जान है तो जहान है!

Submitted by निनाद on 9 January, 2012 - 22:35

जान है तो जहान है!

भारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. हा हल्ला वंश द्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.

पण असे हल्ले कुणावरही मेलबर्न मध्येच नाही तर जगात कुठेही, भारतात, मुंबईत, पुण्यात, बंगळुरु मध्येही होऊ शकतात, हे मात्र आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आपली सुरक्षितता आपणच आधी पाहायची असते. यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी हे सांगण्याचा या निमित्ताने हा प्रयत्न. यातले सल्ले योग्य नसतील तर अवश्य सांगा. त्याबरोबर सुरक्षेचे तुम्हाला योग्य वाटलेले उपायही द्या.
--
सुरक्षा उपाय

* - तुमचा आतला आवाज जर सुरेक्षेसाठी साद घालत असेल तर ऐका! सुरक्षेसाठी तुमच्या सिक्थ सेंस वर भरोसा ठेवा. तुमची असुरक्षित असल्याची भावना तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवत असते हे लक्षात घ्या!
* - कायम सतर्क रहा आणि आत्मविश्वासाने चाला. गोंधळल्या सारखे फिरू नका. चुकले असलात तरी! तुमची आत्मविश्वासू चाल हल्लेखोराचा आत्मविश्वास डळमळवते.
* - शक्य असेल तर पर्सनल अलार्म बरोबर बाळगा. त्याच्या आवाजाने त्वरित मदत मिळू शकते आणि हल्लेखोर घाबरू शकतो.
* - संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर पार्क सारख्या अंधारल्या आणि निर्जन जागा टाळा, शक्य असेल तर सोबतीला कुणी येते आहे का ते पाहा. कुणी बरोबर नसल्यास दुरचा असला तरी सुरक्षित मार्गच वापरा.
* - किमती वस्तू दागिने अंगावर बाळगणे टाळा पण काही पैसे मात्र नक्की बरोबर ठेवा. (काही वेळा लुटारू काहीच मौलवान मिळाले नाही म्हणूनही मारहाण करू शकतात.)
* - अनोळखी लोकांशी बोलणे टाळा. प्रसंगी तसे वागणे उद्धट वाटले तरी 'सुरक्षा प्रथम' हे ध्यानात घ्या.
* - कुणी तुमचा पाठलाग करते आहे असे वाटले तर त्वरित गर्दी / लोक आहेत अशा ठिकाणी जा, पोलिसांशी संपर्क साधा, मदत मागा.
* - अनोळखी ठिकाणी मद्यपान व पेय पान करू नका. अनोळखी लोकांकडून खाद्य-पेय स्विकारू नका.
* - शक्य असेल तर ज्युडो कराटे शिकवणारा स्व-संरक्षणाचा एखादा कोर्स करा.

सार्वजनिक रेल्वे बस इत्यादी वापरताना

* -एकटे असाल तर शक्य तोवर वाहनाची वाट पाहणे टाळा आपल्या वेळापत्रकाची माहिती करून घ्या आणि वेळेवरच पोहोचा.
* - रेल्वेचे तिकिट घेतांना स्टेशनवरील व्यक्तींचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करा.
* - सुरक्षित वाटत नसेल तर गाडी येई पर्यंत स्टेशनवर जाणे टाळा.
* - जवळपास क्लोज सर्किट कॅमेरे असतील त्याच्या रेंज मध्येच रहा.
* - कुणी तुम्हाला त्रास देत असेल असेल तर त्या व्यक्तीला तसे न करण्या विषयी ओरडून सांगा. त्यामुळे इतरांचे लक्ष तेथे वेधले जाईल. आणि ती व्यक्ती बचावात्मक धोरण स्विकारेल. शक्य असेल तर सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांना बोलवा.
* - बस स्टॉपवर असाल तर पुर्ण उजेड असलेल्या ठिकाणी थांबा. शक्य असेल तर इतर लोकांसोबत राहा.
* - शक्य तोवर रेल्वेचे पुर्ण रिकामे डबे टाळा. शक्य असेल तेंव्हा ड्रायवरचा मागचा डबा वापरा.
* - एकटेच टॅक्सीने जाणार असाल तर हात दाखवून टॅक्सी बोलावण्या पेक्षा फोन करून टॅक्सी बोलवा. या मुळे तुम्ही टॅक्सी बोलावल्याची नोंद झालेली असते.
* - टॅक्सीच्या नंबरची नेहमीच नोंद ठेवा. ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला (क्लीनर साईडला) बसा. बोलतांना अनोळखी ठिकाणी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नका.

कारने जातांना

* - आपली कार परत आल्यावरही भरपूर प्रकाश असलेल्या सुरक्षित अशा ठिकाणीच पार्क करा.
* - कार लॉक केली आहे हे पाहून घ्या. कारच्या किल्ल्या सुरक्षित ठेवा.
* - आपल्या कारच्या आसपास संशयास्पद व्यक्ती दिसत असल्यास कार पासून दूरच राहा, शक्य असल्यास इतरत्र मदत मागा.
* - अनोळखी ठिकाणी कार पार्क केली असेल तर कार मध्ये शिरण्यापूर्वी मागच्या सीटवर आणि सीटच्या खाली कुणी नाहीये, हे पाहून मगच कारचे दार उघडा.
* - एकदा कार मध्ये बसल्यावर सर्व दारे आतून लॉक करून घ्या आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचे पर्यंत काचा वरच/बंद ठेवा.

फोन

* - सार्वजनिक फोनला आवश्यक असलेली चिल्लर कायम स्वतः बरोबर ठेवा. मोबाईल फोन हरवल्यास/चोरीला गेल्यास अथवा सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला मित्रांना, नातेवाईकांना किंवा पोलिसांना फोन करता येईल.
* - पब्लिक बुथ मधून फोन करत असलात तर डायल केल्या नंतर फोन कडे पाठ करून उभे राहा म्हणजे बाहेर काय चालले आहे हे तुम्हाला सतत दिसत राहील.
* - कुणी तुम्हाला धमकी देत तर असेल वाट पाहू नका, त्वरित पोलिसांना फोन करा.
* - आपत्काळात मदतीसाठी फोन केल्यावर प्रथम नाव सांगा व परिसराचे नाव माहिती नसल्यास दिसणार्‍या प्रमुख खाणा-खुणा सांगा.

या झाल्या प्राथमिक सुरक्षेच्या गोष्टी.
आता वैयक्तिक सुरक्षा विस्ताराने पाहु या.
आपल्या सुरक्षेचा विचार करून ठेवणे हिताचे असते.त्यासाठी एक योजना बनवलेली हवी.

* सुरक्षा योजने विषयी नातेवाईकांशी, मित्रांशी बोला
* त्यात काही तृटी आहेत का ते वारंवार तपासून पाहा.
* इतर लोक आपली सुरक्षा कशी सांभाळतात याचाही आढावा घ्या.
* त्यांच्या योजनेतले तुम्हाला उपयोगी पडणारे भाग तुमच्या योजनेत घेवून टाका!

मात्र लक्षात ठेवा तुम्हाला जी योजना सर्वात सुरक्षित वाटते, तीच तुम्हाला योग्य आहे.

* - 'असा हल्ला माझ्या कधी होणारच नाही' असा विचार करू नका. परिस्थिती सांगुन येत नसते!
* - तुमची सुरक्षा धोक्यात असेल तर मदत मागायला मागे-पुढे पाहू नका.
* - आपत्काळात कुणाशी संपर्क साधणार आहात याची यादी ठेवा. शक्य तो फोन नंबर्स पाठ करा. शक्य नसेल तर लिखित स्वरूपात जवळ ठेवा. मोबाईलवर विसंबू नका!

आपल्या सुरक्षा योजनेचे भाग तपासून घ्या

* - मी जेथे जाणार आहे तेथला सर्वात सुरक्षित कार पार्क कुठे आहे?
* - सगळ्यात जवळचा बस स्टॉप/ रेल्वे स्टेशन कुठे आहे?
* - मी नेहमी जात येत असलेल्या इमारतींची सुरक्षा दारे कुठे आहेत ते पाहून ठेवा.
* - येण्या जाण्याचे सर्वात सुरक्षित मार्ग पाहून ठेवा आणि नेहमी तपासत राहा.
* - येण्याजाण्याच्या मार्गावर प्रकाश आहे का ते पाहून घ्या.
* - माझ्या रोजच्या मार्गावर कुणी चढून बसण्या जोगी झाडे आहेत का? अथवा अशी ठिकाणे आहेत का याचा विचार करा. असल्यास तेथून सुरक्षित अंतर किती याचा विचार आधीच करून ठेवा.
* - सर्वात जवळचा सार्वजनिक फोन कुठे आहे ते पाहून ठेवा.
* - वेळ प्रसंगी कुणाला सोबत घेवून जाऊ शकतो याचा विचार करून ठेवा. इतरांना सोबत म्हणून जात जा. (म्हणजे इतरही तुमच्या सोबत येतील!)
* - तुम्ही असलेल्या ठिकाणाहून सुरक्षितरित्या पळून जाण्याचा माग कोणता आहे हे पाहून ठेवा!
* - पळून जाऊन सुरक्षा घेण्यासाठी कुठे जाणार आहात याचा विचार करून ठेवा. तशाच मार्गाचा विचार करून ठेवा.

तुम्ही सर्वसाधारण कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त थांबून काम करणार असाल तर

* - तुमच्या सोबत कुणी असेल असे पाहा, नसल्यास तुम्ही तेथे आहात याची कल्पना अजून कुणाला तरी देवून ठेवा.
* - चपळाईने निसटण्यासाठी दारांच्या आणि कारच्या किल्ल्या हाताशी ठेवा.

स्व संरक्षण
स्व संरक्षणाची अशी कोणतीही एकच पद्धत अस्तित्त्वात नाही. निरनिराळ्या परिस्थितीत वेगवेगळे उपाय कामी येतात.
प्रतिहल्ला - तुमच्यावर हल्ला झाला प्रतिहल्ल्याने हल्लेखोर गोंधळतो, घाबरतो आणि तुम्हाला पळायला आवश्यक असलेला क्षण मिळतो.
प्रतिहल्ला हा अनेक प्रकारे करता येतो.

* - जोरात ओरडा
* - कानात किंचाळा
* - नाक, गळा डोळे आणि जननेंद्रिये अशा नाजूक ठिकाणी फटका द्या
* - पायावर लाथ मारा
* - बरगडीत कोपर खुपसा
* - तुमच्याकडे असलेली छत्री, पर्स, किल्ल्या, अगदी ओढणीही हल्ले खोराचे डोळे क्षणिक झाकण्यासाठी शस्त्रासारखी वापरता येते हे लक्षात ठेवा. ते वापरून स्वतःला सुरक्षित करा.

शांततेत सुरक्षा
शांततेत सुरक्षा म्हणजे प्रतिहल्ला शक्य नसेल तर काय करावे याची तयारी/चाचपणी.

* - मनाशी खंबिरपणे शांत रहा
* - हल्लेखोरासोबत आत्मविश्वासाने पण नम्रतेने बोला, त्याला हल्ला करण्यापासून परावृत्त करा, त्याचे लक्ष इतरत्र वेधा आणि त्या क्षणी आपली सुरक्षितता शोधा.
* - सर्व बारिक सारीक गोष्टी नजरेने टिपून ठेवा. त्याचा कसा वापर करता येईल याचा विचार करा.

खरे तर सुरक्षेसाठी कोणतीही अशी एकच व्यवस्था आणि योजना शक्य नाही. परिस्थिती आणि व्यक्ती नुसार वागा. रोज व्यवहारात इतके अतिदक्ष राहाणे म्हणजे फार जाचक वाटते. पण हे उपाय केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे तर सर्व ठिकाणी सर्व काळी उपयोगी पडणारे आहेत.
इतके उपाय सांगितले तरी सावधपणाचे संशयात रुपांतर होऊन भयग्रस्त राहू नका! फक्त सावध असा! Happy
आशा आहे की याचा उपयोग होईल.
तुम्हाला अजून काही उपाय माहिती असतील तर मलाही द्या.

- निनाद

गुलमोहर: 

निनाद ई-सकाळवर आलेला लेख माझ्या कडून मिस झाला होता.. बरे झाले ईथे टाकला. अतिशय योग्य उपाय नमूद केले आहेत. खरं तर पहिल्या वाक्यातच सगळ्या लेखाचे सार दडलं आहे, 'आंतरीक मनाची साद'. ती जर प्रामाणिक पणे ऐकली तर बाकीच्या गोष्टी आपसुकच घडतात.
प्रश्न राहतो तो प्रतीहल्ला करण्याचे धारीष्ट/ बळ एकवटण्याचं. त्यासाठी मनाची पुर्ण तयारी असणं फार गरजेचे आहे.

प्रश्न राहतो तो प्रतीहल्ला करण्याचे धारीष्ट/ बळ एकवटण्याचं. त्यासाठी मनाची पुर्ण तयारी असणं फार गरजेचे आहे.>>> अनुमोदन चंबु.

वस्तु चोरण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्यास ती वस्तु सरळ देवुन टाकावी. नितीन गर्गच्या केसमध्ये ज्या टीनएजरने त्याला मारले तो म्हणाला की नितीनजवळचा फोन बघुन त्याने आणि त्याच्या मित्राने हल्ला केला होता!