आलू बंजारा

Submitted by Vega on 30 September, 2010 - 14:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),
१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,
१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट...रंग छान येतो भाजीला), अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे+जिरे पूड, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, चिरलेला अर्धा टोमॅटो आणि छोट्या लिंबा एवढा गूळ.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी मातीच्या भांड्यात करायची आहे. तेव्हा, बाजारातून (जिथे माठ, मातीच्या कुंड्या मिळतात त्यांच्याकडून) आधीच एक कॅसेरॉलच्या आकाराचे मातीचे भाजलेले भांडे (तुळतुळीत पॉलिश्ड दिसते हे भांडे) आणि त्यावर मातीचेच झाकण असा सेट आणून ठेवावा.

मातीचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करून गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी पळी तेल घालून मंद आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात आले+लसूण ठेचा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.

नंतर चिमूटभर हिंग टाकून त्यात लाल मिर्च्यांचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणे+जिरे पूड आणि गरम मसाला वगैरे जिन्नस टाकावे.

त्यावर चिरलेला कांदा टाकावा (कांदा गुलाबी होईपर्यंत परतण्याची गरज नाही).
नंतर चिरलेला शेपू, सोललेले बटाटे आणि भिजवलेले मसूर टाकून एकदा सगळे मिश्रण परतून घ्यावे.

नंतर सगळे मिश्रण बुडून वर एक इंच राहील इतके पाणी टाकावे.
चवीनुसार मीठ टाकावे. चिरलेली कोथिंबिर टाकावी.

मिश्रण व्यवस्थित ढवळून त्या भांड्यावर मातीचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे.

बटाटे आणि मसूर ब-यापैकी शिजल्यावर, चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालावा.
पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.

आलू बंजारा तयार!

वाढणी/प्रमाण: 
मिताहारी २-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

मातीचे भांडे वापरल्याने शिजलेल्या अन्नब्रह्माला एक वेगळाच खमंग परिमळ येतो. त्यासाठी मातीच्या भांड्यावर मातीचेच झाकण वापरणे गरजेचे आहे! झाकणावरून परावर्तीत होणारी वाफ पुन्हा पदार्थात मिसळते. खमंगपणा द्विगुणित होतो तो त्यामुळेच!

ही भाजी गरमागरम पोळी, किंवा नुसत्या गरम भाताबरोबर एकदम खास; म्हणजे पॉश लागते!

मूळ पाकृ मध्ये टोमॅटो, गूळ, कोथिंबिर, आले हे जिन्नस नव्हते. ते मी प्रयोगाखातर घातले. तसेच मूळ पाकृमध्ये त्यांनी बटाटा चिरून फोडी वापरल्या. मी छोटे गोल बटाटे वापरले एवढाच बदल!

बटाटे, कांदा, मसूर आणि शेपू हे प्रमुख घटक पदार्थ!

सतत फिरतीवर असणा-या बंजारा (लमाणी) लोकांना नॉन-स्टिक पॅन्स, प्रेशर कुकर वगैरे घेऊन फिरणे कसे जमणार? त्यामुळे, एखादे मातीचे भांडे घेऊन त्यात जिन्नस फक्त कोंबायचे आणि शिजवून खायचे अशी सोप्पी, सोयीस्कर पद्धत असावी लमाण्यांची...असा माझा अंदाज!

ज्यांना मातीचे भांडे मिळवणे शक्य नाही, त्यांनी आपल्या नेहमीच्या कढईत आलू बंजारा करून पहावा! शेपूचा नेहमीचा उग्र वास ह्या भाजीत अजिबात जाणवत नाही.
बेमिसाल चव लागते!

माहितीचा स्रोत: 
काही दिवसांपूर्वी टीव्ही वरील एका कार्यक्रमात ही पाकृ पाहिली होती. कोणी अमरजी नामक बल्लवाचार्य होते! पाकृ लिहून घेतली नाही, पण मुख्य घटक आणि कृती मी आठवणीत जपून ठेवली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आज केलय. खूप सही. सही म्हणजे सहीच एकदम. हा बघा फोटो:
हे भांडं
DSC06472.JPG

करायला ठेवलं तेव्हा:

DSC06471.JPG

तयार भाजी:
DSC06513.JPG

मसूर मोड आलेले आवडतात म्हणून तेव्हढाच एक बदल केलाय. बाकी कृती जशी इथे आहे तशीच. कश्मिरी मिरचीने रंग खूप छान आलाय.

सिंडी, फारच जबरी दिसतेय भाजी! Happy

बटाटे छान शुभ्र दिसतायत. व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसात थोडावेळ बुडवून ठेवले होते का भाजीत टाकण्या आधी?

वॉव, काय जबरी दिसतीय भाजी सिंडे. भांडं पण सही आहे. मी पण करून बघीन आता शेपू आणला की, सध्यातरी साध्या स्टीलच्या भांड्यात करावी लागेल.

वरच्या भांड्याचा आकार सुंदर आहे. भाजी हि छान दिसतेय.

माझ्याकडच्या भांड्याची ह्याच्यामुळे मला आठवण झाली व मी कालच गूळाचा शिरा केला घरी गेल्या गेल्या. पण ते पसरट चाट्टी आहे. बटाटे खात नसल्याने नुसते शेपू व मसूर बरोबर इतर डाळी घालून पंचडाळ उद्याला करतेच.
हे असे भांडे मला न्युजर्सीला मिळाले २ वर्षापुर्वी.. म्हणजे आईने घेवून ठेवले.(कोणाला हवे असल्यास..हि माहिती).

bhande.jpg

अभि,
मीही करून पाहीली काल मातीच्या भांड्यांत. छान वेगळी चव आली.
खूप खूप धन्यवाद.

भारतातील लोकांसाठी
गुजराथेतून खास काळ्या रंगातली मातीची भांडी हस्तकला प्रदर्शनातून वगैरे मिळतात. त्यातली दह्याची आणि पाण्याची वेगळी मिळतात, आणि गॅसवर ठेऊन स्वैपाक करायची वेगळी अशी असतात. अगदी मातीचा तवाही मिळतो. फार अप्रतिम चव येते पदार्थांना. वापरून पहा.

अहाहा. काय दिस्तेय भाजी! भांडं पण सही. फोटू बघून आजच भाजी कराविशी वाटतेय. आयकियाची चक्कर होईपर्यंत धीर धरावा.

सिंडे, जहबहरीही. आता भांडे मागवून प्रयोग करणेत येईल. Happy
अभिजीत, रेसिपी टेम्प्टिंग वाटली होतीच (आणि त्यात शेपू!), त्यामुळे करायचा बेत होताच. पण खरं मोटिव्हेशन हे फोटो बघून मिळालं.

(तात्पर्य : म्हाद्याचे फोटोही 'जातीच्या फोटो काढणार्‍याने' काढले तर नक्की चांगले येतील. :P)

सिंडरेला,
कसली सही झालीये ' आलु बंजारा' :).
मसुराला किती वेळ लागतात मोड आणायला ?
मी किती ट्राय केलं तरी मसुराला मोड नाही येत , जसे मुग-मटकी-चवळीला येतात तसे येतच नाहीत :(.

प्रमुख घटक आणि ढोबळ कृती वगळता आलू बंजारा रेसिपी मला ठसठशीतपणे आठवत नव्हती, म्हणून इथे मी जी रेसिपी दिलीय त्यात जरा उन्नीस-बीस झाले आहे.

बरीच वाट पाहिल्यावर वरीजनल रेसिपी साम टीव्ही चॅनेलने अपलोड केली आहे.
वरीजनल रेसिपी व्हिडीओ इथे पहा.

वरीजनल आणि मी करून बघितलेल्या रेसिपीपेक्षा सिंडीने केलेल्या बंजा-याचे दार्शनिक मूल्य (रंग, रूप इ.) मला जास्त चांगले वाटले.

व्हिडीओमध्ये बंजा-यानंतरच्या पनीर इन चिली रेसिपीला 'चक्कूछुरिया' हे नाव जास्त चांगलं शोभलं असतं! Happy

धन्यवाद!

>>त्याचं सगळं श्रेय कश्मिरी तिखट आणि मीठाच्या पाण्याला जातं>>
माझ्या मते तेल, तिखट आणि पाण्याचं प्रमाण तुझं अधिक योग्य होतं!

>>जरा लक्षात घ्या, हा माझा नम्रपणा आहे>>
कदाचित दार्शनिक मूल्याचं ते ही एक कारण असावं! Happy

धन्यवाद, सानी!

मी आजच करुन पाहिली होती. माझ्याकडे मातीचं भांड नव्हतं, सो नॉनस्टीकमध्ये केली. मस्त झाली एकदम, हा फोटो.

aalo banjara.JPG

Pages