आलू बंजारा

Submitted by Vega on 30 September, 2010 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),
१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,
१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट...रंग छान येतो भाजीला), अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे+जिरे पूड, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, चिरलेला अर्धा टोमॅटो आणि छोट्या लिंबा एवढा गूळ.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी मातीच्या भांड्यात करायची आहे. तेव्हा, बाजारातून (जिथे माठ, मातीच्या कुंड्या मिळतात त्यांच्याकडून) आधीच एक कॅसेरॉलच्या आकाराचे मातीचे भाजलेले भांडे (तुळतुळीत पॉलिश्ड दिसते हे भांडे) आणि त्यावर मातीचेच झाकण असा सेट आणून ठेवावा.

मातीचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करून गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी पळी तेल घालून मंद आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात आले+लसूण ठेचा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.

नंतर चिमूटभर हिंग टाकून त्यात लाल मिर्च्यांचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणे+जिरे पूड आणि गरम मसाला वगैरे जिन्नस टाकावे.

त्यावर चिरलेला कांदा टाकावा (कांदा गुलाबी होईपर्यंत परतण्याची गरज नाही).
नंतर चिरलेला शेपू, सोललेले बटाटे आणि भिजवलेले मसूर टाकून एकदा सगळे मिश्रण परतून घ्यावे.

नंतर सगळे मिश्रण बुडून वर एक इंच राहील इतके पाणी टाकावे.
चवीनुसार मीठ टाकावे. चिरलेली कोथिंबिर टाकावी.

मिश्रण व्यवस्थित ढवळून त्या भांड्यावर मातीचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे.

बटाटे आणि मसूर ब-यापैकी शिजल्यावर, चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालावा.
पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.

आलू बंजारा तयार!

वाढणी/प्रमाण: 
मिताहारी २-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मातीचे भांडे वापरल्याने शिजलेल्या अन्नब्रह्माला एक वेगळाच खमंग परिमळ येतो. त्यासाठी मातीच्या भांड्यावर मातीचेच झाकण वापरणे गरजेचे आहे! झाकणावरून परावर्तीत होणारी वाफ पुन्हा पदार्थात मिसळते. खमंगपणा द्विगुणित होतो तो त्यामुळेच!

ही भाजी गरमागरम पोळी, किंवा नुसत्या गरम भाताबरोबर एकदम खास; म्हणजे पॉश लागते!

मूळ पाकृ मध्ये टोमॅटो, गूळ, कोथिंबिर, आले हे जिन्नस नव्हते. ते मी प्रयोगाखातर घातले. तसेच मूळ पाकृमध्ये त्यांनी बटाटा चिरून फोडी वापरल्या. मी छोटे गोल बटाटे वापरले एवढाच बदल!

बटाटे, कांदा, मसूर आणि शेपू हे प्रमुख घटक पदार्थ!

सतत फिरतीवर असणा-या बंजारा (लमाणी) लोकांना नॉन-स्टिक पॅन्स, प्रेशर कुकर वगैरे घेऊन फिरणे कसे जमणार? त्यामुळे, एखादे मातीचे भांडे घेऊन त्यात जिन्नस फक्त कोंबायचे आणि शिजवून खायचे अशी सोप्पी, सोयीस्कर पद्धत असावी लमाण्यांची...असा माझा अंदाज!

ज्यांना मातीचे भांडे मिळवणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नेहमीच्या कढईत आलू बंजारा करून पहावा! शेपूचा नेहमीचा उग्र वास ह्या भाजीत अजिबात जाणवत नाही.
बेमिसाल चव लागते!

माहितीचा स्रोत: 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वरील एका कार्यक्रमात ही पाकृ पाहिली होती. कोणी अमरजी नामक बल्लवाचार्य होते! पाकृ लिहून घेतली नाही, पण मुख्य घटक आणि कृती मी आठवणीत जपून ठेवली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतातील लोकांसाठी
गुजराथेतून खास काळ्या रंगातली मातीची भांडी हस्तकला प्रदर्शनातून वगैरे मिळतात. त्यातली दह्याची आणि पाण्याची वेगळी मिळतात, आणि गॅसवर ठेऊन स्वैपाक करायची वेगळी अशी असतात. अगदी मातीचा तवाही मिळतो. फार अप्रतिम चव येते पदार्थांना. वापरून पहा.
>>> कर्रेक्ट रैना.

कालच वांद्र्याच्या 'महालक्ष्मी सरस' मधून काळ्या रंगाचं मातीचं भांड आणि झाकण आणलं आहे. ते सिध्द करायला ठेवलं आहे. आता बाकीच्या सामानाची जुळवाजुळव करून रात्रीला 'आलू बंजारा' आणि ज्वारी-बाजरीच्या भाकर्‍या असा बेत आहे.

बित्तु, ते अमरजी म्हणजे अमर राणे असणार. त्यांच्या एका पुस्तकात मी ही रेसिपी वाचल्यासारखी वाटते. व्हिडीयो पाहून ते अमर राणेच आहेत असं वाटतय. (पुस्तक बर्‍याच आधीचं असल्याने त्यात त्यांचा त्यांच्या तरूणपणीचा फोटो होता.)

व्वा मामी! भांड्यासह रेस्पीचा फोटो टाक! ते प्रदर्शन अजून आहे का?
अमरजी म्हणून गूगल्ले मी...काही फारशी माहिती मिळाली नाही.

हो. प्रदर्शन बहुतेक २ फेब्रुवारीपर्यंत आहे. इथे जिप्सीने त्या प्रदर्शनाचे काही फोटो टाकले आहेत : http://www.maayboli.com/node/32299

भाजी आणि भांड्याचे फोटो काढते आणि टाकते. Happy

अमर राणे म्हणून गुगल कर ना. या लिंकवर त्यांच्या पुस्तकांची यादी मिळाली. http://erasik.com/books/by/Rane%20Amar/page1/

हे घ्या फोटो :

हे मातीचं भांडं. जरा तिरक्याच बुडाचं आहे हे फोटो काढताना लक्षात आलं. असूद्यात. माणसांची डोकी तिरकी असतात तर भांड्यांची बुडं तिरकी असली तर असली. Proud

ही तयारी - भिजवलेले मसूर, शेपू, बटाटे, प्लेटमध्ये आहेत कापलेला कांदा, खलबत्त्यात कुटलेलं आलं-लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि लाल मिरच्या.

कांदा-टोमॅटो इ. परतून घेतल्यावर :

सगळ्या गोष्टी गेल्या मातीच्या घड्यात :

भाजी शिजली, मस्त वाफा येतायेत :

टेबलावर आली :

पानात ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर :

फारच चविष्ट लागली. बटाटे मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवले होते. मी तेलावर थोडा ओवाही घातला होता. मात्र मातीचा असा काही स्पेशल वेगळा वास अथवा चव लागली नाही. कदाचित ही सगळीच चव नवीन असल्याने मातीची चव वेगळी जाणवली नसावी. पण एकूणात प्रकरण भन्नाट होतं आणि करायला मज्जा आली.

वॉव!! काय भारी फोटो!!

मी गेल्या वर्षी हेच भांडं आणि मातीचा तवा घेतलाय. भांडं वापरात आहे, तव्याचा वास काही अजून जात नाही. Sad आता त्यावर काही नक्षीकाम करून शोभेच्या वस्तूत भरती करणार आहे.

धन्यवाद अन्कॅनी, सायो, बित्तु, मंजूडी.

आता पुढचा लॉजिकल प्रश्न मंजूडीकरता : आता त्या भांड्यात आणखी काय काय बनवता येईल? तुझं भांडं वापरात आहे म्हणजे तु नेहमी काहीतरी बनवत असणार. मला ज्ञानांकित करणे प्लीजच. Happy

मामी,
झकास फोटु. भाकरी सुद्धा सुरेख.
त्या भांड्यात कुळीथाचे पिठलं, बिर्यानी, दालखिचडी, वांगबटाटा रस्सा अप्रतिम होतात. थोडक्यात ज्या पदार्थांना दम द्यावा लागतो, किंवा ज्यांना स्वतःचे पाणी सुटते ते ते पदार्थ फार सुरेख होतात.

रैना + १

गेल्या वर्षी मला रैनानेच ज्ञानांकीत केले होते Happy
मी पुलाव/ जीरा राईस/ मसालेभात इ. तत्सम भातपदार्थ आणि भरली वांगी कटाक्षाने त्या मातीच्या भांड्यातच करते. साधारण दोन वाट्या तांदुळाचा पुलाव/ बिर्यानी, तीन-साडेतीन वाट्यांचा जीरा राईस/ मसालेभात, पाच-सहा माणसांसाठी भरली वांगी होण्याइतकी त्या भांड्याची क्षमता आहे.

मंजू, भांडे कुठून आणलेस? रानडे रोडवर वामन हरी पेठेंच्या पेढी समोर 'प्रजापती' नावाचे दुकान आहे. तिथे छान मिळतात मातीची भांडी.

मी गेल्यावर्षी महालक्ष्मी सरसमधून हे भांडे खरेदी केले.
त्या प्रजापतीकडे काहीच्या काही किंमत सांगितली होती - अडीचशे रुपये Uhoh मी काही घासाघीस करायच्या फंदात पडले नाही.
तेवढ्याच आकाराचं भांडं मला सरसमध्ये ऐंशी रुपयांना मिळालं.

रैना, धन्स. भाकरी माझ्या बाईने केली आहे. त्यामुळे ते श्रेय तिला.
रैना आणि मंजूडी, ओके. छान छान पदार्थ सुचवल्याबद्दल धन्यवाद.

कसले तोंपासू फोटू...........आय मस्ट टेस्ट धिस एएसएपी! Happy

मामी चे फोटो बघितलेस्च नव्हते .. मस्त एकदम! Happy

बंजाराबरोबर भाकरी मिळाली तर काय मजा येईल ..

बित्तू हल्ली गायब दिसतो .. ना नविन फोटो ना रेसिपी ..

Pages