'अनुज बिडवे'नंतर...

Submitted by ललिता-प्रीति on 9 January, 2012 - 01:34

अनुज बिडवेसंबंधीची बातमी मी गेले काही दिवस फॉलो करते आहे.
त्या घटनेतलं कारुण्य दुर्लक्षित करायचं नाहीच. पण तरीही परदेशात राहून शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांबद्दलचे इतर अनेक विचार डोक्यात घोळतायत. माझा मुलगा येत्या चार वर्षांत पदवीधर होईल. त्यापश्चात त्याच्यापुढेही परदेशी शिक्षणाचा पर्याय खुला होईलच. त्यामुळे तर सध्या त्या बातमीशी, संबंधित तपशीलांशी मी अधिक रिलेट होते आहे.
परदेशी विद्यापीठांतल्या प्रवेशपध्दती, त्यासाठीची अर्थयोजना, व्हिसाची तयारी या बाबींबद्दल उघड चर्चा होतात, सल्ले मिळतात. मात्र विशीच्या उंबरठ्यावरच्या मुलांच्या तिथं जाऊन राहण्यासाठीच्या मानसिक तयारीविषयी फारसं काहीच बोललं जात नाही.
यासंदर्भात आजच्या लोकसत्ता-करियर वृत्तांत पुरवणीत एक चांगला लेख आला आहे.
लेख वाचताना जाणवलं की मायबोलीवर असे अनेक आहेत की ज्यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं आहे.(माझ्या नजरेसमोर पहिलं नाव आलं ते अ‍ॅंकीचं.) तर हा धागा त्यांचे अनुभव, विचार ऐकण्यासाठी आहे.
आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी मुळीच पाठवू नये असं मी आजही म्हणणार नाही. पण त्यासाठीच्या मानसिक तयारीकडे अधिकाधिक लक्ष पुरवावं हा आग्रहही धरेन.
तर,
- परदेशी शिक्षण घेऊन भारतात परतलेले
- परदेशी शिक्षण घेऊन आता अर्थार्जनासाठी परदेशातच वास्तव्य असलेले
- भारतात शिक्षण घेतलेले पण आता परदेशातल्या वास्तव्यात या प्रकारच्या बाबी संवेदनशील मनानं टिपणारे
अशा सर्वांचं मतप्रदर्शन इथे अपेक्षित आहे.
‘संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर’ या धाग्यावर ज्याप्रमाणे निखळ चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण होते, त्याच प्रकारची चर्चा इथे होईल अशी आशा आहे. (प्रतिसाद देण्यापूर्वी दिलेल्या लिंकवरचा लेख संपूर्णपणे वाचावा ही नम्र विनंती. कारण त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानंच इथली चर्चा अपेक्षित आहे.)
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा काढला आहेस ललिता. मीही तुझ्या विचारांशी रिलेट करु शकते आहे. इथली चर्चा वाचायला खूप आवडेल आणि त्यातून बरीच माहिती मिळेल अशी आशा बाळगून आहे. तुला धन्यवाद.

परदेशात काही वर्षे वास्तव्य केले असल्याने हे लिहीत आहे. अनुज बिडवेने परक्या देशात (ज्या देशात त्याला प्रवेश करून जेमतेम ३ महिने झाले होते) मध्यरात्री १ वाजता बाहेर जाण्याची मोठी चूक केली. परदेशात कोठेही कमी गर्दीच्या ठिकाणी रात्री ९ नंतर बाहेर जाणे टाळावे. एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास शक्यतो दिवसा व एखाद्या शॉपिंग मॉलमधल्या एटीएम मधूनच काढावे. शक्यतो सेफ्टी गेट, सेफ्टी डोअर असलेल्या कॉम्प्लेक्समध्येच रहावे. गरज नसल्यास डाउनटाउन मध्ये जाणे टाळावे. अशा काही गोष्टी टाळल्यास वाईट प्रसंग टाळता येतील.

ललितादेवी,

मी शिकण्यासाठी इथे इंग्लंडमध्ये आलो नसल्याने मला शैक्षणिक बाबींविषयी सांगता येत नाही. या संदेशाचा रोख केवळ गुन्हेगारीपासून स्वत:चा बचाव कसा करावा इतपत मर्यादित आहे.

कोणावर कशी वेळ येईल ते सांगता येत नाही. मात्र नवीन विद्यार्थ्यांच्या अश्या हत्या नवीन नाहीत. २००८ साली हेस्टिंग्ज येथे एका कतारी मुलाची आल्याआल्या दुसर्‍या महिन्यांत अशीच हत्या झाली होती. इथेही चुकून असंगाशी संग असाच प्रकार झाला. हा हल्ला वर्णद्वेषातून झाला होता. अनुजची हत्याही सॉलफर्ड या मँचेस्टरच्या अत्यंत असुरक्षित विभागात झाली. इथे रात्री बाहेर फिरणे धोक्याचे धरतात. (मी कधी गेलो नाहीये तिथे.)

ही महत्त्वाची माहिती अनुज वा त्याच्या सोबत जेवायला गेलेल्या कोणालाच नसण्याची शक्यता आहे. अशी माहिती असल्यास माणूस जरा सावध राहू शकतो. म्हणून गुन्हेगारीचे आकडे असलेले http://www.upmystreet.com/ असे संकेतस्थळ पाहून त्यावरून आपण कुठे (जाणार) आहोत याची पूर्वकल्पना घेणे बरे पडेल.

आता असं बघा की जंगलातून दिवसाउजेडी फेरफटका मारणे वेगळे आणि रात्र काढणे वेगळे. तसाच प्रकार युरोपातल्या शहरांच्या मध्यवर्ती भागांत असतो. दिवसा कमालीची वर्दळ असते त्यामुळे एक सुरक्षित कवच लाभते. मात्र रात्री कोणी चिटपाखरूही दिसत नाही. अश्या ठिकाणी फिरणे धोक्याचे आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास माझ्या लंडनमधल्या हाऊन्सलो इथे राहणार्‍या मित्राचं देईन. १९०० ते ०७०० वाजण्याच्या दरम्यान तो चालत फक्त तीन मिनिटांवर असलेल्या दुकानातही कार घेऊन जात असे. मी त्याची त्यावरून चेष्टाही केली होती. मात्र त्याने नुकत्याच घडलेल्या लूटमारीचा दाखला देऊन सांगितलं की रस्त्यावरून चाललेल्याला लुबाडायला अर्ध मिनिट पुरेसं आहे. शिवाय पिस्तुलबिस्तुल असेल तर फुकट जीव का धोक्यात घाला!

तर शिक्षणासाठी परदेशगमनाची जी तयारी करून घ्यायची आहे तिच्यात आपण कुठे रहात आहोत वा जाणार आहोत याबद्दल पुरेपूर खबरदारी कशी घ्यावी हे अंतर्भूत असावे. अर्थात हे सर्वगुणगुटिका (सिल्व्हर बुलेट) नाही हे ओघाने आलेच.

आपला नम्र,
-गामा पैलवान

शिक्षणासाठी परदेशगमनाची जी तयारी करून घ्यायची आहे तिच्यात आपण कुठे रहात आहोत वा जाणार आहोत याबद्दल पुरेपूर खबरदारी कशी घ्यावी हे अंतर्भूत असावे
>>>
पुरेपूर खबरदारी फार थोडे जण घेत असतील असं या उदाहरणांवरून वाटतं. त्याबद्दल कितपत विचार करत असतील अशी शंका घ्यायलाच जास्त जागा आहे.
परदेशातलं सगळंच आपल्या देशापेक्षा छानछान ही मानसिकता त्यामागे असेल का?
लोकसत्तामधल्या लेखातही हा मुद्दा मांडला गेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे.

पुरेपूर खबरदारी फार थोडे जण घेत असतील असं या उदाहरणांवरून वाटतं.<<
अनुज बिडवेचं माहित नाही पण कधी कधी देसी ओव्हरकॉन्फिडन्स महागात पडू शकतो अश्या ठिकाणी.
अजून एक मला जाणवलेली गोष्ट म्हणजे देसी पॉकेटस/ बबल्स मधेच कायम असणं हे कधी कधी जास्त डोळ्यावर येऊ शकतं. स्थानिक आणि इतर ठिकाणांच्याहून आलेले विद्यार्थी यांच्यात थोडं मिसळलं तर काही प्रमाणात सेफ जास्त वाटू शकतं (हा फॉल्स सेन्स ऑफ सेफ्टी पण असू शकतो!).
प्रत्येक युनिव्हर्सिटीजमधे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे एखादे ऑफिस किंवा दालन असते. तिथे नवीन विद्यार्थ्यांसाठी स्वागत, डूज&डोन्टस, इतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्यात मिसळणे असे सगळे होत असते. त्यातून अनेक गैरसमज होण्यासारखे मुद्दे टाळता येऊ शकतात.
उदाहरणार्थ अ‍ॅक्सेंट आणि काही शब्दांचे वेगळ्या ठिकाणी वेगळे मानले जाणारे अर्थ (फ्रीक आउट चा अर्थ आपण देशात प्रचंड धमाल करणे असा करतो तर अमेरिकेत बिथरणे सदृश अर्थ घेतला जातो.). हे उदाहरण तसे साधे आहे पण काही शब्द खूप वेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात व गैरसमजातून कुणी दुखावला/ चिडवला जाणं सहज शक्य असतं. हे टाळावे.

चांगला धागा प्रिती!
मेलबर्नमध्येही दोन वर्षांपुर्वी नितीन गर्ग नावाच्या भारतीय तरुणावर हल्ला झाला होता आणि त्यात त्याला त्याचे प्राण गमवावे लागले.
अलीकडेच त्याच्यावर हल्ला करणार्या टीनएजर मुलाला शिक्षा झाली. त्या मुलाने न्यायालयात सांगितले की नितीन गर्गकडे असलेल्या फोनसाठी त्याच्यावर त्याने आणि त्याच्या मित्राने हल्ला केला! Sad

भारतातून येणार्‍या मुलांजवळ महागडे लॅपटॉप, फोन वगैरे उपकरणे असतात त्यामुळेही या मुलांवर हल्ले होतात. तसेच बरीच मुले डॉलर आणि रुपये यांची सांगड घालण्याच्या प्रयत्नात रात्रीबेरात्री कामानिमित्ताने पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असतात.
याशिवाय ट्रेनमधुन प्रवास करताना फोनवर मोठमोठ्याने बोलणे, डब्याच्या एका टोकावरुन पलिकडच्याशी बोलणे, सहप्रवाशांविषयी भारतीय भाषांतुन टिंगलटवाळी करणे, गोर्‍या मुलींना त्यांच्या कपड्यांवरुन्/फिगरवरुन काही-बाही बोलणे असे प्रकार भारतीय विद्यार्थी सरास करताना मला स्वतःला आढळले आहेत. एकदा एक गुजु मुलगा तर चक्क तंबाखु काढुन/मळुन्/चुना लावुन उरलेला भुगा ट्रेनमध्येच फेकुन पुन्हा मोठमोठ्याने फोनवर बोलताना मी पाहिला आहे.

याच कारणांमुळे भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होतात असे नव्हे पण इतर देशात जेव्हा भारतीय विद्यार्थी जातात तेव्हा तिथले सामाजिक संकेत त्यांनी पाळले पाहिजेत.

निनादने (नवर्‍याने) या संदर्भात एक डु अ‍ॅण्ड डोण्ट डु अशी एक यादी केली होती. ती शोधुन इथे टाकते.

रच्याकने, या संदर्भातच आयबीएन लोकमत या वाहिनीवर पण एक चर्चा झाली होती. कोणी हा कार्यक्रम बघितला का? मागच्या सोमवारी रात्री निनादची फोनवर प्रतिक्रिया घेण्यासाठी ई-मेल आली होती पण तेव्हां इथे बरीच रात्र असल्याने तो फोनवर उपलब्ध नव्हता.

परदेशातलं सगळंच आपल्या देशापेक्षा छानछान ही मानसिकता त्यामागे असेल का?>>>>

असु शकेल्...कारण आपण मनाने इतके अजुनही गुलामगीरीत आहोत, की लोक अजुनही परदेशात सगळे छानच असते ह्या मताचे असतात. इकडे छान म्हणजे स्वच्छता, नैसर्गीक सौंदर्य, जुन्या ठेव्याची जपणुक्...पण त्याच बरोबर गुन्हेगारीची काळी बाजु लोक विसरतात.

आम्ही लंडनला ७ वर्षांपुर्वी एकदा रात्री फिरत असताना ईस्टर चे दिवस असल्याने खुप गर्दी होती. त्या मुळे काही जाणवले नाही. पण आता एप्रिल ला गेले तर सामसुम होतं. माझा नवरा अमेरीकेत मेम्फिस ला होत १ महीना तेंव्हा त्यांन्ना त्यांच्या ऑफिसच्या कडक सुचना होत्या की संध्याकाळी ७-८ नंतर एकट्याने रस्त्याने फिरायचे नाही. एकदा त्याची कलीग जवळच्याच वॉलमार्ट ला गेली. साडे नउ झाले. ती लगेच चालत ट्रेनींग सेंटर वर आली. आल्यावर तिची सगळ्यांन्नी खरडपट्टी काढली. म्हणजे येवढं पण धोकादायक आहे.
मला वाटत की ही जी मुलं तिकडे शिकायला जातात, त्यांन्ना हे असे वातावरण नवखे असते. बाकी मित्र जातात म्हणुन त्यांचे अनुकरण करायला ते जातात.

छान धागा..! परदेशात (सध्या ऑस्ट्रेलीयाचा पण मुद्दा ऐरणीवर आहे, झालेल्या काही घटना मी अमान्य करुच शकत नाही; तरी..) शिक्षण व तेथील सुरक्षितता याला अनेक कांगोरे असु शकतील असे मला वाटते. गामांनी म्हटल्या प्रमाणे "जंगलातून दिवसाउजेडी फेरफटका मारणे वेगळे आणि रात्र काढणे वेगळ". उदाहरण द्यायचे झाले तर---Auburn हा दिवसा भरपुर वर्दळीचा भाग. आजूबाजूच्या भागात चिन्यांची/भारतीयांची (पंजाबी/गुजराथी ई.) दाट वस्ती. पण प्रत्यक्ष या भागात आखातातील निर्वासितांचे वास्तव्य व गुन्हेगारीचे प्रमाण मोठे. एक पंजाबी विद्यार्थी रात्री ऊशीरा घराकडे परतत असतांना एक चुकीचा निर्णय घेतो. रात्री १२-१ च्या दरम्यान रस्त्यावरच्या एटीएम मधुन पैसे काढतो अन चालू लागतो. काही सेकंदाच मागून कोणी येते, मानेवर ईंजेक्शनची निडल टेकवली जाते, म्हणे HIVचं आहे.. खिशातलं होतं नव्हतं सगळं जातं..अन जाता जाता मान रक्तभंबाळ झालेली असते!---
आपण शिक्षणासाठी जात आहोत मग जसे पैसा, राहाणं-खाणं याचा विचार करतो तसा संरक्षणाचा/खबरदारीचा विचार करायला नको का? नंतर अशा गोष्टींचा नंतर राष्ट्रीयत्वाशी संबंध जोडून काय ऊपयोग? बरेचदा भारतीयांमधे नको तितके संस्कुतीप्रेम ऊफाळून येते, आपल्याच माणसांच्या गराड्यात स्वत:ला इतके गुरफटून घेतो की परदेशी संस्क्रुतीचे अबकड शिकण्याचे पण भान राहात नाही. मग अकारण असुरक्षितता वाटू लागणे, बोलण्यातून अथवा हावभावातुन होणारे गैरसमज, वादविवाद अशी ही मारूतीची शेपटी वाढू लागते.
हे झाले सगळे 'निगेटेव्ह' विचार.. पण जेव्हा देशी लोकांना परदेशात चांगले अनूभव येतात त्यांच्या किती वेळा बातम्या बनतात? साधे इ-सकाळ मधे असा काही लेख येऊ देत, लोक त्या लेखकाला पळता भूई थोडी करतात. पण असे अनुभव ऐकून सुद्धा मला वाटते की विद्यार्थ्यांमधे थोडा का होईना आत्मविश्वास येऊ शकतो. परदेशात जाणवणारा परकेपणा कमी करू शकतो.

लोकसत्तेतला लेख मला विस्कळीत वाटला. अल्प माहिती वरून अतिरंजित/एकांगी विधानं केली आहेत. 'विद्यार्थ्यांना तिथल्या जीवनमानाची, घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षिततेच्या खबरदारीची, वागण्या-बोलण्यात पाळाव्या लागणाऱ्या संकेतांची पूर्वकल्पना असते का?' हा लेखाचा उद्देश वरकरणी वाटला पण शेवटी 'वर्क व्हिसा मिळाला की, गुणवत्तेवर चालून येणारी रग्गड पगाराची नोकरी, त्यापाठोपाठ आपोआप येणारे स्टेटस, हातात खुळखुळणारा पैसा यापल्याडही आयुष्य असतं, हे पाहायलाही त्यांना सवड मिळत नाही' असली वाक्यं टाकून नक्की काय सुचवायचं आहे ते समजलं नाही. विद्यार्थी नोकरीसाठी चेन्नईऐवजी न्यूजर्सीला प्राधान्य देतात यात लेखिकेला काय त्रास झाला ते ही अगम्य आहे. असो.

वरती लोकांनी बाहेर गावी कसं रहावं याच्या सूचना केल्या आहेत त्यात फार काही भर घालता येणार नाही मला. पण या लेखावरच्या माझ्या प्रतिक्रिया..

>> अलीकडे युरोप-अमेरिकेत उच्च शिक्षण-संशोधनासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढत्येय, तशी त्यांना तिथे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीची वा वर्षद्वेषाच्या घटनांची संख्याही! हा खरोखरीच वर्णद्वेष असतो की, आपल्या संधी हिसकावून घेतल्या, म्हणून स्थानिक लोकांचा व्यक्त होणारा रोष? .. अशा तुरळक घटनांमुळे त्या देशावर वर्णद्वेषाचा ठपका ठेवता येईल?

पुण्यात पूर्वी इराणी विद्यार्थ्यांचा प्रचंड द्वेष व्हायचा! महाराष्ट्रातही बिहारी आले म्हणून जाळपोळ व दंगे होतात. त्याला महाराष्ट्रियांच्या नोकरीच्या संधी बिहार्‍यांनी हिसकावल्या हे कारण दिलं जातं. महाराष्ट्रातले लोक बिहार्‍यांइतक्या कमी पगारावर येत नाहीत ही नोकर्‍या देणार्‍यांची बाजू! इंग्लंडमधे बर्‍याच अंशी हीच परिस्थिती आहे. इथल्या बर्‍याच लोकांना काम न करता नुसते सरकारचे पैसे लाटायचे आहेत. ज्यांना काम हवं आहे त्यांच्याकडे आवश्यक गुणवत्ता नाही. इथे इंजिनिअर मिळत नाहीत कारण बरेच विद्यार्थी (इथल्या) १२ नंतर पुढे शिकत नाहीत.. कारण खर्च (इथल्या लोकांना फी कमी असली तरी तेव्हढेही पैसे नसतात, मग कर्जच काढावं लागतं. ते कर्ज ते नोकरी लागल्यावर बरीच वर्ष फेडत असतात)! शिकले तरी इंजिनिअरिंग किंवा सायन्स साईडच्या डिग्र्यांकडे जात नाहीत.
पण माणूस पूर्वी कळपाने रहायचा तेव्हापासून आपल्या टेरिटरीत बाहेरून लोक आले की त्यांचा द्वेष होणं व मारामार्‍या होणं चालू आहे. या सगळ्याला सरसकट वर्णद्वेष म्हणणं बरोबर नाही. बर्‍याचदा राँग प्लेस अ‍ॅट द राँग टाईम असं होतं. बर्‍याचदा पॉलिटिकल कारणं असू शकतात.

>> भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी तर येत असतं, पण गाठीशी भरपूर पैसे नसतात. त्यामुळे युरोपियन-अमेरिकी विद्यार्थ्यांमध्ये आपण मिसळू शकत असलो तरी त्यांच्यासोबत क्लब, पाटर्य़ाना जाण्यावर आपोआपच मर्यादा येते.

वर म्हंटल्याप्रमाणे इकडच्या विद्यार्थ्यांकडेही फारसे पैसे नसतात. तेही बाहेर नोकर्‍या करून जमवतात. त्यामुळे ते सतत क्लब आणि पार्ट्यांमधे पैसे उडवतात हे अत्यंत चुकीचं व अतिरंजित विधान आहे. आपण त्यांच्यात न मिसळण्याचं खरं कारण आपल्या मनात आहे. आपल्यालाच त्यांच्याशी मैत्री करण्याची कन्फर्ट लेव्हल नसते. हे फक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत नव्हे तर इकडे नोकरीला आलेल्या कुटुंबांमधे पण दिसून येतं. ही कुटुंब सहसा भारतीय वस्ती जास्त असलेले विभाग रहाण्यासाठी पसंत करतात.

>> भारतीय विद्यार्थ्यांसाठी किलकिली असलेली त्यांची दारं अलीकडच्या आर्थिक मंदीमुळेही सताड उघडली आहेत.

माझा आक्षेप 'आर्थिक मंदीमुळे' या शब्दांना आहे. त्यांची दारं पूर्वीपासून सताड उघडी होती. तेव्हा आपल्याकडे तितका पैसा नसायचा, हल्ली वाढला आहे शिवाय बँकाचं कर्ज मिळणंही सुलभ झालं आहे. याची जाणीव झाल्यामुळे हल्ली तिकडच्या विद्यापीठांचं आपल्याकडचं मार्केटिंग वाढलं आहे.

>> परदेशात दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणवून वागणूक मिळाली तरी त्यांना त्यात वावगे वाटत नाही
इकडच्या सर्वांनाच दुय्यम दर्जाचे नागरिक अशी वागणूक मिळते हे यातून सूचित होतंय ते अत्यंत चुकीचं आहे!

>> वर्क व्हिसा मिळाला की, गुणवत्तेवर चालून येणारी रग्गड पगाराची नोकरी
डिग्री मिळाल्यावर रग्गड पगार मिळतो हा एक भ्रम आहे. २०११ मधले पगार वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधे असे होते...
The most generous salaries are those on offer from investment banks (average of £42,000),
law firms (average of £38,000) and oil & energy companies (average of £32,000). Public sector employers (average of £22,200), retailers (average of £24,000) and engineering & industrial companies (average of £24,500) have the lowest graduate pay rates for 2011.
त्यातले इन्व्हेस्टमेंट बँक आणि लॉ कडे जाणारे अगदी कमी आहेत. आपल्याकडच्या आयआयएम अहमदाबादच्या टॉपच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या पगारावरून सर्वच एमबीएंना तसे पगार मिळतात हे विधान जितकं चुकीचं आहे तितकंच सगळ्यांना ४२००० पौंड पगार मिळेल हे! आणि २५००० पौंड पगार हा कुठल्याही स्टँडर्डने रग्गड नाही हे सर्व इंग्लंडवासी सांगतीलच!

ललितादेवी,

>> परदेशातलं सगळंच आपल्या देशापेक्षा छानछान ही मानसिकता त्यामागे असेल का?

नक्की सांगता येत नाही. पण कुतूहल नक्कीच असतं.

घरापासून दूर आल्यावर एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं. तेही कधीकधी चुकून असंगाशी संग घडवून आणतं.

आ.न.,
-गा.पै.

खूपच चांगला चर्चाविषय आहे.
मी अमेरिकेतल्या कोणत्या मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकले नाही पण कम्युनिटी कॉलेजमध्ये गेले होते. रात्रीच्यावेळचेच क्लासेस करणे जमले. त्यावेळी सहाध्यायींशी बोलताना प्रचंड जागरूक असायचे. एकदोनदा माझ्याकडूनही नको ते बोलणे चुकून झाले. त्यापुढे तर आणखी काळजी घेतली. रात्री घरी येण्यासाठी फक्त आणि फक्त फ्रीवे आणि सुरक्षित समजल्या जाणार्‍या एका गावातूनच जात येत असे. ग्रूपशिवाय एकट्या कोणाशी बोलणे फारसे केले नाही. दोनदा माझी खोडी काढण्यासाठी असेल किंवा गरजेपोटी कोणीतरी माझी पुस्तके चोरली. २००$ ची पुस्तके गेल्याने तिडीक आली होती पण तोविषय काढायला चांगलीच घाबरले होते.;) ऑस्ट्रेलियात चाललेया घटना डोक्यात पक्क्या बसलेल्या होत्या. निघताना रोज घरी फोन करून मी निघालिये हे कळवत असे. रात्री एकदाच गॅसस्टेशनवर थांबण्याची वेळ आली होती. अनेक मैल कोणी नाही, जोरात बर्फ सुरु होते. ते भयाण वातावरण लक्षात राहिले. नुकतेच माझ्या भाच्याने मास्टर्स केले त्यावेळीही तो किती काळजी घ्यायचा हे त्याने सांगितले होते. मित्रांबरोबर जाण्याची ठिकाणे आणि वेळ याबाबत तो पक्का होता. स्वत:ची कार घेऊनच जात असे. मित्रांना उशीर होणार असल्यास आपापले घरी वेळेत येण्याच्या त्याच्या सवयीचे कौतुक वाटले. आमच्यासाठी दिल्ली अजून थोडीशी दूर असली तरी काळजी वाटतेच.

चिमण, मुद्दे उत्तम आहेत. अनुभवाअंती आलेले आहेत. Happy

विद्यार्थी नोकरीसाठी चेन्नईऐवजी न्यूजर्सीला प्राधान्य देतात यात लेखिकेला काय त्रास झाला ते ही अगम्य आहे
>>>
कदाचित लेखिकेला असं म्हणायचंय की - चेन्नई म्हटलं की आपण विचार करू - नको बाबा तिकडे लांब साऊथमधे, वातावरण कसं असेल कुणास ठाऊक, काही इमर्जन्सी आली तर इकडून मदतीला जायलाही किती वेळ लागेल ... पण हेच न्यूजर्सीत अ‍ॅडमिशन मिळतेय हे कळताच आपण हुरळून जातो. परका देश, सुरक्षितता हे मुद्दे मग आपल्याला दुय्यम वाटायला लागतात.

२५००० पौंड पगार हा कुठल्याही स्टँडर्डने रग्गड नाही हे सर्व इंग्लंडवासी सांगतीलच!
>>>
रुपयांत कन्व्हर्ट करण्याचीही सवय असतेच ना भारतीयांना. विशेषतः आई-वडील भारतात आणि मुलगा/मुलगी परदेशात नोकरी करणारा/री असतील तर हा हिशोबच फक्त केला जातो. आणि मग रुपयांच्या भाषेत २५००० पौण्ड पगार रग्गड वाटणारच.

भारतातून येणार्‍या मुलांजवळ महागडे लॅपटॉप, फोन वगैरे उपकरणे असतात त्यामुळेही या मुलांवर हल्ले होतात
>>>
यामागेही परदेशाचं आकर्षण आणि मीरानं म्हटल्याप्रमाणे मानसिक गुलामगिरीच असू शकेल. चेन्नईला शिकायला निघालेल्या विद्यार्थ्यापेक्षा न्यूजर्सीला शिकायला निघालेल्या विद्यार्थ्याचे पालक त्याला अधिक महागडी गॅजेटस् घेऊन देत असावेत का? कारण तिकडे सगळं छानछान अशी समजूत असते, तिकडची श्रीमंतीच तेवढी तोपर्यंत पाहून माहिती असते. मग आपलं मूल मागे नको पडायला असा विचार केला जातो.

लोकहो, चर्चा तर चालू ठेवाच. धोके, सुरक्षिततेचे उपाय हे हवेतच. त्याचबरोबर काही सुखद अनुभवही हवे आहेत Happy

यामागेही परदेशाचं आकर्षण आणि मीरानं म्हटल्याप्रमाणे मानसिक गुलामगिरीच असू शकेल. चेन्नईला शिकायला निघालेल्या विद्यार्थ्यापेक्षा न्यूजर्सीला शिकायला निघालेल्या विद्यार्थ्याचे पालक त्याला अधिक महागडी गॅजेटस् घेऊन देत असावेत का? कारण तिकडे सगळं छानछान अशी समजूत असते, तिकडची श्रीमंतीच तेवढी तोपर्यंत पाहून माहिती असते. मग आपलं मूल मागे नको पडायला असा विचार केला जातो.>> >> परदेशात सगळेच लोकं अशा महागड्या वस्तु वापरताना दिसत नाहीत. माझ्या एका मैत्रीणीजवळ अजुन डिजिटल कॅमेराही नाहीये! अर्थात हे खुप टोकाचे उदाहरण झाले. पण सर्वसामान्य लोकांकडे अशा वस्तु नसतात आणि असल्या तरी त्याचे प्रदर्शन होत.
(तुम्हीच श्रीयुत वत्सला ना?)>> हो!

सुखद अनुभव पण बरेच येतात! आमचे लग्न झाले तेव्हां निनाद शिकत होता. इथली गरज म्हणुन त्याने एका ऑस्ट्रेलियन वयस्कर माणसाकडुन एक गाडी विकत घेतली. जुन्या गाड्या घेऊन त्यावर काम करुन विकण्याचा या माणसाचा छंद-धंदा होता. त्या माणसाने निनादकडुन थोडे पैसे घेतले आणि गाडी घेऊन जा, बाकीचे पैसे जमतील तसे दे म्हणाला. मी इथे आल्यावर शेवटचे उरलेले $१०० द्यायला आम्ही गेलो तर त्याने 'spend it on your wife' असं म्हणत पैसे घेतले नाहीत.

चांगला विषय आणि चर्चा चालू आहे.

चिमण ,वत्सला, वास्तववादी मुद्दे
चेन्नई म्हटलं की आपण विचार करू - नको बाबा तिकडे लांब साऊथमधे, वातावरण कसं असेल कुणास ठाऊक, काही इमर्जन्सी आली तर इकडून मदतीला जायलाही किती वेळ लागेल >>> हे अगदी खरय.

एकुण चर्चा उत्तम चालली आहे. (मी एवढं मोठं कधी वाचत नाही. पण हा विषय असा आहे की "बाप मोड" आपोआप ऑन झाला). सर्वप्रथम हा धागा सुरू करणारीचं अभिनंदन ! मला वाटतं ही अनंतकाळ पर्यंत चालणारी चर्चा आहे. मला सगळ्यांचे विचार पटले. पण त्यातही चिमणचे जरा जास्तच. यामध्ये आणखी काही बर्‍या-वाईट आणि वेगवेगळ्या देशातल्या अनुभवांची भर पडली की हा धागा एक माझ्यासारख्या बापांसाठी रेडी रेकनर बनायला हरकत नाही. Happy

बहुतांश ठिकाणी कॉमन सेन्सनी वागले की संकटे येत नाहीत. प्रश्न हा असतो की कुठला कॉमन सेन्स काय आहे. याबाबत आई-वडिलांनी इथे आलेल्या छोट्या मुद्द्यांव्यतिरीक्त खूप विचार करण्यात काही अर्थ नाही. लोकल्स कडुन ती माहिती मिळवणे उत्तम - आणि वेळोवेळी त्यात भर घालायची.

कधिकधि आपण जास्तच बाऊ करतो. पॅसॅडेनाला आल्यावर अनेक वर्षे रात्री लॉस अँजल्स डाऊनटाऊन मधे ड्राईव्ह करुनपण जात नसे. पण बहुतांश भागात ड्राईव्ह करायला प्रॉब्लेम नसतो.

रात्री एकटे न फिरणे, जास्त कॅश न बाळगणे, ऑबव्हियस खटकणारे वर्तन न करणे हे सगळे कॉमन सेन्सचे प्रकार झाले. If in doubt, don't.

मला काही कुठ परदेशात शिकायचा अनुभव नाही आणि स्व्तःच्या जीवापेक्षा कोणताही उपदव्याप मोठा नाही हे पटते तरीपण या बीबीवर इतकी काळजी घ्यावी किंवा घेतली असं सांगणार्‍या लोकांचि कमाल वाटते. ग्रूपशिवाय कुणाशीच एकटं कधीच न बोलणं म्हणजे अतीच. एकवेळ सुरूवातीला ठिक आहे पण कायमच असं वागणं म्हणजेकमाल आहे.
इथे मुंबईतसुद्धा आमच्या कॉलेजात मराठवाडा वैगेर विभागातून येणार्‍या काही जणी अश्याच घेट्टोत राहात .
आधीच्या पोस्टमधला कॉमनसेन्सवाला मुद्दा पटला.

आपण कुठेही शिकायला म्हणजे फक्त अभ्यास करायला आणि नोकरिला म्हणजे पैसे कमवायलाच जातो का? बाकी तिथल्या समाजाचा मग तो भारतात असो किंवा परदेशात भाग व्हायचा प्रयत्न आपण कधी करणार?

इतक्या सार्‍या काळज्या घेऊन कुठेही राहायचं तर मी म्हणेन, "ये जीना भी कोई जीना है लल्लू"

सातीला अनुमोदन.
असं घेट्टो करून राहण्यानेच प्रॉब्लेम जास्त येतात. गैरसमज, दर्‍या, अढी वाढायला मदत होते.
चिमण आणि चंबू यांच्या पोस्टस पटल्या.
लले तुला सुखद अनुभव हवेत का? खंडीभर आहेत. देऊ?

तर सुखद अनुभव..
मी थिएटर डिपार्टमेंटला शिकायला गेल्याने एकही देसी व्यक्ती संपूर्ण डिपार्टमेंटला नव्हती. हे माझ्या पथ्यावर पडले. आपोआपच घेट्टोमधे खेचले जाणे झाले नाही. माझी कागदपत्रे खूप ऐनवेळेला आल्याने मी अगदी रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या दिवशी पोचले होते युनिव्हर्सिटीत. काहीच झेपत नव्हतं. जेटलॅग प्रचंड होता. त्यात सुधुरबुधुर तुटलेली अवस्था. पहिल्याच दिवशी आपलं तर्खडकर इंग्लिश कोणालाही समजत नाहीये आणि त्यांचं बोलणं मला पटकन समजत नाहीये हे लक्षात येऊन फ्रस्ट्रेशन आलं होतं. त्यात प्रचंड न थांबणारा खोकला. अश्या वेळेला माझी कॉ. शॉप मॅनेजर टिना आणि अ‍ॅडव्हायजर सिल्व्हिया या दोघींनी अक्षरशः मला पंखाखाली घेतलं होतं. तुझा इन्शुरन्स आहे त्यामुळे तू हेल्थ सेन्टरमधे जाऊन फ्री कन्सल्टेशन घेऊ शकतेस. आणि अगदी नॉमिनल रेटमधे तुला औषधे मिळतील तिथेच. हे ही मला माहित नव्हते तर सांगितले होते. माझ्या अपार्टमेंटमधे बेसिक सोयी आहेत ना. याची जातीने चौकशी केली होती. कार्पेट असतंच त्यामुळे त्यावर एक रजई/ ब्लँकेट टाकून झोपायचे असा माझा इरादा होता. मॅट्रेस आणायला कोण जाणार? आणि ती घरापर्यंत आणायची कशी असे बरेच प्रश्न होते तर टिनाने तिच्या गेस्टरूममधली मॅट्रेस काही न बोलता माझ्या अपार्टमेंटमधे आणून टाकली. पुढे दोन वर्ष मी तीच मॅट्रेस वापरली. सदर्न हॉस्पिटॅलिटीचा खानदानीपणा जामच जाणवला होता तेव्हा.

आमच्यापासून केवळ ३५ मैलावर असलेल्या ग्विनेट काउंटीमधे ट्रिपल के ची रॅली झाल्याची बातमी आमच्या स्कूल न्यूजपेपरमधे होती. तोवर ट्रिपल के बद्दल थोडंफार कळलं होतं आणि नाही म्हणलं तरी घाबरायला झालं होतं. कॉश्च्युम शॉपमधल्या सगळ्या ग्रॅड-अंडरग्रॅड स्टुडंटस आणि शॉप मॅनेजर सगळ्यांनी त्यासंदर्भात मला खूप छान्पणे कम्फर्ट केलं होतं.

समर इंटर्नशिपसाठी सान्टा फे ला मी गेले होते. अ‍ॅथेन्समधलं अपार्टमेंट सबलीज केलं होतं त्यामुळे माझं सगळं सामान कुठे ठेवायचं हा प्रश्न होता. तर डॉ फर्ली रिचमंड, जो मला इथून निवड करून तिकडे घेऊन गेला होता त्याने त्याच्या बेसमेंटमधे २-३ महिने तो पसारा ठेवून घेतला होता. ३ ही वर्षातल्या उन्हाळ्यांमधे.

असे अजून खूप आहेत. पटकन आठवलेले हे काही.

साती +१. पटलं.

आपण आपल्या कंपुतच रहातो. तिकडे गेलं तरी तिकडच्या लोकात मिसळणं टाळतो. मग पर्यावसन आपल्याला टाळण्यात होत. इथुन जी मुलं जातात त्यांच्या मागे त्यांची कुटुंब असतात. पैसे तर पाठवतातच परत मॉरल सपोर्ट ही असतो. सगळ्यांचेच आई वडिल श्रीमंत असतात असे नाही, तिकडे गेलेली मुलं नोकर्‍या करतात, अभ्यासही करतात. म्हणजेच काय आपण दुरदेशी शिकायला आलो आहे, त्या मुळे एक काहीतरी गोल त्यांच्या नजरेसमोर असतं. परत कुटुंबाचा पाठींबा, अपेक्षा. आपल्याला नक्की काय हवय हे बर्‍याच मुलांन्ना माहीत असते. तिकडे जमलं तर ठीक, नाहीतर त्यांच्या देशाचा पर्याय त्यांन्ना असतोच. अत्ताच माझ्या बॉस च्या मुलीची केस डोळ्या समोर आहे. ती खुपच चांगली स्टुडंट होती. इकडे धीरुभाई अंबानी मधुन आय्.बी. १२वी करुन ती लंडन ला गेली. इकडे प्रचंड श्रीमंतीत राहीलेली, तिकडचे साधे रहाणे तिला मानवेना. ती मॅनेजमेंट मध्ये डीग्री घ्यायला गेली होती. तिने तिकडे २ वर्ष राहुन इकडे परत येण्याचा निर्णय घेतला. इकडे आली, इथे व्यवस्थीत प्रवेश परिक्षा देवुन एम्.बी.ए. करत आहे. तिचा निर्णय धाडसाचा खरा, पण तिला आणि कुटुंबीयांन्ना योग्य वाटला. कुटुंबाने तिला सपोर्ट केलं.
तिकडच्या मुलांन्ना हा कौटुंबीक सपोर्ट मिळेलच असे नाही. अनेक मुल स्वतंत्र पणे आपली वाटचाल करत असतात. त्यांन्ना मॉरल सप्पोर्ट साठी मित्र मैत्रिणीं शिवाय कोणीच नसते. मग कुठे तरी भारतियांचा तिरस्कार सुरु होतो. आणि मग असे हल्ले होतात.

तिकडच्या मुलांन्ना हा कौटुंबीक सपोर्ट मिळेलच असे नाही. अनेक मुल स्वतंत्र पणे आपली वाटचाल करत असतात. त्यांन्ना मॉरल सप्पोर्ट साठी मित्र मैत्रिणीं शिवाय कोणीच नसते. मग कुठे तरी भारतियांचा तिरस्कार सुरु होतो. आणि मग असे हल्ले होतात. >>> हे नाही पटलं! अमेरीका किंवा इतर प्रगत देशांतली परिस्थिती माहित नाही पण ऑस्ट्रेलियात अशी परिस्थिती नाही. अलिकडेच एका लॉयर मित्राच्या २२ वर्षांच्या मुलाचा अ‍ॅक्सीडंट झाला. तो मुलगा बरेच दिवस कोमात होता. त्यातुन बाहेर आला पण अपंग झाला. त्याच्या वडीलांनी १ महिना सुट्टी घेतली आहे केवळ मुलाचे पुनर्वसन करण्यासाठी. अजुन एका मित्राचा १९ वर्षांचा मुलगा मित्रांबरोबर रहाण्यासाठी गेला आहे. त्याबद्दल बोलताना त्याचे आई-वडील भावनाविवश झाले होते. आपल्याएव्हढी नसली तरी बर्‍याच प्रमाणात इथे कुटुंबसंस्था महत्वाची मानली जाते.

Pages