मटण बिर्याणी

Submitted by लालू on 15 June, 2010 - 21:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
अर्धा किलो बासमती तांदूळ
दीड वाटी तूप
अर्धा किलो कांदे
४-५ दालचिनीच्या काड्या
१ वाटी दही
४-५ वेलच्या
दोन चमचे जीरे
एक चमचा मिरी
१५-२० लसूण पाकळ्या
१ इन्च आले
थोडी कोथिंबीर
७-८ लवंगा
४-५ तमालपत्रे
२ चमचे हळद
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
३ चमचे तिखट
मीठ
केशर
थोडे दूध
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
पाणी

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
- आले, जीरे, लसूण वाटावे आणि ते मोडून घेतलेल्या दह्यात मिसळून दही थोडे घुसळून घ्यावे.
- खड्या गरम मसाल्यापैकी थोडे मिरे, ३-४ लवंगा, थोडी दालचिनी कुटून घ्यावी.
- हे दही, कुटलेला मसाला मटणाला चोळून मटण १ ते दीड तास झाकून ठेवावे. (रात्रभर ठेवले तर चांगलेच.)
- थोड्या दुधात केशर भिजवावे.
- कांदा पातळ कापून घ्यावा, जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तूप तापवून त्यात लाल होईपर्यंत परतावा मग काढून घ्यावा.
- त्याच तुपात लवंग, दालचिनी, तमालपत्रे, वेलची थोडी ठेचून घालावी. कांद्याचा अर्धा भाग घालून परतावे.
- मग त्यात मटण, मिरचीपूड, गरम मसाला घालून मिसळावे आणि सतत परतत रहावे.
- मटण तांबूस रंगाचे होऊन खमंग वास सुटला की मटण जरासे बुडेल इतपत पाणी घालावे, मीठ घालावे व मंद आचेवर ठेवावे.

- निथळून कोरडे झालेले अर्धे तांदूळ मटणाला वाफ आली की मटणावर पसरावेत. संपूर्ण मटण झाकले गेले पाहिजे.
- तांदळावर उरलेला अर्धा कांदा आणि मिरे घालवेत व राहिलेले तांदूळ पसरावेत. (याला केशराचा रंग लावता येतो किंवा २ ऐवजी ३ थर करता येतील. एका भागाला कोथिंबीर वाटून ती हिरव्या रंगासाठी लावता येईल.)
- वरुन दुधात भिजवलेले केशर दुधासह आणि उरलेले तूप घालावे.
- थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
- वरुन घट्ट बसणारे झाकण लावून कडा कणकेने चिकटवून घ्याव्यात.
- भात पूर्ण शिजला की काढावे. तांदूळ धुवून ठेवल्याने आणि मटणाचे पाणी, थोडे वरुन घातलेले पाणी यामुळे शिजतो. एरवी भात शिजवताना घालतात तेवढे पाणी घालू नये. बिर्याणीबरोबर मटणाचा रस्साही केला जातो तेव्हा रश्श्यासाठी शिजवलेल्या मटणाचा स्टॉक पाण्याऐवजी वापरतात. तांदळाऐवजी अर्धवट, मोकळा शिजलेला भात करुन मग रंग लावून थर देता येतात.
- सगळे मटण भांड्याच्या तळाशी आहे. भांडे पुरेसे जाड नसल्यास तव्यावर ठेवा. किंवा सुरुवातीला थेट आणि नंतर तवा आधी तापवून घेऊन त्यावर मंद आचेवर ठेवता येईल. अंदाजे १ ते दीड तास लागेल. थर दिल्यानंतर भात अर्धवट शिजवून घेतला असेल तर मटण शिजायला ४० मिनिटे पुरे होतील.
- वरुन तळलेला कांदा, कोथिंबीर, तुपात परतलेला सुका मेवा, उकडलेली अंडी लावून सजवावे.
- वाढताना बिर्याणी न हलवता एका बाजूने झारा तळापर्यंत नेऊन बिर्याणी वाढायला काढावी.
- सोबत लिंबू, दही कांदा द्यावा.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ६ - ८ जणांसाठी
अधिक टिपा: 

हा प्रकार पहिल्यांदाच करताना व्यवस्थित जमेल असे नाही. पण एकदा केल्यावर अंदाज येतो. खालचे शिजलेले मटण खरपूस आणि बर्‍यापैकी सुके असते, म्हणजे पाण्याचा अंश नसतो, तुपाचा असतो. Wink

माहितीचा स्रोत: 
आई
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्स्स... छानै रेसिपी..
मी बर्‍याचवेळा लाकडी कोळसा वापरते स्मोकी खुशबू साठी...
अगदी लाल निखारा झाला लाकडी कोळश्याचा (गॅसवर ठेवून निखारा होतो) कि एका स्वच्छ वाटीत ठेवून ती वाटी तयार चिकन ,मटन च्या भांड्यात मधोमध ठेवून द्यायची. वर खायचे तेल (अम्या रॉकेल नको रे वापरूस Lol ) किंवा बटर ओतायचे,लग्गेच एका मोठ्या ताटाने झाकायचे. धूर अजिबात बाहेर निघू द्यायचा नाही.
धूर संपल्यावर ही झाकण तसेच ठेवा. एक अर्ध्या तासाने कोळसा काढून टाकावा..
ट्राईड अँड टेस्टेड मेनी टाईम्स..

सगळ्यांना धन्यवाद !

खुप छान झाली होती बिर्याणी ...एकदम तोंपासु
मी थोडे पाणी शिंपडले आणि सगळे लेयर मिक्स करुन १५ मि. ठेवली . लेयर बिघडले पण खुप छान झाली होती.

Pages