'अनुज बिडवे'नंतर...

Submitted by ललिता-प्रीति on 9 January, 2012 - 01:34

अनुज बिडवेसंबंधीची बातमी मी गेले काही दिवस फॉलो करते आहे.
त्या घटनेतलं कारुण्य दुर्लक्षित करायचं नाहीच. पण तरीही परदेशात राहून शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांबद्दलचे इतर अनेक विचार डोक्यात घोळतायत. माझा मुलगा येत्या चार वर्षांत पदवीधर होईल. त्यापश्चात त्याच्यापुढेही परदेशी शिक्षणाचा पर्याय खुला होईलच. त्यामुळे तर सध्या त्या बातमीशी, संबंधित तपशीलांशी मी अधिक रिलेट होते आहे.
परदेशी विद्यापीठांतल्या प्रवेशपध्दती, त्यासाठीची अर्थयोजना, व्हिसाची तयारी या बाबींबद्दल उघड चर्चा होतात, सल्ले मिळतात. मात्र विशीच्या उंबरठ्यावरच्या मुलांच्या तिथं जाऊन राहण्यासाठीच्या मानसिक तयारीविषयी फारसं काहीच बोललं जात नाही.
यासंदर्भात आजच्या लोकसत्ता-करियर वृत्तांत पुरवणीत एक चांगला लेख आला आहे.
लेख वाचताना जाणवलं की मायबोलीवर असे अनेक आहेत की ज्यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं आहे.(माझ्या नजरेसमोर पहिलं नाव आलं ते अ‍ॅंकीचं.) तर हा धागा त्यांचे अनुभव, विचार ऐकण्यासाठी आहे.
आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी मुळीच पाठवू नये असं मी आजही म्हणणार नाही. पण त्यासाठीच्या मानसिक तयारीकडे अधिकाधिक लक्ष पुरवावं हा आग्रहही धरेन.
तर,
- परदेशी शिक्षण घेऊन भारतात परतलेले
- परदेशी शिक्षण घेऊन आता अर्थार्जनासाठी परदेशातच वास्तव्य असलेले
- भारतात शिक्षण घेतलेले पण आता परदेशातल्या वास्तव्यात या प्रकारच्या बाबी संवेदनशील मनानं टिपणारे
अशा सर्वांचं मतप्रदर्शन इथे अपेक्षित आहे.
‘संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर’ या धाग्यावर ज्याप्रमाणे निखळ चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण होते, त्याच प्रकारची चर्चा इथे होईल अशी आशा आहे. (प्रतिसाद देण्यापूर्वी दिलेल्या लिंकवरचा लेख संपूर्णपणे वाचावा ही नम्र विनंती. कारण त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानंच इथली चर्चा अपेक्षित आहे.)
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनोळखी जागा ही इतर कुठल्याही ओळखीच्या जागेइतकीच सुरक्षित अन असुरक्षित असते हे कायम डोक्यात ठेवायला हवं.<<<
सोला आने सच.

अँकी Happy

तर असं परदेशात सगळं सेफ असतं... लंडनमधे तुम्ही रस्ता चुकून हरवूच शकत नाही... वगैरे डोक्यात भरून गेल्यामुळे >>> एक्झॅक्टली !! जनजागृती पहिली या आणि अशाच मुद्द्यांवरून व्हायला हवी.

नीरजा, अँकी, (आणि इतरही) अजून लिहा तुमचे अनुभव.

माझ्या युनिव्हर्सिटीचा कॅम्पस अनसेफ (विशेषतः मुलींसाठी) म्हणून घोषितच होता. त्यामुळे युनिव्हर्सिटीची स्वतःची एस्कॉर्ट व्हॅन सर्व्हिस होती. (एस्कॉर्ट सर्व्हिसचा इतर कुठलाही चावट अर्थ घेऊ नये) हे बहुतेक बर्‍याच युनिव्हर्सिटीजमधे असू शकेल. बसेस संध्याकाळी बंद झाल्यावर कॅम्पसमधल्या कॅम्पसमधे किंवा कॅम्पस पेरिफेरीवर तुम्हाला कुठूनही कुठेही गाडीतून सोडले जायचे. या सर्व्हिसचे, कॅम्पस बसचे आणि सिटीबसचे(युनिव्हर्सिटी टाऊन असल्याने स्टुडंट आयडी असेल तर फ्री राइड) मिळून एक $३०-४०/ सेमिस्टर घेतले जायचे.
गाडी नसल्यामुळे मी नेहमीच कॅम्पस पेरीफेरीवर असलेल्या अपार्टमेंटसमधे राह्यले त्यामुळे रात्री २ पर्यंत कधीही डिपार्टमेंटमधून किंवा लायब्ररीमधून घरी जायला मी या सर्व्हिसला फोन करायचे. कॅम्पस फोन्सवरून सर्व्हिसला फोन करायचा तर तोही टोल फ्री होता. एक्झॅक्ट किती वेळात गाडी येईल तेही सांगितले जायचे जेणेकरून गाडीची वाट बघत खूप वेळ बाहेर रस्त्यावर उभं रहायला नको. आणि एखादी वेळ वगळता तीन वर्षात गाडी वेळच्या वेळेसच आल्याचं मला आठवतंय.
कॅम्पस अनसेफ असल्याने आपल्या डिपार्टमेंटपासून पार्किंग लॉटपर्यंत जातानाही(लांब असेल तर) या सर्व्हिसला कॉल करा असे सांगितलेले होते.
अनेकदा देसी स्टुडंटस विशेषतः मुलग्यांना याची लाज वाटताना मी बघितलेय. ही लाज वाटण्याची गरज नाही. हे आपल्या सुरक्षिततेकरता आहे आणि आपण त्यासाठी दर सेमिस्टरला पैसे भरतो तर ती सर्व्हिस वापरायला हवी.
मुंबईपुण्यासारख्या (किंवा इतरही गजबजलेल्या शहरांतून) शहरातून परदेशात युनिव्हर्सिटी टाउनमधे गेलेल्यांना गोंधळायला होतेच. शहरातल्या गर्दीमुळे उशीरापर्यंत जाग असते आणि आपल्या माहितीचे असल्याने आपण कितीही वाजता फिरू शकतो (अपवाद असतातच) पण युनिव्हर्सिटी टाऊन म्हणजे मुळातले छोटे खेडे ज्यात युनिव्हर्सिटी हा एकमेव गजबजलेला प्रकार असतो. त्या खेड्यात युनिव्हर्सिटी सोडली तर रेस्टॉरंटस, क्लब्ज, थोडेफार शॉपिंग, ग्रोसरी स्टोअर्स आणि तत्सम गोष्टीच जास्त असतात. इतर काही नाही. त्यामुळे गर्दी, गजबज कमी असते. हे लक्षात ठेवावे.

यू जी ए ची एस्कॉर्ट व्हॅन सर्व्हिस माझ्यासाठी तरी अतिशय सुखद अनुभवांच्यातली एक होती.

अनोळखी जागा ही इतर कुठल्याही ओळखीच्या जागेइतकीच सुरक्षित अन असुरक्षित असते हे कायम डोक्यात ठेवायला हवं.<<<
अगदी बरोबर अँकी.

मी अलीकडेच बोस्टन ला आलो माझ्या प्रोजेक्ट साठी. हा धागा वाचुन आता भिति वाटतीय. लोक इथे मदत करतात पण खुप. मला पहिल्याच दिवशी एका अमेरिकन कलिग ने विचारलं कि आता इथे इंडियन कोण आहे ते शोधणार का? मी म्हटलं हा बाबा असं का विचारतोय. तर तो म्हणे कि "तुझ्य आधि आलेले ईंडियन्स आल्या आल्या ग्रुप बनवायचे आणि आमच्याशी बोलायचेच नाहीत" ...........

Pages