पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटीलसाहेब, युनिटीच्या रिप्लायला +1 इथे मायबोलीवर देखील ती "युनिटी" जशी पानिपतावर दिसते तशीच प्रत्येक वादात दिसत असते.

हिंदू अंकल सॅमच्या गावात मुक्कामाला आहेत, पण त्यांच्यासमोर नोकरी आणि संसार हेच दोन विकल्प असल्याने साम्राज्यतृष्णा त्याना कधी लागणारच नाही. त्यामुळे त्यांची ना तिथल्या अ‍ॅबओरिजिनना भीती ना वसाहतवाद्यांना. त्याना तरी प्रेषिताचीही कशाला गरज भासेल ? >>> परत +1

साम्राज्यतृष्णा त्याना कधी लागणारच नाही

इथल्या लोकन्ना साम्राज्य तृष्णा नव्हती तर ते अश्वमेध आणि राजसूय कशासाठी करायचे? जागतिक शांततेच्या नावानं दोन कबुतरं उडवून गप्प बसायचं की... घोडा कशाला फिरवायचा? Proud

श्री.वाल्या कोळी ~

अश्वमेध आणि राजसूय यज्ञ करण्यामागील उपचार वा भावना तुम्ही समजावून घेणे आवश्यक आहे. या दोन प्रथांचा साम्राज्यतृष्णेशी थेट संबंध येत नसतो.

१. अश्वमेध यज्ञ ~ याला आजच्या भाषेत 'डिप्लोमसी' म्हटले तर ते जास्त संयुक्तिक ठरले. धर्मग्रंथ आणि आचरणानुसार हा यज्ञ करण्याचा अधिकार फक्त 'सम्राटा' ला असे. श्री.केदार यानी 'सम्राट' पदाची व्याख्या मागे सांगितली आहेच, तरीही या उत्तरासाठी पुन्हा मी सांगतो की, देशभरातील "नरेश" ज्या एका ज्येष्ठ राजाचे वर्चस्व मान्य करतात [म्हणजेच ज्याला 'सम्राट' किताब प्राप्त झाला आहे] तो सोडून अन्यांना अश्वमेध यज्ञाचा अधिकार नाही. सहसा वसंत ऋतुमध्ये सम्राट या यज्ञाचे अशासाठी प्रयोजन करीत असे की शेतीवाडीची कामे संपली आहेत, कोठारे धान्याने वाहून चालली आहेत, जनता आनंदात मश्गुल आहे आणि आता विरंगुळही हवा आहे. त्यामुळे राज्यातील गुणी कलाकारांकडून विविध ललितकलांचे सादरीकरण होत असे आणि नगरजनही मुक्तपणे एक मास 'सोहळा' म्हणून भाग घेत असत. अश्वमेध यज्ञासाठी "घोडा' म्हणजे 'तृष्णे'चे प्रतीक नसून सम्राटाकडे त्या क्षणी असलेल्या साम्राज्यावर अन्य कुणी दावा लावण्याचे धारिष्ट्य करू नये म्हणून ती पताका लावून तो घोडा सीमित रेषेतच विशिष्ट कालापर्यंत फिरविला जात असे. त्याच्या पाठोपाठ जाणारे सैन्यही हे वाटेत येणार्‍याचा खातमा करण्यासाठी नसेच कारण जिथून घोडा जाई तो भाग सम्राटाच्या अधिपत्याखालीच असे. त्यातूनही एका असंतुष्ट "नरेशा' ने तो घोडा रोखण्याचा यत्न केला तरच सम्राटाचे सैन्य त्या नरेशाला प्रत्युत्तर देत. स्वत:हून कोणत्याही राज्यात ते प्रथम हल्ला करीत नसत. आपले साम्राज्य कसे चहुबाजूनी फुलले, बहरलेले आहे आणि जनलोकही किती सुखासमाधानात राहिले आहे त्याची ती एकप्रकारे ग्वाही असे. तृष्णा नव्हे.

२. राजसूय यज्ञ ~ यालाही परत इंग्रजीतूनच ओळखायचे असेल तर "Thanks Giving Event" असे म्हटले तर ते जास्त जवळकीचे होईल. एखाद्या 'नरेशा'ने आपल्या पराक्रमाने चारी दिशा गाजविल्या आणि राज्याची व्याप्ती वाढविली, छोटेमोठे राजे त्याचे अंकित झाले, संपत्ती वाढली, प्रजा सुखसागरात डुंबू लागली की मग त्या नरेशाला असे वाटे की इतरांनी आपल्याला आता 'चक्रवर्ती राजा' असे संबोधावे. त्यासाठी ऋषी-ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावेत आणि ज्यांच्या सक्रीय सहकार्याने, साहाय्याने आपण 'चक्रवर्ती' पदापर्यंतचा प्रवास केला आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता प्रकट करावी म्हणून हा यज्ञ आणि या यज्ञाच्या विविध प्रसंगी अशा व्यक्तींचा सत्कार आणि पूजन.

युधिष्ठराने हस्तिनापूरचे राज्य स्थापन केल्यावर राजसूय यज्ञ केला आणि पांडवांना सदैव मार्गदर्शन करणार्‍या श्रीकृष्णाची त्यानी षोडपचारे पूजाअर्चना केली. [त्यामुळे चिडलेल्या शिशुपालाने युधिष्ठराची निर्भत्सना केली, कृष्णाला दूषणे दिली, मग कृष्णाकडून सुदर्शन चक्राने त्याचा वध...इ.इ. बाबी तुम्हाला माहीत असतीलच.]

असो. यावरून हे दोन यज्ञ आणि साम्राज्यतृष्णा यांची एकमेकाशी सांगड घालू नये, इतकेच.

अशोक पाटील

इसके सिर पर जय-पत्र बाँधकर छोड़ा जाता था। एक सौ राजकुमार, एक सौ राज सभासद, एक सौ उच्चाधिकारियों के पुत्र तथा एक सौ छोटे अधिकारियों के पुत्र इसकी रक्षा के लिये सशस्त्र पीछे-पीछे प्रस्थान करते थे इसके स्वतन्त्र विचरण में कोई बाधा उपस्थित नहीं होने देते थे। इस अश्व के चुराने या इसे रोकने वाले नरेश से युद्ध होता था।

दक्षिणा जीते हुए देशों से प्राप्त धन का एक भाग होती थी।
http://hi.brajdiscovery.org/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%...

होता, ब्रह्मा, अध्वर्यु तथा उद्गाता को पूरब, दक्षिण, पश्चिम तथा उत्तर दिशाओं में विजित देशों की संपति क्रमश: दक्षिणा में दी जाती थी ओर अश्वमेध समाप्त हो जाता था।

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%...

काही असले तरी हे यज्ञ म्हणजे पौराणिक कल्पना आहेत.. प्रत्यक्ष इतिहासात असे यज्ञ कुणी केल्याची फारशी नोंद नाही... ( इथे फारशी हा मराठी शब्द आहे.. परभाषीय नाही.. Happy

"काही असले तरी हे यज्ञ म्हणजे पौराणिक कल्पना आहेत.. "

~ खरंय. पण मोहनराव झाले आहे असे की आपल्याला ज्या 'इतिहासा' ची पुराव्यासह माहिती आहे त्या त्या काळातील राजे, राजपुत्र, राजकन्या याना त्यांच्या पुरोहितांकडून, शिक्षकांकडून "पुराण कथा" सांगण्याचा प्रघात होता आणि मग साहजिकच थेट सत्ययुगापासून द्वापारयुगापर्यंत तसे 'अश्वमेध' वा 'राजसूय' यज्ञ का आणि कोणत्या हेतूसाठी घालत असत याचीही उदाहरणे दिली जात असत.

[रावणासारख्या बलाढ्य राजाचा आणि राक्षसांच्या महासागरसम सैन्याचा पराभव करणार्‍या रामाचा "घोडा" घेऊन आलेल्या लक्ष्मणासारख्या सरदारांचा आणि प्रचंड सैन्याचा दोन शाळकरी पोरे कचरा करतात, घोडाही काढून घेतात. ही गोष्ट आजच्या हिशोबाने मान्य करणे केवळ अशक्य. असल्या अतर्क्य घटना असतात, पण त्याचा 'रीलेव्हन्स' आजच्या मीटरने न तपासता शौर्याचे ते एक प्रतीक म्हणून लवकुशाच्या विजयाकडे पाहिले जाते. पुराणाची हीच शिकवण.]

एकप्रकारे ते "परंपरा" जपण्याचे शिक्षणच होते असे फार तर आपण म्हणू या. हे मान्य की प्रत्यक्ष ज्ञात इतिहासात अगदी हरिहर-बुक्कापासून थेट थोरल्या महाराजांपर्यंतच्या कालखंडात असे 'नामा'चे यज्ञ कुणी घातल्याचे आढळत नाही. पण काही मर्यादित स्वरूपात विजयानंतर 'पूजाअर्चना' सारखे धार्मिक कार्यक्रम होत असतीलच.

अशोक पाटील

अशोकराव... तुमच्या पहिल्या सर्व पोस्ट वाचनीय आणी ऐतीहासीक पुराव्याला धरुन होत्या, पण ही भाकड पौराणीक यज्ञाची पोस्ट मात्र अचंबीत करणारी आहे.. Sad

राम, तुम्ही आता इथे नवा वाद सुरू करू नका. (तुम्ही प्रत्येक बीबीवर जसे लिहिता तसे) इथे नको, तुम्ही अशोकरावांना प्रत्यक्ष भेटून त्यांना खरेखोटे सांगा. Proud

राम ~ यज्ञाची ही पोस्ट देण्याचे कारण म्हणजे पुराणात त्याचा उल्लेख आला आहे आणि वरील एका प्रतिसादात साम्राज्यतृष्णेच्या संदर्भात त्याचा उल्लेख आला म्हणून नेमका त्या दोन यज्ञाचा तसा 'इतिहास' दिला. त्यावर विश्वास ठेवणे त्यात अभिप्रेत नाही.

पुराणात भाकडकथांचा सुळसुळाट आहे हे जितके खरे तितकेच इतिहासातही आहेतच. उदा. रेड्याने मंत्र म्हणणे, तुकारामाच्या गाथा पाण्यावर तरंगणे, त्याने सदेह स्वर्गारोहण करणे, गोरा कुंभाराने चिखलात तुडविलेले बालक परत जिवंत होणे, महाराजांना खुद्द भवानीने प्रकट होऊन तलवार देणे आदी अनेक. पण यावर फक्त इतिहासाची गोडी लावणे याच दृष्टीने पाहणे गरजेचे असते. तिथे रॅशनल थिंकिंग दुय्यम ठरते.

राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमांना पुजणारे हजारो घरे सांप्रत महाराष्ट्रदेशी आहेत हे तुम्हीही मान्य कराल, त्यामुळे त्यांच्या नावाभोवती गुंफलेल्या कथाही त्यासोबत येत राहातात इतकेच. बाकी अन्य तपशिलाला जास्त महत्व मीही देत नाही.

अशोक पाटील

पानिपताची लढाई जिंकायला जर टॉप तीन गोष्टी करायला हव्या असतील तर
माझ्यामते
१) भाउसाहेबांनी अवध प्रथम खालसा करायला हवी होती.
अब्दालीचे स्वतःचे गिलची लष्कर फार मोठे नव्हते पण रोहिले , अवध संस्थान यांच्या मदतीने त्याने दिल्लीच्या पराभवानंतर मोठी सैन्यभरती केली. होळकर भाउना बरोबर सल्ला देत होते. चंबळच्या वर येण्यापुर्वी भाउंनी लष्करव्यवस्था करायला हवी होती.
मी भाउंच्या जागी असते तर बंगालमध्ये ब्रिटीशांशी तह करुन अवध खालसा करुन ग्वाल्हेर जवळ ठाण मांडले असते. सुपिक दोआब भागातुन आणि बंगाल मधुन होणारा रसद पुरवठा बंद केला असता.
यामुळे अब्दालीकडे २ पर्याय उरले असते.
अ) त्याने उत्तरेकडिल पंजाब व राजपुतानाकडुन रसद मागवली असती. हे भाग मराठे व अब्दाली दोघांनाही प्रतिकुल होते यामुळे त्याला ती रसद सहज मिळाली नसती व होळकर शिंदे ती सतत तोडु शकले असते. शेवटी गिलचे त्रस्त होउन परत जायला निघाले असते तेव्हा त्यांच्यावर सहज वार करता आला असता.
ब) रोहिले आणि अब्दाली यांच्यात अंतर्गत फुट पडली असती. यामुळे अब्दालीला अजुन दक्शिणेकडे युद्धाला येणे भाग पडले असते. मराठा साम्राज्याच्या इतक्या आत लढाइ अब्दाली कधीच जिंकु शकला नसता.
क) मराठ्यांची उपासमार कधीच झाली नसती.
फार लवकर व्यवस्थित रसद पुरवठा आणि मित्र तयार न करता फार उत्तरेकडे झेप घेतल्याने लष्कराची उपासमार झाली आणि अब्दाली मराठ्यांचा अंत पाहु शकला.
ड) हाच अवधचा शुजाउद्दौला त्याच्या ३०००० लष्करासह अब्दालीला शेवटच्या क्षणी मिळाला. त्याने केवळ भाउंना झुलवत ठेवले.

२) लष्कराबरोबर कोणत्याही दबावाला न जुमानता एक ते दोन लाख यात्रेकरु नेण्यास सपशेल नकार दिला असता. खरा सेनानी जाणतो की युद्ध हे लढ्ण्यापुर्वीच जिंकले जाते. फार थोडी युद्धे रणांगणावर ठरली जातात. उत्तरे कडे जर एवढा लवाजमा नेला नसता तर लष्कराच्या हालचाली जलद झाल्या असत्या. उपाशी अयोग्य जागी लढण्यापेक्षा मराठे युद्धाची वेळ व जागा ठरवु शकले असते.

३) भाउंऐवजी राघोबाला सरसेनापती म्हणुन पाठवले असते.
राघोबाने पेशावर प्रांत, राजपुताना मराठी साम्राज्याला जोडला हे सर्व जाणतातच पण त्याबरोबर त्याने जाटांचा बंदोबस्त करुन चौथाइ वसुल केली. मथुरेच्या नबाबाचा आणि रोहिल्यांचा पाडाव केला.
होळकरांबरोबर आणि शिंद्यांबरोबर अनेक लढाया त्यांने मारल्या होत्या. रघुजी भोसलेंबरोबर सख्य करुन
बंगाल, ओरिसा, बिहार मराठी प्रांताला जोडले.
नानासाहेबांनी जेंव्हा राघोबाला या मोहिमेवर सरसेनापतीपद दिले तेंव्हा त्याने नानासाहेबांकडे मोठी रक्कम आणि अधिक काळ मोहिमेसाठी मागितला. जेंव्हा भाउंनी नकार दिला तेंव्हा राघोबाने मोहिमेवर जाण्यास ठाम नकार दिला.
नानासाहेबांना आणि भाउला राघोबाचा वाढता प्रभाव डाचत होताच शिवाय विश्वास पेशवा व्हावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती यामुळे नानासाहेबांनी विश्वास आणि भाउंना युद्धाला पाठवले. विश्वासरावांचे प्रस्थ वाढावे हा चुकीचा हेतु यामागे होता. दुर्दैवाने पैशाअभावी व योजने अभावी सैन्य अनोळखी जागी अननुभवी सेनापतीसह उपाशी लढले. भाउ हे सैनिक होते सेनापती नाही. विश्वास पडल्यावर नानांना तोंड कसे दाखवणार म्हणुन युद्धाचा विचार न करता घोड्यावर बसुन गर्दीत घुसणे वेडेपणाचे होते. ते नसते घुसले तर पराभव टळता असेच नाही पण युद्ध अजुन कठिण नक्की झाले असते अशी चुक एखादा सैनिकच करु शकतो सरसेनापती नाही (अशिच सैनिक गिरी शिवाजी महाराजांच्या भाषेत प्रतापराव गुजर यांनी केली त्याची याप्रसंगी आठवण होते)

काल लिहिल्याप्रमाणे अब्दाली लढाईनंतर मराठ्यांबद्दल काय म्हणाला आहे, नानासाहेबला त्याने पाठवलेले पत्र त्यावर लिहितो आहे. काल अशोकदा यांनी बिफिकीर यांना उद्देशून प्रतिक्रिया लिहिल्यानंतर बहुतेक सर्व प्रतिसाद (माहितीपूर्ण आणि वाचनीय असले तरी) धाग्याला धरून नाहीत. ते सर्व टाळून धाग्याशी संबंधित अश्या बाबींवर लिहित आहे. इतरांनी सुद्धा कृपया धाग्याशी संबंधित अजून लिहावे अशी विनंती.

युद्धानंतर अहमदशहा अब्दाली याने जयपूरच्या माधोसिंगला लिहिलेला फारसी खलिता (अनुवादित - शेजवलकर)

"जर त्या दिवशीच्या भारती युद्धात रुस्तम आणि अस्फन्दियर (भीम आणि अर्जुन) प्रत्यक्ष हजर असते तर त्यांनीही ते तूच्छ पोरखेळ समजून आपली शिरे दुसरीकडे वळवली नसती, तर या दिवशीच्या वीरांच्या कृत्यांनी आश्चर्यचकित होऊन आपली स्वतःची बोटे तोंडात घालून दातांनी चावली असती! आमच्या शत्रूने सुद्धा त्या दिवशी स्वतःला नामांकित करून सोडले! ते इतक्या उत्कटतेने लढले की, तसे लढणे इतर कोणाच्या शक्ती बाहेरचे होते! दोन्ही बाजूच्या वीरांच्या रक्तस्त्रावी मुष्टी रक्ताने सारख्याच माखल्या गेल्या होत्या.प्रथम तोफा, गरनाळा, बाण यांनी सुरू झालेले युद्ध नंतर बंदुकांवर येऊन ठेपले व क्रमाक्रमाने बंदुकांवरून धनुष्यबाणावर, नंतर तलवारींवर व त्यावरून सुरे-खंजीर येथपर्यंत येऊन थडकले! नंतर वीरांनी शत्रूची मान पकडून त्याच्या छातीत असे गुद्दे लगावण्याचा सपाटा सुरू केला की, त्यांचा चुरा होऊन गेला! आमच्या त्या निधड्या छातीच्या रक्य वाहवण्याऱ्या शत्रुंनीही आपल्या कामात कसूर केली नाही. हेच काय, पण अत्यंत महनीय किर्तीस्पद अशी कृत्ये रणांगणात करून दाखवली! असे होते तरी ईश्वराची कृपा नेहमीच माझी मदतगार असल्यामुळे विजय वाहू आमच्या बाजूनेच वाहण्यास सुरुवात झाली आणि त्या अमर्त्य प्रभूच्या इच्चेनुरूप शुद्र दाक्षिण्यांचा पूर्ण पराभव झाला."

युद्धानंतर अहमदशहा अब्दाली याने पेशवा नानासाहेब यास लिहिले....

आमची स्वतःची इच्छा युद्ध करण्याची नव्हती, तुमच्या हट्टानेच ते झाले. त्यात तुमचे बंधू, पुत्र व सरदार मेले याचा आम्हासही फार खेद वाटतो पण त्याला उपाय काय? तरी आपण कायमचा तह करून व एकमेकांच्या हद्दी ठरवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करू या."

हे पत्र घेऊन याकुब अल्ली खान मथुरेला आला तिथे होळकर यांचे दिवाण चंद्रचूड यांनी त्यास सांगितले की दक्षिणेस जाण्याचे गरज नाही. तहाचा जिम्मा पेशव्यातर्फे आम्हीच येथे घेतो. पेशव्याने तसा अधिकार होळकरास दिलेला आहे."

१३ मार्च १६७१ रोजीच्या पत्रात "मल्हारबावर आमचा येख्तीयार. अब्दालीशी तह तो या वर्षी जसे म्हणेल तसे करणे, पुढे पेचपाच करणे." असे होळकरास लिहितो.

अब्दालीकडे तहाची नजराणे, हत्ती, वस्त्र वगैरे घेऊन जाताना पेशव्याचा दूत त्रिंबककर यास कोट्या जवळ माहिती मिळाली की अब्दाली मायदेशी निघाला असून आता तो भेटणार नाही. दूत तसाच पुण्यास परत आला. अब्दालीच्या परतीचे कारण पैश्याची टंचाई आणि सैनिकांचे बंड हेच होते. त्याला दिल्लीमध्ये राहण्यास आधीपासून रस नव्हता.

मराठ्यांची साम्राज्यसीमा तेंव्हा अब्दालीच्या ( अफगाणी) सीमेला भिडलेलीच होती.. म्हणजे पानिपतचे युद्ध या दोन शेजारी राष्ट्रांमधलेच युद्ध होते..म्हणजे अब्दालीविरुद्ध लढणे हे मराठ्यांचेच तर आद्य कर्तव्य होते. मग उगाच अब्दाली म्हणजे अगदी कुणी परदेशातून दिल्लीवर चालून आला आणि मराठे/पेशवे दिल्लीच्या मदतीला धावले, असे वर्णन का केले जाते? ( हा नकाशा बरोबर आहे ना? Happy )

http://en.wikipedia.org/wiki/File:South_Asia_1758_AD-_4.JPG

होय जामोप्या.. नकाशा बरोबर आहे. भगव्या रंगात दाखवले आहेत ते मराठ्यांनी तुडवलेले मुघल सल्तनेतेचे २२ सुभे... Happy

"मग उगाच अब्दाली म्हणजे अगदी कुणी परदेशातून दिल्लीवर चालून आला आणि मराठे/पेशवे दिल्लीच्या मदतीला धावले,"

~ मोहनराव म्हणतात तशी बर्‍याच जणांची समजूत असते की अहमदशाह अबदाली (जो अफगाणांचा राजा झाल्यावर 'दुराणी' पदवीस पात्र झाला) म्हणजे खूप कुठल्यातरी लांबच्या देशातून इथे भारतात येतो आणि दिल्लीचे तसेच मराठ्यांचे साम्राज्य खिळखिळे करतो. वास्तविक त्याची अफगाण राजधानी कंदाहार आणि बलुचिस्तानातील क्वेट्टा [जे आज पाकिस्तानात आहे) ही अगदी शे-सव्वाशे मैल अंतरावरील गावे. त्या मार्गानेच तो थेट दिल्ली साम्राज्यावर चालून आला होता. तसे पाहिले तर आजच्या "किलोमीटर" अंतराच्या भाषेत बोलायाचे झाल्यास 'कंदाहार ते दिल्ली' हे अंतर आहे केवळ १४९० किलोमीटर. तर गंमत म्हणजे त्याचवेळी आपण "पुणे ते दिल्ली' अंतर तपासले तर ते होते १४४० किलोमीटर, म्हणजे केवळ ५० किलोमीटरचा फरक. याचाच अर्थ असा की पानिपत युद्धकाळात कंदाहारातून निघालेले अबदाली सैन्य आणि पुण्यातून निघालेले पेशव्यांचे सैन (अधिक तो वादग्रस्त लवाजमा) यानी युद्धस्थळापर्यंत येईतो जवळपास तितकेच अंतर कापलेले होते. फरक पडला तो अबदालीच्या वेगाचा [त्याला कारणही त्याच्याकडे असलेले घोडेस्वार आणि ज्याला फक्त 'सैनिक' म्हटले जाईल असा ताफा, तर भाऊंना सोबत कुणाकुणाला पानिपतापर्यंत घेऊन जावे लागले यावर वेळोवेळी चर्चा झडल्या असल्याने त्याची द्विरूक्ती नको.]

या निमित्ताने अहमदशाह अबदालीबद्दलही थोडेसे लिहिले पाहिजे, कारण बहुतांशी मराठी वाचकाला ते नाव म्हणजे ज्याने पानिपतावर मराठ्यांचा पराभव करून या बलाढ्य अशा शक्तीला नेस्तनाबूत केले असा एक 'परदेशी' लुटारू.

एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, नादरशाह या अफगाण सम्राटाचा अबदाली हा अत्यंत विश्वासू असा सरदार होता व नादरशाहच्या वधानंतर त्याच्या सरदारांनी अहमदशाह अबदालीलाच आपला सम्राट मानले होते ते त्याने वेळोवेळी दाखविलेल्या अतुलनीय अशा पराक्रमामुळे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्याच्याकडे अफगाण साम्राज्याची ज्याअर्थी धुरा आली होती, त्याअर्थी तो निश्चितच पराक्रमी हे विशेषनाम सार्थ करीत असणार.

पश्तुनी अफगाणांची मुघल सम्राटांबरोबर नेहमीच कडुगोड नाती राहिली असल्याने अबदालीची एक नजर कंदाहारमध्ये राहत असे तर दुसरी दिल्लीच्या भोवती. मराठेशाहीने दिल्लीत मिळविलेल्या यशाची त्याला माहिती नक्कीच होती. कारण त्या अगोदर १७४७ मध्येच त्याने सिंधू नदी पार करून लाहोरवर कब्जा मिळविला होताच. [लाहोर ते दिल्ली अंतर अडीचतिनशे मैलाचेही असेलनसेल]. त्याच्या या पराक्रमाला भुलूनच की काय काश्मिरी राजांनी 'तुम्ही मुघलांचा नि:पात करण्यासाठी यावे' यासाठी १७५२ मध्ये त्याला खलिता धाडला होता. १७५६-५७ मध्ये तर अबदाली थेट दिल्लीत आला आणि अक्षरश: दिल्ली त्याने धुवून घेतली असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरत नाही. दिल्ली घेतली म्हणजे पाठोपाठ आग्रा, मथुरावरही त्याची नजर न जाणे म्हणजे नवलाचे झाले असते. दिल्लीत तर आलमगीर म्हणजे गलितगात्र बादशहा. त्याने अबदालीशी त्याच्याच अटीवर तह तर केलाच शिवाय आपल्या मुलगीचा निकाहही त्याच्याशी लावून दिला. मग अहमदशाह याने आपल्याच मुलग्याकडे {तिमूरशाह} आणि सरदारांकडे दिल्लीची व्यवस्था देऊन तो अफगाणिस्थानाला नव्या नवरीसह परतला. त्यावेळी त्याचे वय होते ३५.

पण पुढे रघुनाथरावांच्या अधिपत्याखालील पेशव्यांच्या सैन्याने दिल्लीपर्यंत 'भरारी' मारून दिल्लीतून तिमूरशाह आणि तैनात असलेल्या अफगाणी सैन्याचा तर पराभव करून त्याना दिल्लीतून हुसकावून तर लावलेच शिवाय त्याहीपुढे लाहोर मुलतान आपल्या हाताखाली आणले शिवाय अटकेपार मराठ्यांचे निशाण फडकाविले गेले. या सर्व घडामोडींनी कंदाहारमधील अबदाली अस्वस्थ होणे साहजिकच होते. [यापुढील सारा इतिहास आता सर्वानाच माहीत आहे.]

अहमदशाह अबदालीने जानेवारी १७६१ मध्ये झालेल्या या महासंग्रामात नि:संशय प्रचंड असा विजय मिळविला असला तरी ते वर्ष संपतासंपताच पंजाबमधील शिखांनी त्याच्या सत्तेविरुद्ध उठाव केला होता. [ मराठ्यांच्या दुर्दैवाने हेच 'शिख' पानिपताच्या युद्धाच्यावेळी पंजाबात दोघांपैकी कुणाचीच बाजू न घेता तटस्थ राहिले होते. याचा अर्थ असा की परक्या पाहुण्यांकडून का होईना दिल्लीवर वर्चस्व मिळविलेले 'मराठे' मरतात तर मरू देत, असा सोयिस्कर विचार आमच्याच देशबांधवानी केला होता हा कटू इतिहास आहे. शिखांनी दाखविलेल्या तटस्थ भूमिकेची परतफेड अबदालीने पतियाळाच्या राजाला शिखांचा महाराजा करून दिली होतीच.] पण बंडखोर शिखांच्या बंदोबस्तांसाठी अहमदशाहला १७६२, ६४, ६६ अशी तीन स्वार्‍या कराव्या लागल्या आणि त्यात तो आणि त्याचे सैन्य थकून जाणे साहजिकच होते. त्यानंतर तो भारत आक्रमणासाठी कधी आला नाही आणि १७७२ मध्ये आपल्या लाडक्या गावी - कंदाहार - इथेच त्याचे निधन झाले. मृत्युसमयी त्याचे वय ५० होते.

अहमदशहा अबदाली आणि थोरल्या बाजीरावांतील तीन विलक्षण साम्य सांगता येतील :
(१) दोन्ही वीरांनी जितक्या लढाया लढल्या त्या सर्व जिंकल्या होत्या. आपल्या हयातीत त्यानी एकाही पराभवाची चव चाखली नव्हती हे विशेष.
(२) दोघानीही युद्धादरम्यान 'घोडा' या प्राण्याशिवाय स्वारीसाठी अन्य कोणत्याच प्रकारच्या साधनाचा वापर केला नव्हता.
(३) युद्ध जिंकल्यानंतर दिल्लीच्या आलमगीर पातशहाने अहमदशाहला आपली मुलगी दिली होती, तर बुंदेलखंडाच्या छ्त्रसालाने बंगशच्या तावडीतून बाजीरावाने सुटका केली म्हणून त्याबदल्यात आपली मुलगी 'मस्तानी' त्याला दिली होती.

तसे पाहिले तर मृत्युसमयी या दोन योद्ध्यांच्या वयातही लक्षणीय असे अंतर नव्हते. अबदालीला आयुष्य लाभले पन्नास तर बाजीरावांना चाळीस.

असो.

अशोक पाटील

अशोकजी, अप्रतिम प्रतिसाद आहेत..
केवळ आपल्या पोस्टसाठी या धाग्यावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते..:)
पु.ले.शु.

अशोकजी, अप्रतिम प्रतिसाद आहेत..
केवळ आपल्या पोस्टसाठी या धाग्यावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.....>>>>>>>>>>

अनुमोदन

श्री. अशोकजी, (ज्यांना श्री. म्हणावे असे तुम्ही च. बाकी केवळ हिंदू द्वेषापायी आंधळे झालेले, सर्व अक्कल घालवून बसलेले लोक यांना काय श्री म्हणायचे?), सारिका यांची क्षमा मागून - अशोकजी, अप्रतिम प्रतिसाद आहेत..
केवळ आपल्या पोस्टसाठी या धाग्यावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते..:)
पु.ले.शु.

अशोकजी,
आपले नवे प्रतिसाद मोठ्या अपेक्षा ठेवून वाचतो आणी कधीही आपेक्षाभंग होत नाही. खूप छान माहिती.

हे काय झक्की...
बाकी केवळ हिंदू द्वेषापायी आंधळे झालेले, सर्व अक्कल घालवून बसलेले लोक
>>> आम्हालाही यातच गणलेत की काय... Proud

पानिपतात मराठ्यांचा पराभव झालेला असला तरी अब्दालीलाही जबर तडाखा बसला. पैश्याची टंचाई हे त्याच्या घाईने परत जाण्याचे मुख्य कारण होते. माधोसिंग आणि सुजा या दोघांकडे त्याने पैश्याची मागणी केली होती आणि ती पूर्ण झाली नाही. सुजा जो पळून गेला तो पुन्हा अब्दालीस कधी नजरेस पडला नाही. मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला असे वाटून नजीब सुखावला असला तरी पुढे त्याला जाट आणि शिख यांनी भरडून काढले. पुढे तर त्याच्या मुलाला जिवंत राहण्यासाठी शिख धर्म स्वीकारावा लागला. मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचा हा एक परिणाम म्हणायला हरकत नसावी. हेच जाट मराठ्यांना अब्दालीच्या वेळी मदत करते तर चित्र किती वेगळे दिसू शकले असते. असो...

मुघल सत्तेचे २२ सुभे मराठ्यांनी आपल्या घोड्याच्या टापांनी आणि निनादाने दुमदुमून सोडले होते तेच आणि तेवढाच प्रदेश हिंदू भारत म्हणून नावाजला.मराठे जिथे जिथे गेले तिथे हिंदू प्रजेने मुसलमानांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली हे मराठ्यांचे मोठे यश होय. मग तो ओरिसा-बंगाल असो नाहीतर पंजाब. दुर्दैवाने इतिहासाची चाड आणि जाण नसलेल्या त्यावेळच्या सरकारने सिंध आणि अटक असा प्रदेश सोडून देऊन एक मोठे पातकच केले आहे. पुर्वेकडेही जो बंगाल रघुजी भोसले आणि भास्कर राम कोल्हटकरांनी ताब्यात आणला (हवंतर लुटला म्हणा) त्याच भागात हिंदू प्राबल्य जागे राहून तितकाच भाग स्वतंत्र भारतात आला. त्या पुढचा बाकी पूर्व पाकिस्तान बनला. शेजवलकरांनी जरी हे असे मांडलेले असले तरी माझ्या एका बंगाली स्नेह्यांकडून मला असेच शब्द ऐकावयास मिळाले. फक्त शिवाजी महाराज नव्हे तर संभाजी राजे , थोरले बाजीराव आणि भाऊ यांच्याबद्दल अतीव आदर असणारे कृष्णासू घोष यांनी मराठे अजून पूर्वेपर्यंत गेले असते तर आज तिथे परिस्थिती निश्चित वेगळी असती असे मत ते नेहमीच व्यक्त करतात.

शेवटी माझ्या इथल्या लिखाणाचा समारोप शेजवलकरांच्या शब्दांनीच करतो...

"भले मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडविले असेल, लुटले असेल, दुसऱ्याही अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदू प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून दिले होते. हिंदुस्थानातील मुसलमानी राज्यतंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंद करून उठून मुसलमान सुभेदारास हाकलून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपती निर्मित मराठी राज्याची इति कर्तव्यता होती! इतर प्रांतातील लोकांत हे लोण जाऊन पोहोचू शकले नाही, हीच मराठ्यांच्या इतिहासातील खरीखुरी शोककथा होय, पानिपतचा पराभव नव्हे!"

>>> मुघल सत्तेचे २२ सुभे मराठ्यांनी आपल्या घोड्याच्या टापांनी आणि निनादाने दुमदुमून सोडले होते तेच आणि तेवढाच प्रदेश हिंदू भारत म्हणून नावाजला.मराठे जिथे जिथे गेले तिथे हिंदू प्रजेने मुसलमानांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली हे मराठ्यांचे मोठे यश होय.

अतिशय महत्त्वाची माहिती!

>>> भले मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान तुडविले असेल, लुटले असेल, दुसऱ्याही अनेक चुका केल्या असतील, पण त्यांनी पाचशे वर्षांच्या इस्लामी वरवंट्याखाली चुरडलेल्या हिंदू प्रजेस आपल्या वर्तनाने ताठ उभे राहण्यास उदाहरण घालून दिले होते. हिंदुस्थानातील मुसलमानी राज्यतंत्र त्यांनी इतके खिळखिळे केले होते की, कोणत्याही प्रदेशात तेथील प्रजेने बंद करून उठून मुसलमान सुभेदारास हाकलून द्यावे व स्वतःचे राज्य स्थापावे. या कामात त्यांस मराठ्यांची मदत आपोआप मिळाली असती आणि हीच शिवछत्रपती निर्मित मराठी राज्याची इति कर्तव्यता होती!

खूपच योग्य शब्दात भारताच्या इतिहासातील मराठ्यांच्या (म्हणजे तत्कालीन सर्व मराठी माणसांच्या) योगदानाचे वर्णन केले आहे!!!

सेनापती, नाही हो!! तुम्ही हिंदू द्वेष्टे कसे?
खरे तर हिंदू द्वेष्टे म्हणण्यापेक्षा समाजात जे लोकप्रिय मत असेल त्याला उगाचच विरोध करणारे - खरे असो खोटे असो, लिहायचे, असे लोक. म्हणजे आपण कुणि जास्त शहाणे नि बाकीच्यांना काही कळत नाही असे म्हणायचे!!
उगाचच.
आता ब्राह्मण लोक सत्तेवर, ब्राह्मणच इतिहास लिहीणारे, जे काही केले ते ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली, नेतृत्वाखाली. म्हणून जे चुकले त्याची जबाबदारी पण ब्राह्मणांवरच. त्यात काय नवल?
तेंव्हा असे की, चांगले बघायचे नाही, फक्त वाईट बघून शिव्या द्यायच्या. खरे असो, खोटे असो. म्हणजे लगेच लोक म्हणतात वा! याला कसे कळले? हुषार दिसतोय.
त्याचप्रमाणे बहुसंख्य भारतीय हिंदू, भारतात जे झाले त्यातले बरेचसे काम हिंदूंनी केले. त्यातले जे चुकले ते धरायचे, उरलेले खोटे नाटे करून सरसकट सगळ्या हिंदूंना शिव्या द्यायच्या!
असे लोक इथे येतात नि मजा घालवतात!!

अशोकजी, अप्रतिम प्रतिसाद आहेत..
केवळ आपल्या पोस्टसाठी या धाग्यावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते..
पु.ले.शु.

अशोकजी, अप्रतिम प्रतिसाद आहेत..
केवळ आपल्या पोस्टसाठी या धाग्यावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते..
पु.ले.शु.

मला वाटते पराभवाला कारण देवधर्म पंचांगन बघुन कार्यक्रम आखणे
तसेच मल्हारराव होळकरांना ऊत्तरेतला अनुभव असताना त्यांच्या धोरनानुसार न वागने

>>तसेच मल्हारराव होळकरांना ऊत्तरेतला अनुभव असताना त्यांच्या धोरनानुसार न वागने
पेशव्यांनी उत्तरेत जास्त येऊ नये आणि आपलाच दबदबा रहावा हे धोरण होते त्यावेळेस उत्तरेच्या सरदारांचे,
अशा धोरणाने वागले असते तर बाजीरावाने केलेल्या पराक्रमाला चांगलाच सुरूंग लागला असता.
भाऊला न पाठवता नाना किंवा राघोबाने जायला हवे होते,
ही लढाई मराठे जिंकते तर इतिहास काही और घडला असता.

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥

- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"

पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू अली गोहर याने बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे.
.
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.

आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".

... सौरभ वैशंपायन.

ओह, पानिपताची तारीख विसरण्याइतका नालायकपणा माझ्यात आहे. Sad
बरे झाले आजच्या दिवसाची समयोचित आठवण करून दिलीत Happy धन्यवाद
यापुढे कदापि विसरणार नाही.

डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार"

>> ह्या टिप्पण्णी वर आक्षेप आहे ...बके सब ओके

१४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं.>> प्लीज, परत एकदा जाऊन पानिपतचे युद्ध नीट वाचा. मराठे लढायला उतरले नव्हते. ते पळून जात होते. म्हणून वार छातीवर नाही तर पाठिवर झेलले. कारण पळपुटे कधीही वार छातीवर झेलत नाहित. पानिपतची लढायी म्हणून पळपुटे मराठ्यांची कत्तल... प्रत्येक इतिहासकाराने या युद्धाचे जे वर्णन दिले ते हेच सांगते की मराठे पहाटे पहाटे उठून पळून जात होते अन अब्दालीन समाचार घेतला.

म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय.>>> असहमत. याला मराठी इगो म्हणता येईल. म्हणजे 'गिरे तो भी टांग उपर' वाली कमेंट झाली ही.
अहो अब्दालीच्या सैन्यानी मराठा सैनिकाना उभं गवत कापून काढावं तसं कापलं. दोन-तीन तासात सगळा मराठ्यांचा धुव्वा उडविला. हा इतिहास आहे. पानिपत हा पराजयाचाच इतिहास आहे. त्याला पराजय म्हणूनच स्विकारावे. त्या नंतर काय झालं वगैरेच्या तुम्ही वर ज्या बाता लिहल्या आहेत ते सत्ताधिश वगैरे म्हणून नाहित. मराठे हे बादशाहचे नोकर म्हणूनच त्या दिल्लीच्या रक्षणार्थ नेमले गेले, राज्यकर्ते म्हणून नाही...

मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे.>> दिल्ली तर संपुर्ण महाराष्ट्र सुद्धा कधी मराठ्यांच्या मांडिखाली नव्हता. मराठे सदैव कुणाची ना कुणाची दाढीओठी धरुन सत्ता भोगत आले आहेत.


नजिबाचा नातू अली गोहर याने बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता
>> या वाक्यातून तुम्हीच हे सांगताय की मराठे दिल्लीचे चाकर होते... चाकर... चाकर हाच शब्द यायला हवा.

आली, ब्रिगेडी पोस्ट आली! सध्यातरी घाऊकरित्या 'मराठ्यान्वर' घसरली आहे, पण नन्तर येईल रुळावर.... Wink Proud
[जाताजाता: कुणी मला शिक्रापूरच्या लढाईचा तपशील थोडक्यात सान्गू शकेल का?]

@एम : तोंड सांभाळून बोला. तुम्ही मराठी नाही आहात का ? झाला असेल पराजय, पण मराठे अगदीच हातात शस्त्रे न घेता खाली माना घालून पळून चालले होते असा अर्थ होत नाही. आणि पळायचेच होते तर एवढ्या लांब गेलेच नसते ना.
हे तुमचे बोल इतर वेळी भेदाच्या गोष्टी करणार्‍यांच्या डोळ्यात शिरत नाहीत का ???
की त्यांचेपण हेच मत आहे ??? Angry

अहो अब्दालीच्या सैन्यानी मराठा सैनिकाना उभं गवत कापून काढावं तसं कापलं. दोन-तीन तासात सगळा मराठ्यांचा धुव्वा उडविला. हा इतिहास आहे.>>तुम्ही तिथे प्रत्यक्ष उभे होतात का तेव्हा???

हा संपूर्ण बीबी बसून वाचा. सीलेक्टीव रीडींग नको. पूर्ण संदर्भासकट वाचा. कदाचित तुमच्या शंकांना योग्य उत्तरे मिळतील.

तोंड सांभाळून बोला. तुम्ही मराठी नाही आहात का ? झाला असेल पराजय, पण मराठे अगदीच हातात शस्त्रे न घेता खाली माना घालून पळून चालले होते असा अर्थ होत नाही.>> मी तोंड सांभाळेनही... म्हणून जो पळ होता त्याला चढाई होती असे म्हंटल्याने सत्य बदलणार आहे का? पनिपतच्या लढाईचे संदर्भ तसापल्यास तुम्हाला हेच आढळेल की पहाटेच्या अंधारात धुक्याच्या मदतीने निसटण्याचा तो डाव होता. हे सर्वानी लिहून ठेवले आहे. असो.

मला एवढेचे म्हणायचे आहे 'पराजय तो पराजयच.... अन जेंव्हा जेंव्हा पानिपतचा प्रश्न येईल तेंव्हा तेंव्हा त्याला पराजयच म्हणावे लागेल.'

'पराजय तो पराजयच.... अन जेंव्हा जेंव्हा पानिपतचा प्रश्न येईल तेंव्हा तेंव्हा त्याला पराजयच म्हणावे लागेल.'>>बरं. तुमच्या भाषेत पराजय तर पराजय. झालं समाधान?

इतर लोकहो, वाद घालू नका रे. आज आता एवढ्या पोस्टनंतर हा (चांगला माहितीपूर्ण) बीबी बंद करायचा आहे का?? अनुल्लेख करत जाऊ या सर्वांनीच. (माझ्यासकटच!!)

रोहन, वरील पॅरा लिहिणारी व्यक्ती कोण?

वरील पॅरा लिहिणारी व्यक्ती कोण?>>> हे मात्र अगदी तुमच्या ठेवणितलं... तुम्हाला शोभेल, साजेल असं बोललात. जो पर्यंत कोण आहे पर्यंत दृषिकोन बदलणार नाही.

ह्याट् ! पराजय तर पराजय आम्हाला त्याचा पण अभिमान आहे ! या आता नाहीतर तुमचा पराजय होईल Happy

नंदिनी.. वरील पॅरा लिहिणारी व्यक्ती माझ्या फेसबुक यादीत आहे. Happy

बाकी नकली आयडी घेउन येणार्‍या लोकांना मी इथे अन्नुलेखाने नाकारतोय. त्यावर नो कमेंट्स...

मालोजीराव...

ही अब्दालीचे नव्हे तर नजीबाचे वंशज... Happy

युद्धानंतर अहमदशहा अब्दाली याने जयपूरच्या माधोसिंगला लिहिलेला फारसी खलिता (अनुवादित - शेजवलकर) वर वाचावा म्हणजे त्याचे काय मत होते ते देखील स्पष्ट होते.

Pages