अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

>>मराठीतील अनेक साहित्यीकांची मुले, मुली सिलिकॉन दरीत स्थाईक आहेत. हे साहित्यीक तिथे वर्षातुन तीन चार महीने जातात, नातवडांशी इंग्लिशमध्ये बोलतात. भारतात आल्यावर वेगवेगळ्या परीसंवादातून'मराठीवर इंग्लिशचे अतिक्रमण होत आहे' अशी बोंब मारत फिरतात.तसाच प्रकार या धाग्यावरचे काहीजण करत आहेत.

म्हणजे मराठीचा आग्रह धरणे चुकीचे? हे संकेतस्थळ अमेरिकेत स्थाईक झालेल्या एका मराठी माणसाने मराठीवरच्या प्रेमापोटी काढले आहे. ते काढायला नको होते असे तुम्ही ध्वनित करत आहात.

प्रशासक, बघा हे काय म्हणत आहेत.

ज्यांनी हे संकेतस्थळ सुरु केले ते खरे मराठीचे अभिमानी. मंदार जोशी नावाच्या आंग्ल शाळेत शिकलेल्या स्वताची मुले कॉन्व्हेंटमधे असल्याची अप्रत्यक्ष निर्लज्ज कबुली देणार्या व्यक्ती ढोंगीपणाचा आव आणुन इतरांना फसवत असतात.असो , आडात नाहितर पोहर्यात कुठुन येणार?

उत्पादन दोष आहेतुमच्यात,त्याला तुम्ही तरी काय करणार?>>कृपया पातळी सोडु नका.

लेखाचा मथितार्थ आणि त्यात स्पष्टपणे व्यक्त केलेल्या भावना समजून घेऊन आपला अभिप्राय व मत व्यक्त करण्यार्‍या सर्वांचेच आभार.

मंदार,
परत दोन नम्र सूचना-दुरुस्त्या Happy
१. मथितार्थ
२. प्रिंटरला आपण छपाईयंत्र असा शब्द सर्रास वापरतो. कम्प्यूटरच्या प्रिंटरला फारतर संगणकाचं छपाईयंत्र म्हणायचं का?

अनेक धन्यवाद वरदा Happy
संगणकाचं छपाईयंत्र हा शब्दप्रयोग चांगला आहे. निदान मायबोलीवर तरी उपयोग करायला सुरवात करुया Happy

मंदार, काही मुद्दे पटतील काही पटत नाहीत. पण एक मात्र कबूल करतो - गेले ३-४ दिवस माबोवर लिहीताना एखादा इंग्रजी शब्द लिहीण्याआधी थोडा थांबून "येथे मराठी पर्याय आहे का" विचार करतोय Happy त्या दृष्टीने लेख यशस्वी!

बाकी प्रत्येक पर्यायी शब्द संस्कृत मधून आलेला असावा असे मलाही वाटत नाही. संस्कृत मलाही आवडते आणि ती जगावी असेही वाटते. पण त्याकरिता ते करायची इच्छा नसलेल्या लोकांना जबरदस्तीने अवघड्/दुर्बोध शब्द बोलायला भाग पाडावे हे पटत नाही. तेथे दुसर्‍या भाषेतून आलेला पण बोलायला सोपा असलेला शब्द जर अंगवळणी पडलेला असेल तर तोच वापरावा. कदाचित दोन्ही पर्याय चलनात राहतीलः जाहीर/घोषित/प्रकट्/उघड जसे साधारणपणे आलटून पालटून वापरता येतात.

>>मंदार, काही मुद्दे पटतील काही पटत नाहीत. पण एक मात्र कबूल करतो - गेले ३-४ दिवस माबोवर लिहीताना एखादा इंग्रजी शब्द लिहीण्याआधी थोडा थांबून "येथे मराठी पर्याय आहे का" विचार करतोय स्मित त्या दृष्टीने लेख यशस्वी!

फारेण्डा, भरुन पावलं. एवढं वाटलं, एकालातरी, हेच या लेखनाचं यश आहे Happy
बाकी मुद्द्यांशीही सहमत.

मंजो,

>> फारेण्डा, भरुन पावलं. एवढं वाटलं, एकालातरी, हेच या लेखनाचं यश आहे

अनुमोदन! एकालाच काय कित्येकांना पटलं. अर्थात, विनाकारण वाकड्यात शिरायची खोड असलेले जन्मजात छिद्रान्वेषी धरायचे नाहीत यात!

आ.न.,
-गा.पै.

छिद्रान्वेषी = अर्थ समजून न घेता फक्त आणि फक्त असलेल्या/नसलेल्या चुका काढण्याची वृत्ती असलेले / कुरापतखोर वगैरे.

अहो इथे कुणाची मुलं कुठं शिकतात. कोण कुठ राहातं हा प्रश्न नाही. तुम्ही कुठेही राहा. कोणत्याही माध्यमातून शिका. कोणतीही भाषा शिका. पण जेंव्हा दोन मराठी माणसं समोरासमोर बोलायला येतात, दोघानाही माहेत असतं की त्यांना मराठी येतं तर मग शुद्ध ( शक्यतो) का बोलु नये. काही अपवादात्मक शब्द सोडाना. पण जे सहज बोलु शकतो तिथेही विनाकारण इंग्रजी शब्द का वापरावेत.?

निदान या बातमीफलकावर तर क्षुल्लक चुका असू नयेत..

त्यांना आई, बाबा असेच बोलायला शिकवा << त्यांना आई, बाबा असेच म्हणायला शिकवा

बरेच लोक 'गाणं बोल' , 'तो मला बोलला' असा 'बोलणे' या क्रियापदाचा गैरउपयोग करताना दिसतात..

बाकी मराठी बाफ बघायचा असेल तर बाराबाफला पर्याय नाही... Happy

निदान या बातमीफलकावर तर क्षुल्लक चुका असू नयेत..>>

Proud

मंदार_जोशी | 20 March, 2012 - 15:52 नवीन
छिद्रान्वेषी = अर्थ समजून न घेता फक्त आणि फक्त असलेल्या/नसलेल्या चुका काढण्याची वृत्ती असलेले / कुरापतखोर वगैरे.>>

चुकीचा अर्थ आहे हा

असो

अर्र, आत्ताच एका ठिकाणी मिंग्लिश लिहून आले आणि मग हा धागा पाहिला. आता ते बदलणे आले Happy
मराठीत बोलताना मराठीच वापरायला पाहिजे हे पटते. कधीकधी पटकन शब्द आठवत नाहीत आणि विचार व्यक्त करायची घाई झालेली असते मग इंग्रजीचा आधार घेतला जातो. पण जितके शक्य होईल तितके मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करेन.

अहो इथे कुणाची मुलं कुठं शिकतात. कोण कुठ राहातं हा प्रश्न नाही. तुम्ही कुठेही राहा. कोणत्याही माध्यमातून शिका. कोणतीही भाषा शिका. पण जेंव्हा दोन मराठी माणसं समोरासमोर बोलायला येतात, दोघानाही माहेत असतं की त्यांना मराठी येतं तर मग शुद्ध ( शक्यतो) का बोलु नये. काही अपवादात्मक शब्द सोडाना. पण जे सहज बोलु शकतो तिथेही विनाकारण इंग्रजी शब्द का वापरावेत.? >>>>>>>>>>> अनुमोदन .

बट काय आहे ना कि मेनी पिपल ला असे वाटते कि ईंग्रजी वर्डस मध्ये मध्ये ईन्सर्‍ट केले म्हणजेच स्टेटस मेन्टेन होते . . . .<<हिहीहिही>> <<दिवा>>

@ मंदार

~ "छिद्रान्वेषी" चा अर्थ
छिद्रान्वेषी म्हणजे 'फक्त ' चुकांचा शोध घेणारा. छिद्रांचे अन्वेषण म्हणजे शोध घेणारा. उदा. तुम्ही आणि तुमचा एक मित्र हॉटेलमध्ये चहाला गेला आहात. चहाचे दोन कप तुमच्या टेबलवर आले आहेत आणि मित्र तुम्हाला विचारतो, "मंदार, कपबशी धुतली असेल ना ? आपल्या अगोदर किती़ ग्राहकांनी या कपातून चहा घेतला असेल ? जो चहा वापरतात तो उंची असेल ना ?...' आदी नको असलेल्या चौकशा करून तुमचाही चहाचा मूड घालविणार्‍या व्यक्तीस "नको त्या आणि नको तितक्या चौकशा करणारा' असे ओळखले जाते. त्यालाच एकत्रित "छिद्रान्वेषी' स्वभावाचा असे विशेषनाम पडले आहे.

[मात्र अशी व्यक्ती काहीवेळा "चांगल्या" उपयोगासाठीही सिद्ध होते. विशेषतः सेकंड हॅण्ड कार खरेदी करतेवेळी. माझ्या ओळखीच्या एका या स्वभावाच्या गृहस्थाने माझ्या मित्रासाठी त्याच्यासोबत 'सेकंड हॅण्ड कार सेल बझार' येथे जाऊन तब्बल चार तास अशा काही छिद्रान्वेषी चौकशा केल्या की त्या एजंटची त-त-प-प झाल्याचे अन्य मित्रांनी पाहिले. पण ज्यावेळी जी खरेदी झाली ती नंतर कागद्पत्रांसह अत्यंत समाधानकारक झाली. कारही एक नंबरी सिद्ध झाली. हिअर क्रेडिट गोज टु दॅट छिद्रान्वेषी फेलो. थोडक्यात असा स्वभाव दोन्ही बाजूनी लक्षणीय ठरतो.]

'गाणं बोल' हा शब्द मुंबईकरच जास्त वापरतात.. कोल्हापुरात तर गाणं म्हण असेच म्हणतात.. मला माझे मुंबईचे मित्र ऑफिसात गाणं बोल असेच म्हणायचे, मला तेंव्हा आश्चर्यही वाटायचं.. नंतर तेच अंगवळणी पडलं

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही.>>>> पटलं ......कारण जे ईंग्रजी शब्द टाळता येत नाहीत ते मराठीतूनच वापरले पाहिजेत असा अट्टाहास येथे नाही.
ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? >>> १००% सहमत.
हे मत ईंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या, ज्यांची मुलेही त्याच माध्यमात शिकत आहेत किंवा जे देशाबाहेर स्थाईक आहेत अश्या लोकांचे असेल तर सोन्याहून पिवळं. आता लोकांना ईंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं गरजेचे वाटते पण त्याचबरोबर आपण आपल्या मातृभाषेचा आदर केला तर बिघडलं कुठे?

एक मात्र कबूल करतो - गेले ३-४ दिवस माबोवर लिहीताना एखादा इंग्रजी शब्द लिहीण्याआधी थोडा थांबून "येथे मराठी पर्याय आहे का" विचार करतोय >>>मी तर दुसर्‍यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मध्ये सुद्धा ईंग्रजी शब्द दिसला कि त्याला मराठी पर्याय काय याचा विचार करते Happy

रेडिओ मिर्ची वरचे कार्यक्रम कोणी ऐकलेत का? ती बाई मराठीतून वाक्याला सुरुवात करते, मध्यापर्यंत ते हिंदीत येतं आणि त्याचा शेवट ईंग्रजीत होतो Uhoh किती विचित्र वाटतं ते.

माझ्या बहिणीला एक चांगली सवय आहे..ती कोणालाच मराठीतून बोला असं सांगत नाही पण पर्यायी मराठी शब्द सुचवते. ऊदा. जेव्हा माझी भाची विचारते, "आत्या, आपण sugar cane juice प्यायचा का?" तेव्हा ती म्हणते, "तुला ऊसाचा रस असं म्हणायचे आहे का?"

माझ्या बहिणीची कन्या(ईयत्ता २री). "आपण walking ला जाऊया." असं मराठी बोलायला लागली कारण तिच्या बाईंनी शाळेत फक्त ईंग्रजी बोलायला सांगितले. तेव्हा माझ्या बहिणीने तिला समजावले कि, "असं अर्ध ईंग्रजी अर्ध मराठी नको बोलूस. पुर्ण वाक्य ईंग्रजीतून बोल आणि मग तेच वाक्य मराठीतून बोल. म्हणजे तुला एकाच वेळी दोन-दोन भाषा चांगल्या बोलता येतील". तिला ते पटलं. Happy

माझी मोठी आई(आजी) आईस्क्रिमला "गारेगार" म्हणायची. टूथपेस्टला 'दातवान'. आम्हीही तेच शब्द वापरतो. आपल्यापासुन सुरुवात केली पाहिजे तरच आपली मुले शिकतील.

छान लेख आहे.
गा.मा आणि फारएण्ड यांना अनुमोदन.

मंदार जोशी,
जेम्स बाँड सारखी लोक विरोध करायचा म्हणुन करतात, पुर्ण लेख व त्याचा मदितार्थ न वाचताच.
लक्ष देउ नये.

अशोकभाऊ,

छिद्रान्वेषी या शब्दावरून मला एक कथा (बहुतेक चांदोबात) वाचलीशी आठवते.

मेदूवडा हा पूर्वी बराच लोकप्रिय पदार्थ होता. एकदा पथिकाश्रमात उतरलेल्या एका प्रवाश्याला खायला मेदूवडा मिळतो. त्याला मध्यभागी छिद्र कसे पडते हे शोधण्याच्या नादात खाणे राहून जाते. शेवटी छिद्र असलेली वस्तू खाऊ नये म्हणून तो वडे न खाता उपाशी राहतो. प्रत्यक्षात हा नियम अतिशिळे, आंबलेले, तार आलेले पदार्थ खाऊ नयेत असा आहे. अश्या पदार्थांचा पृष्ठभाग जाळीदार होतो. आपले महाशय भलतंच छिद्र घेऊन त्याचं अन्वेषण करीत बसतात!

Rofl

आ.न.,
-ग.पै.

Pages