पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नम्र विनंती, होळकर यांच्यावर टीका जरूर करावी पण त्यांचा एकेरी उल्लेख टाळावा. या विषयावरील संजय सोनावणींचे लेखन कुणी वाचले आहे का ?

खरेतर होळकर, शिवाजी, शिंदे, पेशवा बाळाजी बाजीराव, भाऊ, चिमाजी आपा ह्या लोकांना इतिहासाचा पुस्तकात एकेरीच संबोधले जाते. कथा, कादंबर्‍या ह्यातच महाराज, सरकार, पेशवे असे लिहिले जाते. एकेरी संबोधल्यामूळे वरील कोणाचेही महत्व कमी होत नसते.

रामला तुम्ही अहो राम म्हणता की कॄष्णाला अहो कॄष्ण. एकेरी संबोधने माझ्याकडून नेहमी होते. ते मला तरी वावगे वाटत नाही. मे बी मी जी पुस्तक अभ्यासली त्याचा परिणाम असावा. (शालेय पुस्तके सोडून).

होळकरांवर टिका होते आहे किंवा कोणावरही टीका होते आहे असे नाही तर जे आहे ते असे आहे. भाऊवर पण मी टीका केली आहेच. इतिहास वाचताना / अभ्यासताना घटना घडून गेलेली अस्ते. त्यामुळे टीका करणे सोपे. प्रत्यक्ष घटनेत ते जसे का वागले ह्याची कारणे त्यांना त्यांना माहिती असतात. आपण फक्त थोडे रॅशनली बघतो इतकेच. इथे टीका झाली म्हणून कोणाचेही कार्य कमी नाहीच. ही टीका ह्या युद्धाबाबत. पण होळकरांनी देखील रण गाजवले त्यामुळेच ते होळकर सरकार झाले.

केदार यांना अनुमोदन...

एकेरी उल्लेख केल्याने त्यांनी केलेले कार्य बदलत नाही. महत्व देखील कमी होत नाही आणि केलेल्या चुकाही बदलत नाहीत. संदर्भ पुस्तके पहिलीत तर सर्व इतिहासकालीन व्यक्तींचा उल्लेख एकेरीच केला जातो. त्यात काहीच वावगे नाही. त्यामुळे इथे एकेरी उल्लेख झाला तरी माझ्यामते काही त्रास करून घेण्याचे कारण नाही. शिवाजी बरोबर 'छत्रपती' न जोडल्याने काय ते छत्रपती नव्हते असे थोडीच होते? तसेच इतरांचे देखील..

मुळात पाणिपत म्हणजे कुणाचा पराभव हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो?
होळकरांचा पराभव का? तर अजिबात नाही. कारण पानिपतची लढाई होळकरानी लढली नसून पेशव्यानी लढली. बरं पेशवे (भाऊ) हा खरच ही लढाई लढू ईच्छीत होता का? तसं मलातरी नाही वाटत. कारण पुणे ते दिल्ली पर्यंतचा प्रवास पाहता भाऊला कुठेतरी असे वाटत होते की आपण तिथे पोहचेस्तोवर अब्दाली निघून गेलेला असेल म्हणून बाजारबुणगे बाळगण्याची चूक केली(किंबहूना अब्दालिशी गाठ पडणार नाही ही भवना मनात असल्यामूळे) ही वारी म्हणजे युद्ध-वजा तिर्थयात्राच होती असा भाऊचा पक्का समज होता.
२) पेशवे हे शस्त्रापेक्षा शास्त्रावर (धर्मशास्त्र) विश्वास ठेवणार आंधळे व मुर्ख ब्राह्मण होते (अपवाद, पहिले बाजीराव) या मुर्ख दैववादी ब्राह्मण पेशव्यांच्या देवधोरनामुळे मराठ्यांवर अवकळा आली.
३) पानिपतची लढाई ही भाऊची कोंडी झाल्यावर अब्दालिने पळून जाणा-या मराठी सेनेला गवत कापून काढतात तसे कापले, यात मराठ्यांची शूरगाथा वगैरे गोष्टी नुसता कल्पना विलास आहे. विश्वास पाटलाची कादंबरी म्हणजे पेशव्यांची पालकी वाहन्याचा प्रकार होय.
४) मराठे हे अब्दालीचे मनोधैर्य व मुत्सद्दीपणापुढे सदैव डावेच ठरले. यमूना ओलांडण्याचा अब्दालीने दाखविलेला साहस मराठ्यांत नव्हता अन्यथा तो उतार मराठ्याना दिसला असता.
५) पानिपत म्हणजे मराठ्यांचा पराजय होय असा खोटा प्रचार केला गेला. तसे असते तर मराठा साम्राज त्या नंतरही उत्तरेत अबाधित होता याचे कारण काय? खरे तर पानिपत हे मराठ्यांचे पराजय नसून ब्राह्मणी पेशव्यांचा पराजय होता. आता त्या पराजयाला विजय म्हणून खोटी आरोळी फोडण्याचा खटाटोप विश्वास पाटलाच्या कादंबरीतुन गेला गेला.
६) पानिपत नंतरही उत्तेरेतील राजकारण मराठ्यांच्या पायी लो़ळत होते हे जाहीर आहे. याचाच अर्थ पानिपतचा पराभव फक्त पेशव्यांपुर्ता मर्यादीत होता.

सारांशः पानिपतचा पराजय हा मराठयांचा पराजय नसून पेशवे (ब्राह्मणांचा) पराजय होता. मराठा साम्राच्यावर पानिपतमुळे काही फरक पडला नव्हता. उत्तरेतील मराठे (शिंदे, होळकर, भोसले) हे पानिपत नंतरही मोठ्या मुत्सद्दीपणे सत्ता चालवित होते. पानिपतचा पराजय होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती अब्दालिच्या नावाने काढलेली भाऊची तिर्थयात्रा होती व त्या यात्रेतील मुख्य जनसमुदाय हा देवदर्शनास निघालेला पुणेरी ब्राह्मणांचा होता. त्या दोन लाख यात्रेकरूच्या जोडीला लाखाचे सैन्य देऊन भाऊची रवानगी केली ते मुळात युद्धासाठी नसून देवदर्शनासाठी होय. म्हणून पानिपत मोहीम ही युद्धाची मोहीम नव्हती तर ती यात्रेची मोहीम होती. अब्दालीशी गाठ पडल्यावर या दैववाद्याना चिरडण्यात आले व उगीच त्याला नंतर युद्धाचे स्वरुप देण्यात आले. खरेतर हे युद्ध नव्हतेच.

बकासुर आपण केलेल्या प्रत्यक विधानाला काही आधारही द्यावा असे आपणास वाटले नाही का? ब्राह्मण आणि मराठा या नेहमीच्या वादाकडे धाग्याला झुकवले की झाले.. काय!!!

दिल्ली पर्यंतचा प्रवास पाहता भाऊला कुठेतरी असे वाटत होते की आपण तिथे पोहचेस्तोवर अब्दाली निघून गेलेला असेल म्हणून बाजारबुणगे बाळगण्याची चूक केली(किंबहूना अब्दालिशी गाठ पडणार नाही ही भवना मनात असल्यामूळे) ही वारी म्हणजे युद्ध-वजा तिर्थयात्राच होती असा भाऊचा पक्का समज होता.

>>> मुळात हे असे लिहिणे चूक आहे. अब्दाली १६५६ नंतर पुन्हा दिल्लीवर चालून का आला ते एकदा तपासा. मराठ्यांचा बिमोड केल्याशिवाय तो परत जायचा नव्हताच. तेंव्हा भाऊने असे समजणे की आपली गाठ अब्दाली बरोबर पडणारच नाही हे विधान अतिशय चुकीचे आहे.

पानिपत नंतरही उत्तेरेतील राजकारण मराठ्यांच्या पायी लो़ळत होते हे जाहीर आहे.

>> हे देखील चूक... महादजी शिंदे आणि माधवरावांनी ११ वर्षे अथक प्रयत्न करून उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण केला.

सेनापती,
भाऊचा पुणे ते दिल्ली व पुढे पानिपत पर्यंतच्या एकंदरीत प्रवासातील एक अशी घटना दाखवा जी हे सिद्ध करते की भाऊ युद्धास निघाला होता. याच्या उलत मी संपुर्ण प्रवासाती प्रत्येक घटना कशी तिर्थयात्रा होती हे सिद्ध करुन दाखवितो.

लढाईच्या दिवशी सुद्धा जे घडले ते युद्ध नव्हतेच. भाऊचे यात्रेकरु गोलाच्या सहाय्याने पळून जाण्यास भल्या पहाटे कूच करतात व अब्दालीची सेना पुढे येते व मराठ्याना कापून काढते हे सर्व इतिहासकारानी नोंदविले आहे.

मला किमान एक घटना तुमच्याकडून अपेक्षित आहे जी हे सिद्ध करते की भाऊ युद्धास निघाला होता वा युद्धाची ईच्छा होती.

मला किमान एक घटना तुमच्याकडून अपेक्षित आहे जी हे सिद्ध करते की भाऊ युद्धास निघाला होता वा युद्धाची ईच्छा होती.

>>> अनेक देता येतील पण ही एक घ्याच.. बळवंतराय मेहेंदळे यांचे लढाईच्या महिनाभर आधी झालेले निधन... ते कशाने झाले ह्याची अधिक माहिती आहे तुमच्याकडे की मीच देऊ???

७ डिसें ला जनकोजी शिंदे व होळकरानी अब्दालीच्या सेनेला चिरडत नेले. मेहंदळेची सेना मदतीसाठी दिली होती पण ती सगळ्यात मागे उभी होती. मेहंदळेनी अजिबात मदत केली नाही. कारण मेहंदळे व कंपूची लढाईची इच्छाच नव्हती. नाईलाजाने मराठ्याना परत फिरावे लागले.
त्या रात्री मराठ्यानी भाऊकडे मेंहदळेची तक्रार केली. मेहंदळेच्या दगाबाजीमूळे शिंदे-होळकरांचे सैन्य कारण नसताना मारले गेले. मग नाईलाज म्हणून मेंहदळेनी युद्धाची ईच्चा नसतानाही मराठ्याच्या धाकापायी चढाई करण्याचा आव आणत कूच केली व २० डिसेंबरला गोळी लागून ठार झाला.

७ डिसेंबरला जर याच मेंहदळेनी मदत दिली असती वा कुमक पुढे पाठविली असती तर अताई खान व नजीब त्याच दिवशी बंदी बनले असते. फक्त मेंहदंळे मुळे नजीब व अताईखान वाचले.

टिप: युद्धाची मानसिकता शिंदे होळकरांची होती. भाऊ, मेहंदळे व यात्रेकरु कंपूची नव्हती हे पुन्हा एकदा अधोरेखीत होते.

आता तुम्ही दुसरी घटना सांगा, मी उत्तर द्यायला तयार आहे.

७ डिसें ला जनकोजी शिंदे व होळकरानी अब्दालीच्या सेनेला चिरडत नेले. मेहंदळेची सेना मदतीसाठी दिली होती पण ती सगळ्यात मागे उभी होती. मेहंदळेनी अजिबात मदत केली नाही. कारण मेहंदळे व कंपूची लढाईची इच्छाच नव्हती. नाईलाजाने मराठ्याना परत फिरावे लागले.

>> संदर्भ सुद्धा द्यावा... Happy तुम्ही लिहिले म्हण्जे ते अधोरेखीत झाले काय???

सेनापती,
तुम्ही ज्या प्रकारे मेहंदळेची घटना विचारलात त्यावरुन तुम्हाला वरचे संदर्भ कुठले आहेत ते चांगले माहीत आहे. मी देण्याची गरज नाही. हवंतर परत एकदा शेजवलकर, वि. पाटिल वाचून या.
’शिंदे-होळकरानी मेहंदळेची भाऊकडे तक्रार कशासाठी केली होती’ हे जर तुम्हाला खरच माहीत नसेल तर मग मी तुमच्याशी चर्चा करावा एवढा तुमचा अभ्यास नाही.
मला पॉईंट टू पॉईंट चर्चा करायला आवडेल, नुसता शब्दाचा खेळखंडबो करायचे असल्यास ईथे माझे काहीच काम नाही.
पुढची घटना सांगा मी उत्तर देण्यास तय्यार आहे.

७ डिसेंबरला जर याच मेंहदळेनी मदत दिली असती वा कुमक पुढे पाठविली असती तर अताई खान व नजीब त्याच दिवशी बंदी बनले असते. फक्त मेंहदंळे मुळे नजीब व अताईखान वाचले.
>>> ह्याच्या वर्षभर आधी नजीबला होळकराने जिवंत सोडला नसता हे सर्वच घडून नसते आले.. नाही का...

असो मला तुमचा मूळ मुद्दा लक्ष्यात आलय. मी इथे अजून बरेच लिखाण करणार आहे. पण ते तुमच्या दृष्टीने पॉईंट टू पॉईंट नसेलही. बहुदा नुसताच शब्दाचा खेळखंडोबा देखील असू शकेल. माझ्या लिखाणावर तुम्ही लक्ष्य ठेवून वेळोवेळी प्रतिक्रिया द्याल याची मला खात्री आहे.

सध्या पुरता कुंजपुरा हा विषय घ्या हवंतर. कुरुक्षेत्रावर निर्धोक पूजा-पाट करता यावेत म्हणून मराठ्यांनी कुंजपुरा घेतला असावा... नाही का?

ह्याच्या वर्षभर आधी नजीबला होळकराने जिवंत सोडला नसता हे सर्वच घडून नसते आले.. नाही का... >> नजिबला सोडण्याची दोन कारणे इतिहासात नोंद आहेत. १) नजिब हा होळकरांचा मानलेला पुत्र होता. २) होळकरांची एक निती होती की उत्तरेतील शत्रूचा पुर्ण नायनाट झाल्यास पेशवा धोतरं बडवायला पुण्यात बोलवेल. त्यामूळे उत्तरेत नजिबासारख्या लोकांचे अस्तित्व असणे गरजेचे होते. यातील दुसरं कारण तितकसं पटण्यासारखं नाही. पण पहिले कारण मात्र खरे विस्वासार्ह वाटते. कारण आपल्या मानलेल्या पुत्रास राघोबानी देहदंडाची शिक्षा सुनावल्यावर त्याचा विरोध करणे होळकरांचे कर्तव्यच होते.

राहीला प्रश्न कुंजपु-याचा, त्याला पेशव्यांची लूट असेच म्हणावे लागेल. लूटेसाठी तलवार उपसाण्याची वेळ भाऊवर आलीच होती. किंबहुना विश्वास पाटलाने तर असेही नमूद केले आहे की शेवटी शेवटी थेट पानिपत गावातील लोकांचीच लूट सुरु झाली. (या घटनेची सारवासारव करत पाटलानी भाऊ कसा नितीमान होता वगैरे रेखाटले आहे. पण सत्य अधोरेखीत झाले ते झालेच). दिल्लीच्या तख्तातील चांदिचा पत्रा तोडताना सुरजमल जाटानी विरोध दर्शविला होताच. पण लूटारु मनोवृत्तीच्या पेशव्यानी एक ऐकले नाही. आता मला सांगा हा पत्रातोडण्याची वेळ का बरं आली. कारण पेशवे कर्जबाजारी होते, मग जो कर्जबाजारी आहे व त्याच्या हाती शस्त्र आहे तो काय करणार? सहाजिकच लूट करणार, जे कर्जबाजारी पेशव्यानी केले.

कुंजपु-यातील लढाई सुद्धा लूटच होती. मुळात कुंजपु-यावरची चढाई ही आधिपासून ठरवून केलेली चढाई नव्हतीच. ऐनवेळी पैशाची अडचण भागविण्यासाठी मिळालेला तो पर्याय होता. कुंजपु-याच्या हातापायीचे कितीही उदात्तीकरण करायला गेले तरी ती लढाई पुर्वनियोजीत नव्हती हे जाहीर आहे तसेच पैशाची गरज भागविण्याचा तो एक पर्याय होता हे सुद्धा सिद्ध होते. या कुंजपु-याच्या लुटीनंतर विंचुरकरानी २००० पठाण गुलाम म्हणून सोबत घेतले. हेच पठान नंतर पानिपत (पराजय) घडविण्यास कारणीभूत ठरले. आता मला सांगा जर तुम्ही कुंजपु-यातील लुटेस युद्ध मानत असाल तर एका प्रश्नाचे उत्तर द्या. विंचुरकरानी शत्रूची सेना(२००० पठाण) सोबत घेतली गेली असती का? असती तर ती वार करेल ईतकी मोकाट सोडली असती का? याचे उत्तर सरळ आहेत. तात्कालीन संदर्भ हेच सांगतात की शत्रूसेना एकतर सोडून दिल्या जात असे वा त्या सेनेचे मुंडकं उडविल्या जात असे. पण ईथे विंचुरकर मात्र त्याना सोबत घेतात व ऐन लढाईत मोकाट सोडतात याचे कारण काय असेल? मुळात त्या दोन हजार पठाणाना विंचुरकरानी स्वतःच्या सैन्याची सेवा करण्यास घेतल्याची घटना हेच सांगते की कुंजपु-याती घातघाई ही लढाई वगैरे नव्हतीच. ती लूटेसाठी झालेली हातापायी होती. म्हणून २००० पठाणां बद्दल पेशवे नि विंचुरकर गाफिल राहिले. अन्यथा त्यांचा व्यवस्थीत बंदोबस्त केला असता.

चला आता हा धागा पावन झाला. अभिनंदन रे रोहन तुझे.
इतिहासातल्या प्रत्येक वाईट गोष्टीचं बिल ब्राह्मण नेत्यांच्या/ जेत्यांच्या/ राज्यकर्त्यांच्या ते अगदी ब्राह्मण घरात जन्मलेल्या दीड वर्षाच्या मुलाच्या नावे फोडलं की खरा इतिहास लिहिला जातो नाही का?
मला तर आता auschwitz आणि हिरोशिमाचे खापर पण ब्राह्मणांवर फोडले गेले तरी आश्चर्य वाटणार नाही.

चला आता हा धागा पावन झाला. अभिनंदन रे रोहन तुझे.>>>>.

नीधपशी सहमत ! मी वाटच बघत होतो , अजुन हा धागा योग्य त्या वळणावर का येत नाही याची! बाकी प्रतिसाद वाचतो आहे. माझा या विषयावरचा अभ्यास इथल्या अभ्यासकांच्या मानाने खुपच तोकडा आहे. पण तरीही कुठे शिरकाव करता येतोय असे वाटले तर लिहीनच Happy

नीधप >> तेच मि वर म्हणालो होतो .. हे असे का होते? . . चांगले विषय असतात , काहितरी नवी माहिती मिळत असते आणि मध्येच "येरे माझ्या मगल्या" चालू . .

इतिहासातल्या प्रत्येक वाईट गोष्टीचं बिल ब्राह्मण नेत्यांच्या/ जेत्यांच्या/ राज्यकर्त्यांच्या ते अगदी ब्राह्मण घरात जन्मलेल्या दीड वर्षाच्या मुलाच्या नावे फोडलं की खरा इतिहास लिहिला जातो नाही का?>> नीधप...... ईतर मला माहीत नाही, पण पानिपतचे अपराधी मात्र फक्त अन फक्त पुणेरी ब्राह्मण ठरतात. सोबत घेतलेले बाजारबुणगे व देवदर्शनाचा परिपाक म्हणजे पानिपत. यात नुसते ब्राह्मण मेले असते तर ब्राह्मणाना देव पावला म्हणून क्षमा करता आले असते. पण ब्राह्मणांच्या चुकीमूळे ईतर मराठी जनता मारल्या गेली त्या बद्दल पुणेरी ब्राह्मणाना कधीच क्षमा करता येणार नाही. किमान जेंव्हा जेंव्हा पानिपतवर चर्चा होईल तेंव्हा तेंव्हा पेशवे नि पुणेरी ब्राह्मण हे अपराधीच ठरतील.
एकतर पानिपतवर चर्चा करु नका, करायचीच तर ब्राह्मणांच्या चूकाही मान्य करा.

हा धागा ब्राह्मणावर जाणार होते हे बकासुर ह्यांच्या संजय सोनवणीच्या पोस्टला इथे टाकल्यामूळेच कळाले होते. कितीही बुद्धिप्रामाण्याच्या आव आणला तरी पोस्ट सगळं सांगून जात होती. अन त्यामुळेच, "सोनवणींनी तसे का लिहिले हे स्पष्ट आहे" असेही मी लिहिले होते.

असो. आपले अभिनंदन. पेशवे सोडून जणू काही इतर युद्ध ह्या मातीत झालीच नाहीत अन मराठा मेलाच नाही! अन विनाकारण कापून काढला गेलाच नाही.

पण राघोभरारीचे काय मग? त्याने तर अटकेपार झेंडे लावले अन मराठा एम्पायर घडण्यास बहुमोल मदत केली, तो ही ब्राह्मणच की!

मराठा म्हणजे आपण सर्व महाराष्ट्रीयन, पेशवे पण मराठाच - पण काही लोकांनी मराठा मधून ब्राह्मण वेगळे काढायचे असे ठरविले आहे. चालूदेत. ह्या चर्चेत रस नाही. करा काय सिद्ध करायचे ते.

अरे लोकांनो तुम्हाला इतकी चांगली माहीती आहे आणि तुम्ही इथे व्यवस्तित लिहीत ही आहात मग मधे जाती जमाती का आणत आहात...............


एका विशिष्ट जातींचे नाव न लिहीता माहीती लिहिता येत नाही का ?

बकासुर... तुमचे चालू दे..

राहीला प्रश्न कुंजपु-याचा, त्याला पेशव्यांची लूट असेच म्हणावे लागेल. लूटेसाठी तलवार उपसाण्याची वेळ भाऊवर आलीच होती. किंबहुना विश्वास पाटलाने तर असेही नमूद केले आहे की शेवटी शेवटी थेट पानिपत गावातील लोकांचीच लूट सुरु झाली.
>>> तुम्ही नक्की शेजवलकर वाचले आहे ना?

त्यावेळी पेशवे म्हणजे ब्राह्मणांची चूक झाली नाही असे इथे कोणी बोलत नाही आहे. पण मराठे देखील तितकेच जबाबदार आहेत ह्या सर्वाला.
नीरजा, विशाल, उदयवन, चारूदत्त... मी इथे अजून बरेच लिखाण करणार आहे. जात लक्ष्यात न घेता..

बाकी ज्यांना जो गोंधळ घालायचायलायचं तो घाला..

अहो बकासूर, तुम्हाला 'रानडुक्कर' नावाच्यी आय डी असलेल्या व्यक्तिबद्दल माहित आहे का?
का ते तुमचेच दुसरे नाव? काही असो. त्यांनी खालीलप्रमाणे एक धाग्यावर लिहीले आहे.

हाच इतिहास आहे.. पटत नसेल तर तुम्ही नव्याने इतिहास लिहायला मोकळे आहात.. लिहा नव्याने... दर दोन चार दिवसानी एखादा जहाल रडत असतोच खरा इतिहास लिहिलाच नाही म्हणून... आळशी कामचोर कुठले! .. साठ वर्षे झाली.. अजुन तुम्हाला खरा इतिहास लिहिता आला नाही ? ... त्यापेक्षा काँग्रेसवाले परवडले की... निदान खोटा का असेना पण एक इतिहास तरी लिहिला... जहाली लोकांसारखं नाही.. स्वतःही बोटभर इतिहास लिहिला नाही.. आणि वर शतकानुशतके हा इतिहास खराच नाही, हेही म्हणून रडायला मोकळे!

वरील विधानांत काँग्रेस ऐवजी ब्राह्मण व जहाल ऐवजी ब्राह्मणेतर असे केले तर हेच विधान इथेहि लागू पडते!

अहो, त्याचे काय आहे, जेंव्हा कुणि काही करतात तेंव्हाच त्यांच्याच हातून चुका होतात. जे काही शिकत नाहीत, पुढे येऊन जबाबदारी घेत नाहीत, नुसते बाजूला बसून दुसर्‍याला दोष देतात, त्यांना काय कळते खरे काय झाले, का झाले? ते नुसते मागून रडत बसणार.

हो रडतच बसणार! कायम रडत बसणार! स्वतः उठून अभ्यास , कष्ट न करता, नुसते रडत बसणार, शिव्या देणार!! कशाला लिहीता असले इथे? कुणालाहि सहज समजते की हे नुसते रडणे आहे, काहीSहि करायची हिंमत, अक्कल नाही अश्या लोकांचे!

चर्चा चांगली सुरु होती.
बकासुर, तुमच्या कुठल्याही विधानाला ना संदर्भ आहेत ना पुरावा. कशाच्या जोरावर इतकी ठाम चुकीची विधानं करताहात??
इथे अनेक लोक त्यांचे इंटरप्रिटेशन्स लिहिताहेत, ते त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर. तुम्हीही तसा अभ्यास करुन, पुरावे-संदर्भ दाखवून मग निष्कर्ष काढा. ते इतिहासाच्या अभ्यासकांकडून तपासून घ्या. अनेक वर्षांची मेहनत अस्ते ती. तुमच्यासारखे आधी निष्कर्ष ठरवून मग अभ्यास(?) करणार्‍या लोकांना काय समजणार?
आज महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही ब्राम्हण नाहीत, मग सगळीकडे आबादीआबाद आहे का? जी दुरावस्था आहे, तिचं खापर ब्राम्हणांनी सरसकट इतरजातीजमातीवर फोडायचं का?
खरं म्हणजे कुठल्याही जातीविषयी अनुद्गार काढणं हा गुन्हा आहे. तेव्हा जरा जपून. वरच्या तुम्ही केलेल्या जातीवाचक उद्गारांबद्द्ल सपशेल माफी मागायला हवी.
कायदा काय म्हणतो ते बघा - http://www.maayboli.com/node/32650

केदार्,सेनापती आणि इतर,
बकासुराकडे दुर्लक्ष करता येणार नाही का? मी फार उत्सुकतेने वाचत होती हा धागा. प्लीज बंद पडू देऊ नका. हाच त्यांचा अजेंडा असणार.

एखादं गाव जिंकायचं म्हणजे नेम्कं काय करत होते? तिथल्या लोकान्ना मारुन लुटायचे? आपले दोन चार सैनिक ठेवायचे? पण बाकीचे सैनिक परत फिरले की पुन्हा कुणीतरी आक्रमण करणारच की! गावातल्या लोकान्ना मारलं, पिकं जाळली तर पेशव्याना काय किंवा कुणाला काय कर कुठून मिळणार? Proud सगळे बिनडोकच होते... Proud

बकासुराकडे दुर्लक्ष करता येणार नाही का? मी फार उत्सुकतेने वाचत होती हा धागा. प्लीज बंद पडू देऊ नका. हाच त्यांचा अजेंडा असणार.

>>>माझ्या हातुन धागा बंद पडणार नाही.. Happy
मी इथे अजून बरेच लिखाण करणार आहे. जात लक्ष्यात न घेता..
बाकी ज्यांना जो गोंधळ घालायचायलायचं तो घाला..

एखादं गाव जिंकायचं म्हणजे नेम्कं काय करत होते? तिथल्या लोकान्ना मारुन लुटायचे? आपले दोन चार सैनिक ठेवायचे? पण बाकीचे सैनिक परत फिरले की पुन्हा कुणीतरी आक्रमण करणारच की! गावातल्या लोकान्ना मारलं, पिकं जाळली तर पेशव्याना काय किंवा कुणाला काय कर कुठून मिळणार? फिदीफिदी सगळे बिनडोकच होते...>>>>>

मला वाटते हे ही एक कारण होते मराठ्यांनी दिल्ली ताब्यात न घेण्याचे. कारण एकदा जिंकलेली दिल्ली कायमकाळ आपल्या ताब्यात ठेवणे महाराष्ट्रात राहून शक्य होणार नव्हते. त्यामुळेच की मराठ्यांनी दिल्लीच्या तटापर्यंत जावूनही दिल्ली ताब्यात न घेता केवळ खंडणी वसुल करून, त्यानंतर एका मुघल युवराजालाच सत्तेवर बसवण्याचा शहाणपणा दाखवला होता. अर्थात आपला प्रतिनिधी दिल्ली दरबारात ठेवला होताच त्यांनी.

राहता राहीला प्रश्न लोकांना मारण्याचा, पिकं जाळण्याचा तर हे प्रकार मराठ्यांनी केल्याचे ऐकिवात नाही. हा मिळेल त्या शेतात मुक्काम करुन खाण्यासाठी तिथल्या पिकांचा वापर सर्रास केला जाई त्याकाळी मराठ्यांकडून तसेच इतर आक्रमकांकडुनही. Happy

सेनापती, एक सुचवावसं वाटतंय. पानिपतावर जे काही आधारग्रंथ आहेत (कादंबर्‍या आणि नुसत्या बाजरगप्पांची पुस्तकं नव्हेत) आणि कागदपत्रं, मूळ संदर्भ आहेत - ज्याला प्रायमरी सोर्सेस म्हणता येईल - त्यांची एक यादी करून वरती टाक. म्हणजे कोण कशाच्या आधारावर बोलतंय याचा उलगडा करायला सोयीचं जाईल.

हा मिळेल त्या शेतात मुक्काम करुन खाण्यासाठी तिथल्या पिकांचा वापर सर्रास केला जाई त्याकाळी मराठ्यांकडून तसेच इतर आक्रमकांकडुनही.

लाखानं सैन्य शेतात राहिलं काय आणि न रहाता जाळून पुढे गेलं काय.. दोन्हीचा हिशोब एकच की! Proud बरं झालं लोकशाही आली.. न्हायतर कुठं तरी तलवार घेऊन लढत बसलो असतो..

मराठ्यांनी दिल्लीच्या तटापर्यंत जावूनही दिल्ली ताब्यात न घेता केवळ खंडणी वसुल करून,

म्हणजे अब्दालीनं केली तर लूट... मराठ्यानी केली तर खंडणी वसुली?? ज्या गावात आपल्याला रहायचे नाही, जिथल्या जनतेला काही राजाचे कर्तव्य म्हणूण काही द्यायचे नाही, तिथल्या जनतेकडून खंडणी कशाला घ्यायची? अब्दाली काय आणि पेश्वा काय सगळे तसलेच होते म्हणायचे.

थोडंसं अवांतर

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!" ही गोविंदाग्रजांची संपूर्ण कविता आहे का कोणाकडे?

>>> हा धागा ब्राह्मणावर जाणार होते हे बकासुर ह्यांच्या संजय सोनवणीच्या पोस्टला इथे टाकल्यामूळेच कळाले होते. कितीही बुद्धिप्रामाण्याच्या आव आणला तरी पोस्ट सगळं सांगून जात होती. अन त्यामुळेच, "सोनवणींनी तसे का लिहिले हे स्पष्ट आहे" असेही मी लिहिले होते.

संजय सोनवणींच्या, मासिके व वर्तमानपत्रातून लिहिलेल्या इतर लेखातूनही, ब्राह्मणद्वेष ठळकपणे आढळतो. त्यामुळे त्यांच्या याही लेखात तोच सूर असणार यात नवल नाही.

रानडुक्कर,

अब्दालीने अमृतसरातलं सुवर्णमंदिरातलं पवित्र तळं हिंदूंच्या प्रेतांनी भरून टाकलं होतं. यमुनेच्या घाटावर ५०००० साधूंच्या कत्तली केल्या.

अब्दाली आणि पेशव्यांतला फरक आपल्या लक्षात आला असेलंच!

आ.न.,
-गा.पै.

कौरव -पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ धृ.॥

जासुद आला कथी पुण्याला - '' शिंदा दत्ताजी पडला ;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो अपमानियला । ''
भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले , '' जाऊ हिंदुस्थाना , नीट पहा.
' काळा ' शी घनयुध्द करुं मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा. ''
बोले नाना , '' युक्ती नाना करुनी यवना ठार करा ;
शिंद्यांचा अपमान नसे हा ; असे मराठया बोला खरा. ''
उद्गीरचा वीर निघाला ; घाला हिंदुस्थानाला ;
जमाव झाला ; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे ;
वृध्द बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसें.
होळकराचे भाले साचे , जनकोजीचे वीर गडी ,
गायकवाडी वीर अघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्यें धीर धरी ;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी ;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळी अंतरी विंचुरकरही त्याचपरी ;
नारोशंकर , सखाराम हरि , सूड घ्यावया अशी धरी.
अन्य वीर हे किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासातें घेति सवें ,
सूड ! सूड !! मनिं सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवें.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे ;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ कौ. १ ॥

( २ )

जमले यापरि पानपतावरि- राष्ट्रसभा जणुं दुसरि दिसे ;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसें.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे ;
प्रतिपक्षखंडना स्वममंडना ; तंबू ठोकिती मंडपसे.
शस्त्रशब्द हीं सुरस भाषणें सभेंत करिती आवेशें ;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसें.
एका कार्या जमति सभा या , कृति दोघींची भिन्न किती !
बघतां नयनीं वाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरमति
पूर्ववीरबल करांत राहे , आहे सांप्रत मुखामधी ;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झालों असे कुधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरिपुत्र गुणी
युध्द कराया , रिपु शिक्षाया , संरक्षाया यशा रणी ॥ कौ. २ ॥

( ३ )

अडदांड यवन रणमंडपिं जमले ; युध्दकांड येथोनि सुरु.
करिती निश्चय उभयवीर रणधीर '' मारुं वा रणीं मरुं ''
पुढें पडे दुष्काळ चमूंमधि अन्न व खाया वीरांना ;
म्हणती , '' अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊं चला रणा. ''
मग सेनेनें एक दिलानें निश्चय केला लढण्याचा ;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधीं बुंदेले ;
श्रीशिवराया युध्द पहाया हांक द्यावया कीं गेले ?
धन्य मराठे ! धन्य यवन ते रणांगणांमधिं लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधें कराया युध्दखळी ;
परि स्वार्थ अनिवार मार दे , आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचें दैवहि नाचे अभिमानाचें रुप धरी ;
करि वसति मनिं सदाशिवाच्या ; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणुं डाव मांडिला बुध्दिबळाचा भूमिवरी ;
परि दुर्दैवें वेळ साधिली प्यादीं आलीं अम्हांवरी !
कलह माजला , झालि यादवी , नवीन संकट ओढवले ;
कारस्थानीं हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले .
कुणि यवनांचा बाप जाहला , ताप तयाचा हरावया ,
नवा सोडुनी जया दवडुनी कुणीं लाविल डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी , कोणी तख्तासाठिं झुरे ;
कुणा लागला ध्यास प्रीतिचा विचार सारासारिं नुरे.
'' लालन लालन ! '' करि कुणि , साधी मर्जीनेची कुणि मरजी ;
असे घसरले , साफ विसरले युध्दरीती अति खडतर जी.
गारदीच मज माफ रुचे जरि यवन न सोडी विश्वासा ;
निजबंधूंची करणी ऐकूनि सोडिं , वाचका , नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमानें ,
जसे हल्लिंचे लोक तोकसम कलहा करिती नेमानें ,
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होतें मन श्रवणीं
असो ; बुडाली एकी , बेकी राज्य चालवी वीरगणीं
सरदारांच्या बुध्दिमंदिरा आग लागी कलहाची
शिपाइभाई परि नच चळले ; रीति सोडिली न मर्दाची.
नाहीं लढले , लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती ;
तसे मराठे गिलचे मोठे कलिंत लढले पानपती ॥ कौ. ॥ ३॥

( ४ )

एके दिवशी रवि अस्ताशी जातां झाला विचार हा -
'' प्रात:काली स्मरुनी काली युध्द करुं धनदाट महा. ''
निरोप गेला बदशहाला , '' युध्द कराया उद्यां चला ;
समरांत मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हांवरि अचला. ''
सकल यामिन आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची ;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची .
परस्परांतें धीर मराठे गोष्टि सांगती युध्दांच्या ,
वीरश्रीच्या शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी , '' माझा न गणी वंशचि मृत्यूभयासिं कधी ;
आजा , पपजा , बापहि माझा पडला मेला रणामधीं.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा ?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा ! ''
कुणी धरी तलवार करीं तिस पाहुनि आनंदें डोले ,
फिरवी गरगर करि खालीं वर वीर मराठा मग बोले -
'' अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचें द्याज घेउनी उद्यांच देइन यवनाला. ''
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोण नच आली ;
कोठें गेली अशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरुपें ईर्षा आली ; भीति पळाली निशामिषें ;
भय मरणाचे कैचें त्यांना ? काय करावें हरा विषे ?
शिंग वाजलें संगरसूचक कूच कराया मिळे मुभा ;
धांवति नरवर समरभूमिवर ; राहे धनगर दूर उभा
हटवायातें देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया ,
कीर्तिवधूतते जाति वराया समरमंडपीं धांवुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदलीं मुख्यत्व घेत कीं पापावलिमधिं जसा कली ,
प्रणव जसा वेदांस सदाशिव तसा आर्यबलसेनानी ;
विश्वासातें पाहुनि वदनीं अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि ; जसे जात कवि यापुढतीं
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ४॥

( ५ )

वाढे जैसा दिवस , वाढलें युध्द तसें अतिनिकरानें
हातघाइला लढाइ आली ; अंबर भरलें नादानें.
उभय वीरवर गर्जति ' हरहर ', ' अल्ला अकबर ' उल्हासें ;
भासे आला प्रळय ; यमाला दिली मोकळिक जगदीशें.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा ;
तलवारींच्या दिवटया केल्या ; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली ; '' उदे '' गर्जती भक्तबळी ,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी ,
रणवाद्य भंयकर भराड वाजे शुध्द न कोणी देहाची ;
रणमदमदिरामत्त जाहले , हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रयरा जणुं अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभीं धाडुनी मेघसंघ कीं रचिति नवा ?
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थीचे ;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचें.
घोर कर्म हें बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा ;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर ; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ ; भ्याले दाढीवाले , मग हटले ;
पळती , धांवति सैरावैरा ; आर्यवीर त्यांवरि उठले.
आर्यजनां आवेश नावरे ; भरे कांपरें यवनाला ;
म्हणति '' मिळला जय हिंदूला लढाइ आली अंताला ! ''
तोंच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला ,
स्वयें धांवला , पुढें जाहला , स्फूर्ति पुन्हां ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चाललें , हले भरंवसा विजयाचा ;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाहीं उपमा शौर्याला ;
त्यावरि ये विश्वास , भासलें कीं खानाचा यम आला !
विश्वासानें अतिअवसानें खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणीं मरण तया ये , शरश एक मग यमनगरी ,
धीर सोडिती पीर शहाचे पळती आवरती न कुणा ;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी , तोही घाबरला ,
म्हणे , '' करावें काय ? न ठावें ! '' दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे ;
म्हणे चमूला , '' पळति यवन ये कंठ तयांचे छेदावे. ''
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकतां छेदावे. ''
शहा तयातें सहाय होतां मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरीं कविज्ञन इच्छा मनिं करिती ,
तसे मराठे गिलचे याचे कलींत लढलें पानपती ॥ कौ. ॥ ५ ॥

( ६ )

नभोमध्यगत सूर्य होत मग युध्दहि आलें मध्याला ;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हांला विजय मिळावा , प्रताप गावा जगतानें !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा ,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा , भाऊ माधवरायाचा ,
बेटा ब्राह्मण बादशहाचा ; पेटा साचा वाघाचा ,
वीरफुलांतील गुलाबगोटा , वाली मोठा धर्माचा ,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण आणितां आर्याला ,
विजयाचा विश्वास असा विश्वास - लागला शर त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचें ओढवलें ;
धर्म-सभेला आत्मा गेला , धर्मवधूकरिं शव पडलें.
अश्रू नयनीं आणि लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची ;
उत्तरे चर्या , अघा न मर्या , परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनीं -
'' नाथघात सैन्यांत समजतां धीर उरेल न आर्यजनीं. ''
छातीचा करि कोट , लोटिला दु:खलोट अनिवार जरी ,
नीट बैसवी प्रेता देवी धुनष्य त्याच्या दिलें करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पति ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचें भाग्य असे या म्हणुनि मिळे हें गायाला !
परि जें घडलें लपले कुठलें ? वेग फार दुर्वार्तेला ;
अल्पचि काळें भाउस कळलें - '' गिळिलें काळानें बाळा ! ''
'' हाय लाडक्या ! काय कृत्य हें ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा , तोंड पुण्याला दावुं कसें ? कथिं तोड तरी , ''
असा करी ती शोक ऐकुनी दु:ख जाहलें सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजतां भंग कराया आर्याच्या चतुरंग बळा
सिध्द जाहला शहा ; तयाला देवानें आधार दिला.
फिरति मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला ;
भाऊराया योजि उपाया - तोही वायां परि गेला.
मान सोडिला , साम जोडिला ; दूत धाडिला होळकरा ;
प्रसंग येता मत किंकरा धनी जोडिती असे करां.
दूर निघाला. सत्वर आला , होळकरांला नमन करी ;
म्हणे , '' भाउचा निरोप एका - ' साह्य करा या समयिं तरी.
उणें बोललों , प्रमत्त झालों , बहु अपराधी मी काका ;
माफ करा , मन साफ करा , या आफतींत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा ;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हें व्यक्तीचें नच ; सक्ति नको ; भक्तीच हवी ;
आसक्ती सर्वांची असतां मिळवूं आतां कीर्ति नवी.
राग नका धरु ; आग लागते यशा ; भाग हा सर्वांचा ;
शब्द मुलाचा धरितां कैचा ? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन बधाया धीर द्यावया या काका ! ''
असें विनविलें , हात जोडिले , दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला ; धरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लावी वयास ; केली थट्टा ऐशा विनतीची ;
दु:खावरतीं डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा -
'' पळा , मिळाला जय यवनाला! '' काय म्हणावें अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैचे ? दैवचि फिरलें आर्यांचें ;
पाहे भाऊ , वाहे नयनीं नीर ; करपलें मन त्याचें.
निरोप धाडी पुन्हा तयाला - '' पळा वांचवा प्राण तरी
पळतांना परि कुटुंबकबिला न्यावा आमुचा सवें घरीं ''
घेत होळकर वीरवधूंतें ; मग दक्षिणची वाट धरी ;
देशहितांची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा ; निजबंधूंच्या दे साची
परवशतेची माथीं मोळी , हातीं झोळी भिक्षेची !
काय कथावी युध्द-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला ;
धीर सोडुनी पळति मराठे , पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धांवे ; वार तयाचा शिरीं जडे ;
भारतरमणीकंठतन्मणी धरतीवरतीं झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव कीं आर्यांचे
आकाशाची कुऱ्हाड पडली ; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती ; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर: वदा कशाला तो आतां ?
वर्णन करितां ज्या रीतीनें कुंठित होइल सुकविमति ,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ॥ ६ ॥

( ७ )

सन सतराशें एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे , उत्कर्ष उरेना ; सकळां आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती ; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर ; मूर्ति अवतरे करुणाची .
घरोघरीं आकांत परोपरि ; खरोखरीचा प्रळय दिसे ;
भरोभरीं रक्ताच्या अश्रू अबला गाळिती शोकरसें.
' दोन हरवली मोति ; मोहरा गेल्या सत्तावीस तशा ;
रुपये खुर्दा न ये मोजितां ' - वचना वदती वृध्द अशा ;
धोर वृत्त हें दूतमुखानें कानीं पडलें नानाच्या ;
' भाऊ भाऊ ' करितां जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयातें हें नव संकट कां यावे !
दु:ख एकटें कविं न येत परि दु:खामागुनि दु:ख नवें !
धक्का बसला आर्ययशाला ; तेथुनि जाई राज्य लया ,
रघुनाथाचें धैर्य हरपलें , जोड उरेना हिमालया.
'' नाथ ! चाललां सोडुनि अबला ! पाहूं कुणाच्या मुखाकडे ? ''
'' वाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरतिं कडे ? ''
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरतां ;
कोणिकडेही तरुण दिसेना ; सेनासागर होय रिता.
उडे दरारा , पडे पसारा राज्याचा ; बळ घेत रजा ;
उघडें पडलें मढें हत्तिचें कोल्हे त्यावरि करिती मजा !
भलते सलते पुढें सरकले , खरे बुडाले नीच -करीं.
मालक पडतां नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हां ; ! खडे चारले यवनांनी ;
तडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वातें दूर लोटिलें निज हातें.
रुमशामला धूम ठोकितां पुणें हातिचें घालविलें ;
दुग्धासाठी जातां मार्गी पात्र ठेवुनी घरिं आले !
करि माधव नव उपाय पुढतीं परि ते पडती सर्व फशीं ;
परिटघटी उघडिल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी ?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्रीं पडतां गिरिशिखरें
पानपताच्या पर्वतपातें इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचें पान येथचें काळें झालें दैवबळें ,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयातें अतां किती ?
व्यास वर्णितां थकले यातें मग मी कोठें अल्पमति ?
जसें झगडतां त्वरित फिरावी सकल जगाची सरळ गति
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ७ ॥

( ८ )

जें झाले ते होउनि गेलें फळ नच रडुनी लेशभरी ;
मिळे ठेंच पुढल्यास मागले होऊं शहाणे अजुनि तरी.
पुरें पुरें हे राष्ट्रविघातक परपस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करितां मरण मराठी राज्याला.
हा हिंदू , हा यवन , पारशी हा , यहुदी हा भेद असा ,
नको नको हो ! एकी राहो ! सांगू आपणां किती कसा ?
एक आइचीं बाळें साचीं आपण सारे हें स्मरुनी ,
एकदिलानें एकमतानें यत्न करु तध्दितकरणीं.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरवपांडव- संगरतांडव द्वापरकालीं होय अती ;
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ ८ ॥

सेनापती,

माझा काही फार मोठा अभ्यास नाही पण मुळ धागा सुरु झाला तेव्हा बरेच नवीन काही समजेल, माझे पानीपता विशयीचे तर्क इथल्या अभ्यासकांच्या मतांशी जुळतात का ते समजेल असे वाटले होते. जसे जमेल तसे माझे विचार मांडायचीही ईच्छा होती पण धाग्याचा प्रवाह मुळ टारगेट सोडून भलत्याच दिशेला वळलेला पाहून तीही ईच्छा गेली Sad

पानीपतकडे केव्हा आपण एक फक्त लढाई म्हणून बघणार...असे म्हणू पाहीजेतर ही लढाई मराठा साम्राज्य किंवा परकीय आक्रमक यांच्या अस्तीत्वाची लढाई होती...

त्यावेळच्या सर्वाधीक भूभागावरचे राज्यकर्ते या न्यायाने आलेल्या आक्रमणाचा मराठा साम्राज्याचे प्रधान या न्यायाने पेशव्यांना या लढाईत सहभागी व्हावे लागले असेल....आज आपण २५० वर्षांनंतर ह्याचे हे चुकले त्याचे ते चुकले अशी चर्चा करतो आहोत पण त्या वेळेला तद्परीस्थीतीनुसार निर्णय घेतले गेले असतीलच की... आज २.५ शतका नंतर आपण त्या निर्णयांची चिरफाड करतो आहोत...

महाराज्यांच्या वेळेला पण काही काही निर्णय अंगाशी येण्याईतके चुकलेच की पण त्यातून स्वराज्याची स्थापनेची ईच्छा काही संपली नाही... तसेच पानीपतानंतरही माधवराव पेशव्यांनी मराठा साम्राज्य समर्थपणे सांभाळलेच की...

असो...

धाग्यावरील चर्चा चालूदे... काही नवीन हाती लागलेच तर जमा करतोच आहे....

अब्दाली आणि पेशव्यांतला फरक आपल्या लक्षात आला असेलंच!

म्हणजे तोही लुटतो आम्हीही लुटतो.. पण (आमचा धर्म एक असल्याने) आम्ही तुम्हाला ठार मारत नाही ( किंवा मारले तरी त्याचे रेकॉर्ड ठेवत नाही) म्हणून आम्ही श्रेष्ठ ! Happy

वरदा... तुम्ही म्हणताय तसे नक्की करता येईल.. Happy

संपूर्ण काव्य इथे दिल्याबद्दल धन्यवाद... शेवट आवर्जून वाचाच... Happy

काही नम्र व प्रामाणिक प्रश्नः

१. इतिहास सांगणार्‍यांना इतिहास कसा कळतो? पुस्तके वाचून ना? मग ती पुस्तके खरी आहेत हे कसे ठरते? तर ती नावाजली व वाचली गेली म्हणून ना? मग हे तर खरे ठरण्याचे प्रूफ नाही ना? जो जे लिहील त्याच्यादृष्टीने ते खरे इतकेच ना?

२. समजा काही शेकडो इतिहास संशोधकांच्या समुदायाने उत्खनन व वाचन, डिकोडिंग वगैरे स्वरुपाचा इतर अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढला तर त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे कोणते मापक उपलब्ध असते? सामान्य माणूस तेच मान्य करणार ना जे तो समुदाय म्हणेल? त्या समुदायाचे चूक असू शकत नाही का? कित्येक संशोधकांचे शोध चुकीचे ठरल्याचे प्रयोगाने सिद्ध झाल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे ना? तसे सिद्ध होईपर्यंत ते शोध सत्यच आहेत असेच समजले जात होते ना?

आपला अमूल्य वेळ आपली मते ठासण्यासाठी सगळेच घालवतात, मी कोण शहाणा त्यावर बोलणार? पण कोणाला सत्य माहीत आहे? उगाच काय भांडायचे? ब्राह्मण काय आणि मराठे काय आणि नजीब काय आणि अब्दाली काय!

तिसरा व सर्वात महत्वाचा (माझ्या दृष्टीने) प्रश्नः

३. या सर्व माहितीचा आपल्या दैनंदिन आयुष्यात आज काय उपयोग आहे? त्याने काय फरक पडणार आहे? समजा ब्राह्मणांची चूक होती आणि युद्ध नव्हे तर तीर्थयात्रेसाठी बुणग्यांना घेऊन पेशवे निघाले हे सिद्ध झाले तर आज काय फरक पडेल? समजा मराठ्यांची चूक होती आणि ब्राह्मणांनी नीतीचे युद्ध केले असे सिद्ध झाले तर आज काय होणार आहे?

इतिहासाबद्दल आपण संपादन केलेले ज्ञान हे आपल्याला एक व्यापक सामाजिक दृष्टिकोन देण्याइतपतच उपयोगी पडते हा मुद्दा गेल्या साठ पासष्ट वर्षांच्या स्थिरावलेल्या लोकशाहीने सिद्ध केलेला आहे. याउपर त्या माहितीचे, ज्ञानाचे प्रयोजन काही इतर नसून फार फार तर दंगेधोपे करायला बरे पडते इतकेच.

<<<<पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.>>>>

हा प्रश्न मूळ लेखात विचारलेला आहे व प्रश्नकर्त्याबद्दल पूर्ण आदर आहे.

पण हे सगळे कसेही झालेले असले तरी त्याचा आज काय संबंध आहे? या क्षेत्रातील जे कोणी जाणकार असतात त्यांच्या ज्ञानाचा आज फायदा काय? उगीच संदर्भ, सनावळी आणि लिंक्स देऊन शेवटी मराठे (पेशवे समाविष्ट) का हारले हेच सिद्ध होणार ना?

(अवांतर - काही प्रतिसाद मी नुकत्याच काढलेल्या मुस्लिम धार्मिक स्थळांच्या धाग्याबाबत हीच मते मांडायचा प्रयत्न करतील तर त्यांना अ‍ॅडव्हान्समध्ये उत्तर असे की चार पाच दिवसांपूर्वी झालेल्या बाबीवर तो धागा आहे व चारपाचशे वर्षांपूर्वी झालेल्या बाबीवर नव्हे)

-'बेफिकीर'!

मनोज... दिल्लीचे राजकारण हा आपला अंतर्गत मामला आहे आणि त्यासाठी कोणीही बाहेरचा (उदा. अब्दाली) पडायची गरज नाही हे मराठ्यांचे मत होते. त्यामुळे ही लढाई आतले विरुद्ध बाहेरचे अशीच होती. शिवाय दिल्लीच्या रक्षणाचा करार होताच. जो की खरेतर १६५६ साली पळाला नाही. राघोबाने शिंदे - होळकरांच्या मदतीने पुन्हा दिल्ली ते अटक मारले असले तरी नजीब्ला सोडून देणे ही प्रचंड मोठी चूक पुढे भोव्लीच.

दुर्दैवाने पानपता आधी १०-१५ वर्षात उत्तरेत बहुसंख्य जणांना मराठे व्याद वाटू लागले होते. त्यामुळे मग जेंव्हा खरया अर्थाने मदतीची गरज १६७० साली लागली तेंव्हा सर्वांनीच हात वर केले. गंमत बघा हा.. शिंदे - होळकर यांच्या सैन्याला कधी म्हणजे कधीही उपासमार सहन करावी लागली नाही. अगदी शेवट पर्यंत. कारण त्यांची रसद, पैसा हा नियमितपणे पोचता होत होता. प्रश्न होता तो पेशव्यांच्या फौजेचा. किती हा विरोधाभास...

बेफिकीर
प्रश्न १ : इतिहास वाचूनच कळतो हे बरोबर. पण इतिहास वाचने हे म्हणजे कथा वाचने नाही. जेंव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात उतराल तेंव्हा कळेल की ते किती अवघड काम असते. विवादास्पद दोन्ही बाजूंमधील कोणती बाजू योग्य ते त्या माणसाची शुरता दुर ठेवूनच थोडेसे अलिप्त राहून बघावे लागते. उगाच एक पुस्तक वाचले अन तोच इतिहास असे नसते. इथे मायबोलीवर तर काहीही न वाचता काहीही लिहिणारे लोक आहेत त्यावरून इतिहासाची उपयुक्तता ठरत नाही.

प्रश्न २ : इतिहासाची साधने पडताळाल्याशिवाय तो इतिहास ग्राह्य धरत नसतात. उद्या माझ्याकडे एक पत्र सापडले तर ते पत्र आधी इतिहासकार (ज्यांना हे पत्र खरे आहे की नाही ह्याचे ज्ञान / शिक्षण असते ते) तपासून पाहतात, त्यावरून कुठल्या घटना कश्या बदलल्या ते आणखी १०-५ साधनं पाहून ठरवतात अन मग तो दस्तऐवज होतो.

त्या समुदायाचे चूक असू शकत नाही का >> हो कधी कधी होऊ शकते कारण इतिहासाकडे निपक्षपणे पाहणरे लोक असतात, जे मग ते पत्र कसे वन ऑफ आहे / महत्वाचे नाही हे मांडतात. एक कमिटी जसे काम करते तसे हे काम होते. अनेकदा इतिहासकारांमध्ये खडाजंगी लागते व वादही होतात. (उदा शिवाजी महाराजांना लिहिता येते की नाही? ) पण आधी लिहिल्यासारखे ते एखादे रानडुक्कर, केदार किंवा बकासुर नसतात, त्यांना अलिप्त राहून पाहता येते. उदाहरणादाखल तुम्ही अ. रा. कुळकर्ण्यांचे लिखान वाचा.

वरील प्रश्नाचे उत्तर खरे तर वरदा नीट देऊन शकेल पण मी ट्राय केला.

ब्राह्मण काय आणि मराठे काय आणि नजीब काय आणि अब्दाली काय! >>> हो इंग्रज राज्य काय, गुलामी काय आणि स्वातंत्र्य काय एकच नाही का?

उद्या माझ्याकडे एक पत्र सापडले तर ते पत्र आधी इतिहासकार (ज्यांना हे पत्र खरे आहे की नाही ह्याचे ज्ञान / शिक्षण असते ते) तपासून पाहतात, त्यावरून कुठल्या घटना कश्या बदलल्या ते आणखी १०-५ साधनं पाहून ठरवतात अन मग तो दस्तऐवज होतो.>>>>>

ज्ञान व शिक्षण असणे म्हणजे काय ते कृपया विशद करावेत. त्यांना हे ज्ञान व शिक्षण कसे मिळते? ज्यांना ज्ञान व शिक्षण मिळालेले आहे असे त्यांना वाटते त्यांच्याकडून का?

ब्राह्मण काय आणि मराठे काय आणि नजीब काय आणि अब्दाली काय! >>> हो इंग्रज राज्य काय, गुलामी काय आणि स्वातंत्र्य काय एकच नाही का?>>>

आपल्याला माझे म्हणणे मला अभिप्रेत असलेल्या सेन्समध्ये घ्यायचे नसावे असे दिसते. माझ्या म्हणण्याचा रोख 'आज त्याने काय फरक पडतो' या संदर्भात आहे.

-'बेफिकीर'!

१. इतिहास सांगणार्‍यांना इतिहास कसा कळतो? पुस्तके वाचून ना? मग ती पुस्तके खरी आहेत हे कसे ठरते? तर ती नावाजली व वाचली गेली म्हणून ना? मग हे तर खरे ठरण्याचे प्रूफ नाही ना? जो जे लिहील त्याच्यादृष्टीने ते खरे इतकेच ना?

२. समजा काही शेकडो इतिहास संशोधकांच्या समुदायाने उत्खनन व वाचन, डिकोडिंग वगैरे स्वरुपाचा इतर अभ्यास करून काहीतरी निष्कर्ष काढला तर त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे कोणते मापक उपलब्ध असते? सामान्य माणूस तेच मान्य करणार ना जे तो समुदाय म्हणेल? त्या समुदायाचे चूक असू शकत नाही का? कित्येक संशोधकांचे शोध चुकीचे ठरल्याचे प्रयोगाने सिद्ध झाल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे ना? तसे सिद्ध होईपर्यंत ते शोध सत्यच आहेत असेच समजले जात होते ना?

>>> इतिहासाच्या वाचकांना तो पुस्तके वाचूनच कळतो पण अभ्यासकांना खरे कागद तपासावे लागतात. त्यातून ते मते बनवतात. त्यावर चर्चा होते मगच मान्यता मिळते. कोणी एक बोलला म्हणून ते खरे असे होत नाही. एकदा ते खरे असे इतिहासकारांच्या समुदायाने नक्की केले की ते बाहेर लोकांपर्यंत येते. सत्यासत्यता पडताळून पाहण्याचे कोणते मापक म्हणजे तत्कालीन पत्रे, नकाशे, नोंदी आणि बखरी. जसे जसे नवीन नवीन कागदपत्र मिळतात तसे आधीचे मत बदलूही शकते.. हे खरे.. Happy

बेफिकीर.. जुन्यातून चुका काढून त्या वर्तमानकाळात टाळून चांगले भविष्य घडवावे हाच इतिहासाचा हेतू. जो इतिहास विसरतो तो अधिक उज्वल भविष्य घडवू शकत नाही. कारण तो समाज/ ती व्यक्ती त्याच त्याच चुका सतत करत राहते. (सध्या आपण/आपला समज तेच करतोय.)

मला सांगा मग इतिहासातील चांगल्या गोष्टी पण शिकायच्या/शिकवायच्या नाहीत का? छत्रपती शिवाजी विसरून जायचा का? धैयवाद, आदर्श राहणी, राष्ट्रनिष्ठा हे सर्व सोडून द्यायचे? ते कुठून शिकणार तुम्ही? इतिहासातूनच ना???

त्यावर चर्चा होते मगच मान्यता मिळते>>>>>

चर्चा करणार्‍यांच्या ज्ञानाची ऑथेंटिसिटी तपासायला मापक नाही असे मला म्हणायचे होते. आता सांगा,दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरू होते की नव्हते? शंभर वर्षांनी त्यांना कोणीही गुरू म्हणणार नाही कारण तेव्हा इतिहास तसा पोचलेला असेल त्या पिढीकडे. मग आपल्याकडे कसा पोचला हेही तपासायला लागेल ना?

जुन्यातून चुका काढून त्या वर्तमानकाळात टाळून चांगले भविष्य घडवावे हाच इतिहासाचा हेतू. जो इतिहास विसरतो तो अधिक उज्वल भविष्य घडवू शकत नाही. >>>>>

जुन्यातून चुका काढायच्या असतील तर पानीपताआधी महाराज होऊन गेले. पेशव्यांनी कोठे चुका सुधारल्या? तेव्हा हा विचार का नव्हता की इतिहासातून ज्ञान मिळवून वाटहाल करावी? प्रत्येक वेळची परिस्थिती भिन्न भिन्न असते. अशा ज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही जर ते बर्‍याच वर्षांपूर्वीचे होते. आता सांगा, की हा इतिहास येथे मायबोलीवर खणून काढून ब्राह्मण मराठा यात दरी पडायला नको असा हेतू ठेवता तरी आला का कोणाला? कोणाच्याच अखत्यारीत राहिली नाही चर्चा. मग हा इतिहास अभ्यासून कुठे कोणी चुका सुधारल्या? सगळे बकासुरांवर भडकले आणि बकासूर सगळ्यांवर

Sad

मला सांगा मग इतिहासातील चांगल्या गोष्टी पण शिकायच्या/शिकवायच्या नाहीत का? छत्रपती शिवाजी विसरून जायचा का? धैयवाद, आदर्श राहणी, राष्ट्रनिष्ठा हे सर्व सोडून द्यायचे? ते कुठून शिकणार तुम्ही? इतिहासातूनच ना???>>>

छे हो, काय बोलताय? सगळेच वेगवेगळे बोलताय. Sad

शिवाजी आठवून आज आपण काय करतो? रेकॉर्ड लावून नाचतो? ड्राय डे ठेवून मागच्या दाराने दारू विकतो? शिवाजी नुसता आठवून काय करायचाय? ध्येयवाद व आदर्श राहणी पालक शिकवतात. राष्ट्रनिष्ठा म्हणालात तर शिवाजी आणि पेशव्याच्या वेळेसच्या भूभागाबाबत काहीच वाटायला नको.

-'बेफिकीर'!

इतिहास म्हणजे सगळा गोंधळच आहे.. ११०० पूर्वी भारत हे काही संघराज्य नव्हते.. सगळी राज्यं वेगळी.. तेच आपापसात भांडत होते... मग मुघल आले, ते परके ठरले.. ते शत्रू... काही पिढ्या गेल्या. मग मुघल आपले ठरले.. अब्दाली बाहेरचा.. तो शत्रु... अजून काही वर्शे गेली.. अखेरचा मुघल बहाद्दुरशहा हा भारतचा स्वातंत्रसैनिक ठरला आणि आता इंग्रज शत्रू Proud जनता बिचारी कधी याच्यासाठी कधी त्याच्यासाठी नुस्ती मरतच राहिली.. Happy

बेफिकीर यांचे नवीन मुद्दे ग्राह्य धरले तर कुणि काही इतिहासाचा अभ्यास करूच नये. तसेच अनेक विषयांबद्दल म्हणता येईल.
कारण पूर्वेला पूर्व का म्हणायचे नि १ + १ = २ च का? त्या आकड्याला २ च म्हणायचे हे उगाचच कुणितरी ठरवले नाही का? उद्यापासून बरेचसे लोक त्याला ५ म्हणतील. म्हणुन ते ५ होतील का? उत्तर हो. जग तसेच चालते, त्याला काय करणार?

बेफिकीर, रानडुक्कर, बकासूर नि तुमच्या नादाने मी, या सर्वांमुळे या धाग्याचा मूळ उद्देश नष्ट झाला आहे.

तेंव्हा आता पानिपताविषयी लिहा, तुम्हाला जे खरे वाटेल ते लिहा, नाही पटले तर सोडून द्या.
पण उगाच ब्राह्मण, ब्राह्मणेतर, इ. वाद सोडून द्या. जेव्हढ्या तुम्ही ब्राह्मणांना शिव्या द्याल त्याहून जास्त वाईट शिव्या मला माहित आहेत (निदान पूर्वी माहित होत्या, आता विसरलो आहे बर्‍याचश्या, पण आठवतील हळू हळू, द्यायला लागलो तर), पण तो विषय नाहीये हो!!
पण इथे जे काही थोडे लोक अभ्यासू वृत्तीने लिहीतात, त्यांना लिहू द्या. आपण हे वाद दुसरीकडे घालू!! मला भरपूर वेळ आहे!!

शनिवारी पुतण्याशी बोलत असताना त्याने शाळेत "पानिपतची लढाई" यावर वादविवाद स्पर्धेत भाग घेत असल्याचे सांगितले (इयत्ता आठवी). त्याला या धाग्याची लिंक देऊन चर्चा कशी असते आणि मुद्दे कसे मांडावेत ते बघ म्हणून सांगणार होतो. फार मोठी चूक झाली असती........
प्रत्येक धागा पहिले २-३ दिवस वाचनीय असतो मात्र लगेच अशा वळणावर जातो. एखाद्या उत्तम विषयावर चर्चा सुरू होऊन सत्यानाश झालेले धागे कोणीतरी सावरायला नको का..........

बेफिकीर मला तुमचा मुद्दा कळलाय आणि माझाही मुद्दा तुम्हाला कळला असावा अशी अशा करतो. Happy

शिवाजी आठवून आज आपण काय करतो? रेकॉर्ड लावून नाचतो? ड्राय डे ठेवून मागच्या दाराने दारू विकतो? शिवाजी नुसता आठवून काय करायचाय?
>> असे म्हणून आपण सर्व सोडून देत नाही ना? / देऊ शकत नाही ना?

झक्की... Wink

झक्की महोदय, पूर्वच पूर्व का असे मुद्दे घालून आपण चुकीची तुलना केली आहेत असे मला वाटते. शास्त्र, गणित, तंत्रज्ञान, भूगोल, खगोल अशा व इतर अनेक शाखांचा अभ्यास दैनंदिन जीवनास फायदेशीर ठरतो. इतिहासाचाही अभ्यास फायदेशीर ठरतोच, मात्र अशा चर्चा सुरू करणे हे फायदेशीर ठरत नाही. समजा पेशव्यांनी इथे बाफ काढला असता तर तुम्हीच म्हणाला असतात की आज पेशव्यांचा काय फायदा? हे पेशवे, रानडुक्कर, बकासूर व बेफिकीर आमच्या मेंदूचे दही करत आहेत. पण हा धागा काढतो आपण आजची माणसे, भांडतो आपण आजची माणसे आणि फायदा काय तर ह्याला कसा सोलला आणि त्याला कसा सोलला. पेशवे, मराठे, अब्दाली, नजीब हे मरून युगे लोटली आणि इथे आज मारामार्‍या. हे बरोबर आहे का?

-'बेफिकीर'!

वेबमास्तरांनी सगळ्यांनाच सरसकट दम (शुद्ध मराठीत वॉर्निंग) देऊन ठेवला पाहिजे की जातपात, धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट्स आणि ते सातत्याने लिहिणारे आय.डी. हद्दपार केले जातील, अतिशय पानचट धागे तर काढल्या काढल्याच उडवले जातील. त्यांनी आधीही हे काम केलेच आहे परंतु पुन्हा ही समस्या उद्भवलीच आहे.

आताही अ‍ॅडमिन / वेबमास्तरांना माझी विनंती आहे की अशा पोस्ट्स आयडेंटिफाय करुन नष्ट कराव्यात म्हणजे सभासदांना मायबोलीवर निखळ चर्चा करण्याचा / वाचण्याचा आनंद घेता येईल.

Pages