मटण बिर्याणी

Submitted by लालू on 15 June, 2010 - 21:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
अर्धा किलो बासमती तांदूळ
दीड वाटी तूप
अर्धा किलो कांदे
४-५ दालचिनीच्या काड्या
१ वाटी दही
४-५ वेलच्या
दोन चमचे जीरे
एक चमचा मिरी
१५-२० लसूण पाकळ्या
१ इन्च आले
थोडी कोथिंबीर
७-८ लवंगा
४-५ तमालपत्रे
२ चमचे हळद
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
३ चमचे तिखट
मीठ
केशर
थोडे दूध
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
पाणी

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
- आले, जीरे, लसूण वाटावे आणि ते मोडून घेतलेल्या दह्यात मिसळून दही थोडे घुसळून घ्यावे.
- खड्या गरम मसाल्यापैकी थोडे मिरे, ३-४ लवंगा, थोडी दालचिनी कुटून घ्यावी.
- हे दही, कुटलेला मसाला मटणाला चोळून मटण १ ते दीड तास झाकून ठेवावे. (रात्रभर ठेवले तर चांगलेच.)
- थोड्या दुधात केशर भिजवावे.
- कांदा पातळ कापून घ्यावा, जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तूप तापवून त्यात लाल होईपर्यंत परतावा मग काढून घ्यावा.
- त्याच तुपात लवंग, दालचिनी, तमालपत्रे, वेलची थोडी ठेचून घालावी. कांद्याचा अर्धा भाग घालून परतावे.
- मग त्यात मटण, मिरचीपूड, गरम मसाला घालून मिसळावे आणि सतत परतत रहावे.
- मटण तांबूस रंगाचे होऊन खमंग वास सुटला की मटण जरासे बुडेल इतपत पाणी घालावे, मीठ घालावे व मंद आचेवर ठेवावे.

- निथळून कोरडे झालेले अर्धे तांदूळ मटणाला वाफ आली की मटणावर पसरावेत. संपूर्ण मटण झाकले गेले पाहिजे.
- तांदळावर उरलेला अर्धा कांदा आणि मिरे घालवेत व राहिलेले तांदूळ पसरावेत. (याला केशराचा रंग लावता येतो किंवा २ ऐवजी ३ थर करता येतील. एका भागाला कोथिंबीर वाटून ती हिरव्या रंगासाठी लावता येईल.)
- वरुन दुधात भिजवलेले केशर दुधासह आणि उरलेले तूप घालावे.
- थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
- वरुन घट्ट बसणारे झाकण लावून कडा कणकेने चिकटवून घ्याव्यात.
- भात पूर्ण शिजला की काढावे. तांदूळ धुवून ठेवल्याने आणि मटणाचे पाणी, थोडे वरुन घातलेले पाणी यामुळे शिजतो. एरवी भात शिजवताना घालतात तेवढे पाणी घालू नये. बिर्याणीबरोबर मटणाचा रस्साही केला जातो तेव्हा रश्श्यासाठी शिजवलेल्या मटणाचा स्टॉक पाण्याऐवजी वापरतात. तांदळाऐवजी अर्धवट, मोकळा शिजलेला भात करुन मग रंग लावून थर देता येतात.
- सगळे मटण भांड्याच्या तळाशी आहे. भांडे पुरेसे जाड नसल्यास तव्यावर ठेवा. किंवा सुरुवातीला थेट आणि नंतर तवा आधी तापवून घेऊन त्यावर मंद आचेवर ठेवता येईल. अंदाजे १ ते दीड तास लागेल. थर दिल्यानंतर भात अर्धवट शिजवून घेतला असेल तर मटण शिजायला ४० मिनिटे पुरे होतील.
- वरुन तळलेला कांदा, कोथिंबीर, तुपात परतलेला सुका मेवा, उकडलेली अंडी लावून सजवावे.
- वाढताना बिर्याणी न हलवता एका बाजूने झारा तळापर्यंत नेऊन बिर्याणी वाढायला काढावी.
- सोबत लिंबू, दही कांदा द्यावा.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ६ - ८ जणांसाठी
अधिक टिपा: 

हा प्रकार पहिल्यांदाच करताना व्यवस्थित जमेल असे नाही. पण एकदा केल्यावर अंदाज येतो. खालचे शिजलेले मटण खरपूस आणि बर्‍यापैकी सुके असते, म्हणजे पाण्याचा अंश नसतो, तुपाचा असतो. Wink

माहितीचा स्रोत: 
आई
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हल्ली भात अर्धवट शिजवूनच करते. कच्ची करुन अनेsक वर्षं झाली. पहिल्यांदाच करणार्‍यांसाठी मी अजून काही टिप्स विचारुन घेईन.

लाल्वाक्का,
मस्त वाटतीये रेसेपी. तांदूळ शिजवून घ्यायचे नाहित ते चांगलं कारण आधी शिजवून घेतला तर कमी जास्त शिजण्याचे प्रकारपण झालेत. त्यामुळे बिर्याणी कधी एकदम कोरडी तर कधी गिच्च होते...

लालू, एका बिर्यानीवाल्याने खास टिप म्हणून सांगितले होते. बिर्यानी तयार झाल्यावर एका वाटीत थोडे निखारे घेउन त्यावर बटर सोडावे आणि ती वाती बिर्यानीच्या पातेल्यात ठेवून (सुलटी) पातेल्याला झाकण लावावे. मस्त खुशबु येते. आता घरात निखारे कशे आणणार ? काही सुचतय ?

पण ही फक्त ऐकीव माहिती आहे. स्पेशॅलिटी डिश कधी बनवल्या नाहीत.

असुदे, भारतात राहत असाल आणि जवळ कोळसेवाला असेल तर पाच्-दहा रुपयांत थोडे कोळसे आणू शकता. बरेचदा कामवाल्या बायका आणून देऊ शकतात कारण त्यांच्याकडे वापरतात अजूनही कोळसे.
भारताबाहेर असाल तर लिक्विड स्मोक मिळतो असे ऐकले आहे. मला स्वतःला हा स्मोकी फ्लेवर खूप आवडतो. अगदी तंदूरचा फील येतो. पण इथल्या दुकानांत खूप शोधूनही मिळाला नव्हता लिक्विड स्मोक. कुठे मिळतो कुणी सांगू शकेल का ?

अगो, मी भारतात रहातो आणि माझ्या ठाण्यातल्या घरात कोळशाची शेगडीही आहे... मी बाकिच्यांसाठी विचारतोय...

असुदे, बरं-बरं Happy
लालू, अगं मी कोळसे नाही. स्मोकचा फ्लेवर कुठे मिळेल विचारते आहे. मागे फूड नेटवर्कवर एली क्रिगरने लिक्विड स्मोक घालून पुल्ड पोर्क सँडविच केले होते. अशाच प्रकारे पंजाबी भाज्या,चिकन वगैरे करुन बघायची इच्छा आहे ( स्मोक फ्लेवर घालून तंदूरची चव आणणे )

म्हणजे ते मॅरिनेडमध्येच घालतात ते का? ओके.
ग्रिलमध्ये टाकायला लाकडाच्या चिप्स मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरसाठी.

मी कधी आणले नाही, पण ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळायला हवे. असल्या गोष्टी कधीकधी बारा महिने मिळत नाहीत. समरमध्ये दिसतील सगळीकडे.
http://www.amazon.com/Wrights-Natural-Mesquite-Seasoning-3-5-Ounce/dp/B0...

लालू सकाळी सकाळीच मेजवानी ! मस्त रेसिपी ! माझ्या मुलाने मागून डोकाऊन यम्मी केलेय. आता माझ्यामागे भूणभूण Happy
मी कोणतीही बिर्याणी करताना पुदिना सढळ हस्ते वापरते. त्याचाही स्वाद मस्त येतो. वाटणात घ्यायचा किंवा नुसती पाने तोडून भातावर पसरायची.
स्मोक करायला माझी गावरान पद्धत : २-३ टिश्यु पेपर घ्यायचे. त्यांचे कापून चार भाग करून ते थोड्या मोठ्या वाटीत घ्यायचे. त्यावर तेल घालून ते पेटवायचे. नीट पेटले की वाटी सांभाळून पदार्थावर ठेवायची अन घट्ट झाकण लावायचे. दुधाची तहान ताकावर Happy

अगं, बिर्याणीची पद्धत नाही गं. पदार्थाला धुरी देण्याची पद्धत म्हणत होते मी Lol
लालू, इथे येऊन मी आज फारच विषयांतर केले त्याबद्दल सॉरी. हेमाइशेपो !

लालू, मस्त रेसिपी. माझी नणंद नेहमी अशी बिर्याणी करते. ती एकदम सुगरण आहे. अशी बिर्याणी करायला पातेले मात्र चांगले जाड बुडाचे जुन्या पद्धतीचे हवे.
अगो, मी आणला होता लिक्वीड स्मोक. पण आपल्या देशी पदार्थांना काही फरक जाणवला नाही. कदाचित मसाल्यांचाच घमघमाट असतो म्हणुन असेल.

शनिवारी केलेली ह्या पद्धतीने बिर्याणी.

हळद नक्की कधी घालायची ? मी दह्यात मिसळून घातलेली.
मिरी दाणे शेवटी तांदळाबरोबर घालायच्या ऐवजी अनवधानाने गरम मसाल्याबरोबर कुटून घातले Sad
अर्धे लाल तिखट अन अर्धे काश्मिरी मिरची पूड असे घातलेले. रंग मस्त आला होता.
मला कणीक लावायचा व्याप जमेल असे वाटले नाही. म्हणून फॉईल ठेवून त्यावरून झाकण लावून शिजवले.
३० मिनिटे मंद गॅसवर ठेवल्यावर भात जवळपास ७५% टक्के शिजला होता पण थोडे पाणी कमी पडते असे वाटले. म्हणून साधारण ६ ऑउन्स कोमट पाण्यात थोडे मीठ विरघळून घेऊन ते भातावर शिंपडले अन मग अजून २० मिनिटे परत शिजवले.

प्रिंट अँड सेव्ह धिस रेसिपी असा सल्ला मिळालाय . चिल्लर पब्लिक म्हणे तुझ्या नेहेमीच्या पसार्‍यापेक्षा सोपी आहे ना ही रेसिपी मग तू नेहमी करशील का बिर्याणी Happy

फोटो काढलेत , ते सावकाशीने टाकेन.

लालु मदत हवीय ... बिर्याणी शिजतेय आत्ता , मी चेक केले तर भाताचा खालील लेयर पुर्ण शिजला आहे पण अगदी वरील लेयर अगदी आहे तसा आहे (कच्चा). (ठेवुन ४० मिनिटे झाली ) अजुन अर्धा तास ठेवावी काय?

अजुन अर्धा तास ठेवावी काय?>> किमान १५ - २० मिनीट तरी.
पण तुम्ही अस मधेच उघडुन नका बघु, वाफ निघुन जाते त्याने.

पिहु,
म्हणून साधारण ६ ऑउन्स कोमट पाण्यात थोडे मीठ विरघळून घेऊन ते भातावर शिंपडले अन मग अजून २० मिनिटे परत शिजवले. >>>>>>ही टीप उपयोगी पडेल कारण वरील लेयर अगदी आहे तसा आहे अस म्हणताय...

Pages