बटाटेवडे - "तू तळ, मी खाणार आहे.."

Submitted by लोला on 9 December, 2011 - 12:48
batate wada
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४ मोठे बटाटे (उकडल्यावर चिकट न होणारे. Russett किंवा बेकिंग पोटॅटोज चालतील. जुने असावेत.)

५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद

दीड वाटी साधे बेसन
अर्धी वाटी लाडू बेसन (हे रवाळ असते, याने कव्हर चांगले होते. घालायचे नसल्यास साधे बेसन दीड ऐवजी २ वाटी घ्यावे)
१ मोठा चमचा मैदा (ऐच्छिक. कव्हर जाडसर होण्यासाठी.)
१ छोटा चमचा ओवा (ऐच्छिक)

पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)
तेल

क्रमवार पाककृती: 

- बटाटे उकडून गार झाल्यावर मॅश करावे. अगदी गुळगुळीत करु नयेत. थोडे तुकडे राहू द्यावे.
- आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.
- हे वाटण, मीठ, हळद बटाट्यात घालून नीट मिसळून घ्यावे. १ मोठा चमचाभर तेल तापवून त्यात हळद घालून ते तेल बटाट्यावर ओतले तरी चालेल.
- कडिपत्त्याची पाने हाताने तुकडे करुन मिश्रणात घालावी.
- मीठाच्या अंदाजासाठी मिश्रणाची चव घेऊन पहावी.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करुन ठेवावे. तळव्यात दाबून थोडा चपटा आकार दिला तरी चालेल. आकारावर अवलंबून आहे पण दिलेल्या प्रमाणात साधारण १० गोळे होतील.

- साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
- त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
- चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
- फार पातळ होता कामा नये. (२ वाट्या पीठ असेल आणि २ वाट्या पाणी घातले तर पातळ होईल.)

- कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
- पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
- बटाट्याच्या मिश्रणाचा एकेक गोळा पिठात नीट बुडवून तेलात सोडावा. पिठातून बाहेर काढल्यावर लगेच तेलात टाकावा. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. गोळ्याला चिकटलेलेच रहावे.
- वडे सोनेरी रंगावर तळावे, फार लाल करु नयेत.
- एकावेळी खूप वडे तळू नयेत, प्रत्येकाला कढईत नीट जागा मिळेल असे पहावे.
- दुसरा घाणा टाकण्यापूर्वी तेल पुन्हा नीट तापले आहे याची खात्री करावी कारण एक तळण झाले की तापमान कमी झालेले असते.
- तळून झालेले वडे पेपर टॉवेल, कागदावर काढावे.
- पिठाच्या दिलेल्या प्रमाणात सगळे तळून व्हावेत, नाहीतर अर्ध्या प्रमाणात पुन्हा पीठ बनवता येईल.

vada2.jpg

वाढणी/प्रमाण: 
१० वडे ३ लोकांना पुरतील बहुतेक.
अधिक टिपा: 

- वडे शक्यतो ताजे/गरम खावेत.
- वड्याबरोबर पाव तळलेल्या मिरच्या, चिंच-खजूर आंबटगोड चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कच्चा कांदा इ. घेता येईल.
- उपाहार असेल तर बरोबर चहा द्यावा.
- जेवण म्हणून असेल तर नंतर काहीच नाही किंवा दही-भात, सोलकढी- भात चालतो.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीने साइड बिझिनेस म्हणून अ‍ॅडल्ट लाळेरी विकायला घ्यावीत.

<<<आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.>>> यामुळे अगदी वेगळी चव येते का? नेहमी हे चिरून घातले जातात ना? (आमच्याकडे सरप्राइझ एलिमेंट म्हणून ओल्या नारळाचे अगदी बारीक कापही टाकतात).

पाककृतीत इतक्या बारीक बारीक सूचना आहेत (हव्यातच)! पोशन्स मास्टर स्नेपने लिहिलीय की काय?

१० वडे ३ लोकांना पुरतील बहुतेक : दहाव्या वड्यासाठी दंगल झाली तर जबाबदार कोण? Lol

अगदी डिटेलवार रेसिपी !!
कव्हरमधे मैद्याच्या जागी तांदळाचे पिठ वापरले तर कव्हर क्रिस्पी होते.
(मुंबईत बहुदा वेगळे बेसन वापरतात. )

मस्तच. Happy

वडापाव हा या जगातला सर्वोत्कृष्ट पदार्थामधे सेकंड आहे. फर्स्ट पानीपुरी Proud असे माझे ठाम मत आहे. असले फोटो बघून त्या मताला वजन प्राप्त होते. (वडे खाऊन ते आपल्यालापण प्राप्त होतेच)

कॅनी, तू तळ, मी खाणार आहे. Happy

आमच्याकडे लाल-चॉकलेटी रंगाचे वडे आवडतात, त्यामुळे आम्ही कव्हरात हळद-तिखट-हिंग घालतो.

तेलाची मोहरी-जिरं-हिंग हळदीची फोडणी, त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊन वड्याच्या मिश्रणात घालतो. खरंतर आईचं हे कढीपत्ता परतण्याचं लॉजिक (की गिमिक?) मला समजायचं नाही कारण कुरकुरीत झालेला कढीपत्ता भाजीत घातल्यावर मऊ पडतोच, म्हणून मी एकदा हाताने तुकडे करून घातला, पण वो मझा नही आया Happy तसंच आई हल्ली आलं-लसूण-मिरचीचं वाटणही फोडणीत परतून घेते, पण मला नाही आवडली त्याची चव. फोडणीत घातल्यावर त्याचा स्वाद सौम्य होऊन जातो. आईचं म्हणणं, त्यांच्या वाढत्या वयासाठी ते योग्य आहे.

सगळेच फोटो लई लई लई भारी!!

वा वा! ही एका कलाकृतीला दाद आहे.
काल मी भजी पाव घेऊन खाल्ला त्या बरोबरच एक जबरी लाल मिरचीची चट्णी होती. तीपण नंतर हाय हुईकरत खाल्ली. बव ला पर्यायच नाही. कांदे नाही घालायचे का चिरून. ? फॉर द सेक ऑफ प्युरीटी ऑफ द रेसिपी.

मस्त फोटू आणि झकास नाव! पुढल्या वेळी पिठात मैदा आणि ओवा घालणार. नवरा तळेल मी खाणार Happy

झकास!!!! माझी पण सेम रेसिपी आहे. Happy फक्त मी कढईमधे फोडणी तयार करुन सगळं मिश्रण त्यात थोडसं परतते.

मी हे बटाटेवडे खाल्लेत. Happy
१.दिपांजली
२.मैत्रेयी
३. अमृता

काय मस्त झालेत वडे!! तू तळ पण मी दोनच खाईन!:अरेरे: जीभेला लगाम!!
हल्ली खावेसे वाटले तर पार्ल्याच्या बाबूकडून आणून खाणे बरे वाटते. घरी केले की जास्त केले/खाल्ले जातात.

अगो, स्टोअरमध्ये सहसा जुनेच मिळतात. फार्मर्स मार्केट मधले नवीन असतात किंवा स्टोअरमध्ये क्वचित नवे असतात, नवे हाताला ओलसर लागतात आणि स्किन पातळ असते, पापुद्रे दिसतात आणि सहज निघून येते. ठेवून अगदी जुने झालेले, कोंब आलेले किंवा सुरकुतलेली स्किन असलेले वापरु नयेत. नवीन बटाटे ठेवून दिले की जुने होत नाहीत म्हणे.. Happy ते जमिनीतून लवकर काढलेले असतात म्हणून नवीन.
जरुरीपेक्षा जास्त वेळ उकडले तरी चिकट होऊ शकतात. स्किन उकलून पाणी आत गेले की तसे होते. थोड्या पाण्यात किंवा पाणी न घालता मायक्रोवेवमध्येही उकडता येतील.

मयेकर, भरड वाटून चव चांगली येते. वाटण तेलात परतलेले की तसेच हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण न परतलेल्याची चव जास्त चांगली लागते असे माझे मत. कडिपत्त्याचेही तेच.
मामी, कांदा चिरुन.. नो, नो! तो नंतर खाताना कच्चा घ्यायचा.

काय भारी दिसताहेत हे वडे.
अ‍न्कॅनी, खरच तू तळ मी खाते Wink
बारिक बारिक टिपा छानच. तसल्या टिपांमुळेच स्पेशल होत असणार तू केलेले बटाटेवडे.

मिनी, तुझे वडे मस्त दिसतायत.
सायो, कव्हरमधल्या बटाट्यामुळे ते तेल जास्त पीत नाही का? किती घालायचा?

कालच केले होते, फोटो काढणे जमलेच नाही, कारण केल्या केल्या फस्त होत होते. हीच रेसिपी वापरली, फक्त बटाट्याच्या मिश्रणात लिंबू पिळले अन चिमूटभर साखर. चुकून कडीपत्ता पण मिरच्या-आलं-लसून बरोबर वाटला, पण त्याची पण चव मस्तच आली. Happy
कॅनी, तुझा पहीला फोटो जबरी आहे.

हम्म, आता नणंदेने चार लोकांकरता बटाटेवडे केले होते. नुसतं खुसखुशीत होण्याकर्ता घालायचा असावा.

अहाहा, आली आली, रेस्पी आली. आता या कृतीने बटाटवडे करणार.

अनकॅनी यांच्या हातचे गरमगरम ब.वडे खाण्याचा योग आला होता. कढईतून दोन सेकंद पेपरटॉवेलावर निथळून डायरेक्ट बशीत. किती खाल्ले ते आठवत नाही, पण जेवायची गरज उरली नव्हती.

मस्त. फोटो तर क्लासच.
आई बटाट्याच सारण सेम असच करते. कव्हरमध्ये फक्त ओवा घातलेलं बघितल नाही. आई सारखे किंवा तुझ्यासारखे परफेक्ट ब.व. जमण कठीण आहे मला.

Pages