चिंचेच्या रसातले मिरचीचे लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 September, 2011 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या चिंचा २०-२५
हिरव्या मिरच्या पाव किलो (मधुन चिरुन, दोन ते तिन तुकडे करुन)
१.५ चमचा राई
अर्धा चमचा जिर
पाव चमचा मेथी
४ चमचे तिळ
चवीनुसार मिठ
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
१ पळी तेल
अर्धा चमचा गुळ (ऑप्शनल)

लोणचे जर तिखट आवडत असेल तर बारीक मिरच्या घ्या. जर कमी तिखट हवे असेल तर जाड्या घ्या.

फोटोत तिळ कमी आहेत. मी नंतर अजुन भर टाकली होती.

क्रमवार पाककृती: 

चिंचा धुवुन आख्ख्याच त्या बुडतील इतक्या पाण्यात थोडावेळ उकडत ठेवा. उकळल्या की चिंचांची साले आपोआप फुटतात.

उकडलेल्या चिंचांची जमतील तेशी साले काढून घ्या म्हणजे गाळायला जास्त त्रास होणार नाही. मग साले काढली की चिंचा चांगल्या खुळून घ्या आणि हे पाणी एका भांड्यात गाळून घ्या. चोथा टाकुन द्या कारण त्यात असणार्‍या चिंचांच्या सालांची कच लागते.

१ चमचा मोहरी, मेथी आणि तिळ वेगवेगळे भाजून एकत्र मिक्सरमध्ये पुड करा.

कढई चांगली तापवा व त्यात तेल गरम करुन अर्धा चमचा राई, जिर, हिंग ची फोडणी द्या. त्यात मिरच्या घाला. जर लोणचे लगेच खायचे असेल तर मिरच्या थोड्या जास्त वेळ ठेउन नरम शिजवा आणि जर २-३ दिवसांनी खायचे असेल तर थोडा वेळ ठेउन थोड्या कडक शिजवल्यात तरी चालेल. नंतर गॅस बंद करुन त्यात मिक्सरमधुन काढलेली पुड, मिठ, गुळ (ऑप्शनल) घाला.

हे सगळे मिश्रण चिंचेच्या रसात ओता. मिश्रण रसात चांगले ढवळून घ्या आणि खायला सुरुवात करा.

वरच्या फोटोतील बाऊल खोलगट असल्याने लोणचे कमी दिसत आहे. पण भरपुर झाले होते. अर्धा कोलोची बरणी भरली होती.

वाढणी/प्रमाण: 
२०-२५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही रेसिपी मायबोली आयडी सारीका हिच्या सासुबाईंनी मला फोनवर दिली. त्यासाठी सारीका आणि तिच्या सासुबाईंचे धन्यवाद.
सारीकाने मला काही दिवसांपुर्वी सांगितले होते की तिच्या सासूबाई वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवतात. अनायसे आमच्याकडे १६ तारखेला साखरचौथीचा गणपती होता. काहीतरी स्पेशल करायचे म्हणून कोथिंबीरवडी आणि सारीकाच्या सासूबाईंना विचारून एखादे वेगळे लोणचे करु असे मनात ठरवले. सारीकाने तिच्या सासुबाईंच्या हातात फोन सुपुर्द केला आणि माझ्याकडे एक हटके लोणच तयार झाले.

हे लोणचे आमच्याकडे सगळ्यांना वेगळे व इतके चविष्ट लागले की सगळ्या पाहूणे मंडळींच्या तोंडात ह्या लोणच्याचीच स्तुती होती. सगळ्यांनी परत परत मागीतले. विशेष म्हणजे माझ्या मुलीने त्याचा रस प्रत्येक वेळी जेवताना मागुन घेतला. सगळ्यांनी मला लोणच्याची रेसिपी विचारली. लोणचे भरलेली बरणीने पहील्याच दिवशी तळ गाठला. ह्याचे सगळे श्रेय सारीकाच्या सासूबाई व सारीका ह्यांना.

कच्च्या चिंचा मिळणे हल्ली कठीण काम झाले आहे. माझ्या आईकडे झाडे आहेत म्हणून मी माझ्या वहीनीला फोन केला. जवळच्या झाडाला नव्हत्या म्हणून तिने गवतात असणार्‍या भागात जाऊन माझ्यासाठी चिंचा काढून आणल्या त्यासाठी तिलाही चिंचांचे श्रेय.

आता ह्या लोणच्याच्या सारीकाच्या सासुबाईंनी दिलेल्या काही टिपा.

कुटातली राई भाजली नाही तरी चालेल. पण मला पुड करताना सगळेच भाजायची सवय असल्याने मी भाजली.

तिळ हे जास्तच घ्यायचे अगदी ४ चमच्यांच्या वर घेतले तरी चालतील त्यामुळे लोणच्याला दाटपणा येऊन चांगली चवही येते.

सारीकाने सांगितले होते की गुळ आजिबात नको घालू पण माझा हात ऐकायला तयार नाही. मी थोडा घातलाच चवीपुरता अगदी थोडा.

हे लोणचे नेहमी फ्रिज मध्ये ठेवायचे. १५-२० दिवस टिकू शकते.

माहितीचा स्रोत: 
मायबोली आयडी सारीका हिच्या सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्ले मार्केटमधे मस्त रसरशीत कच्च्या चिंचांचे आकडे मिळाले. आज लोणचं करणार. ही पाकृ वाचल्यापासून कधी एकदा करून बघतेय झालं होतं.

जागु ताई,कालच हे लोणचे केले, सासर्‍यां चे मित्र येणार होते म्हणून, एकदम यम्मी झाले,खोटं वाटेल पण सर्वांनि तिनतिनदा मागुन घेतले.मी पण,मला असे भरपुर प्रकार बनवता येतात्,पण काय करु नोकरि -घर वगैरे सांभाळून वेळच मिळत नाही वगैरे नौटंकी करुन शाईनिंग मारुन घेतलि.घरातल्या समस्त जावा आणि साबा ,हिच्यातलि अन्नपूर्णा मध्येच अचानक कशी जागी होते सारखा चेहरा करुन बघत होत्या.तरी बरं माझ्या घरी कोणाला मराठी लिहिता वाचता येत नाही!माबो मुळे खरंच माझ्या सारख्यांची मदत होते,नाहि तरं काही खरं नव्हत.
तुला आणि सारिका /साबां ना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!!!

सुखदा Happy

हे लोणचे करायचे बरेच दिवस मनात घोळत होते पण चिंचांचा प्रश्न होता. कॉलनीत चिंचांची झाडे बरीच आहेत पण हाताला लागेलश्या चिंचा मुले आधीच पळवतात.

काल संध्याकाळी चिंचेला न्याहाळतच फिरायला जात असताना अचानक अगदी खाली चिंच दिसली. लगेच तिला ताब्यात घेऊन चिंचेच्या झाडाखाली जाऊन अजुन काही हाती लागते का न्याहाळले तर अजुन एक लआंबलचक चिंच दिसली.

घरी आल्यावर दोन्ही चिंचा उकळत ठेवल्या पण लोणचे करायला वेळ मिळाला नाही. आज सकाळी उठुन केले. मस्त झाले.

आता चिंचेच्या झाडावर कोणालातरी चढवते आणि चिंचा मिळवते आणि जरा जास्त लोणचे घालते.

Pages