रोज रोज जेवायला काय करू ?

Submitted by अवल on 19 March, 2012 - 03:13

रोज रोज जेवायला काय करायचं ? हा स्वयंपाक घरात वावरणार्‍या समस्त लोकांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न !
चला तर वेगवेगळ्या भाज्या, उसळी, रस्से, आमट्या, इ. इ. माहिती करून घेऊयात ?
या बीबीवर तपशीलवार कृती अपेक्षित नाही. मूळ कृतीचे नाव अन अगदी थोडक्यात त्याचे विवेचन करूयात.
अन जमवूयात वेगवेगळ्या पदार्थांची सूची Happy

ही माझी यादी :
बटाटा:
१. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
३. उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
५. उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
६. बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्‍या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
७. बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
८. बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
९. बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
१०. बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
११. बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
१२. चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
( बापरे कित्ती बटाटा खातो आपण Wink )

कोबी
१. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
२. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
३. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
४. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
५. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
६. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.

फ्लॉवर
१. फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
२. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
३. फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
४. फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.

मेथी
१. मेथी पाने : मेथी कोवळी पाने, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
२. मेथी-कांदा : मेथी, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर.
३. मेथी पीठ पेरून : मेथी, बेसन, तेल, लसूण, हिंग, तिखट, मीठ.
४. पांतळ मेथी : मेथी, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
५. मेथी-बटाटा : मेथी, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
६. मलई-मेथी-मटर : मेथी, मटार, मलई, तूप, काजू, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला.

पालक
१. पालक-कांदा : पालक, कांदा, तेल, लसूण, हिंग, हिरव्या मिरच्या, मीठ.
२. पांतळ पालक : पालक, ताक, बेसन, तेल, हिंग, हळद, तिखट, शेंगदाणे, मीठ, साखर.
३. पालक-बटाटा : पालक, बटाटा, तेल, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद, तिखट, मीठ.
४. पालक-पनीर : पालक, पनीर, तूप, बारीक चिरलेला लसूण, कांदा, टॉमेटो, हळद, तिखट, मीठ, साखर, गरम मसाला.

मसूर
१. मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
२. मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
४. मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.

मूग
१. मूगाची उसळ : मोड आलेले मूग, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. मूगाचे बिरडे : मोड आलेले सोललेले मूग, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लवंग, दालचिनी, लसूण, आलं, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. मूगाचे खाटे : भाजलेले मूग, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.

वाल
१. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
२. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
३. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.

कोशिंबीरी
१. काकडीची : काकडी, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
२. टॉमेटोची : टॉमेटो, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
३. गाजराची : गाजर, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
४. बीटाची : बीट, लिंबू, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
५. तोंडल्याची : वाफवलेला तोंडल्याचा किस, दही, दाण्याचे कूट/ ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर.
६. मूळ्याची : मूळा, दही/लिंबू, मीरपूड, साखर, मीठ, कोथिंबीर.
७. केळ्याची : केळी, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
८. कांद्याची : कांदा, दही, हिरव्या मिरच्या, दही, साखर, मीठ. कोथिंबीर.
( टिप : कोणत्याही दही घातलेल्या कोशिंबीरीच सफरचंद सोलून त्याचे अगदी बारीक तुकडे चिरून टाकले तर फार छान लागते कोशिंबीर )
(वेळ मिळाला की अजून टाकते. तो पर्यंत तुमच्या येऊ द्यात Happy )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयुक्त धागा अवल Happy

जामोप्या Proud

पिठले
पिठले- तेल, हळद, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बेसन पिठ, मीठ, पाणी

ताकातले पिठले- तेल, हळद, हिंग, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बेसन पिठ, मीठ, ताक

खिचडी
साधी खिचडी- तेल, हळद, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या,लसूण,कोथिंबीर, मुग डाळ, तांदूळ, मीठ,

मसाला खिचडी- तेल, हळद, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट,धणेपूड, जिरेपूड, गोडा मसाला (नसल्यास गरम मसाला), आले-लसूण पेस्ट, बटाटा-घेवडा-गाजर यांचे छोटे काप, शेंगदाणे, कोथिंबीर, मुग डाळ, मसूर डाळ, तांदूळ, मीठ.

पराठा
आलू पराठा- गव्हाच्या पिठाचे नेहमीपेक्षा थोडे जास्त मीठ घालून आणि तेल घालून मळलेले कणीक, स्टफिंगसाठी उकडलेला बटाटा तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, लिंबूरस घालून थोडे परतून घ्यायचे आणि कणकेत हे स्टफिंग घालून पराठा लाटायचा.

कोबी पराठा- किसलेला कोबी मीठ लावून ठेवायचा. त्याला पाणी सुटले की ते पिळून त्यात तिखट, मीठ, तेल, हळद, हिंग, ओवा, जिरेपूड, धणेपूड घालून मावेल तेवढे पीठ घालून मळायचे आणि भिजले की थोड्यावेळाने पराठे मळायचे.

-------------

रोजच्या रोज डाळ, आमटी बनवण्याची पण गरज नसते. त्याने तोच-तोचपणा येतो आणि जास्तीचे प्रोटिन शरीरात जाते. पोळीसाठी एक सुकी भाजी आणि भातासाठी एक रस्सा भाजी बनवली तरी पुरेशी व्हरायटी होते.

---------
कोशिंबीर
यात काकडी/ बुंदी/ कांदा- टोमॅटो असे व्हेरिएशन्स करता येतील.
कायम राहणारे जिन्नस- फेटलेले दही, मीठ, मिरपूड, आमचूर पावडर. (ही पद्धत एका मैत्रिणीकडून शिकले. छान कॉम्बिनेशन आहे. मस्त होते कोशिंबीर याने.)

अवल , मस्त... आज दुपारी सगळ्या पोष्टी वाचुन काढेन.

मी नविन लग्न झाल्यावर केला होता असा प्रकार. ( कारण त्या वेळी जास्त प्रकार येत नव्हते ना...:) ) मला येणारे सगळे भाज्यांचे प्रकार लिहुन ठेवले होते यादी करुन.

मला जेवण करायला खूप कंटाळा येतो जेव्हा काय करावं हा प्रश्ण असतो.(तसेही कूकींग मला काही खूप आवडत नाही).

खूप विचार करून डोकं दुखले की सरळ बाहेर जावून जेवते. Happy

बरे, जे काही प्रकार आहेत ते वरतीच एका पोस्ट मध्ये नाही का अ‍ॅड होणार? शोधायला बरे पडेल.

इथल्याच रेसीपीची लिंक दिली तरी बरं...

आपले आयटम साधे असतात. बंगाली स्वामी असल्याने... Proud

शोनार चिकन
आलू पोश्तो
आलू अचार
दोय मछली

वगैरे वगैरे..

अवल, मस्त धागा Happy

कुर्मा - पराठा
सुरणाची भाजी - सुरणाच्या काचर्‍या
मटकीची उसळ

भाज्यांचे प्रकार नेमके कमी आठवतात. माशांचे प्रकार चालतील का ग अवल? Wink

मस्त धागा..
पण रोज रोज जेवुन कंटाळा येतो .. वीकेण्ड स्पेशल पण लिहा कुणीतरी..

थालीपीठ :
१. मिश्र पीठे : गहु, बेसन, तांदुळ नी रवा ,त्यात धने, जिरे पुड,तिखट्/मिरची,मीठ हळद नि कोथिंबिर , पीठ डोश्यासारखं मग पट्कन पॅन मधे ओतणे Happy
२. नं १ प्रमाणे पीठ करुन त्यात भाज्या किसुन घालणे ज्या पोटात जाणे गरजेचे आहे पण खाव्या वाटतं नाहित Wink
३. पेसेरट्टु
४. आंबोळी - ज्वारीच्या पीठाची
नी सोबत दही किंवा रायतं

झंपी अशी कशी गं तू? जेवण करायचा कसा गं कंटाळा तुला? आम्हाला नै बै!
(दिवे!!!)...........कधी कधी बनवायचा येत असेल!

वा अवल. बरं झालं. आता यातल्या काही व्हरायटी माझ्या 'महिनाभराचा बेत' तक्त्यामधे मधे टाकून देते म्हणजे अजून व्हरायटी.

दुधी :

दुधीची व्हाईट सॉसमधील भाजी

दुधीची नारळाच्या दुधातील भाजी

धणे, सुक्या मिरच्या, खोबरे परतून त्याचे वाटण करून ते दुधीला लावून भाजी
(हेच वाटण इतर भाज्यांना लावून त्यांचीही अशीच भाजी करता येते.)

दुधी + भिजवलेली मूगडाळ भाजी

दुधीची पंचफोडण वापरून भाजी

दुधी वाफवून त्याचे दही / चक्क्यातील रायते.

दुधीची साल किसून परतून त्याची चटणी

किसलेल्या दुधीत बेसन व इतर मालमसाला घालून वाफवलेल्या व किंचित परतलेल्या गोट्यांची कढी

दुधीचे मूगडाळ घालून दाटसर सूप / शोरबा.

कोबी :

किसलेला कोबी + किसलेले गाजर + मेयॉनीज + मिरपूड + अननस घालून सॅलड

किसलेला कोबी + ओले खोबरे + साखर + मीठ + हि. मिरची ची किंचित हळद घालून फोडणी (आवडत असल्यास) असे सॅलड.

दोडका :

दोडक्याची मोहरी, हिंग, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्यांच्या फोडणीत उडीद डाळ परतून + ओले खोबरे घालून उपकरी.
(याच पद्धतीने फ्लॉवर, पडवळ, भेंडी, श्रावण घेवडा इ. भाज्यांची उडीद डाळ / भिजवलेली चणा डाळ / मूगडाळ घालून उपकरी)

आमच्याकडे रविवारी भात आणि चपाती दोन्हीला सुट्टी असते आणि शक्यतो वन-डिश मील असते.
१) बारीक चिरलेल्या भाज्या घालून किंवा नुसत्याच इडल्या
२) विकतचे पीठ(तांदूळ+चणाडाळ+उडीद डाळ) यात बा.चि.कांदा मिरची घालून आंबोळ्या
३) टमाटो/ओनियन उत्तप्पम
४) व्हेजिटेबल हांडवा
५) अडई (२-५ याबरोबर दह्यात कालवलेली लसणाची चटणी)
६) वडा पाव (न तळता मायक्रोवेव्हच्या इडलीपात्रात केलेले वडे, बटाट्याबरोबर स्प्राउट्स आणि बेसनाच्या पिठासोबत नाचणीचे पीठ असे प्रयोग) + सॅलड
७) पोटभरीची भेळ : नेहमीच्या पदार्थांबरोबर उ.बटाटा+टमाटो+ काकडी +स्प्राउट्स
८) मिसळ

नी अगं तुझं सॉटे व्हेजी वाचून मला वाटलं गं तसं Wink
अरुंधती, भरत, आणि सगळे वा वा मस्त सुचवताय. आता काय रोज रोज करू ही चिंता मिटत जाईल पण आता यातले काय करू असे होणार आता Wink

नी अगं तुझं सॉटे व्हेजी वाचून मला वाटलं गं तसं <<<
???
कुठे टाकलीये मी ही रेस्पी. मला पण सांग Happy

ओह!! तू चार्टबद्दल म्हणतीयेस का? ते असंच इम्प्रॉव्ह आहे. Happy

शेवळीची रस्साभाजी आणि फोडणीचा भातः रविवारी नॉव्हेला सुट्टी द्यायची झाली की मी शेवळीची रस्साभाजी आणि फोडणीचा भात असा बेत करते. सोप्पा आणि खायला नॉव्हेला लाजवेल असला चमचमीत प्रकार! सोबत खारवड्या/कुरड्या/पापड असले तर झक्कासच! Happy

शॉर्ट कृती अशी :

रस्सा: कांदा, टोमॅटो मध्ये तिखट,हळद्,गरम मसाले, किचन किंग अव्हेलेबल असेल तर, आणि भरपूर लसूण पाकळ्या घालून वर अर्धा तास भिजवलेली शेवळी घालून पाणी टाकून शिजवायची. रश्श्यासाठी भाजलेले कांदा+खोबरे+दालचिनी घालायची.कढ येताना भरपूर कोथिंबीर्+ओलं खोबरं.

फोडणीचा भातः तुपावर तमालपत्र्+लवंगा+मिरी्+हळद घालून धुतलेला तांदूळ+खोबरं+कोथिंबीर घालून भात शिजवायचा. Happy


डाळिंब्या/तुरडाळ घालून खिचडी:
तुपावर दालचिनी+कांदा+तिखट+हळद+भिजलेल्या डाळिंब्या/तुरडाळ+धुतलेले तांदूळ घालून शिजवायची. खोबर्‍याची चटणी+पापड्+लोणचे आणि खिचडी उत्तम जेवण!

नीधप, शेवळी ही एक ग्रामीण प्रकारात मोडणारी भाजी आहे. ग्रामीण भागात जास्त मिळते. शहरात ठराविक ठिकाणी.

वीकेण्ड स्पेशल पण लिहा कुणीतरी> वीकेण्ड म्हटल्यावर नॉनव्हेज सुचत
१. मालवणी चिकन, घावणे / आंबोळी, सोलकडी, कांदा टॉम्याटो कोशंबीर, भात
२. कोलंबी आमटी - लाल / हिरवी, तळलेली कोलंबी, सोलकडी, कांदा टॉम्याटो कोशंबीर, भात
३. कोलंबी गरम मसाला बटाटा घालुन मिडीयम ग्रेव्ही करी, घावणे / आंबोळी, सोलकडी, कांदा टॉम्याटो कोशंबीर, भात
४. कोलंबी राइस, तळलेली कोलंबी, कांदा टॉम्याटो कोशंबीर, सोलकडी
५. पापलेट आमटी, तळलेली सुरमइ, भात, सोलकडी

@Reema घावण्यांबरोबर काळ्या वाटाण्यांचे सांबार पण मस्त लागते. शाकाहारी लोकांना चिकन ऐवजी ऑप्शन

कधीकधी नुसतेच तांदळाच्या पीठाचे मीठ घालून खरपूस घावण+ चटणी/सॉस हा प्रकार मजेशीर आहे आणि पोटभरीचासुद्धा.

नॉव्हेमधले काही झटपट प्रकारः

१. अख्ख्या मसुराची, कांदा+टोमॅटो+मसुर्+मसाले+मीठ्+पाणी असे घालून शिजवून मग लसणाची फोडणी दिलेली आमटी. त्यासोबत साधा भात आणि ओले बोंबिल फ्राय....तोंपासू एकदम.

२. तेलावर लसूण+कोथिंबीर+ सुक्या खोबर्‍याचे वाटण, तिखट+ हळद, त्यात भिजवलेले सुके बोंबिल+शेवग्याच्या शेंगा+ पाणी घालून रस्साभाजी. भातासोबत खायची.

शेवग्याच्या शेंगांची भजी :
बेसन्+तांदळाचे पीठ+चिंचेचा कोळ्+भिजवलेला गुळ्+मीठ्+तिखट्+पाणी घालून जाडसर बॅटर. वाफवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांमधल्या बिया काढून, शेंगा बॅटरमध्ये घोळवून हवे तसे (डीप्/शॅलो) फ्राय करणे.

सगळ्यांकडे रविवार स्पेशल म्हणून काहीतरी वेगळे, चमचमीत, स्पेशल असते. मी कधी कधी बरोब्बर उलटेही करते.
आठवडाभर ज्या भाज्या केल्या असतील त्या करायच्या आधीच थोडी हिरवी भाजी बाजूला काढून ठेवायची. यासाठी नेहमी भाजी अर्धा किलो लागत असेल तर घेतानाच ६०० ग्रॅम घ्या.
अशी सगळी आठवड्याची भाजी मिक्स करून ती तूप-जिर्‍याच्या फोडणीवर परतून वाफवायची किंवा शिजवायची. वरून मीठ घालायचे.
आणि एखादे मील नुसतीच भाजी ओरपायची. Happy

Pages