इंग्रज आता राज्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले होते, आणि मेमसाहेबांनी भारतात पाऊल ठेवलं होतं.

punch.jpg१६१९ साली थॉमस रो इंग्लंडास परतल्यानंतर १६४० सालापर्यंत सुरत हे ब्रिटिशांचं भारतातलं प्रमुख ठाणं होतं. शत्रूंचा त्रास आणि भारतातला व्यापार वाढला, तसं इतरत्रही कुठे ठाणं उभारावं, असा विचार पुढे आला. फ्रान्सिस डे या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यानं एका हिंदू राजाकडून जमीन भाड्यानं घेतली, आणि तिथे सेंट जॉर्जच्या नावानं किल्ला उभारला. फ्रान्सिस डेचा तिथल्याच एका तमिळभाषक मुलीवर जीव जडला होता, त्यामुळे त्यानं तिथे जास्तीत जास्त काळ राहायला मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू केले. या ठाण्यातून होणारा व्यापार वाढला, आणि मग तिथली लोकसंख्याही वाढली. आजूबाजूची खेडी या नव्या शहरात सामावली गेली. हे मद्रास शहर पुढे ब्रिटिश साम्राज्याचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. १६६१ साली दुसर्‍या चार्ल्सनं कॅथरिनशी लग्न केलं. त्याला हुंड्यात मिळालं बॉम्बे. चार्ल्सच्या तिजोरीत खडखडाट होता. अगदी स्वत:वर खर्च करायलाही पैसे नव्हते, म्हणून त्यानं ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे भाड्यानं दिलं. कंपनीनं या उत्कृष्ट बंदराचा पुरेपूर वापर करून घेतला. हळूहळू बॉम्बेची लोकसंख्या वाढली, आणि ब्रिटिशांचं भारतातलं ते महत्त्वाचं ठाणं बनलं. पुढे गंगेच्या खोर्‍यात ब्रिटिशांचा वापर वाढला, आणि १६९० साली हुगळीच्या काठी फोर्ट सेंट विल्यम्स बांधण्यात आला. पोर्तुगिजांचं त्या परिसरात अगोदरच ठाणं होतं. गोविंदपूर, सुतानता आणि कालिकाता अशी तीन गावं पुढे एकत्र आली, आणि कलकत्ता या महानगराचा जन्म झाला. ब्रिटिशांच्या वैभवाचं हे प्रतीक पुढची अनेक दशकं पूर्वेचं पॅरिस म्हणून ओळखलं गेलं. सतराव्या शतकात ब्रिटिशांनी या मोठ्या शहरांचा पाया घातला तरी त्यांना केवळ पैशात रस होता. मसाल्यांबरोबरच आता कापसाचा व्यापार तेजीत होता. भारतात आपलं साम्राज्य उभं करावं, इथल्या जनतेवर राज्य करावं, असं त्यांना अजिबातच वाटत नव्हतं. अठराव्या शतकात मात्र परिस्थिती बदलली. मुघलांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. भारतीयांना सतत गुलामगिरीची सवय झालेली आहे, इतरांचे हुकून ऐकणं त्यांच्या रक्तातच आहे आणि ते अतिशय दैववादी आहेत, सध्या मुघलांची सत्ता कमकुवत झाल्यानं आपलं राज्य इथे प्रस्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे, हे रॉबर्ट क्लाइव्ह यानं ओळखलं, आणि भारतात ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला सुरुवात झाली.

pno.jpgब्रिटिशांची सत्ता जसजशी मजबूत होत गेली तसं आपलं वांशिक वर्चस्व राखणं त्यांना अत्यंत गरजेचं वाटू लागलं. इथले ब्रिटिश आता राज्यकर्ते होते. भारतात येणारा प्रत्येक ब्रिटिश हा व्यापारी असतो आणि आपल्याशी मिळूनमिसळून वागतो, हा भारतीयांनी करून घेतलेला समज दूर करणं आता गरजेचं होतं, नाहीतर त्यांचा काही वचकच राहिला नसता. राज्यकर्त्यांच्या भूमिकेत ब्रिटिश शिरले आणि संपूर्ण नवी शासनव्यवस्था त्यांनी भारतात स्थापन केली. या शासनव्यवस्थेबरोबरच आपली मूल्यव्यवस्थाही त्यांनी आणली, आणि या व्यवस्थेचे रक्षक म्हणून तरुण प्रशासकीय व लष्करी अधिकारी भारतात आले. जसजसा नवा भूप्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला, तसे हे तरुण अधिकारी बॉम्बे, कलकत्ता, मद्रास ही मोठी शहरं सोडून लहान गावाशहरांमध्ये जाऊन राहू लागले. या अधिकार्‍यांची जीवनपद्धती नबॉबांपेक्षा अर्थातच फार वेगळी होती. राज्यकारभार चालवणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे हे तरुण अधिकारी देशी स्त्रियांच्या नादी लागणं साम्राज्याच्या दृष्टीनं योग्य नव्हतं. साहजिकच गोर्‍या स्त्रियांची मागणी वाढली आणि तसा पुरवठाही होऊ लागला. मजा म्हणजे, साम्राज्याच्या उभारणीसाठी ब्रिटिश तरुण परदेशी गेल्यामुळे ब्रिटनमध्ये पुरुषांचा तुटवडा निर्माण झाला होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमध्ये १००० पुरुषांमागे स्त्रियांची संख्या होती ११५०. शिवाय इंग्लंडात तसंही लग्न न झालेल्या / केलेल्या स्त्रियांचं आयुष्य फार सुखकर नव्हतं. समाजात त्यांना फारसा मान मिळत नसे, कारण उत्तम नवरा शोधणं आणि टुकीनं संसार करणं हे मुलींचं आद्यकर्तव्य होतं. भारतातलं आयुष्य कष्टप्रद असलं तरी इथे लग्न जुळण्याची शक्यता असे. शिवाय भारतातले अधिकारी दूरदेशी राहून ब्रिटिश साम्राज्यासाठी झटत होते. एक महान राष्ट्रकार्यच होतं ते. साम्राज्यविस्ताराच्या पवित्र कार्यात सहभागी झालेल्या शूर, हुशार ब्रिटिश पुरुषांची सेवा करणं, हे या स्त्रियांसाठी भाग्याचं होतं. भाजून काढणारा उन्हाळा, वाईट रस्ते, अस्वच्छता, धूळ, रोगराई, अडाणी जनता यांना रोजच तोंड द्यावं लागलं, तरी देशाची सेवा करायला मिळत होती. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात भारतात येणार्‍या मेमसाहेबांची संख्या चांगलीच वाढली. सोळाव्यासतराव्या वर्षी लग्न करून किंवा लग्नासाठी या स्त्रिया भारतात येत. अनेकदा जहाजावरच ही लग्नं जुळत. केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात यावं लागत असल्यानं, हा प्रवास लग्न जुळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरे. १८६९ साली सुएझ कालवा वाहतुकीसाठी उघडा झाला, आणि इंग्लंडहून भारतात येणं सुकर झालं. उत्तम प्रतीची, आरामदायी जहाजं बांधली गेली, आणि भारतात येणार्‍या मेमसाहेबांची संख्या चांगलीच वाढली. पी अ‍ॅण्ड ओ लायनरांमधली केबिनं प्रवासाच्या वर्षभर आधी आरक्षित व्हायची. प्रवासात ऊन टाळण्यासाठी उत्तम केबिन मिळावं, म्हणून बड्या अधिकार्‍यांचे वशिले लावले जायचे. [भारतात येताना पोर्टसाइडची केबिनं, आणि इंग्लंडला जाताना स्टारबोर्डच्या बाजूच्या केबिनांना (Portside cabins when Outward bound, Starboard side when Homeward bound) मागणी असायची. यातूनच इंग्रजी भाषेला पॉश हा (POSH) नवा शब्द मिळाला.]

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निम्म्या अँग्लो-इंडियन स्त्रियांचा जन्म भारतात झाला होता. (अँग्लो-इंडियन या शब्दाबद्दल थोडं स्पष्टीकरण. भारतात राहणारे ब्रिटिश या अर्थी अँग्लो-इंडियन हा शब्द वापरला जात असे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा वापर प्रचलित होता. युरोपीय व भारतीयांच्या मिश्र संततीला युरेशीय असं म्हणत असत.) वयाच्या सातव्या वर्षी शिक्षणासाठी त्यांना मायदेशी पाठवलं जाई, आणि सतराव्या वर्षी त्या भारतात परतायच्या. लग्न करून, किंवा लग्न करण्यासाठी. दहा वर्षं ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर अचानक भारतात परतणं, हे त्यांच्यासाठी जरा त्रासदायकच ठरायचं. लहानपणीच्या भारतातल्या आठवणी पुसट झालेल्या असायच्या. आईवडील, आया, नोकर आणि नवरा यांच्याशी ओळख करून घ्यावी लागे. घर बदललेलं असे. गाव बदललेलं असे. शिवाय सांस्कृतिक वातावरणातला बदल होताच. त्यांच्या आधीच्या पिढीत भारतात जन्मलेल्या, आणि वाढलेल्या स्त्रियांचं प्रमाण फार कमी होतं. या स्त्रिया लग्न करण्यासाठीच भारतात येत आणि त्यांना उपहासानं फिशिंग फ्लीट असं म्हटलं जाई. भारतात येणार्‍या या मुली पुरेशा घरगुती असाव्यात, अशी इथल्या अँग्लो-इंडियन तरुणांची अपेक्षा असे. छंद म्हणून घोडेस्वारी, किंवा नेमबाजी, टेनिस वगैरे चालवून घेतलं जाई, पण मुलीला शिवणकाम, पुष्परचना, संगीत, चित्रकला यांत रस आहे की नाही, याची व्यवस्थित चिकित्सा केली जाई. मुलीनं कामसू असावं, तिला घर नीट सांभाळता यायला हवं, अशा नवर्‍यांच्या अपेक्षा असत, त्यामुळे या मुली भारतात येताना अतिशय धास्तावलेल्या असत. काहींची लग्नं जहाजावरच जुळत. उरलेल्यांना मग भारतात प्रयत्न करावे लागत. भारतात नवरा मिळाला नाहीच, तर वर्षभरात मायदेशी परत जावं लागे. अशा मुलींना रिटर्निंग एम्प्टीज म्हणत.

भारतात पाय ठेवताक्षणी समोर दिसणार्‍या गर्दीमुळं ब्रिटिश तरुणी बावचळून जात. बॉम्बे आणि कलकत्त्यातल्या सुरेख, युरोपीय शैलीतल्या इमारतींमुळे भीती थोडी कमी झाली, तरी आपला पुढचा प्रवास अतिशय खडतर आहे, याची त्यांना चांगली कल्पना असायची. वाईट रस्ते, न सोसवणारं हवामान, रोगराई हे तर होतंच, पण 'संडासात, स्वयंपाकघरात, उशीखाली असं कुठेही साप निघतात', 'रात्री दरोडेखोर प्रवाशांना लुटतात, आणि बायकांवर बलात्कार करतात', 'गेल्या वर्षी पोटात कळा सुरू झाल्या, नेमके हे नव्हते तेव्हा, मग बैलगाडीत घालून मला नोकरांनी दवाखान्यात नेलं...वाटेतच बाळंत होताहोता वाचले मी', असं अनेकींकडून ऐकलेलं असायचं. शिवाय भारतीय बेअक्कल, नीतिशून्य असल्यानं त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी साहेबांवर आणि मेमसाहेबांवर होती. ब्रिटिशांइतकीच उच्च नीतिमूल्य अंगी बाणवणारी प्रजा त्यांना निर्माण करायची होती. भारतात नवं ब्रिटन उभारण्याची ही वाढीव जबाबदारी पार पाडण्यासाठी मेमसाहेब ब्रिटनहून सोफे, वॉशस्टॅण्ड, आरसे, कपाटं असं सगळं बरोबर घेऊन येत. याशिवाय बरोबर असे ती भारतात राहायला सुरुवात करण्यासाठी आणि नंतरही उपयोगास येतील अशा पुस्तकांची एक ट्रंक.

annam813.jpg

व्हिक्टोरिअन इंग्लंडात फ्रेनॉलॉजी या (छ्द्म)विज्ञानाला डोक्यावर घेणारे अनेक होते. या शास्त्रात कवटीचं माप, मेंदूचा आकार आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध लावला जातो. या फ्रेनॉलॉजीचा आधार घेऊन गोर्‍या स्त्रिया आणि सारे कृष्णवर्णीय यांची बौद्धिक क्षमता गोर्‍या पुरुषांपेक्षा कमी असते, असं मत अनेकांनी मांडलं होतं. अनेकांनी ते स्वीकारलंही होतं. त्यामुळे स्त्रीचं खरं स्थान घरातच, असं मानणारा एक फार मोठा वर्ग होता. स्त्रीनं घरकाम करणं, हे देशाच्या प्रगतीसाठी गरजेचं आहे, असा या वर्गाचा समज होता. ब्रिटिश स्त्रीच्या नैतिक आचरणाबद्दलचा, साम्राज्याप्रतीच्या कर्तव्यभावनेबद्दलचा आग्रह एकोणिसाव्या शतकात कळसाला पोहोचला होता. त्यानुसार तत्कालीन ब्रिटिश समाजात दोन वर्तुळं होती. घराबाहेर पडून, काम करून राष्ट्रउभारणीस काम करणार्‍या पुरुषांचं एक वर्तुळ, आणि घरी राहून जेवणंमुलं करणार्‍या स्त्रियांचं दुसरं वर्तुळ. अर्थात घरी राहून जेवणंमुलं करण्यात कमीपणा मानण्याचं काही कारण नव्हतं, कारण दिवसभर घरकाम करून या स्त्रिया पैशाची बचत करत होत्या. या स्त्रियांमुळे पुरुषांना लोणी, जॅम, वाइन पैसे देऊन बाजारातून विकत आणावं लागत नव्हते. पण सार्‍याच स्त्रिया काही पुरेशा घरगुती नसत. घरकाम कसं करावं, हे काही त्यांना नीट ठाऊक नसे. पण राष्ट्रउभारणीसाठी गृहकृत्यदक्ष असणं तर अत्यावश्यक होतं. पुरेशा घरगुती नसणार्‍या स्त्रियांच्या मदतीसाठी मग असंख्य पुस्तकं लिहिली गेली. 'माय लेडी - हेल्प', 'द प्रॅक्टिकल हाउअसवाइफ' (आर. के. फिलीप), 'अ गाइड फॉर डोमेस्टिक हाउअसकीपिंग' अशी शेकड्यानं पुस्तकं प्रसिद्ध झाली. 'मॅगझिन ऑफ डोमेस्टिक इकनॉमी', 'इंग्लिशवुमन्स डोमेस्टिक मॅगझिन', 'लेडिज ट्रेझरी मॅगझिन' अशा अनेक मासिकांमधून स्त्रियांना घरकामाबद्दल मार्गदर्शन करणारे लेख नियमितपणे प्रकाशित होऊ लागले.

household words.jpgएकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीनं दिवसातला बराचसा वेळ स्वतःसाठी घालवावा, अशी टूम निघाली. आता घरातली कामं करायची म्हटल्यावर स्वतःसाठी वेळ कसा उरणार? मग नोकरांकडून कामं कशी करून घ्यावीत, हे शिकवणारी पुस्तकं आली. स्वयंपाक्यांसाठी पाककृतींची पुस्तकं लिहिली गेली. पण त्या काळात सर्वांनाच घरी नोकर ठेवणं परवडणारं नव्हतं. शिवाय पुरुष नोकरांवर टॅक्स होता. प्रत्येक पुरुष नोकरामागे एक गिनी दर महिन्याला भरावी लागत असे. म्हणून स्त्रियांनी पटापट काम आटपून स्वतःसाठी वेळ कसा राखून ठेवावा, हे सांगणारी पुस्तकं आणि मासिकं निघाली. या मासिकांमध्ये महत्त्वाचं होतं ते चार्ल्स डिकन्सचं 'हाउसहोल्ड वर्डस्' हे नियतकालिक. या नियतकालिकात वेळोवेळी स्त्रियांना घरकामात उपयोगी पडतील असे, त्यांना बाजारात उपलब्ध झालेल्या नवनव्या उपकरणांची माहिती देणारे, पार्ट्यांमध्ये काय रांधायचं, काय नेसायचं, टेबल कसं वाढायचं, हे सांगणारे लेख नेहमी प्रसिद्ध होत असत. हे एवढं साहित्य कमी होतं म्हणून की काय, इझबेला बीटनचं 'मिसेस बीटन्स बूक ऑफ हाउसहोल्ड मॅनेजमेंट' हे गृहव्यवस्थापनशास्त्राचं बायबल प्रत्येक गृहिणीकडे असेच.

cookbook.jpgभारतात येताना ब्रिटिश तरुणी ही पुस्तकं, मासिकं घेऊन येत. पण त्यांना त्यांचा तसा मर्यादित उपयोग होई. कारण त्या पुस्तकांमधले खास युरोपीय पदार्थ भारतात उपलब्ध असणारं साहित्य वापरून बनवणं कठीण असे. शिवाय नोकरांचे स्वभाव वेगळे, जीवनशैली वेगळी. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर काही अनुभवी अँग्लो-इंडियनांनी मग गृहिणींची ही अडचण ओळखून खास पुस्तकं लिहिली. या पुस्तकांमध्ये भारतात सहज मिळणारं साहित्य वापरून करायचे पदार्थ असत, बाजारातून काय आणि किती वाणसामान आणायचं, त्यांची किंमत किती, हे धडे असत. या पुस्तकांच्या शीर्षकांमध्ये हे पुस्तक कुठल्या प्रेसिडेन्सित राहणार्‍या गृहिणींसाठी उपयुक्त आहे, ते स्पष्ट केलेलं असे. काही पुस्तकं बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास या तिन्ही प्रांतांमध्ये चालू शकत असे. कर्नल केने-हर्बर्ट, एलिझबेद क्रॉफर्ड विल्किन, जी. एच. कूक, सर फ्रान्सिस कोल्चेस्टर-विमिस यांची खास भारतासाठीची पाककृतींची पुस्तकं चांगलीच गाजली. हे झालं पाककृतींबद्दल. पण नोकरांचं काय? भारतात मेमासाहेब स्वयंपाकघरात जाऊन साहेबासाठी स्वयंपाक करण्यासाठी आल्या नव्हत्या. घरातली काम करण्यासाठी घरात असंख्य नोकर होते, आणि या नोकरांशी वागायचं कसं, त्यांच्याकडून काम करून घ्यायची कशी, हे सांगणारं कोणीतरी हवं होतं.

फ्लोरा अ‍ॅनी स्टील आणि ग्रेस गार्डिनरच्या 'द कम्प्लिट इंडियन हाउसकीपर अ‍ॅंड कूक' या भन्नाट पुस्तकानं ही गरज पूर्ण केली. १८६७ साली स्टीलबाई भारतात आल्या. त्यांनी लिहिलेलं भारतीय गृहव्यवस्थापनशास्त्रावरचं हे पुस्तक त्यांच्या भारतातल्या बावीस वर्षांच्या वास्तव्याचं फलित होतं. कोठीघरात कुठल्या वस्तू हव्यात, नोकरांवर सत्ता कशी गाजवायची, त्यांना किती पगार द्यायचा, कुठल्या गावी कुठली वस्तू उत्तम मिळते, त्यांच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये किमती किती, लहान मुलं कशी सांभाळायची, साप, कुत्रा चावला तर काय करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात होती. याच धर्तीवर असंख्य हॅण्डबुकं नंतर लिहिली गेली. मजा म्हणजे, अनेक हॅण्डबुकांमध्ये खास नोकरांसाठी स्वतंत्र मजकूर असे. नोकरांना इंग्रजी वाचता येत नसल्यानं उर्दू, तमिळ, बंगाली अशा भाषांमध्ये नोकरांसाठीच्या या सूचना आणि पाककृती असत. मेमसाहेब नोकरांना समजवून थकल्या तर नोकर स्वतः वाचून मेमसाहेबांना काय हवंनको हे जाणून घेऊ शकतील, या हेतूनं हा नोकरांसाठीचा खास विभाग असे.

नव्यानं आलेल्या ब्रिटिश तरुणींना याशिवाय मदत होई ती भारतात राहून घेतलेल्या, आलेल्या अनुभवांना लिहून काढणार्‍यांची. हजारेक वर्षांपूर्वी स्कॉटलंडहून भारतात आलेल्या सिंघेल्म नावाच्या कुणा पुरुषानं आपले अनुभव अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकलात लिहिले होते. मग 'पुस्पामाजि पुस्प मोगरी' लिहिणार्‍या फादर थॉमस स्टिफन्स यांनीही आपले अनुभव लिहून काढले. थॉमस रो, विल्यम हॉकिन्स, पाद्रे ओव्हिंग्टन यांच्यापासून ते फॅनी पार्क्स, 'व्हाइट मॅन्स बर्डन'बद्दल सातत्यानं लिहिणार्‍या मॉड डायव्हर, हॅरिएट टायटलर, इसोबेल सेव्हरी, जोसेफिन रॅन्सम, एमिली एडन, जॉर्ज अ‍ॅटकिन्सन यांच्यापर्यंत असंख्य ब्रिटिशांनी भारतातलं आपलं वास्तव्य शब्दबद्ध केलं. भारतात राहिल्यावर अनुभव लिहून काढणं व्हिक्टोरिया राणीनं सक्तीचं केलं की काय, अशी शंका घेण्याइतपत या अनुभवकथनांची संख्या प्रचंड आहे. मजा म्हणजे अनेक अनुभवकथनांची शीर्षकं 'अ सोल्जर इन इंडिया', 'द इंग्लिशवुमन इन इंडिया', 'अ‍ॅन इंग्लिशवुमन इन इंडिया', 'अ कर्नल्स स्टे इन इंडिया' अशी आहेत. अनेक लेखकांनी, लेखिकांनी आपली खरी नावं न देता 'अ‍ॅन ओल्ड रेसिडेंट ऑफ मद्रास', 'अ थर्टीफाइव्ह इयर ओल्ड रेसिडेंट' अशी दिली आहेत. भारतातले लोक, इथले नोकर, त्यांच्या चालीरीती यांच्याबद्दल अतिशय विस्तारानं, पण बव्हंशी वर्णवर्चस्ववादी, पूर्वग्रहदूषित असं लेखन या पुस्तकांत वाचायला मिळतं. एखाददुसर्‍या अनुभवावरून तमाम भारतीयांबद्दल अनुमान करणं, हेही या पुस्तकांचं वैशिष्ट्य.

ही अनुभवकथनं किंवा पाककृतींची, गृहव्यवस्थापनशास्त्राची पुस्तकं महत्त्वाची ठरतात ती त्यांतून दिसणार्‍या अँग्लो-इंडियन जीवनपद्धतीमुळे. विशेषतः भारतातले नोकर, त्यांच्या कामांची विभागणी, मेमसाहेबांचं आणि त्यांच नातं, हे विलक्षण आहे.

servants1885.jpg

servants2.jpgअठराव्या शतकात ब्रिटिश व्यापार्‍यांचे नबॉब झाले, आणि नवाबाला साजेसा नोकरांचा ताफा त्यांनी बाळगायला सुरुवात केली. ब्रिटिशांचा भारताशी, भारतीय संस्कृतीशी जो काय संबंध येई, तो या नोकरांमार्फत असे. साहेबांना आणि त्यांच्या मेमसाहेबांना इकडचं पान तिकडे करावं लागू नये, याची सगळी सोय भरपूर पैसा असल्यानं झाली होती. भल्यामोठ्या ताफ्यातल्या प्रत्येक नोकराला स्वतंत्र काम नेमून दिलेलं असे. साहेबांच्या पायात जोडे चढवायला एक नोकर असे, मेमसाहेबांचे केस विंचरायला एक मोलकरीण असे. त्यांचा रुमाल जमिनीवर पडला तर तो उचलण्यासाठी त्या टाळी वाचून एखाद्या नोकराला बोलवत. प्रत्येक नोकर त्याला नेमून दिलेलं काम करत असे. हे काम अर्थातच त्याच्या जातीवर अवलंबून असे. अनेक नोकरांच्या हाताखाली त्यांचे साहाय्यक राबत असत, आणि त्यामुळे प्रत्येक घरी असलेल्या नोकरांची संख्या प्रचंड होती. फिलीप फ्रान्सिस आणि त्याचा चुलतभाऊ वॉरन हॅस्टिंगाच्या काळात कलकत्त्यात राहत असत. या दोघांची काम करण्यासाठी त्यांच्या घरी सत्तर नोकर होते. फॅनी पार्क्सच्या पदरी पन्नास तर विल्यम हिकी या तशा गरीब अधिकार्‍याकडे त्रेसष्ट नोकर होते. काही कुटुंबांमध्ये तर शंभराहून अधिक नोकर असत. यात खानसामा, बावर्ची, खिदमतगार, न्हावी, शिंपी, माळी, गवळी, चांभार, पंखेवाला, आया, धोबी, सुतार, भोई, दरवान, चोबदार, हुजर्‍या, मसालची, मेहतर, भिश्ती, आबदार, हुकाबरदार, माहुत, कुली, चपराशी यांचा समावेश असे. घरात घोडे असतील, तर त्या घोड्याची देखरेख करायला किमान चार नोकर असत. नव्यानं भारतात दाखल झालेल्यांना इतके नोकर एकावेळी बघण्याची सवय नसे. यातून मग काही गमती घडत. लॉर्ड लिटन यांच्या शासकीय निवासस्थानी तीनशे नोकर होते. यांपैकी शंभर स्वयंपाकी होते. हे सारे नोकर पांढर्‍याशुभ्र गणवेशात वावरत असत. सतत आजूबाजूला नोकरच नोकर पाहून लिटनसाहेब जाम वैतागत. 'आमच्या घरात जिकडे पाहावं तिथे नोकर असतात. रात्री जेवणानंतर जरा व्हरांड्यात फिरावं म्हटलं तर अंधारातून अचानक तिघंचौघं उगवतात, आणि मागेमागे फिरतात. उद्या जीव द्यायला मी मागच्या दारानं पळून जायला लागलो तरी शिंचे माझ्या मागे येतील, मला काय हवंनको विचारायला', असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. या लिटनसाहेबांनी एकदा एका मेजवानीप्रसंगी कुठल्याशा संस्थानाचा मांडलिक राजा समजून आपल्या मुख्य जमादारालाच मिठी मारली होती.

मूठभर साहेब ज्याप्रमाणे तमाम भारतीयांवर राज्य करतात, त्याचप्रमाणे मेमसाहेबांनी आपल्या नोकरांवर सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षा असे. कुठल्या कामासाठी किती नोकर हवेत, कुठलं काम कोणी करायचं, नोकरांना पगार किती द्यायचा, त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं, त्यांच्या हातून चुका झाल्या तर त्यांना काय शिक्षा द्यायची, अशा अनेक विषयांबद्दल अर्थातच गाइडबुकांमध्ये आणि अनुभवकथनांमध्ये मार्गदर्शन केलेलं असे. या पुस्तकांमुळे भारतभरातल्या अँग्लो-इंडियन घरांमध्ये नोकरांच्या व्यवस्थापनाची एक समान पद्धत रूढ झाली होती.

khansamashopping.jpgदुभाष किंवा सरकार हा साहेबाचा, आणि मेमसाहेबांचाही मुख्य सेवक. दुभाषाचं प्रस्थ मुख्यतः मद्रास प्रांतात होतं. साहेब गावात आला की त्याला घर शोधून देणं, तो अविवाहित असेल, तर त्याच्यासाठी एखाद्या मैत्रिणीची व्यवस्था करणं, खरेदी कुठे करावी, याची माहिती देणं, अशी कामं तो करत असे. कामाचा मोबदला म्हणून त्याला पाच टक्के कमिशन मिळत असे. बॉम्बे आणि कलकत्ता इलाख्यांमध्ये मात्र सर्वांत महत्त्वाचा असे तो खानसामा. घरातल्या सर्व नोकरांचं नेतृत्व खानसाम्याकडे असे. नोकरांवर देखरेख करणं हे त्याचं मुख्य काम. त्याच्या हुकुमाखाली कडक शिस्तीत सगळी कामं व्हावीत, अशी मेमसाहेबांची अपेक्षा असे. खानसाम्याला उत्तम स्वयंपाक करता येई. केक, जॅम, पेस्ट्री, जेली असे पदार्थ करण्याची जबाबदारी त्याची. मेजवानीच्या प्रसंगी, किंवा घरी कोणी महत्त्वाचे पाहुणे आल्यास त्यांची खातिरदारीही खानसामा करी. साहेबाची महत्त्वाची पत्रं पोस्टात टाकणे, शेजारीपाजारी घडलेल्या काही खास गोष्टी मेमसाहेबांच्या कानी घालणे, एखाद्या नोकरानं शिस्त राखली नाही, तर मेमसाहेबांना सांगून त्याला शिक्षा करणे किंवा कामावरून काढणे इत्यादी त्याच्या कामाचा भाग असत. रोज घरात लागणार्‍या वस्तू बाजारातून आणण्याचं कामही खानसाम्याकडे सोपवलं जाई. मेमसाहेबांकडून पैसे घेऊन तो बाजारात जाई, सामान खरेदी करी. मात्र हे सामान खांद्यावर वाहून आणायला त्याच्या हाताखाली खास कुली असे. बाजारातून आणलेलं सामान हाती घेणं हे खानसाम्याच्या शान के खिलाफ असे. घरातली महत्त्वाची कामं तो करत असल्यामुळे खानसाम्याला पगारही सर्वांत जास्त मिळे. काही खानसाम्यांना तर महिना पंचवीस रुपये पगार असे.

cook.jpgखानसाम्याच्या खालोखाल असे स्वयंपाकी. क्वचित त्याला खानसाम्यापेक्षा जास्त पगार असे. काही अँग्लो-इंडियन कुटुंबांमध्ये एकाच कुटुंबातील स्वयंपाकी वर्षानुवर्षं स्वयंपाक करत असत. घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, स्वयंपाकाची पद्धत माहीत झाल्यामुळे मेमसाहेबही दुसरा कोणी स्वयंपाकी आणण्याच्या भानगडीत पडत नसत. मात्र चांगला, स्वच्छ स्वयंपाकी मिळणं महाकठीण, अशीच असंख्य मेमसाहेबांची भावना असे. रोज सकाळी मेमसाहेब खानसाम्याला आणि स्वयंपाक्याला बोलावून घेऊन दिवसभराचा मेन्यू सांगत. पाहुणे येणार असतील, तर त्यांच्यासाठी कुठले खास पदार्थ करायचे, ते सांगत. मग मेमसाहेब स्वयंपाकासाठी लागणारे जिन्नस कोठीघरातून काढून देत. काहीजणी खानसाम्यानं बाजारातून आणलेल्या भाज्या, चिकन, मासे नीट तपासून मग स्वयंपाक्याच्या हवाली करत. मेमसाहेब आपल्याला खानसाम्याच्या मार्फत आदेश देतात, हे अनेक स्वयंपाक्यांना आवडत नसे. पण मेमसाहेबांना हे सांगायचं कसं, हा मोठा प्रश्न होता. अर्थात स्वयंपाक्याशी मेमसाहेबांनी थेट संवाद साधला, तरी त्यांना स्वयंपाकात चूक सापडणारच नाही, याची काही खात्री नसे. मुळात अनेक स्वयंपाक्यांना युरोपीय पदार्थांशी ओळख नसे. स्वयंपाकघरात जाऊन मेमसाहेबांनी स्वयंपाक्यांना शिकवणं, हे ब्रिटिश शिस्तीत बसत नसे. त्या मग स्वयंपाक्याला अमुक एक पदार्थ कसा करायचा, हे तोंडी सांगत, आणि तो पदार्थ बिघडला की वैतागत. ’तुम्हांला तुमच्या स्वयंपाक्याकडून चांगला स्वयंपाक करून घ्यायचा असेल, तर आधी त्याच्याशी मैत्री करा’, असं कर्नल केमी-हर्बर्टनं लिहिलं होतं. ’तुमच्या स्वयंपाक्याला तुमच्याबद्दल आपुलकी वाटायला हवी. व्होल ओ व्हाँ आ ला फिनासिएर, क्रामुस्की ऑ व्हित्र, सुप्रेम द व्होलय असे पदार्थ तुम्हांला पाटण्यात तुमच्या टेबलावर हवे असतील, तर त्या बिचार्‍या स्वयंपाक्याला जरा दयामाया नको का दाखवायला?’

स्वयंपाक्याशी संवाद साधण्यासाठी स्थानिक भाषा शिकणं अत्यावश्यक आहे, अस्खलित बोलता आलं नाही तरी चालेल, निदान खाद्यपदार्थांची, फळभाज्याधान्याची स्थानिक नावं तुम्हांला यायलाच हवीत, असं अनेक अनुभवी अँग्लो-इंडियन सांगत असत. ’भारतात आल्याक्षणी हिंदी, बंगाली किंवा तमिळ या भाषा शिकायला सुरुवात करा. या भाषा येत नसतील, तर राज्यकारभारात तुम्हांला काही अडचण येणार नाही. पण घरातलं कामकाज नीट चालावं, म्हणून स्थानिक भाषा तुम्हांला यायलाच हवी. ती येत नसेल तर तुम्ही तुमच्या नोकरांशी संवाद साधू शकणार नाही. मग तुमचे नोकर तुम्हांला हातोहात फसवतील. भारतात पंधरावीस वर्षं राहूनही स्थानिक भाषा अजिबात न बोलणारे अनेक महाभाग मी पाहिले आहेत. त्यांना या गोष्टीचा वर अभिमानही वाटतो. पण त्यांचे नोकर त्यांना किती लुबाडतात हे त्यांना कळलं, तर त्यांचा हा अभिमान क्षणार्धात नष्ट होईल', असं एमा रॉबर्टनं लिहिलं होतं. स्वयंपाक्यालाही इंग्रजी भाषा न येण्यामुळं मात्र अनेकदा गमतीचे प्रसंग उद्भवत. लाइफ इन द मोफस्सल या पुस्तकात ग्राहमबाईंनी एक किस्सा सांगितला आहे -

आमचा स्वयंपाकी इंग्रजी बोलतो, असा आमचा समज होता. आमची ओळख होऊन जेमतेम दोनच दिवस झाल्यानं त्याच्या इंग्रजीची खातरजमा आम्ही केली नव्हती. त्या दिवशी सकाळी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की, ’कोठीघरात काही एकदोन वस्तू नाहीत, त्या लगेच युरोपीय दुकानातून आणायला हव्यात’. मी पेन आणि कागद घेऊन यादी करायला बसले.
’हं..सांग.’
’मकरकुर्मा.’
’काय?’
’मकरकुर्मा’.
मी हे नाव कधीच ऐकलं नव्हतं.
’बरं..पुढे?’
’बर्रमचेली’.
’काय?’
’बर्रमचेली’.
मग मी आठ आणे देऊन एक दुभाषा बोलावला, आणि स्वयंपाक्याला मॅकरोनी आणि वर्मिचेली हे दोन पदार्थ हवे होते, हा उलगडा झाला.

भाषेची अडचण असूनही सूप, कटलेट, पाय असे नवे, अनोळखी पदार्थ भारतीय स्वयंपाकी उत्तम करतात म्हणून कौतुक करणार्‍या मेमसाहेबही होत्या. मिसेस मेजर क्लेमन्स यांनी कलकत्ता गॅझेटात आपल्या स्वयंपाक्याचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. पण हे जरा दुर्मिळच होतं. बहुतेक मेमसाहेब आणि स्वयंपाकी यांचे संबंध फारसे सौहार्दाचे नसत.

servants.jpgअनेक अँग्लो-इंडियन घरांमध्ये एकच स्वयंपाकी असे. खानसाम्यानं काही पदार्थ रांधायला स्वयंपाक्याची हरकत नसे, पण घरात दुसरा स्वयंपाकी मात्र त्याला चालत नसे. स्वयंपाक्याच्या हाताखाली मसालची आणि भिश्ती काम करत. धान्य दळणे, मसाले कुटणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, भांडी घासणे, साहेबाच्या बुटांना पॉलिश करणे, पाणी गरम करणे इत्यादी कामं मसालची करी. मसालची बरेचदा खालच्या जातींतल्या बायका असत. ’या बायका भारी अस्वच्छ असतात. त्यांच्याकडे शक्यतो दुर्लक्षच करावं, असं फ्लोरा अ‍ॅनी स्टीलनं लिहिलं होतं. आपण कधीतरी खिदमतगार होऊ, आपला पगार वाढेल, आपल्याला साहेबाच्या घरात प्रवेश मिळेल, अशा आशेवर या मसालची दिवस काढत असत.

पाणी भरणं हे भिश्त्यांचं काम. स्वयंपाकासाठी पाणी भरून मग बागेसाठी, इतर वापरासाठी पाणी भरलं जाई. अनेक गावांमध्ये पाणी फार दूरवरून आणावं लागे, आणि साहेबाघरी पाण्याची उधळपट्टी होई. भिश्त्याला मग दिवसभर खेपा करत पाणी भरत बसावं लागे. भिश्ती आणि मसालची या दोघांनाही त्यांच्या श्रमांच्या मानानं फार कमी पगार मिळे, शिवाय कामालाही प्रतिष्ठा नव्हती.

khidmatgar.jpgखिदमतगाराचं मुख्य काम जेवणाच्या टेबलावर काय हवं नको ते बघणं. साहेबाचा चहा तयार करणं, ताटलीतली कोंबडी कापून साहेबांच्या आणि मेमसाहेबांच्या प्लेटीत वाढणं, स्वयंपाकघरातून पदार्थ टेबलावर आणणं, अशी कामं खिदमतगार करत असे. ब्रिटिश भोजनपद्धतीचा चांगला अभ्यास त्याला करावा लागे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जेवताना फ्रेंचांचं अनुकरण ब्रिटिश करत. ताटल्या भरून सगळे पदार्थ टेबलावर ठेवले जात. या ताटल्या टेबलावर कशा मांडाव्यात, याचंही शास्त्र होतं. म्हणजे महत्त्वाचे पदार्थ टेबलाच्या मध्यभागी, सूप आणि आँत्रे त्यांच्या शेजारी, मधल्या जागेत ओर दूव्ह्रच्या छोट्या बशा इत्यादी. मग १८१२ साली आ ला रूस पद्धत अस्तित्वात आली, आणि काही वर्षांतच ब्रिटनमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. आता वाढपी स्वयंपाकघरातून पदार्थ घेऊन येत, आणि पाहुण्यांच्या ताटलीत वाढत. सूप, मासे, मांस, भाज्या आणि शेवटी गोड पदार्थ, असा वाढण्याचा क्रम असे. मारिआ रंडेल, चार्ल्स डिकन्स अशासारख्यांना ही नवी पद्धत फार आवडली, आणि त्यांनी आपल्या लेखनातून तिचा प्रचार करायला सुरुवात केली. काही वर्षांतच भारतातही अँग्लो-इंडियन आ ला रूस जेवू लागले, आणि मग खिदमतगारानं साहेब आणि मेमसाहेब जेवत असताना लक्ष ठेवून असणं, हे ओघानं आलंच. चांदीच्या भांड्यांना पॉलिश करणं, जेवणाचं टेबल आणि खुर्च्या स्वच्छ ठेवणं हीसुद्धा त्याचीच कामं. अनेकदा मुख्य खिदमतगाराच्या हाताखाली दोनतीन मदतनीस असत. हे खिदमतगार साहेबाच्या विश्वासातले असत. घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ देणार नाहीत, अशी खात्री वाटली कीच खिदमतगार म्हणून नेमणूक होत असे.

या खिदमतगारांचे कपडे खास शिवून घेतले जात. पाहुणे आले की अनेक घरी त्यांना नवे कपडे मिळत. ’जेवणाच्या खोलीत स्वच्छ कपडे घालून वावरणारे खिदमतगार काम संपलं की पुन्हा आपले मळकट कपडे घालतात. बरेचदा याच घाणेरड्या कपड्यांनी ते भांडीही पुसतात. खिदमतगारानं असं वागू नये, यासाठी मेमसाहेबांनी दक्ष राहायला हवं’, असं फ्लोरा अ‍ॅनी स्टीलनं लिहिलं होतं. पुढे खिदमतगारांसाठी सूचनाही होत्या - 'खिदमतगारानं नॅपकिनांच्या व्यवस्थित घड्या कराव्यात, टेबल पुसायला नॅपकिन वापरू नयेत, जास्तीचे चांदीचे चमचे असतील, तर ते चमचे वापरून उगाच टेबलावर चित्रविचित्र आकृत्या तयार करू नये, स्वयंपाकघरात सारख्या चकरा मारू नये, एकाच खेपेत काय हवं ते आणावं, साहेब आणि मेमसाहेब टेबलावरून उठेपर्यंत भांडी उचलू नये, साहेबांना हात धुवायला नेहमी गरम पाणीच द्यावं..'

hookahburdar.jpgखानसामा, स्वयंपाकी, खिदमतगार यांशिवाय अँग्लो-इंडियनांच्या दैनंदिन आयुष्यात स्थान असणारे काही नोकर होते. यांपैकी सर्वांत महत्त्वाचा होता हुकाबरदार. साहेबाच्या हुक्क्याची काळजी घेणं, हुक्क्यातला कोळसा विजू न देणं, गुलाबपाण्याची व्यवस्था बघणं हे त्याचं काम. हुक्कापानाची सवय साहेबाला अर्थातच भारतीयांनी लावली. अगदी सुरुवातीला भारतात आलेल्या इंग्रज व्यापार्‍यांनाही हुक्कापान भारी आवडलं होतं. १६७५ साली लिहिलेल्या फॅक्टरी मिसलेनियस रेकॉर्डांमध्ये हुक्कापानाचे उल्लेख सापडतात. अठराव्या शतकात हुक्कापानाला खूप महत्त्व प्राप्त झालं. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर हुक्कापान केलंच पाहिजे, असा नियम साहेबानं स्वत:पुरता घालून घेतला. इतर वेळीही क्वचित साहेबाला हुक्का ओढायची तलफ येई, आणि म्हणून साहेब जिथे जाईल, तिथे हुकाबरदाराला जावं लागे. रोजच्या रोज हुक्का स्वच्छ करणं, सर्व साहित्याची तजवीज करणं आणि साहेबानं बोलावताक्षणी त्याच्यासमोर हुक्का ठेवणं, हे हुकाबरदारानं करणं अपेक्षित होतं. साहेब पुढे आणि मागे हातात हुक्का घेऊन हुकाबरदार अशी वरात असे. अगदी साहेब पालखीतून जातानाही हुकाबरदार मागे पळत असे.

solvyn1.jpgसाहेबाचं जेवण झालं की हुकाबरदार खोलीत प्रवेश करी. साहेबाच्या खुर्चीमागे एक छोटं स्टूल ठेऊन त्यावर हुक्का ठेवला जाई. धूर सुगंधी असावा म्हणून गुलाबपाण्याचं एक भांडं शेजारी असे. साहेबाच्या हातात हुक्क्याची नळी देऊन तो खुर्चीमागे उभा राही. ’दुसरा हुक्का लाओ’ असं साहेबानं म्हणताच तो तत्परतेनं हुक्का पुन्हा तयार करून साहेबासमोर ठेवी. साहेब खोलीत एकटाच असेल तर ठीक, पण पार्ट्यांमध्ये हुक्क्यांच्या गुडगुडण्याचा मोठ्ठा आवाज होई. त्यामुळे जेवणानंतर आपापसांत न बोलता सर्वजण आधी हुक्कापान आटपत. साहेबाला हुक्क्याबद्दल इतकं प्रेम होतं की, गव्हर्नमेण्ट हाउसात किंवा गव्हर्नर जनरलाच्या घरी होणार्‍या पार्ट्यांमध्येही हुकाबरदाराला प्रवेश असे. या पार्ट्यांच्या आमंत्रणपत्रिकेत ’येताना फक्त हुकाबरदाराला घेऊन यावे, इतर नोकरांचं स्वागत होणार नाही’ अशी सूचना असे. पार्ट्यांमध्ये हुक्कापानामुळे मेमसाहेबांना त्रास होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यासुद्धा हुक्क्याच्या शौकिन होत्या. क्वचित पार्ट्यांमध्ये पाहुण्यांसाठी खास, वेगळ्या हुक्क्यांची व्यवस्था केली असे. कंपनीचे मोठे साहेब, लष्करातले मोठे अधिकारी यांना हा मान मिळे. या बड्या पाहुण्यांसाठी चांदीचे, किंवा सोन्याचं पाणी दिलेले हुक्के आणले जात. तंबाखूही उंची असे. एका रांगेत साठसत्तर हुक्के मांडलेले असत. त्यांच्या आवाजात इतर काही ऐकू येत नसे, आणि धुरामुळे समोरचं काही दिसत नसे. अर्ध्या तासाच्या हुक्कापानानंतर गप्पा पुन्हा सुरू होत. हाताला गजरे बांधून, नाच बघत, हस्तिदंती किंवा सोन्याचांदीच्या हुक्क्यातून हुक्कापान करणं ही कलकत्त्याच्या पार्ट्यांमधली आम बात होती. प्रत्येक पार्टीत हुक्का असलाच पाहिजे, असा अलिखित नियमच होता.

एरवीही साहेबाच्या घरी हुक्कापानाचा थाट असे. हुक्क्याखालचा गालिचा उंची असे. खास हुक्क्यासाठीचे हे गालिचे एकमेकांना भेटीदाखल दिले जात. श्रीमंतांच्या हुक्क्यांचं बूड सोन्याचांदीचं असे. त्यांवर अनेकदा मौल्यवान रत्नं जडवलेली असत. इंग्लंडात बनवलेले कट ग्लासाचे सुरेख हुक्केही वापरात असत. हुक्क्याच्या नळीला उंची रेशीम किंवा सोन्याचांदीच्या तारा असलेलं ब्रोकेड गुंडाळलेलं असे. नळीच्या दुसर्‍या टोकाला असलेली चिलीम सोन्याची, चांदीची की हस्तिदंताची आहे, यावरून साहेबाच्या श्रीमंतीचा, त्याच्या कंपनीतल्या अधिकारपदाचा अंदाज केला जाई. तंबाखूत सुगंधी अत्तरं, सुका मेवा, मसाले घालून हे मिश्रण मातीच्या भांड्यात जमिनीखाली महिनाभर पुरून ठेवत. तंबाखूच्या स्वादावरूनही साहेबाची प्रतवार केली जाई. बॉम्बेत हुक्क्याला क्रीम कॅन्स असं नाव होतं. हुक्क्याचा शोध लावणार्‍या करीम खान नावाच्या पर्शियन राजामुळं हे नाव मिळालं होतं. काहीजण हुक्क्याला ऐलून असंही म्हणत. शिपायांच्या किंवा कारकुनांच्या हुक्क्याला हबलबबल म्हटलं जाई. सुरतेत हुक्क्याला नारगिल असं नाव होतं, आणि कलकत्त्यात गडगडा.

एकोणिसाव्या शतकात मात्र इंग्रजांचं हुक्क्याचं व्यसन कमी व्हायला लागलं. हे व्यसन जरा महाग होतं, हे एक कारण. हुक्का, तंबाखू यांचा खर्च होता. तो कमी करणं शक्य नव्हतं कारण त्यांच्या दर्जावरून साहेबाची किंमत केली जाई. शिवाय हुक्का सांभाळण्यासाठी हुक्काबरदारही नोकरीत ठेवावा लागे. त्यापेक्षा सिगार किंवा पाइप ओढणं स्वस्त होतं. बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या इलाख्यांतल्या शहरांतून मग हुक्का नाहीसा झाला.

हुकाबरदाराप्रमाणे आबदारही साहेबाच्या घरातून दिसेनासा झाला. बर्फ अगदी सहज उपलब्ध होण्यापूर्वी पाणी, मद्य गार करणं ही आबदाराची जबाबदारी असे. आबदार म्हणजे त्या काळातला चालताबोलता रेफ्रिजरेटर. आपल्या साहेबाच्या मागोमाग हा एका बाटलीत सॉल्टपेटर आणि दुसर्‍या बाटलीत मद्य घेऊन हिंडत असे. एखाद्या घरी पार्टी असेल तर पाहुण्यांचे आबदार तासभर आधी त्या घरी पोहोचत आणि आपल्या मालकांसाठी पाणी गार करत, कारण पाणी नक्की किती गार करायचं हे त्यांचं त्यांनाच माहीत असे. १८३३ साली अमेरिकेहून एका जहाजातून कलकत्त्यात बर्फ आणला गेला. या आनंदाच्या, ऐतिहासिक प्रसंगी गव्हर्नर जनरल लॉर्ड बेन्टिंकांनी जहाजाच्या कप्तानाला भेट म्हणून चांदीचा चषक दिला होता. मग नंतर बॉम्बे आणि मद्रास प्रांतांतही अमेरिकेतला बर्फ पोहोचला, बर्फ साठवण्यासाठी गोदामं उभी राहिली, गावोगावी चार आण्याला शेरभर बर्फ मिळू लागला आणि आबदाराचं साहेबाच्या घरातलं काम संपलं.

khidmatgars.jpgसाहेबाच्या घरातल्या या नोकरांची निवड त्यांच्या जातीनुसार केली जाई. बहुतांश नोकर हे खालच्या जातींतले हिंदू किंवा मुसलमान असत. बॉम्बे इलाख्यात अनेक नोकर पोर्तुगीज आणि पारशीही होते. मद्रास प्रांतात धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या नोकरांची संख्या भरपूर होती, तर कलकत्त्यात हव्या त्या जातीचे, धर्माचे नोकर उपलब्ध होते. मात्र युरोपीय नोकर ठेवण्याकडे लोकांचा कल नव्हता, कारण या नोकरांना स्वत:चं घर लागे, आणि त्यांच्याकडे भारतीय नोकर असत. या भारतीय नोकरांचे पगारही साहेबानं द्यावे, अशी युरोपीय नोकरांची मागणी असे. शिवाय ते कधीही नोकरी सोडून स्वदेशी परतण्याची भीती असायची. मात्र युरोपीय नोकरांना टाळण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना इंग्रजी भाषा समजत असे. घरातली, जेवणाच्या टेबलावरची संभाषणं त्यांना सहज कळत, आणि त्याबद्दल बाहेर वाच्यता होण्याचा, अफवा पसरण्याचा धोका असे. युरोपीय नोकरांइतकंच भारतीय पण ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्यांबद्दलही अँग्लो-इंडियनांचं वाईट मत होतं. धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्यांना शक्यतो कामावर ठेवण्यास मेमसाहेब नाखूश असत. जे स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक राहू शकत नाहीत, ते मालकाशी प्रामाणिक कसे असतील? म्हणून या मंडळींवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही, असा समज होता. द इंग्लिशवुमन इन इंडियाच्या लेखिकेनं, म्हणजे मॉड डायव्हरनं लिहिलं होतं - ’ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले भारतीय खरं म्हणजे कठीण परिस्थितीत असतात. घरचे त्यांच्याशी संबंध तोडतात, अनेकदा समस्त गावकरी त्यांना वाळीत टाकतात. नोकरीव्यवसाय नाही, घरच्यांचा आधार नाही. अशा परिस्थिती दारू, जुगार यांना जवळ केलं जातं. त्यासाठी लागणारा पैसा साहेबाच्या नोकरीत अप्रामाणिकपणे वागून मिळवला जा्तो. शिवाय आपण साहेबाचा धर्म स्वीकारला आहे, तर साहेबानं आपल्याला पैसे द्यायला हवेत, असाही विचार असतो.’ धर्मांतर केलेला खानसामा किंवा खिदमतगार नोकरीवर ठेवला तर त्याला भारतीय दुकानदार वस्तू विकणार नाहीत, आणि आपण उपाशी राहू, असा व्यावहारिक विचारही काही मेमसाहेब करत असत. अठराव्या शतकात मॉरिशसहून भारतात गुलाम आणले जात. बॉम्बे, मद्रास या प्रांतांत साहेबाघरी स्वयंपाकी म्हणून त्यांना राबावं लागे. साहेबाकडून अतिशय वाईट वागणूक त्यांना मिळत असे. एलिहू येल हा मद्रास प्रांताचा गव्हर्नर. (यानं भारतात कमावलेल्या पैशातून येल कॉलेज आणि विद्यापीठाची स्थापना झाली.) त्यानं एकदा न सांगता नोकरी सोडून गेला म्हणून आपल्या खानसाम्याला झाडावर टांगून फाशी दिली होती. स्वयंपाकाला उशीर झाला, किंवा चव बिघडली म्हणून स्वयंपाक्याच्या अंगावर उकळतं पाणी टाकणं, मिरच्या खायला लावणं, मारहाण करणं हे बॉम्बे आणि मद्रास इलाख्यांत वारंवार घडत असे. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीनं गुलामगिरी संपुष्टात आणल्यावर हे प्रकारही कमी झाले.

उच्चवर्णीय हिंदू मासांहारी स्वयंपाक करत नसत, उष्ट्या अन्नाला स्पर्श करत नसत, म्हणून साहजिकच स्वयंपाक्याची नोकरी त्यांना मिळत नसे. स्वयंपाकी हे मोघ, मुसलमान किंवा खालच्या जातींतले हिंदू असत. बंगालात पोर्तुगिजांनी केक, बिस्किटं, मिठाया तयार करण्याचं प्रशिक्षण मोघांना दिलं होतं. हे मोघ मूळचे म्यानमारातले. अरब व्यापारांनी त्यांना बंगालात आणलं. कलकत्त्याहून सुदूर पूर्वेकडे जाणार्‍या अरबांच्या जहाजांवर ही मंडळी हमाल आणि स्वयंपाकी म्हणून काम करत असत. पोर्तुगिजांनी हुगळीच्या काठी आपलं ठाणं स्थापन केल्यावर त्यांनी या मोघांना जहाजांवर नोकरीला ठेवण्याची परंपरा राखली. यांपैकी काही मोघांनी नंतर बंगालात आपल्या स्वत:च्या बेकर्‍या सुरू केल्या. पोर्तुगिजांचा अंमल कमी होऊ लागल्यावर अनेक मोघांनी आणि पोर्तुगिजांनी सुरू केलेल्या बेकर्‍यांच्या, मिठायांच्या दुकानांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली. बंगालातल्या या अस्सल युरोपीय मिठाया सर्वत्र चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे इंग्रजांनी मोघांना आणि पोर्तुगिजांना स्वयंपाकी म्हणून ठेवणं साहजिकच होतं. या स्वयंपाक्यांना युरोपीय पदार्थ कसे करायचे, हे शिकवण्याची गरज नव्हती. शिवाय भारतात सहज उपलब्ध होणारी सामुग्री वापरून या स्वयंपाक्यांना केक, सुफ्ले, पुडिंग करता येत असत.

स्वयंपाकी निवडण्याच्या महत्त्वाच्या कामात मेमसाहेबांना बरेचदा दुभाष मदत करत असे. ही निवड करणंही तसं कठीणच असे, कारण स्वयंपाक्यावर विश्वास कसा ठेवायचा? काही स्वयंपाकी नोकरी सोडताना मेमसाहेबांकडून शिफारसपत्र घेऊन ठेवत. पण अनेकदा बदल्यांमुळे मेमसाहेब तडकाफडकी शहर सोडून जात, आणि आता शिफारसपत्र आणायचं कुठून, हा प्रश्न स्वयंपाक्यासमोर उभा राही. पत्राचा एखादा नमुना समोर ठेवून खोटी पत्रं तयार करणारे काही व्यावसायिक पत्रलेखक होते, त्यांची मदत मग घेतली जाई. चारपाच आण्यांमध्ये स्वयंपाक्याच्या पाककौशल्याचं, प्रामाणिकपणाचं कौतुक करणारं असं मस्त, सुरेख इंग्रजीतलं पत्र लिहून मिळे. पत्राच्या शेवटी साहेब आणि मेमसाहेबांचं आयुष्य हे पत्र घेऊन येणार्‍या स्वयंपाक्याच्या हातचं अन्न खाऊन बरंच वाढेल, अशी ग्वाहीही दिलेली असे. साध्याभोळ्या मेमसाहेबांना स्वयंपाक्यानं अशी खोटी पत्रं देऊन फसवू नये, म्हणून इंडियन डोमेस्टिक इकनॉमी अ‍ॅण्ड रिसीट बूकमध्ये सर्व स्वयंपाक्यांच्या नावांची नोंद पोलिसचौकीत करावी, आणि पत्रांचा खरेखोटेपणा तपासून घ्यावा, असा सल्ला दिला गेला होता.

भारतीय नोकर अप्रामाणिक, अस्वच्छ आणि खोटारडे असा एकंदरीत अनेकांचा सूर होता. कलिनरी आर्ट स्पार्कलेट्समध्ये ’चेहर्‍यावरून कितीही प्रामाणिक वाटले तरी प्रामणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव हे दोन गुण भारतीत नोकरांमध्ये अजिबात आढळत नाहीत’, असं बीट्रिस व्हिएरा यांनी १९०४ साली लिहिलं होतं. अठराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत लिहिल्या गेलेल्या असंख्य पुस्तकांमध्ये हाच सूर आळवलेला दिसून येतो. काही खानसामे आणि स्वयंपाकी फसवणुकीत तरबेज होते, हे मात्र खरं. लॉर्ड कर्झनाच्या स्वयंपाक्यानं महिनाअखेर ६०० कोंबड्यांचं बिल सादर केलं. आपण एवढ्या कोंबड्या खाल्लेल्या सौ. कर्झन यांना आठवेना. कोंबडीविक्रेत्याकडे चौकशी केल्यावर कळलं की, फक्त २९० कोंबड्या कर्झनांच्या घरासाठी विकत घेतल्या गेल्या होत्या. त्या स्वयंपाक्याला मग अर्थातच नोकरीवरून काढून टाकलं. चहा, साखर, दूध, भाज्या, मांस यांची खरेदी करताना थोडीफार लबाडी अनेकजण करत. बाजारातून वस्तू विकत घेताना रुपयामागे एक आणा खानसामा स्वत:च्या खिशात घालत असे. ही दस्तुरी आपला हक्कच आहे, अशा समजुतीतून खानसामे सगळे व्यवहार करत असत. अँग्लो-इंडियनांना दस्तुरीची ही पद्धत तापदायक वाटत असे. पण एकदा का दस्तुरी खिशात गेली, की खानसामा इतरांना आपल्याला फसवू देणार नाही, व आपल्याशीही एकनिष्ठ राहील, अशी समजूत घालून घेतली जात असे. आपण स्वत: बाजारात खरेदीला गेलो, तर प्रत्येक वस्तू दुप्पट किमतीला विकत घ्यावी लागेल आणि खानसाम्याला मिळणार्‍या पगारात त्याचं घर चालू शकत नाही, या दोहोंची जाणीव अनेक मेमसाहेबांना होती. त्यामुळे या वरच्या कमाईला आक्षेप घेतला जात नसे. महिन्याच्या सुरुवातीला खानसामा मेमसाहेबांकडून महिनाभराच्या खर्चासाठी पैसे घेत असे. त्याच्या हाताखालच्या नोकरांचा पगारही मेमसाहेब त्याच्याच हाती देत. किरकोळ खरेदीसाठी स्वयंपाक्याकडे थोडे पैसे दिले जात. महिनाअखेर खानसाम्यानं आणि स्वयंपाक्यानं हिशोबाची वही मेमसाहेबांना दाखवणं अपेक्षित होतं. दस्तुरी किती घेतली, हेही अनेक खानसामे या वहीत प्रामाणिकपणे लिहीत असत. ही रक्कम मेमसाहेबांना जास्त वाटली, तर त्या खानसाम्याला पुन्हा हिशोब करायला लावत, किंवा स्वत:च तेवढे पैसे पुढच्या महिन्याच्या खर्चातून कापून घेत.

हे खानसामे आणि स्वयंपाकी हिशोब नीट लिहीत नाहीत, अशी काही मेमसाहेबांची तक्रार असे. शिवाय ते भयंकर विसरभोळे आहेत, असंही काहींना वाटे. ’आज शिकवलेला पदार्थ आमचा स्वयंपाकी उद्या विसरतो’, किंवा ’आमचा स्वयंपाकी गेली दोन वर्षं नियमितपणे पुडिंग करत होता, कालपासून तो पुडिंग कसं करायचं हे विसरला’, हे फ्लोरा अ‍ॅनी स्टीलच्या कानी वारंवार पडू लागल्यावर तिनं स्वयंपाक्यांना शिस्त कशी लावावी, याबद्दल लिहिलं - ’भारतीय स्वयंपाकी हे लहान मुलांसारखे असतात. त्यांची वयं कितीही असली तरी त्यांना लहान मुलांप्रमाणेच समजावून सांगावं लागतं. लहान मुलांना शिस्त लावताना आपण प्रसंगी कठोर होतो, तसंच या नोकरांच्या बाबतीतही करावं लागतं. माझे स्वयंपाकी एखादी गोष्ट विसरले तर मी त्यांना दंड करते. चूक किती गंभीर आहे, त्यावर दंडाची रक्कम ठरते. काही वेळा मी दंड म्हणून एक रुपयाही वसूल केला आहे. शिवाय मी अजून एक जालीम पण मजेदार उपाय योजला आहे नोकरांना धाकात ठेवण्यासाठी. एखाद्या नोकरानं चूक केली की मी त्याला एरंडेल पाजते. अपेक्षित परिणाम दिसला की या नोकराची इतरांकडून चेष्टा केली जाते, शिवाय त्याला त्रास होतो, सतत पळावं लागतं ते वेगळंच. त्यामुळे सगळे नोकर या माझ्या शिक्षेला घाबरून असतात. ही माझी शिक्षा खरोखर परिणामकारक ठरली आहे. हाताखालच्या नोकरानं साधीशी जरी चूक केली, तरी आता आमचा खानसामा त्याला म्हणतो, "मेम साहिब तुम को जरूर किआस्तर इल पिला देगा".’

मात्र नोकरांचा सहानुभूतीनं विचार करणार्‍याही अनेक मेमसाहेब होत्या. लेडी मेरी हे यांचं १९२८-१९४७ या काळात भारतात वास्तव्य होतं. त्यांनी लिहिलं होतं - ’आमच्या घरी काम करणारे अनेक नोकर आमच्याबरोबर अनेक वर्षांपासून आहेत. आमच्याबरोबर अनेक शहरांमध्ये ते आणि त्यांची कुटुंबं राहिले आहेत. त्यांचा योग्य तो सांभाळ करणं, त्यांची काळजी घेणं, ही मला माझी जबाबदारी वाटते. सर्व्हंट क्वार्टरांमध्ये राहणार्‍या स्त्रियांच्या, मुलांच्या काही समस्या आहेत का, हे बघण्यासाठी मी दर आठवड्याला त्यांच्याशी बोलते. मुलं रोज शाळेत जातात की नाही, ते विचारते. तुम्ही भारतात जास्त काळ राहिलात की तुम्हांला आपोआप या लोकांबद्दल प्रेम वाटू लागतं. फार छान स्वभाव आहेत यांचे. या लोकांचं मला इतकं प्रेम मिळालं, की अजूनही त्या आठवणींनी मला भरून येतं’. भारतीय स्वयंपाकी ब्रिटिश स्वयंपाक्यांपेक्षा लवकर एखादी गोष्ट आत्मसात करतात, असं मॉड डायव्हरनं लिहिलं होतं. इ. ऑगस्टा किंग हिनं तर भारतीय स्वयंपाकी वि. ब्रिटिश स्वयंपाकी या विषयावर एक भलामोठा निबंध लिहिला होता. भारतीय स्वयंपाकीफार मायाळू असतात, मालकासाठी जीव द्यायलाही तयार असतात, ब्रिटिश स्वयंपाक्यांसारखे ते व्यवहारी नसतात, मात्र भारतीय स्वयंपाकी भारी अस्वच्छ असतात..या बाबतीत त्यांच्यापेक्षा ब्रिटिश स्वयंपाकी फार चांगले, असा त्या निबंधाचा एकंदर सारांश होता.

kitchen.jpgभारतातले स्वयंपाकी आणि स्वयंपाकघरं अतिशय अस्वच्छ असतात, असं बहुतेक सार्‍या अँग्लो-इंडियनांचं मत होतं. भारतातली पारंपरिक स्वयंपाकघरं त्यांना पसंत पडण्यासारखी नव्हतीच, कारण मुळात इथली स्वयंपाकाची पद्धत वेगळी होती. भारतात घरं बांधताना ब्रिटिशांनी सर्वप्रथम स्वयंपाकघराला मुख्य घरापासून वेगळं केलं. स्वयंपाकाची खोली घरापासून कमीत कमी तीस यार्ड लांब असे. ही वेगळं स्वयंपाकघर बांधण्याची पद्धत आठव्या हेन्रीच्या काळात, म्हणजे सोळाव्या शतकात सुरू झाली. त्यानं बांधलेल्या हॅम्प्टन कोर्टात स्वयंपाकाची खोली ही मुख्य इमारतीत नव्हती. राजाच्या भोजनगृहात जाण्यासाठी या स्वयंपाकाच्या खोलीतून एक जिना काढला होता. वेस्टमिन्स्टर राजवाड्याला १५१२ साली मोठी आग लागली होती, आणि पुन्हा अशी घटना घडू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती. आठव्या हेन्रीची मुलगी एलिझाबेथ पहिली ही अति लाजाळू. तिला एकटीला जेवायला आवडे. जेवताना तिला आसपास नोकरही नको असत. स्वयंपाकघर जवळ असल्यानं तरीही नोकर अधूनमधून डोकावून जात. मग स्वयंपाकाच्या खोलीतून सारखे शिजवलेल्या अन्नाचे वास येतात, आणि नोकर येजा करतात, या कारणामुळं तिनं हॅम्प्टन कोर्टातल्या स्वयंपाकघराचा तो जिना काढून टाकला, आणि यापुढे प्रत्येक शाही इमारतीत स्वयंपाकघर हे मुख्य इमारतीपासून लांब बांधावे, असं फर्मान काढलं. राणीचा आदेश इंग्लंडातल्या अमीरउमरावांनी मानला, आणि श्रीमंताघरी वेगळं स्वयंपाकघर बांधण्याची पद्धत रूढ झाली. भारतात आल्यावर ब्रिटिशांनी अर्थातच ही पद्धत कायम ठेवली. बारा बाय बारा फुटांच्या या खोलीचं बांधकाम बरेचदा निकृष्ट असे. या खोलीत साहेब आणि मेमसाहेब रोजच्या रोज येण्याची फारशी शक्यता नसल्यानं ती रंगवण्याची तसदी कोणी घेत नसे. भिंती धुरामुळे काळवंडणार असल्यानं रंगवून तसा उपयोगही नव्हता. स्वयंपाकघर कसं असावं, याबद्दल थर्टी-फाइव्ह इयर्स रेसिडण्टानं लिहिलं होतं - ’स्वयंपाकघर मोठं, हवेशीर असावं. पुरेसा प्रकाश असावा. स्वयंपाकघरात फडताळं असावीत, आणि या फडताळांवर रोज लागणारी भांडी आणि इतर उपकरणं ठेवावीत. अव्हन आणि फायरप्लेशींसाठी भारतात मिळतात तसल्या मातीच्या विटा वापरू नयेत. सतत डागडुजी करत राहावी लागू नये म्हणून चांगल्या भट्टीत भाजलेल्या उत्तम दर्जाच्या विटा वापराव्यात. स्वयंपाकघरात ताजं पाणी भरून ठेवण्यासाठी भरपूर मोठाले माठ ठेवावेत. यांपैकी निदान दोन माठांतलं पाणी भाज्या, धान्य धुण्यासाठी राखून ठेवावं. भारतीय नोकरांना माठांमध्ये हात बुडवून पाणी काढण्याची घाणेरडी सवय असते, त्यामुळे तुमची ऐपत असेल, आणि स्वयंपाकघराला गच्ची असेल, तर वर पाण्याची टाकी बांधावी, आणि नळाद्वारे पाणी स्वयंपाकघरात आणावं. पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी नाल्या बांधाव्यात. या नाल्यांचा उतार व्यवस्थित असावा. दरवाजेखिडक्यांना जाळ्या असाव्यात, म्हणजे कीटक आत येणार नाहीत. स्वयंपाकघराच्या भिंती, फरशा स्वच्छ असाव्यात. कोपर्‍यात धूळ साचलेली नसावी. रोज एकदातरी केर काढावा. भारतातले ब्रिटिश दर तीन वर्षांनी कौलं शाकारतात, आणि तेव्हाच स्वयंपाकघरही स्वच्छ करतात. तसं करू नये. स्वयंपाकघराची रोजची स्वच्छता महत्त्वाची. स्वयंपाकघर, भांडी आणि पाणी स्वच्छ असतील तरच स्वयंपाक उत्तम होतो, हे तुम्ही स्वयंपाकघरात वावरणार्‍या सर्वांना समजावून सांगा. महिन्यातून एकदा वगैरे जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाकघराला भेट द्याल, तेव्हा स्वच्छतेची पाहणी करा, आणि स्वच्छता राखली गेली असेल, तर नोकरांचं कौतुक करा. मात्र भारतीय नोकरांचं वारंवार कौतुक केलं, की ते काम नीट करत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत स्वच्छतेबद्दल रागवत राहा.’

स्वयंपाकघरात पुरेशी स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळे त्या खोलीत जाण्याची, तिथे डोकावण्याची, स्वयंपाक नक्की कसा होतो हे बघण्याची तसदी मेमसाहेबांनी घेऊ नये, असा सल्ला अनुभवी मंडळी देत असत. १८४१ साली मिसेस क्लेमन्स यांनी लिहिलं होतं - ’स्वयंपाक्याची खोली कशी आहे, हे बघायला फार कोणी जात नाही, आणि तेच योग्य आहे. तुमच्या ताटात पडणारे पदार्थ कुठे आणि कसे बनवले जातात, हे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या घशाखाली घासच उतरणार नाही. ब्रिटिशांना सवयीची असलेली स्वच्छता इथे तुम्हांला आढळणार नाही. त्यामुळे पानातला पदार्थ चवीला बरा आहे, यात काय ते समाधान माना’. मुळात मेमसाहेबांना काय अभिप्रेत आहे, तेच स्वयंपाक्यांना कळत नसे. जमिनीवर बसून स्वयंपाक करणं, फरशीवर भाज्या ठेवणं, गाळण्यासाठी फडक्याचा वापर करणं, या गोष्टी ते पूर्वापार करत आले होते. कधीही न बघितलेले पदार्थ, नवी उपकरणं समोर आल्यावर गोंधळून जाणं तसं स्वाभाविक होतं. शिवाय या वस्तूंचा वापर कसा करायचा हे त्यांना समजेल अशा भाषेत क्वचितच सांगितलं जाई. ’भारतातले स्वयंपाकी अस्वच्छ’, अशी पक्की समजूत करून घेतलेल्या मेमसाहेबांना तशी आवश्यकताच वाटत नसे, किंवा स्वयंपाक्याला, आणि स्वयंपाकघरात वावरणार्‍या इतर चाकरांना नीट कसं समजवावं, हे मेमसाहेबांना कळत नसे. पण त्यामुळे व्हायचं काय, की जमिनीवर बसून टोस्टला लोणी लावताना तो स्वयंपाक्यानं पायाच्या बोटांमध्ये पकडणे, चव बघण्यासाठी भाजीच्या भांड्यात बोट बुडवणे, किंवा सूप गाळण्यासाठी मोज्यांचा वापर करणे, अशी हृदयद्रावक दृश्यं मेमसाहेबांना बघावी लागत. ’अ‍ॅन इंग्लिशवुमन इन इंडिया’ या पुस्तकात एक मजेदार संवाद आहे -
’बॉय, हाऊ आर मास्टर्स सॉक्स सो डर्टी?
आय टेक, मेक अ स्ट्रेन कॉफी’
व्हॉट, यू डर्टी रेच, फॉर कॉफी?
येस, मेमसाहिब, बट नेव्हर टेक मास्टर्स क्लीन सॉक. मास्टर डन यूज, देन आय टेक.’

servantsocks.jpg'रफिंग इट इन साउथ इंडिया'त हॅण्डलेबाईंनी एक मजेदार किस्सा सांगितला आहे - 'एकदा रात्री आम्ही ह्यांच्या मित्राकडे जेवायला गेलो होतो. सूपची चव आम्हांला जरा मातकट वाटली. रंगही मातकटच होता. क्लिअर सूप नव्हतं ते. आमच्या यजमानीणबाई ’तुम्ही थांबू नका, मी आलेच’, असं म्हणत लगेच आत गेल्या ते चांगल्या अर्ध्या तासानं बाहेर आल्या. बर्‍याच घुश्शात होत्या त्या. आमचं जेवण तोपर्यंत आटपत आलं होतं. ’उद्या दुपारपर्यंत मला नवा स्वयंपाकी शोधायला हवा’, असं म्हणत त्या खुर्चीत बसल्या. त्यांचा राग जरा शांत झाल्यावर त्यांनी आत काय घडलं, ते आम्हांला सांगितलं. सूपचा अनोखा रंग आणि स्वाद कशामुळे, हे जाणून घेण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या. समोरच्याच भिंतीवर त्यांना स्वयंपाक्याचं डोक्याला बांधायचं फडकं अडकवलेलं दिसलं. ते ओलं होतं, आणि त्याला भाज्यांचे तुकडे चिकटलेले होते. स्वयंपाक्यानं सूप गाळण्यासाठी ते फडकं वापरलं होतं. यजमानीणबाईंनी ते फडकं खुंटीवरून काढलं, आणि स्वयंपाक्याला कोमट पाणी आणायला सांगितलं. मग त्या पाण्यात त्यांनी ते फडकं काही मिनिटं व्यवस्थित बुडवलं. नंतर फडकं बाजूला काढून ते मातकट पाणी त्यांनी स्वयंपाक्याला प्यायला सांगितलं. स्वयंपाक्यानं गुमान भांडं तोंडाला लावलं.
’कशी आहे चव?’
तो बिचारा काय बोलणार? त्याच्या चेहर्‍यावर चव दिसतच होती.

माझ्या स्वयंपाकघरात असाच एक मजेदार प्रसंग घडला होता. कधी नव्हे ते एकदा मी स्वयंपाकघरात गेले. आमच्या स्वयंपाक्याच्या मुलांना तिथे प्रवेश नव्हता. मुलांना अजिबात आत येऊ द्यायचं नाही, अशी ताकीद मी दिली होती. पण त्या दिवशी मी गेले तेव्हा स्वयंपाक्याचा धाकटा मुलगा आत होता. जेमतेम दोन वर्षांचं पोर होतं ते. जमिनीवर ठेवलेल्या एका मोठ्या बीफच्या तुकड्यावर बसून मजेत ते बाळ खेळत होतं. खालची फरशी टणक आणि गार, बीफ मऊ, म्हणून कदाचित स्वयंपाक्यानं बाळाला तिथं बसवलं असेल. फार गोजिरवाणं बाळ होतं ते! कपडेही भन्नाट होते. डोळ्यांना त्रास होईल अशा भडक गुलाबी रंगाचं झबलं त्याला घातलं होतं. हे झबलं त्याच्या मापापेक्षा जरा मोठंच होतं, कारण ते खांद्यावरून उतरलं होतं. बाळाचे केस दाट आनि लांब होते, त्यांची छोटी वेणी घातली होती. टपोरे डोळे, आणि भरपूर काजळ. भुवया दाट आणि अंगावर सुरेख बाळसं. उजव्या हातात चांदीचं नाजूक कडं होतं. माझ्याकडे लक्ष जाताच ते बाळ फार गोड हसलं. आमचा स्वयंपाकी मात्र गडबडला. मी तिथे त्यावेळी येईन, असं त्याला वाटलंच नव्हतं. ’मी नाही आणलं याला इथे, कोणीतरी आणून ठेवलं. यापुढे असं मी करणार नाही’, असं तो म्हणाला असावा, कारण मला अगदीच जुजबी तमिळ कळतं. त्या गोंडस, हसर्‍या बाळाला बघितल्यावर मला अजिबात राग आला नाही. मी काही क्षण त्या बाळाला बघितलं आणि घरात निघून आले.

रात्री आठ वाजले आणि आम्ही जेवायला बसलो. आता मात्र माझ्या पानात ते बीफ आलं तर घशाखाली उतरेल की नाही, अशी धास्ती वाटायला लागली. आमच्या ह्यांना मी ती हकिकत सांगितली होती, पण त्यांना त्याची काही फिकीर नव्हती. ’एरवी त्या स्वयंपाकघरात काय चालतं, ते आपण बघायला जातो का? समोर येईल ते खातोच ना? मग आताही तसंच जेव. आणि बीफ शिजलं की सगळे जंतू मरतातच. तू काळजी करू नकोस’, असं ते म्हणाले. मी मात्र काळजीतच होते. पण आमचा स्वयंपाकी मला वाटलं होतं त्यापेक्षा हुशार आणि समजूतदार निघाला. त्यानं मी सांगितलेला मेन्यू स्वत:हून बदलला, आणि बीफऐवजी ताज्या माशांचं कालवण केलं. मी नि:शंक मनानं जेवले. स्वयंपाक्यानं मात्र पुढचे दोन दिवस मला तोंड दाखवलं नाही.'

भारतीय स्वयंपाक्यांच्या अस्वच्छ वागणुकीला कंटाळलेल्या मेमसाहेबांच्या मदतीसाठी फ्लोरा अ‍ॅनी स्टील आणि ग्रेस गार्डिनर यांनी एक मसुदाच आपल्या पुस्तकात लिहून दिला होता - ’आपल्या चाकरांना सांगावे - तुमच्याप्रमाणेच तुमचे पूर्वजही खानसामे, किंवा स्वयंपाकी, किंवा खिदमतगार असतील. त्यामुळे तुम्हांला तुमची कामं कशी करायची, हे व्यवस्थित ठाऊक आहे. पण प्रत्येक माणसाला काही प्रत्येक गोष्ट ठाऊक नसते, तसंच तुम्हांलाही काही गोष्टी ठाऊक नसतील. आता या गोष्टी तुम्हांला ठाऊक नाहीत, यात तुमची चूक नाही, आणि तुम्ही त्याबद्दल कमीपणा वाटून घ्यायचंही काही कारण नाही. पण म्हणूनच तुम्ही या गोष्टी तातडीनं शिकून घ्यायला हव्यात, कारण जगात सतत नवनवीन शोध लागत असतात. अगदी रोज नवनवीन पदार्थांचा शोध लागतो. दरवर्षी तिकडे आमच्या देशात राहणारे हुशार पुरुष नवनवे आजार आणि त्यांमागची कारणंही शोधत असतात. आता जगातल्या निम्म्याअधिक आजारांचं मूळ पोटात आहे, हा शोध आमच्या बुद्धिमान पुरुषांनी लावला आहे. आता आमचं पोट कोणाच्या हाती आहे? तुमच्या. त्यामुळे आम्हांला आजारी न पडू देण्याची जबाबदारी कोणाची? तुमची. तुम्ही जर स्वयंपाक नीट केला नाहीत, स्वच्छता राखली नाहीत, तर आमचं हे घर काही आनंदी राहणार नाही. कारण मग तुमच्या मेमसाहेब, म्हणजे मी, चिडतील, आणि साहेबांचं पोट बिघडेल. मग पोट बिघडल्यामुळे ते चिडचिड करतील. त्यांचं त्यांच्या कामात लक्ष लागणार नाही. मग ते त्यांच्या हाताखालच्यांवर चिडतील. मग त्यांच्या हाताखालचे साहेब घरी जाऊन त्यांच्या बायकांवर चिडतील, आणि त्या बायका त्यांच्या नोकरांना रागावतील. आता इतके लोक चिडले, रागावले, यात चूक कोणाची? तुमची.

अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. तुम्ही भारतीय परंपरांना, तुमच्या वाडवडिलांनी काय सांगून ठेवलं आहे त्याला, फार चिकटून असता. त्यात चूक काही नाही, पण ते नेहमी बरोबर असतंच असं नाही. उदाहरणार्थ, चूल पेटवण्यासाठी तुम्ही आगपेटी वापरता. तुमच्या वडिलांना आगपेटी माहीत होती का? नाही. तुम्ही केरोसिन वापरता. तुमच्या आजोबांनी केरोसिन वापरलं होतं का? नाही, कारण तेव्हा आमच्या इंग्लंडातच केरोसिन कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे तुमच्या वडिलांना, आजोबांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आज अस्तित्वात आहेत, आणि त्यांच्यामुळे तुमची कामं सोपी झाली आहेत. आपले साहेब, मेमसाहेब जे जे सांगतात, ते ते आपल्या भल्यासाठी, आपली काम सोपी व्हावीत यासाठीच आहेत, हे तुम्हां स्वयंपाक्यांनी, आणि खानसाम्यांनी म्हणून कायम लक्षात ठेवले पाहिजे. नवं ते सगळं वाईट, असा विचार करणं योग्य नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पूर्वजांनी सांगितलं, लिहून ठेवलं त्यापेक्षा कितीतरी अधिक स्वच्छता पाळायला हवी.

आमच्या देशातल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की, घाणेरडं दूध आणि पाणी यांमुळे अनेक रोग होतात. म्हणून स्वयंपाकघरातल्या नालीजवळ दूध कधीच ठेवू नका. पाण्याचे माठही नालीपासून लांब ठेवा. या नालीत तुम्ही कोंबडीची पिसं, भाजीची देठं, सालं, खरकटं अन्न असं वाट्टेल ते टाकत असता, ही सवयही सोडून द्या. सहा महिन्यांतून एकदा स्वयंपाकघर धुवा आणि भिंतींना चुना लावा. या कामासाठी दोन दिवस तुम्हांला स्वयंपाकातून सुट्टी मिळेल. जमीन सारवलेली असेल तर तिथे फरशा घालण्याची साहेबांना विनंती करा. नालीत साचलेली घाण नीट वाहून जावी, म्हणून तीत सतत पाणी ओता. हे पाणी तुम्हांला केरोसिनाच्या रिकाम्या डब्ब्यांमध्ये भरून ठेवता येईल. कपाटांमध्ये, फडताळांमध्ये वर्तमानपत्रं ठेवा. रात्री झोपण्याआधी सर्व भांडी स्वच्छ धुतली आहेत की नाही, हे बघा. सर्व भांडी धुतल्याशिवाय झोपायचं नाही, असा नियम घालून घ्या. म्हणजे दुसर्‍या दिवशीपर्यंत ती भांडी अस्वच्छ राहणार नाहीत, आणि शिळ्या अन्नाचाही प्रश्न आपसूकच मिटेल.’

सुरुवातीला स्वयंपाकघरं कळकट असली तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. स्वयंपाकघरात भरपूर फडताळं, कपाटं आली. स्वयंपाकघरात वेगळी मोरी बांधली गेली. बाकावर बसून स्वयंपाकी आता भाज्या चिरू लागले. भारतीयांच्या कपड्यांना विचित्र वास येतो, आणि हा वास त्यांनी केलेल्या पदार्थांमध्येही उतरतो, अशी तक्रार अनेकजण करत. त्यामुळे मेमसाहेब आता स्वयंपाकी स्वच्छ कपडे घालतात की नाही, याकडे लक्ष देऊ लागल्या. भांडी घासण्यासाठी वॉशिंग सोडा वापरला जाऊ लागला. नव्या चुलीही बांधण्यात आल्या. साधारण तीन फूट उंच, पाच फूट लांब आणि तीन फूट रुंद अशा आकाराचा मातीचा ओटा असे. या ओट्याला समोरून चारपाच मोठी छिद्रं असत, आणि ही छिद्रं वरच्या बाजूला उघडत असत. या वरच्या छिद्रांवर जाळी बसवलेली असे. समोरच्या छिद्रांमधून कोळसा आत सरकवला जाई. कोळसा पेटवण्याच्या आणि पेटता ठेवण्याच्या कामी एका नोकराची नेमणूक केलेली असे. या चुलीवर एकावेळी पाचसहा भांड्यांमध्ये स्वयंपाक करता येत असे. याशिवाय तिझल नावाची तीन पायांवरची एक छोटी चूल असे. या चुलीला कोळशांसाठी समोरून एक लहानसा दरवाजा असे. भाज्या, चिकन, मासे भाजण्यासाठी या चुलीचा वापर केला जाई. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वयंपाकासाठी तांब्याची भांडी वापरली जात. मग नंतर अ‍ॅल्युमिनियमची भांडी आली. एग बीटर, पेस्ट्री कटर, पोटॅटो मॅशर, लेमन स्क्वीझर, बँ मारी अशी उपकरणं स्वयंपाकघरात असली तरी त्यांचा वापर मात्र क्वचितच केला जाई, कारण ती वापरायची कशी, हे स्वयंपाक्याला ठाऊक नसे. 'द इंग्लिशवुमन इन इंडिया' या पुस्तकात लेडी रेसिडेण्टनं स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तूंची यादी दिली होती - 'स्वयंपाकघरात पुरेसे काटे, चमचे असावेत. तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींची संख्या, तुमच्याकडे साधारण किती व्यक्ती जेवायला येतात यांचा अंदाज घेऊन काट्याचमच्यांची संख्या ठरवा. हे काटेचमचे चांदीचे नसावेत. भारतात चोर्‍या खूप होतात, आणि चांदीच्या भांड्यांवर आधी डल्ला मारला जातो. ही चांदी वितळवून मूर्ती घडवल्या जातात. त्यामुळे इलेक्ट्रोप्लेटेड भांडी वापरावीत. चार जणांचं कुटुंब असेल तर करीसाठी डझनभर ताटल्या, भांड्यांसाठी झाकणं, दोन कॉफीपॉट, दुधासाठी दोन मोठे जग, बिअरसाठी एक जग, एक डिनर सेट, एक ब्रेकफास्ट सेट हे अत्यावश्यक आहे. जेवणासाठी दोन टेबलं असावीत, आणि मेणबत्त्यांसाठी निदान पंधरा स्टँडं असावीत. भारतातल्या नोकरांना बसल्याबसल्या तंद्री लावून सुर्‍या जमिनीवर घासण्याची सवय असते, शिवाय या सारख्या चोरीलाही जातात. म्हणून सुर्‍यांच्या लाकडी मुठीवर तुमचं नाव घाला, आणि सुर्‍या कशा वापरायच्या, हे नोकरांना शिकवा. तुमच्याकडे नेहमी पार्ट्या होत असतील तर वेगळा डेझर्ट सेट विकत घ्या. शिवाय वाइन, शॅम्पेन यांच्यासाठी साजेसे चषक, चीझसाठी छोट्या डिश, सोड्यासाठी ग्लास, पाण्यासाठी मोठे ग्लास, दोन डिकॅण्टर यांचीही खरेदी करा. पापिये माशेचे चार मोठे आणि दोन लहान ट्रे तुमच्या घरात असावेत. जपानी ट्रे महाग असतात, त्यामुळे ते घेतले नाहीत तरी चालतील. मात्र पत्र्याचे ट्रे चुकूनही वापरू नका. त्यांचा फार आवाज होतो, आणि ते दिसतातही बटबटीत. याशिवाय (फार उंच नसलेले) जेली मोल्ड, केक भाजायला वेगवेगळ्या आकाराचे ट्रे, वजनकाटा, खलबत्ता, लाटणं, चाळण्या, बिस्किटकटर इत्यादी स्वयंपाकघरात असावेतच.’ एकोणिसाव्या शतकातली ही यादी स्वयंपाकघराच्या किमान गरजा भागवण्यासाठी पुढची अनेक दशकं वापरली गेली.

हॉट केस या खास अँग्लो-इंडियन वस्तूचा उल्लेख मात्र एखाददुसर्‍याच पुस्तकात आढळतो. हा एक जाड, पत्र्याचा डबा असे. या डब्यात भरपूर कोळसे ठेवता येतील असं मातीचं एक पसरट भांडं असे. हॉट केशीतले हे निखारे जेवण गरम ठेवत असत. ही हॉट केस घराच्या मागच्या व्हरांड्यात ठेवलेली असे. स्वयंपाकघर जेवणाच्या खोलीपासून लांब असल्यामुळे टेबलावर पोहोचेपर्यंत अन्न थंड होऊ नये, म्हणून ही हॉट केस वापरली जाई. हॉट केशीत एकाच वेळी दोनतीन भांडी मावत असल्यानं स्वयंपाकघरापर्यंत सारख्या चकरा माराव्या लागत नसत. शिवाय बंगालात स्वयंपाकाच्या खोलीपासून मुख्य घराकडे जाणारा रस्ता हा बांबूच्या ताट्यांना झाकलेला असे. इतरत्र मात्र तशी सोय नव्हती. ’कावळा उडत आला, आणि भांड्यातला चिकनचा तुकडा उचलून उडाला’, अशा तक्रारी मग खिदमतगार करत. तेव्हा अशी उघडी भांडी नेण्यापेक्षा हॉट केस वापरली जाई. पक्ष्यांचा जसा त्रास, तसा किटकांचाही उपद्रव असे. चांगली दुकानं नसणार्‍या गावांमध्ये मेमसाहेब वस्तूंची साठवण करत. पण मुंग्या, किडे यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून अशा वस्तू पाण्यातल्या तिवईवर ठेवल्या जात. काही उत्साही मेमसाहेबांनी साठवणीच्या खोलीत लहान खंदक बांधून घेतले होते. या खंदकांमध्ये पाणी असे, आणि मध्ये टेबलावर साठवण केली जाई. या खोलीत तांदूळ, डाळी, साखर, चहाकॉफी आणि डबाबंद पदार्थ साठवले जात. या खोलीतूनच मेमसाहेब स्वयंपाक्याला रोजच्या स्वयंपाकासाठी पदार्थ काढून देत. अनेक पुस्तकांमध्ये वाणसामानाची यादी कशी करायची, याचं मार्गदर्शन केलेलं सापडतं. बॅचलरांसाठी, दोनचारसहादहा जणांच्या कुटुंबासाठी, बॉम्बेकलकत्तामद्रास इलाख्यांत राहणार्‍यांसाठी अशा वेगवेगळ्या याद्या दिलेल्या असत. कॉन्स्टन्स गॉर्डन यांनी अँग्लो-इंडियन क्विझिन अ‍ॅण्ड डोमेस्टिक इकनॉमी या पुस्तकात बॅचलरांसाठी महिनाभराच्या वाणसामानाची यादी दिली होती.

१ पाउंड चहा (जर दिवसातून दोनदा घेत असाल तर)
१ बाटली व्हिनेगर
१ बाटली सॅलड ऑइल
१ डबा कॉर्नस्टार्च
१ बाटली मश्रूम केचप
१ डबा चीज बिस्किटं
२ पाकिट साखर
१ बाटली व्हॅनिला फ्लेव्हरिंग
३ डबे खारावलेले मासे
३ बाटल्या जॅम
१ बाटली पांढरी मिरी
१ बाटली काळी मिरी (स्वयंपाक्यासाठी)
१ बाटली फ्रेंच प्रुन
१ पाकिट सुंठ
१ बाटली बोव्हरील (अचानक पाहुणे आले तर सूप बनवण्यासाठी)
२ वड्या साबणाच्या
१ काडेपेटी

युरोपीय वस्तूंचं मेमसाहेबांना आणि नोकरांना फार महत्त्व वाटे. फडताळांमध्ये हवाबंद डबे हारीनं मांडून ठेवले जात. या युरोपीय वस्तू सहज मिळाव्यात म्हणून बहुतेक प्रत्येक शहरात युरोपीय दुकानं उघडण्यात आली होती. मोठ्या शहरांमध्ये अनेक दुकानं असल्यानं स्पर्धा होती, आणि साहजिकच योग्य त्या किमतीत वस्तू मिळत असत. लहान शहरांमध्ये मात्र एखादंच दुकान असल्यानं दुकानदारांची मनमानी चाले. अनेकदा दुप्पटचौपट किमतीला ते वस्तू विकत असत. वाचकांच्या पत्रव्यवहारातून मग या लुटीविरुद्ध आवाज उठवला जात असे. काही दुकानदार मात्र त्यांच्या सचोटीसाठी प्रसिद्ध होते. त्यांपैकी एक हावेल. पाटण्याजवळ गंगेच्या काठी सुरुवातीला त्याचं लहानसं दुकान होतं. दुकानामागे भाज्यांचे वाफे होते. शेजारी पोल्ट्रीफार्म, गोठा, वाइन सेलर, धान्याचं कोठार होते. पार कलकत्त्याहून लोक त्याच्या दुकानात येत. धान्य, दारू, मांस एकाच ठिकाणी मिळत असल्यानं हावेलचं दुकान फार सोयीचं होतं. पुढं त्यानं दुकानात क्रोकरी, दागिने, युरोपीय फळं, डबाबंद पदार्थ आणि खारावलेले मासे विकायला सुरुवात केली. हावेलच्या दुकानातल्या खारावलेल्या माशांसाठी भारतभरातून ऑर्डरी येत.

पाटण्यातलं हावेलचं दुकान जसं प्रसिद्ध होतं, तसंच मद्रासमधलं व्हिटलेही बर्‍यापैकी नावाजलेलं होतं. तरीही युरोपातून जहाजं घेऊन येणार्‍या खलाशांशी स्पर्धा या दुकानांना करावी लागत असे. हे खलाशी कप्तानाशी संगनमत करून डबाबंद लॉबस्टर, ऑयस्टर, रेनडिअरची जीभ, सुकामेवा, मद्य, हॅम इत्यादी कलकत्त्यात विकण्यासाठी आणत. जहाज बंदराला लागलं की कलकत्ता गॅझेटात जहाजावरून आलेल्या सामानाची जाहिरात झळकत असे, आणि मग दुकानांपेक्षा कमी किमतीत मिळणार्‍या या वस्तू विकत घेण्यासाठी एकच झुंबड उडे. काही खलाशी तर आणलेलं सामान छोट्या होड्यांमध्ये घालून गंगेच्या काठांवर वसलेल्या गावांमध्ये व्यापारासाठी जात. युरोपीय दुकानं नसलेल्या गावांमध्ये या खलाशांची भरपूर कमाई होई.

armyandnavystore.jpg

भारतात रेल्वे आल्यानंतर मालवाहतुकीचा वेग वाढला. पूर्वी कलकत्त्याच्या दुकानातून ऑर्डर केलेली एखादी वस्तू बॉम्बे प्रांतातल्या एखाद्या गावी पोहोचायला सहा महिनेही लागत, ती आता दहाबारा दिवसांत मिळू लागली. अँग्लो-इंडियनांनी मग मोठ्या शहरांमधल्या युरोपीय दुकानांमधून वस्तू ऑर्डर करायला सुरुवात केली. अशाप्रकारे मागवलेल्या वस्तू महाग पडत, पण लहान गावांमधल्या युरोपीय दुकानदारांकडून होणार्‍या फसवणुकीपेक्षा हा जास्त दर देणं परवडे. १८९१ साली बॉम्बेत, मग पुढच्या वर्षी कराचीत आणि १९०१ साली कलकत्त्यात द आर्मी अ‍ॅण्ड नेव्ही स्टोअर्सनं आपल्या शाखा सुरू केल्या, आणि लोकांची मोठीच सोय झाली. मेल ऑर्डर डिलिव्हरीसाठी या दुकानाची ख्याती होती. त्यांचा कॅटलॉगच शंभर पानी होता. युरपातून मागवलेल्या भाज्या, फळं, मांस बर्फाच्या पेट्यांमधून, स्वतंत्र रेल्वेगाड्यांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचत. कुठल्या तारखेला पार्सल ग्राहकाच्या हाती पडेल, हे आगाऊ कळवलेलं असे. दिलेल्या तारखेपेक्षा एक दिवसही उशीर झाला, तर ग्राहकाला नुकसानभरपाई दिली जाई. ऑस्ट्रेलियातलं मांस, फ्रांसच्या आणि स्पेनच्या वाइन अगदी अलाहबाद, जळगाव आणि सालेम या गावी पोहोचवणारं हे एकमेव दुकान होतं.

सतराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत अँग्लो-इंडियनांच्या जीवनशैलीत बदल झाले, तशा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. एकेकाळी रोज करी, भात खाणारे साहेब नंतर सकाळसंध्याकाळ फ्रेंच जेवणाचे भोक्ते झाले. या बदलाविषयी पुढच्या भागात...

annamend.jpg

*****

टिपा -

१. ह्या विशाल पृथ्वीचे असे कितीसे आहे मला ज्ञान? - 'ऐतगान' या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांच्या कवितेचा श्री. पु. ल. देशपांडे यांनी श्री. प्र. श्री. नेरुरकर यांना लिहिलेल्या पत्रात केलेला अनुवाद. 'पु. ल. : एक साठवण' (संपा. जयवंत दळवी) या ग्रंथातून साभार, © मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.

२. बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता ही शहरांची तत्कालीन नावं वापरली आहेत.

*****

चित्रांचा तपशील -

१. इस्ट इंडिया कंपनीची सुरतेतली वखार - थॉमस सामन यांनी काढलेलं चित्र, १७५१. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

२. कलकत्त्यातल्या एका नबॉबाचं घर - फ्रेडरिक फीबिग यांनी काढलेलं आणि हाताने रंगवलेलं छायाचित्र, १८५१. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

३. जन. विल्यम पामर याचं त्याच्या जनान्या-मुलांसह योहान झोफनी यानं काढलेलं तैलचित्र. विल्यम पामर हा वॉरन हॅस्टिंग्सचा खाजगी सचिन होता. योहान झोफनी हा राजचित्रकार होता. ब्रिटनच्या आणि इटलीच्या दरबारात त्यानं नोकरी केली होती. अठराव्या शतकाच्या शेवटी तो दोन वर्षं लखनऊला येऊन राहिला होता. या काळात त्यानं भारतीय जीवनशैली दाखवणारी अनेक चित्रं रेखाटली. हे चित्र त्यांपैकीच एक. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन

४. व्हिक्टोरिया राणीपुढे नतमस्तक भारतमाता - 'पंच' मासिकात आलेलं कार्टून, १८६२, © द पंच कार्टून लायब्ररी, लंडन.

५. उत्तर भारतातल्या कुठल्याशा घरातले नोकर - बूर्न आणि शेफर्ड यांनी काढलेलं छायाचित्र, १८७०. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

६. साहेब आणि भारतीय नोकर - 'करी अ‍ॅण्ड राइस ऑन फॉर्टी प्लेट्स' या पुस्तकातील एक चित्र. चित्रकार अज्ञात. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

७. बाजारातून खरेदी करून परतणारे खानसामा आणि कुली - श्री. बनी लाल यांनी काढलेलं जलरंगांतलं चित्र, १८८०. कंपनी पेंटिंग शैलीतलं हे चित्र आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही शैली विकसित झाली. इंग्रजांना आवडतील असे रंग वापरून त्यांच्या दिवाणखान्यात टांगण्यासाठी ही चित्रं रंगवली जात. बंगालातल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात या शैलीचा उगम झाला, आणि नंतर पाटणा, वाराणसी, लखनऊ या शहरांमधल्या चित्रकारांनी या शैलीत अनेक चित्रं रंगवली. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

८. भारतीय स्वयंपाकी - फ्रान्स्वाझ बाल्थझार सॉल्व्हिन यानं काढलेलं कंपनी शैलीतलं एचिंग. १७९१-१८०३ या काळात सॉल्व्हिन भारतात होता. सामान्य भारतीय, त्यांचे सण, रोजचं जीवन इत्यादी दाखवणारी अडीचशे एचिंग त्यानं काढली. © रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह, ज्यु.

९. मसालची - निकोलस आणि कर्थ यांनी काढलेलं छायाचित्र, १८९३. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

१०. चहा ओतताना खिदमतगार - बूर्न आणि शेफर्ड यांनी काढलेलं छायाचित्र, १८७०. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

११. हुकाबरदार - फ्रान्स्वाझ बाल्थझार सॉल्व्हिन यानं काढलेलं एचिंग. © रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह, ज्यु.

१२. हुक्का ओढताना सोल्व्हिन - फ्रान्स्वाझ बाल्थझार सॉल्व्हिन यानं काढलेलं सेल्फ-पोर्ट्रेट. © रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह, ज्यु.

१३. खिदमतगार आणि त्याचे मदतनीस - बूर्न आणि शेफर्ड यांनी काढलेलं छायाचित्र, १८७०. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

१४. स्वयंपाकी आणि स्वयंपाकघर - चित्रकार अज्ञात. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

१५. मोज्याने कॉफी गाळणारा स्वयंपाकी - 'रफिंग इट आउट इन सदर्न इंडिया' या पुस्तकातलं चित्र, चित्रकार अज्ञात, प्रताधिकारमुक्त.

१६. द आर्मी अँड नेव्ही स्टोअर्सच्या बॉम्बे आणि कलकत्त्यातल्या इमारती - या दुकानाच्या जाहिरातीमधून घेतलेलं चित्र. © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.

*****

विशेष आभार - सॅण्ड्रा पॉलेट (ब्रिटिश लायब्ररी, लंडन), श्री. रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह, ज्यु, द पंच कार्टून लायब्ररी, लंडन. श्री. अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई)

*****

मुख्य संदर्भ -

१. The Recipe Reader : Narratives - Contexts - Traditions, Edited by Janet Floyd and Laurel Forster, Ashgate Publishing Ltd., England, 2003.

२. Reversing the gaze : Amar Singh's Diary, A Colonial Subject's Narrative of Imperial India, Edited and commentary by Susanne Hoeber Rudolph and Lloyd L. Rudolph with Mohan Singh Kanota, Oxford University Press, 2000.

३. Indian Outfits & Establishments : a practical guide for persons about to reside in India; defining the articles which should be taken out, and the requirements of home life and management there, An Anglo-Indian, Upcott Gill, London, 1882.

४. Curry and Rice : The ingredients of Social Life at 'Our Station' in India, George Francklin Atkinson, Day & Sons (Lithographers to the Queen), London, 1866

५. The Wife's Help to Indian Cookery, W. H. Dawe, Elliot Stock, London, 1888.

६. Guide to Indian Household Management, Mrs Eliot James, Ward, Lock and Co., London, 1879.

७. The Indian Cookery Book : A Practical Handbook to the Kitchen in India, Adapted to the Three Presidencies; Containing Original and Approved recipes in Every Department of Indian Cookery; Recipes for Summer Beverages and Home-Made Liqueurs; Medicinal and Other recipes; Together with a Variety of things worth knowing, A Thirty-Five Years' resident, Wyman & Co. Calcutta, 1869

८. Hints for the First Years of Residence in India, Annie Campbell Wilson, Clarendon press, Oxford, 1904.

९. An Englishwoman in India: the memoirs of Harriet Tytler, 1828-1858, Harriet Tytler, Oxford University Press, London, 1986.

१०. The Ruling Caste : Imperial Lives in the Victorian Raj, David Gilmour, John Murray, London, 2005.

११. Married to the Empire : Gender, Politics and Imperialism in India, 1883-1947, Mary A. Procida, Manchester University Press, Manchester, 2002

१२. Women of Anglo-India - Tales and Memoirs, Ed. Margaret Deefholts and Susan Deefholts, CTR Inc. Publishing, New Jersey, USA, 2010.

१३. Indian Domestic Economy and Receipt Book; comprising numerous directions for plain wholesome cookery, both oriental and english; with much miscellaneous matter, answering for all general purposes of reference, connected with household affairs, likely to be immediately required by families, messes and private individuals, residing at the presidencies or out-stations, by the author of 'Manual of Gardening for Western India', Press of the Society for Promotion of Western Knowledge, Vepery, Madras, 1860.

१४. Food Culture in Colonial Asia - A Taste of Empire, Cecilia Leong-Salobir, Routledge, London, 2011.

१५. The Englishwoman in India, A Lady Resident, Smith, Elder & Co., London, 1864.

१६. Indian Cookery General for Young House-Keeprs, An Anglo-Indian [Mrs. J. Bartley], Thacker & Co., Bombay, 1935.

१७. Lady Curzon's India: Letters of a Vicerine, Ed. John Bradley, Weidenfeld and Nicholson, London, 1985.

१८. Memoirs of a Gentleman, Who Remained Several Years in the East Indies, C.W. J. Donaldson, London, 1774.

१९. Modern Indian Etiquette: Of Mixed Society, Describing Ancient Indian Usages and Important Modern Indian Manners and Customs, Aiming at Social Amity between Indians and Non-Indians, El Edroos and Fakhruddin Aboobaker, Printed by HR Scott at the Mission Press, Surat, 1921.

२०. The Complete Indian Housekeeper and Cook, Flora Annie Steel and Grace Gardiner, Oxford Printing Press, London, 2010.

२१. Roughing it out in Southern India, Mrs. M. A. Handley, Edward Arnold, London, 1911.

२२. The Memsahibs: The Women of Victorian India, Pat Barr, Allied, Bombay, 1978.

२३. Memsahibs Abroad - Writings by Women Travellers in Nineteenth Century India, Ed. Indira Ghose, Oxford University Press, New delhi, 1998.

२४. The Nabobs: A Study of the Social Life of the English in Eighteenth Century India, Percival Spear, Curzon Press, London, 1980.

२५. Women and Empire - Representations in the writings of British India (1858-1900), Indrani Sen, Orient Longman Pvt. Ltd, Hyderabad, 2002.

२६. Real and Imagined Women: Gender, Culture and Postcolonialism, Rajeswari Sunder Rajan, Routledge, London and New York, 1993.

२७. The General East India Guide and Vade Mecum for the Public Functionary, Government Officer, Private Agent, Trader or Foreign Sojourner in British India and the Adjacent Parts of Asia Immediately Connected with The Honourable The East India Company. Being A Digest of the work of the Late Capt. Williamson, with many improvements and additions, embracing the most valuable parts of similar publications on the statistics, literature, official duties and social economy of life and conduct in that interesting quarter of the world, J. B. Gilchrist, Kingsbury, Parbury & Allen, London, 1825.

२८. Life in the Mofussil, or The Civilian in Lower Bengal, G. Graham, C. K. Paul & Co., London, 1878.

२८. Domesticity in colonial India: what women learned when men gave them advice, Judith E. Walsh, Rowman & Littlefield Publishers, Inc., USA, 2004.

*****

स्रोत -

भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे, ब्रिटिश लायब्ररी, पुणे, सिनसिनाटी विद्यापीठ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठ.

*****

या लेखातील कोणतेही चित्र अथवा (संक्षिप्त वा संपूर्ण) मजकूर इतरत्र वापरण्यास परवानगी नाही.

*****

क्रमशः

*****

प्रकार: 

फारच सही माहिती!!!

धन्यवाद चिनूक्स.. या सगळ्या मालिकेतुन खुप काही नविन माहिती मिळाली Happy

सध्या आमच्या कडे "एंपायर" नावाची एक मालिका सुरु आहे यात ब्रिटीशांचे साम्राज्य, त्यांच्या कॉलनीज आणि त्याबद्दल माहिती आहे.. यात देखिल इंग्रजांचे भारतातिल वास्तव्य, त्यांच्या खाण्याच्या आवडी इ इ बद्दल जेरेमी पॅक्समन बोलतो आहे.. बीबीसी ची डॉक्युमेंट्री आहे.. जाला वर सापडेल कदाचित.

बादवे, तु अजुन इतका वेळ जागा Uhoh

उत्तम व दर्जेदार.
पहिली कविता फार छान आहे व व्हिज्युअल अगदी समर्पक आहे. विक्तुरिया राणीचा विनोद फार मस्त जमून गेला आहे. ह्या जीवनशैलीचे पडसाद भारतातील सैन्याधिकार्‍यांच्या जीवनात उमटलेले दिसून येतात.
हैद्राबादेस एक साहिब सिंग सुलतान नावाचे उत्तम रेस्तराँ आहे. तिथे वरील काळातील रेल्वेचा डबा असल्यासारखे डेकोरेशन व थीम आहे. वरील प्रमाणे साहेबाच्या काळातील खानसामे, रेल्वेच्या घोषणा
आणि त्याकाळातील उत्तम अन्न तिथे मिळते. तिथे जेवणे हा अतिशय सुखद अनुभव आहे. आत्ता समोरून साहेब व गोरी मेम येइल कि काय असेच वाट्ते. सर्व स्टाफही त्याकाळातील रेल्वे कर्मचार्‍यांचे कपडे घालून असतो व अगदी अदबीने वागतो. रोड नं १ व १० बंजारा हिल्स, सिटी सेंटर मध्ये आहे.
इथे सुप्रसिद्ध आटा चिकन पण मिळते. चार मजबूत खाणारे असल्यास ते मागवावे.

निम्मा लेख वाचला. हुश्श ! एका दमात खूप माहिती दिली आहे. इंटरेस्टिंग आहे.

ही सगळी माहिती जमा करुन (?) लेख लिहायला किती वेळ/दिवस लागतात ?

धमाल आहे!
पॉशची व्युत्पत्ती महान आहे.
इंग्रज आणि आपलं नातं कसं बनत गेलं हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा दोन पूर्णपणे भिन्न आणि आपापल्या परीने समृद्ध संस्कृतींची ही देवाणघेवाण जगाच्या इतिहासातील एक जबरदस्त घटना आहे. इतर साम्राज्यवादी देशांच्या बाबतीत अशी घुसळण फार कमी झाली. स्पॅनिश, पोर्तुगिज यांनी स्थानिक संस्कृती उदा. इंका पार उध्वस्त केल्या.
आपल्या आणि त्यांच्या संबंधांवर भारतीय बाजूने केलेले तात्कालिन लिखाण आहे काय? म्हणजे राजकियदृष्ट्या लिहिलेले नव्हे तर 'द वे वुई पर्सिव्हड देम' असे?
अमा म्हणते तसे आपल्या सैन्याच्या कल्चरमधे या सर्वांचे प्रतिबिंब अजून आहे, आणि प्रत्येक बाबतीत 'दस्तुरी' काढणार्‍या आपल्या नोकरशाहीतही!
तुझ्या अभ्यासाला आणि कष्टाला सलाम. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही नुसतीच माहितीची जंत्री नाही, तर बदलत्या समाजव्यवस्थेचे समालोचन आहे.
तरीही, मुद्द्यावर यायला तू जरा वेळ लावतोस असे वाटते. ते सुरुवातीचे अनाहिताचे उदाहरण नसते तरी चालले असते.
काही वर्षांपूर्वी 'परदेश' नावाची मराठी कादंबरी वाचली होती त्याची आठवण झाली.

बाप्रे !!! . . . .किती पूर्वतयारी लागली असेल याला . . . किती दिवस? . मस्त झालाय .. खरेतर आर्धाच वाचून झलाय आजून .
आणि 'अनाहिता' किस्सा वाचून त्याचा या लेखात काय संबंध असे वाटले होते. मग कळले.

छान

मस्त लिहिलय. (आणि कित्त्ती लिहिलय!!!)

पॉश वाचून एकदम मजा वाटली. घरातल्या खलाशाना सांगण्यात येइल. Proud

वा!

खूप मस्त. एवढे श्रम घेउन लेख लिहील्याबद्दल, माहिती आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
त्याकाळातल्या पद्धतींबद्दल खूपच माहिती मिळाली. नंतर परत सविस्तर प्रतिक्रिया लिहीते. लेख नक्कीच परत परत वाचेन. Happy

माहिती अप्रतीम आणि सुंदर लेख. साधारण याच विषयावर आशा कर्दळे यांचे एक पुस्तक होते. ईंग्रज मेमसाब्चे भारतातील अनुभव. पण या लेखाइतका सांगोपांग विचार मला त्यात नव्हता वाटला. अर्थात ती कादंबरी होती.

वाचणार आहे सावकाश, पण नवीन लेखन मध्ये हा धागा दिसल्यावर राहवले नाही व आले. प्रतिसाद वाचून झाल्यावर नंतर देईनच. Happy

अर्धाच वाचून झाला. मस्त आहे. पण खरच २-३ भागात विभागून यायला हवा होता असं वाटलं.
डोक्यात माहितीचा स्फोट होतो आहे असं वाटलं. आणी यात खराच इंटरेस्ट असल्याने वाचताना ब्रेक हवा असं वाटलं. उरलेला वाचेन लवकरच.

ह्या मालिकेतील प्रत्येक लेखाचा फॉर्मॅटच तसा आहे. गाभा अन्न व अन्ना भोवती गुंफलेल्या संस्कृती, शोधपूर्ण माहिती असा असला तरी प्रत्येक लेखात एक दुसरा तितकाच मजबूत धागा विणलेला आहे. जसे इथे अनाहितेचा किस्सा आहे.
दोन्ही एका बिंदूवर एकत्र येतात व पुढे मग अन्नविषयक माहिती सुरू होते.

लेख दोन भागात आहे म्हणून प्रतिक्रिया पण दोन भागात. Happy

एखाद्या अनुभवावरून किंवा पुस्तक वाचून मत बनवू नये हा मुद्दा बरोबर आहे.

नेहमीप्रमाणॅच उत्तम लेख. खूपच माहितीपूर्ण....

तरीही, मुद्द्यावर यायला तू जरा वेळ लावतोस असे वाटते. ते सुरुवातीचे अनाहिताचे उदाहरण नसते तरी चालले असते. >>>आगाऊला अनुमोदन. Happy दिल्लीवरचा लेख माहेर मासिकात वाचला. त्यात माबोवर असलेलं शिल्पाचं वर्णन, कविता वगैरे काही नाहीये. तरी कुठे अपूर्ण वाट्त नाही..

फारच छान लेख चिनूक्स. ग्युटेनबर्ग प्रोजेक्ट अंतर्गत काही प्रताधिकारमुक्त पुस्तके उपलब्ध आहेत त्यातील एडवर्ड एल्विन या लेखकाचे 'इंडिया अँड द इंडियन्स' हे पुस्तक मी गंमत म्हणून वाचले होते. त्यात ह्या लेखातल्या धाटणीची वर्णने वाचून मजा वाटली होती व त्याचबरोबर किती बारीक सारीक नोंदी लेखकाने केल्या आहेत ते वाचून आश्चर्यही वाटले होते.

अश्विनीमामी + १ < एखाद्या अनुभवावरून किंवा पुस्तक वाचून मत बनवू नये हा मुद्दा बरोबर आहे.> अगदी!

लेख खूप मोठा आहे, पण माहिती इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आस्वाद घेत सावकाऽऽऽऽऽऽऽऽऽश वाचावी अशीच...

'द कम्प्लिट इंडियन हाउसकीपर अ‍ॅंड कूक' भारीच असावं. Happy
पॉश बेस्ट.

नबॉब वगैरे प्रकार माहिती नव्हता. व्यापारी आणि राज्यकर्ते अशा बदलाच्या ओघाने आलेले बदलही वाचनीय!
आपला देश काहीतरी जादूई आहे पण.
<< लालचुटून ओठांचे, रक्त ओकणारे आपले देशबंधू बघून सुरतेस नव्यानं दाखल होणारे ब्रिटिश व्यापारी चांगलेच दचकायचे. >>हुक्का पिणारे /पान खाऊन रक्त ओकणारे ब्रिटीश वगैरे कसलं वाटतंय... Proud

आपला देश सोडून दुसरीकडे जाऊन तिथे व्यापार आणि शेवटी राज्य करण्याच्या ब्रिटीश/इतर सर्व दर्यावर्दी लोकांच्या स्वप्नाला, प्रयत्नांना आणि शौर्याचं कुतुहल वाटतं. अंगात लय दम असावा लागतो!

हे सगळं (अनुभव / हाऊटू इ. ) लिहून ठेवण्याची त्यांची बुद्धी/सवय(?) तर फार भारी!

-------

चिनुक्सा! महान लेख आहे!

खरं तर चिनुक्साची मुलाखत घ्यायला हवी कोणीतरी की हे लेख लिहीताना त्याची प्रोसेस कशी आहे. इतकी प्रचंड माहिती मिळवताना त्यातलं नक्की काय घ्यावं, काय नाही वगैरे सगळ्याचा विचार करणं हे अशक्य अवघड असावं.
खाण्याच्या बाबतीत एखादा इतकं काही शोधू/वाचू/बोलू शकतो यावर माझा विश्वासच बसला नसता.
___/\___

बावाऽऽऽ ... तू नादखुळा!!!

ही लेख मालिका पुस्तकरूपात लवकर येवो म्हणजे विकत घेता येईल. अतिशय उत्तम लेखन, अवलोकन! I am your fan Chinux! Excellent penmanship!

जबरी आहे अजुन पूर्ण वाचायचा आहे Happy

>>>>>>अमुक एक गाणं ऐकलं की पोट साफ होतं, असं सांगणारे विद्वान तेव्हा नसल्यानं दुसरा दिवस आनंदात जावा, म्हणून रात्री ताडीचं सेवन करण्याचा काहींचा रिवाज होता
Rofl सही हाणलाय...

खरंच महान! मुद्द्यावर यायला वेळ लागत असला, तरी 'लेखाची वीण' याबाबत विचार केला तर इथं ते तसं करणं गरज असल्यागत वाटलं. प्रस्तावनेबाबतही तसंच. (तेंडूलकर लेखमालेच्या प्रस्तावनाही अशाच अफाट आणि अभ्यासपूर्ण, औचित्यपूर्ण होत्या.)
काहीच ठाऊक नसलेल्या खूप मनोरंजक गोष्टी समजल्या. चित्रांमुळे आणखीच छान वाटले सारं वाचायला. काही चित्रं तर किती सुंदर आहेत! इतका अभ्यास करून आणि संदर्भ शोधून लिहिणं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे.
एका दमात वाचू शकलो नाही. पण ते एका परीने बरंच झालं. धन्यवाद! Happy

सुरुवातीचे काव्य अप्रतिम.... खूपच भावले..

जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी | तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||

हे देखील माझे आवडते.. Happy ह्या लेखातली सर्व चित्र सुंदर आहेत.. Happy आणि संपूर्ण लेख खूपच डिटेलड झालाय..

.................. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.. Happy

Pages