रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
३. उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
५. उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
६. बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्‍या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
७. बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
८. बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
९. बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
१०. बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
११. बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
१२. चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
( बापरे कित्ती बटाटा खातो आपण Wink )

कोबी
१. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
२. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
३. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
४. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
५. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
६. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.

फ्लॉवर
१. फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
३. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.

मेथी
१. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
२. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
३. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
४. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
५. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
६. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.

पालक
१. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
२. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
३. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
४. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.

मसूर
१. मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
२. मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
४. मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.

मूग
१. मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.

वाल
१. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.

कोशिंबीरी
१. काकडीची : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
२. टॉमेटोची : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
३. गाजराची : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
४. बीटाची : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
५. तोंडल्याची : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
६. मूळ्याची : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
७. केळ्याची : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
८. कांद्याची : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
( टिप : कोणत्याही दही घातलेल्या कोशिंबीरीच सफरचंद सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे चिरून टाकले तर फार छान लागते कोशिंबीर )
(वेळ मिळाला की अजून टाकते. तो पर्यंत तुमच्या येऊ द्यात Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा फारच उपयुक्त धागा Happy
नी सारखा तक्ता बनवायची आयडीयाही मस्त.म्हणजे निदान आठवड्या च्या भाज्या आणणं आणि कडधान्ये आठवणीने भिजत टाकण होईल.. आणि खाणं ही होईल.

तुरीची डाळ वापरूनः
१) साधं वरण - तूप

२)तुपाऐवजी वरून तूप्-जिरं- हिरवी मिरची किंवा तेल्-मोहरी-हिंग-लसूण-लालतिखट यांची फोडणी घालून.

३) आंबटवरणः तेल-मोहरी-हिंग्-फोडणीतच हिरव्या मिरच्या, लाल तिखट पोळवून्-यात पाणी ओतून त्यात कैरी किंवा कोकम, गूळ, डाळ.

४)खोबरं-मिरं-लसूण यांचं वाटण घालून.

५) कांदा टोमॅटोचं.

६) धणे-जिरे-मिरे-लवंग्-दालचिनी कुटून्-तेलात पोळवून यावर कच्च्या डाळींब्या घालून शिजवलेलं.

७) सांबार

८)रसम्

९)डाळ-वांगं

९) पालक्-मेथी किंवा तत्सम पालेभाज्या घालून.

१०) ताक्-शिजलेली डाळ एकत्र करून, कढिलिंब-तूप-जिरं-हिरव्या मिरच्यांची फोडणी घालून.

११) फोडणीत कुठल्याही लोणच्याचा खार, तीळ्-खोबरं आणि कांदा घालून.

अवल लिस्ट चांगलीच आहे. पण मायबोलीवरच्या पाककृतींची देखील अशी यादी, लिंकसकट व्हायला
पाहिजे.

बटाट्याचे हिरवे कालवण-------तेल, हिंग,हळद, बटाटा,मीठ, कोकम,हिरवे वाटण(ओले खोबरे,हिरवी मिरची,आले,लसुण)......डाएट करत असाल तर वाटणात ओले खोबरे कमी करुन २ चमचे तांदुळ पिठी वापरावी, याने रस्सा दाट होतो. गरमागरम भाताबरोबर मस्त लागतो. याबरोबर तळलेले मासे असतील तर ...अहाहाsssss
मांसाहार खाणारे बटाटाऐवजी कोलंबी, पापलेट ही वापरु शकतात.

तेलावरची बटाट्याची भाजी...... तेल, हिंग, लाल तिखट, लोणच्याचा मसाला,कोकम,मीठ्,बटाटा.
या ही भाजीत मांसाहार खाणारे कोलंबी, करंदी,पापलेट्,सरंगा वापरु शकतात. पण तेव्हा थोडी आले+लसुण पेस्टही वापरावी.

यादी, माहिती सगळं छान आहे पण कुणी असा एखादा धागा देइल्/काढेल का की ३० मिनिटांचा स्वयंपाक - जास्तीत जास्त ४५ मि. रोजच्या स्वयंपाकाला मला ३०-४५ मि पेक्षा जास्त वेळ घालवायचा नसतो - नंतरच्या साफसफाइ, डिश वॉशर लोड सकट!! आळशीपणामुळे नाही तर बाकीचे बरेच अवांतर उद्योग असतात म्हणून. Wink
८:३०-५:३० नोकरी + प्रवासाचा वेळ आणि ६-७ तासांची झोप या वर अजिबात तडजोड करायची नसेल आणि शेकडो छंद, मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष इ. इ. सांभाळायचे असेल तर घरगुती कामामधे जास्त स्मार्टनेस आलाच पाहिजे आणि म्हणून हे लिमिट घालून घेतल आहे. हाताबरोबर भांडी स्वच्छ करून टाकायची पण बर्‍यापैकी सवय आहे. आता मला हे जमतय पण त्यासाठी काही ठराविक भाज्या, उसळिंचा (लिमिटेड मेनु थोडक्यात) पर्याय आहे. ताज्या पोळ्या तर नाहीच. Happy वन्-डिश्-मील च बर्‍याचदा केला जातो. नॉन व्हेज पण करते कारण एकदा का ओव्हन मधे ते गेल की स्वयंपाकघर सफाईच काम काही नसतं. Happy तर अशा शेकडो व्याप सांभाळणार्‍यांसाठी झट्पट स्वयंपाक मेनू सुचवा.

लाल बिटाची भाजी , बीट टोमॅटो सुप,

बिटाचे छोटे तुकडे करुन थोडे वाफवुन घ्यायचे तुप, जिरं, मोहोरी, लाल तिखट फोड्णीत परतावुन एक वाफ द्यायची, थोडे आमसुल/कोकम घालायचं. सर्व्ह करताना वरुन ओला नारळ कोथिंबीर घालायची एकदम वेगळ्या चवीची भाजी छान लागते.
बिट वाफवुन पाणी राहातं त्यात एक टोमॅटो कच्चाच मिक्सर्ला वाटुन टाकायचा, उकळी काढुन, वरुन मीठ, मिरपुड, आणी थोडसं बटर घालायचं.

स्लाइस्ड बीन्स (श्रावणघेवडा/फरसबी)
पसरट भांड्यात/ पॅनमध्ये फोडणी करणे. तेलात मोहरी + हिंग +मिरच्यांचे मोठे तुकडे. हळद नाही. फोडणीतर ३-४ चमचे उडीद डाळ/मुगडाळ घालणे. दोन मिनीटांनी मिरचीचे तुकडे काढुन घ्यायचे कारण तसेच ठेवल्यास श्रावणघेवड्याच्या तुकड्यांत दिसत नाहीत आणि खण्यात येतात. खमंग फोडणीवर बीन्स टाकणे (इथे फ्रोजन मिळतात तशाच टाकते. थॉ करत नाही) आणि पेशन्स ठेवुन परत परत परतणे. झाकण ठेवु नये. बीन्स शिजल्या की रंग बदलतो. त्यानंतर खोबर्‍याचा किस घालुन ४-५ मिनीटं परतणे. मस्त खमंग भाजी तयार होते! परतायला वेळ लागतो पण इतर कामे उदा. पोळ्या + वरणाला फोडणी+कोशिंबीर होईपर्यंत होऊन जाते.

त टी : आत्ताच घेतलेल्या स्वानुभवानुसार ही भाजी करताना मायबोलीवर डोकावु नये. भाजी परतायची आहे हे विसरायला होतं आणि हमखास भाजी जळगांवला पोहोचते! Biggrin

जुन्या मायबोलीवर ३० मिनिटात स्वैपाक असा बीबी होता असं आठवतय. शोधायला पाहिजे!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/83251.html?1113848963 या लिंकवर ३० मिनिट मील आहेत!!

मला ही लांब लचक स्वंयपक जमत नाहीत>
१. वेगवेगळे पराठे, चटणी / सॉस
२. इडली सांबार चटणी
३. डोसे सांबार चटणी
४. भाज्या घालुन केलेले सँडविच, मिल्क शेक
५. पावभाजी
६. म्यागी Happy
७. भाज्या घालुन केलेला पुलाव, टॉम्याटो सार
८. ऑल टाइम फेवरेट खिचडी (साधी, मसाला, गव्हाची), पालक सुप
९. उकड, कोणतेही सुप
१०. कोणतिही उसळ, चपाती / आंबोळी (रेडी पिठ मिळत बाहेर)
११. भाज्या घालुन बनवलेला उपमा
१२. कोणतही सुप, भजी, पोळी
१३. डाळीचे धिरडे, चटणी, सुप
१४. पोळीत उकडलेले बटाटे, वर कच्चा कांदा, चाट मसाला घालुन फ्र्यांकी रोल

मस्त धागा.
दिनेशदा > पण मायबोलीवरच्या पाककृतींची देखील अशी यादी, लिंकसकट व्हायला
पाहिजे. > +१

हो रीमा, मी तेच करते. मला वैताग येतो १ तास जरी जेवणात घातला तरी. दोन माणसे जरी जेवणात असली तरी वेळ हा लागतोच.

त्यामुळे अर्धा तासात जे काही दोन माणसे करतील ते करते. पालेभाज्या साफ करण्यातच कधी कधी अर्धा तास जातो. त्यामुळे स्टर फ्राय वेजी + बेक असेच मेनु बरे पडतात
त्यावर आवराआवरी असतेच... मग छंद पुरे करायला वेळ कधी मिळणार?

मस्त धागा बराच आधार मिळाला. इथल्या लिस्ट मस्त आहेत. सगळ्यांना धन्यवाद Happy

"आज काय करायचं?" हा सतत सतावणारा प्रश्न .. म्हणुन आम्ही पण एक दिवस सगळ्या पदार्थची नावे लिहीली आणि फ्रिज ला ती लिस्ट लावली होती त्यामुळे जेवणातला तोच तोच पणा कमी झाला.

त्या लिस्ट प्रमाणे मी आठवड्यातुन/महिन्या दोन महिन्यातुन आलटुन पालटुन खालील पदार्थ करते

तसही महिन्यातुन १-२ दा (कधी कधी त्याही पेक्षा) बाहेर खायला जाणं / किंवा थकुन घरी आल्यावर टेक अवे होतच असतं Happy

- पोळी + भाजी (कोणतीही फळ भाजी / पालेभाजी / वांग्याचं भरीत) + कधी सोबत (दुधी/भोपळा/सि.मी. रायता) + कधी उसळ (मोड आलेले मुग/मटकी , चवळी, वाटाणा(हिरवा/पांढरा) )

- भाताचे प्रकार (वांगी भात/ पुलाव / बिर्याणी/ (टोमॅटो / पालक)+कॉर्न राईस/ फ्राईड राईस / मसाला खिचडी/साधी खिचडी)) + सोबत कोशिंबीर / रायता / ताक / कढी / सुप. (सुटेबल कॉबिनेशन तुम्हाला कळेलचं Happy

- जिरा राईस + डालफ्राय / टिपिकल पंजाबी भाजी (पालक पनीर/ छोले/ राजमा / कोफ्ता करी) / वरण (मुग / तुर/ मसुर) + रायता

- पास्ता / पिझ्झा / पनीनी/ फहिता रॅप(माझं फेवरेट) Happy

- डोसा(+चटणी) / इडली(वडा) सांबर / रगडा पॅटिस / मिसळ पाव / वरणफळं / पाव भाजी

- पराठा (मुळा/ पालक/ मेथी /आलु / लाल भोपळा) [कधी ह्याच उंड्याच्या पुर्‍या] Happy / ठेपला / थालीपिठ + सोबत नारळाची चटणी / दही वगैरे

टिप- रायता (बुंदी / काकडी+पुदिना / टोमॅटो+कांदा) [दही+जिरेपुड+चाट मसाला हे घटक पदार्थ कायम]

या जेवायला कधीही Happy

उकडलेल्या बटाट्याची भाजी : लोणच्याचा मसाला लावून
कोबीची बंगाली पद्धतीची भाजी पंचफोरन वापरून >>>>>> भरतजी ह्या भाज्यांची रेसिपी द्याल का? माझ्याकडे थोडा लोणच्याचा मसाला उरला आहे, करुन पहाता येइल Happy
अवल मस्तच धागा.... माझ्या निवडक १०त तर केंव्हाच गेलाय. मला जेवण करण्यापेक्षा, काय करावे ह्याच टेंशन जास्त येतं.

बरोबर आहे रोजरोज काय स्वेपाक करायचा कलत नाही. मलातरदुपारछ्च्या न्याह्रीचे काय करावे कलत नाही.काहीतरी सुचवा.

अच्चे कच्चे? दुपालच्या न्याहलीत पोहे, सांजा, उपमा, ददपे पोहे, तांदलाची उकड, कण्या, भजी, वडे, पानीपुली, शेवपुली, कच्ची दाबेली, चिवडा, लाडु, शंकलपाले,,अप्पे,दोसे, इदली, बाकरवडी आणी अनेक प्लकाल करावेत.

आणी रोजच्या जेवणाचे काय? वर एवढे सारे तोंपासु आणी पौष्टिक, रसरशीत प्रकार सुचवल्यावर ते ही तुम्हाला कमी वाटते? दिवे, मेणबत्ती, कंदिल, टॉर्च काहीही घ्या.

निधप दिसला ग चार्ट!मनापासून धन्यवाद!आजपासून॑ गाईडलाईन म्हणून वापरण्यात येईल ग्!खरचच खूप छान कल्पना आहे.

नीधप, खूप छान चार्ट. मी अलीकडेच संपूर्ण जेवणं करण्या साठी बाई ठेवली आहे. त्यामुळे नेहेमी दोन भाज्या तरी तयार ठेवाव्याच लागतात. त्या येतात पण सकाळी सात वाजता. तुमच्या चार्ट चा खरोखर मस्तच उपयोग होईल आणि त्याप्रमाणे भाज्या अगोदर आणून ठेवता येतील.

दुधी भोपळा किसून त्यात दही,बेसन(हरबरा डाळीचे पीठ ),शेंगा दाण्याचे कुट,रवा,हिरवीमिरची आणि लसून पेस्ट,मीठ चवीनुसार घालावे. हे सगळा इकत्र इक्जीव करून ३० मिनिटे नंतर घावन घाला खूप छान होतात..दुधी न आवडणार्यांना हे छान आवडेल. खूप चटकन होतात.

Pages