रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
३. उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
५. उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
६. बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्‍या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
७. बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
८. बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
९. बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
१०. बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
११. बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
१२. चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
( बापरे कित्ती बटाटा खातो आपण Wink )

कोबी
१. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
२. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
३. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
४. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
५. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
६. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.

फ्लॉवर
१. फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
३. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.

मेथी
१. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
२. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
३. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
४. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
५. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
६. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.

पालक
१. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
२. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
३. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
४. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.

मसूर
१. मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
२. मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
४. मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.

मूग
१. मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.

वाल
१. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.

कोशिंबीरी
१. काकडीची : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
२. टॉमेटोची : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
३. गाजराची : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
४. बीटाची : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
५. तोंडल्याची : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
६. मूळ्याची : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
७. केळ्याची : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
८. कांद्याची : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
( टिप : कोणत्याही दही घातलेल्या कोशिंबीरीच सफरचंद सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे चिरून टाकले तर फार छान लागते कोशिंबीर )
(वेळ मिळाला की अजून टाकते. तो पर्यंत तुमच्या येऊ द्यात Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालक :

दाल पालक

दाल पालक + उकडलेला बटाटा फोडी

पालक बटाटा परतून

पालकाची बेसन लावून गोळा भाजी

ताकातला पालक

पालक दही रायते

पालकाची दाणेकूट + लिंबाचा रस घालून वर फोडणी दिलेली कोशिंबीर - कांदा - टोमॅटोही घालता येतो. (आई त्याला पालक पचडी म्हणते!)

पालक ग्रेव्हीत शिजवलेले सोया चंक्स.

@Reema घावण्यांबरोबर काळ्या वाटाण्यांचे सांबार पण मस्त लागते. शाकाहारी लोकांना चिकन ऐवजी ऑप्शन>
हो हो कांदा खोबर वाटप घालुन जवळ जवळ सगळ्याच उसळी मस्त लागतात घावण्यांबरोबर आणि आंबोळ्यांबरोबरही.

फ्लॉवर :

फ्लॉवर किसलेल्या आल्याबरोबर वाफवून त्याला थोड्याशा लोण्यात परतायचे व वरून मीठ मिरपूड कोथिंबीर घालायची.

फ्लॉवरची धणे, लाल मिरच्या, कोरडे/ओले खोबरे परतून त्याचे वाटण लावून केलेली परतलेली भाजी

फ्लॉवर तूप, जिरे, हि मि च्या फोडणीत परतून वरून ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ.

फ्लॉवर वाफवून त्याचे इतर वाफवलेल्या भाज्यांबरोबर दह्यात रायते.

<हो हो कांदा खोबर वाटप घालुन जवळ जवळ सगळ्याच उसळी मस्त लागतात घावण्यांबरोबर आणि आंबोळ्यांबरोबरही.>

आमच्याकडे काळ्या वाटाण्यांच्या उसळीबरोबर तांदळाच्या पिठाचे वडे असतात

हा एक चार्ट आहे माझा. जो सध्या माझ्या घरात मी वापरतेय. अगदी काटेकोरपणे फॉलो होत नाही. मार्केटात काय मिळतंय, जेवायला घरी यायला वेळ आहे नाही या सगळ्यावर असतं. पण तरी..
चार्टमधे थोड्या थोड्या महिन्यांनी बदल होत असतात. पण घाई घाईमधे दर वेळेला तीच तीच तशीच भाजी आणली जाण्यापेक्षा चार्ट फॉलो करायचा प्रयत्न केला तर सगळ्या भाज्या पोटात जातात आणि भाजीचे रिपीटेशन १५ दिवसाच्या आत नसल्याने कंटाळा येत नाही.
माझ्याकडे स्वैपाक बाई सकाळचीच येते आणि दोन्ही वेळचा करून ठेवते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ एकच भाजी-कोशिंबीर-आमटी असते. २ माणसांच्या घरात तेच सोपे पडते. कधी वेळ आणि उत्साह असेल तर मग मी अधूनमधून काही प्रयोग करते. ते असो.

तर हा घ्या चार्ट Monthly cooking plan.pdf (35.48 KB)

नीरजा Happy पालकाची चना (छोले) पालक अशीही भाजी करता येते, फक्त ती क्वचितच केली जाते.

आमच्याकडे यातील बहुतेक भाज्या दाण्याचा कुट लावुन करतात (रस्सा भाजी).. जसे

वांगे: दाण्याचा कुट लावुन भरली वांगी
दाळवांगं: तुरीची दाळ शिजवुन + वांगी फोडी करुन+ लसुण जिर्‍याची फोडणी

दुधी: दुधीची चौकोनी काप + हरभर्‍याची दाळ + दाण्याचा कुट+ लसुण जिर्‍याची फोडणी हे सगळं कुकरमधुन दोन शिट्ट्या देउन काढावे.

दोडके/ गिलके: चौकोनी काप करुन किंवा मोठे तुकडे ४ चिरा देवुन दाण्याचा कुट लावुन भाजी
दोडके: तुरीची दाळ शिजवुन + दोडक्याचे काप+ लसुण जिरे फोडणी

पालकः तुरीची दाळ शिजवलेली+ पालक + दाण्याचा कुट
गवारः तुकडे करुन दाण्याचा कुट लावुन रस्सा भाजी.

मेथी/ पालकः हिरवी मिरची+ भाजलेले दाणे+ लसुण हे सगळं थोड्या पाण्यात मिक्सरमधे काढावे आणि फोडणीत मेथीची भाजी टाकुन एक वाफ आली की हे सगळं मिश्रण टाकावे.

दुसरी पद्धतः मेथीची पाण्याची भाजी किंवा तुरीची दाळ घालुन भाजी: तुरीची दाळ शिजवुन पाण्यासहीत अशाच फोडणी दिलेल्या आणि वाफेवर शिजवलेल्या मेथीत घालुन.

नी, माझ्याकडे एरर येतेय लिन्क उघडताना, मलाच येतेय की सगळ्यांना येतेय? घरी जाऊन परत उघडुन पाहते.

मानुषीताई, तुम्हाला कशाचा ना कशाचा कंटाळा येतच असेल वा नावडीचे असेलच ना तसेच मला जेवण करायचा कंटाळा.. खरे तर करण्यापेक्षा "काय करावे" ह्याचा कंटाळा. Happy

काय धावतोय हा बाफ!!!!

अवलमाता की जय!! Happy

पण आता पंचाईत अशी झाली आहे की... एव्हढ्या प्रकारातुन आज नेमक काय बनवायच??? Uhoh

मस्त धागा सौ. ना प्रिंट काढून द्यावा लागणार, कालच रोजच्या जेवणाला फाटा देऊन रवा मैदा घावन केले होते त्यात आलं किसून, कडिपत्ता, मोहरीची फोडणी देऊन मस्त घावन केले होते. सोबत नारळाची चटणी.
अधून मधून रात्रीच्या जेवणा एवजी कांदेपोहे, मिसळ घावन असे पदार्थ खायला घालतात.

अतिच्शय उप्युक्त धागा.
अवलः धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
बाकी सगळ्याचे या धाग्यावर माहिती लिहल्याबद्दल धन्यवाद.

अवलः एक विनंती - इथल्या प्रतिसादामधले भाज्या/वन डिश मिल धाग्याच्या हेडर मधे टाकणार का? तेच तेच combo परत होणार नाहीत अन फक्त तुमच्या धाग्याचया हेडर मधली माहिती अम्ही copy केली कि झालं

मन्पुर्वक धन्यवाद.

बाजरीच्या भाकर्‍या नी मटण मालवणि.

ज्वारीच्या भाकर्‍या नी चिकन कोल्हापुरी.

भाकरी नी चहा.......थेपले नी चहा...... बटाटापरोठा, कोबीपरोठा, तुप परोठा नी चहा............ हो कधी मधी एक वेळ असे ही जेवण करु शकता.

वरणफळ ,तुरीच्या डाळीला शिजवून लसूण,मिरच्यांची फोडणी द्यायची आणि पोळ्या लाटून ,कापून टाकायच्या त्यात घालायच्या ,आणि वरून कोथिंबीर घायालाची! भाज्या नसतील तर भारतीय पास्ता म्हणून खपवायला छान!

मस्त पदार्थ सुचवले आहेत साऱ्यांनी. त्यातले आवडते पदार्थ लिस्ट करून प्रिंट करून ठेवले पाहिजे म्हणजे काय करू ,काय करू असे होणार नाही!

हे अस सगळ एकत्र लिहिण्या पेक्षा अ‍ॅडमिनला सांगुन एक वर्गवारी करता येईल असा धागा चालु करता येईल का ?

अवल,मस्त धागा!
>>>( बापरे कित्ती बटाटा खातो आपण )<<<तुझ्या बटाटा भाजी प्रकारांव्यतिरिक्त तू कोबी,फ्लॉवर,पालक,मेथी मध्येही बटाटा घातला आहेस म्हणून मी वालात पण घालते! Wink
वालाची उसळ...
मोड आलेले सोललेले वाल,
उकडलेला बटाटा Happy ,हिरवीमिरची,आलं,लसूण,हिंग,मोहरी,जिरे,कढीपत्ता,हळद,कांदा,तेल,मीठ,ओले खोबरे,जिरेपूड

आताच शॉर्टकट जेवण झालं. लिंबू भात (फोडणीची मिरची आणि मटार घालून), तांदुळाच्या पिठाचे घावन आणि कैरीची चटणी.

Pages